मुक्त व्हायचंय मला भाग २
मागील भागावरून पुढे…
मुलांचं मागे येणं, रडवेला चेहरा करून बोलणं मालती बाईंना मनातून रडवून गेलं पण आता त्यांनी ठाम निर्णय घेतला होता.
विचार करता करता मालतीला त्यांना बघायला जेव्हा रघुवीर आले होते तो दिवस आठवला.
रघूवीर त्यांचे काका काकू त्याची चुलत बहीण असे सगळे मालतीला बघायला आले होते.
"याया बसा. घर सापडायला त्रास नाही गेला नं !" मालतीची आई
"नाही नाही. तुम्ही पत्ता अगदी बरोबर सांगीतल्यामुळे आम्ही सहजपणे घर शोधू शकलो."
रघूवीर चे काका म्हणाले.
"चंदू पाणी आण."
मालतीचे वडील चंदूला मालतीच्या भावाला म्हणाले.
"हो आणतो." चंदूचंदू पाणी आणायला आत वळला पण तेवढ्यात नंदाने त्याच्या बायकोने पाणी आणलं.
"हा माझा मोठा मुलगा चंदू .त्याचं दोन वर्षांपूर्वीच लग्न झालं. त्याची ही बायको नंदा." मालतीचे वडील म्हणाले.
नंदाने सगळ्यांना पाणी देतांना नमस्कार केला.
रघूवीर चे काका म्हणाले
" रघूवीर तुला आणि मालतीला काही बोलायचं असेल तर बोलून घ्या."
"मला मुलगी पसंत आहे. जेवढ्या लवकर मुहूर्त काढता येईल तेवढ्या लवकर काढा."
रघूवीर म्हणाला. यावर सगळे हसले.
मालतीचे बाबा म्हणाले,
"हो. मी बघतो. जितक्या लवकर होईल तितक्या लवकरचाच मुहूर्त काढतो."
"चला निघतो आम्ही"
रघूवीरचे काका म्हणाले. सगळे निघाले.
ते गेल्यावर तिचा भाऊ चंदू मालतीला म्हणाला.
"अगं आजकाल मुलं मुलीशी बोलायचं म्हणतात आणि हा रघूवीर बोलायचं नाही म्हणाला आणि लग्नाचा मुहूर्त लवकर काढा म्हणाला.हा…हा… हा गंम्मत आहे." चंदू म्हणाला.
" अरे असतो एकमेकांचा स्वभाव आपली मालती त्यांना पसंत पडली ही गोष्ट किती आनंदाची आहे." मालतीची आई म्हणाली.
"बाबा लग्नानंतर मी नोकरी सोडणार नाही. चालणार आहे नं त्यांना आधीच विचारा.नाहीतर नंतर म्हणतील." मालती बोलली.
"अगं नाही तसं काही होणार नाही. ते तुला करू देणार आहेत नोकरी."
मालतीच्या वडिलांनी तिला निर्धास्त केलं
"मालती जावई बापूंना बराच पगार आहे समजा म्हणाले नोकरी सोड तर सोड काय बिघडलं" आई म्हणाली.
"आई नोकरीमुळे माझं अस्तित्व आहे.मी आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र आहे. मी नोकरी सोडली तर मला सतत त्यांना पैसे मागावे लागतील. जे मला आवडणार नाही." मालती
"ऐ तायडे एवढी का डिस्टर्ब होतेस. हव असेल तर ऊद्या त्यांना भेट आणि सांग." चंदूने उपाय सुचवला.
"ते भेटणार आहेत का ?आत्ता प्रश्न विचारा म्हटलं तर नाही म्हणाले लवकर मुहूर्त काढा म्हणाले. काहीतरी विचीत्र बोलणं" मालतीच्या स्वरात त्रागा होता.
"काहीतरी काय आता लग्न करायचं म्हणून तुला बघायला आले होते नं मग लवकरचा मुहूर्त काढा म्हणाले यात काय बिघडलं?" मालतीची आई
"मला मजेदार वाटलं म्हणून मी म्हटलं." मालती.
"बरं चंदू त्यावरून आता वाद घालणार का?" आई
"आई वाद कशाला घालीन. बाकी मुलगा जरा मजेदार वाटला." चंदू
"आता तुला काय दिसलं?"
आईने जरा चिडून विचारलं.
"आई मला नं मुलांचा चेहरा शिष्ट वाटला." नंदा म्हणाली.
"मुलांनो फार फाटे फोडू नका. पहिल्याच भेटीत माणसाच्या स्वभावाची पारख करून नये.चला आता साखरपुड्याची तयारी करायची आहे. हा कार्यक्रम लवकर करावा लागेल म्हणजे लग्नाची तयारी करता येईल." मालतीचे वडील म्हणाले.
"अहो उद्याच आपल्या दापके गुरूजींना विचारून तारीख ठरवून घ्या. लग्नासाठीसुद्धा मुहूर्त बघा. दोन-तीन तारखा काढा." आई
"हो तेच करतो. पटपट दिवस सरतील कळणार नाही." बाबा
"नंदा तुझ्या मैत्रीणीचा बिझनेस आहे नं.?" आई
"कोण मैत्रीण !अनीता का?" नंदाने विचारलं.
"हो तीच. तिला पाच छान बॅग सांग करायला त्यात मग हळदी कुंकवाचं सामान ठेवायला. मुलाकडच्या पाच सवाष्णींचे पाय धुवून मग त्यांना या बॅगा देता येईल." आई म्हणाली.
***
मालती विचारात पडली लग्न ठरलं की माणूस किती एक्साईट होतो. रघुवीरचही मालतीला आश्चर्य वाटलं. तिच्या मनात आलं की खरंच आपण रघूवीरला पसंत आहोत की …करायचं म्हणून हा लग्न करतोय. याचं दुसरीकडे कुठे अफेयर तर नसेल? समजा असं असेलही तर आपण काय करायच? आपल्याला कळेल तरी का? मालती रघूवीरच्या थंड वागणूकीमुळे धास्तावली होती. जिला बघायला आलोय तिच्याकडे हा मुलगा बघताना जराही आनंदी दिसत नाही. हे कसं? हे मालतीला कळत नव्हतं.
" मालती कसल्या विचारात पडलीस?" नंदाने मातीला हलवून विचारलं.
" नाही ग कसलाच विचार करत नाही." मालती म्हणाली.
" हं मला माहिती आहे तू रघूवीरच्या आठवणीत गुंतली आहेस." नंदा असं म्हणाली आणि हसायला लागली.
यावर " काहीतरीच तुझं" मालतीने लाजूनच नंदाला म्हटलं. मालतीबरोबर धंदाही हसायला लागली.______________________________क्रमशः मुक्त व्हायचंय मला.लेखिका…मीनाक्षी वैद्य.