ठेच Nisha Gaikwad द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ठेच

 

" धाड्ड" असा मोठा आवाज पूर्ण ऑफिसभर झाला ,

 मेहतांच्या कॅबिनचा दरवाजा जोरात बंद करून रागाने पाय आपटत जानव्ही तिच्या  केबिनमध्ये निघून गेली, जानव्ही हि  मेहतांची पर्सनल सेक्रेटरी , तीन वर्षांपूर्वी तिने हे ऑफिस जॉईन केलं होत, दिसायला जेमतेम , स्वस्तातले  कपडे कपडे असायचे तिचे पण त्यातून हि हिला नटायला आवडत,  हे तिच्या राहणीमानातून लख्ख डोकवायचं,  नवीन होती तेव्हा काहीशी अबोल , संकोचलेली,  मेहताने हि अशी मुलगी पी.ए.म्हणून का निवडावी ह्याच सुरवातीला सर्वानाच आश्चर्य वाटलं, पण नंतर मात्र तीच राहणीमान, बोलन , वागण सगळच कस  एकाएकी बदललं एक प्रकारचा आत्मविश्वास आला होता तिच्यात , साधे कपडे घालणारी एक साधारण मुलगी आता हायप्रोफाईल दिसू लागली होती आणि हि किमया  दोन – तीन महिन्यातच  घडून आली होती .

हि सर्व मेहतांची कृपा हे कुणी सांगायला नको "जानव्ही ना ती फक्त मेहताच्या जीवावर उड्या मारते बाकी येतंय काय तिला कामातलं,   नुसते नखरे करायला कामावर यायचं लिपस्टिक लाव ,सेल्फी काढत बस ,  येणाऱ्या जाणाऱ्या वर फुकटचा  रुबाब  चढव, मेहतांच्या  केबिन मध्ये गेली कि  तासभर तरी काय बाहेर येत नाही" अश्या आडून आडून चर्चा ऑफिसभर होऊ लागल्या ,ऑफिसमधली ज्योती हि जानव्ही ची जिवलग मैत्रीण होती.जानव्ही जेव्हा नवीन होती तेव्हा ज्योतीनेच तिची सर्वांशी ओळख करून दिली होती.लंच हवर मध्ये जानव्हीला तिने आपल्यासोबत जेवायला बसवलं होत , त्या दोघी रोज ऑफिस सुटल कि   घरी जाताना सोबत निघत.नंतर मेहता जानव्हीला थांबवून घेऊ लागले मग मात्र ज्योतीने तिच्या सोबत जाण कायमच बंद केल .

जानव्ही आणि मेहतांची वाढती जवळीक तिने खुद्द जानव्हीच्या तोंडून ऐकली होती ,  तिने जानव्हीला समजवण्याचा खूप प्रयन्त केला पण लहानपणापासून कधीही चांगलं खायला, चांगल ल्यायला, न मिळालेल्या जानव्हीला तिचा हा  उपदेश नकोसा व्हायचा दोघींची भांडण व्हायची मग ज्योती तिच्या पासून दूर दूर राहू लागली , तिच्या सोबत  तिने काहीही संबंध ठेवला न्हवता ,  पण आज  मात्र तिला जानव्हीशी बोलावसं वाटलं.

तिने जानव्हीला मेसेज केला “ऑफिस सुटलं कि आपल्या नेहमीच्या बस स्टॉप वर भेटूया”.

जानव्हीने “नको मला आज कुणालाही भेटायची इच्छा नाही” असा रिप्लाय दिला.

तरीही ज्योती ने “भेट , तुला बर वाटेल” असा मेसेज केला  त्यानंतर जानव्हीने काही रिप्लाय दिला नाही पण

नेहमीच्या ठिकाणी दोघी भेटल्या.

"काय झालं आज केबिन मध्ये" ज्योती ने सरळ सोट प्रश्न तिला विचारला.

"जाऊदे ग, माझंच नशीब फुटकं म्हणून हि वेळ माझ्यावर आली" जानव्ही ने रडण्याचा पवित्रा घेतला.

"तुझ्या नशिबामुळे नाही तर तुझ्या या  वाहवत जाण्यामुळे हि वेळ तुझ्यावर आली ,  तुला मी कित्ती वेळा सांगितलं होत ..... '

"बस्स कर यार प्लीज मला लेक्चर नको देऊस परत" जानव्हीने तिला मधेच थांबवलं.

"ठीकेय, तू म्हणशील तस तुला राग येतो ना माझा जाते मी,  काळजी घे" ज्योती जायला निघाली.

जानव्हीने तिला हात धरून अडवलं आणि तिच्या गळ्यात पडून पुन्हा रडायला लागली, ज्योतीने तिला काहीवेळ तसेच राहू दिल, तिच्या रडण्याचा भर ओसरल्यानंतर,

"आता सांगशील काय झालं” ज्योतीने विचारलं.

"मेहता बोलतात उद्यापासून ऑफिसला येऊ नकोस"

"का?” ज्योती आवाक झाली .

 "त्यांच्या घरी म्हणे समजलंय आमच्या नात्याबद्दल, पण मला माहित आहे मेहता खोट बोलतायेत माझ्याशी "

"कशावरून"

"आज काल ते फारसं बोलत नाहीत माझ्याशी, मला वेळ नाही देत, आमचं वरचेवर बाहेर फिरणं व्हायचं, पण आता ते सतत मिटींग्स आहेत असं सांगतात, आणि त्या सर्व मिटींग्स अचानक ठरलेल्या असतात माझ्याकडे त्यांचं काही अपडेट नसत, ज्योती माणस अशी बदलतात का ग ? , किती प्रेम कराव , किती जीव लावला तरी , जराश्या गोष्टी मुळे , आमच्यातल नात अस एका एकी संपून जाऊ शकत ? , अश्यावेळी मग माझ्यासारख्या व्यक्तीने काय करायचं , सांग ना , काय करायचं अश्यावेळी , मी कशी विसरून जाऊ सगळ , उद्या पासून येऊ नकोस म्हणाले मला , अस कस बोलू शकतात ग मला ते , मी कोणीच नाही का त्यांची , कि आता त्यांची गरज संपली म्हणून फक्त " अस बोलत ती हमसून हमसून रडू लागली.

 

“ हे बघ जानव्ही माझ ऐकशील ? त्या मेहताचा नाद सोड, आणखीन किती दिवस हे चालेल , तुला माहितीये ऑफिसमधले सर्व तुला किती घाण बोलतात, माझ्यावर थोडासा तरी विश्वास ठेव ,मी नेहमी सांगितलं हा वाईट मार्ग आहे ,अजूनही वेळ गेली नाहीये, ते बोलतायत ना तर खरंच नको येउस उद्या पासून कामावर , शोध दुसरी नोकरी,  तुझ्याकडे खूप  पैसे असतील ,  पण आज तू इतकी डिप्रेस होतीस  एक माणूस तरी आलं तुला विचारायला, आयुष्यात पैशाने सगळं मिळत पण आपली मनापासून काळजी माणसं नाही मिळत, ती माणसं कमव"

जानव्हीला सगळं पटत तर होत "ठीकेय ज्योती, बरोबर बोल्तीयेस तू ,  मी नाही भेटणार पुन्हा मेहताला”

"मी आहे तुझ्यासोबत नेहमी" ज्योतीने तिला आनंदाने मिठी मारली.

जानव्हीने नोकरी सोडली मेहताचा नंबर ब्लॉक लिस्ट मध्ये टाकला ,मेहताला  तीच घर माहित न्हवत , मेहताने पण विषय सोडून दिला,मेहेताचे काही दिवसापूर्वी  एका  दुसऱ्या एका  बाईशी संबंध सुरु झाले होते  , आणि  त्या बाईने मेहतांच्या आणि तिच्या काही खाजगी क्षणांचे फोटो कुणालातरी पैसे देऊन काढायला सांगितले होते , आणि त्या फोटोंना हाताशी धरून तिने मेहेतांकडून बरेच पैसे घेतले होते  हे सर्व प्रकरण त्याच्या घरी समजलं होत, त्याच्या बायकोने त्याला कडक शब्दात ताकीद दिली होती त्यामुळे तो बरेच महिने गप्प राहिला होता पण  काही महिने  गेल्यानंतर  मेहताला जानव्ही ची परत आठवण येऊ लागली होती , पण तिला शोधायचं कसं, ज्योती आणि जानव्हीची मैत्री त्याला माहिती  होती, ज्योती कडे विचारानं त्याला प्रशस्त वाटेना, एच, आर.कडे तिचा पत्ता विचारणं म्हणजे हा पुन्हा जानव्हीला शोधतोय हे पूर्ण ऑफिसभर कळणार, पुन्हा कदाचित माझे ग्रह उलटले आणि जर माझ्या घरी कळलं तर काही आपली खैर नाही हे तो जाणून होता, पण तरीही जानव्ही त्याला कोणत्याही परिस्थिती हवीच होती,  मेहताला जरी तीच घर माहित न्हवत तरी ती कोणत्या वसाहती मध्ये राहते हे मात्र त्याला ठाऊक होत,  खूपदा तो तिला रात्री गाडीने घरी सोडायचा पाच सहा  इमारतींपैकी एका इमारती मध्ये तीच घर होत, तो रोज ऑफिस सुटल्यावर तासभर जाऊन तिकडे गाडीत बसून तिची वाट पाहू लागला जवळ जवळ आठ दिवसानंतर नवव्या दिवशी जानव्ही त्याला त्या रस्त्यावरून घरी जाताना दिसली , त्याने पटकन गाडीतून उतरून तिला गाठलं.आणि तिच्या समोर जाऊन उभा राहिला

"सर, तुम्ही आणि इथे" जानव्ही ने आश्चर्याने मेहताला विचारलं,

"हो तुझ्यासाठी" हे बोलत मेहता ने तिला संबध खालून वर न्याहाळल.

"का, ती सोडून गेली वाटत आता  " जानव्ही शांत आणि संयमी स्वरात  म्हणाली.

"जानू,, प्लिज असं बोलू नकोस , तुझ्याशिवाय कुणीच न्हवत कधीच न्हवत" अस बोलत मेहेताने तिचा हात हातात घेतला .

"हो का, मग मी नोकरी सोडल्यानंर आज वेळ मिळाला तुम्हाला  " जानव्ही खसकन स्वतः चा हात सोडवत म्हणाली.

" अग नाही खूप प्रॉब्लेम्स होते, म्हणून नाही येता आलं आणि तसही तू माझा नंबर ब्लॉक करून टाकलास फोन कसा करू तुला"

"हो, केला मी ब्लॉक तुमचा नंबर आणि तुम्हालाही प्लिज जा इथून"

 ती जायला वळली तसा मेहताने पुन्हा तिचा हात पकडला

"मिस्टर मेहता मी इथे राहते इथे तमाशा नका करू प्लिज:" जानव्ही रागाने आपला हात सोडवून घेत म्हणाली.

"बर, तू म्हणशील तस, एकदा भेट मला, आपण सविस्तर  बोलू, प्लिज फक्त एकदा भेट" मेहता तिच्या समोर हात जोडत  म्हणाला.

"ठीकेय कुठे भेटायचंय"जान्व्हीला  एकदाचा सोक्षमोक्ष लावायचा होता .

त्यादिवशी पहिल्यांदा जेव्हा मेहेतांना ती भेटली होती , तिच्या  इंटरव्हयूच्या वेळी तेव्हा ते जास्तीत जास्त  तिच्याकडे फक्त  बघत होते ,मेहतांनी तिला  तुझ्या घरी कोण असत इतकंच तिला विचारलं होत.

त्याच्या तीनचार दिवसातच जानव्हीला मेहतांकडून तू असे कपडे घाल अजून छान दिसशील अश्या सूचना मिळू लागल्या, तासतास भर ती त्याच्या केबिन मध्ये राहू लागली होती , त्या नंतर अचानक एक दिवस त्यांनी त्यांच्या बायकोचा विषय काढला ती कशी आहे ती कशी त्यांना त्रास देते त्यांच्याकडे कस तीच अजिबात लक्ष नाही असं म्हणून तिच्या समोर रडू लागले, जानव्हीला कित्ती बिचारे आहेत मेहता ह्यांना आधाराची गरज आहे असं वाटू लागलं होत, मग नकळत ती त्यांची काळजी घेउन लागली होती त्यांना काय हवं नको ते बघू लागली होती ते तिला चांगलं राहण्यासाठी पैसे देऊ लागले तीपण ते सांगितलं ते  करू लागली होती,

जानव्हीला त्या रात्री सगळ्या जुन्या गोष्टीं आठवू लागल्या.

त्या वेळी  नेमका ज्योती चा फोन आला

"काय मॅडम, काय चाललंय"

"छान चाललंय, मस्त वाटतंय, तुला मी खूप मिस करते"

"जानव्ही, काय झालं"   

"आज मेहता आले होते मला भेटायला, मला भेटायला बोलावत आहेत"

 जानव्ही तू अजिबात जाणार नाहीयेस"

"ज्योती, मी जाणार आहे , मला जायचंय"

"तुझ्या गरजा नाही भागत का तुझ्या पगारात, कशासाठी पुन्हा तेच करतेयस"

“तू पण येशील का सोबत, मी तुला पत्ता मेसेज केला आहे "

"अजिबात नाही," ज्योतीने रिप्लाय दिला.

"प्लिज माझ्यासाठी पुन्हा तुला त्रास देणार नाही मी "

ज्योतीने फोन कट केला

 

ज्योतीला काय करू ह्या मुलीच अस वाटायला लागल , कितीही समजवा तरी पालथ्या घड्यावर पाणी , काही फायदा नाही अश्यांना समजवून , मेहनत आणि कष्ट करायला नकोत, हे अस जगन अजून किती दिवस , जानव्ही ला हे कळत का नाहीये , एक ना अनेक खूप विचार एका मागोमाग एक ज्योतीच्या डोक्यात येऊ लागले.

मेहता आणि जानव्ही भेटले

"बोला सर, काय बोलायचं होत" जानव्हीने मेहतांना विचारलं.

 "माझे सर्व प्रॉब्लेम्स तुला सांगायचेत, मी इतक्या दिवस कुठे होतो, माझ्या आयुष्यात काय काय झालं"

"पण आता तुम्ही मला हे का सांगताय"

“ मी तुला खूप मिस करत होतो जानू, तू पुन्हा माझ्याकडे याव असं मला मनापासून वाटतंय"

"तुम्हीच मला नोकरीवरून काढून टाकलं, मी कुठे सोडून गेले होते तुम्हाला "

"अग  माझ्या फॅमिली मध्ये आंपल्याबद्दल समजलं म्हणून मी तुला नोकरी सोडायला सांगितली,  त्याच्याकडे आपल्या खाजगी क्षणांचे फोटोज आहेत आणि जर त्याला हवी ती रक्कम दिली नाही तर तो सर्व फोटोज माझ्या बायकोला दाखवेन अशी धमकी त्याने  मला दिली  हे सर्व सोर्टऑफ करेपर्यंत इतके दिवस गेले, " मेहता सराईता सारखा  खोट बोलत होता

"तुम्ही किती खर बोलता मला चांगलंच माहित्ये" जानव्ही मेहेताला चांगलीच ओळखून होती .

"मी खोटं नाही बोलत जानव्ही," त

"तरीही माझा विश्वास नाही, मला तुमच्यात काहीही इंटरेस्ट नाही” ती स्पष्टच बोलली

 "इंटरेस्ट नाही म्हणजे , का नाहीये इंटरेस्ट, आता नाही लागत पैसे, दागिने ,नवीन कपडे, मोबाईल्स, कि आता कुणी दुसरा पुरवतो ह्या सर्व वस्तू"

"तुम्ही काय समजता मला, मी तुमच्या सोबत  ह्या सर्व वस्तू मिळत होत्या म्हणून फक्त होते, चुकताय तुम्ही सर , हो मला तुम्ही पैसे ,दागिने ,कपडे , चांगल्या हॉटेल मध्ये जेवण सर्व काही दिलत,  मला ते सर्व आवडतही होत , पण मी  अडकले होते तुमच्यात आणि हे हि मनापासून  ,  मला सगळं कळत होत , हे चुकीचं आहे ज्योतीने मला नेहमी सांगितलं पण खरतर मी तुमच्यात इतकी  इन्व्हॉल्व्हड झालेय हे तिलापण नाही कळलं , तिला पण मी सर्व पैशांसाठी करतेय इतकंच वाटत राहील, त्या दिवशी मी तुम्हाला मिस लीना सोबत ड्रिंक घेताना आपल्या नेहमीच्या हॉटेल मध्ये पाहिलं होत तुम्ही खोटं बोलून त्या दिवशी मला भेटायचं टाळून तिला भेटलात, मग मात्र मी तुमचा पिच्छा पुरवला, तुम्ही आणखीन खोटं बोलत गेलात पण त्यादिवशी घरी समजलंय असं सांगून मला नोकरी सोडायला लावलीत, त्या नंतर आज पर्यंत माझं काय झालं ह्याच्याशी तुम्हाला काही घेणंदेणं न्हवत आणि आज माझी आठवण आली ती सोडून गेल्यानंतर, तुमच्या सारखी माणसं हि पैशाच्या जोरावर काहीही कराल पण कुणाचं खरं प्रेम कधीच मिळवू शकत नाही,  आणि आता राहिला प्रश्न तुमच्या आयुष्यात परत येण्याचा तर ते आता शक्य नाही कारण  एकदा मला ठेच लागलीये आणि माझं प्रेम हे इतकं स्वस्त नाहीये जे मी तुमच्यावर उधळू, काळजी घ्या स्वतःची आणि प्लिज पुन्हा माझ्यासारख्या कोणत्याही मुलीचा गैरफायदा घेऊ नका"

असं बोलून ती उठली , जानव्ही पाठोपाठ कोणीतरी  हॉटेल बाहेर पडल.

त्या व्यक्तीने जान्व्हीला मागून कडकडून मिठी मारली.

ती व्यक्ती इतर कोणीही नसून ज्योती होती .

जानव्हीला सर्व माहित होत , ज्योती तिच्या मागोमाग हॉटेल मध्ये आलेली , तिच्या मागच्या टेबल वर बसलेली, तिने सर्व पाहिलं होत .

दोन्हींनी एकमेकींकडे पाहिलं आणि जान्हवी ज्योतीला म्हणाली.

“आयुष्यात पैशाने सगळं मिळत पण आपली मनापासून काळजी माणसं नाही मिळत, ती माणसं कमव" असं म्हणालीस होतीस ना तू बघ मी आज तुला कायमच कमावलं हो कि नाही.”

आकाश मोकळ झाल होत , पण  दोघींच्या डोळ्यात मात्र पाणी होत .

___________________________________ समाप्त__________________________________________