मला स्पेस हवी पर्व २ भाग २९ Meenakshi Vaidya द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मला स्पेस हवी पर्व २ भाग २९

मला स्पेस हवी पर्व २ भाग २९

मागील भागात आपण बघीतलं की नेहा प्रणालीशी बोलून खूप फ्रेश झाली. आता या भागात बघू काय होईल.

नेहा आज आनंदात होती कारण तिच्या मनाप्रमाणे जाहिरातीचं स्क्रिप्ट तयार झालं होतं सत्यम आडवर्टाइजिंग एजन्सीचे लेखक आणि यांनी शोधलेली नवीन लेखिका या तिघांना नेहा ने जाहिरात कशी हटके हवी आहे हे सांगितलं. तिघांना कॉन्फरन्स हॉलमध्ये एकमेकांशी चर्चा करून जाहिरातीचं स्क्रिप्ट तयार करायला सांगितलं. त्यांच्या जेवणाखानाची व्यवस्था स्वस्तिक टूर्स कडून केलेली होती. त्यानंतर त्या तिघांनी जे जाहिरातीचे स्क्रिप्ट केलं होतं ते प्रत्येकाने आपापले स्क्रिप्ट नेहाला दाखवलं. ते बघितल्यावर तिला तिन्ही स्क्रिप्ट मधलं दोन दोन पॉईंट्स आवडले. नेहाने त्या तिघांशी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की

“ क्षेमकल्याणी सरांच्या स्क्रिप्ट मधलं हे पाॅईंट घ्या मॅडमच्या स्क्रिप्ट मधलं हा पॉईंट घ्या आणि जाधव सरांच्या स्क्रिप्ट मधलं हा पाॅंईट घ्या. असे हे तीन पॉईंट एकत्र करा सुरवातीला मॅडमनी जी स्टार्टिंग केलेली आहे ती खूप योग्य आहे ती तशीच ठेवा आणि शेवट मात्र मी सांगते त्याप्रमाणे करा.”


एवढं बोलून नेहाने त्यांना स्क्रिप्ट परत केलं. तिघ पुन्हा कॉन्फरन्स हाॅलमध्ये गेले. त्यांनी ते स्क्रिप्ट पुन्हा लिहिण्यासाठी तिन्ही स्क्रीप्टवर चर्चा करून त्याचा योग्य सिक्वेन्स लावून तिघांनी मिळून एक स्क्रिप्ट तयार केले. ते स्क्रिप्ट नेहाला दाखवलं. नेहा ते वाचून त्या तिघांना म्हणाली,

“ शेवट मी लिहीन. हे स्क्रीप्ट तुम्ही छान तयार केलं आहे.आता तुम्ही घरी गेलात तरी चालेल..”

ते तिघही घरी निघून गेले. नेहा स्क्रिप्ट सारखी वाचत होती कारण तिला शेवट हटके द्यायचा होता. एकूण स्क्रिप्ट वाचून झाल्यावर तिला शेवट सुचला.तो जरा हटकेच होता. अगदी नेहाला हवा तसा होता.याचा आनंद नेहाच्या चेहऱ्यावर झळकला. तेवढ्यात तिला फोन आला फोनवर तिच्या सासूबाईंचं नाव होतं नेहा आश्चर्यचकित झाली. कारण या चार-पाच महिन्यात त्यांचा फोन नव्हता आला.


“ हॅलो आई बोला ना.”

“ नेहा अगं कितीतरी दिवस झाले तू तिकडे गेलीस आणि फोन नाही केलास.”

“ हो आई कामांमुळे वेळ नाही झाला.”

“मी विचारलं सुधीरला नेहाचा फोन नाही आला तर तो म्हणाला तूच फोन कर. म्हणून आज केला. तू खूप कामात आहेस का? “

“ नाही एवढं काम नाही. बरं झालं ना आई तुम्ही फोन केला आपण बोलूया.”

“ नेहा अग तू तिकडे गेलीस आणि मला करमत नाही. तू माझी प्रियंकाच आहेस नं. त्याच्यामुळे मला करमत नाही. परवा कढी केली होती तेव्हा तुझी आठवण आली. तुला माझ्या हातची कढी फार आवडते नं म्हणून.”

हे ऐकताच नेहाच्या डोळ्यात पाणी आलं. तिच्या लक्षात आलं आपण सगळ्या गोष्टीला कंटाळून येथे आलो पण आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या सासूला मात्र फोन करायचे विसरलो. खरं तर हे बरोबर नाही झालं. आपल्या लक्षातच नाही आलं.

“ नेहा ऐकतेस ना?”

“ हो आई ऐकतेय . मला पण तुमची आठवण येते.कशा आहात तुम्ही?”

“ चांगली आहे. आता एक चक्कर टाक इकडे.आम्हाला तुझी खुप आठवण येते. तुला भेटून ऋषी सुद्धा खूप आनंदित होईल.”

“आई मी या शनिवारी यायचा प्रयत्न करते.”

“ नक्की ये ग बाळा. आम्ही सगळेजण रोज तुझी आठवण काढतो. रोज काही ना काही बोलणं होतं आणि तुझी आठवण येते. प्रियंका गेल्यानंतर तूच माझी प्रियंका झाली आहे. मला तुझी खूप सवय झाली आहे. त्या दिवशी मी चक्क वरण फोडणीला घालताना पंचपाळ्यातील मोहरी संपली तर तुलाच हाक मारून मोहरी कुठे ठेवली आहेस ग? असं म्हटलं तेव्हा हे हसायला लागले म्हणाले अगं नेहाला बंगलोरला जाऊन चार महिने झाले. तुझ्या लक्षात नाही का येत? नेहा आता बंगलोरला असते तेव्हा मलाही हसू आलं म्हणजे बघ इतक्या छोट्या छोट्या गोष्टीत तू माझ्याशी जोडल्या गेली आहेस. ये बाई एकदा गळाभर भेटून जा.”

नेहाला आता मात्र रडू आवरेना. ती म्हणाली,

“ आई मी या शनिवारी नक्की येते. नवीन काम असल्याने फुरसत मिळाली नाही. मी तिकीट काढलं की तुम्हाला सांगते. पण सुधीर आणि ऋषीला सांगू नका. त्यांना सरप्राइज देईन.”

“ चालेल. पण नक्की ये हं. ऋषीची परीक्षा झाली की आम्ही दोघं बंगलोरला येण्याचं आधीच ठरवलं आहे.”

“ आई नक्की या. मलापण खूप बरं वाटेल. कधी कधी तुम्हा सगळ्यांची आठवण येते आणि एकटं वाटतं.”

बोलताना नेहाचा आवाज कातर झाला.

“ बाळा एकटेपणा वाटला तर खुशाल फोन करायचा. तुझे आईबाबा पण तुझ्या फोनची वाट बघतात.परवाच तुझी आई येऊन गेली आपल्या घरी.”

“ कशी काय आली होती?”

“ आईचं मन तूही ओळखतेस नं . गाजराचा हलवा केला म्हणून घेऊन आल्या. तुला आवडतो म्हणून. इथे आल्यावर त्यांच्या लक्षात आलं तसं त्यांनाच हसू आवरलं नाही. मी म्हटलं अहो तुम्ही आज गाजराचा हलवा आणलात मी तर रोज काही न काही कारणाने नेहाला हाक मारत असते. माझ्यापण लक्षात रहात नाही की नेहा बंगलोरला गेली आहे. आमचे हे आणि सुधीर दोघंही माझी टिंगल करतात. त्यावर त्यांना जरा बरं वाटलं पण त्यांच्या डोळ्यात तुझ्या आठवणीने पाणी आलं. म्हणून म्हणते ये एकदा.”

“ हो. नक्की येते.आई फोन ठेऊ?”

“ ठेव. मीच तुझ्या कामाच्या वेळेत फोन केला. इतके दिवस तुझा आवाज ऐकायला कान आतूर झाले होते त्यामुळे वेळेचं भान नाही राहीलं. ठेव बेटा फोन.”

सुधीरच्या आईने फोन ठेवताच नेहाच्या डोळ्याला पाण्याची धार लागली. नेहा अस्वस्थ झाली. तिच्या मनात आलं की आपण इथे बंगलोरला आल्यावर एकही फोन आईला किंवा सासूला केला नाही. दोन्ही माऊलींच्या मनाला किती दुखावलं. छे: आपण असं वागायला नको होतं. तिच्या डोळ्यातील अश्रू खाली स्क्रीप्ट वर पडत होते पण नेहाला त्याचं भान नव्हतं.

अपर्णा नेहाच्या केबीनमध्ये आली आणि तिला नेहा रडताना दिसली. तिचे अश्रू स्क्रीप्ट वर पडताना दिसले. अपर्णाने झटकन ते कागद बाजूला केले. आणि नेहाला विचारलं,

“ मॅडम काय झालं? बरं वाटतं नाही का?”

“ बरं आहे.”

“ मग रडता कशाला? घरची आठवण आली का?”

नेहाने रडतच सासूबाईंचा फोन आला होता.नेहाने इतके दिवस त्यांना फोन केला नाही याची खंत तिला सतावते आहे असं सांगून फोनवर झालेलं संभाषण सांगीतलं.

यावर अपर्णा म्हणाली,

“ मॅडम या शनिवारी खरच तुम्ही घरी जा. कामापेक्षा ही तुम्ही रमण शहा प्रकरणामुळे जास्त थकल्या आहात. एकदा घरी जाऊन या सगळ्यांना भेटा म्हणजे तुम्हाला एनर्जी मिळेल. ती घेऊन परत बंगलोरला या.”

“ हो मलापण तसंच वाटतंय. मी जाईन या शनिवारी.”

आपले .डोळे पुसत नेहा म्हणाली.

“ तुम्ही काढणार आहे का तिकीट की मी काढू?”

“ नको.मी काढीन.”

नेहा म्हणाली.

“ आता ठरलंय नं मग वेळ घालवू नका. शनिवार रविवार सगळ्या बसेस लवकर बुक होतात”
अपर्णा म्हणाली.

“ हो. मी लगेच तिकीट बुक करते. मला तुझी काळजी कळतेय अपर्णा. तुझ्या सारखी मैत्रीण मला मिळाली हे माझं भाग्य आहे.”

“ मॅडम तुम्ही पण किती छान मैत्रीचे बंध निभावता.मला असं वाटतच नाही की आपली आत्ता ओळख झाली आहे.नक्की मागच्या जन्मी आपण पक्क्या मैत्रीणी असू.”

हे ऐकल्यावर नेहा हसायला लागली.

“ हसल्या का?”

“ तू आता अनुराधा सारखी बोललीस म्हणून मला हसायला आलं.”

“ खरय.तिच्या सहवासात राहून तिचा गूण लागला.”

“ छान आहे.असे सकारात्मक विचार करण्याचा गूण असणं चांगलं असतं. चल आता कामाकडे वळूया. हे स्क्रीप्ट… अरे! हे कागद ओले कसे झाले?”
नेहाला काही कळेना.

“ मॅडम मी आले तेव्हा तुम्ही रडत होता.तुमचे अश्रू या कागदांवर पडलेत. मी घाईने ते बाजूला केले म्हणून खूप ओले झाले नाही.”

“ हं. मनातलं वाचलेलं सगळं वाहून गेलं. बरं झालं.मन मोकळं झालं. चल स्क्रीप्ट वाचूया.”

नेहा म्हणाली.

नेहा आणि अपर्णा समोरील स्क्रिप्ट वाचण्यात गढल्या.
_________________________________
क्रमशः