एकतर्फी Nisha Gaikwad द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

एकतर्फी

                                                 एकतर्फी

प्रकरण – १

सकाळचे सात  वाजले होते, रोहिणीची लगबग चालू होती, तिला छोट्या मिनुला शाळेसाठी तयार करायचं होत, श्रीकांतचा टिफ़ीन  बनवायचा होता,  आणि स्वतःला देखील वेळेवर ऑफिस गाठायचं होत , तिची तारेवरची कसरतच सुरु होती पण  श्रीकांत मात्र  शांतपणे चहा घेत रोजच वर्तमानपत्र वाचत बसला होता ,

 रोहिणीच्या खूपदा मनात येई “ह्याने निदान मिनुची तयारी तरी  करावी तिला स्कुलबस पर्यंत तरी सोडावं, एकतर ह्याच्याच मुळे मला रोज रात्रीच जागरण होत, रोजच का हवं असत ह्या माणसाला कुणास ठाऊक, एक दिवस म्हणून सुटका नाही, अरे निदान माझ्या तब्बेतीचा तरी विचार करशील कि नाही, त्या दिवशी अंगात ताप असताना देखील जाऊदे , तो विषय नको आता नाहीतरी उगीच माझी चिडचिड होते.”

मिनुला तयार करून श्रीकांतला गॅस वर ठेवलेल्या दुधावर लक्ष द्यायला सांगून ती खाली उतरली, मिनुला सोडून ती घराजवळ आली तेव्हा तिला करपलेल्या दुधाचा वास आला ती झटकन किचन मध्ये शिरली, दूध आटून पातेलं करपून गेले होत, श्रीकांत अंघोळीला निघून गेला होता, रोहिणीला श्रीकांतचा भयंकर राग आला पातेलं उतरवताना तिचा हात देखील भाजला.

"तुम्हाला साधं दुधावर देखील लक्ष  ठेवता येत  नाही  का "

"तुला किती वेळा सांगितलय हि असली बायकी कामं मला नको सांगत जाऊस"

"अहो पण सकाळच्या घाईत जरा मला मदत केली तर काय बिघडेल तुमच "

"जर इतकी घाई होत असेल तर जरा लवकर उठात जा "

रोहिणी श्रीकांतला काहीच बोलली नाही , बोलून तरी काय फायदा होता म्हणा , एकदा अशीच ती श्रीकांतला रात्रीच्या जागरणावरून बोलली असताना, तू माझी हक्काची बायको आहेस , तू नाही म्हणटलीस तरीही मी ते करणार ते पण रोज , तुझी इच्छा असो किंवा  नसो तू ते मला दिलच पाहिजे आणि जर तुला नसेल जमत तर तसही सांग मी बाहेर सर्व उरकून येत जाईल”

रोहिणीसाठी हि धमकी खूपच  भयंकर होती, नवरा बाहेर जाऊन तोंड मारेल, सोबत कोणते आजार घेऊन येईल आणि त्याला काही झालं तर आपलं आणि आपल्या मुलीचं काय होईल ह्या विचाराने ती तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत होती, बरं ह्याला सोडून द्यायचं म्हंटल तरी सांगणार काय सांगणार आई वडिलांना , नवरा कामात मदत करीत नाही म्हणून , कि तो रोज माझी इच्छा नसताना माझ्यावर जबरदस्ती करतो म्हणून , रोहिणीला इथेही नवऱ्याच्याच इज्जतीची काळजी होती, तिच्या नवऱ्याच्या ह्या एकतर्फी सेक्स भावनेला ती वैतागली होती.

**********************************************************************************          

प्रकरण – २      

फरीदा आज खूपच थककेली दिसत होती, तापामुळे तिला खूपच अशक्त पणा आला होता ,  निदान आज तरी तिला कोणतही  गिर्हाइक  नको होत, पण सुलेमानपुढे बोलायची हिम्मत तिची नसायची, थोड्याच वेळात सुलेमान एका माणसाला घेऊन आला.

"सुलेमान जरा तबियत ठीक नाय माझी तू ह्याला रुकसानाकड घेऊन जा ." फरीदा अगदी दीनवाणा चेहरा करून बोलली.

"ये..फरीदा..तुझी नाटक नाय पाहिजे काय .दोन दिस आदी पण तू असच केलंत , यक्तर किती मेहनतीनं गिर्हाइक आणतो, तुझ काय रोजच रडगाणं” सुलेमान तिच्याकडे खाऊ कि गिळू ह्या नजरेत पाहत होता.

"माझी खरचं तबियत ठीक नाय , आज्जचा दिस जाऊदे, पाय पडते तुझ्या" असं म्हणून ती खरचं त्याच्या पाया पडू लागली

"बस झाली तुझी नाटकं रांड साली" अस म्हणून तिने तिला लाथेने उडवून लावली.

आता मात्र फरीदा जाम चिडली."व्हय..हाय मी रांड , धंदा करते आणि पैसा कमावते, तुझ्या सारखी दुसऱ्याच्या तुकड्यांवर नाही जगत.." असं म्हणून फरीदा सुलेमानला मारायला धावली, सुलेमान पुढे तीच काहीच  चाललं नाही त्याने तिची  गचांडी पकडली "माझ्यावर मग्रूरी केलीस ना तर जिवंत जाळींन तुला, लक्षात हाय ना  चमेलीच काय केलं मी, चुपचाप माझ्या  माणसाला खुश करायचं"अस म्हणून आणलेल्या गिऱ्हाइकाला तिथेच ठेऊन सुलेमान चालता झाला.

वेश्येला तिने केलेल्या संभोगाचे पैसे मिळतात , फरीदा धंदा करून जरी तीच पोट भरत होती,   जरी ती त्यात सारवलेली असली तरी कधी कधी मात्र तिला तिच्या मनाविरुद्ध इच्छा नसताना देखील एकतर्फी च्या जबरदस्तीला समोर जावंच लागायचं.
 

प्रकरण -३

प्रियाला आज कॉलेजला  उशीर झाला होता ती झपझप चालत होती आणि मनोमन ईश्वराकडे प्रार्थना करत होती कि आज पुन्हा नको तो रस्त्यात दिसायला, नरेश उर्फ नऱ्या हा तिच्या बिल्डिंग जवळच्या झोपडपट्टीत राहणारा  मावली मुलगा,  तो रोज तीन - चार टाळक्यांसोबत प्रियाच्या येण्याजाण्याच्या रस्त्यावर उभा असायचा, प्रियावर प्रेम असल्याचं सांगायचा, लग्नाची गळ घालायचा , पण प्रिया एका सुशिक्षित घरातली अभ्यासू मुलगी होती, तिला खूप शिकायचं होत, स्वतःच्या पायांवर उभं राहायचं होत तिला खरतर अभ्यासा व्यतिरिक्त  दुसरं कशातही इंटरेस्ट न्हवता ती त्याला खूप घाबरायची , तो दिसला कि तिथून पळ काढायची तिला स्वतःला ह्या तिच्या घाबरण्याचा खूप राग यायचा पण ते तीन-चार जण आणि ती एकटी काय करणार घरी सांगायचं म्हंटल तर आईबाबांना टेन्शन द्यायचं न्हवत, आईबाबा कदाचित  तीच कॉलेजहि  बंद करतील हि भीती तिला सतत वाटायची म्हणून ती गप्प होती, त्या दिवशी तर  त्याने सरळ प्रियाचा हात पकडला.

" आज तू मला हो म्हणालीस तरच हात सोडीन "

"प्लिज मला जाऊ दे मला नाही तुझ्याशी लग्न करायचं." प्रिया रडायला लागली.

"लडकी जभी ना काहे तो उसका मतलब होता है हा." नऱ्या उगीच हिंदी डायलॉग मारत हसला .

"हे बघ प्लिज माझा हात सोड नाहीतर मी आरडाओरड करेल, पोलिसात जाईल "

"खूप झाल तुझ , कितीदा सांगायचं तुला ,आणि आज तू पोलिसाची धमकी मला देतेस , बघच तुझ काय करतो मी ."असं म्हणून तो तिकडून रागारागाने  निघून गेला.

त्याच्या दोनच दिवसांनी वर्तमान पात्रत बातमी आली  "एकतर्फी प्रेमातून तरुणी वर ऍसिड हल्ला.."

नऱ्याला प्रियाशी असं वागून काय मिळालं, तिला तो आवडत न्हवता इतकं कारण पुरेसा न्हवत तिच्या नकाराला, तिच्या तोंडावर ऍसिड फेकून काय मिळाल त्याला , आयुष्यात काहीतरी मोठ करू पाहणारी मुलगी एका माथेफिरूच्या एकतर्फी प्रेमाला बळी पडली.

 
 

प्रकरण – ४

लतिका तिच्या लॅपटॉपवर आजच्या मीटिंगचा अजेन्डा वाचत होती. कंपनीच्या नवीन लाँच झालेल्या प्रोडक्टच आज प्रेझेन्टेशन होत हे नवीन प्रोडक्ट मार्केट मध्ये आल्यानंतर तिच्या कंपनीच्या टर्नओवर मध्ये बरीच भरभराट करणार होत,  तिनेच अँपॉईंट केलेल्या सोहेलने सर्वाना खूप उत्तम रीतीने प्रोडक्टच प्रेझेन्टेशन समजावलं , मीटिंग संपल्या नंतर सर्वाना आज रात्री एका  फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये कॉकटेल पार्टीचं तिने जाहीर केलं,

सोहेलवर लतिका भलतीच खुश होती , आपली निवड हि कशी आणि किती चांगली ठरली हे ती प्रत्येक वेळी स्वतः: शीच बोलत होती , त्या रात्री पार्टीत जरा ती जास्तच खुश  होती,  ती स्वतःहून सोहेल सोबत ड्रिंक्स घेत होती त्याच्याशी खूप थट्टा मस्करी विनोद करत होती, सोहेल साठी थोडसं ते अवघडल्यासारखं होतं कारण काही झालं तरी लतिका त्याची बॉस होती, लतिकाला  चढली असल्यामुळे तिला बॉस एम्प्लॉई असं काही भानच न्हवत, पण सोहेलला मात्र तिच्या चारित्र्याबद्दल संशय आला, बॉस असून पण आपल्यापेक्षा     लो- प्रोफाइल माणसाशी इतकं अघळपघळ वागणं त्याला खटकत होतं, नंतर मात्र सोहेल देखील स्वतःहून तिच्या वागण्याला प्रतिसाद देऊ लागला उगीच तिला सावरण्याचा नाटक करताना तिला स्पर्श करू लागला.

"चला मॅम..तुम्हाला घरी सोडतो मी " अस म्हणत त्याने तिला ड्रायवरच्या बाजूच्या सीटवर बसवलं.

"नो..मिस्टर सोहेल...आय एम ओके....आय कॅन गो मायसेल्फ" लतिका अस  म्हणाली आणि धडपडली.

"मॅम ..तुम्हाला जास्त झालीये ..तुम्हाला नाही चालवता येणार गाडी.." सोहेल ने जबरदस्ती गाडीची चावी तिच्या हातातून काढून घेतली.

"नको मी हळू हळू चालवत जाईल..तुझ्याशी बोलता बोलता किती पेग रिचवले कळलंच नाही"

"माझ्यामुळे झालाना प्रॉब्लेम म्हणून मीच सोडतो तुम्हाला"

ती नको म्हणत असताना सोहेलन तिला गाडीत बसवलं आणि गाडी स्टार्ट केली.

खिडकीतून येणारा गार वारा आणि चढलेली नशा त्यामुळे लातीकाला  पेंग येऊ लागली .

 काही वेळाने तिला जाग आली  तेव्हा तिची गाडी  एका निर्मनुष्य रस्त्यावर थांबली होती आणि सोहेल तिच्या अंगावरून हात फिरवत होता ती जोरात किंचाळी आणि तिनं सोहेलला दूर ढकल.

"तुझी हिम्मत कशी झाली माझ्या अंगाला हात लावायची" लातीकाचा राग उफाळून येत होता.

"म्हणजे काय...तुम्हाला हे खरंच आवडलं नाही का मॅम"

"व्हॉट यु मिन, तू काय बोलतोस”

“मला वाटलं कि तुम्ही फार फॉरवर्ड आहात. माझ्याशी इतक्या मोकळे पणाने वागत होतात , माझ्यासोबत तुम्ही ड्रिंक घेतली, मला वाटलं  जस्ट थोडस  एन्जॉय करावं म्हणून ह्या गोष्टी नथिंग असतात , ईस्ट ह्यपेन"

"तुझ्यासाठी नथिंग असतील मी तुझ्यासोबत ड्रिंक घेतली कारण तुझ्यावर खुश होते मी तुझ्या कामावर खुश होते, त्याचा तू असा अर्थ काढला "

"कॉम ऑन मॅम, मी कुणालाही सांगणार नाही हे फक्त तुमच्यात आणि माझ्यात राहील" असं म्हणून तो पुन्हा तिला हात लावू लागला.

लतिका ने खाडकन  सोहेलच्या  मुस्काटात पेटवली.

"पुन्हा जर मला हात लावलास ना तर मारून टाकीन तुला" तिच्या डोळ्यात आग पेटली होती.

"इथे कुणीही येणार नाहीये तुला वाचवायला, तूझ्यासोबत मी काहीही करू शकतो आणि त्या नंतर तू माझ्यावर कितीही आरोप केलेस तरी बदनामी तुझीच होईल.”एका नामांकित कंपनीच्या सी.ई.ओ वर तिच्याच एम्प्लॉयीने केली जबरदस्ती" कशी वाटली हेडलाईन , हे बघ लतिका सगळं शांतपणे होऊ देशील तर ठीक आहे , नाहीतरी मी तुझ्यावर जबरदस्ती करू शकतो  जी तुला खूप त्रासदायक ठरेल"

त्या रात्री त्या निर्मनुष्य रस्त्याने लतिकाच्या किंचाळ्या कान फुटे पर्यंत ऐकल्या असतील.

सोहेलच्या बुद्धिमत्तेला शोभतील अश्या  एकतर्फी घाण विचारांमुळे लतिका तीच उर्वरित आयुष्य कस घालवणार , ह्याचा विचार न केलेलाच बरा.

 

******************************************************************************

मुलगी शिकली प्रगती झाली असं आपण समजतो . पण इथे तर एक अशिक्षित वेश्ये पासून ते एका मोठ्या हुद्द्यावर काम करणाऱ्याच्या बायकांची देखील तीच अवस्था आहे , बाईचं चारित्र्य हा एक असा ठपका असतो जो प्रत्येक स्तरातल्या स्त्रियांवर लादला  जातो  मग ती गृहिणी असो, तरुण मुलगी असो , एखाद्या कंपनीची सी.इ.ओ असो किंवा एखादी वेश्या, कितीवेळा तिच्या मनाप्रमाणे हा समाज तिला जगू देतो,  वरच्या  चारही उदाहरणात रोहिणी,  प्रिया, लतिका आणि फरीदा आपल्या समाजाच्या स्त्रीच नेतृत्व करतात, प्रत्येकीच्या आयुष्यात तिच्या मनाविरुद्ध एकतर्फी घटना घडतात, ज्याच्या मुळे त्यांना  सतत आपली मान खाली घालूनच जगावं लागता,रोहिणीसारख्या कधी नवऱ्याच्या इज्जतीची काळजी करतायेत, प्रियासारखं  कधी आईवडिलांच्या इज्जतीची काळजी करतायेत काही लतिकासारखं स्वतःच्याच इज्जतीसाठी परीस्थ्तीला शरण जातायेत  तर काही  फरीदासारखं स्वतःच्या  इज्जतीचा बाजार मांड्तायेत.

स्त्रीला  सगळ्यांची काळजी असते ..कुटुंबाची, आईवडिंलाची, नवऱ्यांची , मुलांची , समाजाची , स्वतःच्या चारित्र्याची, पण तिची काळजी मात्र कुणीच नाही करत अगदी तीच चारित्र्य देखील  ते देखील लगेच कलंकित होऊन जात .बदनाम ठरत , कमवायला आयुष्य जात पण गमवताना एक क्षण पुरेसा ठरतो.

एकतर्फीच्या प्रेमाने , एकतर्फीच्या संभोगामुळे  जो  हक्क म्हणून केलेला असो किंवा पैसे देऊन मिळवलेला असो किंवा ओरबाडलेला असो ह्या एकतर्फीच्या घटनांमुळे तीच उभं आयुष्य जळून जातंय , जे त्या पुरुषाला कधीही कळत नाही.

स्त्रीचा नकार उगीच होकार समजायचा, ती वेश्या आहे म्हणून तिला पैसे देऊन तिच्यावर जबरदस्ती करायची, बायको आहे म्हणून हक्काने तिला उपभोगायचं, आणि तिच्याच बदनामी ची धमकी देऊन तीच शील लुटायचं.

समाजासाठी ती एक उपभोगाची वस्तू म्हणूच राहणार का ?

उघडतील का ह्या समाजाचे डोळे का हे असाच राहणार कायम  एकतर्फी

 

समाप्त

 

********************************************************************************