“ मुक्त व्हायचय मला ’’ भाग १‘हॅलो......’ सरीताचा आवाज ऐकताच तिची आई म्हणाली, ‘"सरिता तुला वेळ आहे का?""कशासाठी?" सरीतानी आईला प्रतिप्रश्न केला. "तुझ्याशी बोलायचं’’ आई“तुला माझ्याशी बोलायचय?” सरिताच्या आवाजात आश्चर्य होत.“ हो” आई म्हणाली. “तुझ्याशी आणि माधवशी दोघांशी बोलायचं आहे.”आई“बापरे!....दोघांशी बोलायचंय. आई काही गंभीर आहे का?” “ते भेटल्यावर कळेल” “ बरं मी घरी येते.” “घरी नको..आपण बाहेर भेटू.”“का?” आईच्या बोलण्यानी सरीता गोंधळली. तेवढ्यात आई म्हणाली, “आपल्या घराजवळच्या कॉफी हाउसमध्ये भेटू.चल ठेवते.”आईनी फोन ठेवल्यावर सरीता विचार करू लागली की आईला काय बोलायचं असेल? कारण,एवढ्या आयुष्यात तिला कधीच बोलतांना पाहिलं नाही, बोलायचे फक्त बाबा ....विचार करून डोकं दुखायला लागल्यावर तिने नाद सोडला आणि माधवला फोन लावला.*** *** *** ठरल्याप्रमाणे सरीता आणि माधव कॉफी हाऊसमध्ये पोचले. आई तिथे आधीच पोचली होती आणि या दोघांची वाट बघत होती.आईला बघताच दोघांनी एकमेकांकडे बघितलं आणि तिच्या दिशेनी चालू लागले.”या बसा” आई त्यांच्याकडे बघून खुर्चीकडे बोटं दाखवून हसत म्हणाली.मुलांच्या चेहे-यावरचा गोंधळ बघून मनात हसत होती. खुर्चीवर बसताच माधव म्हणाला,”हं आई बोल तुला काय बोलायचं” “अरे...चहातर मागवू..मग बोलू. एवढी काय घाई आहे?”“नको...मला लवकर जायचं आहे.” माधवआजपर्यंत आईचं काही ऐकलच नव्हतं त्यामुळे आई किती बोलेल आणि ते किती कंटाळवाणे होईल याचा माधवला काही अंदाज येत नव्हता.सारीताचही काही वेगळं नव्हतं.आजपर्यंत फक्त बाबाच बोलायचे.आई त्यांच्या दृष्टीनं आई जुन्या विचारांची वगैरे ...असल्यानं त्यांना आपल्या वेळेचा अपव्यय झालेला नको होता. “मलापण...”सारीताही म्हणाली. “जाल रे...माझं बोलण ऐकून जा. मी सरळ मुद्यावरच येते. तुम्हा दोघांना माझा निर्णय सांगते.”त्या दोघांना आश्चर्य वाटलं. आई आणि तिचा निर्णय सांगणार आहे..! आजपर्यंत कधी स्वत:चं मतही न मांडणारी आई आज स्वत:चा निर्णय सांगते आहे. “ऐकताय न..” त्यांना गोंधळातून बाहेर काढीत आई म्हणाली. “अं ...हो’ दोघही बोलली. आईनी बोलायला सुरवात केली.”मी माझ्या आयुष्याशी संबंधीत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. मी तुमच्या वडलांना घटस्फोट द्यायचं ठरवलं आहे.” “काय?” दोघही ओरडली. “ओरडू नका. आपण घरी नाही हॉटेलमध्ये आहोत. शांतपणे ऐका.” “आई अग आत्ता या वयात हा काय भलता निर्णय तुझा.” माधव म्हणाला.आईचा निर्णय माधवाच्या पचनीच पडला नाही. सारीताचही तेच झालं. “आई याच वयात दोघांना एकमेकांची गरज असते.” सरिता कसबसं बोलली.“ मला कळल तुम्हाला काय म्हणायचं. ज्या वयात एकटी राहू शकत होते त्या वयात तुमच्या दोघांच्या भविष्याचा विचार करून मी गप्प राहिले. आता मला कुठला पाश नाही आणि आताही मी माझ्या आयुष्याचा मला हवा तसा विचार केला नाही तर माझ्या जगण्याला अर्थ काय?” आई.“आई असं काय झालाय तुझ्या आयुष्यात ? तू नोकरी करत होतीस बाबांसारखा कर्तुत्ववान नवरा असतांना तुला काय कमी होतं?” माधव“हा तुमचा विचार आहे. तुझ्या आयुष्याचा विचार मी करू शकत नाही तसा माझ्या आयुष्याचा विचार दुस-यांनी का करावा? पण तो केला तुझ्या बाबांनी मला पटत नसून मी तुमच्या भविष्याची धूळधाण होऊ नाही म्हणून ऐकला. त्यांनी माझा कधीच एक व्यक्ती म्हणून विचार केला नाही. संसार फक्त त्यांनी केला. कारण तेच हुकुमशहा होते. मी नोकरी करीत होते. नोकरीच्या ठिकाणी माझ्या हुशारीचं कौतुक व्हायचं.पण घरी ...घरी मी एक बिनडोक गुलाम होते. मला मिळालेले पुरस्कार त्यांनी कधी तुम्हाला दाखवू दिले नाही की कधी अभिमानाने शोकेसमध्ये ठेवू दिले नाही. माझा पूर्ण पगार ते स्वत:कडे ठेवत. रोजचे बसचे पैसे तेवढे देत. ऑफीसमध्ये मला कोणाकडून चहा पिण्याची सोय न्हवती.” थोडं थांबून पुन्हा आई बोलली “मला सांग सरीता तुला ऑफीसमध्ये असं राहावं लागलं, तुझा पगार नीलेशनी घेतला, तुझी सुट्टी तुझ्यासाठी मोकळी ठेवली नाही तर तू काय करशील?” आईनं विचारलं.“ मी अजिबात असं होऊ देणार नाही. माझं स्वातंत्र्य मी असं गमावणार नाही. मी एक जिवंत व्यक्ती आहे.माझं स्वातंत्र्य मी नवा-यापाशी गहाण ठेवणार नाही.” बोलतांना सरीताच्या मनातील राग बाहेर पडत होता.ते बघून आई म्हणाली, “तुला नुसतं विचारलं तर तुला एवढा राग आला मला आजपर्यंत माझं स्वातंत्र्य असंच गहाण ठेवाव लागलं म्हणून आज तुम्ही इतके चांगले घडलात. तेव्हा माझं स्वातंत्र्य मी निवडलं असतं तर आज तुम्ही कुठे असता? कसे असता ? माहित नाही. कारण माझ्या बंड करण्यामुळे आपलं घर हे घर न राहता रणांगण झालं असतं. तुम्ही तश्या वातावरणात जगू शकला नसता. मोकळा श्वास घेउ शकला नसता.आज ज्या आत्मविश्वासानी तुम्ही दोघं आपापल्या क्षेत्रात उभे आहात,ज्या उत्तम पद्धतीनं तुम्ही तुमच्या लाईफ पार्टनरला समजून घेताय आणि योग्य रीतीनं आयुष्य जगताय हे सगळं असं घडलं नसतं जर मी बंड केलं असतं.” आई“आतातरी आई तुला का गरज आहे घटस्फोट घ्यायची?” माधव म्हणाला.”आई तू तुझ्या मनाप्रमाणे बाबांबरोबर राहूनही वागू शकते. आम्ही समजाऊ बाबांना” सरिता म्हणाली. “ नाही ते मला मंजूर नाही. मी आता नोकरीतून निवृत्त झाले. मी आता मला पटणाराच निर्णय घेणार. तुम्हाला माझा निर्णय पटला तर ठीक . नाहीतर ही आपली शेवटची भेट.” आई उठून जाऊ लागली तसे दोघही भानावर आले. “आई थांब” सरिता ओरडली. आई थांबली सरिता धावत आईपाशी आली.माधवही तिच्यामागून आला. “कशाला हाक मारलीस?” आईनं विचारलं.“आई”...आवंढा गिळत सरिता कसंबसं बोलाली, “आई तू कुठेही जायचं नाहीस.” “का?” आईनं सरीताला विचारलं.“आई तुझ्या मनाचा आम्ही कधीच विचार केला नाहे हे खरं आहे. बाबा तुझ्याशी कसे बोलतात,वागतात तेच आम्हाला करावसं वाटलं. त्यात थ्रील वाटायचं. बाकीच्या मैत्रिणीच्या आया अजिबात त्यांचं ऐकायच्या नाहीत आमची आई आम्हाला घाबरते असं वाटायचं.” माधव बोलला.“हो आई मलासुद्धा असच वाटायचं. म्हणूनच तर आम्ही कधी तुझं ऐकलं नाही. तू मिळवलेल्या बक्षिसांचपण कधी कौतुक वाटलं नाही.पण आता ही चूक आम्ही सुधारू. बाबांनाही लक्षात आणून देऊ कि त्यांचं काय चुकलं.” सरीता पण म्हणाली.आईचा निर्धार ठाम होता. ती काही न बोलता चालू लागली. माधव आणि सरिता बघतच राहिले.
______________________________क्रमश:मुक्त व्हायचंय मला लेखिका…मीनाक्षी वैद्य