सापांचे दिवस
पुढिल दारच्या अंगणा पासून सात आठ हात अंतरावर पुरुषभर उंचीची डेग आहे . ती चढून वर गेले की सवथळ मरड लागते. त्याच्या कडेला काळ्यांच्या आगराची हद्द संपून सामाईक पाणंद लागते, नी त्या पलिकडे धारेला घडीव चिऱ्यानी बांधलेल्या पारावर वडा पिंपळाची दोन जुनाट झाडे आहेत. आमच्या काळे घराण्याच्या नवव्या पिढित समाधी घेतलेले आमचे पुर्वज ‘ स्वामी’ त्यानी ते वड पिंपळ लावून घडीव चिऱ्यांचा पार बांधून घेतला नी पिंपळाची मुंज केली अशी आख्यायिका मोठी माणसे सांगतात. पिंपळाच्या टिकाळीला घारी - गरुड घरटी बांधित. पिंपळाचा एक फाटा वाळून कोळ झालेला नी त्याच्यावर कांडेचोरांच्या ढोली असायच्या. त्यांत कांडेचोरानी वीण घातली की महिनाभराने भर दिवसा त्यांची पिलावळ फांद्याफांद्यांवर दडाकुकू नी धावाधावी खेळायची. त्यांचा धिंगाणा चालु झाला की फांद्यांच्या बेचक्यातून नांदणाऱ्या चान्या भयाने सरसरत उंचावर सुरक्षित जागा धरून शेपटे फुलवून मोठ मोठ्याने च्रुक् ऽऽ च्रुक्क आवाज काढीत रहात.
फांद्यांवरून धावणाऱ्या कांडेचोरांच्या पिल्लाना हुसकावण्यासाठी आम्ही हात मोडेपर्यंत दगड मारायचो. पण आमचे दगड इतक्या उंचीवर कसले पोचतायत् ! पण बाणे वाडीतल्या नायतर सप्ते वाडीतल्या कोणातरी थोराड पोरांचे दगड मात्र वरपर्यंत पोचायचे. क्वचित एखादा दगड पिल्लाला लागायचा सुद्धा . दगडांच्या सडाक्याने भेदरलेली पिलावळ गबागबा ढोलीत दडी मारायची. आम्हा पोराना खूप मजा वाटायची. दुपारी वडिलधाऱ्या माणसानी टकली टेकलेनी की, आम्हाला रान मोकळे व्हायचे नी आम्ही तडक पार गाठायचो. वडाच्या पारंब्यांवर झोके घे, सूर पारंब्या सारखा ‘ पुडेक ’ खेळ असा नुसता हुदुदू चालायचा. झोपलेल्या माणासांपैकी खालची काकू (म्हंजे काकू आज्जी) सगळ्यात आधी चाळवायची. ती उठल्या उठल्या “आँक्क.... छी .... छडाक्क” अशी दणदणीत शिंक द्यायची. त्याला मोठी माणसे तोफ झडली असे म्हणत. तिच्या शंकेचा आवाज हा आम्हां खेळणाऱ्या ( मोठ्यांच्या भाषेत जीव घालवणाऱ्या) पोराना इशारा असायचा, नी आम्ही लगेच खेळ बंद करून दडदडत मोठी माणसं उठण्यापूर्वी साळसूदपणे घर गाठायचो. एकदा असेच घरी येत असताना डेगेवरच्या चिव्याच्या बेटाकडे एक भले मोठे लचांड सळसळत गेलेले दिसले . त्याबरोबर घाबरलेल्या बाळक्याने “ बापू ..... धाव..... साप... साप” अशी बोंब मारली.
एक हात डोळ्यावर आडवा घेवून, चवाळीचा ओला पंचा पांघरून पुढील दारी झोपाळ्यावर ‘घुर्रर्र .... फुस्स...’करीत आडवे झालेले बापू काका साप हा शब्द कानात पडताच तट्कन् उठून बसले. दाराआडची कऱ्ह्याची काठी ओढीत त्यानी इतर मोठ्या माणसाना ‘चिव्याच्या बेटाहारी साप आलाहे रे ’असे हाकारे घातले. अन दीड दोन मिनिटात दहा बारा माणसांची जमात दरड चढून वर आली. साप कुठे ... कधि दिसला अशी चौकशी केल्यावर सगळे सावधपणे बेटाच्या दिशेने निघाले. तशी आमचाही धीर चेपला नी आम्हीही त्यांच्या मागून निघालो. सगळ्यांच्या मागून अवकासाने येणारे दमेकरी आबा ओरडले, “पोरानो आधी मागे व्ह्या बघू भोसडीच्यानो, साप म्हंजे काय खायची कामे वाटली काया रे तुम्हाला ? ” नी ते तिथेच एका सप्पय दगडावर टेकले. आता मोर्चेबांधणी सुरु झाली. “विनू ( आबा हे सगळ्यात मोठे म्हणून ते अप्पां सकट सगळ्याना नाव घेवून अरे तुरे करीत) तू हिगडे डाव्या कुशीला ऱ्हा , बापू तू पलिकडच्या अंगाला ऱ्हा, सदू - वासू तुम्ही मध्ये थांबा; पुर्षातू बापुच्या कडेला नी धोंडू तू कांबेरू घेवून विनू सोबत ऱ्हा. बबन तू दरडीखाली जावून थांब, न जाणो भेदरलेले जनावर दरडी खाली दखी घालून घेईल .... काय नेम सांगता येनार नाय... ” बसल्या जागेवरून बूडही न चाळवता आबांनी सुचना दिल्या.
काळ्यांच्या घरवडीत ते पोक्ते पुरवते! सगळे जण त्यांचे आयकत. आबांच्या सुचनेप्रमाणे जागा धरल्यावर बेटाच्या मुळातला पातेरा हुसकीत बापये सापाला हुडकायला लागले. थोडा वेळ गेला नी “ बबन सावध ऱ्हा रे साप डेगे खाली उतरतोहे बहुतेक ” असे आबांचे वाक्य पुरे होण्या आधीच साप घसाक्कन सरसरत डेगेखाली अंगणात उतरला सुद्धा ! सावध असलेल्या बबनने साप पुढे सरकण्यापूर्वीच काठीचे दोन सणसणीत तडाखे वर्मी लगावले. आबा ओरडले “त्याचे मस्तक फुटले काय बघ नी पुरे कर आता उगाच त्याची चिचण करू नको. ” तेवढ्यात बबनची आई , धाकटी काकू लाशी सारखी पुढे धावत आली नी बबनचे बचकोट धरून त्याला मागे खेचीत म्हणाली , “तू कशाला पुढे धावलास रे... ? भलतेच अतिरेकपण करणे चांगल्याचे नाय हो .... बरें तर बरें, उगाच नेम बीम चुकला असता तर जीवाशी बेतले असते... !” हे तिचे नेहेमीचेच असे.... कामाधंद्यात सुद्धा आपल्या मुलाना तकस लागू नये म्हणून ती नेहेमी दक्ष असे.
एवढा मोठा दीड वाव लांब कृष्ण सर्प पहिल्यांदा मारण्याचा मान आमच्या वखलात बबनला मिळालेला. त्या पूर्वी मारलेले साप दीड दोन हात लांबीचे , हळदव्या रंगाचे ‘अक्करमाशे’ असायचे. काळा कृष्ण सर्प आमच्या भागात सहसा आढळत नसे. साप उताणा करून आबा त्याचे ‘पारे’ म्हणजे ‘प्रहर’ निरखू लागले. सापाच्या तोंडापासून सहा एक आंगूळ अंतरावर काळसर रंगाचे दोन पूर्ण नी एक अर्धा असे पट्टे दिसले. हा साप अडीच प्रहराचा निघाला. म्हणजे याचा दंश झाला तर माणूस अडीच प्रहरात मृत्यूमुखी पडला असता. आमच्या भागात दीड , दोन , अडीच किंवा तीन प्रहर असलेले साप असायचे. आता डोळ्यांवर पाण्याचे सपकारे मारून , खळखळावून चुळा भरून खांद्यावरच्या फडक्याने तोंडे पुशीत सगळी पुरुष मंडळी आमच्या सोप्यात शिरली. आम्ही पोरे त्यांच्या गप्पा ऐकायला जमिनीवर फतकल मारून बसलो. माझ्या आईचे करणे सवरणे चांगले नी तिचा हात पण मोठा म्हणून कायतरी निमित्त झाले की आबा, बापू काका हक्काने तिला सांगायचे “ सुने, जरा आलें - बिलें घालून चांगला ठसठशीतसा चहा कर बघू.... ” आईने झटपट चहा गाळून कप भरल्यावर आप्पानी स्वत: परातीत कप भरून सगळ्याना नेवून दिले. भुरके मारीत चहा पिऊन झाल्यावर पान जमवता जमवता या पुर्वी कधि कुठे नी कसे साप मारले त्या गप्पा रंगल्या. दरवेळी साप मारून झाल्यावर मोठ्यांची अशी गप्पाष्टके रंगायची. काकू आज्जी मात्र या असल्या गप्पाना ‘ चर्वितचर्वण’ नायतर ‘एरंडाचे गुऱ्हाळ’ म्हणायची. पण आम्हा पोराना मात्र ते आवडत असे. आम्ही जीवाचा कान करून ह्या गप्पा ऐकत असू. पुढे मोठेपणी या गप्पांचे महत्व प्रकर्षाने जाणवले. त्या गप्पा नुसते भुशाचे मळण नव्हते. त्या मधून खूप मौलिक माहिती उलगडायची. सापांची ठीवे कुठे आढळतात, ती कशी ओळखायची, त्यांचा रहिवास कसा ओळखायचा ? सर्प विष उतरणाऱ्या औषधी वनस्पती कोणत्या? त्या कोठे सापडतात ? अशी चतुरस्त्र माहिती त्यात असे. एवढेच नव्हे तर सर्पांविषयीचे लोकभ्रम, सर्पांविषयीचे पौराणिक संदर्भ, नाग देवतेची उपासना पद्धती, स्तोत्रे अशी सर्वस्पर्शी माहिती एरंडाच्या गुऱ्हाळात मिळे नी त्याही पेक्षा आम्हां पोरांच्या मनातली दडस कमी व्हायची.
मुळात आमचे काळ्यांचे अख्या गावात एकच घर ! पण तिसऱ्या पिढीत गोविंद आणि गोपाळ या सख्ख्या भावांचे आपापसात पटेना. वितुष्ट एवढ्या टोकाला गेले की, आगर अर्धे अर्धे वाटून घ्यायचे , एकाने जुन्या घरात रहायचे नी दुसाऱ्याने त्याच्या हिश्शाच्या भागात स्वतंत्र घर बांधून रहयचे असे ठरले. पण घरभाटाचे दोन भाग कुठून कसे करायचे यावर खडाजंगी सुरु असताना आगराच्या मध्यात असलेल्या ढोल्या फणसाच्या मुळातून दोनेक वाव लांबीचा नाग सरसरत आला. तो फणा पसरून थोडावेळ डोलला नी नंतर पुन्हा सरसरत आगराच्या टोकापर्यंत जावून मळ्यात नाहिसा झाला. तो गेला त्या जागी सकेर बाजूला होवून मातीत पट दिसू लागला. दोन्ही बंधूना या संकेताचा अर्थ उमगला. नागराजाने आखलेल्या मार्गावर सीमा निश्चित करून मूळ घर मोठ्याने घेतले नी पलिकडचा भाग धाकट्याने घेवून स्वतंत्र घर बांधले. तेव्हा पासून आमचे वखल हे वरचे काळे नी आगराच्या खालच्या अंगाला असणारे ते खालचे काळे म्हणून गावात रुढ झाले. गोविंद गोपाळ यांच्या पश्चात मात्र पुढच्या पिढ्यांमध्ये तेढ उरली नाही. वेळे गरजेला हातातले काम टाकून एकमेकांच्या मदतीला जायचे नी दोन्ही वखलांमध्ये जो कोणी वडिलधारा असेल त्याचा शब्द उभयपक्षी मानायचा हा रिवाज पडला. उभय पक्षी कुठेही कार्य कर्तूक असले तर पुर्वतयारी पासून तो कार्य उलगे पर्यंत एकीकडे चूल पेटायची. ही प्रथा आजतागायत माझ्या नवव्या पिढीतही निर्वेध सुरू राहिली आहे.
आमचे घरभाट मळ्याच्या कडेला. त्यात आणि आगरभर पानाची बीये नी केळी लावल्यामुळे बारमास थंडावा. आगरभर हिरव्या- पिवळ्या नी लाल रंगाच्या असंख्य पिटपिट्या बेडक्या आढळायच्या. मेरेच्या कडेला तर उंदराचे आदस्थान ! उंदिर नी बेडक्या म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्याना जसे आमंत्रण ! दर चार – आठ दिवसानी कुठे ना कुठे कोणीना कोणी किरडू हुकमी आढळायचेच. सगळीच किरडवे विषारी नसतात.आधेल/ दिवड, वानेरू, पाणसाप/ वयाळे, सर्प टोळ याना आम्ही चुकुनही मारीत नसू. वानेरू तर खेपेने सात- सात आठ- आठ निघायची. पण त्याना कुणीच मारीत नसे. फुरशी, डुरवे नी कुसडे घोणस, मण्यारी, नानेटे , कांडर , अक्करमाशी साप , नी वीतभर लांबीचे दाभणे साप /तक्षक या जातीचे साप विषारी . मण्यारी सहसा चावत नसत , पण त्यांची सावली पडली (त्यांच्या उच्छवासातून विष कण बाहेर पडतात, त्यांचा संपर्क झाला की) माणसाला श्वास घेणे कठिण व्हायचे, छाती कोंदायची , हळू हळू अंगावर ढाणे उठायला लागायची. अशावेळी रुग्णाला योग्य उपचार मिळाले नाही तर श्वासावरोध होवून तो दगावू शकतो. कांडर , नानेट्या यांचा वावर वेलींवर असायचा.
विषारी किरडू कधीही कुठेही उमगले तरी काळे मंडळी त्यांचा पिच्छा पुरवायची. हातातला कामधंदा टाकून ते विषारी किरडू शोधून काढून त्याला मारणार म्हंजे मारणार. आगरात मेरे कडेला उंदरांच्या बिळात शिरलेला साप बाहेर पडण्या साठी मिरच्यांची - जांभीच्या (काजू) बीयांची धुमी करून धुर बाहेर पडेल ती छिद्रे चोंदून आम्ही बीळ संपे पर्यंत खणती घेत असू. हा उद्योग काही वेळा विरड विरड क्वचित पुरा दिवस चालायचा. अशा वेळी एकेक बापया आळीपाळीने जेवून यायचा. पण किरडू मिळेपर्यंत काम निर्वेध सुरु रहायचे. हे करणे योग्यच होते. कारण फुरशाचा दंश आणि मण्यारीची विषबाधा यावर प्रभावी वनौषधी उपलब्ध आहेत. पण अन्य विषारी सर्पदंशा वर अशी वनौषधी आजही उपलब्ध नाही. एंजेक्षन सुद्धा ठराविक मुदत उलटल्यावर निरुपयोगी ठरते. आम्हा काळ्यांना निरुद्योगी माणसांचा मनस्वी तिटकारा. रिकामपणी चकाट्या पिटित बसणे, कामधाम सोडून वायफळ उद्योगात वेळ दवडणे याचे आम्हाला अतीव वावडे. म्हणून कुठे लग्न मुंजीला गेले तरी अक्षत पडली जेवणावळ झोडायला तासन् तास दवडण्या पेक्षा यजमानाला आढळीत रहाण्याच्या फंदात न पडता. काळे मंडळी घरी येवून आमटीभात खाणे पसंत करायचे. रात्री सत्यनारायणाची पूजा, मंत्रपुष्प अशा कार्यक्रमाना गेल्यावरही मुख्य कार्यक्रम उरकल्यावर पत्त्यांचे डाव न मांडता काळे मंडळी घर गाठणार. एकदा तर म्हणे आमची पुरुष मंडळी कुणाकडेशी षष्ठी पुजनाला गेलेली. तो यजमान म्हणजे हालगे मालगे , होते आहे चालले आहे अशातला सगळा संथ कारभार . माणसे जमली. दीड दोन तास उलटले तरी घुगऱ्यांचा पत्ता नाही . मग कंटाळून काळे मंडळी घुगऱ्या न खाताच उठून घरी आली. ही आख्या खालची काकू आज्जी अगदी रंगवून रंगवून सांगायची.
मराठी शाळेत असताना आम्ही मधल्या सुट्टीत देवराईत मजायचो. तिथे सुरंगीची गर्द झाडकळ असायची . जुनाट सुरंगीच्या खोडात पोपट,साळुंख्या, सुतार पक्षी यांच्या ढोली असत.अशाच एका बेताची उंची असलेल्या झाडावरच्या ढोलीतून एक पोपट बाहेर पडताना दिसला. आमच्या वर्गातला सतीश कांडले भारी उपद्व्यापी. तो लगेच सुरंगीवर चढला.त्याने ढोलीत हात घालून बघितल्यावर तीन अंडी हाताला लागली. आता आम्हाला एक नवीन व्यवधान मिळाले. दर एका दोन दिवसानी आम्ही देवराईत गेलो कि सतीश सुरंगीवर चढून धोलीत हात घालून बघायचा. दहा बारा दिवसानी अंडी फुटून पिल्ले बाहेर आली. आता सतीश ने झाडावर चढून ढोलीत हात घातला कि आई आली असं समजून पिल्ले च्राँ .... च्राँ असा आवाज करीत. त्यांचा आवाज झाडाखाली थांबलेल्या आम्हां पोरानाही ऐकायला यायचा.
घोडेमुखाच्या जत्रेच्या सुट्टी नंतर आम्ही शाळेत गेलो. त्या दिवशी आमच्या तिसरीच्या वर्गाचे लोके गुरुजी रजेवर गेलेले. आम्ही पाट्या बाहेर काढून अभ्यासाचे ढोंग करीत फुली शून्याचा खेळ सुरु केलेला. कोणीतरी धोलीतल्या पिलांचा विषय काढला. मग लघवीच्या सुटीत आमची दहा बारा जणांची फरड देवराईत शिरली. सतीश नेहेमी सारखा सुरंगीवर चढला. त्याने ढोलीवर हाताने फटका मारला .नेहेमी असे केल्यावर आतल्या पिल्लांचे च्राँ ... च्राँ सुरु व्हायचे पण आज काहीच आवाज येईना.“ पिलां भडवी झोपली हतशी वाटता ” असे म्हणत त्याने ढोलीत हात घातला मात्र.....“आय्येऽग्येऽऽ कायतरी चावला ” असे म्हणत त्याने झटक्यासरशी हातबाहेर काढला नी तो खाली उतरला. त्यावेळी ढोलीतून किरडवाने टोकरी बाहेर काढलेली आम्हाला दिसली . कोणी तरी दगड मारल्यावर सापाने फणा पसरली आणि आम्ही घाबरून धूम ठोकली. मग कोण धावाघाव झाली नुसती. शाळे जवळच्या घाडी वाडीतला खेमाजी घाडी वैदगिरी करी त्याने विष वर चढू नये म्हणून कसलासा लेप त्याच्या हातावर काढला. दरम्याने वाडीतल्या बापयानी डोळी बांधून आणली. सतीशला डोळीत घालून सगळे मोंडात जायला निघाले. त्यावेळी मोंडातले पोकळे डॉक्टर पुऱ्या दशक्रोशीत सर्पदंशच्या रुग्णावर हुकमी ईलाज करणारे एकमेव डॉक्टर! जवळजवळ साताठ मैलांची चाल मारून माणसं मोंडाच्या सड्यावर भैराईच्या देवळा जवळ पोचली नी सतीश आचके द्यायला लागला. त्याला पाणी पाजीत असतानाच त्याने मान टाकली नी खेळ खलास झाला.
सराईला भात कापणी झाल्यावर नी भरडात नाचण्याची कणसे वेटताना मेरेच्या कडानी हारीने उंदराची बीळे दिसायला लागत. अशावेळी किरडवांची खूप भिती - म्हणून अशा ठिकाणी कामाला जाताना हातात काठी घेवून जायचा शिरस्ता असे. सराईच्या वेळी तर किरडवांचा नुसता सुळसुळाट असे. तेंव्हा गोठ्या बाहेर , संडासाच्या खोरणा जवळ, विहिरीकडे दोणी जवळ नी आगर- घरभाटात ठिकठिकाणी हुकमी सापडाव्या म्हणून कायम काठ्या ठेवलेल्या असत. हा रिवाज सगळेच अगदी कटाक्षाने पाळीत. म्हणून कुठेही साप-किरडू उमगले की ते सहसा जिवंत सुटून जात नसे नी पोराबाळाना धोका रहात नसे. या काठ्यासुद्धा विशिष्ठ प्रकाराच्या असायच्या. आवती किंवा मलकी चिव्याच्या , निगडीच्या, आंजणीच्या किंवा कऱ्ह्याच्या जून - जडशीळ, पायाच्याआंगठ्या एवढ्या जाडीच्या खास शोधून आणाव्या लागत. अडीच ते तीन हात इतक्या बेतवार लांबीची किंचीत बाक असलेली ( सरळ सूत काठी जमिनीवर मारली तर हाताची बोटे चिंबटण्याची शक्यता असे) चांगली जून काठी निवडून घासून तासून गुळ गुळीत करून उजू करावी लागायची. जनावर किरडू मारल्यावर नारळाच्या किशीने घासून धुवून पुसून परत जागच्या जागी ठेवण्याकडे कटाक्ष असायचा.
गिमात (एप्रिल मे चा काळ) आंबे, काजू. करवंदे, चारणे आणायला आम्ही आडीत- सड्या शिवरात फिरून यायचो. अशावेळी दोन-तीन खेपा झाल्या कि दुखाव्याचा साप गेलेल्यांचा माग काढीत घरापर्यंत आला नाही असेसहसा होत नसे. एकदा आमच्या विजू आक्का कोनीत फिरून जांभीच्या बिया ,बोंडू नी पडीचे आंबे घेवून आल्या. रात्री मागिलदारी त्या भांडी घाशीत असताना चिकवीणीच्या मुळात असलेल्या नळ्यांच्या ढिगातून फुस्स ऽऽ फुस्स ऽऽ असे आवाज आल्यावर त्यानीघाबरून मोठ्या माणसाना हाका मारल्या. जवळ जवळ अर्ध्या पडवीच्या छपरावरचे नळे उतरून रचलेला ढीग..... कंदिल बॅटऱ्या घेवून सगळे मागिलदारी जमले. नळ्यांचा ढीग हालवून बाजुला रचून झाला. आता जमिनीवर फुटक्या नळ्यांची खापरे विखुरलेली शिल्लक राहिली. अप्पानी सुचना केली, “आता अवघाती हात घालू नका. काठीने फुटके बाजूला करा. ” थोडीशी फुटके चाळवल्यावर आंगूळभर फटीतून जनावराच्या पोटवळाचा भाग दिसला. आप्पानी सप्पकन् कांबेरू मारून दाबून धरल्यावर तोंडवळाचा भाग बाहेर काढीत फुस्कारा टाकून सापाने फणा फुलवला. धोंडूकाकाने नेमका तडाखा मारला तो सापाच्या मस्तकावरच. एकाच फ़टक्यात साप लोळा-गोळा होवून पडला. अडचणीच्या जागी, सांदी फटीत उमगलेले जनावर जख़डून ठेवायला चौधारी कांबेरू म्हणजे हुकमी एक्का! त्याची अणकुचीदार टोके किरडवाच्या अंगात रुतली की ते जखडबंद झालेच समजा ! मात्र जनावरावर फटका मारताना तो अवघाती कांबेरूवर बसणार नाही एवढे पथ्य पाळले की बस्स!
त्यावर्षी गोम्या बंडब्याला खंडाने कसायला दिलेले भरडातले दळे आम्ही काढून घेतले. त्यावरकस जमिनीत मजुरीनेजोतेलावून आम्ही नाचणा टोवला. दसरा झाला आणि आमची फरड नाचण्याची कणसे वेटायला भरडात गेली. अर्धा भांगा वेटून झाला आणि नाचण्याच्या धाटांमध्ये सुस्त पडलेले दोन वाव लांब नी पायच्या पोटरीएवढे जाड जनावर उमगले. आम्ही चार भावंडे नी आप्पा....एवढे जनावर कसे मारणार? मी धावत जावून घरी वर्दी दिली . मग बापू काका, बबन, सोन्या नी धोंडू काका, काठ्या कांबेरू घेवून आले. दोघानी दोन कांबेरू - एक तोंडा जवळ नी दुसरे त्या मागे दीड हातअंतरावर मारून जनवराला जखडून धरले. नी बाकीच्यानी कणसे झोडतात तसे धडाधड काठ्यांचे दणके मारायला सुरुवात केली. जनावरएअवढे जबरदस्त की कठ्यांच्या दणक्या गणिक त्याने अंग फुलवायला सुरुवातन केली. “हे लचाण्ड काठ्यानी मरणारे नाय रे विनू ” म्हणत बापूकाकानी कुदळ घेतली आणि त्या जनावराच्या तोंडवळा चा भाग छिन्न विछिन्न करून टाकल. तोआर म्हणजे अजगर होता. त्याला मारायला खरेतर बंदूकच लागते.
आम्ही सातवीत असताना वरंडावरच्या रानडे बाई बदली होवून आमच्या शाळेत हजर झाल्या. वरच्या वठारात बाबा दिक्षितांच्या घराजवळ त्यांच्या चुलतभावाचे छोटेखानी दोनखणी घर , ती माणसे मुंबईत स्थायिक झालेली. ते घर भाड्याने घेवून बाईनी तिथे बिऱ्हाड थाटले. त्यांच्या मागिलदारी पडवीत पाणी तापवायची थाळी नी मोरी आणि बाजुला जुनेवासे , खांडबारे, सऱ्या नी रिफांचे बलाट डाळलेले. त्यावर्षी बाबांच्या मुलीची मंगळागौर झाली. रानडेबाई सगळ्यांबरोबर पत्री काढायला आडवणात गेलेल्या. त्या रात्री जेवण झाल्यावर बाई भांडी घासायला मोरीच्या कठड्यावर बसलेल्या असताना बलाटातून सापाने टोकरी काढून फुत्कार टाकल्यावर घाबरून बाईनी आरडा ओरडा केल्यावर माणसे जमली. बलटाखाली सांदी फटीतून बॅटऱ्यांचे फोकस मारून शोढ घेतला पणजनावर काही उमगले नाही. तासभर शोधाशोध करून माणसे परत गेली. दुराऱ्या दिवशी संध्याकाळी शाळेतून आल्यावर बाई पाय धुवायला गेलेल्या असताना पुन्हा सापाने बलाटाबाहेर टोकरी काढून फुत्कार टाकले. पुन्हा माणसे जमली. पण शोध घेतला तरी जनावर काही उमगले नाही. एवढे मोठे बलाट तरी कसे कोसळणार? मग कोणीतरी धुमी करायची शक्कल काढली . शेणी पेटवून मिरच्यानी जांभीच्या बीया घालून बलाटाच्या तळी दमदार धुरी केली.सगळी पडवी धुराने भरली. पन जनावर बाहेर पडताना काही उमगले नाही. त्या नंतर पंधरवडाभर जनावर उमगे नाही. धुरीला भिवून जनावर पळून मार्गस्त झाले असा बाईंसकट सगळ्यांचाच समज झाला. बाई ही घटना विसरूनही गेल्या. त्यानंतर आठवडाभराने सकाळी उठून मशेरी लावीत बाईनी मागिलदार उघडून उंबऱ्या बाहेर पाय टाकला मात्र.... उंबऱ्याबाहेर दबा धरून राहिलेल्या सापाने पायाची दवण शीर धरूनच दंश केला. बाईनी प्राणांतिक बोंब मारली. बाबांच्या आणि बाजुच्या घरातली माणसे धावत आली. बाई उंबऱ्या जवळच बसलेल्या ....आजूबाजूलाशोढ घेतल्यावर अंगणाकडेला कर्दळीच्या गजकटात जनावर मिळाले. बाईना मोंडात डॉक्टरांकडे न्यायला माणसानी डोळीची बांधाबांध सुरु केलेली असतानाच बाईंची प्राणज्योत मालवली.
मिरजेतले आमचे काका दिवाळी- मे महिन्यात सुटीला मुलाबाळांसह घरी यायचे. काकूचे माहेर तिकडे सांगलीलाच. तिला कोकणात आल्यावर तिन्हीसांजा झाल्यावर भिती वाटायची. साप किरडवाना तर ती जामच घबरायची. कुठल्याही सरपटणाऱ्या जनावराला ती ‘ जीव ’ म्हणायची. आगरात फिरणारे आधले (धामण) बघून तिने बोंबच मारली. “बाई बाई बाई ..... केवढा मोठा जीव तो.... माझी तर पाचावर धारण बसली... अगदी प्राणच कंठात आले ” ती आईला सांगू लागली. आम्ही पोरे तिचा जीव हा शब्द धरून तिला चिडवीत रहायचो. आमच्याकडे कुळवाड माळवाड बाया,बापये सुद्धा नाग सर्प या नावाचा उच्चार करणंही टाळीत. त्याचा उल्लेख ‘मोटो ’ किंवा ‘थोरलो ’ असा करीत. तसे काकूही साप/नाग हे नावही घेणे टाळायची. रात्री जेवणे उरकल्यावर सोप्यात मध्ये कंदिल ठेवून आम्ही आठजणे दोन कॅट एकत्र करून झब्बू खेळत बसलो. काकूही आमच्या सोबत खेळायला बसलेली. हातातल्या शेवटच्या गुलामाचा झब्बू देवून “चला सुटले बाई...आता कोणाचा नंबर लागतोहे बघूया ”असे म्हणत काकू जरा बाजूला सरकली . नेमका त्याचवेळी भिंतीकडेच्या भाताच्या कणगीखालून मोठे पिवळे धम्मक जनावर बाहेर पडले.आम्ही नुस्ती बोंबाबोंब सुरुकेली नी त्या गडबडीत जनावर भेदरून कोपऱ्यातल्या मोरीत शिरले.
आमची मोरी एक दिव्यच होते. आम्ही बॅटरीचा फोकस मारल्यावर साप मोरीच्या मुशीत रिगला. प्रसंगावधान राखून मी धावतच बाहेर गेलो तिथेच गावलेला गोणपाटाचा तुकडा चुरगाळा करून तो बोळा मुशीत चोंदला. दोन-तीन मिनिटातच मोठी माणसं जमली. बॅटरीचे फोकस मारून काळजीपूर्वक निरखून बघितल्यावर मुशीत सापाच्या पोटवळाची दुडत दिसली. काकानी शक्कल लढवली. काठीला चिंध्या गुंडाळून त्या पलित्यावर रॉकेल नी गोडेतेल ओतून तो पेटता पलिता मुशीत घातला. युक्ती लागू पडली. ज्वाळांची झळ लागताच साप मुशीतून बाहेर पडला नी वासूच्या कांबेरूच्या तडाख्यात गावला. तिथे काठी मारण्यासारखी नव्हती . त्याला पलित्याचा होरपळा देवून जितेपणीच धगवून मारला. दुसरे दिवशी आम्ही जमिनीत खड्डा खणून त्यात त्याचे वेटोळे ठेवून वर जानवे नी पैसा सुपारी ठेवून त्याला मूठमाती देत असू. त्या घटनेची काकूने एवढी दडस घेतली की त्यानंतर ती कधिही वस्तीला घरात राहिलेली नाही.
मध्यंतरीच्या काळात आम्ही मुले शिक्षण नोकरी या निमित्ताने दाही दिशाना पांगलो. आबांचे घर तर बंदच झाले. त्यांचा मुलगा अंतू कलकत्त्याला प्रायव्हेट कंपनीत नोकरीला लागला. त्याने तिकडचीच बंगालिण बायको केलीन. आबानी त्याचे नावच टाकले. लग्नानंतर बायकोला घेवून पाया पडायला आलेल्या पाणी सुद्धा घेऊ न देता त्यानी अक्षरश: हाकलून लावले. तो जो गेला तो आबा निवर्तल्याची तार केल्यावर तिसऱ्या दिवशी आला.दिवस कार्य झाल्यावर आईला घेवून घराला टाळे मारून तो जो गेला तो पुनश्च गावी आला नाही. वरच्या घरात सुद्धा बापू काका काकू नी त्यांचा शाळामास्तर मुलगा वासू त्याची बायको नी दोन मुलं , आमचे आप्पा नी आई एवढीच माणसे राहिली. आम्ही दोन्ही भाऊ नोकरीनिमित्त मुंबईत स्थायिक झालो. कधितरी सुटीला चार दिवस घरी जाऊन येतो इतकेच.
आमच्या ठिकाणासह सगळ्याच गावाचा नव्हे तर पुऱ्या देवगड तालुक्याचाच चेहेरा मोहरा पार बदलून गेला. खायच्या पानाची बीये, केळी नी माड पोफळीही कधिच मारून झाली. आता आगर लख्ख उघडे झाले ले आहे. मळ्यात सुद्धा चुकार न कुठे कुठे भात शेती केलेली दिसते, बाकी दळे पड टाकलेले आहेत. पूर्वी पाऊस काळ सुरु झाल्यावर मुंबईच्या हाफकिन इन्स्टिट्यूशनची व्हॅन देवगडला येवून हजारो फुरशी प्रतिविष बनविण्यासाठी घेवून जात. सड्यावर इतस्तत: पडलेले दगड उचलले तर दर दोन तीन दगडांखाली हमखास फुरशी मिळायची पण आता नांदगाव पासून देवगडला जाई पर्यंत पुरा सडा पार स्वच्छ झाला... तिथे एन. ए. प्लॉट पाडून हजारो खाजगी बंगले नी हौसिंग कॉलन्या उभ्या राहिल्या. इतर गावानी सुद्धा कातळात ब्लास्टिंग करून डबरे पाडून त्यात माती भरून हापूस कलमे लावलेली आहेत. करवंदी, आंजणी, उक्षी, पंचकोळी, तिवरे डोळी या झाळींचा अगदी मागमूसही राहिलेला नाही. सापांचे दिवस कधीच इतिहास जमा झाले .... मुलाना तर आमच्या खणकथा खऱ्याच वाटत नाहीत.
※※※※※※※※