घाबरट Nisha Gaikwad द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

घाबरट

 

 

मी सदाशिव रामेश्वर  कर्णिक , वय वर्ष चाळीस , मी विवाहित आहे आणि दोन मुलींचा बाप देखील ,खूप पैसेवाला जरी नसलो तरी पोटापुरत आणि कधीमधी मुलींची आणि बायकोची हौस पुरवण्या इतपत कमावतो , हि झाली माझी जुजबी ओळख, काय म्हणता काम काय करतो , काही विशेष नाही ओ एक सामान्य  सेल्समन आहे एका कपड्याच्या दुकानात , आणि हो माझ स्वतःच एक घर देखील आहे , वडिलोपार्जित असल तरी स्वतःच, भाड्याच नाही , तीच एक गोष्ट आहे जी मी नेहमी अभिमानाने सांगतो, हे सगळ मी तुम्हाला का सांगतोय ,  काही महिन्यांपूर्वी माझ आयुष्य हे अगदी सरळमार्गी होत  , पण मंडळी मला एक तुम्हाला देखील विचारावस वाटत आपल्याला कधी कधी आपल्याच सरळमार्गी आयुष्याचा कंटाळा येतो का , येतोना, अहो येतोच,  काही झाल तरी आपण हाडामासाची माणस आहोत , जीव उबतो , आयुष्यातला तोच तोच पण नकोसा वाटतो , अहो मग माझी तरी सुटका कशी बर होईल ह्यातून , माझ्याआयुष्यात देखील काहीतरी घडल एक अशी विशेष घटना जी मी आयुष्यातून कधीही पुसून टाकू शकत नाही, जीसदैव माझ्या स्मरणात राहिल, कधी कधी वाटत हे जे काही माझ्या आयुष्यात घडल ते घडलच नसत तर , कदाचित काही दिवसांपूर्वी जे मी स्वतःला काहीतरी वेगळ समजत होतो , वेगळ म्हणजे काय तर मी स्वतःला इतरांपेक्षा म्हणजे माझ्या मित्रांपेक्षा खूप चांगला  कधीही कोणत्या हि स्त्री शी साधा बोलायला देखील नजाणारा,  माझा तो समज अहो समज कसला माझा गैरसमज अजूनही आबादित राहिला असता कदाचित वर्षानुवर्ष त्याला धक्काही लागला नसता.

बस झाल आता पल्हाळ लावण, आता मुद्द्याच बोलतो ,  मला दोन मुली एक सिद्धी आणि एक समृद्धी त्यातली सिद्धी इयत्ता तिसरी मध्ये आहे आणि समृद्धी सध्या फक्त सिनियर केजी मध्ये , होमी माझ्या मुलींना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलं आहे, हो हो सेल्समन असलो तरीही , बायको नको म्हणत होती , एकतर ते  शिक्षण आपल्या आवाक्या बाहेरच आहे न परवडणार आणि शिवाय घरात इंग्रजी भाषा हि फक्त A फॉर Apple , पुरतीच मर्यादित आहे , इंग्रजी बोलण तर सोडाच पण इंग्रजी वाचून ते समजून घेण ती फार मोठी तारेवरची कसरत आहे आमच्यासाठी  , आमच्यामोठ्या सिद्धीच्या वेळेचा अनुभव आहे ना मला     त्यांचेशिक्षक आम्हापालकांचा व्हाट्स अँप ग्रुप बनवतात आणि त्यात वर्गातआज काय काय शिकवलं तो  अभ्यास पाठवतात, तर कधी कोणता प्रोजेक्ट मुलांकडून करवून घ्या आणि शाळेत पाठवा हि माहिती देतात , कधी सुट्ट्या बद्दल माहिती तर कधी कोणी कोणी अजून फी नाही भरली ह्याची जाहिरात , कधी कधी हसू येत वाटत आपल्या वेळेला कुठ होत हे सगळ तरी शाळेचे दिवस अजूनही आठवले तरी मन कस ताजतवान होत , तर हा कुठे होतो मी , तर काहीही असो माझ्या मुली मागे राहायला नकोत म्हणून मी त्यांना टाकल इंग्रजी शाळेत , माझी मोठी मुलगीआधीपासूनच त्या शाळेत असल्यामुळे ह्या केजी च्या मुलांचे काय प्रोजेक्ट असतात ह्याची थोडी फार कल्पना मला आधी पासूनच होती म्हणून बर त्यामुळे समृद्धी म्हणजे माझ्या छोट्या मुलीच्या वेळेला मला जास्त त्रास होत न्हवता तिची जुनिअर केजी अगदी सुखरूप पार पडली.मुलीनाशाळेत पोहोचवण्यासाठी सकाळी मी आणि घरी घेऊन येण्यासाठी माझीबायकोअस आम्ही ठरवलेलं आहे , सकाळीमुलीना शाळेत सोडून मी परस्पर माझ्या अक्टीवा ने दुकानावर जातो.

 

तो दिवस इतर दिवसांपेक्षा थोडा निराळा होता, मुलीना सकाळी बरोबर साडेआठ ला शाळेत पोहोचवावे लागे, म्हणून घरातून आम्ही दहा ते पंधरा मिनिट आधी निघत असू , त्या दिवशी मी वेळेच्या जरा जास्तच आधी त्यांनाशाळेत घेऊन आलो, नाही म्हंटल तरी जवळपास दहा मिनिट आम्ही लवकर पोहोचलो होतो , सिक्युरिटीने काही गेट अजून उघडलाच न्हवता , आम्ही आपले थांबलो गेट उघडण्याची वाट पाहत , माझ्याचिमण्यांची चिव चिव चालूच होती मी आपली त्यांना जमेल तशी उत्तर देत होतो ,  हळू हळू सर्व पालक येऊ लागले , एकदाच ते गेट उघडलं मी थांबून कंटाळलो होतो , दोघींना बाय केल्या केल्या मी अक्टीवा सुरु केली आणि माझ्याही नकळत मी घाईत गाडी शाळेच्या रस्त्यातून बाहेर काढली अजून काही पालक मुलांना घेऊन येताना मला दिसत होते , आणि अचानक माझी नजर त्या दोघांवर गेली , एक छोटा मुलगा आणि ती,,,,,,,,त्याची आई ,

मीथांबू कि नको ह्या विचारात होतो , कारणह्या आधी मी कधी कोण्या पर स्त्रीशी संवाद साधला न्हवता , किंबहुना तशी वेळ ह्या आधी माझ्या वर कधी आली न्हवती , ते दोघे रस्त्यात थांबून होतेत्यांना मदतीची गरज होती असेल म्हणून मी  माझी गाडी अगदी त्यांच्या समोर लावतच पटकन खाली उतरलो , ती...तिच्या मुलाचा गुडघा न्याहाळत होती आणि मुलगा बहुदा आधी खूप रडला असावा पण आता तो शांत होता आणि फक्त मुसमुसत उभा होता .

“काय झाल , पडला का हा “ मीएकदा तिच्या कडे आणि मग त्याच्या कडे पाहत विचारल.

तिनेआधी काही वेळ उत्तरच दिल नाही , ती अजूनही त्याची जखम किती खोल आहे तेच पाहत होती .

मग माझ्याकडे न पाहतच, “हो पडला....... हा काय इथेच“ अस म्हणून तिने शेजारचा खड्डा मला दाखवला .

“जास्त लागलंय का “ मी खरतर काळजी ने विचारल .

“नाहीम्हणजे निदान तस दिसत तरी नाहीये, म्हणजेकाहीसमजत नाहीये मला“

अस म्हणून ती त्याला पुन्हा घरी घेऊन जायला निघाली, पण जस त्या मुलाने एक पाऊल उचलतसा तो जोरात किंचाळला, त्याचापाय मुरगळला होता आणि त्याला प्रचंड वेदना होत आहे हे त्याच्या ओरडण्यावरून स्पष्ट दिसत होत.

त्याच्यात्या तश्या ओरडण्याने ती दचकली, बैचेन झाली , तिला आता काय कराव हे सुचत न्हवत , तो चालू शकतच न्हवता आणि शाळेच्या रस्त्यापासून मुख्य रस्ता हा बराच लांब होता , रिक्षा तिथूनच भेटली असती , तिला काही त्याला उचलून घेऊन चालन शक्य होणार न्हवत हे मला तिच्या हालचालीवरून कळल, पण ती स्वतःहून काही माझीमदत मागायला तयार न्हवती,

म्हणून मग मीच तिला“कुठे राहता तुम्ही , या बसा मी सोडतो” अस म्हणालो.

“नको अहो,  मी जाईल त्याला घेऊन “ अस म्हणून तिने त्याला उचलून चार पावलं चालण्याचा प्रयत्न केला पण तिला ते सवय नसल्यामुळे तिच्या मुलाच वजन तिला झेपत न्हवत.

“अहो, बसा तुम्ही दोघ , का अस करताय सोडतो मी “ अस म्हणून मीच नाईलाजानेतिच्या मुलाला उचलून माझ्या पुढे बसवलं आणि गाडी स्टार्ट करू लागलो , ती निमूट येऊन माझ्या मागे बसली.

गाडी सुरु असतानाच ती तिच्या घराचा रस्ता मला दाखवीत होती , वळणाला, आणि ट्राफिक मध्ये असताना  गाडीच्याउजव्या  बाजूच्या आरशातून तिचात्रासिक चेहऱ्याकडे सारख लक्ष जास्त होत, ती फारच अवघडून माझ्या मागे बसली होती जणू कधी एकदाच तीच घर येईल आणि ती उतरेल माझ्या गाडीतून ह्याची ती वाटच पाहत होती.एकदाची तिची बिल्डींग आली, मी तिच्या मुलाला खाली उतरवल आणि माणुसकी म्हणून वर  तिच्या घरापर्यंत देखील जाणार होतो पण तिनेच मला “बस बस धन्यवाद हा“अस म्हणून “ अरेशंकर” अशी जोरात हाक मारली , शंकर तिच्या बिल्डींगचा सिक्युरिटी होता, शंकर ने तिच्या मुलाला उचलून घेतलं आणि तो लिफ्टकडेचालू लागला , मग ती देखील माझ्याकडे वळूनही न बघता , इकडे तिकडे बघत निघून गेली.

मला कमाल वाटली ,काय बाई आहे , घर आल तस माझ्याकडे न बघताच निघून गेली , तुम्ही वर आमच्या घरी येता का, थोडा चहा घ्या , बर एकवेळ घरी बोलवायचं किंवा चहाच जाऊदे,  पण निदान माझ्याकडे बघेल तरी जाताना , तर नाही गेली आपली , मलाचनेहमी दुसर्याला मदत करायची हुक्की येते बिनकामाची , चला सदाशिवराव दुकानावर चला , नाहीतर तिकडे महायुद्ध सुरु होईल असमनातल्या मनात म्हणत मी  गाडीला किक मारली.

आज सकाळपासूनच ते दुपारी  जेवणाच्या सुट्टीपर्यंत दुकानात भरपूर कस्टमर अटेंड केल्यामुळेमोबाईल पहायला काय हातात सुद्धा घायला मिळाला न्हवता , मी जेवणाचा डब्बा उघडला आणि शांतपणे मोबाईल पाहत जेवू लागलो, मोबाईल मध्ये भरपूरव्हाट्सअँप मेसेज आले होते , शुभ सकाळ , त्यात काही सुविचार , काही कविता , काही लेख , ताज्या घडामोडी , मनोरंजक व्हिडिओ अस बरच काही होत , तेसर्व पाहत मोबाईल स्क्रोल करत असताना खूप खाली जवळपास शेवटून दुसराएक नवीन नंबर दिसला , त्या नंबर वरूनव्होईस मिस्ड कॉल येऊन गेलेला  होता , आणि“खूप मनापासून धन्यवाद” असा एक मेसेज देखील होता, मी त्या  नंबरच्या डीपी वर जाऊन पाहिलं तर अरेच्चा हा तर सकाळचा मुलगा ज्याला आपण घरी सोडलं , अरे पण सकाळी तर हि बाई काही न बोलता माझ्याकडे वळूनही न बघता निघून गेली होती आणि आता मेसेज करते , पण एक मिनिट हिला माझा नंबर मिळाला कुठून , मी तर स्वतः हून दिला नाही.

मी लगेचच तिला“हॅलो....” असा मेसेज केला.

 

पुढच्या काही सेकेंदातच“ नमस्कार, सकाळसाठी तुमचे पुन्हा एकदा आभार”आणि पुढे हात जोडलेला एक ईमोजी,

 

“अहो त्यात काय इतक” माझा रिप्लाय.

 

“हो पण तरीही खूप खूप आभार “

 

“कसा आहे त्याचा पाय आता“ मीआपल बोलन पुढे सुरु ठेवायच्या उद्देशाने म्हणालो.

 

“डॉक्टर बघून गेलेत , पेनकिलर दिली आहे , होईल म्हणाले दोन – तीन दिवसात बरा “

 

“व्वा, छान, थोडक्यात निभावल”

 

“होना“

 

आता पुढे काय बोलायचं , बाय म्हणूया पण  न जाणो मला तिच्याशी  अजून बोलायच होत,  तिला कसली तरी भीती वाटते म्हणून ती मोकळेपणाने बोलत नाहीये अस काहीस मला तिच्यासकाळच्या वागण्यातून जाणवल होत. मला तिच्या बद्दल प्रचंड कुतुहूल निर्माण झाल होत .

 

“काय नाव काय छोटूच “ मी संवाद पुढे चालू रहावाह्या उद्धेशाने म्हणालो.

 

“अश्वत”

 

“अरे व्वा छान नाव आहे कि , आणि तुमच नाव “ मी टाकल एकदाच विचारून.

 

“सौ, तळपदे“ इतकाचरिप्लाय आणि मग ती ऑफ लाईन गेली.

 

मला आपल उगीच वाटू लागल, तिला राग तर नसेल ना आला , कारण मी ह्या आधी कधीही कोणत्या बाईशी डायरेक्ट संवाद साधला न्हवता , बायकांशी कस बोलाव ह्यांचे जर प्रशिक्षण वर्ग असते तर किती बर झाल असत , आता ह्या तळपदे बाई ला राग आलाय कि नाही हे कस समजणार , पण सदाशिव तू का बर इतका विचार करतोयस , काम आहेत पुढ्यात भरपूर ,अर्र.....तिलाआपला नंबर कुठून मिळाला हे तर विचारलच नाही, पुन्हा करायचा मेसेज नाहीतर नको पुन्हा शाळे जवळ भेट होईल कधीतरी तेव्हा विचारू.

 

पण नंतर बरेच दिवस ती शाळेजवळ दिसलीच नाही , आणि तिच्याशी फोन वर , मेसेज वर बोलाव तर तिने मला ब्लॉक केल होत , मला तिच्या वागण्याचा काही अंदाज लागत न्हवता, मी खरतर चार दिवसाने तिला विसरूनही गेलो , आणि त्या दिवशी सकाळी तब्बल आठ दिवसाने तळपदे बाईचं दर्शन झाल , अश्वतचा पाय आता पूर्णपणे बरा झाला होता , त्या दिवशी रडून गोंधळ घालणारा,  आता मात्र पठ्या चांगलाचउड्या मारत चालत होता , मी माझ्या मुलींसोबत  गाडी वर  त्यांच्या मागून पुढे गेलो, ते दोघ छान बोलत , गप्पा गोष्टी करत जात होते , मुलांनाशाळेत सोडल्यानंतर मला वाटल तळपदे बाई बोलेल माझ्याशी पण तिने तर साधी ओळखही दाखवली नाही , मला थोड चमत्कारिकच वाटल , मी चक्क तिला बघून स्मितहास्य केल  होत पण ती सर्रास दुर्लक्ष करीत होती , मनात म्हटलं काय बायका असतात ह्यांना मदत करावी आणि नंतर मात्र ह्या ओळख देखील दाखवीत नाही , अरे पण सदा तुला मदत करायला सांगितलीये कोणी तूच गेलास ना स्वतःहून , आता तिला नको असेल तुझ्याशी ओळख वाढवण त्याला तू तरी काय करणार.

 

त्या नंतर मी देखील तिच्याकडे ढुंकूनही न पाहता सुसाट वेगाने तिला ओलांडून निघून गेलो, दुपारी दोन पर्यंत भरपूर काम होत आज मालकाने स्टॉक  मोजायचंकाम दिल होत, अगदी पाणी प्यायलाकिंवापोटातली टाकी रिकामी करायलादेखील सुचल न्हवत , पण आता मात्र पोटातले कावळे ओरडत होते मी सगळ बाजूला ठेवून आधी हात धुवून डब्बा खायला बसलो , बायको ने आज डब्ब्याला माझी आवडतीभरपूरटोमाटो टाकून शेवची भाजी दिली होती , आधीच पोटात भूक मी अक्षरशः जेवणावर तुटून पडलो . दोन घास खाल्ले आणि मला माझ्या मोबाईलची आठवण झाली , मोबाईल बाहेर काढून पाहतो तर तळपदे बाई चा मेसेज , “जेवलात का “ , तिने मेसेज तासाभरापूर्वी केला होता , पण तरीही तीऑनलाईन  दिसत होती मी“हो जेवलो”अस टाईप केल, मेसेज सेंड झाल्याबरोबर ब्लू टिक झाला जणू ती माझ्याच प्रोफाईल वर थांबून माझ्या रिप्लाय ची वाट पाहत होती , तिनेमेसेज वाचला होता लगेच , त्यामुळे मी देखील तिला मेसेज  करून“तुमच झाल जेवण “ असा मेसेज केला . तो देखील पटकन वाचला गेला आणि त्यावर“ हो” आणि गालातल्या गालात हसणारी इमोजी पाठवली, काही क्षण ती स्वतःच माझ्याकडे बघून हसतेय अस वाटल , हातात घास तसाच पकडून मी मोबाईल पाहत होतो, जेवणावरून लक्ष कधीच उडालं होत, तिच्याशी आणखीन काय बोलाव ह्या विचारात असतानाच ती पटकन ऑफलाईन  गेली , आणि चक्क तिचा डीपी आणि लास्ट सीन पण दिसायचा बंद झाला, ह्याचा अर्थ तिने मला ब्लॉक केल, का? , आता तर छान बोलत होती , आणि मधेच काय झाल , ती मोबाईल अक्षरशः बाजूला फेकून दिला आणि रागारागाने पटापट जेऊ लागलो , जेऊन झाल पाणी पिऊन पुन्हा कामाला लागणार पण तरीही आधी मी मोबाईल वर काही मेसेज आलाय का ते पाहिलं , मेसेज न्हवता , मन नाराज झाल पण नंतर वाटलअसेल ती भित्री म्हणून नको असतील तुझे मेसेज अरे पण मग अस होत तर मला का आधीमेसेज करून जेवलात का वैगेरे का विचारल , आणिमग जेव्हा मी बोलायला लागलो तेव्हा का मग ब्लॉक केल , असोआपण तिचा इतका विचार करता कामा नये , इतक तिला महत्व द्यायचं काही कारण नाही , मघाशी तू रागाने फोन फेकलास हे बर न्हवे , मोबाईलला काही  झाल तर नवीन मोबाईल लगेच घेण जमणार आहे का तुला , नाहीना मग जरा विचार करून वाग, मी फोन खिशात ठेवून काम करू लागलो.

 

रात्रीघरीगेल्यावर बायकोला रिकामा डब्बा हातात देताना तिने माझ्याकडे मी काहीतरी बोलेल ह्या आशेने पाहिलं , मी काय “ अस खुणेनेच विचारल , तर तिने “भाजी” इतकच विचारल , “ अरे हो , खूप सुंदर झाली होती “ हे ऐकून ती खुश होऊन आत निघून गेली , पण मला मात्र दुपारच्या आठवणी परत देऊन गेली , मी खिशातून मोबाईल काढला , आणि पुन्हा तिचा मेसेज आला कि नाही हे तपासलं , मेसेज न्हवता आणि तिने मला ब्लॉक केलेलं होत , मीजाऊदे म्हणत फोन बाजूला ठेऊन दिला,

मुलींशी छान गप्पा मारत जेवलो, तळपदे बाई डोक्यातून तेव्हा साफ निघून गेली होती , रात्री सकाळचा अलार्म लावायचा होता म्हणून फोन हातात घेतला आणि मला लागलेला चाळा मला स्वस्थ बसू देईना , मीपुन्हा तळपदे बाईच्या प्रोफाईल वर गेलो , तरत्यावेळी मात्र मला ती ऑनलाईन दिसली , म्हणजे मला तिने आताअनब्लॉक केल होत ,आणि डीपी चा फोटो बदलला होता ,    मीआधाश्या सारखा तिचा डीपी चेक केला , डीपी वर तिच्या पूर्ण फमिली सोबतचा फोटो , नवरा, तिचा मुलगा आणि ती , अश्वत  बापाच्या कडेवर होता , आणि खूप हसत होता, तिच्या नवर्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला होता ,  पाच वर्षाच्या मुलाची आई असली तरी तळपदे बाई हि अंगाने व्यवस्थित होती , न जास्त जाड, न जास्त बारीक , तिचा गव्हाळ वर्ण आणि तिचे मोठ्ठाले डोळे, मी तिला प्रथमच इतका नीट पाहू शकत होतो , मीतिचा चेहरा झूम इन करीत पाहत होतो , लांब तरतरीत नाक , मध्यम आकाराची जीवनी , त्यातून किंचितसे हसताना विलग झालेले तिचे बारीक ओठ , कुरळेकेस मागे उंच बांधलेले , तरीही ते थोडे पुढे घेऊन खांद्यावर रुळले होते , निळ्यारंगाची साडी तिला खुलून दिसत होती मी परत परत तिला झूम इन करून न्ह्याहाळत होतो पटकन माझ बोट तिच्या चेहर्या वरून , तिच्या गालावरून हलकेच फिरू लागल , तिच्या ओठांजवळ मी बोट फिरवणार पण चुकून माझ बोट उजव्या बाजूला लागल आणि पटकन तिच्या नवर्याचा चेहरा तो पण झूम केलेला माझ्या डोळ्यापुढे आला , त्याचक्षणी मी सटपटलो , जणू त्याने माझी चोरी पकडली होती , फोटोत तो हसत होता म्हणून ठीक नाहीतर त्याचा मुळचा रापलेला काळा रंग त्यात झुपकेदार मिश्याआणि भारदस्त शरीरयष्टी , तो बहुदा पोलिसात असावा , त्याचा फोटो पाहून मी कमालीचा अस्वस्थ झालो.पटकन फोन बंद करून झोपी गेलो.

 

दुसर्या दिवशी सकाळी नेहमी प्रमाणे ती  मला शाळेच्या आवरात दिसली , मी तिला पाहिलं होत पण मी मुद्दामच लक्ष दिल नाही , कारण मला माहित होत सकाळी शाळेजवळ दिसणारी तळपदे बाई मला साधी ओळखही दाखवत नाही, आणि तीच बाई नंतर मात्र जेवलात का म्हणून चौकशी करते ,  मी लक्ष जरी देत नसलो  तरी नजर मात्र सतत तिच्याकडे जात होती , आणि एका क्षणी मला अस वाटल कि ती देखील माझ्याकडे चोरून पाहतेय , काय खरच पाहतेय का ... छे भास असेल माझा , मुली शाळेच्या  आत गेल्यावर मी गाडी स्टार्ट केली , समोर गाडी चालवत होतो आणि गाडीच्या उजवी कडल्या आरशातून माझ सहज मागे लक्ष गेल तर तळपदे बाई गाडी मागून चालत होती आणि चक्क माझ्याकडे एकटक पाहत होती , मी त्या नजरेने नाही म्हटलं तरी थोडासा भ्यालो , काही झाल तरी हा अनुभव मला आयुष्यात पहिल्यांदा येत होता, एक बाई , आणि चक्क सुंदर बाई आपल्याकडे अशी का बर पाहत असेल, मी थांबलो नाही मी गाडी अक्षरशः पळवली,

 

दुकानात येऊन देखील तळपदे बाईंची तीएकटक नजर काही माझी पाठ सोडत न्हवती , तिने अस का पाहिलं असेल माझ्याकडे , राहून राहून मी आज सतत तिचा मेसेज येतोय का ते पाहत होतो , दुपार झाली तरी तिचा मेसेज काही आला नाही , दुपार उलटून संध्याकाळ झाली तरीही नाही , मलाकळेना आज का नसेल केला मेसेज , कदाचित नवरा घरी असेल , हो तेच असेल कारण , रात्री घरी आलो,माझी समृद्धी माझ्या मांडीवर येऊन बसली,  म्हणाली.,”पप्पा आज मिस ने  वर्गात आशुला खूप मारलं “

“कोण आशु , आणि काय केल त्याने “

“त्याच  नाव अश्वत आहे पण आम्ही सर्व फ्रेंड्स त्याला आशूच म्हणतो ,  त्याने आज क्लास मध्ये बोर्ड वरच कॉपी करून लिहिताना खूप सारे पेजेस सोडले म्हणून मग मिस ने त्याला मारलं “

“काय, पेजेस सोडले म्हणून मारलं , नाव काय म्हणालीसतुझ्या फ्रेंड्च “

“अश्वत......अश्वत तळपदे “

अरेहा तर तळपदे बाईंचा मुलगा , अच्छा म्हणून आज मेसेज नसेल केला का, रात्री झोपताना पुन्हा एकदा तिने मला अनब्लॉक केलय का ते पाहिलं , पण नाही,  तिचा डीपी दिसत न्हवता ,

सकाळीमी मुलीना शाळेत सोडायला गेलो नाही , मला अंगात थोडा ताप वाटत होता म्हणूनकामाला उशिरा जाणार होतो, पडून होतो पण नेहमीच्या वेळी उठायची सवय असल्यामुळे मला झोप लागत न्हवती , उठून हाताला चाळा म्हणून मोबाईल चेक करीत बसलो तर तिचे काल रात्री बारा नंतर टाकलेले काही स्टेटस मला दिसले त्यात काहीस एकट- एकाकीपण,माणसाचीकिंमतनसण, आयुष्य म्हणजे तडजोड अस काहीश्या अर्थाचे मेसेज होते , मला तिच्या कडे बघून तिच्या मनस्थितीची कल्पना आली होती , पण आज त्यावर नाही म्हंटल तरी शिक्का मोर्तब झाला ,कामावर गेल्यावर तिला फोन करायचं नक्की केल आणि आवरून घेऊ लागलो, तोवर बायको मुलींना शाळेत सोडून आली होती ,

 “ हे काय आज उशिरा जायचं व्हत ना“ तिने माझी अंघोळ झालेली बघून प्रश्न विचारला.

“हो पणनिघतो, ठीक आहे मी “ मी काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून बोललो.

 

पुढे ती काही बोलली नाही , कि अजून एक प्रश्न देखील विचारला नाही ,

 

कामावर गेल्या गेल्या तर नाही पण तासा-दीड तासाने मला थोडी सवड मिळाली मी थोडा दुकानाबाहेर आलो आणि तिला फोन लावला.

“हेलो,मिसेस तळपदे”

 

“बोला“ तिचा शांत आणि माझा फोन जणू अपेक्षीतच  होता असास्वर,  माझ्या सर्वांगातून एक लहर जातेय अस मला जाणवलं.

 

“कसा आहे आश्वत, जास्त नाही ना लागल त्याला “ मी बोलायला सुरुवात केली .

 

“छे, अहो, दुपारनंतर विसरला देखील , तुम्हाला समृद्धी ने सांगितल का “

 

“तुम्हाला कस कळल, म्हणजेतुम्हांला माहित होत ते दोघे एकाच वर्गात आहेत म्हणून “

 

“नाहीकाल मी अश्वत च्या वर्गात गेले तेव्हा कळल”

 

“अस होय , बाकी.....”

 

“बाकी....ठीक“ इतकच बोलून ती थांबली .

 

पुढे काय बोलाव हे मला सुचेना , मला तिला विचारायचं होत ,  तुला काय दु:ख आहे, मला तू  सांगू शकतेस , मी ऐकेन , अगदीतू बोलशीलतितका वेळ ऐकेन , पण मी ह्यातलंकाहीच बोललो नाही , बोलणार हि न्हवतो, आणि तेवढ्यात मला मालकांनी हाक मारली , ती तिने ऐकली बहुतेक, तिनेफोन काहीही न बोलता ठेवला.

 

दुपारी मी स्वतः तिला मेसेज करणार होतो , पण पाहतोय तर तिने मला पुन्हा  ब्लॉक केल होत , माझा प्रचंड हिरमोड झाला , चरफडत मी जेवण उरकल , खरतर मला आज खूप बैचेन वाटत होत , कदाचितअंगात थोडा ताप असेल म्हणून देखील असेल पण सकाळी जेव्हा आपण तिच्या शी बोलत होता तेव्हा मात्र हे अस काही जाणवत देखील नव्हत , मग आता  हे आजारपण का जाणवतंय, मालकांना सांगून मी जरा पाय मोकळे करायला बाहेर पडलो , दुकानाच्यागल्ली बाहेर समोरच  मुख्य रस्ता होता तिकडे न जाता मी डाव्या दिशेला वळलो, तिकडेएक पानाची टपरी होती तिकडे जाऊन मी बडीशोप विकत घेतली, आणितीच चघळत ,काही वेळ तिथेच थांबालो, पुन्हा खिशातून मोबाईल काढून चेक केला तिने अजूनही मला ब्लॉक ठेवलं होत  मी पुन्हा दुकानात शिरलो ,

 

एक पाठमोरी बाई साड्या पाहत उभी होती , पण तीच लक्ष साड्यांकडे न्हवत ती दुकानात कुणाला तरी शोधीत होती , तिचा चेहरा पाहण्यासाठी मी मुद्दामहून तिच्या बाजूने जाऊ लागलो तर ती तळपदे बाईच होती, तिला बघून मी मनापासून सुखावलो.

 

“अरेव्वा, साडी खरेदी, ते पण आमच्या दुकानात “

 

उत्तरादाखलती फक्त हसली.

 

“बोला, कोणती साडी दाखवू “

 

“कोणतीही दाखवा, लेटेस्ट मधली “

 

“लेटेस्ट, लेटेस्ट , लेटेस्ट“ असम्हणत साड्यांच्या गर्दीतून मी   तीन चार साड्या निवडून तिच्या समोर अंथरल्या.

ती नुसती साड्या पाहत होती पण एकही पसंत करीत न्हवती , मी आणखीन दोन तीन व्हरायटी तिलादाखवतहोतो, तिच्याशी त्या साड्यांच्या सुता बदल , रंगाबद्दल, प्रिंट बद्दल भरपूर बोलत होतो, ती प्रत्येक साडी वरून फक्त हात फिरवीत होती आणि माझ्याकडे मधून मधून मान वर करून पाहत होती , तिलामी एकूण वीस साड्या दाखवल्या ,एकविसावी साडी दाखवावीकि नाही ह्या संभ्रमांत मी होतो तेव्हा तीच “पुरे, मला नाही आवडली एकही साडी “ अस म्हणून ती सरळ बाहेर निघून गेली , मालक माझ्याकडे प्रचंड रागाने पाहत उभे होते, “मूर्ख आहेस का , पहिल्या पाच साड्या दाखवल्या नंतर गिर्हाईकाला खरेदी करायची आहे कि नाही हे समजत , तुझ्या ओळखीची बाई होती म्हणून तिला अख्ख दुकान दाखवशील का, मला वाटल चांगल्या चार साड्या तरी ती घेईल , असाटाईमपास पुन्हाकेलास तर याद राख”

मालकांच्या बोलण्याच मला काही वाटल नाही , कारण मालकांची ती सवय होती , खर आश्चर्य मला तळपदे बाईचं वाटल , इतकी लांब तंगड्या तोडत हि इथवर आली आणि काही खरेदीन करताच निघून गेली हि नेमकी आली कशाला होती आणि एक मिनिट सर्वात महत्वाच म्हणजे दुकानाचा पत्ता तिला कुठून मिळाला , हिच्या कडे काही विद्या तर नाहीये ना , माझा मोबाईल नंबर , माझ्या दुकानाचा पत्ता हिला मिळाला कुठून , हिला विचारायचं म्हणजे तोंड उघडून बोलत देखील नाही , आधी जास्त वेळ तर ब्लॉकचठेवते मला , पण पुढच्यावेळी काहीही झाल तरी मी आधी तिला माझा नंबर आणि दुकानाचा पत्ता कुठून सापडला हे विचारणार अगदी काहीही झाल तरी .

 

शनिवार होता मुलीना शनिवार रविवार शाळेला सुट्टी असायची , दोन दिवस सुट्टी सार्थकी लागावी म्हणून शाळेने पालकांना प्रोजेक्ट बनवायला दिले होते , आणि ते काम नेहमी प्रमाणे  माझ्यावर आल होत  , कारण माझी बायको जास्त शिकलेली नाही त्यामुळे काही चुकेल आणि मुली आपल्याला ओरडतील अश्या अनाठायी भीती पोटी ते प्रोजेक्ट करायला अजिबात तयार होत नाही .प्रोजेक्टच नाव इंडिअन करन्सी अस होत म्हणजे काय तर भारतीय नोटा आणि नाणी एका पुठ्यावर चिकटवून त्या खाली नावे लिहायची, समृद्धीच्या वर्ग शिक्षेकेने प्रोजेक्ट कसा असावा ह्याचा एक रेडीमेड व्हिडीओ देखील ग्रुप वर पाठवला होता , पणप्रोजेक्ट करताना शिक्षकेच्या व्हिडीओ प्रमाणे मी चुकून पाचशे ची स्टीकर नोट हि दोन हजारच्या स्टीकर नोट च्या खाली न लावता शेजारी लावली , वास्तविक ते तस केल तर काही इतका फरक पडणार न्हवता  पणतरीही मी काही तरी बोलायला चान्स हवाम्हणून तळपदे बाई ना फोन केला .फोन आधी बराच वेळ वाजत राहिला , मला वाटल आता कट होईल पण तिने उचलला .

“बोला“ तसाच शांत आणि संयमी आवाज,

एक क्षण तर मी काय बोलायचं होत हेच विसरून गेलो .

“अहोबोला“ तळपदे बाई पुन्हा म्हणाली.

“मी काय म्हणतो ...प्रोजेक्ट बनवायला सुरुवात केलीत का तुम्ही“ मी खूप काही महत्वाच सांगायच्या आवेशात विचारल.

“नाही अजून का..बर“ तळपदेबाईनी अश्चार्यने विचारल.

“अजून नाही केली , कधी सुरु करणार मग “

“कर्णिक अहो तुम्ही फोन का केलात ते सांगा आधी ”

“मी फोन ...............” आता काय सांगणार कारण मी तर फक्त तिच्याशी बोलता याव म्हणून फोन केला होता .

“हेल्लो” तळपदे बाई ने मला भानावर आणल.

“हा...अहो त्याच काय झाल , प्रोजेक्ट मी घेतलाय बनवायला आणि चुकून माझ्याकडून पाचशे ची स्टीकर नोट हि दोन हजारच्या स्टीकर नोट च्या खाली न लावता शेजारी लावली गेली आहे , चालेल ना , “

 

तिथून तळपदे बाई चा फसकन हसल्याचा आवाज आला , बहुतेक तिने मला वेड्यात काढल.

“चालेलनोट कुठे हि लावा फक्त खाली नाव मात्र बरोबर द्या ...आणि हो “ अस म्हणून ती मधेच थांबली.

“काय“मी अधिरतेने तिला विचारल.

“काही नाही , खोट्या स्टीकर च्या नोटा लावायच्या आहेत , खऱ्या नोटानाहीत बर का “ अस म्हणून ती पुन्हा फसकन हसली.

मी हि हसलो ..

“चला ठेऊ फोन , जेवण बनवायचं” अस म्हणून तिने फोन कट देखील केला.

मी मात्र अजूनही फोन हातात धरून गालातल्या गालात हरवल्या सारखा हसत होतो.

“पप्पा, कोण होत , कुणाशी बोलत होता“ समृद्धीने मला विचारल.

“ कोणी नाही , चला आपल्याला प्रोजेक्ट बनवायच ना“ अस म्हणून मी हळूच स्वयंपाक घरात नजर टाकली , बायको शांतपणे चपात्या लाटत होती , आणि काहीतरी गुणगुणत देखील होती, मला हायस वाटल. म्हणजे तीच लक्ष न्हवत.

त्या रात्री मात्र जेव्हा तळपदे बाईन चाव्हाट्स अँप प्रोफाइल चेक करत होतो तेव्हा तिने मला ब्लॉक केलेलं न्हवत , मी तिचा फोटो , स्टेटस, लास्ट सीन सर्व काही पाहू शकत होतो ,

हि मला ब्लॉक करायला विसरली का , काही वेळ गेला असेल आणि मला तीऑनलाईन दिसली

मलामोह आवरला नाही मी तिला मेसेज टाईप करू लागलो ,

“बनवला प्रोजेक्ट “  मेसेज ब्लू टिक झाला नाही .

मी थांबलो काही वेळ ब्लू टिक होण्याची वाट पाहत बहुदा ती स्टेटस अपडेट करीत होती ,

मी तिच्या स्टेटस वर गेलो , तिकडेजवळ पासपाच-सहा फोटो आताच टाकलेले दिसत होते .

सर्व फोटो तिचेच काही लग्नानंतरचे काही लग्नाआधीचे होते मी आधाश्या सारखे सर्व फोटो परत परत पाहत होतो .

आणि तिचा रिप्लाय आला , “होझाला माझा पण”

तिनेरिप्लाय दिला ह्याच मला आशचर्य वाटल , सहसा रात्री मला ब्लॉक करणारी आता माझ्याशी कस काय बोलत होती .

काही वेळ पुढे काय बोलू हे मला समजल नाही . पण आता आपण गप्प राहिलो तर हि पुन्हा आपल्याला ब्लॉक करेल अशी भीती मला वाटू लागली , म्हणून मी लगेचच तिला

“आशु झोपला का “ असा मेसेज टाकला.

“हो..कधीच“ ह्यावर तिचा तत्काळ रिप्लाय आला .

“ एक विचारू तुम्हाला “ मी मेसेज टाकला.

“ विचारा कि “ तिचा अगदी सहज बोलाव तसा रिप्लाय.

“तुम्हाला माझा नंबर आणि दुकानाचा पत्ता कुठून मिळाला”

रिप्लाय दाखल तिने एक फोटो मला सेंड केला .

तो फोटो म्हणजे माझ्या दुकानाच्या नावावर छापलेलं माझ व्हिसीटींग कार्ड होत, आमच्या मालकांनी अशी कार्ड सर्व एक वर्षापेक्षा अधिक काळ दुकानात टिकलेला प्रत्येक सेल्समन ला बनवून दिली होती , ह्याचे दोन फायदे होते एक म्हणजे, आपल्याला कडे आपल्या नावच व्हिसीटींग कार्ड आहे ह्याच त्या सेल्समन ला अप्रूप वाटे आणि दुसरा फायदा म्हणजे कार्डावरदुकानच नाव आणि पत्ता असल्यामुळे जर आमच्या कडून काही कस्टमरजर दुकानात आले तर आम्हाला त्यावर कमिशनआणि त्याकस्टमरला त्याच्या खरेदीवर डिस्काऊंट मिळत असे ,हिनवीन पद्धत आमच्या दुकानात अलीकडे सुरु झाली  होती फोटो पाहिल्यावरमला लक्षात आल , तळपदे बाई ना माझा नंबर आणि दुकानाचा पत्ता कसा मिळाला ते .

“कुठे सापडलं “ हा मेसेज आणि सोबत  स्मित हास्याचा ईमोजी मी तळपदे बाई ला पाठवला.

“ त्या दिवशी माझ्या बिल्डींग पाशी आला होतात ना,तेव्हा तिथेच पडल होत मला आमच्याशंकरने मला आणूनदिल” तळपदे बाई नि माहिती पुरवली .

“ हो का .बर झाल “ हा मेसेज मी खूप घाईत सेंड केला आणि तो  ब्लू टिक देखील झाला होता .

म्हणजे आता तो डिलीट जरी केला तरी तो मेसेज तिने वाचला होता . मी काहीवेळ थांबलो , तळपदे बाई चा अंदाज घेऊ लागलो.

“का बर झाल “ तिचा अपेक्षित मेसेज आला होता , ह्यावर आता कायरिप्लायदेऊ पण तरीही धीर करून मीतिला मेसेज केला.

“म्हणून तर आपण आता बोलू शकतोय “ हामेसेज पाहिल्यावर तळपदे बाई गालातल्या गालात हसली असेल , अस आपल मला उगीच वाटल आणि तिचा स्मित हास्य करणार इमोजी आला देखील ,

माझ म्हणन खर झाल , तिला खरच हासु आल होत हा माझ्यासाठी सुखद धक्का होता .

“ आणखीन एक विचारू “ माझी खरतर आता भीड चेपली होती ,

“विचारा”

“ तुम्ही मला सतत ब्लॉक का करता “ मी तिला विचारल.

“तुम्हाला कस कळल”  माझ्या प्रश्नच उत्तर द्यायचं सोडून तिनेच मला प्रश्न विचारला.

कधी कधी आपण पुरुष स्वतःला फार हुशार समजतो , आपण बायकांना कात्रीत पकडायला जातो , पण आपल्याही नकळत त्याच कात्रीत त्यांनी आपल्याला कधी पकडलेल असत हे आपल्यालाही कळत नाही.

ती  मला ब्लॉक करते आणि हे मला कस कळल म्हणजे साहजिकच मी तिला पाहतो हे मला मान्य कराव लागणार , त्यात मी सतत ब्लॉक का करता असा मेसेज करून बसलो होतो , म्हणजे मी तिला सतत पाहतो हे माझ्या तोडून मीच सागितलं होत . ती माझ्या रिप्लाय ची वाट पाहतेय आणि माझ्याकडे रोखून पाहतेय असा मला भास झाला ,

“ एकदा दोनदा मी पाहिलं होत मला तुमच्याशी बोलायचं होत पण कधी तुम्ही मला ब्लॉक करता तर कधी अनब्लॉक म्हणून विचारल”

“काय बोलायचं होत माझ्याशी “ तिने कात्रीची पकड अजूनच घट्ट केली जणू.

“हेच माझा नंबर कसा मिळाला आणि ..............”

“आणि काय ..” तिचा मेसेज , तो वाचताना ती माझ्याकडे पाहतेय अस मला सारख वाटत होत.

“आणि तुम्ही शाळेत जेव्हा दिसता तेव्हा पाहत देखील नाही माझ्याकडे , आणि नंतर दुपारी मात्रमाझ्या जेवणाची चौकशी कशी काय करता ” मी पण काही कमी नाही ह्या मेसेज मुळे मी तिला दाखवून दिल.

 तिने मला ह्यावर काहीच रिप्लाय केला नाही ती सरळ ऑफलाईन  गेली , मी कमालीचा अस्वस्थ झालो ,

दहा पंधरा मिनिट वाट पहिली तरीही ती काही परत ऑनलाईन  आली नाही , माझे डोळे जड होऊ लागले .

 

शेवटी मी वाट पाहून तिला एक गुड नाईट चा फोटो पाठवला.

 

सकाळी हटकून मुलीना  शाळेत सोडायला गेलो , तळपदे बाई दिसेल म्हणून ,आणि मला फार वेळ वाट पहावी लागलीनाही तळपदे बाई आधीच तिथे उभी असलेली मला दिसली तिने अश्वतला शाळेत देखील सोडलं होत , आणि तरीही गेट वर कोणाची तरी वाट पाहत उभी आहे अस मला जाणवलं , आणिमी दिसताच तिचे  डोळे लकाकल्या सारखे मला दिसले , कदाचित तो माझा भास हि असू शकतो , दोघींना  शाळेत सोडल्यावर मी युटर्न घेणार पण माझी नजर तिच्याकडे गेली ती  एकटक नाही पण सतत राहून राहून माझ्याकडे पाहत होती, हिच्याशी बोलाव कि नाही बोलाव ह्या संभ्रमात असतानाच तिने तिचा उजवा हात उचलून मलाबाय केल , मीतिच्या त्या कृतीमुळे नाही म्हटलं तरी थोडासा हादरलो , आणि आजुबाजूला आम्हाला कोणी पाहत नाहीये न ते एकदा पाहून घेतलं , पण कोणाच लक्ष न्हवत , सर्व पालक आपापली मुल नीट आत जात आहेत ना ते पाहण्यात गर्क होते , मी जायला वळण्या आधी मी पुन्हा एकदा तिच्या कडे पाहून घेतलं ,तर ती मलानाराज दिसली तिने तिची मान दुसरी कडे वळवली , मला काही समजेना नंतर फोन करून विचारू म्हणून मी गाडी सुरु केली , न राहवून मागच्या आरशात ती माझ्याकडे पाहतेय का मी पाहिलं पण ती अजूनही मान वळवून दुसरी कडेच पहात होती , माझ्यावर ती नक्कीचिडली आहे हे मला समजल , आणि मला ते समजलंय हे मला तिला दाखवून द्यायचं न्हवत ,दुकानात पोहोचलो , नेहमी प्रमाणेच प्रचंड कामात दुपारपर्यंत गढून गेलो , जेवणाच्या सुट्टी मध्ये मोबाईल पाहिला आणि पाहतोय तर काय त्यात तळपदे बाईंचे चार मिस्डकॉल होते , मी तत्काळ फोन लावला एक रिंग झाली असेल आणि फोन पटकन उचलला गेला,

“कुठे होतात इतका वेळ “ हेल्लो नाही,  काही नाही फोन उचलल्या बरोबर तिने मला प्रश्न विचारला.

“कामात होतो , का?”  मला कमालीच आश्चर्य वाटत होत , तिच्या बोलण्याच .

 

“अहो, तस नाही मी खूप वेळा फोन केला तुम्ही उचलला नाही ना म्हणून विचारल.”  तळपदे बाई म्हणाली.

 

“हो चार मिस्डकॉल पहिले मी आणि म्हणून लगेचच फोन केला , बोला काही काम होत का”

 

“तुम्ही घाबरट आहात का “ तळपदे बाई नी काहीसाअसमंध प्रश्न विचारला .

 

“सॉरी, मी समजलो नाही “

 

“सकाळी जेव्हा मी तुम्हाला बाय केल तेव्हा तुम्ही इकडे तिकडे का बघत होतात”  तळपदे बाई खूपच धीट होती, परखड होती , हे मला पहिल्यांदा जाणवलं.

 

“तस काही नाही , अगदी सहज पाहिलं असेल मी “ माझी चोरी तिने पकडली होती , आणि मी चक्क खोट बोलत होतो.

 

“सहज नाही मिस्टर कर्णिक, तुम्ही घाबरला होतात , मी तुम्हाला बाय केलेलं कोणी पाहिलं असेल का म्हणून , वास्तविकएक स्त्री म्हणून हि काळजी मला हवी नाही का ?”

 

“काय बोलताय तळपदे बाई तुम्ही, एक साध बाय तर केलत त्यात कसली आलीये भीती”

 

“तीच, जीसकाळी तुम्हाला वाटली” तळपदे बाई पदोपदि मला निरुत्तर करीत होती .

 

पण मी हि काही कमी न्हवतो , मग मी पण तिला म्हणालो.

 

“ हो तुम्ही बरोबर ओळखल , मला वाटली एक क्षण भीती पण आपण शेवटी समाजात राहतो , त्याचाच एक भाग बनून,आपली मुल त्या शाळेत शिकतात , उद्या आपल्यामुळे आपल्या मुलांवर कोणी बोट उचलता कामा नये , म्हणून वाटली असेल कदाचित मला भीती , बोला ह्यात काय चुकल माझ”

 

आता मी तिला निरुत्तर केल होत , मी तिच्या प्रतिसादाची वाट पाहत  थांबलो होतो. मलावाटल ती पुढे काहीही बोलणार नाही, माझा अंदाज साफ खोटा ठरला .

“ कालरात्री तुम्हीच मला  रात्री मेसेजवर म्हणालातना  तुम्ही शाळेत जेव्हा दिसता तेव्हा बोलत नाही माझ्याशी , आणि नंतर दुपारी माझ्या जेवणाची चौकशी कशी करता म्हणून”

 

“अच्छा म्हणून हे अस “ मी हसत हसत म्हणालो.

 

“हो“ती ठाम स्वरात म्हणाली.

 

“पण तुम्हाला कारण तर समजल ना , माझ्या वागण्याच “ मी मूड हलका करायच्या उद्देशाने म्हणालो.

 

“हो समजल , पण त्यावेळी मात्र राग आला होता “

 

“ठीक आहे , उद्या मी सुद्धा तुम्हाला बाय करेन ते पण सर्वांसमोर हात हलवून “

 

“नकोकाहीही गरज नाही “

 

“आता काय झाल , करेन मी खरंच“

 

“आपली मुल तिथे शिकतात , आणि खरतर ह्याची जाणीव मला देखील असायला हवी होती “आता माझे शब्द ती बोलत होती.

 

“नाही नाही तुम्ही साफ मनाच्या आहात म्हणून ते अगदी साहजिकचतुमच्याकडून घडल , प्लीज त्याच वाईट वाटून घेऊ नका आता “मी तिला समजावलं.

 

“हम्म, ठीक आहे , बाकी काय , कस चालू आहे काम “ तळपदे बाई ने विषय बदलला.

 

“ठीकच म्हणायचं , आला दिवस ढकलायचा”मी म्हणालो.

 

“अस का म्हणता , छान काम आहे , संसार आहे , तुम्हाला काय आहे कमी”

 

“काम करतोय, पण शेवटी माणूस आहे मी , नको वाटत कधी कधी , वाटत सोडून द्याव सगळ आणि पळून जाव कुठेतरी”

 

“काय, तुम्हाला सुद्धा “

 

“म्हणजे, काय मला सुद्धा “मी आश्चर्याने विचारल.

 

“हेच, पळून जावस वाटत का , कधी कधी “

 

“ हो, बरेचदा वाटत “ खरसांगायचं तर मी ते अगदी सहज बोलून गेलो होतो.

 

आणि तेवढ्यात अश्वत तिथे आला , कारण तो तिला “कुणाशी बोलतेयस मम्मा, मला फोन दे “ अस म्हणून लागला, मी काही वेळ थांबलो, पण कदाचित तो ऐकत नसावा, तळपदे बाईनी फोन बंद केला .

 

मी स्वतःशीच हसत  दुकानात शिरलो , आज मला खूप हलक वाटत होत , कोण कुठली ती तळपदे बाई , पण आज तिच्याची बोलून मन मोकळ  झाल्या सारख वाटत होत , उरलेला संबंध दिवस त्याच उत्साहात पार पडला ,

 

दुकान बंद करून गाडी स्टार्ट करणार तेवढ्यात माझा फोन वाजला , मला वाटल बायकोचा असेल , निघाले का वैगेरे विचारायचं असेल , पण तो अननोन नंबर होता ,

 

“हेल्लो, कोण“ मी फोन कानाला लावला .

 

“हेल्लो, कर्णिक, मी तळपदे बोलतेय“

 

“तळपदे बाई , अहो हा कुणाचा नंबर “

 

“माझाच, पण तुम्ही ह्या नंबर वर फोन नका करू कधीच , ह्या नंबर वरून मीचफोन करेल तुम्हाला”

 

“बर, ठीकआहे, पण हा नवीन नंबर कशासाठी, काही खास कारण”

 

“खास नाही , पण एक प्रकारची खबरदारी म्हणून आहे , बाकी काही नाही “

 

“कसली खबरदारी “

 

“अहो आपण  दुपारी बोलत होतो तेव्हा अश्वत आला तिकडे , त्याने मला तुमच्याशी बोलताना पाहिलं , आणिखर सांगू का मला त्याची भीती वाटते , तो त्याच्या वडिलांना सांगेल म्हणून , त्यासाठीहि खबरदारी”

 

“म्हणून तुम्ही नवीन नंबर घेतला ?“

 

“अहो नुसता नवीन नंबर नाही , मी एक नवीन फोन पण घेतला आहे , आणि तो मी आता लपवून ठेवणार आहे , कुणाला कळणार नाही कधीच आपण बोलतो ते “

 

“अहो पण तळपदे बाई , कशासाठी, फक्त आपल्याला बोलता याव म्हणून “

 

“ हो मग काय करू , माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय पण न्हवता, आणि एक सांगू का कर्णिक , तुमच्याशी बोलून मन मोकळ झाल्यासारखं वाटत, तुम्हाला पण वाटल”

 

“हो वाटल मला पण“    

 

“होना, मला माहित होत” तळपदे बाई एखाद्या लहानमुली प्रमाणे बोलत होती .

 

“ आणि हो आणखीन एक तुमच्या मोबाईल मध्ये हा माझा नवीन नंबर वेगळ्या नावाने सेव करा, कराल ना “

 

“हो, चालेल, काय नावाने करू तुम्हीच सांगा”

 

“दमन“ ती हरवून गेल्यासारखी म्हणाली .

 

“दमन,हे काय नाव , अर्थ काय ह्याचा “

 

“काही नाही , माझ नाव दामिनी आहे ना म्हणून दमन हे नाव मी सुचवलं , बाकी काही नाही “

 

“दामिनी, व्वा छान आहे तुमच नाव, आणि हे दमन पण आवडल मला”

 

“दमनआणि आवडलं, माझ तर रोज होत इथे माझ्या घरात” अस म्हणून दामिनी जोरात हसू लागली.

 

मला तिच्या बोलण्याचा संदर्भ लागेना ,

 

“हेल्लो, काय झाल , अश्याका हसताय “

 

“ सहजच, चलाठेवते काळजी घ्या “ अस म्हणत तिने फोन ठेवून दिला .

 

माझ्या तोंडात आणि विचारात दमन हा शब्द अडकून पडला.

 

घरी येऊन छान पोटभर जेवून , झोपायला अंग टाकल, मुली केव्हाच झोपी गेल्या होत्या , दामिनी शी बोलत राहिल्यामुळे मला घरी यायला अर्धा पावून तास उशीर झाला होता , बायको सर्व मागच आवरत होती , माझ्या डोक्यात पुन्हा तो शब्द नाचू लागला ,

मी नुसता अद्ध्या कडे पाहत पडून होतो, बायकोचीकामे झाली , ती शेजारी येऊन पडली , मला अजून जाग बघून तिने माझी चौकशी केली ,

“काय झाल , जाग आजून तुमी “

 

“लता, दमन म्हणजे काय ग “ मी आपल तिला विचारल .

 

“दमन, काय म्ह्याईत , का व “

 

“काही नाही ग सहज , मलाअर्थ माहित न्हवता ना म्हणून विचारल तुला “

 

“तुम्ही आपल्या पोरी करत्यात तस का न्हाय करत, त्या दिशी सिद्धी ला एक शबूत अभ्यास करताना समजला न्ह्याई , तरतीन फोन वर शोधल आणिलिवल वहीत , तुम्ही बी करा तस”

 

लता ने खूप चांगली कल्पना मला सुचवली होती , मी ठीक आहे करतो उद्या“म्हणून डोळे बंद केले.

दुसर्याच सेंकदाला लताच्या घोरण्याचा संथ आवाज माझ्या कानात येऊ लागला , अर्थात तिला आता गाढ झोप लागली होती ,

 

मी हळूच फोन घेऊन गुगल मध्ये दमन ह्या शब्दाचा मराठी अर्थ काय आहे  अस लांब लचक वाक्य टाईप केल.

 

उत्तरा मिळालंदमन म्हणजे दाबून टाकणें; रग जिरविणें; खोड मोडणें; संयमन.

मलाह्याच्याशी दामिनी चा काय संबंध आहे हे समजत न्हवत , हो ती काहीशी त्रासलेली दिसायची , पण माझ्या घरी माझ रोज  दमन होत आणि मी आपल्याला बोलता याव म्हणून नवीन फोन घेतला आहे , हे सगळ माझ्यासाठी , माझ्या सारख्या सामान्य माणसाच्या आकलना पलीकडच होत , मला कळत होत , तिला माझ्याशी बोलायला आवडत होत , मलास्वतःला देखील ते  आवडत होत, पण आजच्या तिच्याबोलण्यामुळे मी कुठेतरी ह्या प्रकरणातून काढता पाय घेण योग्य, अस मला सतत मला वाटू लागल,

 

आणि पुढेबरेच दिवस मी मुलीना सोडायला गेलोच नाही , मुद्दाम हून बायकोलातब्बेत ठीक नाही वाटत , तर कधी तू जा , मी माझ्यासाठी आज स्वतःच भाजी बनवतो , तर कधी आज लवकर मालकाने बोलावलं आहे अशी काही बाही कारण देऊन दिवस ढकलत होतो , दामिनीचे फोन येत होते , आता मी  तिच्या दोन्ही नंबरला ब्लॉक केल होत, अगदी सगळीकडून ब्लॉक केले होत , तिचे दिवसातून चार-पाच वेळा तरी फोन येऊन जायचे , मीदुर्लक्ष करीत होतो , कारण मला आता तिची भीती वाटू लागली होती . हि आपल्यालावर मोहिनी घालतेय अस वाटू लागल होत , आणि मला त्यात आता आणखीन अडकायचं न्हवत .

 

पणएकदिवस बायको कधी न्हवे ते  माझ्यावर भयंकर चिडली, मुलीना सोडायला जा नाहीतर मी बोलायची नाही तुमच्याशी अशी धमकी मला दिली तेव्हा मी नाईलाजास्तव जायला तयार झालो.

दामिनी नजरेस पडू नये  म्हणून पटकन मुलींनागेटवर सोडल गाडी वळवणार तेव्हा मला अश्वत येताना दिसला , मला वाटल आता दामिनी पण दिसणार पण नाही दामिनी न्हवती , अश्वत कोण्या दुसर्या बाई सोबत शाळेत आला होता , तीबाई अश्वत आत जाई पर्यंत त्याच्याकडे पाहत उभी होती , मध्यम वयाची पण काहीशी थकलेली , साधी साडी नेसून , केसांची आखूड वेणी तिच्या पाठींवर रुळली होती , हातात साधासा मोबाईल , तो घट्ट पकडून ती तिथेच उभी होती , अश्वत दिसेनासा झाला तेव्हा ती जायला वळणार तेवढ्यात मी तिला आवाज दिला.

“माफ करा ताई , तुम्हीअश्वतच्या कोण , म्हणजे मी मिसेस तळपदे ना ओळखतो , त्याच नेहमी येत होत्या अश्वतला सोडायला , तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं मी “

 

तिने शांतपणे माझ बोलन ऐकून घेतलं , “मी अश्वत ची बेबी सीटर आहे गेल्या पाच दिवसा पासून बाईनी  मलानोकरीवर ठेवलंय”

 

“का, तळपदे बाई कुठे आहेत आता “

 

“आजारी आहेत त्या”

 

“आजारी काय झालंय त्यांना , “ मला मनापासून तिची काळजी वाटू लागली.

 

“मला नक्की माहित नाही , पणत्या सतत झोपून असतात , अशक्त पणा वाटतो अस म्हणतात सारख्या”

 

मला काय झाल काय माहित , मी तिचा तिने दिलेला दुसरा नंबर डायल केला तर तो फोन , त्या बेबी सीटरच्या हातात होता , तो वाजला तस तिने माझ्याकडे पाहिलं .

 

“हा नंबर सध्या मी वापरते “ तिने तिच्या फोनच्या स्क्रीन वर झळकत असलेल माझ नाव जेमिस्टरकर्णिक अस सेव्ह केलेलं मी पाहिलं.

 

मीथोडासा ओशाळलो  आणितळपदे बाई न चा आधीचा नंबर डायल करणार पण ह्या बाई समोर नको म्हणून मी फोन पुन्हा खिशात ठेवला आणि  ठीक आहे अस म्हणून तिथून निघालो,

 

ती बाई मला पाठमोरी देखील पाहतेय अस मला जाणवू लागल, पण पर्याय न्हवता  कारण जे करायला नको ते मी करून बसलो होतो.

 

गाडीवर जाता जाता देखील दामिनीचे विचार मनात सतत येत होते , शेवटी न राहवून मी गाडी एका बाजूला उभी केली , आणि सरळ तिला फोन लावला.

फोन खूप वेळाने उचलला गेला.

“हेल्लो” एक थकला आवाज माझ्या कानावर पडला.

 

“हेल्लो दामिनी”मीसावधपणाने बोललो.

 

“बोला,खूप दिवसांनी आली आठवण” तोच थकला स्वर कानी पडत होता.

 

“गावी गेलो होतो , काही कामा निम्मित”

 

“का खोट बोलताय,कर्णिक “

 

“मी का खोट बोलू तुमच्याशी”

 

“त्या दिवशी मी शाळेत आले होते तेव्हा तुमच्या बायकोशी ओळख करून घेतली , तेव्हामी तुमच्या बद्दल चौकशी केली ,”

 

“ सॉरी”मी खजील झालो.

“कशासाठी“

“मी घाबरलो होतो”

“कोणत्या गोष्टीला “

 

“त्या दिवशीतुम्हीमला तब्बल चार वेळा फोन केला, मी त्यावेळी फोन वर सापडलो नाही म्हणून तुम्ही किती रागवलात माझ्यावर  आणि माझ्याशी बोलता याव म्हणून नवीन फोन घेतलाम्हणून“

 

“पणमला फक्त तुमच्याशी बोलायचं होत , आणखीन काही माझा हेतू न्हवता , तरीही घबरालात”

 

“मी एक समान्य माणूस आहे  दामिनी, सुंदर स्त्री पाहायला , फार फार तर तिच्याशी बोलायला मला आवडेल , पण तुम्ही म्हणताय तशी मैत्री , बोलण्यासाठी का होईना करण,आणि जरी ती केलीतर ती  अशी किती दिवस टिकेल , एक न एक दिवस आपल्या घरच्यांना कळेलच , आणि ती फक्त शुद्ध  मैत्री आहे हे कोणीही मान्य करणार नाही”

 

“ठीक आहे , इथे तुम्हाला मैत्री करायची देखील भीती वाटतेय, तर मी काय बोलू”

 

“काहीही बोला , भित्रा, घबराट, भेकड काहीही ,”

 

“ह्यातलं मला काही बोलायचं नाही असो, पण तुम्ही सभ्य मात्र आहात , हे नक्की’ अस म्हणून ती क्षीण हसली.

 

“काही सभ्य वैगेरे नाही मी, पणमर्यादे पलीकडे जाताना आमच्यासारख्या सामान्य पुरुषांना त्यांचा इतका वर्षाचा संसार आधी आठवतो”

पुढे ती काहीच बोलली नाही म्हणून मग मीच विचारल .

 

“तब्बेतीला काय झालंय तुमच्या”

 

“काही नाही , थकवा जाणवतो सतत , टेस्टकेल्या सर्व , सर्व काही नॉर्मल आहे पण आधीसारखा उत्साह वाटत नाही ”

 

“असकसउत्साह न वाटायला काय झाल, अश्वत साठी तर वाटायलाच हवा, अस करून कस चालेल.” मी तिला हक्काने बोलल्या सारख बोललो.

 

“हम्म. माहित आहे मला”

 

“माहित आहे तर मग काय झालंय आजारी पडायला , आज नाही आता पासूनच इतर कोणासाठी नाही पण स्वत:साठी जगायला शिका, आनंदी राहा , तुम्हाला ज्याच्यात मन रमतय त्या गोष्टी करा , अडचणी, त्रास, कटकटीकुणाला नसतात , पण आपण जर तेच धरून बसलो तर आयुष्य जगणार कधी , मान्य आहेत सर्वच गोष्टी तुमच्या मनासारख्या घडणार नाहीत , पणस्वतःला आनंदी ठेवण्यासाठी स्वता: साठी जे करण शक्य आहे ते तर तुम्ही करू शकता , आणि सर्वात महत्वाच म्हणजे जर आजारी पडून तुम्हाला काय झाल तर अश्वतच काय , त्याला कोण बघेल” इतक सगळ बोलताना मला जाणवलं नाही पण जेव्हा मी बोलायचा थांबलो , तेव्हा मला मुसमुसण्याचा आवाज कानी पडू लागला .

 

“दामिनी शांत हो , रडू नकोस”मी पहिल्यांदाच तिचा एकेरी उल्लेख केला.

 

“थान्क्यू कर्णिक, थान्क्यू सो मच, मी हरवले होते स्वतः मधेच , नाही करणार मी पुन्हा अस , राहील मी आनंदी , माझ्या अश्वत साठी नक्की चांगली होईल”

 

“काळजी घे , स्वतःची, ठेवतो मी फोन” त्यापुढेमी इतकच म्हंटलं आणि  फोन ठेवला.

 

इथून पुढे कधीही मला दामिनी चा मेसेज, फोन काहीही येणार न्हवता , त्यामुळे तिने मला ब्लॉक केलय कि अनब्लॉकहे पाहण मी सोडून दिल.

 

काही दिवसांपूर्वी माझ्या आयुष्यात आलेली एक सुंदर बाई , अश्या प्रकारे निघून गेली होती , तिची काय अपेक्षा होती माझ्या कडून फक्त बोलण , आणि ते जरी असल तरी बोलण कुठवर चालल असत, पुढे त्याच रुपांतर भेटीत किंवा शरीर संबंधात नक्कीच झाल असत,

आता प्रश्न पडतो , मला हे नको होत का , किंवा मला ते आवडलं नसत का , तर निच्छितच आवडलं असत , कारण मी सुद्धा हाडामासाचा माणूस आहे पणत्या नंतर त्या नात्याचा जो समारोप झाला असता तो दोघांच्या जिव्हारी लागला आसता , किंवा दोन कुटुंब , आमची मुल ज्याचा काहीही अपराध नाही ते सर्व त्यात होरपळून निघाले असते .

आता हे सर्व अस सांगताना जर तुम्ही मलाघाबरट बोलत असाल, तर हो मी सदाशिव रामेश्वर कर्णिक , एक नंबरचाघाबरट मनुष्य आहे .

 

 

समाप्त

लेखिका : निशा राकेश गायकवाड .