कोकणी हिसका श्रीराम विनायक काळे द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कोकणी हिसका

कोकणी हिसका

कॅम्पस इंटर्व्यूसाठी जॉर्डन खुराना केटा सप्लायर्स कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर विनोद घंटांची ऑडी कॉलेजच्या मेनगेट समोर आली नी ड्रायव्हरने खिडकीतून डोकं बाहेर काढताच सिक्युरिटी गार्ड साळुंखे कडक सॅल्युट मारून पुढे जात, “लेफ्ट टर्न लेकर नीले रंगके बिल्डिंग की ओर जाओ’’ असे सांगून बाजुला झाला. सिक्युरिटी जवळ कसलेही सोपस्कार न होता ऑडी आत आली नी थेट अ‍ॅडमिनिस्ट्रेशन सेल कडे जाऊन थांबली तेंव्हाच जेकेके कंपनीचे मॅनेजिंग डिरेक्टर आल्याचं स्कॉलर्सनी ओळखलं. दहा वाजता इंटरव्ह्यू सुरू झाला.विक्रमचा तिसरा नंबर होता. डिरेक्टर घंटा नी त्यांच्या सोबत असलेल्या कुणी मॅडम दोघानीही प्रश्न विचारले. बहूतेक सग़ळे प्रश्न बीई च्या सिलॅबस मधिल टॉपिक्सवर आधारलेले होते.त्यांची बिनचूक उत्तरं त्याने दिली. फक्त दोनच प्रश्न ऑउट ऑफ सिलॅबस होते- हॉबीज कोणते आहेत? नी सॅलरी एक्स्पेक्टेशन्स किती?. विक्रम मध्यमवर्गीय कुटूंबातून आलेला. रात्री गप्पा मारताना बाबा त्याला म्हणाले होते की, सॅलरी एक्स्पेक्टेशन्स विचारलेनी तर सरळ सांग की, “आपल्या कंपनीचं रेप्युटेशन पाहता मला करियरची सुरुवात करायला मिळणं हेच मी भाग्य मानतो.” त्याचं हे उत्तर घंटा साहेबाना अपिल झालय् हे विक्रमने ओळखलं.
दोन वाजता रिझल्ट समजणार होता. इंटरव्ह्यू संपवून चारही कॅण्डीडेट कॅण्टिनमध्ये जमल्यावर जो तो मी अमूक हजार नी क्वार्टर्स पाहिजे म्हणून सांगितलं असं सांगू लागला. तन्वी वगळता त्यांचे आकडे चाळीस ते पन्नास या रेंज मधले होते. सगळ्यांचे आकडे ऐकल्यावर विक्रम म्हणाला कि, मी कंपनी देईल त्या सॅलरीवर काम करायला तयार आहे असं सांगितलं. त्यावर सगळ्यानीच त्याला वेड्यात काढलं. तेव्हा मात्र डोळे मिचकावीत तो म्हणाला, मी टेनिस चॅम्पियनआहे. मी चेंडू त्यांच्या कोर्टमध्ये टाकलाय. ऑफर चांगली असेल तर विचार केला नी नसेल तर काखा वर केल्या. तन्वीची डिमांड वीस हजार म्हणजे इतरांपेक्षा खूप कमी. आता रिझल्ट स्पष्ट होता. चान्सेस दोघानाच होते. हे सगळ ऐकल्यावर आस्मा नी रितेश यानी सरळ कबूल केलं की आपण विचारलेल्या प्रश्नांपैकी जेमतेम चार प्रश्नांची उत्तरं दिली, बाकी सरळ क्लीन बोल्ड. आस्मा रिझल्ट ऐकायलाही थांबली नाही.
दोन वाजता निकाल जाहीर झाला. विक्रम नी तन्वी दोघही सिलेक्ट झाली. कंपनीने दहा दिवसांचा पिरियड दिला असला तरी मुलं एव्हढी हौसावली होती की दोघही सहाव्या दिवशीच जॉईन झाली. पहिला पूर्ण दिवस रेकॉर्ड सबमिशन नी लिगल फॉर्मलिटिज पूर्ण करण्यातच संपला. त्यांच दैनंदिन दहा तासांच टाईट शेड्युल होतं. सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेतो ट्रेनिंग होत. यात 9 ते 4 पर्यंत एक तास लंचब्रेक वगळता कंपनीच्या वेगवेगळ्या सेल मध्ये जॉब असायचा. टाईम शेड्यूल शार्प असायचं नी अंमलबजावणी स्ट्रिक्ट असायची. चुकवाचुकवी टंगळ मंगळ अचूक पॉईंट आऊट केली जायची. अ‍ॅप्रेण्टिसशीप संपली त्याच्या दुस‌-याच दिवशी रवी खुरानानी आपल्या केबिनमध्ये बोलावून त्यांचं स्वागत केलं. विक्रमला बंगलोरला पोस्टिंग मिळालं. स्टार्टिग सॅलरी पन्नास हजार नी त्या बाहेर जवळ जवळ वीस हजार रुपये वेगवेगळे अलाऊन्सिस कंपनीने ऑफर केल्यामुळे खुशीचा माहोल होता. विक्रम बंगलोरला रूजु झाला. विक्रमला कंपनीच्या वेगवेगळ्या प्रॉडक्ट्स चं डिझायनिंग करायचा मेन जॉब होता. विक्रम च्या हाताखाली चार टेक्निशियन्स होते. विक्रमने दिलेल्या लेआऊट प्रमाणे फायनल डिझायनिंग करून कॉम्पुटर प्रोग्रामिंग टेक्निशियन्स करायचे. जॉबना टाईम लिमिट असायचं. कारण इथून पुढे प्रत्यक्ष प्रॉडक्शन सेलमध्ये नियोजीत टार्गेट एवढे जॉब तयार करून डिस्पॅच केले जायचे नी निर्धारित टाईम लिमिटमध्ये ऑर्डर पूर्ण केली जायची. यात विलंब झाला तर ऑर्डर कॅन्सल व्हायचा धोका होता. विक्रम हजर झाल्यावर त्याने पहिला ले आऊट प्रिपेअर केला. या पूर्वीचे रेफरन्सिस पाहून सहा दिवसांचं टाईमलिमिट घालून त्या ले आऊट प्रमाणे फायनल डिझायनिंग आणि प्रोग्रॅमिंग साठी जॉब टेक्निशियन्सकडे दिला.
चार दिवस झाल्यावर वर्क प्रोग्रेस पाहिला तर जेमतेम निम्मे वर्कसुद्धा झालेलं नव्हतं. त्याने चौघाही टेक्निशियन्सना चांगलं झापलं. टेक्निशियन्स पुरे पोचलेले होते. “सर, हा जॉब फार कॉम्प्लिकेटेड आहे. त्यामानाने फार कमी टाईम दिलात तुम्ही.” असं त्यानी सांगितल्यावर विक्रमने पूर्वीची वर्क हिस्ट्री दाखवली. ती काळजीपूर्वक पाहिल्यावर एकजण म्हणाला, “पण सर तुम्ही दिलेल्या ले आऊट मध्ये तीन प्रोसेस फार वेगळ्या नी आम्हाला नवीनच आहेत त्यामुळे तुम्ही दिलेल्या टाईम स्पॅनमध्ये प्रोग्रॅमिंग पूर्ण करणं नाही जमणार. यापुढे प्लीज आमच्याशी कन्सल्ट करून टाईम शेड्यूल ठरवा.” विक्रमला घाम फुटला. वर्क प्रोटोकॉल प्रमाणे सबमिशनसाठी फारतर दोन दिवस ग्रेस पिरियड मिळाला असता पण विक्रमच्या प्रॉम्प्टनेस पुढे कदाचित एक क्रॉस मार्क आला असता. आपला क्रू जाणिवपूर्वक आपल्याला खेळवतोय हे त्याने ओळखलं.
अ‍ॅप्रेण्टिसशीप करताना त्याने या सेल मधल्या टेक्निशियन्सचे उद्योग पाहिलेले होते. ती पोरं जॉब न करता गेम खेळत बसायची. एकदा त्याने विचारल्यावर त्यांच्यापैकी एकजण म्हणाला, “ सर, ही आमची वर्क पॉलिसी आहे. हा खरंतर एक दिवसाचा जॉब आहे पण आम्ही याच्या साठी सहा दिवसांचा कालावधि मागून घेतलाय.” त्यावर विक्रम अचंबित होऊन म्हणाला, “ हे सरळ सरळ चिटिग आहे.” त्यावर मिळालेलं उत्तर ऐकून तो उडालाच, “सर ,आम्हाला इंजिनिअर्स सारखं लठ्ठ पॅकेज मिळत नाही. खरं तर प्रोग्रमिंग हे हार्ट ऑफ वर्क आहे.मरणार आम्ही पण क्रेडिट अपर रॅन्क मधले एम्प्लॉयी घेणार.... एकदा हा जॉब कमी वेळेत करून दिला तर ती कायमची रीत होऊन बसेल नी कामाखाली मरायला होईल. म्हातारी मेल्याचं दु:ख नाही पण काळ सोकावता नये अशी आमची वर्क स्ट्रॅटेजी आहे. मालक मंडळीनी ह्या फर्म्स कामगाराना रोजी रोटी देण्यासाठी नव्हे तर कमीतकमी गुंतवणुकीत गबरगंड पैसा कमवण्यासाठी सुरू केल्यात.”
पूर्वानुभव आठवता शहानिशा करून घेण्यासाठी त्याने प्लान केला. ऑफिस बॉय सुजित ला बोलावून घेतलं. त्याच्यासमोर दोनशे रुपये टाकून तो बोलला, “हे बघ जितू, मी आल्यापासून तू माझी एव्हढी खातिरदारी करतोस ना कि मी एकदम खूश आहे गड्या तुझ्यावर..... माझं एक काम कर यार.....” यावर खुशीत येवून जितू म्हणाला, “सर, बोलाना,” मग विक्रम म्हणाला,“ अरे, मी या टेक्निशियन्सना जॉब दिलाय, आज चार दिवस झाले... पण अजून निम्मे काम पण झालेलं नाही ... ते टंगळ मंगळ करतायत ...” त्यावर त्याला थांबवीत जितू बोलला,“ सर, ते पाचही जण पूरे पोचलेले हायत... तुम्ही केबिनमध्ये असेपर्यंत काम केल्याचं नाटक करतात नी मग गेम खेळत बसतात... तुम्ही येताना दिसला की पटकन विंडो बंद करतात.....तुमचं काय काम आहे सर? ” त्यावर “ तू आत्ता बोललास ना? त्याच गोष्टीची मला खात्री करून घ्यायची होती. झालं माझं काम.” तेंव्हा दोनशे रुपये परत करीत जितू बोलला, “सर ,ठेवा पैसे, मला कधि गरज पडेल तेंव्हा मागून घेईन.” त्या दिवशी विक्रम मुद्दाम इतर सेक्शन्स मध्ये टाईमपास करत राहिला. लंच अवर पूर्वी केबिनकडे निघाला. त्याला कॉरिडॉर मधून येताना पाहताच एका टेक्निशियन ने बाजूच्याना कोपरखळी मारून सावध केलं त्यानी समोर निर्देश केला. त्यांच्या कृति साळसूद असल्यातरी चेहे-यावरचे भाव विक्रमने अचूक टिपले.
लंच अवरचा बझर झाला. पाचही टेक्निशियन्स लंच घ्यायला कॅंटिनकडे निघाले. तेंव्हा जितू येऊन म्हणाला, “साहेब तुम्ही बाहेर गेल्यापासून सगळेजन गेमा खेळत होते, तुमाला येताना बगितल्यावर त्यानी गेम बंद केले.” ते परत आल्यावर विक्रमने वर्क रिपोर्ट मागितला. त्याचा अंदाज नी जीतूने दिलेली टीप खरी होती.जॉब काडीभरही पुढे सरकलेला नव्हता. “दोघानी डिझायनिंगवर वर्क करा नी फायनलाईज केलेला एरिया बकिच्याना देऊन प्रोग्रॅमिंग सुरु कर. असं केलत तर एखादा दिवस जादा दिला तरी जॉब पुरा होईल.” त्याची ही सुचना पण त्यानी उडवून लावली.“ पण सर,डिझायनिंग़ मध्येच थोडासा जरी बदल झाला तरी सगळं प्रोग्रॅमिंग डिस्टर्ब होतं. प्लीज सर तुम्ही आमचं ऐका.... पाहिजे तर आमच्यापैकी कुणीतरी असोशिएट डायरेक्टरना भेटून टाईम शेड्युल वाढवून घेतो हवं तर, या पूर्वीही खुप वेळा टाईम शेड्यूल वाढवून दिलय जमखंडिकर साहेबानी......” आता मात्र विक्रमचा संयम तुटला . महद प्रयासाने आवाज न चढू देता तो म्हणाला,“टाईम शेड्यूल वाढवणं माझ्या अखत्यारित आहे,त्यासाठी साहेबांना भेटायची जरूरी नाही...एक्स्टेण्डेड टाईमस्पॅन मध्येही जॉब नाही पूर्ण झाला तर साहेबंचं अ‍ॅप्रूव्हल घ्यायला लागतं, नी तशी वेळ आली तर मी ते करीन त्या साठी तुम्ही सराना भेटायची जरूरी नाही.आता मी काय सांगतो ऐका, जॉब पूर्ण होईपर्यंत प्रत्येकाने आपपल्या कामाचा प्रोग्रेस रिपोर्ट ठेवा, मी मागेन तेंव्हा तो मला द्या.फायनल वर्क झालं कि रिपोर्ट करा.
काहीही झालं तरी टाईम शेड्यूल वाढवून न देता जॉब पूर्ण करायचाच या जिद्दिने तो कामाला लागला. प्रथम त्याने डिझायनिंग करायला घेतलं. हे काम म्हणजे त्याच्या हातचा मळ.... तीन तासात करेक्ट डिझाईन करून झालं. पुढचा प्रोग्रॅमिंग चा जॉब जरा किचकट , कंटाळवाणा नी वेळकाढू होता. ऑफिस अवर्स संपले नी एम्प्लॉईज बाहेर पडले. पाच मिनिटं वाट बघून जितू आला. “सर , तुम्ही थांबत असलात तर मी पण थांबतो...” त्याला जायला सांगून तो कॉफी मारून आला. अ‍ॅडमिनिस्ट्रेशन सेक्शन बंद झाला तरी वर्क सेक्टर तीन शिफ्ट्मध्ये सुरू असायचा. त्याने प्रोसिजर प्रमाणे आपण उशिरा पर्यंत थांबणार असल्याचा रिपोर्ट रिसेप्शन काऊंटरला केला.क्वार्टर्सवर न जाता कंपनीच्या गेस्टरूम मध्येच झोपायच असं त्याने ठरवलं. जेवायलाही न जाता जॉब प्रोग्रॅमिंग पुर्ण झालं तेंव्हा पहाटेचे तीन वाजलेले होते .
सकाळी दहाला जाग आली. उठून आंघोळ उरकून तो कॅटिन मध्ये गेला. गरमागरम साबू वडा नी कॉफी घेऊन शार्प टायमिंगला केबिन मध्ये शिरला. पुढच्या दोन तासात प्रोग्रॅमिंग कंप्लिट करून जॉब हातावेगळा केला. मग जॉब हिस्टरी डेटा नी डिझायनिंगसह प्रोग्रॅम पेन ड्राइव्ह वर कॉपी करून तो जमखंडिकर साहेबांच्या केबिन मध्ये शिरला. जॉब ले आऊट टेक्निशियन्सकडे दिल्यापासून तो आपण तो जॉब कसा पूर्ण केला याचं रिपोर्टिंग करून सगळा एविडन्स पेन ड्राईव्हमधून आणला असल्याचं सांगितलं. मग पेन ड्राईव्ह त्यांच्या लॅपटॉपला जोडून दोन्ही फोल्डर कॉपी करून सरांच्या डेस्कटॉपवर पेस्ट केले. सरानी अर्धा तास ओव्हर ऑल चेक करून आपल्या रेकमेंडेशन रिमार्क सह जॉब डिझाईन वर्क सेक्टरकडे फॉरवर्ड केलं. मग कॉफी ची ऑर्डर देऊन ते बोलू लागले. “ यू सी माय यंग चॅप, इथे तू नवीनच आहेस. टेक्निशियन्स कंपनीचे पर्मनंट एम्प्लॉयी आहेत. तुझ्याकडे स्ट्रॉंग एव्हिडन्स ही आहे. पण तरीही त्यांची कान उघाडणी करणं या पलिकडे काही अ‍ॅक्शन घेणं कठिण आहे. त्याना वॉर्निंग दिली तर ते राजरोसपणे तुझ्याशी असहकार करतील. या वेळी तू जिद्दिने जॉब पूर्ण करून दाखवलास ही रिमार्केबल फॅक्ट आहे. पण प्रत्येक वेळी तुला हे जमायच नाही. यू रिलाय ऑन देम. हे टीम वर्क आहे. ज्याला जे जसं जमेल तसं तो करणार....एकाद्याची एफिशियन्सी सराव , ट्रेनिंग देवून वाढवता येते. पण ठरवून वेळकाढूपणा करणाराला सुढारता येत नाही. डोण्ट गेट नर्वस माय यंग बॉय ...... झोपेचं सोंग घेणाराला उठवता येत नाही. या सिच्युएशन्स मीही फेस केल्यात. आय कमिट माय डिफीट अ‍ॅण्ड सरेंडर मायसेल्फ. ” यातलं गांभिर्य लक्षॎत येऊन विक्रम भलताच डिस्टर्ब झाला.“ आय अ‍ॅम सॉरी सर....! फॉर टाईम बीईंग वी कॅन नायदर चेंज नॉर कंट्रोल द सिच्युएशन ..... पण माझा तसा प्रयत्न मात्र नक्की राहील. निदान काम न करता गेम खेळणं बंद कसं करायचं यावर तरी मी काही ना काही सोल्युशन नक्की शोधेन.... आय टेक इट् अ‍ॅज अ चॅलेंज” मग हसत हसत साहेब म्हणाले, “हे बघ, अशा रॉट्न गोष्टी विसरण्यातच शहाणपण आहे. असं काही सोल्युशन शोधलसच तर मात्र ते ट्राय आऊट करण्यापूर्वी माझा सल्ला घ्यायला मात्र विसरू नको.”
विक्रम वर्क रिपोर्ट विचारील असं टेक्निशियन्सना वाटल होतं पण दोन दिवस झाले तरी त्याने त्यांच्याकडे ढुंकूनही लक्ष दिलं नाही तेंव्हा मात्र ते लोक जरा सिरियस झाले. तरीही त्यानी सांगितल्या प्रमाणे चार दिवस गेल्यानंतरच त्यानी जॉब पूर्ण करून सबमिट केला. मात्र रोजचे प्रोग्रेस रिपोर्ट दिलेले नव्हते. दहा मिनिटानीच विक्रमने सगळ्यानाही बोलावून चार दिवसांचे प्रोग्रेस रिपोर्ट मागितले. त्यानी फक्त पहिल्या दिवशी प्रोग्रेस रिपोर्ट ठेवले होते. एकजण निगरगट्टपणे म्हणाला, “पण सर .... आम्ही जॉब तर पूर्ण करून दिलाय ....मग आता प्रोग्रेस रिपोर्ट काय करायचेत?” विक्रम जरबेच्या स्वरात म्हणाला “ हे तुम्ही ठरवणार की मी? मला पाच मिनिटात रिपोर्टस पाहिजेत....” तरीही एकजण धीर करीत बोलला, “ पण सर आधी प्रोग्रॅमिंग व्हेरिफाय करून सबमिट करायला पाहिजे ना? आधी ते काम करूया.....” जरा पॉज घेऊन विक्रम म्हणाला, ‘‘मित्रानो जॉब चार दिवसांपूर्वीच सबमिट झालाय, तिकडे प्रॉडक्शन सेल मध्ये जॉब बनायला लागलेत.....’’ त्यानी थक्क होऊन म्हटलं,“कसं काय शक्य आहे हे ? नी प्रोग्रॅमिंग कुणी कधि केलं?” हसत हसत विक्रम उत्तरला, “तीन दिवसात पाच टेक्निशियन्सना फिफ्टी पर्सेंट जॉब ही पूर्ण करणं जमलं नाही आहे हे जसं शक्य आहे तसंच एका बी ई झालेल्या सीडॉक केलेल्या इंजिनिअरला चौदा तास कंटिन्यू बसल्यावर एकट्याने तो जॉब डिझाईन करून प्रोग्रॅमिंग करणं कां शक्य असू नये? आणि हो हे काम एका भुताने केलय...”
मग करारी आवाजात तो म्हणाला, “आधी प्रोग्रेस रिपोर्ट सबमिट करा नाहीतर इंस्ट्रक्शन फॉलो केल्या नाहीत म्हणून मला तुम्हाला शो कॉज द्यावी लागेल.” मग मात्र आपण फक्त एकच दिवस रिपोर्ट ठेवले .... नंतर विसरलो ..... असं पाचही जणानी मान्य केलं. त्यावर, ‘‘ठीक आहे , पण आज पासून लंच ब्रेक पूर्वी अन् नंतर ऑफिस अवर्स संपे पर्यंत दोन वेळचे प्रोग्रेस रिपोर्टस् ठेवायला सुरुवात करा.”असं बोलून त्याने विषयाला पूर्ण विराम दिला. एवढ्यातच इंटरकॉमचा बझर वाजला. “ सर, युवर अंकल फ़्रॉम देवगड हॅज कम .... शॅल आइ ब्रिंग हिम टू यू ?” त्यावर “येस येस इट्स् माय प्लेझर”..... विक्रम आश्चर्याने थक्क झाला होता. काहीही पूर्व सुचना न देता दत्ताकाका अकस्मात कसे काय आले? असा विचार तो करीत असता रिसेप्शनिस्ट रूबी स्वत: काकाना घेऊन आली. त्याने काही विचारण्यापूर्वी दत्तकाका म्हणाले, ‘‘ अरे दोन दिवस चिक मंगळूरला युनियनचं अधिवेशन होतं, आम्ही दोन्ही जिल्ह्यातले मिळून अठरा लोक वीस सीटर करून आलो. येतानाच तुझ्याकडे दोन दिवस तळ ठोकायचा असं ठरवलेलं होतं.......हल्ली तुम्ही मुलं म्हणता ना तसं सरप्राईझ देऊया म्हटलं तुला....”
त्याने काकाला सगळ्या सेक्शन्समध्ये फिरवून आणलं. वर्कशॉपमध्ये कॉम्प्युटराईज्ड प्रोग्रॅमिंग प्रमाणे जॉब करणारी आटोमॅटिक मशिन्स चं काम कसं चालतं हे त्याने समजावून सांगितल्यावर काका भलतेच एक्झाईट झाले. “अरे बाबौ.... हे म्हणजे अतर्क्यच आहे बाबा...” विक्रम म्हणाला “काका, या जॉबचं डिझाईन आणि प्रोग्रॅम मी केलाय.” असं म्हणत मशिन जवळच्या ट्रे मध्ये असलेली ड्रॉईंगची ब्लु प्रिंट त्याने. काकाला दाखवली. काका हायस्कूलला मुख्याध्यापक नी डबल पोस्ट ग्रॅज्युएट होते. सेंट्रल गव्हर्नमेंट्च्या स्कीम खाली हायस्कूल्स मध्ये कॉम्पुटर लॅब सुरु झाल्यावर ते कॉम्पुटर वापरायला शिकले, एम.एस.सी.आय.टी. हा बेसिक कोर्स सुद्धा केला. मुलांसाठी घरात डेस्क टॉप आणला. आता तर त्यानी स्वत:साठी लॅपटॉप घेतला होता. त्याच्या पाठीवर कौतुकाने थाप मारली. “हे म्हणजे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली ना तसंच म्हणायला हवं. हा कसला पार्ट आहे त्याचं त्रिमितीय ड्रॉईंग आहे. याला तरल कल्पनाशक्ति हवी नी मुख्य म्हणजे या सगळ्या मापांमध्ये अगदी डेसिमल पॉईंटमध्ये झालेली चूकही क्षम्य नाही. ह्या ब्लू प्रिंटप्रमाणे पार्ट बनवणारं हे मशिन हे ही अचंबित करणारं....” थोडा पॉज घेऊन ते पुढे म्हणाले,“ पण काय रे .... ड्रिलिंग कटिंग करणारे पान्हे, पाती यांची धार अधे मधे कधीही बोथट झाली तर..... ते आगाऊ कळतं का? नायतर सगळ्या कामाचा सत्त्यानास....”
आपला काका म्हणजे अद्भूत असामी आहे याची प्रचिती त्याला आली.“काका यू आर ग्रेट...टूल्स जराही बोथट झाली तरी लगेच अलर्ट मिळतो नी सिस्टीम पॉज घेते. मग दार उघडून ते टूल रिप्लेस करायचं.त्यासाठी प्रत्येक सिस्टिम समोर ट्रेंड लेबर असतात. या मी प्रोग्रॅम केलेल्या जॉब बद्दल आणखीही गंमतीशीर किस्सा आहे, तो लंच घेताना सांगतो...” सगळे सेक्शन फिरून झाल्यावर त्याने लगेच कँटिन गाठलं. जेवताना त्याने टेक्निशियन्स सोबत कसा खटका उडाला तो किस्सा साहेबांशी झालेल्या चर्चेसह इत्थंभूत सांगितला.‘‘अरे बाबौऽ ऽ ’’ दीर्घ सुस्कारा सोडीत काका म्हणाले. “तुझे साहेब म्हणाले ते अगदी त्रिकालाबाधित सत्य आहे. असंतुष्टता नी अप्रामाणिकपणा यातून निर्माण झालेली विकृती कोणालाही थोपवता येत नाही. आढीत एक आंबा कुजला की आजूबाजूचे आंबेही कुजू लागतात. आढीतला कुजका आंबा निदान वेळीच काढून टाकता येतो. इथे सगळेच आंबे सडलेले आहेत. बरं कायदे नियम तरी किती कसे करणार? त्यानाही पळवाटा असतातच ना? अधिकारी नियमावर बोट ठेवायला लागला की काम करणारा टोपल्या टाकायला लागतो.” जेवण उरकून लंच ब्रेक होण्याच्या सुमारास काकाना घेऊन विक्रम कॅन्टिन बाहेर पडला. लंच अवरमध्ये असो. डायरेक्टरना भेटून हाफ डे लिव्ह घेवून काकाला घेवून विक्रम क्वार्टर वर गेला. चार वाजेतो आराम करूनते नॅशनल पार्क पहायला गेले. रात्री जेवण झाल्यावर दत्ताकाका म्हणाले, “हे बघ विक्या... अरे कॉम्पुटरवर आपण केलेल्या कामाच्या फाईल्स शिल्लक राहतात ना रे? ती पोरं ती गेम खेळतात त्याचा संदर्भ..... डाटा..... तो मिळेल ना रे ? ” काकाला काय म्हणायचं आहे ते त्याने ओळखलं “ नाही काका , पुरावा म्हणून वापरता येईल असा डेटा नाही मिळत. तू हा विषय अगदी पक्का डोक्यात ठेवलास की काका. ” किंचीत विचार करीत टाळी वाजवून काका म्हणाले “अस्सं... प्राणांतिक कळ जावी असा वर्मी फटका तर बसेल पण वळ उठणार नाही नी रक्त फुटणार नाही असा उपाय सांगतो.”
“तुला कोकणातली एक म्हण माहिती असेल,वाकड्या खुंटाला वाकडा खड्डा काढावा. त्यांची तिरकी चाल बिनबोलत सुधारेल असा कोकणी हिसका सुचवतो मी तुला. तू एकच कर. आत्ता ते दाराकडे तोंडं करून बसतात त्यामुळे ते काम करतायत की गेम खेळतायत हे समजत नाही. त्यांची बसण्याची व्यवस्था फिरव.... बसणारांची तोंडं उलटी फिरवायची. म्हणजे कॉम्पुटरचे स्क्रीन जाणा-या येणा‌-यालाही सहज दिसायला हवेत. आत्ता ते अगोदर सावध होतात ... पण उलटे बसल्यावर मात्र काम न करता गेम खेळायची हिम्मत तरी कोण करणार नाही. काही बनेल आहेत ते काम करताना मुद्दाम पुन्हा पुन्हा चुका करून वेळ काढूपणा करतीलही.... त्याना दहा बारा दिवस सक्तीने ट्रेनिंगला काढायचे नी तिथे कोण इंट्रक्टर असेल त्याला कान पिचकी देऊन काम चोराना ते कंटाळेपर्यंत चक्की पिसायला लावायची. त्यांचं काम सुरू असताना लक्ष ठेऊन जे चूक करतील त्याना तिथल्या तिथे दुरुस्ती सुचवून कामाचा उरका वाढवता येईल.”
दोन दिवस उटी म्हैसूर पासून फिरून दत्ताकाका गावी गेले. त्यानी सुचवलेला उपाय एवढा नामी होता की, तो अ‍ॅडमिनीस्ट्रेटिव्ह लेव्हल वर अ‍ॅप्रिशिएट झाला असता नी त्याचं श्रेय भलताच कोणी घेऊन गेला असता. म्हणून विक्रम योग्य संधीची वाट पहात राहिला. महिना अखेर रूटिन प्रमाणे स्टाफ मीटिंग लागली . अजेंड्यावरचे मुद्दे संपल्यावर मॅनेजिंग डायरेक्टर साहेबांची परवानगी घेऊन त्याने टेक्निशियन्सचा आपला अनुभव थोडक्यात सांगितला नी हा प्रॉब्लेम मिटवायचा हुकुमी उपाय म्हणजे त्यांची सिटिंग अ‍ॅरेजमेंट उलटी फिरवायचा तोडगा सुचवला. त्याचं बोलणं पूर्ण झाल्यावर क्षणभर सन्नाटा पसरला. मॅनेजिंग डायरेक्टरनी उभं राहून जोर जोरात टाळ्या वाजवायला सुरुवात केल्यावर सगळेच उभे राहिले नी टाळ्यांचा कडकडाट झाला. हात ऊंचावून सर्वाना बसायची खूण करून साहेब बोलू लागले, “ आय अ‍ॅम प्राऊड ऑफ माय यंग प्रॉमिसिंग कलिग मिस्टर विक्रम. हिज सजेशन इज सुपर्स्टिशस नो डाउट ..... आय हॅव फेस्ड द सेम प्रोब्लेम .... बट इ डिडण्ट गॉट एनि सोलुशन. वी सिनिअर मेंबर्स वील थरली डिस्कस ऑन द मॅटर अ‍ॅण्ड मेक अ वर्क आउट प्लॅन. बट नन विल डिस्क्लोज द नेम ऑफ मास्टर माईंड. ऑल आर अल्सो वॉर्न्ड नॉट टू स्पिक अ सिंगलवर्ड अबौट चेंज इन सिटिंग अ‍ॅरेंजमेंट अ‍ॅण्ड द पर्पज बिहाईंड इट अ‍ॅज इट इझ अ पॉलिसी मॅटर. माय यंग चॅप युवर सजेशन इज अ‍ॅप्रिशिएटेड अ‍ॅन्ड विल बी रिवार्डेड इन टर्न ऑफ थ्री इनक्रिमेंटस ! ”
आठवडाभराने डायरेक्टरने नोटिस काढून ऑफिसच्या इंटिरिअर डेकोरेशन आणि रिनोव्हेशन साठी चार दिवसांची सुटी डिक्लेअ‍र केली. चार दिवस मस्त एंजॉय करून सगळे कामावर रुजु झाले. कॅरिडॉर मध्ये रंगरंगोटी केलेली दिसली. केबिनच्या काचा बदलून तळाकडे दोन फुट उंचीपर्यंत गॉगल ग्लास बसवलेल्या होत्या. आतली टेक्निशियन्स ची सिटिंग अ‍ॅरेंजमेंट फिरवलेली होती. हा बदल बघितल्यावर त्यातले धोके ओळखून एकजण म्हणाला, “आता स्क्रीनवर रिफ्लेक्शन येऊन डोळ्याना त्रास होणार..... हे सगळं उलटं झालं आता. तुम्ही कुठच्या ही ऑफिसमध्ये जाऊन पहा काम करणा-याचं तोंड एंट्रन्सकडे असतं. ” त्यांची चरफड बघून विक्रम मनातल्या मनात हसत होता. टेक्निशियन्स आसनस्थ झाले अन त्या नी विण्डो ओपेन केल्या. विक्रम ने पुढे जाऊन निरीक्षण केलं, खिडकीच्या तावदानाला तळी गॉगल ग्लास बसवल्यामूळे कॉम्प्युटर डिस्प्लेवर रिफ्लॅक्शन येत नव्हतं. “तुमच्या एका शंकेचं निराकरण झालं ना मित्रानो ? डिस्प्लेवर रिफ्लॅक्शन येत नाहिये ... इंटिरियर डेकोरेटर्स हुषार असतात नी त्यापेक्षाही कंपनीच्या अ‍ॅडमिनिस्ट्रेटर्सनाही फोरसाईट असते. आता एक बरं झालं तुमचं वर्क सुरु असताना मला लक्ष ठेवता येईल नी एखादी स्टेप चुकली तर तिथल्या तिथे करेक्शन देता येईल.”
मग त्याने काकाना फोन लावला, “काका, मी ऑफिस मधून बोलतोय् तुम्ही सांगितल्या प्रमाणे कोकणी हिसका दाखवला नी तो चांगला लागूही पडला. ऑफिसमधली बैठक व्यवस्था बदलली. आता कॉम्प्युटरवर काय काम चाललय ते सहज बघता येतं. कामचोरांची नुसती चरफड चरफड सुरू आहे. सविस्तर संध्याकाळी सांगतो. ”
* * * * * * * * *