bali books and stories free download online pdf in Marathi

बळी

                           

आमावस्येची ती भयाण रात्र , जंगलात लांबवर ऐकू येणारी कोल्हेकुई मध्येच काळीज दडपून टाकणारा एखाद्या घुबडाचा चित्कार , झाडांच्या पानांची अनैसर्गिक होणारी सळसळ , रातकिड्यांची भुणभुण आणि त्या सर्व वातावरणाला भेदून जाणारा शरीराचा थरपाक उडवणारा जीवा मांत्रिकाचा आवाज , जीवा मांत्रिकाच चाललेलं अगम्य अस मंत्र पठन फारच भीती दायक वाटत होत.

जंगलाच्या एका झाडाखाली बसून जीवाने त्याच्या पूजेचा पसारा मांडला होता , जवळच भयभीत सुदाम्या इकडे तिकडे बघत थरथरत हात जोडून जीवा समोर बसला होता.

जीवा मांत्रिक त्याच्या चिरकलेल्या आवाजात पटापट  मंत्र म्हणत  होता आणि हातासरशी ठेवलेल्या  समिधा पेटवलेल्या आगीत  टाकत होता त्याचक्षणी  आगीचे लोळ त्या होमातून उठत होते .आणि वर आभाळाला भिडत होते , त्याने पन्नासावी कोंबडी कापली ,कलकलाट करत ती शांत झाली, ते  रक्त एका भांड्यात साठवलं ज्यात  इतर कापलेल्या  कोंबड्यांचं देखील रक्त आधीच होत , जीवा  ने  ते रक्त्याने भरलेल वाडग   सुदाम्याला  देत " पिऊन  टाक हे रक्त" अशी जवळपास आज्ञाच दिली.

सुदाम्या ते   रक्त प्यायला,  एका दोन घोट पोटात गेल्या नंतर  ते वाडग खाली सांडल आणि तो तिथेच भडाभडा ओकला.

जीवा मांत्रिक ओरडला "काय केलंस तू मुर्खा , किती महिन्याने मोठ्या कष्टाने हा योग जुळून आला होता ."

"माफ करा मला महाराज,काय करू आता मी  " सुदाम्याने घाबरतच जीवाला विचारल.

"जा आता घरी आणि सांगितलेलं सगळं लक्षात ठेव जाताना माग वळून बघू नको, मीच आता निस्तरतो सगळं"

सुदाम्या   तडक उठला आणि झपझप पावलं टाकत  रास्ता कापू लागला.

सुमी त्याची वाट बघत अजून जागीच  होती .त्याने आल्या बरोबर अंगणातील रांजनातल पाणी तोंडवर मारून घेतलं , स्वच्छ चूळ भरली  आणी दोन तांबे पाणी तो घटाघटा प्यायला..

सुमी ने त्याला काहीच विचारलं नाही ती शांत होती. तिने त्याला जेवण वाढलं  पण त्याची  भूक मेली होती.

तो न जेवताच झोपून गेला. सकाळी सुमी ने त्याला उठवलं तो तापाने फनफणत होता  

तिने त्याला उठून बसवलं आणि त्याला कसलातरी काढा पाजला. त्याला थोडी हुशारी वाटली तेव्हा सुमीने त्याला काल रात्री बद्दल विचारल .

"ताप किती वो आलाय, मी राती इचारलं न्हाई पण गेल्ता कुठं" सुमीने त्याच्या कडे एकटक पाहत विचारल.

 "जीवा मांत्रिकाकड "

"त्याच्या कडे काहून गेल्ता"

"जीवा मला बोल्ला पन्नास कोंबड्यांचा निवद लागलं, मग मला बाप हुता ईल, त्यान तुलापण बोलावल हाय चार दिसानी”

"मी नाही जायची, नजर चांगली न्हाय मेल्याची " सुमी चिडून म्हणाली.                                                      

"असं काय करती सुमे , डाक्टर बोल्ला अडचण माझ्यात हाय , मी बाप नाय होऊ शकत, पण जीवा म्हणतो   तुझ्यावर बादा हाय तिचा बंदोबस्त केला कि सगळ ठीक हुईल , एक काय चांगल तीन-चार पोर व्हतील असं बी म्हणला" सुदाम्या तिला समजावणीच्या सुरात म्हणाला.

"आणि तुम्ही इस्वास ठिवला, तुम्हास्नी काय वाटत , त्या  मांत्रिकांमुळं पोर होतील आपल्याला, अवो तो एक नंबरचा लबाड मानुस हाय"

"सुमे तुला माझी शप्पत हाय, ह्या येळला नाय म्हणू नगस, यका दिसाचा तर प्रश्न हाय."

"तुमचं डोस्कबिस्क फिरलंय काय, त्या माणसाकडे जायचं म्हंजी साधं काम वाटय व्हय तुम्हास्नी."

"अग फकस्त जाऊन त्याच्या संग पूजा करायची एका दोन तास " सुदाम्या अजूनही त्याचा हेका सोडत न्हवता

"हे बघा धनी मला काय हे बरोबर वाटत न्हाय मी त्याच्याकडं अजाबात जायची न्हाय"

"मग अख्ख गाव मला हंडगा म्हणलं ते चालतंय तुला, पण सवताच्या नवऱ्यासाठी तू एक पूजा करायला तयार नाहीस " आता सुदाम्या सुमीवर चिडला .

"पर धनी त्यानं माझ्यावर हात टाकला तर " सुमी रडवेली होत म्हणाली.

"अग येडे देवाचा मानुस हाय तो असल काय बी वंगाळ करणार न्हाय"

"तुम्हीबी चला माझ्या संग, मी एकटी न्हाय जाणार .."

"तुला एकटीलाच बोलावलंय, मला घरातच राह्य सांगितलं, आपण दोघ पण घरात नसलो तर ती बादा आपल्या घरावर ईल"

"पर धनी"

"आता पुढं काय बोलू नगस, चार दिसांनी तुला त्याच्याकड जायचंय" अस म्हणून सुदाम्या डोक्यापर्यंत पांघरून घेऊन झोपून गेला.

सुमी डोक्याला हात लावून बसली. तिला जीवा मांत्रिका कडे जाणं म्हणजे आयुष्य उध्वस्त करण हे चांगलंच ठाऊक  होत, तिला सावत्याची रुक्मा आठवली, बिच्चारी वेडी झाली होती, मुलं होण्याचं औषध घायला जीवाने तिला एकटीलाच बोलावलं होत ,त्या दिवशी रुक्मासोबत काय घडल असेल ह्याचा अंदाज सुमीला आधीच आला होता ,  सुमीच्या अंगावर शहारा आला. तिला तिच्या नवऱ्याचा रोष ओढवून घेणं पण परवडणार न्हवत.

मनाशी काहीतरी ठरवून सुमी त्या रात्री जीवाकडे गेली, तिच्या नवऱ्याने सांगितल्याप्रमाणे एक- दोन तासांची पूजा होती पण तिला माहित होत जीवामांत्रिक तिच्या सोबत काय करणार होता ते म्हणून तिने सोबत एक सुरा आणि मिरची पूड पदराला बांधून घेतली. तिला जीवाला चांगलीच अद्दल घडवायची होती.

जीवा तिला बघताच खुश झाला त्याने उगीच एका दगडासमोर फुल वाहिली, काहीतरी मंत्रोच्चार केले, कुणाशी तरी संवाद साधत असल्याचं नाटकं केलं.

सुमी ते सर्व नाटक उघड्या डोळ्यांनी पाहत होती.

"सुमे देव म्हणतो तुला पोर पाहिजे असेल तर तुला माझ्यासोबत निजाव लागल" जीवा सुमी कडे पाहत म्हणाला.

सुमीनं प्रसंगावधान राखून थोडी चलाखी दाखवली..

"जीवा मला ठाव हाय माझा नवरा मला पोर न्हाय देऊ शकत,  तूच मला पोर देऊ शकतो" थोडंसं लाजण्याच नाटकं करत सुमी म्हणाली.

"हुशार आहेस तू " असं म्हणून तो तिच्या जवळ जाऊ लागला.

तो जवळ आल्याची संधी साधून तीन पदरात बांधलेली मिरची पूड त्याच्या डोळ्यात फेकली.

अचानक झालेल्या हल्लाने जीवा कळवळायला लागला, सुमीने तत्परतेने सुरा बाहेर काढून त्याच  पुरुषत्वच  कापून टाकलं, रक्ताच्या चिळकांड्या तिच्या साडीवर,  तोंडावर उडाल्या , जीवा बोंबा मारत त्याच अर्धवट कापलेलं हातात घेऊन जंगलात सैरावैरा धावत  सुटला, सुमी देखील काही अंतर त्याच्या मागे धावली , पण तो  जंगलात दिसेनासा झाला तिने तो नाद सोडला आणि ती घराकडे  निघाली वाटेत तिने जंगलातच एका  झाडाखाली कुणाला दिसणार नाही असा  एक खड्डा करून त्यात तो सुरा   पुरून टाकला, आणि इतर पुरावे देखील नष्ट केले आणि घरी आली. सुदाम्या  तिची वाटच  बघत बसला होता . सुमी शांतपणे घरात शिरली .

"सुमे झाली न्हवं नीट पूजा" सुदाम्याने आल्या आल्या सुमीला विचारल.

"व्हय नीटच झाली" सुमीने त्याच्याकडे  न बघतच उत्तर दिल.

"मग आता कसलाच तरास न्हाय ना " सुदाम्या खुश होता.

"व्हय आता कुणालाबी कसलाच तरास न्हाय व्हनार". सुमी च्या चेहऱ्यावर छदमी हास्य पसरलं .

"हे रगात कसलं. तुझ्या लुगड्यावर" सुदाम्याने तिच्या साडीकडे निरखून पाहत विचारल.

"कोंबड कापलं त्यानं माझ्या समोर त्याचंच उडालं असलं, मी बदलून येते" अस म्हणून ती झटकन आत निघून गेली.

सुदाम्यान जेवण आधीच  बनवून ठेवलं होत जेवता जेवता पुन्हा त्याने  विषय काढला..

"काय म्हणाला जीवा पूजा उरकल्यानंतर"

सुमीला आधी काय बोलाव ते सुचेना मग ती म्हणाली.

"जीवा म्हणला आता आपल्याला पोर होईल आणि नाही जर झालं तर तो त्याच गुप्तांग कापून देवाला देईल"

सुदाम्याचे डोळे पांढरे पडले तो पुढे काहीच बोल्ला नाही. दोघांनी शांतपणे जेवण केल.

दुसऱ्या दिवशी जंगलात जीवाचं प्रेत एका गावकऱ्याला दिसलं त्यानं  अक्ख्या गावात बोंब मारली.

सुदाम्या  पण गेला जीवाचं प्रेत बघायला.

त्या रात्री  जीवाच डोक कोणीतरी दगडाने ठेचून त्याला मारून टाकल होत  आणि कमरेखाली देखील  रक्त वाहून सुकून गेलं होत. कमरेखालच रक्त बघून सुद्म्या  समजायचं ते समजून गेला.

सुदाम्या  मनातल्या मनात सगळ्या गोष्टींचा संदर्भ लावत होता. जीवा मलातर कधी त्याच कापून देवाला देईल असं म्हणाला नाही काल सुमीलाच  कसाकाय तो बोलला आणि हे दुसऱ्यादिवशी लगेच असं घडलं त्याला  कुठे तरी पाणी मुरतंय असा दाट संशय आला , शिवाय जीवाच डोक पण कोणीतरी दगडाने ठेचल होत .

त्याला जंगलातून जाताना काहीतरी चमकताना दिसलं  नीट पाहिलं तर ते अर्धवट मातीत घुसल्यासारक होत त्याने खाली बसून नीट उकरून बाहेर काढलं तर तो एक सुरा होता, कोण्या प्राण्याचे तो थोडासा उकरून बाहेर काढला असावा आणि नेमका तो सुद्याम्यालाच  दिसला, तो त्याच्याच घरातला होता हे त्याने ओळखल. त्याने तो गपचूप लपवून घरी आणला.

"जीवा मेला जंगलात त्याच मढ सापडलं. डोस्क बी फुटलं होत त्याच" सुदाम्या  आल्या आल्या बोलला आणि सुमीचा चेहरा पाहू लागला सुमीच्या चेहऱ्यावर काहीच भाव न्हवते.

"आन. सुमे तू सांगितलंस तसच झालं बर का. त्यानं खरच त्याच ते कापून देवाला दिल."

तरीही सुमीच्या चेहऱ्यात काहीच फरक न्हवता

मग त्याने तो सुरा बाहेर काढून तिच्या समोर धरला तेव्हा  मात्र सुमी घाबरली.

"हा सुरा कुठं गावला तुम्हाला" सुमीने मोठे डोळे करत सुद्याम्याला विचारल.

"तिकडचं जिथं तू पुरून आली व्हतीस...... का सुमे का केलंस तू असं?"

"मी नसत केलं तर नंतर कुणीतरी हेच  केल असत, आन काय कराया पाहिजे हुतं मी त्याच्या जवळ निजले असते तर तुम्हाला कळलबी नसत आणि तुम्ही बाप बी झाला असता पण ते पोर तुमचं नसत येतंय डोस्क्यात कायतरी "

"पण सुमे तो जीवा तो तर म्हणला ."

"फशवीत व्हता तुम्हाला त्याला माझ्यासंग वंगाळ काम करायचं होत म्हणून तर मला एकटीलाच  त्यानं बोलावलं आणि तुम्हास्नी घरी राह्य सांगितलं"

"माझा नाय इश्वास बसत.."

"अहो धनी आईच्यान खरं बोलतीय त्यानं हात टाकला व्हता माझ्या अंगावर म्हणून मी हे संमद"

"अग  मग पळून यायचं त्याला मारून टाकलंस खून केलास त्याचा" सुदाम्याने  मधेच तोडत ओरडून सुमीला विचारल ,

त्या आवाजाने कि काय सावत्याची रक्मा त्यांच्या दारात आली "सुमीन  न्हाय मी मारलं जीवाला,    मी त्याला खाली  पाडून  दगडान ठेचून ठेचून मारलं त्याला"असं म्हणून हसायला लागली..

सुदाम्या  आणि सुमी दोघे तिच्या कडे बघायला लागले तेव्हढयात सावत्या धावत आला आणि रुक्माला ओढत घरी घेऊन जाऊ लागला.

सुदाम्यान  त्याला अडवलं ”थांब सावत्या रुक्मा काय तरी बोल्ली आता"..

"सुदाम्या हात जोडतो  कुणालाबी सांगू नगस , हि पोरगी काल माझा डोळा चुकवून जंगलात पळून गेली आणि हींनच  काल जीवाला मारलं मी तिला शोधपतुर सगळं संपलं व्हतं जीवा मरून पडला होता पाया पडतो तुझ्या कुणाला सांगू नगस त्यानंच माझ्या पोरीला आविष्यातून उठवली त्या राती मला रुक्माला  त्याच्याकड पाठवाय नको व्हती मी नसती पाठवली तर माझी पोरगी वांझ राहिली असती पण येडी तर झाली नसती नवऱ्यानं जरी सोडलं तरी तीन तीच आविष्य कसतरी घालवलं असत पण आता बोलून काय उपेग सार  संपल." असं म्हणून सावत्या लहानमुलां सारखं रडू लागला..

सुदाम्याने त्याला धीर दिला "तू हिला चांगल्या डाक्टरला दाखव आता कुण्या  मांत्रिका कड न्हेऊ नगस"

सुमी आश्चर्याने सुदाम्याकडे  पाहू लागली.

"माफ कर सुमे मला " अस म्हणून सुदाम्या रडू लागला.

सुमीने त्याच्या तोंडावर हात ठेवला"आता पटलं ना जाऊ द्या मग आपल्याला पोर व्हनार नाय असं डाक्टर जेव्हा बोलतोय तेव्हा हे असले ढोंगी मांत्रिक आपल्यावर काय उपचार करणार , त्याला त्याच्या पापाची शिक्षा  भेटली, असं समजा , मला फकस्त त्याला अद्दल घडवायची होती पण खरं नुकसान रुक्माच झालं व्हतं आणि तिनंच त्याचा बदला घेतला"

"नाही सुमे रुक्मान नाय, निसर्गानं, कारण जीवा  निसर्गानं निर्माण केलेल्या जीवांचा खेळ करत होता , त्याचं आयुष्य संपवत होता त्यांचा उगीच बळी देत होता , म्हणून आज निसर्गानचं त्याचाच बळी घेतला" हे बोलताना सुदाम्याला  पुन्हा त्या कोंबड्याच्या रक्ताची आठवण आली आणि त्याने मनोमन ईश्वराची क्षमा मागितली.

 

समाप्त   

 

 

 

 

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED