मला स्पेस हवी पर्व १ - भाग ९ Meenakshi Vaidya द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ९

मला स्पेस हवी पर्व १ भाग ९

मागील भागात आपण बघीतलं की नेहाची बंगलोरला जाण्याची वेळ जवळ आली आहे.ती बंगलोरला जाताना नेहा कशी वागते बघू या भागात.

नेहाची बंगलोरला जणारी बस रात्री असते. त्या दिवशी तिला पुण्याच्या स्वस्तिक टूर्स अँड ट्रॅव्हल ऑफीसमधून लवकर सुट्टी मिळते कारण सगळी तयारी करून तिला रात्री ट्रेन पकडायची असते.

नेहा अर्ध्या तासांपूर्वी घरी आलेली असते. ती बॅग व्यवस्थित भरली आहे नं हे पुन्हा चेक करते. या आधी तिने दोनदा चेक केलेली असते तरी पुन्हा एकदा बघते.गडबडीत काही राहून जायला नको म्हणून ती काळजी घेते.

नुकताच ऋषी झोपेतून उठला आणि सरळ नेहाच्या खोलीत आला. नेहाला बॅग भरताना बघून ऋषीने मागून तिच्या कमरेला मिठी मारली. त्याबरोबर बॅग आवरता आवरता नेहा झटदिशी एखादा करंट लागावा तशी थांबली. तिच्या चेहे-यावर खूप आठ्या पडल्या. तिला हे सगळे बंध नकोसे वाटायला लागले असतात.

"ऋषी बाजूला हो मला बॅग आवरू दे."

"आई मला दूध बिस्कीट दे नं"

ऋषी नेहाच्या कमरेच्या भवतीच मिठी न सोडता म्हणाला.

नेहाच्या आवाजात तिखटपणा तिच्याही नकळत आला.

"ऋषी तुला कळत नाही का मी काम करतेय. आजी आहे नं. जा आजीला मागं. आता तुला जे काय लागेल ते आजीलाच मागायचय. जा तिकडे. कमरेच्या भवतीच हात सोड."

"रोज आजीलाच मागणार आहे. आज तू दे नं आई."

ऋषीच्या स्वरात आर्जव होतं त्याला दाद न देता नेहाने जबरदस्ती जोरात ऋषींचे आपल्या कमरेभवतीचे हात सोडवली आणि म्हणाली,

"काय वेडेपणा चाललाय. एकदा सांगून समजत नाही? जा तिकडे."

ऋषी आई ओरडल्या मुळे कोमेजून एवढं तोंड करून खोली बाहेर आला. खोलीबाहेर सुधीरची आई उभी असते. नेहाचं ऋषीशी असं बोलणं त्यांना आवडलेलं नसतं पण त्या काही बोलत नाही.

"आजी आई रागावली मला."

"अरे आईला आज जायचयं नं मग तिला काम करू दे. मी देते नं तुला दूध आणि बिस्कीट "

खोलीतून नेहाने सासू आणि ऋषीचं संभाषण ऐकलं. तिच्या चेहऱ्यावर नापसंतीची छटा उमटली.

सुधीरची आई ऋषीला घेऊन स्वयंपाक घरात आली . डायनिंग टेबल जवळच्या खुर्चीवर बसला. सुधीरच्या आईचं मन गलबललं. त्यांना वाटलं आज नेहा जाणार आहे तर पाच मिनीटे तिने ऋषीला दूध देण्यासाठी वेळ दिला असता तर काय बिघडलं असतं. नेहा रात्री जाणार आहे. रोज तर आपणच ऋषीचं सगळं करणार आहोत.

दूध पिताना ऋषीने विचारलं,

"आजी आई तिकडे गेल्यावर रोज तिथेच राहील?"

"हो बाळा.आईचं ऑफीस तिकडेच आहे."

"मग आपण कधी जायचं तिचं ऑफीस बघायचय मला."

"असं कोणालाही ऑफीसमध्ये येऊ देत नाही बाळा. जो त्या ऑफीसमध्ये नोकरी करतो त्यालाच तिथे जाता येतं."

"आई मग कधी येईल इकडे ?"

"आईला सुट्टी मिळाली की लगेच धावत येईल."

"माझ्यासाठी?"

"हो. तू आईचं पिल्लू आहेस नं. मग तर आई येणारच."

सायीचे विरजण लावता लावता सुधीरची आई म्हणाली. पण असं होणार नाही अशी मनात कुठेतरी त्यांना वाईट शंका येत होती. त्यामुळे त्या अस्वस्थ झाल्या.

ऋषीशी शांत आवाजात सुधीरची आई जरी बोलल्या असल्या तरी त्यांच्या मनात खूप विचार चालू होते.त्यांना पुढचं सगळं जरा कठीणच दिसत होतं.

दुध बिस्कीट खाऊन ऋषी खेळायला शेजारी गेला.

सुधीरच्या आईच्या मनात नेहाचं कोरड्या स्वरात आणि चिडलेल्या स्वरातील बोलणं घुमत होतं. त्यांना नेहाचं इतकं कोरडे वागण्याचं कारण कळत नव्हतं.

विरजण लावून चहा करून आईने चहा कपात गाळला. दोन कप आणि बिस्कीटं घेऊन डायनिंग टेबल पाशी आल्या.

"आत्ता मी विचारणारच होतो. चहा झाला की नाही?"
सुधीरचे बाबा म्हणाले.

"रोज करतेच नं यावेळला चहा."
चहाचा कप सुधीरच्या बाबांसमोर ठेवत त्या म्हणाल्या.

"ऋषी उठला का ग?"

"हो. उठला दूध बिस्कीट खाऊन खेळायला गेला."

"आज रात्री जाणार नं नेहा."

" हं"

सुधीरची आई यापेक्षा फारसं बोलली नाही. सुधीरच्या बाबांना थोडं आश्चर्य वाटलं पण ते काही बोलले नाही. चहा पिऊन होताच पायात शूज घालून ते फिरायला निघाले.

"काही आणायचय का येताना?"

"काही नाही."

"भाजी आहे का घरात?"

"आहे ऊद्या पुरती. ऊद्या आणा."

" काही आठवलं तर फोन कर."

सुधीरच्या आईने मानेनेच हो म्हटलं.

सुधीरच्या बाबांच्या खिशात एक फोल्डिंग पिशवी नेहमी असायची. फिरून येताना काही वस्तू आणायची असेल तर ते घेऊन येत. ते फिरायला बाहेर पडले.

***

सुधीरची आई डायनिंग टेबल पाशी चहा संपला तरी थिजल्यासारखी बसली होती. त्यांच्या मनाला नेहाचा मघाचा ऋषीबरोबर बोलतानाचा कोरडा स्वर राहून राहून टोचत होता. नेहाच्या वागण्यामागे काय कारण असावं?काही न समजून त्या बराच वेळ तिथेच बसून राहिल्या.

संध्याकाळचे फिरून सुधीरचे बाबा घरी आले.त्यांनी किल्लीने दार उघडलं. घरात मिट्ट काळोख होता. त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी दिवे लावले आणि बायको कुठे गेली हे बघायला आतमध्ये आले तर सुधीरची आई डायनिंग टेबल जवळ नुसती बसून होती इथेही अंधारच होता. या खोलीतला दिवा लावून त्यांनी सुधीरच्या आईला हलवून विचारलं

"कायग! काय झालं? अशी का अंधारात बसलीस.?"

"अं "

सुधीरच्या बाबांच्या आवाजाने त्या भानावर आल्या.

"तुम्ही कधी आलात?"
गोंधळून आईने विचारलं.

"मी आत्ताच आलो. काय झालं? बरं वाटतं नाही का?"

"बरं आहे."

"मग कसल्या विचारात होती‌स? मी जाऊन फिरून आलो. म्हणजे एक तास झाला. तू अशीच बसली आहे?"

"हं. मी जरा खोलीत जाऊन पडते."

"जा. बरं वाटत नसेल तर झोप."

सुधीरच्या आईला आत्ता कोणाशीच बोलायची इच्छा नव्हती. वारंवार त्यांच्या डोळ्यासमोर ऋषीचा मघाचा कोमेजलेला चेहरा आणि नेहाचा कोरडा स्वर कानात घुमत होता. त्या जडशीळ पावलाने उठून आपल्या खोलीत गेल्या. त्यांना पाठमोरं बघताना सुधीरच्या बाबांना कसला अंदाज बांधता येत नव्हता पण त्यांना असं वाटलं की नेहा आज बंगलोरला जाणार आहे म्हणून कदाचित ही उदास असेल. ते शूज काढून ठेवायला बाहेरच्या खोलीत गेले.

***
सुधीरच्या बाबांनी सुधीरला फोन लावला.

" हॅलो"

" सुधीर आज लवकर येतो आहेस नं. आज नेहाला बंगलोरला जायचय."

" हो बाबा.ऑफीस सुटलं की येतो."

" आज जास्तीचं काम असेल तर सांग साहेबांना"

" हो."

सुधीर फोन ठेवतो.

सुधीरच्या बाबांच्या मनात आपल्या बायकोला काय झालं असावं हा विचार डोकावला. आपण फिरायला जाण्यापूर्वी चांगली होती. नेहमीसारखी नव्हती बोलत. कदाचित आज नेहा जाणार म्हणून उदास झाली असावी.ऊद्यापासून तिची खूप धावपळ होणार आहे. आपण तिला मदत करायला हवी.

सुधीरचे बाबा डोळे मिटून बसले.

***
सुधीर आज लवकर घरी आला. नेहाचं सगळं पॅकिंग झालेलं होतं. मघाशीच सरस्वती बाईंनी येऊन सगळा स्वयंपाक केला होता.

सुधीर आला आणि खोलीत गेला. नेहा तयार होत होती. क्षणभर सुधीर थबकला. त्याचं मन भरून आलं. त्याला वाटलं पटकन नेहाला मिठीत घ्यावं आणि मला तिचा विरह सहन होणार नाही हे पुन्हा सांगावं पण तो तसं करू शकत नव्हता. त्याच्यात हिम्मत नव्हती असं नाही पण त्याच्या ऊत्कट मिठीला नेहा प्रतिसाद देणार नव्हती हे त्याला माहीत होतं. असं झालं असतं तर तो मनातून दु:खी झाला असता. सुधीर इच्छा होऊनही जागीच उभा राहिला आणि एकटक नेहाकडे बघायला लागला.

नेहा आरशासमोर उभी राहून केस विंचरत होती. तिचं अचानक सुधीर कडे लक्ष गेलं. सुधीरला आपल्याकडे असं एकटक बघताना बघून क्षणभर तिच्या अंगावर रोमांच उठले पण तिने ते रोमांच लगेच झटकून टाकले. आता तिला कशात अडकायचे नव्हतं. एक क्षण जरी ती अडकली तर मग ती कधीच दूर जाऊ शकणार नाही आणि स्वतःला स्पेस मिळवून देऊ शकणार नाही. म्हणून तिने लगेच स्वतःच्या मनाला सावरलं.

" काय बघतोय?"

नेहा जितक्या कोरड्या आवाजात बोलता येईल तेवढ्या कोरड्या आवाजात बोलली.

नेहाच्या कोरड्या आवाजाने सुधीरला भानावर आणलं

"काही नाही. झाली का तुझी तयारी?"

स्वतःला सावरत सुधीर म्हणाला.

" हो. मी तयार झाले. आता जेवले की निघेन."

" येतोय मी आणि ऋषी तुला सोडायला."

" कशाला? काही गरज नाही. कॅब करून जाईन."

" तू तुझा निर्णय घेतला आहेस. त्याप्रमाणे तू चालली आहेस. मला आणि ऋषीला बसस्टॅंडवर तर येऊ दे. आधीच ऋषी तू जाणार म्हणून कोमेजला आहे. कमीत कमी तुला सोडायला येताना तुझ्या जवळ राहील तर त्याला बरं वाटेल.'

" इथून टाटा केला काय आणि बसस्टॅंडवर टाटा केला काय सारखंच आहे."

" तू इतकी कशी कोरडी झालीस ग नेहा? जरा तर विचार कर ऋषीचा.लहान आहे तो."
आता सुधीरच्या आवाजात राग होता.

" मला याचं सगळ्या गोष्टींपासून दूर जायचयं. नको येऊस "

" नेहा एक दिवस तू पस्तावशील. ज्या नात्यांना तू दूर लोटून चालली आहेस तीच नाती जेव्हा तू खूप प्रयत्न केलेस तरी तुझ्या जवळ येऊ शकणार नाही."

"जाताना कशाला मला शाप दिल्यासारखे बोलतोय. मला या सगळ्या नात्यांची गरज नाही पडणार. मी निघते."

" खात्री आहे तुझी?"

" हो.मी नव्याने माझं आयुष्य सुरु करणार आहे."

" म्हणजे नवी नाती जोडणार."

" नाही. मी माझ्या बरोबरच राहणार आहे."

" असं कसं शक्य आहे? नाती जोडल्या शिवाय आपलं आयुष्य पुढे सरकतच नाही. हे तुला आत्ता नसलं कळत तरी काही दिवसांनी कळेल.सध्या तू सो काॅल्ड स्पेसच्या मागे धावतेय म्हणून आंधळी झाली आहेस."

सुधीर पोटतिडकीने बोलला. पण नेहावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही.नेहाचा चेहरा निर्विकार होता.

नेहा खोलीतून बाहेर पडली आणि सुधीर पलंगावर कोसळल्या सारखा पडला.

_________________________________
नेहा निघून जाताना ऋषीसाठी अडखळले का? सुधीरच्या आईबाबांची प्रतिक्रिया काय असेल बघू पुढील भागात.