कर्माच्यो गती श्रीराम विनायक काळे द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कर्माच्यो गती

कर्माच्यो गती
दर तीन वर्षाआड होणारी पाटणे वाडीतली सार्वजनीक सत्यनारायणाची पूजा म्हणजे पंचक्रोशीसाठी कौतुकाची बाब. आम्हा पोराना ते आनंदपर्वच! आमच्या घरापासून हाकेच्या अंतरावर पाटणेवाडी सुरु व्हायची.आमची घरं भुरडी लगत सखलवटात. आमच्या घरामागे उंचच उंच डेग सुरु व्हायची. अगदी ताकदवान बापया सुद्धा मागिलदारच्या अंगणा पासून तो डेग संपून सपाटी सुरू हो ई पर्यंतचा अजमासे दोनशे वाव लांबीचा टेणा जराही न थांबता किंवा वेग कमी न करता धावत पार करू शकणार नाही एवढा जीवघेणा.पावसाळी व्हावटीमुळे माती धुपून रेवा सकेर वर साठलेली , त्यावरून जपून चालावे लागे. चढण तर अशी जीव घेणी की अर्ध्या टेण्यावर पोचला की माणूस पेटीच्या भात्यासारखा श्वास घ्यायला लागे. सपाटी गाठल्यावर पन्नासेक ढेंगांच्या अंतरावर दोन फाटे फुटायचे .डावी कडची वाट गावात चव्हाट्या कडे जायची नी उजवी कडची वाट पाटणे वाडीत.
वाडीच्या तोंडाशी पहिलंच घर काश्टीवाल्या भिक्याचं. वाडीत भिकाजी नावाचे चार इसम..... चौघांची स्वतंत्र ओळख पटवण्यासाठी लोक त्याना काश्टीवाला भिक्या, धोतीरवाला भिक्या, पानवाला भिक्या नी टकलू भिक्या या नावानी संबोधित. वाडीत जवळ जवळ ऐंशी उंबरा. वाडीच्या मध्यापासून ते खाली पार भुरडी पर्यंत दुतर्फा आगरवट भागात पानाची बीयं असायची. तिथेच वाटेच्या खालच्या अंगाला वाडीतला एकमेव पाणवठा. बावीस हात खोल, गोल आड. आडाचा घेर ही खूप मोठा, म्हणून छताडभर उंच घडीव चि-याचा कठडा बांधलेला . उन्हाळ्यात सुद्धा आडाला दीड पुरुष पाणी असायचं. वाडीतला घरवंदांचा भाग मळेवटी पासून माडभर उंचावर, पाण्याच्या दृष्टीने ओसाड.
पाटणे हे काय आमच्या गावातले मूळ रहिवाशी नव्हते. त्यांचा मूळ गाव तिकडे लांब वलाटीत. अंतर्गत कलहातून एका पाटण्याची पुरी घरवडच भाऊबंदानी गावातून अक्षरश: पिटाळून लावली. दोन कर्ते पुरुष त्यांच्या बायका नी पोरं नेसत्या वस्त्रांनिशी गडाच्या दिशेने चालत राहिले. दोन दिवसानंतर त्यांचा मुक्काम आमच्या पाणखोलात पडला. आमच्या गावचे अण्णा खोत दयाळू.... त्यानी पाटणे कुटुंबाला आसरा दिला. त्यानी वीस एकराचं ओसाड पडण त्याना कायम स्वरूपी बक्षिस पत्राने दिल. आरंभ काळात पाटणे आजूबाजूच्या विहिरी वरून पाणी न्यायचे.घरवडी वाढत चालल्या तसे कोणी कोणी भुरडी नजिकची आगरं खरेदी केली. कोणी कोणी आमची नी बर्व्यांची आगरं खंडाने अर्धेलीने घेऊन पानमळे लावले. पण पिण्याच्या पाण्याची जिकिर कधिच सुटली नाही.
कोण कोण पाणके बोलावून पाचसहा ठिकाणी विहिरी खणुन झाल्या पण कुठेच पाणी लागले नाही, त्या काळी वाडीत तिघा चौघांच्या सारवट गाद्या होत्या. ते फोण्डा बाजारात खायची पानं विकायला नेत नी परतीच्या खेपी गावातल्या नी आजुबाजुच्या गावातल्या दुकानदारांचा किराणा आणून द्यायचे.फोंडा बाजारात गडमठातल्या बाबू देवधराचा मोठा बोलबाला. त्याला कर्णपिशाच्च वश आहे .... तो म्हणेल ते खरे होते अशी त्याची ख्याती. एकदा बाजराला जाणा-या विठू. सख्या नी बच्चू तिघानीही ठरवून गडमठात जाऊन त्याची भेट घेतली. सव्वारुपया दक्षिणा ठेवून विठू म्हणाला, “ बाबू नानानू आमच्यो चार पिडयो पाणखोलात ग्येल्यो पन आमचे पान्याचे वनवास काय कमी होयत् नाय...... तुम्ही आमका वाडीत पानी आखून द्येवा... पंचवीस नारळ नी सवा पंचवीस रुपाये तुमच्या थळावर आनून भक्षिस करीन.”
बाबू देवधराने विठू पाटण्याचं आव्हान स्वीकारलं..... “तुमच्या भागात जित्या पान्याचो झरो काय दिसत नाय .... पन माजी इद्या इरेक टाकून मी तुमका पानी काडून द्येयन्.... माजो चेडो मी कायमचो थंय ठेवीन... दर गटारी अमवाशेक तीन कोंबडे द्येवन तेचा देना फेडूक लागात... तां चुकलां तर दुसरे दिवशी पन्याचो ठेंब नदरे पडणार नाय.” बाबू ने आखून दिल्या जागी टोलेजंग आडाचे खोदकाम सुरु झाले. पुरी वाडी कामाला लागली. दीड महिन्याच्या अविश्रांत मेहेनतीनंतर वाडीचा पान्याचा प्रश्न कायमचा सुटला. पाटण्यानी बाबू देवधराला वाजत गाजत आणून मानाचा फेटा नी बोलल्या प्रमाणे दक्षिणा देवून त्याची संभावना केली. गाव जेवणावळ घातली. नी तेंव्हा पासून दर वर्षी गटारी अमावास्येला चेड्याचं देणं भागवून खा-या नैवेद्याच वाड भोजनही व्हायचं नी दर दोन वर्षाआड सत्यनारायणाची महापूजा घालायची प्रथा सुरु झाली.
वाडीतला घर ठेप एक तरी बापया मुंबईत नोकरीला. सार्वजनीक पुजा हा पाटण्यांचा जसा मानबिंदू! दोन वर्षाआड पूजेसाठी झाडून सगळे मुंबयकरी बायकापोरांसह गावी यायचे. हात सोडून खर्च व्हायचा. दर डोईपट्टी ठरलेली नसायची.कार्यक्रमाची आखणी वाड प्रमूख नी वाडीतले बापये मिळून करीत. पूजेपूर्वी चार दिवस घरठेप स्वेच्छा वर्गणी प्रमुखाकडे जमा होई.पूजा झाल्यावर दुस-या दिवशी दुपारी जमाखर्च सांगिताला जाई. सहसा तूट येतच नसे.... पण आलीच तर जमलेली मंडळी खिशात हातघालून पैसे काढून देत नी तूट भरून रक्कम शिल्लक उरत असे.
पूजेच्या रात्री आसमंतातल्या नामांकित भजनी बुवाना चढ्यादराने सुपा-या देवून भजनाचा झगडा असायचा.आजुबाजुच्या पाच गावातली मंडळी रात्री तीर्थ प्रसादाला नी भजन ऐकायला जमायची. मुख्य भजनं रात्री उशिरा सुरु होत . तत्पूर्वी संध्याकाळची आरत झाल्यावर वाडीतली मंडळी एक बारी करीत. वाडीच भजन मंडळ असं नव्हतं पण कोणीतरी बरा गाणारा बुवा होई. रात्रीच्या भजनासाठी बोलावलेल्या बुवांपैकी कुणाचं तरी सामानमंडपात आलेलं असायच, तेच पेटी, मृदुंग, टाळ वगैरे वापरला जाई. एका वर्षी गावातल्या पाण्डु बुवाचा मेव्हणा कुणकेश्वरचाजोईल बुवा, त्याला सुपारी दिलेली होती.त्याने इतक्या लांबून पेटी , तबला, टाळ वगैरे सामान न आणता भावोजीच सामान वापरायचं ठरवलं. त्यामुळे पाण्डु बुवाने पुजेच्या ठिकाणी पेटी, मृदुंग, टाळ आणून पहिला नंबर धरून ठेवला.
संध्याकाळची आरत झाली नी पाटणे मंडळीच भजन सुरु झाल. एक दोन अभंग झाले नी सखाराम बुवाने भारूड सुरु केलं. आपल साहित्य वापरून पाटण्यानी भजन सुरु केलं हे कळल्यावर पांडुबुवाचा पारा चढला. पाटण्यांचा सभागतीअपमान करायचं योजून पांडु मास्तर तावातावाने पुढे गेला नी, “ भजन बंद करा.... कोणाच्या हुकुमाने दुस-याचा सामान वापरताहास? साले उपरे येवन् शिरजोर झाले.... आपल्या मालकीचा सामायन घ्येवची कुवत नाय नी चल्ले भजनां करूक .....” एकदम रंगाचा बेरंग झाला... जाणती बापये मंडळी पुढे होऊन हाती पायी पडू लाग़ली ..... तशी पांडुबुवाला अधिकच जोर चढला..... त्याने पाटण्यांची आई माई उद्धरायला सुरुवात केली..... पाटण्यांमधले जाणते सोनशेट , गोपाळ शेट नी आबा यानी काहीतरी मसलत केली नी ते पुढे सरले ..... शिव्या देणाऱ्या पाण्डुची गचांडी धरून त्याला बाजूला खेचून आडवा घातला. त्याच्या धोतराचा सोगा घेवून त्याचे हातपाय मागच्या बाजुला बांधून त्याच्या डोक्यावरची टोपी तोंडात कोंबून त्याचे तोंड बंद केले. आबा म्हणाला “ तू कोण नी काय आता ह्या काळोकात काय आमी वळकीत नाय..... उद्या उजवाडलां की मगे तुका वळकू नी तुजा काय म्हन्ना हां तां दुकु आयकू...” समोरच्या पोराना बोलावून सोनशेट त्यांच्या कानात बोलला, “ ह्येका न्हेवन् काष्टीवाल्या भाग्याच्या गोठ्यात टाका. ” मग भजन कऱ्यांकडे वळून तो म्हणाला , “तुमी करा भजन.....”
त्या वर्षी पूजेला तर एकदम अजाब ..... पुजे पूर्वी दोन दिवस मांडाजवळून टर्र टर्र टर्र आवाज यायला लागला म्हणूनआम्ही पोरं बघायला धावलो. पेट्रोलवर चालणारे जनरेटर होते ते. वाडीत येणाऱ्या रस्त्यापासून ते पूजेच्या मांडापर्यंत बल्बनी ट्यूब लाईट ची रोषणाई पहायला सगळा गाव जमलेला. आम्ही स्प्रिंग फिरवून चालणारे घरगुती ग्रामोफोन बघितलेले ..... इथे त्याची सुधारित आवृत्ती दिसली. मांडावर वाजवलेली गाणी आमच्या घरातही स्पष्ट ऐकू आली. हम है राजकुमार, कलियोंने घुंघट खोले, मेरा नाम चिन चिन चू . मेरी दोस्ती मेरा प्यार, अशी तेंव्हा गाजणारी हिंदी गाणी प्रथमच ऐकायला मिळाली. तसंच हिंदी गाण्यांच्या कालींवर बांधलेली कलियुगाचा आला फेरा बायको पुढती झुकतो नवरा (हँसता हुवा नूरानी चेहेरा च्या चालीवर) नी ‘आजची ताजीखबर ..... ओ मामा थांबा जरा ओ मामा ऐका जरा’ , ‘मी मर्द गडी बैलांची जोडी खिल्लारी’ असली मराठी गाणी दोन दिवस कान किटवीत राहिलेली .
तेंव्हा दोन दिवस दोन कार्यक्रम ठेवलेले.... पहिल्या दिवशी भजनं नी दुसऱ्या दिवशी स्टेजवर नाच गाण्यांचा कार्यक्रम. रेकॉर्ड प्लेअर वर गाणी वाजवून नाचाचे कार्यक्रम झाले. (तेंव्हा रेकॉर्ड डान्स हा प्रकार आम्ही प्रथमच पाहिला.) वाडीतली मुलं मुली यानी एकत्र नृत्य करण्याचा तो काळ नव्हता. त्या साठी मुंबई वरून मुलामुलींचा ताफा आणलेला होता. तशी वाडीतल्या चार दोन मुलानी मात्र त्या ताफ्यात नाचकाम केलेनी. पण वाडीतली एकही मुलगी सहभागी झालेली नव्हती. मुलींच्या ताफ्याची मालकीण कुणी पापादेवी नायडू नावाची अर्ध्या वयाची बाई ....गळ्यात सोन्याचे लफ्फेदार हार नी दुपदरी गोफ , हातात चार चार बांगड्या पाटल्या, दोन्ही हातांच्या बोटात तीन तीन आंगठ्या अशी सोन्याने मढलेली.... भारी भारी साड्या नी चमकदार तोकड्या पाठीची पोलकी घालून ओठ रंगवून असायची. ती मात्र वाडीतले बापये, मुंबई वाली पोरं यांच्याशी सलगी करायची. उडदळीत परम्या गावड्याचा हातभट्टीचा धंदा चालायचा.तिथे एकवशी कोपरा गाठून बसून दारुडे गावठी दारू प्यायचे. तिथेच उडदळित दारुड्या बापया/पोरां बरोबर बसून बसून पापादेवी सिगारेटी ओढते, इंग्लिश दारू पिते, तिला दुवक्त मासे मटण लागतं ह्या असल्या बातम्या वाडीतले शाळा सोबती मोठ्या फुशारकिने रंगवून रंगवून सांगायचे.
टसत्यनारायणाच्या पुजेला वाडीतल्या नवीन लग्न झालेल्या जोडप्याला बसवायची प्रथा असायची. त्या वर्षी पूजेपूर्वी चार दिवस गोंद्याच्या मुलाचे लग्न ठरलेले... पण दुर्देव आड आले... .. लग्ना दिवशीच नवरीची अडचण आल्यामुळे लग्न रद्द झाले.म्हणून सार्वजनिक पूजा झाल्यावर तिसऱ्या दिवशी लग्नाचा बेत धरला. कार्यक्रम उरकून आलेला ताफा नी वाडीतली बरिचशी मंडळी कार्यक्रम उरकल्यावर दुराऱ्या दिवशीच मुंबईला रवाना झाली . पापादेवीला गाव आवडलेला नी वाडीतल्या जाणत्यानी तिला लग्नसोहोळा पाहायला आग्रहकरून थांबवून घेतलेनी. लग्नाचा दिवस उजाडला. वरपिता गोंद्या, वरमाय काशी नी नवरदेव जगु पुण्याहवाचनाला बसले. त्या वेळी वाड प्रमुख भलाजी पाटणे नी धोतीरवाला भाग्या पापादेवी जवळ जावून अजिजीच्या सुरात म्हणाले, “म्हंजे तुमी नाय म्हटलास ... तरी आमका राग नाय .... पन पुण्यावाचन म्हंजे द्येवाचा कार्य.... वर मायका कार्या पुरतो तुमचो हार द्येवा घालुक नि न्हवरदेवाक गोफ नी याक आंगटी द्येवा.... कारेक्रम झालो की आपली डाग ताब्यात घ्येवा..... ” पापादेवीने क्षणभरही विलंब न लावता डाग काढून दिले. पुण्यावाचन उरकून वऱ्हाड बाहेर पडण्यापूर्वी दोघही दागिने काढून पापादेवीकडे देवू लागली तशी पापादेवी म्हणाली, “अरी रहने दो भाभीजी.... शादी पुरी होनेतक मत निकालो ... तुमी काय पलून ज्याते काय कुटे? आनी मी बी संगत ऱ्हायेल की तुमचे.... ” नी हार तेवढा तिने परत घेऊन गळ्यात घातला
सगळ्या वऱ्हा डातून पापादेवी लग्नघरी पोचली. गोंद्या गरीब तसा त्याचा पाव्हणाही गरीब. नवरीच्या अंगावर मंगळसूत्रातली डवली सुद्धा सोन्याचं पाणी दिलेली खोटी . ते चित्र दाखवून मांडव शोभे पुरते पापादेवीने हार, बांगड्या ,पाटल्या , आंगठ्या नवरीला घालायला देण्याची विनंती भलाजी पाटणे नी धोतीरवाला भाग्या ह्यानी केली नी पापादेवीने ती मान्यही केली. त्यावेळी मात्र वाऱ्हाडासोबत आलेली वाडीतली जाणती म्हातारी सुशाबायो म्हणाली, “ग्ये पापाद्येवी ... ... तु ह्यां काय चलवलस तां माका काय बरां वाटत नाय...... ही जोकमदारीची वस्तू.... गरजेक मध द्येवचो पन मधाची बुदली कदी देव नये शान्या मानसान्......” पुरा अर्थ नाही कळला तरी सुशाबायोच्या बोलण्याचा मतितार्थ पापादेवीला जरूर कळला. खळखळून हसत ती बोलली, ‘‘अरी जाने भी दो माँजी .... शादी ब्याह का मामला है... और वैसे तो मैं हूँच ना यहाँ....’’ . बाजूला उभा राहून संभाषण ऐकणारा भलाजी म्हणाला, “ह्यां सुसलां म्हंज्ये खर्कट्या हातान मांजूर हाकल्ताना आदी बोटाची शीता दुकू चाटीत नी मगे हात वर उकलित.....काय घंट्याभराचो प्रश्न... लगिन झाला की येळ न काडता लगेच आपले डाग ताब्यात घ्येवा ..... मग्ये झाला मां ? ” नी पापादेवीने हार. बांगड्या, पाटल्या उतरून नवरीला घालायला वरमाय काशीकडे दिल्या.
लग्न लागलं, जेवणावळ सुरू झाली.... पत्रावळीवर बचकाभर भात त्यावर वाढलेलं काळ्या वाटाण्याचं सांबार नी मीठ.... माणसं खुरमांडी घालून बसली नी मटामट भाताचे गोळे तोंडात कोंबीत बोल बोल म्हणेतो उठलीसुद्धा. पापादेवी रांधपाच्या होवऱ्यात बायकांच्या पंक्तित बसलेली म्हणून भात भिजेल एवढं कालण पुन्हा मागितल्यावर तिला मिळालं. हात धुतल्या धुतल्या सोबतच्या बायकानी धावती केली नी त्यांच्याच जथ्यातून पापादेवी काळवं पडता पाणखोलात पोचली. तिची रहायची सोय हिराबाबूच्या ओसरीवर केलेली. कुलुप काढून पापादेवीने खोलीत पाय टाकला . घडवंचीवर ठेवलेली तिची पत्र्याची बॅग कुठे दिसेना. तिने घाबऱ्या घुबऱ्या सुंद्री काकीला हाका मारल्या. सुंद्री काकीआली तिने बाकाखाली, बाजल्याखाली वाकून बघितलं पण बॅग मिळाली नाही. आता मात्र पापादेवीचा धीर सुटला.... ती मोठमोठ्याने रडाभेकायला लागली....... आजूबाजुच्या घरातली माणसंही आली........ घरात नी गोठ्यात शोध घेतला पण बॅग गेली ती गेली.
धास्तावले ल्या पापादेवीने गोंद्या नी नवरा नवरीची चौकशी सुरु केली . त्यावर लांबचं मकाण असल्यामूळे ती मंडळी वस्तीला नवरीच्या शेजार घरी जगूच्या मावळ्याकडे राहणार नी उद्या पाच परतवण उरकून दुपार नंतर येणार असं जाणत्यानी सांगितलं. रात्री पापादेवीला अन्न गेलं नाही. रात्री निजायच्या टायमाला सुशाबायो आली. तिला बघताच पापादेवीला रडू आवरलं नाही. ‘‘तुमने मना किया था मुझे , लेकिन मैंने तुम्हारा कहना हँसी मजाकमें छोड दिया ...” तिच्या पाठीवर हात फिरवीत सुशाबायो बोलू लागली... ‘‘ कर्माच्ये गती नी कोंबड्यान गिळला मोती.... तशी तरा........तु येवडी हुंबय सारक्या शेर बाजारात ऱ्हवान कुंटण खानो चलवनारी छप्पन बाई पन शेवटी बापयाच्ये मोडी आडया सुडक्याच्या बायल् मानसाक कशो कळनार? बापयाची जात पायान् गाटी घालीत त्ये बायल मानूस हातान दुकू सोडव शकनार नाय.... ”
‘‘आता मी काय सांगतय् तां सोयन् आयक् . आपलां ठिव सोडून बारा बंदरी जाताना असां शेरभर सोनां आंगा खांद्यार घेवन् जायाचा नाय बायल् मानसान. बापयाचे नाद बायल मानसान कदी करू नये...पन तू ते करतंस.... शिगरेटी वडतंस... दारू खातस .... बायल मानसाची मान मर्यदा सोडून बापयांशी लय लगळपान तू करतस मग कदितरी डबऱ्यात पडनारच तू ..... तू दारू खावक येकटा दुकटा उदळीत जायस् बापयां वांगडा तवाच माका भय वाटायचो की सोन्यासाट्ना कोन पन ह्येका गाडित एकवशी गाटून त्येचो पत्त्याबी लागनार नाय.... पन पूजेचो कारेक्रम हुतो नी तुज्या मानसांची जुग पन हुती म्हनान बचावलस ... ”
‘‘अजून पैजान , फेरवे, कनातले झुमके , नाकातली चमकी नी दोन आंगट्यो ..... नाय म्हटलां तरी दोन तोळे ऐवज बाळगून हस तू..... बॅग चोरीक ग्येली तरी काय ना काय रोकड , बिदागीचे अडिचशे रुपाये तुज्यारी हत.... तेच्यासाटना कोन कदी घात करीत समाजणार पन नाय.... तू उगीच आशेर् ऱ्हांव नुको.... मांडव शोबेक दिलस तां तू कितीपन पिचाटलस तरी तुका परत मिळणार नाय.. जां आसा तुज्याहारी तां नी तुजो जीव शाबूत ठेवन् हुंबय गाट..... नायतर जां ऱ्हवला हा त्येचासकट तुका पन ईकून खाती ह्ये सोदे.... आता झोप नी सकाळी उटान विजेदुरुग गाट नी सांजच्या बोटीत बसान हुंबैका जा .”
सुशाबायोचा सल्ला मानून दुसऱ्या दिवशी सुशा बायोने दिलेले दोन वांगडी घेऊन पापादेवी रवाना झाली. जाताना सुशाबायोच्या पाया पडत पापादेवी म्हणाली , “मैं सब कुछ भूल जाऊँगी लेकिन तुम्हें हमेशा याद करूंगी.तू तो मेरी माँ बनके रही ” मुंबई ला गेल्यावर पापा देवीने पूजेसाठी तिच्या जथ्याला सुपारी देणाऱ्या हरबा नी भाग्या पाटण्याला गाठून काय तरी खटपट करायचा प्रयत्न केला. पण या दोघांचा मुंबईतला ठिकाणा कोणालाच नेमका माहित नव्हता. पापादेवी च्या ताफ्यात फ़क्त पोरींचा भरणा... त्यांच्या सोबत गावात गेलेले पोरगेही चार ठिकाणांहून गोळा झालेले.... पापादेवीला हरबा नी भाग्या पाटण्याला गाठायचा बेतही सोडून द्यावा लागला. काल गेला की व्रण राहिला तरी जखम भरून येते .... या न्यायाने पापादेवी सार्वजनिक पूजेला मिळालेला दणका विसरली पण सुशाबायोच्या रूपाने भेटलेल्या माय ला कधिच विसरू शकली नाही.
※※※※※※※※