मला स्पेस हवी पर्व १ - भाग ८ Meenakshi Vaidya द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • लोभी

          "लोभी आधुनिक माणूस" प्रस्तावनाआजचा आधुनिक माणूस एकीकडे...

  • चंद्रासारखा तो

     चंद्र आणि चंद्रासारखा तो ,जवळ नाहीत पण जवळ असल्यासारखे....च...

  • दिवाळी आनंदाचीच आहे

    दिवाळी ........आनंदाचीच आहे?           दिवाळी आनंदाचीच आहे अ...

  • कोण? - 22

         आईने आतून कुंकू आणि हळदची कुहिरी आणून सावलीचा कपाळाला ट...

  • कथानक्षत्रपेटी - 4

    ....4.....लावण्या sssssss.......रवी आणि केतकी यांचे लव मॅरेज...

श्रेणी
शेयर करा

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ८

मला स्पेस हवी पर्व १ भाग ८

मागील भागात आपण बघीतलं की नेहाने तिच्या आईला सांगितलं पण तिला काही पटलं नाही.आता काय होईल या भागात बघू.

नेहाने काल ऑफीसमध्ये ती प्रमोशनवर बंगलोरला जायला त्या आहे हे सांगितल्यामुळे ती आता बंगलोरला जाण्याची तयारी करण्यात गुंतली.

ती जाणार म्हणून घरात ज्या अस्वस्थ हालचाली सुरू होत्या त्याकडे कळूनही नेहाने दुर्लक्ष केलं. तिला आता यात गुंतायचं नव्हतं. हे सगळे पाश तिला नकोसे झाले होते.

जेवणाच्या टेबलावर आता कमालीची शांतता असायची. सगळे जेवायचे पण जेवताना प्रत्येक जण आपल्या विचारात असायचा. नेहा त्यांच्या बरोबर जेवायला असायची पण त्रयस्थपणे जेवायची.

जेवताना निरागसपणे ऋषी नेहाशी बोलायचा प्रयत्न करायचा. त्याच्या प्रश्नांनापण नेहा त्रयस्थ पणे उत्तर द्यायची. सुधीरला हे सगळं बघवत नसे. आपल्या मुलांशी बोलताना नेहाच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर इतका कोरडेपणा कसा असू शकतो याचं कोडं सुधीरला सुटत नव्हतं.

नेहाचं जेवण झालं की उठून हात धुवायला निघून जायची.

सुधीरची आई नेहाचा निर्णय कळल्यापासूनच ऋषीला आपल्या जवळ झोपायला नेऊ लागली होती. नेहाचं निर्विकार वागणं बघून त्या सुधीरच्या बाबांना म्हणाल्या

" मला नेहाचं वागणं बघून असं वाटतं आहे की तिने आपल्या घरातून, आपल्या संसारातून मन काढून घेतलं आहे. इतकं निर्विकार वागणं तेही आपल्या लहानग्या बाळाबरोबर ती कशी वागू शकते? नऊ महिने ज्याला पोटात वाढवलं,ज्याला जगात आणण्यासाठी एवढे कष्ट घेतले त्याच्याबरोबर असलेली नाळ नेहा इतक्या चटकन कशी तोडू शकते. मला याचं नवल वाटतंय."

" नेहाचं वागणं विचीत्र आहे पण त्यावर आता तू फार विचार करू नकोस. तिने निर्णय घेतला आहे. ती या निर्णयावर ठाम आहे. सुधीरने परवानगी दिली आहे मग आपण तिला थांबवू शकत नाही."

सुधीरच्या बाबांच्या बोलण्यावर सुधीरची आई म्हणाली,

" मला नाही वाटत सुधीरने परवानगी दिली असेल."

" अगं तोच म्हणाला नं. तिचं करीयर आहे जाऊ द्या."

" याशिवाय तो काही म्हणून शकत नसेल म्हणून जाऊ द्या म्हणाला. तिही आपल्या घराशी, आपल्याशी काही संबंध नसल्यासारखी वागतेय याचं मला आश्चर्य वाटतंय."

" तू म्हणतेस ते बरोबर आहे. मलाही तसंच वाटतंय तिचं वागणं बघून. पण आपण काही करू शकत नाही.आपण सुधीर आणि ऋषीची काळजी घ्यायची. आपण त्यांच्या पाठीशी राह्यचं एवढंच करू शकतो. काही दिवस तरी सुधीर अस्वस्थ राहील. आपण सांभाळून घ्यायला हवं. आपण त्याच्या पाठीशी राह्यलो, त्याला समजून घेतलं तर तो पूर्वीसारखा होईल."

" हो आपण सुधीरच्या पाठीशी राह्यला हवं तरच तो पूर्ववत होईल. हं चला झोपू ऊद्यापासून ऋषीला शाळेसाठी तयार करण्याची आता माझी ड्यूटी सुरू झाली."

" हो. मी तुला मदत करीन. मी ऋषीला आंघोळ घालत जाईन. तू टिफीनचं बघ."

"हो. त्याच्या आंघोळीचे तुम्हीच बघा. एकदा बाथरूममध्ये शिरला की लवकर बाहेर येत नाही. त्याला ओढून आणावं लागतं. एवढ्या वेळ शाॅवर खाली उभा असतो पण अंगाला साबण किती लावतो कुणास ठाऊक?"

सुधीरची आई हसत म्हणाली.

" जाऊ देग. लहान आहे. सुट्टीच्या दिवशी मी त्याला आंघोळ घालीन. साबण लावून चकाचक करीन."

"कायतरी बाई बोलणं ! तो काय वस्तू आहे चकाचक करायला."

" अगं गमतीने म्हणालो. मुलांशी असंच गमतीशीर बोलून त्यांना आंघोळ घालावी लागते. सुधीरला कशी आंघोळ घालायचो मी आठवतं का?"

हे बोलताना सुधीरचे बाबा हसले.

" हो आठवतं तर. काय त्या गमतीदार ताडोबाच्या जंगलाच्या गोष्टी सांगायचे. नुसतं सांगायचे नाही त्या गोष्टी सांगताना तुमचे हातवारे किती असायचे. तो वाघोबाचं आवाज काढणं. सगळच मजेशीर असायचं."

" अगं अश्या गोष्टी सांगायचो म्हणून तर त्याला कधी मी त्याच्या डोक्याला शांपू करायचो कळायचं नाही. नाहीतर एरवी केसांना हात लावू द्यायचा नाही "

सुधीरच्या बाबांच्या या बोलण्यावर दोघांनाही सुधीरचं लहानपण आठवून खूप हसायला आलं.

"आता पुन्हा ज्युनिअर सुधीरला आंघोळ घालण्याची जबाबदारी तुमची हं"

" बिलकूल. मी ही जबाबदारी ऊचलणार आहे. ऊद्या पासून सकाळी आपली ड्युटी सुरू त्यामुळे आता झोपूया."

"प्रियंकाला आंघोळ खूप आवडायची. दोघांच्या दोन त-हा. प्रियंकाला किती ओरडावं लागायचं. दिवसभर आंघोळ कर म्हटलं असतं तरी पठ्ठीने केली असती."

हसतच सुधीरची आई म्हणाली.

"अजूनही प्रियंकाचं लहानपण आठवतं"

हसता हसता गंभीर होत सुधीरची आई म्हणाली.

" हं. आठवणारच.अग मुलगी होती आपली. आपल्या काळजाचा तुकडा. कसं विसरणार? अगं नवजात बाळ दगावले तरी आईबाप किती दु:खी होतात. त्या बाळाचा सहवास खूप मिळाला नसला तरी किती ते त्या बाळात गुंतलेले असतात. इथे प्रियंका तीस वर्षांची होऊन गेली. तिच्या सहवासात आपण कितीतरी क्षण घालवले आहेत. कसं विसरणार ते क्षण."

सुधीरचे बाबा कळवळून म्हणाले.

" हो खरय हो तुम्ही म्हणता ते. प्रियंकाला मूलबाळ नव्हतं ते एकप्रकारे बरंच झालं.त्याला कसं वाढवलं असतं. आत्ता ऋषी पाच वर्षांचा तरी आपल्याला काळजी वाटतेय. परमेश्वर बघत असतो. आपल्या या वयात त्याने ती जबाबदारी आपल्याला नाही दिली."
" नको त्या आठवणी काढू चल आपण झोपूया आता."
सुधीरचे बाबा म्हणाले.

"सुधीरला झोप लागली असेल का नाही माहिती नाही."

अस्वस्थ पणे सुधीरची आई म्हणाली.

" सुधीरला झोप लागणं कठीण आहे. त्यालाही कठीण जात असेल नेहाने घेतलेल्या निर्णयाला पचवणं. सवय झाली की सगळ्या गोष्टी सोप्या होतात तसं सुधीरलाही सवय होईल. झोप आता फार विचार करू नकोस. ऋषी झोपला नं?"

"हो. केवढीतरी मोठ्ठी गोष्ट सांगितली तेव्हा झोपला. सारखं म्हणत होता आजी मोठ्ठी गोष्ट सांग."

" कोणती गोष्ट सांगीतली?"

" तुम्ही जी सुधीरला आंघोळ घालताना सांगायचे तीच."

" ताडोबाची.?"

" हो."

हसतच आई म्हणाली तसे सुधीरचे बाबा पण हसले.

" ही ताडोबाची गोष्ट बरी आहे जितकी लांबवायची असेल तितकी लांबवता येते."

" चला झोपूया. ऊद्या ज्युनिअर सुधीरला आंघोळ घालायची ड्युटी माझी आहे. तेव्हा गुडनाईट ऋषीची आजी."

हे बोलून सुधीरचे बाबा जोरात हसले आणि झोपायला गेले.

सुधीरच्या आईच्या लक्षात आलं की बाबांच्या हसण्यामागे दु:ख लपलय. त्यांनी आपले डोळे पुसले आणि त्याही झोपायला गेल्या. पण सुधीरच्या आईला मात्र बराच वेळ झोप लागली नाही.

***

त्या दिवशी निशांतने लंचटाईमला सुधीरला गाठला.

" सुधीर तुला माझ्याशी काही बोलायचं होतं नं?

" हं. जेवताना सांगतो."

" चल मग."

निशांत आणि सुधीर कॅंटीनमध्ये गेले. सुधीर आणि निशांत नेहमीच्या जागी येऊन बसले.

" काय झालं सुधीर? सगळं शांतपणे सविस्तर सांग."

निशांत त्याचा डबा उघडता उघडता सुधीरला म्हणाला.

" निशांत नेहा प्रमोशन घेऊन बंगलोरला चालली आहे."

" अरे वा! ही तर छान बातमी आहे. मग तू एवढा नाराज का? तुझी परवानगी नाही का नेहाला? तुला पटलं नाही."

" तसं काही नाही."

" मग काय झालंय की तू इतका अस्वस्थ आहेस?"

" हं"

सुधीर हसला.

" अरे हसतोय का?"

निशांतने आश्चर्याने विचारलं.

"निशांत नेहा बंगलोरला फक्त प्रमोशनच घेउन जाणार असती तर मला आनंदच झाला असता. पण नेहाने प्रमोशन वेगळ्याच कारणासाठी घेतलंय. ते कारण मला पटलेलं नाही."

" कोणतं कारण?"

" तिला आता तिच्या आयुष्यात स्पेस हवी आहे."

" स्पेस हवी आहे. म्हणजे?"

निशांतला या वाक्याचा अर्थ कळला नाही.

" ती म्हणाली मला माझ्यासाठी वेळच देता येत नाही. सगळ्या भूमिका करता करता मी मला कधीच भेटत नाही. म्हणून मला एकटं राह्यचं आहे."

" कमाल आहे. आत्ता लग्नाला इतकी वर्ष झाल्यानंतर तिला स्पेस हवी आहे. आणि एकटं राहून काय करणार ती? काही दिवसांनी तिला एकटेपण झेपणार नाही."

" सांगीतलं मी तिला. तिला म्हटलं काही दिवस एकटीच बाहेर फिरून ये. आम्ही कोणी तुला फोन करून डिस्टर्ब करणार नाही. तुला हवी ती स्पेस मिळेल. तू फ्रेश झाली की ये परत. तर नाही म्हणाली. मला काही दिवसांसाठी नाही जायचं."

" हे काहीतरी विचित्र वाटतंय. सुधीर तू रागाऊ नकोस पण एक विचारू का?"

" अरे विचार नं. तू दोस्त आहे आपला विचार."

" ती कंटाळली आहे का तुझ्याबरोबर.की दुसरं कोणी तिच्या आयुष्यात आला आहे?"

" तिच्या आयुष्यात दुसरं कोणी नाही याची खात्री मी केली आहे. तिला वेगवेगळे प्रश्न विचारून खात्री केली आहे. तिचं अफेयर असतं तर ती कुठेतरी ऊत्तर देताना गडबडली असती. ती माझ्याबरोबर राह्यला कंटाळली असावी असं वाटतं आहे."

" असं असेल तर तिला जाऊ दे. काही दिवसांनी तिला कळेल."

" अरे ते ठीक आहे.पण आत्ता ऋषीला कसं सांभाळू कळत नाही."

" हळूहळू त्यालाही सवय होईल. तुझ्या आईबाबांना सांगीतलं का नेहाला स्पेस हवी आहे हे."

" नाहीं अजून नाही सांगीतलं. नेहा बंगलोरला गेल्यावर सांगीन."

" सुधीर या गोष्टीचा फार विचार करू नको. खूप विचार केलास तर तू असाच अस्वस्थ राहशील. यामुळे तुझ्या घरातलं वातावरण पण बिघडेल. तुझे आईवडील कायम टेन्शनमध्ये राहतील आता या वयात त्यांना हे टेन्शन देणं योग्य नाही. या सगळ्या परिस्थिती मध्यें ऋषीचं बालपण कोमेजुन जाईल. म्हणून मला असं वाटतं की तू शांत रहा नेहाला जाऊ दे. सुधीर तू ऋषी आणि आईबाबा यांच्यासाठी घरातील वातावरण नाॅर्मल ठेवावं असं मला वाटतं."

" तुझं म्हणणं बरोबर आहे. पण मला कळत नाही इतक्या वर्षाच्या सहवासातून तिला माझ्या बद्दल काहीच फिलींग्ज नसतील का?"

" तुझ्या बद्दल काहीच फिलींग्ज नसतील असं नाही पण सध्या तिला प्रायोरिटी स्पेसला द्यावीशी वाटत असेल. तर तशी दे तिला. प्रत्येकाला स्वतःच्या मनाप्रमाणे आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. तो दिला दे. कसं आहे सुधीर नेहाला खूप दाबून ठेवलेस तर चेंडू कसा उसळून वेगाने वर जातो तसं होईल. तसं होऊ नये म्हणून नेहाला तिच्या इच्छेप्रमाणे जाउ दे. आता हे दोनतीन दिवस तिच्याशी छान पूर्वी सारखं बोल म्हणजे तीह रिलॅक्स मूडमध्ये बंगलोरला जाईल. काही दिवसांनी बघ तू तिलाच तिथे एकटेपणाचा कंटाळा येईल."

" तसं झालं तर फार बरं होईल. मला आमचा संसार मोडायचा नाही. "

हे बोलताना सुधीरच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं ते बघून निशांतला पण खूप वाईट वाटलं. निशांत सुधीरच्या हातावर थोपटत म्हणाला,

" सुधीर काळजी करू नकोस. असं काही होणार नाही.'

" निशांत मी नेहावर खूप प्रेम करतो रे. ती जर माझ्या आयुष्यातून निघून गेली नं तर मी नाही जगू शकणार. ऋषी कसा राहील आईशिवाय."

" सुधीर रडू नकोस.असं काही होणार नाही."

बराच वेळाने सुधीर शांत झाला. निशांत आणि सुधीर दोघंही आपापला लंचबाॅक्स घेऊन कॅंटीनच्या बाहेर पडले.
______________________________

नेहा बंगलोरला गेल्यावर सुधीर आईबाबांना सांगेल का? त्यांना ही गोष्ट झेपेल का? बघू पुढील भागात.