सर्कसवाले नारायणराव वालावलकर
( स्त्री चित्रपटाच्या सेटवर व्ही.शांताराम यांच्यासोबत नारायणराव वालावलकर 1961 )
कै. नारायणराव वालावलकर यांच्या “ दि ग्रेट रॉयल सर्कस ” च्या कारकिर्दिवर आधारित “आम्ही सर्कसवाले ” ह्या पुस्तकाचे लेखन मी केले होते. 1988 ते 1996 ह्या सात आठ वर्षात मी तत्कालिन सर्कस मालक प्रतापराव उर्फ आप्पा वालावलकर , मॅनेजर अनंतकाका वालावलकर , मॄत्युगोलात बाईक रायडिंग करणारे मनोहरराव तथा मामा पेंडुरकर , अॅनिमल ट्रेनर अर्जुनराव वालावलकर , सर्कसच्या अकौंट्स सेक्शन मधिल अप्पा भोगवकर या मंडळीशी संपर्क ठेऊन होतो. मालक प्रतापराव उर्फ आप्पा वालावलकर यांच्या माझ्या घरी सात - आठ खेपा झाल्या असतील. मी सवड मिळाली की सर्कस जिथे मुक्कमाला असेल तिथे जात असे व तीन चार दिवस वास्तव्य करीत असे. मिरज, महाड, मुंबई, पुणे , रत्नागिरी व सर्कस सिंधुदुर्गात असताना कुडाळला या मंडळीकडून गप्पांच्या ओघात संकलित केलेल्या माहितीवर आधारित सुमारे अडिजशे फुलस्केप एवढे लिखाण मी केले होते. अनंतकाका, मामा पेंडुरकर,अर्जुनमामा यानी त्यांच्या संग्रही असलेले सुमारे 60 फोटो , सर्कसच्या दप्तरा मधले 60 ते 70 फोटो, आणि सर्कसचे पहिले भागिदार विश्वनाथराव मादुस्कर यांच्या कारकिर्दितले अत्यंत दुर्मिळ 6 फोटो ज्यात विश्वनाथ मादुस्कर नी सीतारामपंत वालावलकर यांचे फोटो , त्यांची सर्कसगुरु आवडाबाई परूळेकर यांचा भारतमातेच्या वेषातला सिंहाच्या रथातला फोटो, बंडोपंत देवल वाघांना ट्रेनिंग देत असलेला फोटो, आणि एक मादुस्कर रॉयल सर्कस चे जीर्ण हँडबील होते. मी रॉयल सर्कस ची माहिती गोळा करीत असता कै. नारायणराव वालावलकर यांच्याकडे सर्कस हस्तांतरित होण्यापूर्वी तळेकांटे रत्नागिरीचे प्रो. विश्वनाथराव मादुस्कर आणि सीतारामपंत वालावकर यांच्या संयुक्त मालकी हक्काखाली "मादुस्कर रॉयल सर्कस ” या नावाने खेळ करायची अशी माहिती कळली .
पुढे 1946 मध्ये विश्वनाथरावांच्या मृत्युनंतर त्यांचे मालकी हक्क नारायणरावांकडे आले व सीतारमपंत आणि नारायणराव यांच्या संयुक्त मालकी खाली “ दि ग्रेट रॉयल सर्कस ” असे नामांतरण नारायणरावानी केले. एकदा एकदा गप्पांच्या अनंतकाका बोलले की, “मादुस्करांचे एक भाचे - मुळ्ये नावाचे गृहस्थ रत्नागिरीला राहतात त्यांच्या संग्रही मादुस्कर रॉयल सर्कसचे काही जुने दुर्मिळ फोटो आहेत. त्यांची दोन पत्रे रॉयल सर्कडे आलेली . आपल्याकडे सर्कसचे असे असे जुने फोटो आहेत , पण मालक प्रताप उर्फ आप्पानी काहीच दखल घेतली नाही , मुळ्ये यांची ती पत्रे सुद्धा गहाळ झाली.” मी हा संदर्भ पक्का ध्यानात ठेवून या मुळ्यांचा शोध घ्यायचा निश्चय केला. मी अकरावी ते बी.ए. पर्यंत रत्नागिरी ला रहिलेला . रत्नागिरी ही फार मोठी नाही. माझे सख्खे काका रत्नागिरीला स्थाईक झालेले . मी त्याना पत्र लिहून रॉयल सर्कस वर आधारित पुस्तक मी लिहित असून त्या संदर्भात मुळ्ये यांचा शोध घेऊन त्यांची भेट घेऊन चौकशी करायला कळविले. माझ्या काकाना सर्कसचा विलक्षण शौक ! त्यानी सर्कस प्रेमापोटी मुळ्ये या सुताच्या आधाराने स्वर्ग गाठायचा उद्योग चार दिवसात केला. वसंतराव मुळ्ये नावाचे गृहस्थ मधल्या आळीत गणपतीच्या देवळजवळ राहतात , त्यांच्या संग्रही खरोखरच काही दुर्मिळ फोटो आहेत व तू समक्ष भेटलास तर पाहता येतील, असे काकांचे पत्र आले. मी लगतचा शनिवार धरून रत्नगिरी गाठली. वसंतराव मुळ्ये हे साधारण पंचेचाळिशीचे अविवाहित गृहस्थ , पांढरा पायजमा नी जुन्या पद्धतीचा पांढरा सद्रा घातलेले अर्धवट पिकल्या केसांचा मधोमध भांग पाडून भुवयांच्या मधोमध शेंदराची टिकली लावणारे मध्यम वर्गीय गृहस्थ मधल्या आळीत जुन्या घरात दोन बेताच्या खोल्यांमध्ये भाड्याने रहायचे. मी त्याना माझ्या कडची फोटोंची नी माझ्या लेखांची फाईल दाखवली . त्यांच्याशी दिवसभर मनमुराद गप्पा झाल्या. त्यांच्या संग्रही असलेल्या फोटोंवरुन अनिल फोटो स्टुडिओ च्या काळेभाऊंकडुन फोटो काढुन घेऊन त्या प्रती मुळ्याना देऊन मूळ फोटो मला मिळाले. शिवाय काही मोलाचे संदर्भही उमगले .
विश्वनाथ मादुस्कराना ते 10/12 वर्षाचे असताना वेद विद्या/ भिक्षुकी शिकण्यासाठी रत्नागिरीला पाठशाळेत ठेवायचे ठरले. मादुस्कराना पुढे शिकुन व्हर्नाक्युलर फायनल करायची ईच्छा अन त्याही पेक्षा चम्मनगोटा करून भिक्षुकी करायचा तिटकारा , पण वडिलांच्या धाकापुढे त्यांचे काही चालले नाही. नवरात्र झाले अन दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मामा विश्वनाथाला रत्नांग्रीच्या पाठशाळेत दाखल करुन परत गेला. आठवडाभर उलटला आणि एके दिवशी गुरुजीनी विश्वनाथाला जवळ बोलावुन सांगितले, " ही पाठशाळा आहे, इथे हे हे डोक्यावरचे जंगल नाय चालायचे , वेदविद्या शिखुन ब्राह्मण व्हायचे असेल तर डोक्यावर गायीचे पावला एव्हढा घेरा नी लाम्ब शेण्डी राखायस हवी , आजच्या आज नाक्यावरच्या न्हाव्या कडे जाऊन घेरा राखून गुळगुळीत गोटा करून ये नी उद्यापासून संथा सुरु करायची." मग नवाथ्यांच्या दामुला ," ह्यास नाक्यावरच्या न्हाव्याकडे न्हेवून गोटा करून घेऊन ये ...” असे सांगुन गुरुजी आपल्या कामाला लागले. विश्वनाथावर जसे आकाशच कोसळले. त्याने मनाशी काही निर्धार केला. मी जरा रामाच्या देवळाजवळ माझी आत्ते ऱ्हात्ये तिच्याकडे जाऊन येताना गोटा करून येतो असे सांगून तो जो बाहेर पडला तो याला त्याला विचारित कोल्हापूरच्या वाटेला लागला . वाटेत भिक्षा मागून मिळेल ते मिळेल तिथे खाऊन विश्वनाथ चालत राहिला.
तेंव्हा मलकापूरला आवडाबाई परुळेकरांची छत्रे सर्कस डेरेदाखल झालेली होती. विश्वनाथ तंबूत शिरला तेंव्हा सकाळी 9 चा सुमार होता आणि आवडाबाईंसह त्यांच्या ट्रूपचा रिंगणात सराव सराव चाललेला. हा गोरागोमटा मुलगा दिसल्याबरोबर आवडाबाईनी त्याला जवळ बोलावून विचारपूस केली . विश्वनाथाने त्याना आपण पाठशाळेतून का पळून आलो ते सांगितले. त्याला खाऊपिऊ घातल्यावर आवडाबाईनी त्याला घरी तळेकांटे येथे पाठवयाचा बेत केलेला.पण विश्वनथाने ठाम नकार दिला. “मी घरी गेलो तर वडिल मरेमरेस्तो मारतीलने पुन्हा आपली रवानगी पाठशाळेत करतील, पाठशाळेतले गुरुजी नी विद्यार्थी रोज मला केंडित राहणार..... असले नामुश्किचे जीणे जगण्या पेक्षा मी सरळ जीव देईन, त्या पेक्षा मला तुमच्या तुमच्या सर्कशीत ठेवा , मी पडेल ते काम करीन,मला कसरत शिकवा. काहीही करा पण मला हाकलू नका.... ”
एवढ्या लहान मुलाचा निर्धार पाहून आवडाबाईंचे मन द्रवले. जवळ जवळ 10 /12 वर्षे विश्वनाथ छत्रे सर्कसमध्ये होता.आवडाबाईं मूळच्या पाट परुळ्याच्या, त्याना विष्णुपंतानी कसरतीची कामे शिकवली. त्या भारतमातेची वेशभूषा करून रथात बसून रिंगणात यायच्या तो रथ दोन सिंह ओढायचे . रथ रिंगण घेऊन थांबला की सर्कस मधिल गणा हत्ती पुष्पहार घालून भारतमातेची पुजा करायचा. त्या सायकलिंग , बॅलन्सिंग सिंगल ट्रॅपीझ वरचे खेळ आणि इतर कसरतीचे प्रयोग करायच्या. पुढे विष्णुपंतांच्या प्रथम पत्नी निवर्तल्यावर त्या नी आवडाबाईंशी द्वितिय विवाह केला. त्यांच्या ट्रुपमध्ये कुडाळ वेंगुर्ला सावंतवाडी परिसरातल्या बऱ्याच मुली होत्या. त्या भागातले काही मुलगेही त्यांच्याकडे कसरतपटू म्हणून हरकामे म्हणून असायचे. पुढे आवडाबाईंची सर्कस डबघाईला आल्यावर विश्वनाथ इंडियन बहादुर सर्कस मध्ये आर्टिस्ट म्हणुन काम करित असता पर्शुराम सर्कसमधील सीतारामपंत वालावलकरांशी त्याचा परिचय झाला. 1906 मध्ये विश्वनाथ मादुस्कर आणि सीतारामपंत वालावलकर यानी भागीदारीत “मादुस्कर रॉयल सर्कस” या नावाने नवीन सर्कस उभारून ठाणे येथे शो सुरु केले . मादुस्कर हे सर्कस चे रिंगमास्टर होते. त्यांच्या सर्कशीत एका वाघिणीला बच्चा झाला . मादुस्करानी त्याला अंगा- खांद्यावर खेळवून चांगलेच माणसाळावलेले . त्याच्या गळ्यात पट्टा नी जाडसर साखळी असायची . मादुस्करांच्या तंबूत वाघाचा इतका मुक्त संचार असायचा की भेटायला येणारे लोक मादुस्करांसोबत कुत्र्या सारखा वावरणारा वाघ पाहून आश्चर्यचकित होत असत.
सीतारामपंत कुडाळ परुळे वेंगुर्ला परिसरातले कित्येक मुलगे सर्कशीत आणुन त्याना ट्रेनिंग देवून कसरतीची , ट्रपीझ ची कामे करवून घ्यायचे. नारायणराव वालावलकरांचे आई वडील अकाली निवर्तले अन त्यांचा प्रतिपाळ करण्याचा भार त्यांच्या मामांवर पडला. नारायणच्या उपलवटी कारवायानी मामा पुरते जेरीला आले. नारायण शाळा चुकवून लक्ष्मीनारायणाच्या मंदिराच्या आवारात नी गावभर हुंदडत रहायचा. रोज त्याच्या काहिना काही कलागती यायच्या. पोर एवढा निर्ढाव्लेला की मार खाऊनही वठणीवर येईना. उपाशी ठेवला तर ताई भटणी कडे तर कधी रामु आत्त्याकडे जाऊन मागुन खायचा. रात्रीचा बाहेर ठेवला तर मंदिरात नाहीतर कोणाच्याही ओसरीवर जाऊन रात्र काढायचा. मग जनलज्जेपायी मामी त्याला पाठिशी घालायची. त्या दरम्याने सीताराम पंत वालावलला आले नी मामानी नारायणची ब्याद त्यांच्याकडे सुपूर्द केली.
सर्कसच्या जादुनगरीत मात्र नारायण पुरता रमला. त्याचा उपलवटी ढालगज स्वभाव इतका आमुलाग्र बदलला की , सीताराम पंताना सुद्धा आश्चर्य वाटायच. सर्कस मुंबई दौऱ्या वर असताना नातेवाईकांपैकी नारायणाच पूर्व चरित्र्य माहिती असलेला कुणी सोयरा सीतारामपंताना भेटायला आला नी नारायणाला बघून चकितच झाला. ही आनी बिलामत ख्येका गळ्यात घितलास? ह्यो म्हंजे जितो समंध .... निस्ती चाळेगत.... कदि खय आग घालित भरावसो नाय.... ह्येका हैसून भायरो करा..... पण पंत हसून म्हणाले , “ह्यो चाळो माका रुजु झालो, ह्येका सर्कशीत आणून पाच वर्सा झाली पन माका म्हनशा तर काडीचो तरास नाय हां दिल्लो ह्येनां...... अमुक कर म्हनान कदी सांगाचा पडत नाय. घोड्याची लीद काड्न्या पासून तो जां जां पडललां काम दिसात तां पोटाळनार ...... माकाव कदि कदि अजाब वाटतां ..... ह्या कायच नाय , कसरती ची कामां पन कदि कशी शिकान घितल्यान तां लक्षुमीनारायणाकच म्हायत, ट्रपीज वरचा ह्येचा कसब बगलास तर तुमकाव अजाब वाटात..... ”
नारायण मादुस्कर सर्कस मध्ये स्टाफ अर्टिस्ट म्हणून रोजच्या शो मध्ये दोन तीन आयटम्समध्ये काम करू लागल्यावर त्याला अल्पस्वल्प मेहनताना मिळायला लागला. अर्थात स्लॅक सीझनच्या वेळी दोन दोन तीन तीन महिने त्याच्या मानधनाची फिकिर ही मालक मंडळीना नसायची. आपल्याला इतर आर्टिस्ट प्रमाणे पेमेंट मिळत नाही हे कळत असूनही नरायणाचा भिडस्त स्वभाव त्याला गप्प बसायला लावायचा. या मागे आणखीही एक महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे सर्कशीत नारायणाच्या शब्दाला मालक मंडळी नी मॅनेजर यांच्या शब्दाइतकीच किंमत होती. त्याने केलेल्या प्रत्येक सुचनेची विना विलंब कार्यवाही सन्मानाने केली जायची. स्टाफ आर्टिस्ट सोडाच वेगवेगळ्या ट्रुपचे मालक/व्यवस्थापकही त्याला टरकून असायचे. एखादा नवीन आर्टिस्ट नारायणच्या अनुमती विना सर्कसमध्ये रुजु करून घेतला जात नसे. त्याचा परफॉर्मन्स पाहून तो स्टाफ वर घ्यायचा की नाही हे नारायणच्या सल्ल्याने ठरवले जायचे.
नारायणाचे लग्न झाल्यावर मात्र त्याला परिस्थितीचे चटके बसू लागले. वाढत्या गरजांपुढे पगार अपुरा पडायला लागल्यावर मात्र त्याची भीड मोडली. त्याने अगोदर सीतारामपंताना आडून आडून पगार वाढवण्याबद्दल सुचवून पाहिले. पंत हासुन टोलवयला लागल्रे. हंयचा मोजतर पुरा होवने ... पुण्यात तम्बू टाकलंवकी तुका पगार वाढौन देवया. पुण्यातला मुक्काम उठायची वेळ आली तरी पंत काही पगारवाढीचे नाव काढीनात. मग पुढच्या नाशिक दौऱ्याची आखणी करण्यासाठी मादुस्कर , पंत यांच्याबरोबर चर्चा सुरु असता मध्यंतरात नाष्टा आला नी अवांतर गप्पा सुरु होताच नारायणाने पगारवाढीचा विषय काढला नी त्याला अपेक्षित मानधनाचा आकडाही फोडला . त्यावर पुढच्या मुक्कामी कसा काय धंदा होतो ते बघून काय ते ठरवूया असे उत्तर मादुस्करानी दिल्यावर संयम संपलेला नारायण म्हणाला की , आत्ता या इथे काय तो सोक्षमोक्ष होवून जाऊदे नाहीतर इथला मुक्काम संपल्यावर माझ्याऐवजी बदली आर्टिस्ट शोधा. त्याच्या कडून अशा काही उत्तराची शक्यतासुद्धा मालक मांडळीनी गृहित धरलेली नव्हती. पंत त्याला समजवण्या साठी काहीतरी बोलण्यापूर्वीच मादुस्कर उसळून म्हणाले , “नारायणा .... सीतारामपंताचा माणूस म्हणून आज पर्यंत तुझा तोरा चालवून घेतला , आमच्या बरोबरीने तुझा रुबाब चालवून घेतला पण लक्षात ठेव सर्कसला तुझी गरज नाही ... तुला सर्कसची गरज आहे. इतकीच मस्ती असेल तर हा दौरा संपण्याची तरी वाट कशाला बघायची ? तू आजच्या आज बाहेर पडू शकतोस. तुझ्या बदली येणाऱ्या आर्टिस्ट ची नवीन मुक्कामी जाण्या आधीच ट्रायल घेता येईल. ”
सगळया धंद्यांमध्ये संधीसाठी टपलेले लोक असतात. नारायणाची पगारवाढी मुळे असलेली नाराजी बरेच आर्टिस्ट ऐकून होते . त्यानी कधीपासून मोर्चे बांधणी केलेलीच होती. मादुस्करानी विषयाचे एक घाव दोन तुकडे केल्याने सीताराम पंताना गुळणी धरणे भागच पडले. अर्थात नारायणसाठी ती इष्टापत्तीच होती कारण पंतांनी काहीतरी वायदा केला असता तर नारायणाला तडकाफ़डकी बाहेर पडणे जमले नसते. त्याने तत्काळ चम्बू गवाळे आवरले नी दुपारी जेवणे उरकल्यावर झाल्या दिवसाचा मिळाला तो हिशोब घेऊन नारायण मुम्बई ला रवाना झाला. त्याने मादुस्कर सर्कस सोडली तेंव्हा सर्कस विश्वात त्याच्या नावाचा चांगलाच दबादबा असल्याने त्या वेळी ठाण्यात खेळ करीत असलेल्या जी. ए. सर्कसमध्ये त्याना भरपूर मानधनसह संधी मिळाली. नाना मादुस्कर सर्कस सोडून एकटेच बाहेर पडले . जी. ए. सर्कस मध्ये दाखल होताच त्यानी स्वत:चा ट्रुप फॉर्म केला. यात इतर सर्कसमध्ये असणारे काही मित्र व कुडाळ वालावल या कोकण परिसरातले दिगंबर / अनंत वालावलकर वगैरे मंडळी होती ज्यानी अखेरपर्यंत नानाना साथ दिली.
मादुस्कर सर्कसने नानाना काय दिले याचा लेखा जोखा घेताना ग्रेट रॉयल सर्कस मधील मॅनेजर अनंतकाका वालावलकर यानी अत्यंत मार्मिकपणे अधोरेखित काही बाबी मला प्रकर्षाने नमूद कराव्या लागतील. मादुस्कर सर्कसने त्याना आर्थिक मोबदला अत्यल्प दिला किंबहुना उमेदवारीचा पूर्ण काळ निव्वळ पोटावारी अन एखादा अॅक्ट करू लागल्यापासून तो रोजच्या शो मध्ये त्यांचे अॅक्ट हे अविभाज्य बनल्यावरही सर्कसने त्यावेळी असलेल्या प्रचलित दरांच्या तुलनेत अत्यंत अल्प (ते ही अनियमित ) मानधन देऊन त्याना अक्षरश: पिळून घेतले . मात्र मादुस्करमध्ये त्यांच्या व सीताराम पंतांच्या जवळिकीच्या नी अतीव विश्वासाच्या नात्यामुळे नाना मालकाच्या रुबाबात राहिले. सर्कसच्या व्यवस्थापनात सहभागा मुळे सर्कसच्या अर्थकारणाचे मर्म त्याना ज्ञात झाल्रे. मादुस्कर सर्कसमध्ये हरकाम्या म्हणुन वावरताना प्राण्यांची निगा देखभाल , त्यांना ट्रेनिंग देणे या पासून तो अडल्यावेळी हत्ती घोड्यांपासून अगदी वाघ सिंहांपर्यंत कोणत्याही प्राण्याचा अॅक्ट रिंगणात सादर करण्याची दुर्लभ संधी नारायणरावाना सहजावारी मिळत गेली. दौऱ्याची आखणी करणे, नवीन ठिकाणी विविध सरकारी कार्यालयांकडुन परवानग्या मिळविणे , नवीन ठिकाणी तम्बू ची मांडामांड करणे, साहित्य खरेदी , सर्कसच्या रोजच्या शो मधल्या आयटम्स चे प्रोग्रॅमिंग , सर्कसचे नाविन्य टिकवण्या साठी नवनवीन उदयोन्मुख कसरत पटु –ट्रुप मॅनेजर यांच्याशी संधान साधणे व त्याना युक्ती प्रयुक्तीने पटविणे अशा विविध तंत्रां मध्ये प्रत्यक्ष सहभागी होवून ती तंत्रे आत्मसात करण्याची संधी योग्य मार्गदर्शन – सल्ला यासह सीतारामपंतानी त्याना दिली. या सर्कसमधिल त्यांच्या अधिवासात त्यांचा लोकसंग्रहातही प्रचंड भर पडली. अर्थात असे झोकून देऊन काम करण्याचे कोकणी बाळकडू त्याना जन्मसिद्ध हक्कानेच मिळालेले होते आणि वाटेल ते कष्ट घेण्याची हुन्नर हा त्यांचा स्वभावविशेष त्यामुळे भारतीय सर्कस इतिहासात नारायणराव वालावलकर हे नाव चतुरस्त्र / अष्टपैलू सर्कस वीर आणि अॅनिमल ट्रेनर म्हणून अजरामर झालेले आहे. त्यांच्या बहुआयामी त्वाचे श्रेय निरपवादपणे त्यांच्या मादुस्कर सर्कसमधिल सीताराम पंतांच्या अनुयायित्वाखाली केलेल्या शागिर्दीलाच द्यावे लागते ही बाब मितभाषी अनंतकाका नी मिरज मुक्कामी त्यांच्या जानपद शैलीत माझ्याकडे उध्रृत केली. त्यांचे शब्दवर्णन थोडे मालवणी बाजाचे पण आशय निरपवादपणे मी शब्दबद्ध केला तोच होता.
अनंत काका, मामा पेंडुरकर,अर्जुनवालावलकर या त्रयीचा बरोबरीने सर्कस डोलारा सांभाळणारा चौथा किंगपोल सुरेश म्हापणकर. सर्कसमध्ये सुरेश म्हापणकर दाखल झाला आणि नी नारायणराव बिनघोर झाले. सर्कसचे दौरे आखणं, सरकारी परवानग्या मिळवणं, रोजच्या गल्ल्याची मोजदाद, जाहिरात विभाग सांभाळण आणि अत्यंत महत्वाचा जनसंपर्क तो लीलया सांभाळू लागला आणि सर्कसला भव्य दिव्य रूप द्यायला , नी अंगभूत प्रयोगशीलता वास्तवात आणायला नारायणरावांना फुरसत मिळु लागली. कसरती च्या प्रयोगांमधे नाविन्य आणि थरार आणण्या साठी नारायणरावांनी कल्पकता पणाला लावली. ट्रपीझ अॅक्ट मध्ये कॅचर नी जंपर अवकाशातल्या ज्या बिंदूवर दोघांचे झूले एकत्र येतात त्यालामीटिंग पॉईंटम्हणतात. इथे दोन्ही झुल्यांमध्ये विशिष्ट अंतर राखावे लागते . नारायणरावांनी हे अंतर वाढवून त्यातला थरार हे त्यांच्या सर्कसमधले विक्रमी वैशिष्ट्य रूढ केले. सर्कसचा शिकारखाना हे ही सर्कसचे खास आकर्षण असते. अवढव्य किमती मोजुन प्राणी खरेदी करावे लागत. नारायणरावांनी प्राण्यांच्या संगोपनावर लक्ष केंद्रित करून त्यांची पिलावळ पैदा करण्याचे जटिल काम यशस्वि केले. तसेच वाघ सिंहाचा संकर घडवून लायगर ही नवीन पैदास विकसित करून त्यांचे कसरत प्रयोग सादर केले. त्यांच्या या लोकोत्त्तर कार्याचा गुगल वर संकलित केलेल्या माहितीत उल्लेखसुद्धा केलेला नाही. वाघ,सिंह,चित्ते व चिपांझी यांच्यापासुन असंख्य बछडे जन्माला येऊन त्यांची उत्तम देखभाल व प्रशिक्षण पूर्ण करून त्यांचे कसरतीचे प्रयोग हे नारायणरावांच कार्य सर्कस इतिहासाने खास दखल घ्यावी असेच म्हणायला हवे. सर्कसच्यामुख्य प्रशासकीय तंबूत सीतारामपंत / वसंतराव आणि नारायणराव वालावलकर या तिघांचे फोटो कायम लावलेले असायचे.
आप्पाना कसरती चे ज्ञान नसले तरी उच्च शिक्षणामुळे येणारी नम्रता, परिस्थीती नी प्रशासन हाताळण्याचे कसब त्यांच्याकडे पुरेपूर होते. नानानी बसविलेल्या पठडीला धक्काही न लावता ,काका,मामा, सुरेश म्हापणकर या नारायणरावांच्या विश्वासू सहकाऱ्याना पूर्वीप्रमाणे कामाची स्वायत्तता देऊन सर्कसच्या आर्थिक धोरणावर भक्कम नियंत्रण ठेवले. अनावश्यक खर्चाला कात्री लावली. सर्कसचा बाजारहाट खरेदीसाठी जाणा-या लोकांबरोबर स्वत: जायला सुरुवात केली. सर्कसमधून होणारी आर्थिक गळती पूर्ण बंद झाली. नारायणरावांचा खाक्या पेशवाई थाटाचा. माझी सर्कस मोठी आहे. इतर सर्कशींमध्ये जे आयटम्स असतात ते माझ्याकडे असलेच पाहिजेत हा त्यांचा अट्टाहास त्यापायी कितीतरी कलाकाराना नी ट्रुप्सना नारायणरावांनी अक्षरश: पोसले होते. त्या बाबतीत कोणाचाही सल्ला त्यानी कधीच जुमानला नव्हता. खरं तर या गोष्टी काका ,मामा,सुरेश यानी नारायणरावांच्या निदर्शनाला कधिच आणून दिलेल्या होत्या. पण नारायणरावांनी ते कधिच मनावर घेतले नव्ह ते. अप्पा कडे मॅनेजमेंट आली नी केवळ ईर्षे खातर नारायणरावानी पोसलेले महागडे आयटम्स बंद करून त्या ट्रूप्सना नारळ दिले. दर शो मधली कार्यक्रमांची खोगीर भरती कमी करून त्यात नेमकेपणा आणला.
सर्कसचं स्टोअर म्हणजे अजबखानाच होता. जवळ जवळ निम्मे सामान केवळ निरर्थक होते. सर्कसचा मुक्काम हलविताना सहा मोठे कं टेनर भरायचे .हा निरर्थक आर्थिक भुर्दंड गेली कित्येक वर्षे सर्कस सोशित होती. अप्पाने जपानच्या कायझेन तंत्राचा अभ्यास केलेला होता. व्यवसाय उर्जितावस्थेला आणायचा तर प्रथम आपली विद्यमान स्थिती काय आहे? उपलब्ध साहित्य सुविधा आणि सामग्री ची काय अवस्था आहे? इथून सुरुवात करायला लागते. अनावश्यक खर्च वाचवणं ही भविष्यकालिन कामाईच आहे . या प्रशासन तंत्रांची आणि सिद्धांतांची अंमलबजावणी आप्पा ने सुरु केली. टनावारी भंगार विकून काढले. सर्कसचे किंग पोल असेच खूप उंच होते. खरतर त्यांची निम्मे उंची निरर्थकच होती. इतके उंच किंगपोल उभे करताना, त्यांची वाहतूक करताना ही अडचणी यायच्या. सर्कसचा मुक्कम हलविताना अप्पाने चारही किंग पोल अर्धे कापले.
किंगपोल कापण्याचा अप्पाचा निर्णय काका मामा यानाही तेवढासा मान्य नव्हता. कसं कोण जाणे , अप्पाने सहा लोड लोखंड सामान विकलं, किंगपोल अर्धे कापले ही गोष्ट नारायणरावांच्या कानावर गेली. अप्पाची मुंबईत खेप झाली तेंव्हा नानानी जाब विचारला. भंगार विकल्यामूळे वाचलेल्या वाहतूक खर्चाचा आकडे स्संगितल्यावर मात्र त्याना अप्पाचा हिशेबी दृष्टिकोन पटला. किंग पोल कापल्यामुळेही वाहतूक, उभारणी यातला व्याप कसा कमी झाला , तसेच डबल संच झाल्यामुळे एकिकडचा मुक्काम हलविण्यापूर्वी दुसरीकडे तंबू उभारणे कसे शक्य होते, त्यामुळे ट्रॅझिट कसा कमी होतो ही बाब सुद्धा त्याना पटली. “तू शिकलेला आहेस, या गोष्टी मला कधि सुचल्याही नव्हत्या , आमचा पेशवाई कारभार.... खांदेपालट झाली पण सर्कस कर्जातून बाहेर आली . नारायणरावांच्या सर्कसचे उंच पोल लांबूनही दिसतात ..... लोक कौतुक करायचे..... अंगावर मूठभर मांस चढायच. एकिकडचा मुक्कम संपला की तंबू उतरून किंग पोल सुटे करून ते ताबडतोब नवीन मुक्कामावर हालावावे लागत .... कारण ते उभे केल्याशिवाय नवीन ठिकाणी तंबूचं काम सुरुच करता येत नसे. शिवाय अव्वाच्या सव्वा भाडी द्यावी लागत. तू ही कटकट मोठ्या हुषारीने चुटकीसारखी सोडवलीस . आंधळं दळतं नी कुत्रं पीठ खातं, असा आमचा कारभार असं म्हणून नाना हसले . ”
गरजेपेक्षा जादाचा शिकारखानाही अप्पाने असाच मर्यदित केला. नवीन धोरणामुळे सर्कसचा खर्चाचे आकडे एकतृतियांश कमी झाले. प्रॉफिट वाढू लागला. अप्पा सर्कसमध्ये येण्यापूर्वी पाच सहा वर्षापाठी सर्कस जवळ जवळ बंद पडायला आलेली.त्यावेळी पटेल या गुजराती पार्टीला स्पॉन्सरशीप दे ऊन गंडांतर टळलं.दहा वर्षाचा करार होता. रोजच्या उत्पन्नातून ठराविक रक्कम त्याना द्यावी लागायची. त्यांचे दोन तीन अकौंटंट सर्कसला पोसावे लागायचे. अप्पाची कारकीर्द सुरु झाली, सर्कस फायद्यात सुरु झाली नी सुरेश शी सल्ला मसलत करून अप्पाने पटेलाना रक्कम देवून स्पॉन्सरशीपचा करार रद्दा केला.या निर्णयालाही सर्कसमधल्या जुन्याजाणत्यांचा विरोध होता. पुन्हा अस्मानी सुलतानी झाली तर नवीन स्पॉन्सर कोण गाठणार? पण अप्पाचा स्वत:च्या निर्णयावर भरवसा होता. सर्कस तोट्यात कधिच नव्हती. मात्र आर्थिक नियंत्रणा अभावी बारा वाटानी खर्च वाढायचा नी फायदा कोणीतरी खावूनजायचे.
अंतर्गत कारभारातही अशीच अंदाधुंदी होती. कारकिर्द सुरु झाली नी अनंत काका, मामा पेंडुरकर, अर्जुनमामा,नी सुरेश म्हपणकर यांची जबाबदारी वाढली. आर्थिक व्यवस्थापन आणि शो चे व्यवस्थापन असे दोन स्वतंत्र विभाग झाले. दोन्ही विभागांची अखत्यारी भिन्न प्रशॎसकांकडे असली तरी त्यांच्यामध्ये कधीही मतभिन्नता वा दुफळी झाली नाही . मात्र हे करताना अनंत काका, मामा पेंडूरकर, अर्जुनमामा हे नारायणरावांचे निकटवर्ती सहकारी , त्यांचा सर्कसच्या स्टाफवर वचक असायचा , त्या व्यवस्थेत मात्र यत्किंचितही ढवळाढावळ केली नाही. अप्पाच्या प्रशासनाच इ ष्ट फलित दिसू लागलं , नारायणरावांच्या कारकिर्दित सर्कसच्या पाचवीला पुजलेली ओढघस्त संपली. पंचवीस वर्षं सतत परदेश दौ-यावर असलेल्या मंडळीना भारतात परत जायची स्वप्नं पडू लागली. मायदेशी शिफ्ट होवून खेळ सुरू करीपर्यंतचा ट्रॅंझिट मोठा असतो . त्या काळात प्राणी, स्टाफ यांचा खर्च सुरु ठेवून पल्ला निभावणं हे तसं आव्हानच असतं. पण स्पॉन्सर न गाठता अप्पाने स्वत:च्या हिम्मतीवर ते यशस्विरित्या निभावूनही नेलं . अर्थात नारायणरावांचा लौकिक ,तोही फलस्वरूपात कामी आला. एवढ्या लवाजम्याची वाहतूक, शासकियपरवागनग्या कुठेच अडवणूक झाली नाही. उलट अनेक अधिका-यानी सर्कसच्या लौकिका मुळे पूर्ण सहकार्य केलं .
सर्कस ची आर्थिक बाजू सावरली आणि सर्वाना भारतात यायचे वेध लागले. एडन,सोमालिया, इजिप्त, सुदान,ईराण, इराक, कैरो, युनायब रिप्ब्लिक,केनया,युगांडा, टांझानिया, मॉरिशस,सिंगापूर,मलेशिया, इंडोनेशिया, आणि फिलिपाई न्स या देशांचा 21 वर्षांचा यशस्वि दौरा करून 1983 मध्ये सर्कस भारतात परतली. मायदेशी येवून सर्कस दिमाखात खेळ करू लागली . अर्थात हे कौतुक नारायणराव पाहू शकले नाहीत.. सर्कस भारतात आल्यावर सुरेश म्हापणकर सर्कस मधून बाहेर पडले. मात्र अनंत काका, मामा पेंडुरकर, अर्जुनमामा उमेद असे पर्यंत सर्कस मध्ये राहिले. यांच्या जोडीला अकौंट सांभाळायला आप्पा निरवडेकर (यांचं नाव स्मरत नाही) असायचे. सर्कसच्या भारतातील दौ-यात सर्कस संदर्भात प्रसिद्ध झालेले लेख, बातम्या, सर्कसला भेट देणा-या सिने कलाकार, नेते व अन्य महनीय व्यक्तिंच्या भेटीचे फोटो निरवडेकरानी तारीखवार संग्रहित केलले होते. तसेच सर्कसच्या संदर्भात सांख्यिकीय माहिती ते पटकन द्यायचे. अनंत काका रोजच्या शो चे व्यवस्थॎपन पहायचे. मामा पेंडुरकर मृत्युगोलात मोटर सायकल चालवायचे. (त्याच मामांचा मालवण मध्ये मोटर सायकल चालविताना अॅक्सिडेंट झाला नी त्याना 2/3 महिने बेडरेस्ट घ्यावी लागली) . अर्जुनमामा चिपांझी ची कामे सादर करीत. आज घडीला मामा पेंडूरकर आणि अर्जुनमामा वालावलकर हयात नाहीत.
नारायणरावांची दोन स्वप्न होती , आपल्या जन्मभूमीत एकदातरी सर्कसचा बारदाना न्यायचा नी खेळ करायचे. दुसरं स्वप्न म्हणजे दामू धोत्र्यां प्रमाणे आपल्या सर्कस ची कारकीर्द वाङमय रूपाने सामान्यांपर्यंत पोचावी. नानानी त्यांच्या हयातीत दोन वेळा नामवंत लेखकांशी संपर्क साधून पुस्तक लेखनाच कार्य सुरू केलं पण ते आकारालाही येवू शकलं नाही. एक ईच्छा रत्नागिरी सिंधुदुर्ग दौरा करून अप्पानी पूर्ण केली. पण सर्कसच्या कारकिर्दीवर आधारित पुस्तक मात्र प्रकाशित होऊ शकलं नाही. मध्यंतरी सर्कसमध्ये प्राण्यां ची कामं सादर करण्यावर बंदी आली. त्या दरम्याने काही काळ आर्थिकदृष्ट्या परखड गेला. काही प्राणी सिंधुदुर्गात निरवड्याला अप्पांच्या फार्म वर ठेवली होती.त्याचदरम्याने अप्पांचा मृत्यू झाला . उपाशी पोटी पिंज-यात डांबलेल्या प्राण्यां चे फोटो नी वृत्तंही पेपरात आली होती. बदलत्या काळानुसार मनोरंजनाची माध्यमं बदलली नी सर्कस कडे प्रेक्षकांचा ओढा कमी झाला. 22\12\2002 मध्ये प्रतापराव वालावलकरांचा आकस्मिक मृत्यू झाला नी सर्कस विश्वातून वालावलकर पर्व संपुष्टात आलं . 15\04\2004 रोजी नारायणरावांच्या पत्नी स्नेहलता वालावलकर यांच्या मृत्यूमुळे सर्कसच्या कागदोपत्रीही नारायणरावांची निशाणी अस्तंगत झाली . मात्र अजूनही नारायणरावांची सर्कस अस्तित्व राखून आहे.
प्रा.श्रीराम काळे ,
मोबा. 8766764641