मरणभोग
“हा काळ आपला मुर्दाडासारखा पुढे ऽऽ पुढे जातोहे ,पण ह्यानेच घात केलान माझा, ह्याला कुठेतरी आरेखायला हवा.” चंद्रुआक्का दाराच्या उंबऱ्यात बसल्या बसल्या योजीत होती. संध्याकाळचा सुमार. घराखालच्या मळ्यात टोकाला दर्या, दिवसभर घटकापळांनी पुढे पुढे सरकत सरकत हा सूर्य एकदा दर्यात बुडाला की झाली रात्र ! अरेच्या ! इतके दिवसांत हे असे सुचलेनाही? स्वतःच्या कल्पनेचे चंद्रुआक्काला हसायला आले. “आत्ता बघते कसा थांबत नाय काळ तो...” ती एकटक सूर्याकडे बघून त्याला दटावायला लागली. त्याने थोडावेळ चंद्रुआक्काकडे लक्ष नाहीसे केलेन् पण ती नजर खळवीत नाहीसे दिसल्यावर त्याचा नाईलाजा झाला. हाताने खुण करून 'थांब' असा इशारा तिने केला अन् सूर्य थांबला. पाच-दहा मिनिटे तो तसाच कसानुसा थांबलेला. मग जरा धीर करून म्हणाला, “चंद्रुआक्का, अगो मी असा थांबू शकत नाही मला जायला हवे. ”
आता तिचा धीर चेपला. मनाशी काहीतरी योजना आखीत ती म्हणाली, “मग मी सांगत्ये तसा जा.उलटा मागे जा. जा मागे....जा....हां अस्सा.” नकळत तिचा आवाज तार सप्तकापर्यंत पोहोचला. तशी गोठ्यात म्हषीचे दुध काढायला गेलेला तिचा नवरा म्हणाला, “ हां, झाले वाटते हिचे खुळाचार सुरू ! आधी आत जा बघू. आत जात्येस की येऊ ?” नवऱ्याच्या दरडावणीने चंद्रुआक्का नाईलाजाने माघारी वळली. "नायतर मेला खरेच काठी घेऊन यायचा.
सोप्यातल्या खिडकीतून तिने परत सूर्याकडे लक्ष केले. चंद्रुआक्काला घाबरून त्याचे उलट दिशेने जरा जरा मागे जाणे सुरू झाले नी, “मेल्या जा की जारा पटापटा... अजून जोरात, अजून जोरात, जोऽऽऽरात !” मग सूर्याला गरागरा फिरण्या शिवाय गत्यंतर राहिले नाही.आता उलटे दिवस यायला लागले ! ती एक एक दिवस मोजीत राहिली. हा मासिक निवृत्तीचा दिवस, हे तेरावे....हे बारावे....हा सारी भरल्याचा दिवस! होता होता अंगणातल्या फणसाखाली पडलेला सुरेश.....डोके फुटून मेंदू बाहेर आलेला,नाकातोंडात रक्त, आणि किंकाळी मारणारी खुद्द चंद्रुआक्का!त्या दृष्याने मात्र चंद्रुआक्काचे भान सुटले. “नको ऽऽनको ऽऽऽ ” ती खरेच किंचाळली. आतून तिची मुलगी बयो धावतच बाहेर आली. खिडकीचे गज धरून चंद्रुआक्का भेदरलेल्या अवस्थेत उभी. “आई ऽआई ऽऽआधी सावध हो !" मुलीच्या हाकेने चंद्रुआक्का भानावर आली. मुलगी विचारत होती, "आई,काय झाले ? का ओरडलीस ?”
वास्तविक तिनेही केवळ विचारायचे म्हणून विचारले एवढेच. हल्ली चंद्रुआक्काला ओरडायला काही कारण लागत नसे. तिचे डोके फिरले तेव्हापासून असल्या गोष्टींची बयोला सवय झालेली. “बयो, अगो काय बघ....” झाला प्रसंग सांगायचे अगदी जिभेवर आलेले, पण बयोला पटले नसते म्हणून चंद्रुआक्काने विषय तिथेच थांबवला.“आई, संध्याकाळ झालीय्, जरा देवाचे नाव घे म्हणजे शांत वाटेल.उगाच आरडाओरड नको.” असे बजावीत बयो आत गेली. चंद्रुआक्का परत खिडकीतून बघायला लागली. मघाशी तर हा उलटा जात होता. तिच्या मनात विचार आला पण आता सूर्य खरेच दर्यात डुबायला लागलेला. चंद्रुआक्का स्वतःशी च विचार करीत बसली. चुकलेच माझे, थोडा वेळ कळ काढायला हवी होती, सूर्य आणखी मागे मागे गेला असता तर सुरेश जिांवत झाला असता . त्याला लहान - लहान झालेला बघता आला असता.
“आता खेळ पुरे झाला हो. हात पाय धुवून परवचा म्हणा. उजाळणी म्हण.” चंद्रुआक्का असे ओरडल्यावर मात्र सुरेश गुपचुप पाय धुवून झोपाळ्यावर बसला. परवचा,मराठी महिने, राशी,तिथी म्हणून झाल्या आणि उाळणी सुरू झाली. सुरेशचे सहापासूनचे पाढे तेवढे पाठ नव्हते. तो मध्ये मध्ये चुकायचा म्हणून चंद्रुआक्का त्याच्याबरोबर म्हणायला लागली. "सहा एके सहा, सहा दुणे बारा...नवा सत्ता त्रेसष्ठ,नवा आठा बहात्तर,नऊ नव्वे एक्याऐंशी....“आवशीचा घोव एक्याऐंशी” भलूनाना करवादला, “आता गप ऱ्हा.... नायतर चार वादाटे ओढीन पाठभर,तीन्हीसांजा पण म्हणायचो नाय मी.”
चंद्रुआक्काची तंद्री भंगली. “हा साला शनी सारखा राशीलाच लागलाहे माझ्या.” तिने कडाकडा बोटे मोडली. 'म्हणे गप्प बस,नायतर वादाडे ओढीन....! ओढ वादाडे,चामडे सोलून काढ माझे.आपल्या पापांवर पांघरूण घालायचे म्हणजे माझे तोंड बंद करायलाच हवे . देवाने कशाला हा बाईचा जन्म दिलान कोण जाणे. दोन पोरे झालेल्या या बापयाला हे नाद सुचतात!जात नाही धर्म नाही! नाही म्हणजे अब्रू सोडावी तरी किती हो म्हणत्ये मी माणसान् ! इतके दिवस बोलवा होती कानावर,आज प्रत्यक्ष माझ्या डोळ्यानीच बघितले तुमचे थेर."
चंद्रुआक्काच्या या शब्दांनीच तेव्हा भलूनानाला कोण फोड आले. “रांडेच्ये कामधंदा सोडून कोनीत कडमडायला तुला कोणी सांगितलेन होते ?आणि काय थेर बघितलेस माझे?” चंद्रुआक्का बेभान होऊन ओरडली. “हा मात्र निर्लज्जपणाचा कहर झाला.” भलूनाना वेळी-अवेळी कोनीत जातो. गुरे राखायचे नाव फक्त....रख्मी धनगरीण तिथे येते, दोघे तासन् तास मांगर बंद करून असतात. ही बोलवा चंद्रुआक्काच्या कानावर आली होती.भागी परटीण तोंडाळ! भाडभीड न ठेवता तिनेच चंद्रु आक्काला सांगितलेन. मग पाळत धरून चंद्रुआक्का भलूनानाच्या मागावरच राहीली. त्यांनी आत जाऊन मांगर बंद करून घ्यायची खोटी,चंद्रुआक्का तश्शी धावत पुढे गेली अन्“दार उघडा,बाहेर या आधी" अशी बोंब तिने मारली. भलूनाना दार उघडून बाहेर आला. रख्मी मागच्या बाजूची कवाडी उघडून पळाली. मग भलूनानाशी चंद्रुआक्काची बाचाबाची झाली. "रख्मी तुमच्यापुढे मांगरात शिरलेली मी माझ्या डोळ्यांनी बघितली. आणखी कसले पुरावे हवे मी म्हणत्ये, करून सवरून वर तोंड करून बोलायला जीभ रेटत्येच कशी?”
आता मात्र भलूनाना संतापला. आधीच रंगाचा बेरंग झाल्यामुळे तो चवताळलेला.“आता गप्प बस नायतर वादाडे ओढीन पाठभर.” पण चंद्रुआक्का कसली गप्प बसायला. ती रागाने म्हणाली, “नाय जनलोकात अब्रुचे धिंडवडे काढले तर ओगल्यांच्या घराण्याचे नाव नाय घ्यायची” भलूनानाने मग आंजणीच्या झाळीचा एक फाटा मोडून घेतला अन् चंद्रुआक्काला मरीमर झोडून काढले. त्यांचा कालवा ऐकून मोंड्यांचे चार झिलगे धावत आले. ते मधे पडले. मग मात्र काही न बोलता भलूनाना वाटेला लागला.
चंद्रुआक्का अंगावरचे वळ बघायला लागली. “म्हणजे माझ्या मनाचेच खेळ होते तर सगळे?” भानावर येत ती म्हणाली. म्हणजे लोक म्हणतात तसे खरेच माझे डोके फिरले की काय ? तिलाच काहीच सुधरेना. “आई,चहा घे घोटभर” चहाचा कप तिच्यापुढे ठेवीत बयो म्हणाली. भलूनाना झोपाळ्यावर चहा घटाळीत बसलेला होता. चंद्रुआक्काला त्याची किळस आली . कुठच्या जन्मीचे पाप म्हणून हा शेतकिडा मला मिळाला.ह्याच्या नावाने कुंकू लावायचे म्हणजे सुध्दा पाप आहे पाप! एवढा पोटचा पोर गेला. सगळा गाव हळहळला. दांडग्या छातीचे जगुनाना, तो सदू बापट ! पण सुरेशला उचलून तिरडीवर नेऊन ठेवताना त्यांचे हात कापायला लागले. पण या शेतकिडयाने जनरीत म्हणून तरी दोन टिपे गाळावी होती. पण नाही.....त्या प्रंसगातही पान खाऊन किवेण पडल्यासारखे त्याचे तोंड....पानाचा तोबरा सांभाळीत कुत्रा बोलला काय? तर म्हणे "व्हायची गोष्ट झाली, आता दुःख करून काय उपयोग?" शरमसुध्दा कशी वाटली नाय म्हणत्ये मी असले अघोचरी बोलायला? चंद्रु आक्काला वाटले. तेवढ्यात भलूनाना म्हणाला,"बयो आणखी घोटभर असला तर आणगो चहा."
भलूनानाची टिंगल करण्यासाठी चंद्रुआक्का मग कवन म्हणायला लागली. “चहा घ्यावा,चहा द्यावा,चहा जगीचा विसावा”चंद्रुआक्काचे डोके फिरल्यापासून तिला बाहेर जायची बंदी केलेली. सारा दिवस उंबऱ्यात बसून ती समोरच्या दर्याकडे बघत राहायची. हल्ली लहरीत असली की,चंद्रुआक्का गाण्यात बोलायची. आत्तासुध्दा पोस्टमन पत्रे वाटायला वाडीत चाललेला. तो दिसल्यावर चंद्रुआक्काला कवन आठवले. पोस्टमन हाकेच्या अंतरात आल्यावर तिने सुरू केले,“अंगात ड्रेस खाकी, पत्रांची ब्याग हाती, शोधीत हा कुणाला आला टपालवाला...”
चंद्रुआक्का तालासुरात म्हणायला लागली. पोस्टमन हसला. आतुन बयोची हाक आली. “आई चल आंघोळ करून घे.” चंद्रुआक्का गाण्यातच म्हणाली, “आंघोळीला चला. चला जाऊ चला....” चंद्रुआक्का उठून आंघोळीला गेली. दोन तांबे अंगावर ओतून ती पाय चोळायला खाली वाकली. पायावर सूर्य किरणाचा गोल कवडसा पडलेला, मध्येच वाऱ्यावर पान हललेआणि कवडसा नाहीसा झाला. मग पुन्हा दिसायला लागला. कवडशांचा लंपडावाचा खेळ बघून सुरेश खुदकन हसला. हात पुढे करून त्याने कवडसा मुठीत धरला. तो जे काही दिसेल ते तोंडात घालायचा. त्याने मुठ तोंडासमोर आणून उघडली तो आत काहीच नव्हते. त्याची फजिती बघून चंद्रुआक्कासुध्दा हसायला आले.“खुळा रे खुळा !” पुन्हा एकदा कवडशाच्या आड पान आले. कवडसा नाहीसा झाला अन् त्याच्याबरोबर सुरेशसुध्दा. मग चंद्रुआक्का सुरेशला शोधायला लागली. तेवढ्यात तिला लख्ख आठवले. सुरेशला पाळण्यात झोपवून आपण आंघोळीला आलो. चटकन आंघोळ करून घरात जायला हवे. तो आता उठेल. त्यापूर्वी भात शजायला हवा. मग लगोलग आंघोळ करून ती घरात गेली.
सुरेश जाऊन वर्ष होत आले. सगळीच हळूहळू सुरेशला विसरायला लागलेली. भाव्यांकडचे मागणे आल्यापासून बयोसुध्दा मनोमन सुखावली. चार दिवसांनी भाव्यांकडची माणसे तिला बघायला येणार होती. तिने घराची झाडलोट सुरू केली. हल्ली चंद्रुआक्काही जरा बरी....बरी म्हणजे तिचे ओरडणे, आळपणे पुष्कळ कमी झालेले. बाकी बेताल हसणे, गाणी म्हणणे होते तसेच होते. मुलाकडच्यांना या गोष्टीची कल्पना होती. पण माणसे येतील तेव्हा त्यांना हे चळींदर समोर दिसायला नको म्हणून बयोची मोठी बहिण सुमी हिने आईला चार दिवस माझ्याकडे पाठवा असा निरोप दिला. भलूनाना तिला पोहोचवायला जायचा होता. पिशवी घेऊन चंद्रुआक्का बाहेर पडली. उंबऱ्यात आल्या आल्या तिला आठवण झाली, “सुम्ये,उगाच हुंदडत राहू नको. सुरेशकडे लक्ष ठेव नीट आणि दर्याकडे त्याला एकटा पातू नको हो.”आतुन बयो नुसते 'हो' म्हणाली अन् चंद्रुआक्का चालायला लागली. वाटेत धाकू कुंभाराने हाक मारली, “काय ग्ये भटणी,” बाहेर जायच्या खुषीत चंद्रुआक्काने त्याला कवन म्हणून दाखविले. “चाक फिरवतो गरागरा ,मडके करतो भरा भरा , तर मी कोण ? धाकू कुंभार” धाकू हसतच पुढे गेला. पाराजवळ एस. टी. चा स्टॉप. चंद्रुआक्का पिशवी मांडीवर घेऊन पारावर बसली. थोडया वेळाने लांबून गाडी येताना दिसली. चंद्रुआक्का अगदी खुषीत आली. “गाडी आली गाडी आली झुक् झुक् झुक् शिटी कशी वाजजे बघा कुक् कुक् कुक् ”
गाडीतून उतरल्यावर पिशवी काखोटीला मारून चंद्रुआक्का भराभरा चालत निघाली. भलूनाना आता तिचा नवरा नव्हता अन् तिच्या तो खिागणतीतही नव्हता. तिला बघताच “आज्जी आज्जी” करीत नातवंडे तिला बिलगली. सुमीने विचारले,“आई नाना कुठेत ?”चंद्रुआक्का झटकन उत्तरली, “नानात नाना फडवणीस नाना इतर नाना करीती तनाना. मी एस्टीत बसायला आले तिथपर्यंत मेल्यान् पाठ धरलीन. पण मी कसली वस्ताद ! दिल्या त्याच्या हातावर तुरी नि बसल्ये गाडीत. तो गेला असेल तिकडे त्याच्या मैतरणीकडे.” आजीचे हे मजेशीर बोलणे ऐकून नातवंडे हसायला लागली. त्यांना दटावीत सुमी आत गेली. थोड्याच वेळात भलूनाना आत आले. त्यांना पाहताच चंद्रुआक्का पुढे झाली. त्यांना ओवाळण्याचा अविर्भाव करीत म्हणाली, “अहो, नाऽऽना तुम्ही खावा सुपारी पाना आणि करा ठणाणा पळा इथून. ”
नाना गेल्यावर मात्र चंद्रुआक्काचे चळिंदर जरा कमी झाले. ती नीट बोलून चालून राहीली. अधून मधून तिचे गाण्यात बोलणे मात्र चालायचे. पण जावई,नातवंडे, सुमी कुणालाच ती उपमर्दकारक काही बोलली नाही. चार दिवसांनी सुमीने तिच्या जाण्याचा विषय काढला तर चंद्रुआक्काचे आपले भलतेच सुरू झाले,“ त्या भल्याचे तोंड नाही हो बघायची मी..... माझा सुरेश गेलाए मालवणात नोकरी करायला. त्याला खोली मिळाली की तो येईल मला न्यायला. मग मी जाईन मालवणला. नांदायला, नांदायला, नांदायला,मला नाही जायाचं नांदायला.” हे कर्मकठीणच झाले. दोन दिवस गेल्यावर मग सुमी म्हणाली, “आई मालवणला जाऊ या ना सुरेशकडे? त्याचा निरोप आला सकाळी,उद्या तुला मालवणला पोचवायला सांगितलेन आहे त्याने. ” हे ऐकताच चंद्रुआक्का खुषीत आली. दुसऱ्या दिवशी ती खुषीतच सुमीबरोबर बाहेर पडली. गाडीत आक्का शांत होती. गाडी थांबल्यावर उतरताना मात्र आपण फसलो हे तिच्या लक्षात आले. “सुम्ये खोटारड्ये, शेवटी मला फसवलेस की गो.....”आक्का रडायला लागलीय. पण काहीही आक्रस्ताळेपणा न करता आक्का घराकडे जायला निघाली.
बयोच्या लग्नाची गडबड सुरू झाली. कसले तरी कार्य आहे हे आक्काने ओळखले, पण तिला कोणीच काही बोललेले नव्हते. लग्नाला आठ दिवस राहीले अन् पत्रिका छापून झाल्या. घरात देवापुढे पत्रिका ठेवून झाली. आक्काने बयोलाएका बाजुला घेतले अन् विचारले, “बयो, तुझा घोडनवरा बापुस माझ्या उरावर सवत आणतोहे की काय ?” बयो म्हणाली,“आई, काय भलतेच बोलतेस,अगो,माझेच लग्न आहे!” अपमानाने आक्काला रडू आले, “चांडाळणी, तुझे लग्न आणि मला कोणीच नाही गो मला बोललीत, मी का तुझे लग्न मोडायला जाणार होत्ये?”
मग नवरा मुलगा कोण-कुठला याची चौकशी करून काय काय तयारी झाली, देणे-घेणे काय ठरले ते खडान् खडा तिने बयोला विचारले. कुणाला काही न विचारता सवरता तिने रूखवताचे जिन्नस करायला घातले. वड्या थापता थापता, “विहिणींनो बसा भोजनाला, आज हा उशीर फार झाला...” तिने सुरू केले. आता घरात चार पाहूणे मंडळी जमली. आक्काचे गाणे म्हणणे सोडले तर ती खुळी आहे असे कोणाला खरेही वाटले नसते. लग्न दोन दिवसांवर आले तेव्हा मात्र अजून सुरेश कसा आला नाही या काळजीत ती पडली. कुणीतरी प्रसंगावधान राखुन त्याला रजा नाही,तो लग्नाच्या दिवशी परभारे तिकडे येईल असे सांगितले. आक्काचेही समाधान झाले.
आक्काला लग्नाला न्यायची नव्हतीच, पण तसे सांगुन तिला पिसळवा कशाला म्हणून “तुला लग्नाच्या दिवशी तिकडे नेऊ, तुझे हे चळिदंर बघून बयोचे लग्न मोडले म्हणजे? तुझे गाणी म्हणणे,हसणे, आम्ही समजून घेऊय पण लोक नावे ठेवतील. लग्नाच्या दिवशी तु आणि सुमी सकाळच्या गाडीने या.” अशी तिची समजुत घातली. सगळी मंडळी गेल्यावर मात्र चंद्रुआक्का उमजली. “मला फसवलेनी....” म्हणून उंबऱ्यात बसून ती रड रड रडली. दुसरे दिवशी सकाळीच उठून तिने दारात पोतेरे फिरवून त्यावर छानपैकी राधाकृष्णाची रांगोळी काढली. साग्रसंगीत देव पुजा केली, लग्नाच्या मुहूर्ताच्या वेळी देवाच्या पुढ्यात बसून मंगलाष्टके म्हटलीन. वरण भात, गोडाचा सांजा असे जेवण रांधलेन. महापुरूषाला पान, गोग्रासाचे पान ठेवलेन. दुपारी जेवल्यावर मायलेकी आडव्या झाल्या. चंद्रुआक्का खुषीत सुमीला म्हणाली, ”सुम्ये, आता माझा घोर मिटला. मला तेवढी सुरेशकडे मालवणला पोचव म्हणजे झाले. मालवणात जााईन, तुप रोटी खाईन,जाडजुड होईन......”
सुमी वैतागली, “आई, तुझ्या मांडीवरच सुरेशने प्राण सोडला, तो फणसावरून पडुन गेला,म्हणून तर तुझे डोके फिरले. या गोष्टीला आता रदोन वर्षे होऊन गली. तुझी कवने, उखाणे आणि पाचकळपणा बघितला की आम्हाला अगदी लाजिरवाणे होते , एकेकदा वाटते खरेच तुझे डोके फिरलेले आहे की तू आमच्यावर जाणूनबुजून कसला सूड उगवण्यासाठी ही नाटके करतेस.”
सुमीचे शब्द तापलेल्या षशिशासारखे चंद्रुआक्काच्या कानांत पडले आणि सगळे घर तिच्याभोवती गरागरा फिरायला लागले.“सुरेश गेला? माझ्या काळजाचा तुकडा गेला,” म्हणून ती धाय मोकलून रडायला लागली. आक्काचे खुळेचार, ती नानांचा करीत असलेलाउपमर्द आणि आत्ताचे तिचे अघोचारी रडणे यांमुळे वैतागलेली सुमी म्हणाली,“तरी लग्नाला जायला नाचत होतीस. तिथे मांडवात असे तमाशे करून लग्नात विघ्न घातले असतेस तर नानांना गळ्यात धोंडा बांधुन जीव द्यायला हवा होता. ” आता मात्र आक्काचा पण संयम सुटला, “नाना, मोठा आला गो तुझा नाना. एवढा पुळका आला तर मध घालून चाट त्याला. या तुझ्या नानाचे एक एक प्रताप सहन करीत उभा जन्म जिवंतपणी मरण जगल्ये गो मी सुम्ये!”
आक्का पुढे सांगायला लागली. “ लग्न होऊन महिनाभर नसेल झालेला.नमसवाडीतले झिलगे कलागत घेऊन तिन्हीसांजेला लक्ष्मी यायच्या वेळी घरात आले. शिदू भाटल्याच्या विधवा भावायीची कळ काढली म्हणून वाडीतल्या गड्यांसमक्ष ह्या ह्या ओटीवर त्याने तुझ्या नानाच्या तोंडात व्हाण मारलीन् नी वाडीतल्या पोरांनी चपलांची माळ त्याच्या गळ्यात घातलेनी .... खरं तर गावातुन त्याची धिंडच निघायची, पण मी आडवी गेल्ये, त्यांच्या हातापाया पडल्ये म्हणून पुढची नाचक्की टळली. केवढा रामाचा अवतार गो तुझा नाना ! ह्या प्रसंगामुळे तरी धडा शिकावा होता त्याने, पण नाही! रख्मी धनगरणीबरोबर मांगरात शेण खाताना मी त्याला पकडला आणि त्याच्याकडून गुरासारखा मार खाल्ला....हा मानेवरचा वळ बघ माझ्या आणि विचार तुझ्या नानाला ही गोष्ट खरी काय ! नरकडे ढोर बांधून घातले की जमते, पणशिंदळ झालेल्या माणसाला कसा आरेखणार? जत्रेत येणाऱ्या गोसावणी, त्यांच्याशी ह्याचे आंबटषोक पोटच्या गोळ्यांसाठी मी जिती होत्ये गो सुम्ये, आणि डोके तर माझे कधीच फिरलेले आहे. हातातोंडाशी आलेला पोर फणसावरून पडून गेला आणि मी अगदीच खुळाचार करायला लागल्ये इतकेच. माझे डोके फिरवून महालक्ष्मीन मेहेरबानीच केलीन् गो माझ्यावर. सुरेश मालवणात आहे या आशेवर मी आला दिवस ढकलीत ऱ्हायल्ये. आज तु मला शहाणी केलीस गो ,नाही म्हणायला बयोचा पाश होता. आता ती सुध्दा काळजी मिटली. मी सुखाने मरायला मोकळी झाल्ये. ”
तिरमिरीसरशी चंद्रुआक्का उठली. देवापुढे जाऊन पाट मांडला. बांगड्या,मंगळसुत्र काढून देवासमोर ठेवले. डोक्याचे कुंकू पुसले. सुमी हे बघून गडबडूनच गेली. “आईऽ आई... तू काय आरंभलेस हे?" पदराने डोळे पु शीत चंद्रुआक्का म्हणाली, "सुम्ये,अगदीच कशी गो तू खूळी? ज्याच्या नावाने हे.....हे सौभाग्य लेणे ल्यायचे तोच गेला.... अहेवपणी मरायचे भाग्यही माझ्या वाट्याला आले नाही. उभा जन्म मला छळायचे ते छळलेनच पण दावेदार जातानाही मला रंडकी करून गेला गो ऽऽ !”आणि चंद्रुआक्का गळा काढून रडायला लागली.
◙ ◙ ◙ ◙ ◙ ◙ ◙ ◙