येरा गबाळ्याचे काम नोहे श्रीराम विनायक काळे द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

येरा गबाळ्याचे काम नोहे

येरा गबाळ्याचे काम नोहे .......

आम्ही लास्ट इयरला असताना गोगटे कॉलेजमध्ये इंग्रजी प्रिन्सिपल ला विद्यार्थ्यांच्या संख्येचं रेकॉर्ड झालं. एरव्ही शिकस्तीने 6 ते 8 एवढीच मुलं असायची. पण आमच्या बॅचला चक्क 18 स्टुडंटस् झाले. एस.य. ला 22 मुलं होती . पण टी.वाय. ला फक्त 9 जणानीच इंग्रजी प्रिन्सिपल घेतलं. मुंबई युनिवर्सिटीचे रिझल्ट फार कडक, जेमतेम निम्मीशिम्मी बॅच उद्धरायची. म्हणून बरीच मुलं इतिहास, सोशोलॉजी, मराठी, हिंदी हे विषय घेवून बी.ए. करीत. चिपळूण आणि सावंतवाडी ला इंग्रजी प्रिन्सिपलची सोय नव्हती म्हणून त्या कॉलेजमधली 7 मुलं गोगटे कॉलेजला आलेली. तसेच बी.अ‍ॅण्ड सी. मध्ये रायगडचे एक्झिक्युटीव इंजिनीअर नेवग़ी बदली होवून रत्नागिरीला आले त्यांची मुलगी कांचन ही नवीन अ‍डमिशन झालेली. प्रा . दिक्षीत, प्रा. बोडस म्हणाले की," आमच्या आठवणीत प्रथमच इंग्रजी प्रिन्सिपल ला17 मुलं झाली आहेत." त्यामुळे नेहमीचा क्लास लहान पडायला लागला म्हणून इंग्लीशच्या बॅचला लायब्ररीत तळ मजल्या वरची रुम देण्यात आली. वर्ष मजेत पार पडलं. 7 ते 16 मे अ‍न्युअल चं टाईम टेबल लागलं. 16ला शेवटचा पेपर सुरू असताना पेपर सुटण्यापूर्वी अर्धातास प्रा.बोडस एक्झाम हॉलमध्ये आले. सगळ्या मुलांची विचारपूस करीत माझ्याजवळ येवून ते म्हणाले, " देसाई, पेपर झाल्यावर स्टाफरूममध्ये येवून मला भेटून जा."
पेपर सुटला, रिलॅक्स मूडमध्ये चिपळूण सावंतवाडीच्या मुलांशी निरोप्याच्या गप्पा मारल्यावर बोडससराना भेटायला मी स्टाफरूम मध्ये गेलो." पुढे काय करायचं ठरवलं आहेस? जर जॉब करणार असशील तर इथेच पटवर्धन हायस्कूलला इंग्लिशची पर्मनंट व्हेकन्सी आहे. तिथले मावळंकर जुनमध्ये रिटायर होणार आहेत, म्हणून हेडमास्तर जोग सर इं ग्लीशचा चांगला हॅण्ड शोधताहेत. मी त्याना तुझं नाव सुचवलं आहे. उद्या दहा- साडे दहाला त्यांना जावून भेट. तुला इथेच जॉब मिळाला तर एम.ए. रेग्युलर बॅचला अ‍डमिशन घेवून एम. ए. कर."मी हवेत तरंगतच रूमवर गेलो. मी ऑप्शनल संस्कृत घेतलेलं असल्यामुळे मला संस्कृत पाठशाळेत मोफत रहायला मिळालं होतं. लास्ट ईयरला मी संस्कृत ऐवजी इंग्रजी घेतलं असलं तरी पाठशाळेच्या संचालकानी मला रहायची परवानगी दिली होती. मी संध्याकाळी संचालकाना भेटायला गेलो. मला पटवर्धन हायस्कूल मध्ये जॉब मिळण्याची संधी असल्याचं त्याना बोललो. त्याना खूप आनंद झाला. ते म्हणाले," तसं झालं तर मी तुम्हाला पाठशाळेतच व्यवस्थापकां साठी तीन खोल्यांची बिऱ्हाडाची जागा आहे ती देतो. तुम्ही तिथे रहा. पाठशाळेतल्या मुलांवर लक्ष ठेवा नी तिथलं व्यवस्थापन सांभाळा."
मी दहा वाजता पटवर्धन हायस्कूलमध्ये जोग सराना भेटायला गेलो. केबिन बाहेर गोताड शिपायाने जोग सराना मी आल्याची वर्दी दिल्यावर सरानी मला लगेच आत बोलावून घेतलं. सरानी बसा म्हटलं तरी मला सरांसमोर खुर्चीत बसायचा धीर होईना."तुमच्या विनम्रतेची दखल घेतली मी. तुम्ही उभे किती वेळ रहाणार? बसा, मी मावळंकर सराना बोलावून घेतो. ते आले की, पुढच्या गोष्टी ठरवू." पाच मिनिटानी मावळंकर सर आले. जोग सरानी त्याना सग़ळा विषय सांगितला. दोघानीही माझी फाईल बघितली. "तुमचं करियर चांगलं आहे. बोडस सरानी तुमची शिफारस केलेली आहे. पण आम्ही आधीच ठरवलेलं आहे. जो कॅण्डिडेट निवडायचा त्याची 50 गुणांची रिटन टेस्ट घ्यायची. तुमची तयारी असेल तर पहा." मी होकार दिला. सरानी मला प्रश्न पत्रिका आणि उत्तरं लिहायला कोरे पेपर्स दिले. सरांच्या केबिन मध्ये कोपऱ्यातल्या टेबलवर बसून मी पेपर सोडवायला घेतला.
पहिल्या प्रश्नात सिंथेसिस, ट्रान्सफॉर्मेशन आणि डायरेक्ट इन डायरेक्ट वर आधारित 30 उपप्रश्न होते. दुसरा प्रश्न होता भाषांतराचा. त्यात मराठी पेपर मधलं कात्रण दिलेलं होतं नी तिसरा प्रश्न निबंध लेखनाचा. त्यात इफ आय् वेअर अ बर्ड किंवा माय फेव्हरिट नॅशनल लीडर यापैकी एका विषयावर 25 ओळी लिहायच्या होत्या. मी पाऊण तासात पेपर लिहून हातावेगळा केला. दरम्याने चहा बिस्किटे आली. आम्ही चहा घेईतो मावळंकर सरानी माझा पेपर तपासून जोग सरांकडे दिला. सरानी पेपरवर नजर टाकली नी म्हणाले, " अभिनंदन, तुम्ही 14 जून पासून आमच्याकडे हजर व्हा." मी अतिशय नम्रतेने सराना म्हणालो. " सर मला माझा पेपर पहायला मिळेल का? " सरानी पेपर दिला. पहिल्या प्रश्नातली सगळी उत्तरं बरोबर होती. भाषांतराच्या उत्तरात तीन शब्द अधोरेख़ित केलेले होते नी निबंधातही दोन स्पेलींग चुकली त्याना सर्कल मार्क केलेला होता, मार्क मात्र दिलेले नव्हते. मी प्रश्नचिन्हांकित चेहरा करून मावळंकर सरांकडे पहात म्हणालो, " सर गडबडीत दोन शब्दांची स्पेलिंग चुकली. पण बरोबर स्पेलिंग्ज मी सांगू शकेन." हसत हसत सर म्हणाले," मी ओळखलं ते. भाषांतरात अधोरेखित आहेत ती वाक्यं माझ्या दृष्टिने वेगळ्या प्रकारे भाषांतर करता येतील. अर्थात तुम्ही केलेलं भाषांतर चूक आहे असं नव्हे. निबंध आणि भाषांतर ही प्रत्येकाची स्वतंत्र अभिव्यक्ती असते. त्यात मत मतांतर होवू शकतं म्हणून मी त्या उत्तराना गुणदान केलेलं नाही. पण तुम्ही सगळी उत्तरं बिनचूक दिलेली आहेत. आता 14 जुनला हजर व्हायला या. दरम्याने तुमचं अप्लिकेशन बाय पोस्ट पाठवून द्या."
घरी ही गोष्ट कळल्यावर आई भाऊना आनंद झाला. एका नामांकित शाळेत मला नोकरी मिळाली होती. वर्षभराने माझ्या मागची बहिण सुमन एस.एस.सी. झाल्यावर तीला गोगटे कॉलेजमध्ये सायन्स साईडला घालता येईल. मला पाठशाळेत बिऱ्हाडाची जागा असल्यामुळे दोघांचीही रहाण्याची चिंता मिटलेली होती. महिनाभर आनंदात गेला.5 जुनला रत्नागिरीहून माझा मित्र आचरेकर याची तार आली. बी.ए.चे रिझल्ट लागले , मी फर्स्ट क्लास मिळवून पास झालो असा मजकूर होता. मार्क लिस्ट घ्यायच नी जोग सराना ही भेटून यायचं असं ठरवून दोन दिवसानी मी रत्नगिरीला गेलो. दीड वाजता सिटी पोस्टा जवळ उतरून मी कॉलेजचं ऑफिस गाठलं. जोशी हेडक्लार्क लंच बॉक्स उघडून पोळी भाजी खात होते." देसाई, तू बॅचमध्ये फर्स्ट आहेस. मुलींमध्ये चिपळूणची नंदा खरे फर्स्ट आहे पण आठ मार्क कमी पडल्यामुळे तिला सेकंड क्लास मिळाला. बॅच मधले पटवर्धन, सोहोनी हे मुलग़े नी दीपा पिंगळे, कांचन नेवगी या मुलीना थर्ड क्लास मिळाला. चौघाना केटी लागली. सात लोकांचे 3/4 पेपर्स गेले." जोशीना रिझल्ट तोडपाठ होता. जेवण झाल्यावर त्याना घरून नेलेल्या आंबा वड्यांची पुडी देवून मी त्याना नमस्कार केला. मार्कलिस्ट घेतल्यावर सिव्हिल हॉस्पिटल च्या आवारातलं कॅन्टिन गाठलं. मिसळ, कांदा भजी नी चार पाव असा भरपेट नाष्टा करून फुल्ल कप चहा मारून मी पटवर्धन हायस्कूलच्या दिशेने निघालो.
उन्हाळी सुटी सुरू असल्याने जोग सर दीड वाजता घरी गेलेले होते. गोवेकर क्लार्कनी मला आत बोलावून घेतलं. माझा विषय त्याना माहिती होता. त्या संदर्भात त्यानी जी माहिती सांगितली ती ऐकल्यावर माझ्या पायाखालची वाळूच सरकली. 25 मे रोजी शिक्षणाधिकारी माने साहेबानी जोग सराना बोलावून घेतलं. एक्झिक्युटीव इंजिनीअर नेवग़ींची मुलगी कांचन हिला मावळंकर सर रिटायर झाल्यावर त्यांच्या जागेवर नेमून घ्यायला सांगितले. सी.ई.ओ. साहेबानी आपल्याला तसे निक्षून सांगितले आहे असे ते बोलले. सराना हो म्हणण्या वाचून ईलाजच नव्हता. चार दिवसानी माने सरांचे पत्र घेवून कांचन नेवगी जोग सराना भेटली. सरानी तिलाही 50 मार्कांची प्रश्नपत्रिका दिली. सर कंपाऊंडचे काम चालले होते ते पहायला गेल्यावर कांचना उठली, तीने प्रश्न पत्रिका न सोडवता सगळे कागद ऑफ़िसमध्ये जमा करून सराना न सांगताच ती निघून गेली. संध्याकाळी शिक्षणाधिकारी माने ना नेवगी साहेब सोबत घेवून सराना भेटायला आले. अकस्मातपणे प्रश्न पत्रिका समोर आल्यावर मुलगी घाबरून रडत घरी आली. असे नेवगी साहेब बोलले, "मुलगी लहान आहे, जरा सांभाळून घ्या. ती शार्प आहे. " अशी रदबदली माने साहेबानी केली. सगळे ऐकून मी अवाक् झालो. मी नको म्हणत नसतानाही गोवेकर मला सरांच्या बिऱ्हाडी घेवून गेले. माझ्या पाठीवर थोपटीत सर म्हणाले," आमची संस्था खंबीर आहे , पण शिक्षणाधिकाऱ्यांशी वैर परवडणारे नाही. 12 जूनला जिल्ह्यातल्या मुख्याध्यापकांची मिटींग आहे. मी कुणा ना कुणाकडे तुमच्यासाठी शब्द टाकतो . तुम्ही निश्चिंत रहा."
सरानी आपला शब्द खरा केला. 14 जुनला गिरावळ हायस्कूलचा शिपाई संभू खवळे हेडमास्तर फडके सरांची चिट्ठी घेवून आमच्या घरी कालवीला आला. जोग सरांचा संदर्भ देवून त्यानी मला हजर व्ह्यायच्या तयारीनेच बोलावले होते. मुणगे आडबंदर दरम्याने दर्याच्या किनारी गिरावळ आणि गादव तर्फ़ ही गावं होती. गावं मोठी... पाचवी ते दहावी दोन दोन तुकड्या असलेलं साडेचारशे पट आणि अठरा शिक्षक असलेलं मोठं हायस्कूल...... फक्त एकच अडचण होती. गावच्या एका अंगाला खाडी, भरतीच्या वेळी संपर्क तुटायचा. आडबंदरहून तरीने जायची सोय होती पण दीड तास चालावं लागे. माझ्या नलू मावशीची नणंद भटवाडीत जोशांकडे दिलेली आहे असं आई म्हणाली. संभू आला त्या दिवशी शुक्रवार होता. आम्ही सोमवारी जायचा बेत नक्की केला. देवगडहून सकाळी सात वाजता , दहा वाजता आणि संध्याकाळी तीन वाजता आडबंदर आचरापार गाड्या सुटायच्या. आम्ही दहाच्या गाडीने निघून गिरावळ फाट्यावर उतरायचं असं ठरलं. संभू आम्हाला न्यायला यायचा होता. दहाची गाडी कायम उशिरा साडेअकरा बारा पर्यंत सुटते अशी मौलिक माहिती संभूने दिली.
भाऊंची तब्बेत बरी नव्हती म्हणून शेजारच्या आबा काकाना घेवून मी सोमवारी गिरावळला जायला बाहेर पडलो. बरोब्बर दहा वाजता आम्ही 'घाडणीच पाणी' स्तॉप गाठला. अडीज तासांच्या तिष्ठंती नंतर एकदाची गाडी आली. सोबत पानग्या नी लसणीची चटणी घेतलेली होती. मिठबाव तिट्ठ्यावर बरीच लोकं उतरली. निम्मी गाडी रिकामी झाली. आम्ही दोघानी दोन विंडो पकडून एकेक पानग़ी नी चटणी खाल्ली. नारिंग्र्यात पाटलाच्या हॉटेल जवळ गाडी थांबवून ड्रायव्हर कंडक्टर जेवायला गेले. आम्हीही चहा घेतला. त्यानंतर हिंदळ मुणगं करीत गाडी आडबंदर रोडला वळली. वीसेक मिनिटात आमचा स्टॉप आला. ठरल्याप्रमाणे संभू न्यायला आलेला होता. आम्हाला पलिकडे न्यायला बिन उंडलीची छोटी होडी आणलेली होती. आमच्या बरोबर उतरलेल्या लोकांपैकी तीन बापयानी कपडे काढून पिशवीत भरले नी फक्त अर्ध्या चड्डीवर ते तरीत उतरून चालायला लागले. बाया माणसं सुकती लागायची वाट पहात थांबली. संभूने आमच्या पिशव्या होडीत ठेवल्यानी मागोमाग आम्ही होडीत चढलो. संभू होडीला बांधलेली रशी धरून चालत निघाला. फुल्ल सवारी होती पण कुठेच कमरभरहून जादा पाणी नव्हते. काठाकाठाने पंधरा मिनीटे चालल्यावर होडी पैलतडीला जायला लागली. थोडे अंतर गेल्यावर ऐन मध्यात छातीभर उंच पाणी झाले . मग काठाकडे जाताना पुन्हा पाणी कमी कमी होत कमरभर राहिले. संभू म्हणाला " पावसाळ्यात हऊर येतो त्या वेळी ग़ळ्या अगळ उंच पाणी असते. पुऱ्या पावसाळ्यात असे चारपाच दिवस सोडले तर वर्षभरात कधीच कमरेपेक्षा जादा पाणी होत नाही. नवख़ा माणूस खाडी बघून घाबरतो. हां एक मात्र खरे की पूर्ण पाण्यातून अर्ध्या तासाची चाल आहे."
आम्ही फडके सरांच्या बिऱ्हाडी पोचलो. आम्ही पाय धुवी पर्यंत पानं वाढून तयार होती. आम्ही जेवलो नी शाळेत गेलो. सड्याच्या माथावळीला गिरावळ नी गादववाडी यांच्या मध्यावर शाळेची भव्य इमारत बांधलेली होती. थोडसं टेकाड चढून गेल्यावर शाळे समोरची कमान दिसू लागली. दहा मिनिटं चाल मारल्यावर श्री गिरिमादेवी माध्यमिक विद्यालय गिरावळ ही अक्षरं दिसू लागली. शाळेची भव्य इमारत नी सभोवतीचं विस्तीर्ण पटांगण बघून मला भलताच हुरूप आला. सरानी आमचं हसून स्वागत केलं. कसलीही औपचारिकता न ठेवता फडके सर म्हणाले, " गाव थोडं आडवळणी, एकवशी आहे पण इथे तुम्हाला कसलीच कमतरता भासणार नाही. हापूस आंबा कलमं आणि मच्छिमारी हे इथले मुख्या उद्योग आहेत. बहुजन समाज सधन आणि गुणग्राहक आहे. तुम्ही मन लावून काम केलत तर त्याचं चीज इथे होईल. जोग सरानी तुमच्याबद्दल ग्वाही दिलेली आहे. मी त्यापेक्षा अधिक काही विचारणार नाही. तुम्हाला शाळा नी गाव आवडला का? इथे काम करायची तुमची तयारी आहे का? एवढं सांगा. आजच नव्हे, चार दिवस राहून सवडीने सांगितलंत तरी चालेल. तूर्त तुमचा अर्ज तेवढा लिहून द्या. तुमचा निर्णय झाला तर तुम्हाला अपॉईंटमेंट लेटर देईन. तुम्ही बी.एड. नसल्यामुळे तुम्हाला ईयर टू ईयर नेमणूक दिली जाईल . पण तुमच्या सेवेत खंड पडणार नाही. हा माझा शब्द आहे." मी झटपट अर्ज लिहून दिला नी माझा निर्णयही सांगून टाकला.
दुसरे दिवशी आबाकाका निघून गेले. नलू मावशीच्या नणंदेच घर शाळेपासून लांब गादव वाडीत असल्यामुळे शाळेलगत राणे वाडीत जीजी राणेंच्या दुकाना शेजारच्या गाल्यात सरानी माझ्या बिऱ्हाडाची व्यवस्था केली. जीजी राणेंच मोठं कुटुंब. ते सात भाऊ टोलेजंग चौसोपी वाड्यात एकत्र रहायचे. वाड्यापासून पाच मिनिटांच्या अंतरावर त्यानी धंद्यासाठी पाचखणी वखार बांधलेली. त्यात एका बाजूच्या तीन खोल्या मला दिलेल्या. अत्याधुनिक सोईनी सुसज्ज अशी ती इमारत होती. पुढे पन्नास फूट लांब भव्य व्हारांडा. त्या लगत तीन तीन खोल्यांचे पाच गाळे. एका गाळ्यात त्यांच किराणा मालाचं दुकान. एका गाळ्यात जीजींची उठबस असायची. दोन गाळे आंबा सिझनला उघडे असत नी एका गाळ्यात दुकानचं सामान असे. माझ्या खोली समोर मोठा झोपाळा होता. मी खोलीत आलो की माझा बराचसा वेळ झोपाळ्यावर जायचा. सुरुवातीला चार दिवस मी हाती जेवण करून खाई. पण माझी धावपळ पहाता जीजी राणेंच्या पत्नी त्याना "मोठ्या आई " म्हणत, मला बोलावून घेतलं.मी फडके सरांबरोबर भेटायला गेलो. मोठ्या आई म्हणाल्या, " आमचं मोठं कुटुंब. इथे गावात आम्ही चार जावा आहोत. आम्ही मासे मटण खात असलो तरी आमचं ते रांधप वेगळं असतं. आमच्यापैकी कुणीतरी सराना शुद्ध शाकाहारी जेवण रांधून घालू. आमच्या जावेची मुलगी नंदा नी माझा मुलगा सतीश दोन्ही मुलं शुद्ध शाकाहारी आहेत. त्याना अगदी अंडं सुद्धा चालत नाही. तेव्हा सरांसाठी आम्हाला वेगळं काली करायला नको आहे. सकाळी त्याना खोलीवर नाष्टा पाठवू नी दुपारी शाळेत जेवणाचा डबा पाठवू. रात्री आठ वाजता शाळकरी मुलांबरोबर सर वाड्यावर जेवायला आले तरी चालेल किंवा त्याना रात्रीचाही डबा भरून पाठवू. त्यांना हाती करून जेवायचा त्रास नको ,असा जीजींचा हुकूम आहे."
आठवडा भराने राणेंच्या घरातली पाचवी ते दहावी त शिकणारी सहा मुलं संध्याकाळी अभ्यासाला माझ्याकडे यायला लागली. सातवी पर्यंतची मुलं त्यांचा गृहपाठ पुरा करीत. मोठ्या आठवी नी दहावी च्या मुलाना मी एक दिवस आड इंग्रजी व्याकरण शिकवी. तिन्ही सांजेला खोलीतल्या गणपती लक्ष्मी सरस्वतीच्या तसबीरी समोर दिवा अगरबत्ती करून मी रामरक्षा म्हणायचो. एक दिवशी मुलानाही रामरक्षा शिकवावी असं मनात आलं नी मी त्याना रामरक्षा शिकवायला सुरुवात केली. सुरुवातीला मी त्याना एकेक श्लोक शिकवी. पण आठवडाभरात मुलं माझ्या सोबत बिनचूक म्हणायला लागली. दहा दिवसात सगळ्याना तोंड पाठ म्हणता येवू लागलं. रोज दिवे लागणीच्या वेळेला आम्ही खड्यासुरात रामरक्षा म्हणायला लागलो की , दुकानात गिऱ्हाईकांचा कालवाही कमी होई. जीजी राणेनी या गोष्टीची नोंद घेतली होती. नी एके दिवशी आम्ही म्हणणं सुरु केल्यावर राणेंच्या घरातली झाडून सगळी बायका पुरुष मंडळी माझ्या खोलीत आमच्या मागे येवून उभी राहिली. आमचं म्हणून झाल्यावर रोजच्या प्रघाता प्रमाणे मोठ्या मुलाने सर्वाना अंगारा लावला. मग जीजी समक्ष पुढे येवून त्यानी मला नमस्कार केला. मी ओशाळून मागे होवू लागताच जीजी म्हणाले, सर तुम्ही ब्राह्मण अहात. तुम्ही जे संस्कार आमच्या मुलावर करीत अहात त्यामुळे तर आम्हाला फार आदर वाटतो. मग सगळ्याच माणसानी मला अक्षरश: पायावर डोकं ठेवून नमस्कार केला.
दोन सतरंज्या अंथरून सर्वाना बसायला सांगितलं. भाई काकांची मुलगी नंदा दहावीत जाणारी, जाणती तिला दुकानातून पाच सहा बिस्किट पुडे नी किलोभर फरसाण आणायला सांगितलं. मोठ्या आईंकडे वळून म्हणलो, "आई , तुम्ही सगळी मंडळी यानिमित्ताने माझ्या खोलीवर आलात. सर्वानी फरसाण, बिस्किटं घ्या. तुम्ही सर्वांसाठी चहा करा." मुलाना सांगावही लागलं नाही. नंदाने आतली दोन ताटं आणून त्यात फरसाण घालून एक पुरुष मंडळीना नी दुसरं महिला वर्गा पुढे ठेवलं. सगळ्यानी फरसाण बिस्किटं खाल्ली. चहा घेतला. मग मी कुंकवाची कुयरी मोठ्या आईंकडे दिली."तुम्ही सगळी वडिल धारी मंडळी अहात, तुम्ही आम्हाला मोठं प्रोत्साहन दिलत. कृतज्ञता भावनेने मी तुम्हाला नमस्कार करतो सर्वानी भरभरून आशिर्वाद द्या." माझ्यासह सगळ्यानी वडिलधाऱ्याना नमस्कार केला नी खोली बंद करून रोजच्याप्रमाणे मी सर्वांबरोबर जेवायला वाड्याकडे निघालो.
चार दिवसानी मोठ्या आई मला म्हणाल्या," ही मुलं सकाळी आंघोळ झाल्यावर देवाचं म्हणतात. ते ऐकून आम्हा बायकाना लाज वाटायला लागली आहे. सर्वांतर्फे आमची एक विनंती आहे. तुम्ही आम्हाला पण कायतरी शिकवा." दुसरे दिवसापासून रात्री जेवायला गेल्यावर मी गणपती स्तोत्र आणि भवानी अष्टक शिकवणं सुरु केलं. मुलाना एकेक करीत मारुती स्तोत्र, नवग्रह स्तोत्र, गणेश पंचरत्न स्तोत्र , गणपती अथर्व शीर्ष शिकवलं. रोज दिवे लागणीच्या वेळी अदलून बदलून एक स्तोत्र म्हणायचा प्रघात सुरू झाला. जीजीनी ही गोष्ट मुंबईतल्या भावानाही कळवली. दीड महिन्याने मी फडके सराना घेवून जीजींकडे भाडं नी खानावळीचा विषय काढला. त्यावर जीजीा सराना म्हणाले," भाडं म्हणाल तर सर रोज आमच्या सहा पोराना दोन दोन तास शिकवतात. त्याचीच परतफेड आम्ही करणं लागतो. त्याही पेक्षा आमच्या मुलांवर सर जे संस्कार करताहेत ते ऋण तर पैशात फिटणारं नाही. आमच्या घरात देवाधर्माचं व्हायला लागलं ते सरांमुळे . जेवणाचं म्हणाल तर तो विषय माझा नाही. ते तुम्ही मोठ्या आईला विचारा नी काय ते तिच्याकडेच पुरं करा." रात्री जेवताना मी मोठ्या आईना बोललो त्यावर त्या म्हणाल्या," तुमच्यामुळे आम्हाला रोज ब्राह्मण जेवायला घालायचं पुण्य मिळतं आहे. तुमच्यामुळे आमच्या घराला घरपण आलं. देवाचं नाव घेतलं जातं. त्याची किंमत कशी करणार? उद्या तुमचं लग्नकार्य झाल्यावर तुम्ही वाड्यावर थोडेच जेवायला येणार? दोन तीन वर्षाचा तर प्रश्न आहे. "
आई भाऊनी मला ग्राम देवता गिरिमा देवीला खण नारळ ठेवून दर्शन घ्यायला सांगितलेलं होतं. तीन दिवसानी रविवारी देवीच्या देवळात जावून यायचा बेत मी केला. सोबत जीजींच्या सतिशला न्यायचं ठरवलं. शुक्रवारी नववीतल्या प्रमोद पाध्येने वडिलांची - बाबा पाध्येंची चिट्ठी दिली. पाध्ये कुटूंबीयांविषयी मी जीजींकडून ऐकून होतो. तेही पाच भावांचं मोठं कुटुंब.त्यांच्यातले बंडू मास्तर यानी पन्नास साठ गाई बाळगलेल्या. गाई कायम मोकळ्या असायच्या. फक्त लहान वासराना गोठ्यात बंदिस्त ठेवीत . पण इतर गाई नी बैल याना कधीच दाव्याने बांधित नसत. ते गाय गुरांचा विक्रा करीत नसत. गरजूना गाय , बैल ,पाडे फुकट देत. अट एकच. नेलेलं जनावर कसायाला विकायचं नाही. नेणाराला ते नकोसं झालं तर परत आणून सोडायचं. गुराना रात्री एका गोठणीत कोंडून ठेवीत. गिरिमा देवीला जाताना वाटेत बंडू मास्तरांची गोठण लागे, ती पंचक्रोशीत प्रसिद्ध होती. बाबा पाध्यानी मला रविवारी जेवायला बोलावलं होतं. रविवारी मला न्यायला प्रमोद यायचा होता.
ठरल्या प्रमाणे सकाळी साडे आठ वाजता प्रमोद आला. मी तयारच होतो. दहा मिनिटात आम्ही बाहेर पडलो. देवीची पूजा पाध्यांकडेच असल्याने आधी त्यांच्या घरी जावून मग देवळात जायचे असे प्रमोद बोलला. पाध्यांकडे जायला अर्धा तास लागला. पाध्यांचे राजांगण असलेले चौसोपी घर बघून मी हरखूनच गेलो. आम्हाला पाहताच बाबा आणि बंडू मास्तर स्वागताला पुढे आले. अंगणात एका बाजूला पाटाचे पाणी नी त्याखाली चिऱ्याची दोण होती. आम्ही हात पाय धुवून ओसरीवर गेलो. प्रमोदची आई गुळ पाणी घेवून आली. माणसं प्रेमळ नी बोलकी..... पाचच मिनिटात माझा संकोच पळून गेला. पोहे फोडणीचे की दडपे अशी पृच्छा केल्यावर मी दडप्या पोह्यांची फर्माईश केली. पंधरा मिनीटात भरपूर खोबरं घातलेले पोहे आले. सोबत शहाळ्याच्या साईचा भलामोठा तुकडा नी स्टीलच्या लोट्यात साध्या पाण्या ऐवजी शहाळ्याचं पाणी आलं. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. बंडू मास्तर उमेदवारीच्या काळात आरंभीची पाच वर्षं कालवीला होते. ते शाळेलगत भिड्यांकडे रहायला होते. आमच्या कडे चार पाच वेळा समाराधनेला भट म्हणून आलेले.
पोहे झाल्यावर बाबा पाध्येंबरोबर मी देवळात निघालो. त्यांच्या मागिलदाराहून घाटी चढून वर गेल्यानंतर दोन तीन घडघड्या धोंड्यांची कोंढाळी नी दोन गवताने शाकारलेले मोठे मांगर दिसायला लागले. एक कोंढाळं आटपसूर , त्यात भातयाण आणी करड गवताच्या गंजी होत्या. दुसरं कोंढाळं खूपच ऐसपैस होतं. तीच बंडू मास्तरांची प्रसिद्ध गोठण. सोळा वाव व्यास असलेल्या त्या गोठणी भोवती पाच हात उंचीचा मोठ्या अनगळ धोंड्याचा भक्कम गडगा होता. आत जायला दोन हात रुंद बेळं होतं, नी ते बंद करायला शिरडीची गच्च तटकी होती. तिन्हीसांजेला दूध काढून झाल्यावर गुराना आत कोंडून तटकी लावून घेत. सकाळी भिणभिणताना दोन गडी नी घरचा कोणीतरी वर येवून गाईना बाहेर काढी. दुभत्या गाईंची दुधं काढून वासरं लुचल्यावर त्याना मांगरात घालीत. व्यायला झालेल्या गायी, आजारी गुरं रातीवळ्याला वासरांच्या मांगरात बाजुच्या पडवीत बंदिस्त ठेवीत. जवळ जवळ वीस पंचवीस दुभत्या गाई होत्या. त्यांची एक पाखल पिळीत नी बाकी दुध वासराना ठेवीत. दुसऱ्या मांगरात पेंड पोती, भाताचे मुडे असत. आम्ही गेलो तेंव्हा गाईना पेंड घालायची वेळ झालेली होती. सगळ्या गाई. पाडे मधल्या मांगरा भोवती जमलेले होते. सगळी जनावरं चांगली गुडगुडीत नी तल्लख दिसत होती. पांढऱ्या, काळ्या, ढवळ्या, तांबूस नी कसऱ्या, कबऱ्या रंगाची ती गायरं दशक्रोशीत कां प्रसिद्ध होती ते त्याना बघितल्यावर मला कळलं. गड्यानी दोन पेंड पोती बाहेर आणून कातळात मारलेल्या चार आंगळं खोल चरीत ओतली जाई. उन्हाळी सिझनला दुपारी गवताच्या गोठणी बाहेर भातयाण - करड गवत टाकीत ते खावून गायरं आजू बाजुला हापूस कलमं, रायवळ आंबे, ऐन - धामण- हसाणी च्या झाडांखाली रवंथ करीत बसत. गोठणी जवळ आणि मधल्या मरडात असे दोन ठिकाणी दोन प्रचंड मोठे वड होते. चाळीस एकरांच्या त्या बंदिस्त प्लॉट मध्ये गायरं मोकळेपणी फिरत. त्याच प्लॉट मध्ये पायथ्याला पाध्यांचा चौसोपी वाडा होता.
गिरिमादेवीच्या देवळाजवळून वहाणाऱ्या बारमाही व्हाळापासून दोन हात रुंद, हात भर खोल पाटातून चोवीस तास पाणी यायचं. गुराना पाणी पिण्यासाठी पाटाकडेला तीन चार ठिकाणी दोन हात औरस चौरस नी वीत भर उंच पाषाणी दोणी बसवलेल्या होत्या. तो पाट पार खाली वाड्याच्या मागे पर्यंत गेलेला होता. संपूर्ण पाट चिऱ्याच्या धडीव वळीवानी बांधलेला होता. घराखाली मळ्यात शंभर माड, दीडशे पोफळी, केळी नी चार भांग्यात ऊस लावलेला असे. केळीची पाने, उसाची पात, वाड्याच्या मागील बाजूला नेवून टाकीत ती खायला सकाळी गायरं खाली उतरत असत. गोठणी जवळून पुढे हाकेच्या अंतरावर गिरिमा देवीचे भव्य मंदिर होते. मंदिराला तीन गोपूरं होती. मधल्या गोपूराखाली गिरिमा देवीचा गाभारा होता. एका बाजूला छोटा नंदी नी समोर काळवत्री शंकराची पिंडी होती. मंदिरात प्रवेश केल्यावर लांब रुंद ऐस पैस सभागृह, दोन बाजूना वीस हात लांब चिरेबंदी बळाणी मध्यभागी चार फुटी नक्षीदार प्रवेशद्वार, त्याच्या दोन्ही बाजूना लाल पाषाणात कोरलेले पूर्णाकृती कमनीय जय विजय होते. प्रवेशद्वाराच्या पायऱ्या चढल्यावर गाभाऱ्ऱ्याच्या मागील भिंतीत कोनाड्यात पुरुषभर उंच पाषाणात कोरलेली देवीची चतुर्भुज उभी मूर्ती. पहाताक्षणीच देवीची उग्र मुद्रा पाहून माझी छाती दडपून गेली. बाबांचे धाकटे भाऊ भाई काका देवी सूक्ताची आवर्तनं करीत होते.
देवीच्या पाया पडल्यावर मी नेलेली ओटी देवीला मानवून बाबानी कडकडीत गाऱ्हाणे घातले.नारळ फोडून प्रसादाची कवड दिली. मग गाभाऱ्ऱ्यासमोर बसून मी सुद्धा भाईकाकांबरोबर खणखणीत सुरात देवीसूक्त म्हणायला लागलो. सगळेजण कौतुकाने पहा तच राहिले. तीन आवृत्या झाल्यावर भाईंची आवर्तनं पुरी झाली. मग बाबांबरोबर सगळा आवार फिरून बघितला. मंदिराच्या मागिल बाजूला हाकेच्या अंतरावर केगदीचं बन होतं. तिथे कमरभर खोल नी दोन वाव औरस चौरस कोंड होती नी मागच्या बाजुला दोन पुरुष उंच नी चार वाव रुंद काळवत्री शीळा होती. शीळेच्या साधारण मध्यात तळाकडे हातभर उंच ,नी चार आंगळं खोल कोनाड्या सारखी घब होती नी मोठा तडा गेलेला दिसायचा. त्या कोनाड्यातून मनगटा एवढी स्वच्छ पाण्याची धार पडत असायची. बारा महिने त्यात वाढ की घट व्हायची नाही असं बाबानी सांगितलं. तेच पाणी वहाळातून वहात गिरिमा देवीच्या मंदिराला वळसा घालून खाली गावदरीत जावून पुढे दर्याला जाऊन मिळत असे. पाऊस काळ संपता संपता गावात दोन ठिकाणी वहाळाला बांध घालून पाणी अडवीत. उन्हाळी भाजीपाला पिकवता येत असे. गावातली दोनचार एकवशी घरं सोडली तर अख्ख्या गावाला बारमास पाटाचं पाणी मिळायचं.
दुपारी मोदकाचं जेवण केलेलं होतं. मोदकांसोबत एका द्रोणातून नारळाचा आपरस नी एका द्रोणातून तुप होतं. सुरुवातीला जेवणारानी वरणभातावर नारळाचा आपरस ओतला. मला हे नवीनच होतं. आपरस घातलेल्या वरणभाताची चव पक्वान्नालाही मागे टाकणारी होती. मी संकोच बाजूला ठेवून पुन्हा भात मागून घेतला. सगळ्यानी अगदी आग्रह करकरून मोदक वाढले. शेवटी दहीभाताला पोटात जागाच राहिली नाही. मी दह्याची कवडी खाल्ली नी आपोष्णी घेवून उठलो. जेवण अगदी तटी लागेतो झाले होते. पान खावून गप्पा झाल्यावर बंडूमास्तर पत्त्याचे कॅट घेवून आले. भाई म्हणाले, "सहा जणात लॅडिस खेळूया". मला पत्ते खेळायला आवडे. पण जेवण एतके अंगावर आले होते की पडस्थळ मारण्यावाचून गत्यंतर नव्हते. मी स्पष्टच सांगून टाकले की, " मला पत्ते कुटायला आवडतात पण तुम्ही सगळ्यानी आग्रह करकरून इतके मोदक खायला घातलेत की जेवण अगदी अंगावर आले आहेत. आत्ताच डोळे मिटायला लागलेहेत. मी जरा आडवा होणार. सगळे खळखळाऊन हसले. नी बाबा मला ओसरीवरच्या खोलीत झोपायला घेवून गेले.
25 जुनला एस्.एस्. सी. चा रिझल्ट लागला. अ -ब दोन्ही तुकड्या मधल्या 67 मुलांपैकी इंग्रजीत 13 मुलं पास झाली तेवढा म्हणजे 19.40% एवढा शाळेचा रिझल्ट लागला. या वर्षी दोन्ही तुकड्यांत 71 मुलं होती. त्यातली जेमतेम 15 मुलं उद्धरणारी होती. उगाच टपसरण नको म्हणून मी दोन्ही तुकड्यांची 50 गुणांची चाचणी घेतली. कॉम्प्रीहेन्शन पॅसेज म्हणजे उताऱ्या वरील प्रश्न 10 गुण, भाषांतर 8 गुण आणि ट्रान्सफॉर्मेशन - सिंथेसिस 32गुण अशी प्रश्नपत्रिका होती. परीक्षेत 18 ते 20 गुण मिळवून 14 मुलंपास झाली. 8 मुलानी 12 ते 14 गुण मिळवले आणि उरलेलल्या 49 मुलाना 2 ते 10 गुण मिळाले होते. मी हेडसराना गुणपत्रक दाखवलं. मी काही बोलण्या आधीच सर म्हणाले, " यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. पुढच्या वर्षी तुमच्या प्रयत्नांमुळे 22- 23 मुलं पास झाली तरी पुरेसं आहे. तेवढं तुम्ही नक्की कराल याची मला खात्री आहे. त्यासाठी तुम्हाला जे प्रयत्न करावेसे वाटतात ते तुम्ही करा. आमच्याकडून जे सहकार्य पाहिजे असेल ते फक्त सांगा.
दोन दिवसां नंतर मी शाळा सुरु होण्याआधी 9 ते 10.30 या वेळेत दोन्ही तुकडीतल्या मुलांसाठी जादा मार्गदर्शन वर्ग सुरु केले. जादा तास सुरु झाल्यावर मी नंदाला संध्याकाळच्या क्लासला येण्याची गरज नाही असे म्हणालो. पण ती रोज नेकीने यायची. क्लासला मी दिलेला गृहपाठ पुरा करून माझ्याकडून तपासून घ्यायची. इंग्रजी च्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप विचारात घेवून व्याकरण आणि निबंध, पत्र लेखन आणि उताऱ्या वरील प्रश्न यांचा सातत्याने सराव करून घ्यायचे ठरवले. जुन्या मार्च ऑक्टोबर च्या प्रश्न पत्रिका, अपेक्षित प्रश्नसंच यांचा संदर्भ घेवून 3 स्वतंत्र वह्यांमध्ये रोज द्यायच्या सरावाचे वर्ग पाठ नी त्यावर आधारित गृह पाठ अशी वर्गवारी करून साहित्य संग्रहित केले. त्याप्रमाणे जादा तासाना सराव करून घ्यायला लागलो. तासाच्या सुरुवातीला काल घरी दिलेल्या ग्रहपाठाची उजळणी नी नंतर नवीन सराव मी देत असे. हेडसर जातीनिशी मुलांच्या उपस्थितीवर लक्ष देवून असायचे. तसेच मी संकलित केलेल्या वह्या ही त्यानी चाळून बघितल्या." तुम्ही अगदी पैजेचा विडा उचलावा अशी तयारी केलेली आहे. मी अगदी निश्चिंत आहे. तुमच्या कष्टाचे चीज करीन."
जुलै अखेर सरानी 10 वीतल्या मुलांच्या पालकांची सभा लावली. ज्याचे पालक येणार नाहीत त्याचे नाव काढून टाकण्यात येईल अशी तंबी दिल्यामुळे सर्वांचे पालक सभेला हजर होते. सुपरवायझर मोर्वेकर सरानी माझा परिचय करून दिला. मी घेतलेल्या चाचणी मुलानी काय दिवे लावले आहेत त्याची कल्पना दिली. हेडसरानी मी किती कष्ट घेवून नियोजनबद्ध मार्गदर्शन वर्ग घेत आहे याची कल्पना दिली. शहरात जादा क्लासचे चालक किती फी उकळतात ते सांगून इंग्रजी गणिताचे जादा मार्गदर्शन करणाऱ्या सराना फुल ना फुलाची पाकळी दरमहा 20 रुपये मानधन जे सधन पालक आहेत त्यानी शाळेकडे जमा करावे असे आवाहन केले. "ज्याना शक्य नसेल त्यानी फी देवू नये मात्र जादा तासाला मुले पाठवा, "असे सांगितले. रक्कम अल्प असल्यामुळे पालकानी मान्य केले एवढेच नव्हे तर जीजी राणे, बाबा पाध्ये, तातू भंडारी या पालकानी सराना सांगितले की, "जे कोणी पालक परिस्थितीमुळे देणार नाहीत त्यांची फी आम्ही तिघे जण देवू." पहिल्या महिन्याची फी पालकानी तात्काळ जमा केली.
पुढच्या आठवडा भरात मार्च मध्ये नापास झालेली मुलंही हेडसरांची परवानगी घेवून जादा तासाला येवू लागली. या रिपिटर मुलांसाठी पुस्तकातले धडे कविता यांच्या प्रश्नांचा सराव करून घेण्यासाठी शनिवारी दुपारी 2 ते 4 यावेळेत जादा तास सुरु केला. मी दर 15 दिवसानी झालेल्या भागाची चाचणी घेवू लागलो. दोन तीन महिन्यानी प्रगती मध्ये लक्षणीय बदल दिसू लागला. 10 -12 मुलं पन्नास पैकी 28 ते 35 गुण मिळवीत. तर सुमारे 15 मुलं 20 ते 25 गुण मिळवू लागली. विषेश म्हणजे परीक्षा- पेपर हे भीती मुलाना वाटेनाशी झाली. उलट परीक्षा झाल्यावर दुसरे दिवशी उत्तर पत्रिका तपासून दिल्या नाहीत तर मुलं नाराज होत. तासाला अनुपस्थितीची समस्याही वर्षभरात कधीच जाणवली नाही. जादा तासाला येणाऱ्या रिपीटर मुलांपैकी दहा जण ऑक्टोबर च्या परीक्षेत पास झाले. फेब्रुवारीत पूर्व परीक्षेत 32 मुलं चांगली पास झाली चार मुलानी 25 पेक्षा अधिक गुण मिळवले. म्हणजे या वर्षी 40 % निकाल नक्की लागेल असा मला विश्वास वाटू लागला. सहामाहीला राणेंची माझ्याकडे शिकवणीला येणारी नववीतला सतीश, आठवीतली नीता यानी इंग्रजीत सत्तर गुण मिळवले नी पुढे वर्गातही दोघांचा गुणानुक्रमे पहिला नंबर आला. दहावीतल्या नंदानेही इंग्रजीत वर्गात सर्वाधिक म्हणजे 68 गुण मिळवले. याआधी तिला कधीही 40 वर मार्क मिळालेले नव्हते. बाकीची तीन मुलं सहावीतला दीपक , नेत्रा आणि सातवीतली अनिता यांच्या कडून मी धड्याखालच्या एक्झरसाईझ सोडवून घेत असल्यामुळे त्यानीही इंग्रजीत साठच्यावर गुण मिळवून दाखवले. मी रात्री जेवायला गेल्यावर मोठ्या आईना हाक मारून मुलांचे पेपर दाखवले. "आमची मुलं कधि असं नेत्रदीपक यश मिळवतील अशी स्वप्नात सुद्धा अपेक्षा केली नव्हती. सतीश तर एक नंबरचा उनाड, त्याचे मार्क बघून जीजीना बहुतेक कांदे लावावे लागतील." मोठ्या आई म्हणाल्या.
आता मी गावात चांगलाच रुळलो होतो. महिन्यातून एखाद्या शनिवारी घरी खेप असे. एरव्ही शनिवारी वसतीला माझ्या मावशीची नणंद आशा आत्ते कडे म्हणजे गादववाडीत जोशांकडे जाई. त्यांच्या घरातली दोन मुलं हायस्कूलला होती. मी रविवारी दुपारी पाध्यांकडे जाई . हा अगदी ठरीव कार्यक्रम असे. नवरात्रात देवीच्या देवळात घटी बसायचा. ललिता पंचमीला नी दहाव्या दिवशी तर मला ब्राह्मण भोजनासाठी निमंत्रण होते. अर्थात हायस्कूल पासुन मंदीर पंधरा मिनीटाच्या चालीवर असल्यामुळे चौथा पिरियड अ‍डजस्ट करून मधली सुटी साधून मी जावून जेवून आलो. पौष दशमी ते पौर्णिमे पर्यंत पाच दिवस देवीचा वार्षिकोत्सव नी जत्रा असे. रात्री आठ वाजता पालखी काढीत.त्यावेळी देवीचे अवसर उभे रहात. मंदिराला तीन प्रदक्षिणा झाल्यावर पालखी आत आल्यावर आरती असे.नी त्या नंतर पडस्थळे असत. म्हणजे आलेले भक्तगण देवीचा संचार झालेल्या अवसराला आपल्या समस्या सांगत नी अवसर त्याना काय काय तोडगे सांगत. हे काम मध्यान रात्री पर्यंत चाले. यात्रेला प्रचंड गर्दी व्हायची. यात्रेला टुरिंग टॉकीज यायची. आदल्या दिवसापासून जत्रा उठे पर्यंत रोज सहा ते साडे आठ पहिला खेळ , पालखी झाल्यावर साडेनऊ ते बारा दुसरा खेळ होई. दरवेळी वेगळा सिनेमा असे. मी रोज दुसरा शो बघित असे. यात्रेच्या पाच दिवसांसाठी आडबंदराहून पाच सहा होड्या गिरावळीच्या बंदरावर असत नी यात्रेला येणाऱ्या भाविकाना मोफत अलिकडे पलिकडे सोडण्यात येई. अर्थात तांडेल पाण्यात उतरून रशी ने होडी ओढित न्यायचा. यात्रेला लांब लांबचे व्यापारी दुकानं घेवून यायचे. यात्रेचे पाचही दिवस दुपारी रात्री महाप्रसादाची सोय असायची. मी रोज रात्री महाप्रसादाला जायचो.
बघता बघता आठ-नऊ महिने कसे गेले कळलेच नाही. 28 फेब्रुवारीला दहावी चा सेंडॉफ झाला नी मला खुपच मोकळीक मिळाली. मी अप्रशिक्षित असल्यामुळे 31 मार्चला मला सेवा खंडित केल्याची नोटिस दिली असली तरी." नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून तुम्हाला हजर करून घेवू. तुमची सेवा खंडित होवू देणार नाही "असे वचन हेडसरानी दिले नी पुढची तीन वर्षे ते पाळले. एक मे ला रिझल्ट लागले नी उन्हाळी सुटी सुरु झाली. मी आठदहा दिवस सुटी घेतल्यावर अकरा मे पासून दहावीचे जादा क्लास जाहीर केले. रोज सकाळी आठ ते अकरा तीन तास इंग्रजीचे तास सुरु झाले. ह्या बॅचची हालतही मागच्या बॅच सारखीच होती. नववी अ ब माझ्याकडेच असल्याने त्यांची तयारी चांगली होती. सकाळी क्लास आटोपल्यावर संध्याकाळी मी देवळाकडे फिरून येत असे. जीजींच्या सतीशलाही आता अभ्यासाची चांगलीच गोडी लागल्याचं मला जाणवलं.
सहा जुनला शाळा सुरु झाली. दिवसभरचं रुटीन सुरु झालं. आता वेध लागले होते ते दहावीच्या रिझल्टचे.तेरा जुनला रिझल्ट शीट आणायला गोसावी क्लार्क रत्नागिरीला गेले. चौदा तारीखला संध्याकाळी सहाच्या गाडीने ते यायचे होते.हेडसरां सह आम्ही सगळे शिक्षक तरीवर जावून थांबलो. साडेसहाला गोसावी येताना दिसले. हाकेच्या टप्प्यात आल्यावर ते ओरडून म्हणाले बेचाळीस टक्के......एकोणतीस मुलं पास झाली. तेवढाच रिझल्ट गणिताचा. इंग़्रजीत 34 मुलं पास . यंदा गणितापेक्षा इंग्रजीचा रिझल्ट जास्त आहे. गोसावी पलिकडे आल्यावर त्यानी विषय निहाय आकडेवारी लिहिलेला कागद सरांकडे दिला. संस्कृतमध्ये सर्वाधिक 52 मुलं पास झाली होती. त्या खालोखाल मराठीत 51, इतिहास भुगोलमध्ये 44, हिंदीत 42. विज्ञानात 50,इंग्रजीत 34 आणि गणितमध्ये सर्वात कमी 29 मुलं पास झाली होती. भाईंची नंदा 78% गुण मिळवून पहिली, 76% मिळवून असवडेकरांचा मोहन दुसरा नी अजित गुरव 69% मिळवून तिसरा आला. नंदाने इंग्रजीत पूर्व परिक्षेपेक्षा 3 गुण अधिक म्हणजे 74 गुण मिळवले होते.
शाळेत पन्नासेक पालक आलेले होते. सरस्वतीसमोर नारळ ठेवून सरानी नमस्कार केला नी देवीसमोर पेढ्यांची डिश ठेवली. "यंदा प्रथमच शाळेचा नेत्रदीपक म्हणजे 42 टक्के रिझल्ट लागलाहे. जेवढा गणिताचा निकाल तेवढाच शाळेचा निकाल आहे, दरवर्षी आम्ही इंग्रजीत मार खात असू यंदा देसाई सरानी बाजी मारली शाळेच्या निकालापेक्षा इंग्रजीचा निकाल सहा टक्क्यानी जास्त आहे. आता काळोख पडला आहे. मार्कलिस्ट उद्या दहा वाज्ल्या नंतर मिळतील." गोसावी तीन किलो पेढे घेवून आलेले होते. आलेल्या सर्वाना पेढे वाटल्यावर शाळा बंद करून सगळे बाहेर पडले . मी जीजींबरोबर घराकडे निघालो. मी नंदाचे मार्क लिहून घेतलेले होते. आम्ही घरी पोचलो तेव्हा सगळी माणसं ओटीवर जमून आमची वाटच पहात होती. मी नंदाचे विषय निहाय गुण वाचून दाखवले. जीजी म्हणाले, " हायस्कूल सुरु झाल्यापासून प्रथमच आमच्या घराण्याचा झेंडा नंदाने लावला. यापूर्वी असवडेकरांचा मोहन दरवर्षी चार पाच टक्के जादा मिळवून पहिला यायचा नंदा दुसरा किंवा तिसरा नंबर मिळवी. यंदा देसाई सरांच्या मार्गदर्शनामुळे तीचे मार्क वाढले. आमच्या घरातली तीन मुलं यंदा वर्गात पहिली आली. ही सगळी सरांची कृपा आहे. मी आमच्या कुटुंबाकडून सरानी छोटीशी भेट देणार आहे." जीजी पाच मिनीटानी पाकीट आणि श्रीफळ घेवून बाहेर आले. सर, ही छोटीशी भेट आहे, ती तुम्हाला घ्यावीच लागेल. आमचा मान राखायचा म्हणून ही घ्या." मला नाही म्हणणं शक्यच नव्हतं.जेवून घरी गेल्यावर पाकिट उघडलं आत दोनशे रुपये होते.
दुसरे दिवशी प्रार्थनेच्या वेळी सरानी सर्व शिक्षकांना धन्यवाद दिले. माझे खूप कौतुक केले. पास झालेली मुलं मार्कलिस्ट घेतल्यावर भेटायला येवून पाया पडून जात होती. मधल्या सुट्टीत सरानी मला केबिनमध्ये बोलावून घेतले. पालकांकडून जादा मार्गदर्शनापोटी जमा केलेल्या रक्कमेतला निम्मा वाटा गणित शिकवणाऱ्या बागुल सरानी घेतला होता पण मी ती रक्कम घेतलेली नव्हती. रिझल्ट चांगला लागला तर मी ती रक्कम घेईन असे म्हणालो होतो. म्हणून ती रक्कम सरानी बाजुला करूत ठेवलेली होती." देसाई सर , तुमचे कष्ट सत्कारणी लागले. तुम्ही जे कष्ट घेतलात त्यापुढे ही रक्कम नगण्य आहे. बहुमान म्हणून हे पैसे घ्या." मी पैसे घेतले. एक रकमी साडेपाच हजार ही माझ्यासाठी खूप मोठी रक्कम होती.अलिकडे राणेंच्या घरातली दुसरीत जाणारी गीता नी तिसरीत जाणारा संदीप दोन मुलंही हट्ट करून मोठ्या भावंडांबरोबर संध्याकाळी शिकवणीला यायला लागली. मी अधून मधून त्याना इंग्रजी अल्फाबेट शिकवायला सुरुवात केली. काही दिवसानी सोपी सोपी इंग्रजी वाक्य बोलायचा सराव द्यायला लागलो. हळू हळू त्याना सोप्या ऑर्डर समजू लागल्या.मोठ्या भावंडांच्या इर्ष्येने गीता नी संदीप मी शिकवलेला शब्दन् शब्द मुखोद्गत करीत. त्याना दोन्ही लिप्या लिहिता यायला लागल्या. मी त्यांना पाचवीच्या इंग्रजीच्या पाठ्य पुस्तकातले कॉन्वर्सेशन पॅसेज शिकवी. पाच सहा महिन्यात त्याना सोपी वाक्यं समजू लागली नी बोलता लिहिता येवू लागली. घरी गेल्यावर क्लासमध्ये मी शिकवलेली वाक्यं बोलून दाखवून मुलं घरच्याना चकित करीत.
बघता बघता तीन वर्षे कधी मागे पडली ते कळलेच नाही. नोकरी टिकवायची तर बी, एड्. करणे भाग होते. पण त्यावेळी बी.एड्. प्रवेश मिळणे आणि वर्षभर उत्पन्न बंद ठेवून आठ दहा हजार खर्च करणे कुवती बाहेरचे होते. पण उपरवाला देता है तो छप्पर फाडके देता है ही म्हण सार्थ ठरावी असा जी. आर. महाराष्ट्र सरकारने काढला. डिसेंबर76 पूर्वी सेवेत रुजु झालेल्या अप्रशिक्षित शिक्षकांसाठी शासकीय बी. एड्. महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात येईल आणि प्रशिक्षणासाठी विनावेतन रजा देण्यात येईल, असा तो जी. आर. होता. शासनाने जिल्हानिहाय सर्व अप्रशिक्षित शिक्षकाना शासकीय बी.एड्. महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला. मला पुण्याला प्रवेश मिळाला. फी शासकीय दराने असल्याने परवडणारी होती.
मी बी.एड्. पूर्ण करून विद्यापीठाची परीक्षा झाल्यावर एक एप्रिल पासून शाळेच्या सेवेत हजर झालो. त्या वर्षी मोठ्या मुश्किलीने पंधरा जुलै ला इंग्रजीचा शिक्षक मिळाला होता. सरानी माझ्या वह्या त्याना दिल्या. मी कशी तयारी करून घेत असे तेही समजून सांगितले. स्वत: लक्ष देवून माझ्या पद्धती प्रमाणे तयारी करवून घेतली होती खरी, पण माझ्या ऐवजी आलेले बोरवणकर अगदीच सो सो होते. "धर कुत्र्या कर पारध" असे म्हणून शिकार थोडीच होते? शेवटी व्हायचे तेच झाले. रिझल्ट १८ टक्क्यावर आला. निकाल पत्रक बघितल्यावर कपाळावर हात मारून घेत हेडसर बोलले, "शेवटी तुकाराम महाराज म्हणतात तेच खरं आहे. तेथे पाहिजे जातीचे! इंग्रजीची रिझल्ट सुधारणे हे‌ येरा गबाळ्याचे काम नोहे."
************