मला स्पेस हवी पर्व २ भाग १४ Meenakshi Vaidya द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मला स्पेस हवी पर्व २ भाग १४

मला स्पेस हवी पर्व २ भाग १४

मागील भागात आपण बघितलं की नेहा सुधीरजवळ बरच बोलते आणि शांत होते. या भागात बघूया काय होईल?


सकाळी उठल्यावर नेहा खूप फ्रेश दिसते. तिला बघून सुधीरला आनंद होतो.

“ गुड मॉर्निंग.”

“ गुड मॉर्निंग “

नेहा प्रत्युत्तर देते.

“ आज काल पेक्षा तू खूप छान फ्रेश दिसते आहेस.”


सुधीर म्हणाला.

“ हो. काल तू जवळ होतास त्यामुळे कुठलंच टेन्शन माझ्या मनावर नव्हतं.”

तिचा हातात हात घेऊन सुधीर म्हणाला,

‘नेहा एवढंस आयुष्य आहे आपल्याला. किती ते सांगता येत नाही. मग त्या छोट्याशा आयुष्यात आपण चिंताग्रस्त होऊन का जगायचं ?म्हणून तुला म्हणतो तू टेन्शन घेऊ नको. तुला छान स्पेस मिळाली. तू आनंदी झालीस. तू स्वतःला ओळखलस. तुझ्या मनावर जे तणाव होते ते दूर केलेस. छान गोष्ट घडली.आता तुला जेव्हा पुण्याला यायला मिळेल तेव्हा ये पण या सहा महिन्याचा काळ खूप विचीत्र आला होता तसा आता पुन्हा येऊ देता कामा नये.”


‘ मला कळतंय रे. सुधीर त्या सहा महिन्यात मी स्वतःशीच खूप झगडत होते. कळत नव्हतं मला काय हवं आहे आणि मला काय नको आहे. जे नको असं वाटत होतं त्याकडेच जास्त लक्ष दिल्या गेलं. त्यामुळे काय हवय याच्याकडे लक्षच देता आलं नाही.”


“ ठीक आहे पण आता तो भूतकाळ झाला आहे असं समज नव्हे तो भूतकाळच आहे. आता आपण दोघं भेटलो सहा महिन्यांनी आणि दोघांच्या मनाची अवस्था समजून घेतली आता मी निश्चिंतपणे पुण्याला राहू शकतो.”


“ मला कळतय सुधीर माझ्यामुळे तुमच्या सगळ्यांची झोप उडाली असेल पण मला तेव्हा तसंच वाटलं. तिथेच मला सगळं काही मिळणार आहे असं वाटलं म्हणून मी हा निर्णय घेतला.”


“ निर्णय तू घेतलास तो योग्य वेळी घेतला. कारण आपल्याला काय हवय काय नको हे कळत असतानाही आपण निर्णय घेण्यात वेळ घालवला तर आपलं बरचसं आयुष्य हातातून निसटून जातो. अग हा वेळ रेतीसारखा कधी आपल्या हातातून निसटून जाईल कळत नाही त्यामुळे तू तो निर्णय घेतला हे चांगलं केलस. पण इथे आल्यावर आम्हाला तू फोनही केला नाही. करत नव्हतीस. आम्हाला त्रास व्हायचा. असा कोणता सल तुझा मनात आहे ज्या च्यामुळे तुला आमचा आवाज सुद्धा ऐकावासा वाटत नाही हा प्रश्न आम्हाला तिघांनाही भेडसावायचा.”


असं सुधीर म्हणाल्यावर नेहालाही जाणवलं की आपण फार रुक्षपणे वागलो.

“ सुधीर आतापर्यंत माझा वागणं खूप विचित्र होतं. हे मी कबूल करते पण आता यापुढे मात्र ऋषीच्या बोबड्या बोलण्यातील जो आनंद आहे जो मी सहा महिन्यात घेऊ शकले नाही तो आनंद घेणार आहे.”



“हे बघ आता अजून उद्या दोन दिवस आपण दोघांनी ठरवलं आहे नं आपण एन्जॉय करायचं. सोमवारी जर तुला सुट्टी मिळत असेल आणि तू थांब म्हणालीस तर मी थांबेन. सोमवार या आणखी एक दिवसाच्या सुगंधित कळ्या आपल्या ओंजळीत भरून घेऊ. तुला माहिती आहे सकाळी उठल्यापासून प्रत्येक गोष्टीत तुझ्या खुणा मला दिसतात. तू बाल्कनीत लावलेली काही फुलांची झाडं. त्याला मी रोज न चुकता पाणी देतो. त्या झाडांशीच मी बोलतो. माझ्या मनातील पोकळी मी आईबाबांच्या बोलून दाखवू शकत नाही. ते मी झाडांना सांगतो. आईबाबांना जे बोलू शकत नाही. ते या झाडांशी बोलतो.”

सुधीरचा म्हणणं ऐकल्यावर. नेहा सॉरी म्हणाली.

“ अगं सॉरी कशाला म्हणतेस? माझी मनोवस्था सांगितली तुला. तुला त्यासाठी अपराधी नाही ठरवलं.”

“हा सगळं तुझा मोठेपणा आहे. केली तर मी चूक आहे पण माझ्या दृष्टीने मी मला स्वतःला दिलेला वेळ आहे.”


“तेच म्हणतो आहे ना मी. तू चूक नाही केलीस त्यामुळे सॉरी कशाला? तू योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास. त्यामुळे या सहा महिन्यात तुला स्वतःला ओळखता आलं. तुला नक्की काय हवं आहे ? हे तुला कळलं. आज आपण आनंदाने एकमेकांना भेटलो आहोत. तुला जर नसतं कळलं तर तू तशीच घुसमटत राहिली असतीस आणि कदाचित आपल्या दोघांमध्ये एक दरी निर्माण झाली असती. आलं का लक्षात?”

“हो. सुधीर आपल्या संसारासाठी, आपल्या नात्यासाठी मला या सहा महिन्यात खूप विचार करता आला. प्रियंका गेल्यानंतर नातेवाईकांनी जो घोळ घातला होता त्यात कदाचित एखादी मुलगी नसती अडकली आणि इतकी कंटाळून मला स्पेस हवी म्हणत दुसऱ्या गावी गेली नसती पण माझा स्वभाव जरा वेगळा असल्याने मी हे सहन करू शकले नाही.”

“ खरय तुझं म्हणणं “

सुधीरने तिला नजरेने धीर देत म्हटलं.


“मला खूप समंजस आणि प्रामाणिक नातं आवडतं जे मला आपल्या घरी लग्नानंतर मिळालं. प्रियंका मुळे मी आपल्या घरी लवकर रूळले.आपल्या घरी मुलीसाठी एक सुनेसाठी दुसरा नियम नाही ते मला खूप आवडलं. प्रियंका बरोबरचं माझं जे नातं तयार झालं होतं त्या नात्यामुळेच प्रियांका गेल्यानंतर मी मनातून खूप दुखावले होते, हळवी झाले होते. ती गेल्या नंतर भेटायला आलेल्या नातेवाईकांचा हे विचित्र वागणं मला सहन झालं नाही कारण तिच्या जाण्याचं दुःख कमी आणि नातेवाईकांचं स्नेहसंमेलन जास्त वाटत होतं.”

नेहा दुखावलेल्या स्वरात म्हणाली.

“ हं. ते माझ्याही लक्षात आलं होतं पण मी आई बाबांकडे बघून गप्प बसलो होतो. आता या सगळ्या गोष्टी विसर. त्या घडल्या होत्या याची पुसटशी सावलीसुद्धा तुझ्या मनावर येऊ देऊ नकोस. आता आलेल्या प्रत्येक क्षणात, प्रत्येक दिवसात गेल्या सहा महिन्यांची कसर भरून काढू. पटतंय नं.”

सुधीरने हळुवार नेहाचा चेहरा आपल्याकडे वळवून विचारलं. नेहाने जेव्हा सुधीरच्या डोळ्यात बघीतलं तेव्हा तिला सुधीरच्या डोळ्यात मिलनासाठी आतूर झालेला प्रियकर दिसला आणि तिच्यावर अंगावर रोमांच उठला. नेहाच्या लक्षात आलं हा असाच रोमांच नेहाच्या अंगावर लग्नानंतरच्या पहिल्या रात्री नेहाच्या अंगावर उमटला होता. तेव्हाही सुधीरने असंच हळुवार हाताने नेहाचा चेहरा त्याच्याकडे वळवला होता.


नेहा लाजली आणि तिने खाली बघीतलं.

“ अशीच लाजली होतीस तू आपल्या लग्नानंतरच्या पहिल्या रात्री.आठवतय?”

“ हं.” लाजेमुळे नेहाच्या आवाजात थरथर आली.

“ असं वाटतच नाही की आपलं लग्न होऊन सात वर्षे झाली कारण प्रत्येक पावलावर तू मला मनापासून साथ दिली.”

“ तू सुद्धा मला समंजसपणे साथ दिलीस म्हणून तर बंगलोरला येण्याचा निर्णय घेताना मला भिती वाटली नाही. हा निर्णय घेण्यामागची माझी मनस्थिती समजून घेशील ही खात्री होती पण तुझी माझ्यातील गुंतवणूक बघता तू कोणत्याही क्षणी कोलमडू शकतोस हे मला कळत होतं. त्यासाठी मी घाईने निघाले.”


“ मी तुझ्यात गुंतलो तर आहेच. ही गुंतवणूक इतकी जास्त आहे की तुझ्याबद्दल स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे. निशांतने मला विचारलं होतं की नेहाचं कुठे अफेअर आहे का? त्यासाठी ती बंगलोरला जातेय का?”

“ काय?”

नेहाला धक्का बसला.

“ मला त्या क्षणी निशांतचा राग आला होता पण तुझ्या विषयी खात्री होती. मी निशांतला म्हटलं मी नेहाला खूप छान ओळखतो. ती कुठेही बाहेर गुंतणार नाही. तिचं मन कशाने तरी अस्वस्थ आहे ते कशाने आहे हेच कळत नाही. बंगलोरला जाऊन तिला शांतता मिळाली तर छान आहे.”

नेहा खूप वेळ काही बोलली नाही. तिचं तडकाफडकी बंगलोरला निघून येण्यामागे असेही तर्क काढले जातील असं तिला वाटलंच नव्हतं. हा उद्देश नसूनही रमण नावाचं शुक्लकाष्ठ आपल्या मागे लागलंच. कसं त्याला थांबवायचं कळत नाही.


मघापर्यंत प्रेमाच्या हळूवार हिंदोळ्यावर फुलणारी नेहा अचानक रमणच्या विचाराने अस्वस्थ झाली.

“ नेहा काय झालं? मध्येच अशी कुठल्या जगात हरवून जातेस? काय गोंधळ उडाला आहे तुझ्या मनात? सांगून टाक.”

“ नाही रे. कसलाही गोंधळ नाही. उगीचच काहीतरी आठवतं आणि…”

बोलणं अर्धवट सोडून नेहा पलंगावरून ऊठली.

“ काय आठवतं? सांग?”

“ आपण या दोन दिवसात खूप आनंदाचे क्षण जमा करायचं ठरवलंय नं. मग चल ऊठ. त्या सहा महिन्यांना आपल्या दोघांच्या आयुष्यातून हद्दपार करूया.”

हसत नेहाने सुधीरच्या हातातून आपला हात सोडवला आणि स्वयंपाक घराकडे जात म्हणाली,

“ मी नाश्त्याची तयारी करते. आपल्या राजकुमारांना उठवा. सुधीर ऋषी उठला की आधी आईबाबांना फोन कर. त्यांना सकाळपासून करमत नसेल. खूप सवय आहे त्यांना ऋषीची.”

“ हो. आत्तापर्यंत त्यांनी कितीदा तरी ऋषीला हाक मारली असेल मग त्यांच्या लक्षात आलं असेल ऋषी बंगलोरला गेलाय. ऋषीला उठवून लगेच फोन करतो.”
नेहा स्वयंपाक घरात गेली आणि सुधीर ऋषीला उठवण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरु लागला.

________________________________
क्रमशः.