कामीनी ट्रॅव्हल - भाग ३४ Meenakshi Vaidya द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कामीनी ट्रॅव्हल - भाग ३४

कामीनी ट्रॅव्हल्स भाग ३४

प्राची ऑफीससाठी जशी घराबाहेर पडली तसा तन्मय भय्यासाहेबांपाशी आला आणि म्हणाला

"आजोबा आपल्या घराजवळच्या बगीच्यात जाऊ. माझे सगळे मित्र आलेत तिथे. त्यांना तुमच्याकडून डिटेक्टीव्ह स्टोरी ऐकायची आहे.चलानं"

तन्मय गयावया करू लागला. हे त्यांचं बोलणं कामीनी बाईंनी ऐकलं आणि हातातलं काम तसंच ठेऊन त्या समोरच्या खोलीत आल्या.

"तन्मय आईनी काय सांगीतलं आहे लक्षात आहे नं? का विसरलास?"

" आजी बगीचा तर घराजवळच आहे. आज शंकर नाही प्रदीपदादा आहे नं!"

" नको. प्राची नाही जायचं म्हणाली नं मग नको."

कामीनी बाईं ठामपणे म्हणाल्या.तसा तन्मयचा चेहरा पडला. त्याचा पडलेला चेहरा बघून भय्यासाहेबांना वाईट वाटलं.ते म्हणाले.

"अगं घराजवळच आहे बगीचा आणि प्रदीप पण आहे बरोबर एक तासाभरात परत येऊ. चलरे लगेच तोंड पाडून बसू नकोस."

तन्मय खूष झाला. दोघेही तडक पायात चप्पल अडकवून बाहेर पडले.

तन्मय आणि भय्यासाहेब गाडीतून गेटबाहेर पडले तेव्हाच विश्वास रागानी त्यांच्याशीच भांडायला येत होता.त्यांना बाहेर पडताना बघून विश्वास घरी न जाता त्यांचा पाठलाग करू लागला.

त्यांची गाडी घराजवळच असलेल्या बगीच्यापाशी थांबली. तसा विश्वासही थांबला. भय्यासाहेब आणि तन्मय गाडीतून उतरून बगीच्यात शिरले..प्रदीप मात्र गाडीतच थांबला.

विश्वास प्रदीपला आपण दिसणार नाही अश्या त-हेने बगीच्यात शिरला. तो शिरुन ही मंडळी कुठे बसली आहे हे शोधतो. तेव्हा भय्यासाहेब त्या मुलांना काहीतरी सांगत असतात आणि मुलं हसत असतात. ही मुलं बहुदा तन्मयचे मीत्र असावेत.

थोड्यावेळाने ते मीत्र निघून जातात तोपर्यंत विश्वास कंटाळला होता पण तरी तो थांबलेला असतो.ते मीत्र गेल्याबरोबर हा भय्यासाहेब आणि तन्मय जिथे बसलेले असतात तिथे धडकतो.

थोड्यावेळ दोघांच्याही लक्षात येत नाही विश्वास तिथे आल्याचं.विश्वास बोलतो तेव्हा दोघांचं लक्ष त्याच्याकडे जातं.

"" वा! हे छान आहे.मला पैसे द्यायची टाळाटाळ करायची आणि तुम्ही मस्त बगीच्यात फिरायचं"" यावर भय्यासाहेब म्हणाले,

"तुला आम्ही पैसे का म्हणून द्यायचे?"

" का म्हणजे दिलेत ना इतकी वर्ष? मग आता आम्हाला गरज आहे तेव्हा का नाही म्हणता? पैसे काय मरताना काखोटीला बांधुन नेणार का?"

विश्वास गुर्मीत बोलत होता. जणूकाही भय्यासाहेबांनी विश्वास कडून कर्ज काढलं आहे.

" पैशाची गरज आहे तर करा मेहनत.माझ्या पैशाच्या जिवावर स्वत:चं कुटूंब पोसणार का?"

भय्यासाहेब जरा जरबेच्या सुरात बोलले. त्यांचं बोलणं संपतं न संपतं तोच विश्वासने त्यांची काॅलर पकडतो. या त्यांच्या कृतीमुळे भय्यासाहेब जरा डगमगतात.ते बघून तन्मय ओरडतो.

"हे काय करताय तुम्ही? आजोबांची काॅलर सोडा."

विश्वास दुस-या हातानी तन्मयचीपण काॅलर पकडतो.

"म्हाता-या गपगुमान दर महिन्याला पैसे द्यायचे मला. पोलीसात तक्रार करून उपयोग नाही. कळलं. तू सोन्याची कोंबडी आहे माझी म्हणून तुला सोडतोय.कळलं?"

विश्वासच्या या दटावणीनी भय्यासाहेब घाबरले नाहीत पण त्यांचा राग प्रचंड वाढला.त्यामुळे त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडत नव्हता. विश्वासने त्यांची काॅलर सोडता क्षणी भय्या साहेब धडपडत त्या सीमेंटच्या बेंचवर पडले.

" म्हाता-याची अर्धी अधिक वाकडं स्मशानात गेली तरी पैशाचा मोह सुटत नाही.परवा येतो पाच लाख तयार ठेव."
अशी दमदाटी करून तन्मयची काॅलर सोडून निघून जातो.

घाबरलेल्या तन्मयच्या जरा वेळानी लक्षात येतं की भय्यासाहेब कसतरी करतात आहे.त्यांचं बीपी चांगलच वाढलं होतं. त्यांनी घाई घाईनी प्रदीपला फोन लावून लगेच बगीच्यात बोलावलं

प्रदीप येऊन बघतो तर भय्यासाहेब विचीत्र अवस्थेत दिसतात. लगेच दोघं त्यांना कारमध्ये घालून जवळ असलेल्या शुभनिवास या दवाखान्यात दाखल करतात.

त्यांना इमर्जन्सी मध्ये ॲडमीट केल्यावर तन्मय प्राचीला फोन करून सगळं सांगतो.

प्राची तन्मयवर खूप चिडली.तन्मय साॅरी म्हणाला .पण प्राचीचा राग काही शांत झाला नाही. ती यादव आणि संदीपला सांगून ऑफीस मधून ती आणि हर्षवर्धन शुभनिवास हाॅस्पीटलला पोचतात.

भय्यासाहेबांना आयसीयू मध्ये ठेवलेलं असतं. दवखान्यात पोचताक्षणी ती रेसीडेंन्शीयल डाॅक्टरना भेटते. भय्यासाहेब खूप क्रिटीकल नाहीत पण त्यांचं बीपी खूप वाढल्यामुळे दोन दिवस तरी ऑब्झरवेशन साठी ठेवावं लागेल.असं ते डाॅक्टर तिला सांगतात.

प्राची प्रदीपला कामीनी बाईंना आणायला घरी पाठवते.
ती तन्मय जिथे बसला असतो तिथे त्यांच्या बाजूला जाऊन बसते. तन्मयचं तिच्याकडे लक्ष जाताच घाबरतो.

" तन्मय मी परवाच तुला सांगीतलं होतं. की नीट वागायच़.का तुम्ही दोघं बगीच्यात गेले? असं काय महत्वाचं काम होतं बगीच्यात?"

" माझे मीत्र बगीच्यात जमले होते त्यांना आजोबांकडून डिटेक्टीव्ह स्टोरी ऐकायची होती."

"तुझ्या मीत्रांना. आपल्या घरी बोलवता आलं असतं.ते याआधी आपल्या घरी येऊन गेले आहेत.होनं."

" हो.पण बगीच्यातच ये म्हणाले मीत्र म्हणून गेलो.मला काय माहिती होतं असं होईल?" तन्मय म्हणाला.

" मला त्याचा अंदाज होता आणि तू असं वागू शकतो याचाही अंदाज होता म्हणून तुला वारंवार बजावत होते. तन्मय अरे मोठा हो. १८वर्षाचा झालास.आपल्या घरी काय परीस्थिती आहे हे तुला लक्षात येतं नाही का?""

"" साॅरी आई आता नाही असं लागणार!"".

""अरे गोष्ट घडून गेल्यावर साॅरी म्हणण्यात काय अर्थ असतो? आज तुझ्याबरोबर प्रदीप नसता तर तू वेळेत भय्यासाहेबांना दवाखान्यात पोचवू शकला असता ? केवढा विचीत्र प्रसंग ओढवला असता. आत्ताच भय्यासासेबांची प्रकृती जरा नीट होते आहे. हे तुला कळवायला हवं होतं.प्रत्येक वेळी मीत्राचच ऐकायचं योग्य नाही."

प्राची एवढं बोलून दमली.अजूनही तिच्या चेह-यावर राग दिसत होता. तेवढ्यात कामीनी बाई दवाखान्यात आल्या.

"कसे आहेत हे?" कामीनी बाई घाबरतच दवाखान्यात आल्या.त्यांचं शरीर भीतीने थरथरत होतं. त्यांच्या तोंडून आवाज नीट फुटत नव्हता. आत्ताच भय्यासासेबांची प्रकृती जरा बरी होतेय तोच हे घडलं म्हणून कामीनी बाईंना टेन्शन आलं.

" ठीक आहे.पण दोन दिवस ठेवावं लागेल म्हणाले."
कामीनी बाई अजून घाबरू नये म्हणून प्राची त्यांचा हात हातात घेऊन बसली.

" त्या विश्वासला आता सोडणार नाही." कामीनी बाईं रागातच होत्या आणि बोलताना त्यांच्या मुठी आवळल्या जात होत्या.

"प्राची चल माझ्या बरोबर." एवढं बोलून त्या निघाल्या.

प्राचीला कळेना कुठे जायचं आहे. घाईघाईत तिने प्रदीपला सांगितलं आणि कामीनी बाईंच्या पाठोपाठ निघाली.आत्ता कामीनी बाईंची चाल एवढी झपाट्याने होती की प्राचीला अक्षरशः पळतच त्यांना गाठावं लागलं.

"आई आपण कुठे जायचं आहे?"

" विश्वासच्या घरी." कामीनी बाईं शांतपणे म्हणाल्या.

"काय? त्यांच्याकडे का जायचं आपण ?"

" आज त्या विश्वास ला चांगलाच धडा शिकवते."

प्राची लगबगीनं गाडीचं लाॅक उघडते. दोघी गाडीत बसतात.गाडी सुसाट निघते आणि विश्वासच्या घरापाशी येऊन थांबते.

कामीनी बाईं प्राचीची वाट न बघता विश्वाच्या घराच्या दिशेने चालू लागतात. प्राचीला लक्षात येतं की कामीनी बाईंच्या अंगात आज काहीतरी संचारलं आहे.

"अरे कामीनी ताई तू? आज कशी पायधूळ झाडली या गरीबांच्या घरी."

विश्वास कुत्सीतपणे म्हणतो आणि हसतो.

त्याच क्षणी कामीनी बाई त्यांच्या श्रीमुखात भडकावतात. विश्वासची तंतरते. प्राची दरवाज्यातच अवाक् होऊन ऊभी असते. कामीनी बाईंचं हे रूप तिला नवीन असतं.

" हा आत्ता तुला फक्त प्रसाद दिला आहे.पूर्ण जेवण नको असेल तर इथेच तुझ्या कारवाया थांबव.जर तुला मी जेवायला वाढलं तर एक हाड तुझ्या अंगात शिल्लक राहणार नाही.माझ्यापर्यंत तुझं विचीत्र वागणं ठीक होतं. माझ्या नव-याच्या वाटेला पुन्हा जायचं नाही कळलं?"

" कामीनी ताई विश्वासला कशाला म्हणतात?"

विश्वासाची बायको लक्ष्मी बाहेरच्या खोलीत येऊन म्हणाली,

"लक्ष्मी तुझा नवरा तुला सांगत नसेल तो बाहेर काय करतो. चांगल्या घरातला मुलगा गुंड लोकांच्या संगतीत राहतो आणि त्यांच्या भरवशावर इतर लोकांवर रोब झाडतो धमकावतो,पैसे लुटतो. लक्ष दे याच्याकडे. नाहीतर एकदिवस तुला आणि मुलांना विकून खाईल."

कामीनी बाईंचा आवाज चांगलाच तापलेला होता.

"काय हो काय बोलतात या?"

लक्ष्मी त्याची बायको रागाऊन विचारते.

"काही नाही ग खोटं बोलतेय ही."

विश्वास चाचपडत ऊत्तरला.

" यापुढे माझ्या किंवा माझ्या घरातल्या कोणत्याही माणसाच्या वाटे गेलास तर असा आरोप ठेवीन तुझ्यावर की जन्मभर जेलमध्ये सडशील."

एवढं बोलून कामीनी बाई रागातच विश्वाच्या घराबाहेर पडल्या. विश्वास लाही कामीनी बाईंचं हे रूप नवीन होतं. तो आपला गाव चोळत बसला. प्राची काही न बोलता एक जळजळीत कटाक्ष विश्वास वर टाकून घराबाहेर पडली.

गाडीत बसताच. प्राचीनी कामीनी बाईंचा हात हातात घेतला. त्या अजूनही रागातच होत्या.

प्राची म्हणाली.

" आई अहो केवढा मोठा धक्का बसला मला तुमचं हे रणरागीणीचं रूप बघून. धक्का बसला पण खूप अभीमान वाटला मला."

प्राचीचा स्वर आनंदाने गहिवरला होता.

" प्राची मी शांतपणे सगळं स्विकारत होती कारण मला वाद भांडणं आवडत नाही.पण यांच्यावर हा प्रसंग आला तो विश्वास मुळे. मी लेचीपेची आहे अशी समजूत त्याने करून घेऊ नये म्हणून आज मी अशी वागले."

कामीनी बाईंनी आपल्या वागण्याचं स्पष्टीकरण दिलं.

" तुम्ही योग्य तेच केलत.विश्वासचा जो गैरसमज आहे तो तोडायलाच हवा होता. तुम्हाला माझा सॅल्यूट."

प्राची कामीनी बाईंना सॅल्युट करते.

"चला आता दवाखान्यात जाऊ. आता तुम्ही काळजी करू नका. सगळं व्यवस्थित होईल."
एवढं बोलुन प्राची गाडी सुरू करते आणि दोघी दवाखान्याच्या दिशेनी निघतात.

***

दवाखान्यात येताच कामीनी बाई खुर्चीवर बसल्या. त्यांना एकदम गळून गेल्यासारखं वाटायला लागलं. तन्मय तसा आधीच घाबरलेला होता त्यात कामीनी बाईंना असं बघून तो आणि घाबरला.धावत प्राची कडे गेला. प्राची तेव्हा ज्युनिअर डाॅक्टरशी बोलत होती.

"आई आजी बघ कशी करतेय."

हे ऐकताच प्राची आणि डाॅक्टर दोघेही घाईघाईने कामीनी बाईंजवळ आले.

डाॅक्टरांनी त्यांना चेक केलं.आणि म्हणाले

"यांना त्या रुममध्ये झोपवा.त्यांना औषध देतो.शांत झोप झाल्यावर त्यांना बरं वाटेल. मिस्टरांच्या तब्येतीचा ताण आला असण्याची शक्यता आहे. सीस्टर…" डाॅक्टरांनी हाक मारताच सिस्टर आली.

"काय डाॅक्टर?"

" यांना त्या १ नंबरच्या रूममध्ये न्या.व्हीलचेयर आणा.पायी नका चालवू. मॅडम मी इंजक्शन लिहून देतो.ते आपल्या दवाखान्याच्या मेडीकल स्टोअर मध्ये मिळेल."

" ठीक आहे."

डाॅक्टरांनी दिलेलं प्रिस्क्रीप्शन प्राची तन्मय जवळ देते.

"तन्मय हे औषध घेऊन ये.लगेच.मध्येच मित्रांचे फोन आले तरी घ्यायचे नाही.सध्या आजी महत्वाची आहे कळलं?"

" हो "
आणखी काही न बोलता तन्मय औषध आणायला गेला.

कामीनी बाईंना रूममध्ये घेऊन जातात. तिथे सलाईन मधून इंजक्शन देऊन .सिस्टर निघून जाते.

विश्वास कडे जे रणरागिणीचं रूप कामीनी बाईंनी घेतलं होतं त्यात त्यांची खूप शक्ती गेली होती त्यामुळे त्यांना हा त्रास होतो आहे.हे प्राचीच्या लक्षात आलं.

प्राची आणि तन्मय समोरच्या खुर्चीत बसलेले असतात.

". तन्मय तू १८वर्षाचा यावर्षी झालास म्हणजे तुला आता मतदानाचा अधिकार मिळणार. तो अधिकारसुद्धा तू तुझ्या मित्रांच्या म्हणण्यानुसार वापरणार का?"

"आई मी चुकलो. मी यापुढे समजून वागत जाईन."

" तन्मय आजी आजोबा म्हातारे झाले तर तुझे बाबा खूप स्ट्राॅंग नाही हे तुला माहीत आहे नं?"

" हो.आई पण बाबा असे का आहेत? माझ्या सगळ्या मित्रांचे बाबा खूप स्ट्राॅंग आहेत.माझे बाबा का नाही?"

प्राचीला त्यांच्या मनात चाललेला गोंधळ लक्षात आला.तिने हळूच त्याला जवळ घेतलं आणि म्हणाली.

"प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळं असतं. आयुष्यात कधी खूप मोठं संकट आलं तर त्यात झळ ज्या व्यक्तीला पोचते. तो अक्षरशः कोलमडून जातो. त्यातुन तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतो.पण पुन्हा मध्येच तसेच झटके बसले तर तो माणूस तरी काय करणार? पुन्हा त्यांचे शुन्यापर्यंत खाली आलेले प्रयत्न वर येण्यासाठी त्याला धडपड करावी लागते.

तन्मय बेटा तुझ्या बाबांचं असंच होतंय. म्हणून अजूनही ते पूर्णपणे नाॅर्मल होऊ शकले नाही. मी सगळ्या आघाड्यांवर लढता लढता थकले आहे. तन्मय तुला खूप लवकर मोठं व्हावं लागणार आहे. तुझ्या वयाच्या मुलांसारखी कदाचित तुला मस्ती करता येणार नाही. कारण आपल्या घराला तू लवकर सक्षम होणं गरजेचं आहे. यावर्षीपासूनच तू आता थोड थोड आपल्या ऑफीसमध्ये लक्ष घालायला लाग.

आजीला आता आजोबांकडे पूर्ण लक्ष द्यावं लागणार. पूर्वी आपल्या ऑफीसचा निम्मा भार आजी सांभाळायची. म्हणून तू आपणहून सगळ्या गोष्टीत लक्ष घाल. समजून घे सगळे व्यवहार.येशील नं बेटा लवकर माझ्या मदतीला?"

प्राचीच्या हळव्या आवाजाने तन्मयनी दचकून तिच्याकडे बघीतलं.

" आई तू रडू नको.मी आहे तुझ्याबरोबर.आपण दोघं मिळून आपली कंपनी छान सांभाळू."

प्राचीला रहावलं नाही आणि आपण दवाखान्यात आहोत याकडे लक्ष न देता तिनी तन्मयच्या गालाची पापी घेतली. त्याला हळूच कुरवाळत म्हणाली,

"माझं कोकरू खरंतर लहान आहे पण त्याने लवकर मोठं व्हावं अशीच अपेक्षा करतेय. माझा नाईलाज आहे बेटा."

"आई नको वाईट वाटून घेऊ.मी आजपासुनच मोठा झालो आहे." प्राचीकडे बघून हसला.

कामीनी बाईं झोपेत होत्या.त्यांना मायलेकांच गोड संभाषण ऐकू आलं असतं तर त्याही या गप्पांमध्ये सामील झाल्या असत्या.
------------------------------------------------------------
क्रमशः कामीनी बाई शुद्धीवर येतीलच?
लेखिका – मीनाक्षी वैद्य