एक होती मुन्नी Nisha Gaikwad द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

एक होती मुन्नी

 

एक होती मुन्नी

 

"अरे भाय ..तू कायको मेरा फिकर करता ..मी ठीक हाय.."   मुन्नी  तिच्या पुण्यात राहणाऱ्या भावाशी फोन वरून बोलत होती...."तेरे पास पैसा जास्ती हुवा क्या ..तू रख अभी..मेरेको काम को जाणा है.."  असं म्हणून तिने  फोन कट केला...तीच ते बंबैय्या हिंदी फारच मजेदार वाटायचं ऐकायला...ती फोनवर जास्त बोलायची नाही... तीला बोलायला आवडायचं नाही असं न्हवत. तोंडाची टकळी कायम सुरु..पण फोनवर बोलायला पैसे लागतात..आणि बोलण्यासाठी पैसे खर्च करण तिला आवडत न्हवत...

मुन्नी  माझ्या आईची बालमैत्रीण...उंचीने कमी , रंगाने सावळी,  सांगण्याचं तात्पर्य मुन्नी दिसायला सुंदर वैगेरे न्हवती, हे झाल माझ लहानपणीच मत पण आता विचारलं तर तिच्यासारखी अत्यंत देखणी आणि सुंदर स्त्री मी आजतागायत पहिली नाही                 मी तिला मुन्नी मावशी म्हणायचे...खरतर ती  माझ्या आईची चुलत किंवा मावस  बहीण नसून मैत्रीण आहे हे  मला खूप वर्षांनी कळल , इतकी ती आमच्यात एकरूप झाल्यासारखी वागायची, तिला मोठ्या दोन बहिणी  आणि लहान दोन भाऊ मुन्नी मावशी तिच्या आईच तिसरं आपत्य... माझी आई आणि ती एकत्र शाळेत होत्या , एकमेकांनीच्या अत्यंत जिवलग अगदी सख्या बहिणीप्रमाणे, म्याट्रिक ची परीक्षा  झाल्यावर माझ्या आईच लग्न झालं...त्यानंतर मुन्नी मावशी ने देखील शाळा सोडली पुढं ती  शिकली नाही..ती छोट्या मोठ्या कारखान्यात कामाला मला जाऊ लागली..तिच्या घराची परिस्थिती फार हलाखीची म्हणून पण असावं कदाचित...तिच्या मोठ्या बहिणींची लग्न झाली... पण तिने लग्न नाही केलं...तिला स्थळं आली कि नाही हे माहित नाही पण  ती स्वतः कुणाच्या प्रेमात देखील  पडली नाही ,  कारणं नेमकं काय ते सांगता नाही येणार पण लग्नाचं वय असताना ती कायम घराच्या जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेली राहिली... तिच्या मागच्या दोन्ही भावंडांची लग्न झाली...लग्नानंतर आई जेव्हा पुण्याहून मुंबईला आली...तेव्हा मुन्नी मावशी  आम्हाला पुण्याहून भेटायला यायची... माझ्या मोठ्या भावाचे, माझे खूप लाड करायची... मला चांगलं आठवतंय  ..माझ्या लहान बहिणीच्या वेळेस जेव्हा माझी आई गरोदर होती..तेव्हा ती स्वतः आमच्या घरी येऊन राहिली होती...माझ्या आज्जीला मदत करायची मला एकदा तिच्या पर्स मध्ये एक पुस्तक दिसल..ते रेसिपींचं पुस्तक होत...त्या पुस्तकातलं बघून ती जेवण बनवायची...ते जेवण कसं बनायचं हे मला नाही आठवत..पण मी जेव्हा हे आईला विचारलं...तेव्हा आईने मला मुन्नी  मावशीच्या घरची आणि आपल्या घरची जेवण बनवण्याची पद्दत वेगळी आहे म्हणून ती तसं करते अस ती मला सांगायची ...आणि वेगळी का तर मुन्नी मावशी महाराष्ट्रीयन न्हवती ती तेलगू होती हे देखील मला तेव्हा नव्याने  कळलं...मला तेव्हा विशेष नाही काही वाटलं...पण आज मला मनापासून जाणवतंय एक व्यक्ती आपल्या दुसऱ्या जातीच्या मैत्रिणीच्या सासरी जाऊन तीला मानसिक आधार देणं...तिच्या मुलांना जीव लावणं..तिच्या सासूला कामात मदत करणं… ह्या साध्या गोष्टी नाहीत आणि हे सगळं मला आत्ता आठवतंय म्हणून मी हे सांगू शकते..पण अश्या कित्तेक गोष्टी असतील ज्या तिने केल्यात आणि कुणाला माहित देखील नसतील.

जेव्हा मी लहान असताना ती यायची... तेव्हा तीची कोणतीही वस्तू मला आवडली...फक्त “मावशी हे खूप छान आहे ग”...इतकं बोलायची खोटी ती सरळ ती वस्तुं काढून हातात ठेवायची...मग ते काहीही असो घड्याळ , पर्स, अगदी काहीही....

ती नेहमी न कळवता यायची...अचानक उगवल्यासारखी....ती आली कि आई तिला आमच्या भावंडांचे  नवीन काढलेले फोटो दाखवायची ...त्यातला आमच्या तीघांचा एक- एक फोटो ती आठवणीने ती स्वतः सोबत घेऊन जायची ...मला तेव्हा कळायचं नाही आणि मला तिचा रागही यायचा आमचे फोटो घेऊन हि त्यांचं करते काय ...पण आता समजतंय...ती जाताना आमच्या आठवणी सोबत घेऊन जायची..

आईने तीला खूपदा लग्न करण्याबद्दल सांगितलं अगदी तीने चाळीशी ओलालांडली तेव्हा देखील..पण ती म्हणायची “कशाला हवय आता लग्न तुझी मुलं मला सांभाळणार नाहीत का” `आता ह्या उत्तरापुढे आई काय बोलणार.. मुन्नी मावशी आता मुंबईतच राहते तीच्या एका भावाच्या घरी ...तशी ती तीच्या भावंडांच्या सर्व फॅमिली मध्ये फेमस होती...सगळ्यांना मदत केली तीने...आता ती थकलीये आधीचा उत्साह नाही राहिला तिच्यात...पण तरीही अजूनही ती कामाला जाते...तब्बेत ठीक नसते तीची...तिने सर्वांसाठी इतकं केलय तीला तीची सर्व भावंडं स्वतःकडेच राहण्याचा आग्रह करतात..पण तिथेच राहते जिथे तीला राहायचंय ..माझ्या वर तीचा खास जीव होता....माझ्या लग्नाच्या वेळेस अगदी हळदीच्या दिवसापासून ती राबत होती...लग्न कार्यात कुणाचं लक्ष कुणाकडे नसत ..अगदी माझ्या आईच पण न्हवत...ती जेवली कि नाही कि फक्त कामच करत होती...कुणाला माहीतच न्हवत.... पण तीने तक्रार केली नाही ... .पण खूप शांत होती....गप्प गप्प होती...काय चालू होत तिच्या मनात... कुणासठाऊक…

त्यानंतर माझ्या भावाच्या लग्नातही ती आली होती...पण ह्यावेळी तीला आईने खूप विनवण्या केल्या तेव्हा ती आली...तिच्यातला हा बदल कदाचित वयोमानामुळे असू शकतो... कि माझ्या लग्नातल्या अनुभवामुळे माहित नाही…

माझ्या लहान बहिणीच्या लग्नात मात्र डायरेक्ट लग्नाच्या दिवशीच आली होती...तेव्हा देखील आईने तिचा खूप शोध घेतला ती नेमकी कोणत्या भावाच्या घरी आहे तीचा आताचा नंबर वैगेरे इथपासून तीचा शोध सुरु व्हायचा...कधी ती पुण्यात असायची तर कधी मुंबईत तीच कायमस्वरूपी कोणतंच ठिकाण न्हवत...

तिची आई गेली तेव्हा तीला भेटायला गेले होते..ती घाय मोकलून वगैरे रडत न्हवती...पण “मी अनाथ झाले” असं मात्र ती आईला म्हणाली...ते बोलताना पण ती हसत होती...त्या हसण्यामागे पण खूप खोल असं दुःख आहे हे मात्र कळत होत.

आयुष्यात आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपण ,आपली माणसं, इतक्या मधेच गुंतलेले असतो...पण मुन्नी मावशी सारखी माणसं मात्र ईश्वराने दुसर्यासाठीच जन्माला घातलेली असतात..ती माणसं कधीही स्वतः मध्ये रमत नाहीत..त्यांना कायम दुसर्यांना सुख द्यायचं असत.. मुन्नी मावशी बिनलग्नाची का राहिली हा सर्वस्वी तिचा निर्णय होता...पण मला कधी कधी वाटायचं हि इतकं प्रेमळ असून पण कधीच कुणाच्या प्रेमात पण पडली नाही...का स्वतःच रंग रूप असं.. म्हणून तीने स्वतःला प्रेमात पडण्यापासून लांब ठेवलं...ती कायम आमच्यात आणि स्वतःच्या भावांच्या मुलाच्या मध्ये स्वतःच जग शोधत आली... काही दिवसांपूर्वीच तिच्याशी माझं बोलणं झालं...ती सतत स्वतःचे नंबर बदलत असते...आणि स्वतःहून कुणाला फोन देखील करत नाही.. स्वतःहून कुणाकडे जातही नाही...आई तीला ओरडते ..पण मला वाटत आता तीच आयुष्य हे तीला तिच्याप्रमाणे जगू द्यावं आयुष्य भर सर्वांचं केलं.. आता तीला स्वतःसाठी वेळ हवा असेल...आणि का नाही द्यावा तिनं स्वतःला वेळ.....खरच मुन्नी मावशी निदान माझी तरी तुझ्या पासून काहीच तक्रार नाही.....तू जशी आहेस तशी मला खूप प्रिय आहेस...आणि तशीच राहा आनंदी….. उरलेलं आयुष्य तरी तू स्वतःसाठी जग ….. ईश्वर तुला खूप सुख आणि समाधान देवो….

 

समाप्त