मुक्त व्हायचंय मला भाग ४
मागील भागावरून पुढे…
रघूवीर आणि मालतीचं लग्नं होऊन साधारण दोन महिने झाले असतील. या दोन महिन्यातच मालतीला वीस पंचवीस वर्षांचा संसार केल्यासारखं वाटायला लागलं.
मालतीच्या घरचे खूप माॅडर्न नसले तरी जगाच्या बरोबर चालणारे होते. कुठल्याही प्रसंगी निर्णय घ्यायचा असेल तर तिच्या घरचे सगळे एकत्र बसून विचार विनीमय करायचे. सगळेजण आपली मतं सांगायचे. पण विषय ज्याच्यासंबंधी असेल त्यानेच फायनल निर्णय घ्यायचा मग तो इतरांना अमान्य असला तरी ते या निर्णयावर आक्षेप घेत नसत.
रघूवीरकडे सगळं ऊलटच होतं. रघूवीरच्या घरी सगळं त्याच्या हुकूमानुसार चालत असे. मालतीला मोबाईल घेण्याची सोय नव्हती. एक दिवस तिच्या भावाचा चंदूचा रघूवीरला फोन आला.अजून सगळं नवीन असल्यामुळे चंदूला एवढी कल्पना नव्हती.
" हॅलो" रघूवीर
" मी चंदू बोलतोय मालतीचा भाऊ. मालती आहे का?" चंदू
" काय काम आहे?" रघूवीर
" मालतीला ऊद्या आमच्या घरी पाठवाल का?" चंदू
"काम काय आहे ? काम असेल तरच तिला पाठवीन.तसच ते काम मला महत्वाचं वाटलं तरच पाठवीन. काम काय आहे बोल." रघूवीर
" काम असं खूप महत्वाचं नाही. तुमच्या लग्नाला दोन महिने झालेत मालतीला भेटावसं वाटतंय म्हणून तिला घरी बोलावलं आहे." चंदू
"तुम्हाला एवढी आठवण येते मालतीची तर लग्न कशाला केलंत तिचं? काम नाही नं काही मग नाही पाठवणार मालतीला." रघूवीर एवढं बोलला आणि झटकन त्याने फोन कट केला.
चंदूला फार आश्चर्य वाटलं.असा कसा हा माणूस!
" कायरे चंदू येतेय का मालती?" आई
" नाही." चंदू
" का? तिला घ्यायला जायचं असेल तर जानं तू." आई
" अगं आई एवढाच प्रश्न असता मी गेलो असतो घ्यायला.तसाही मी तिला ऑफिस मध्ये घ्यायला जाणारच होतो." चंदू
" मग कुठे माशी शिंकली?" बाबा
" रघूवीर नाही म्हणाले.महत्वाचं काम असेल तरच पाठवीत म्हणाले.वरून हेही म्हणाले की ते काम मला महत्वाचं वाटायला हवं तरच मी पाठवीन."चंदू
" असं म्हणाले!" बाबा
" बाबा मला हा रघूवीर नावाचा माणूस जरा विचीत्रच वाटतोय." चंदू
" अहो आपण खूप चवकशी न करता मालतीचं लग्नं जमवलं का?" नंदा
" नाही ग आपण फडक्यांकडे चवकशी केली होती. ते रघूवीरच्या काकांच्या इतक्या जवळच्या ओळखीचे आहेत तेव्हा त्यांनी आपल्याला सगळं ठीक आहे सांगीतलं म्हणून पुढे गेलो नं." चंदू.
"चंदू ऊद्या तू लंचटाईममध्ये मालतीच्या ऑफीसमध्ये जा आणि तिला भेट. रघूवीरला जर तिला घरी पाठवायचं नसेल तर तिला तिच्या ऑफीसमध्येच भेटत जा." बाबा
" बाबा पण हे असं वागणं बरोबर आहे का? बायकोला कामाशिवाय माहेरी पाठवणार नाही हे योग्य नाही. बाबा तिला कधीच पाठवणार नाहीत असं त्यांच्या बोलण्यावरून वाटलं." चंदू
"म्हणजे मालतीला भेटायला आपण ऑफीसमध्ये जायचं किती विचीत्र आहे." नंदा
"काय करणार आपण? लग्नाआधी जर फडक्यांनी आपल्याला रघूवीरचा स्वभाव असा आहे सांगीतलं असतं तर आपण हे लग्न केलेच नसतं." आई
" मी सांगू का आई मालतीचं लग्नाचं वय उलटून गेलं म्हणून फडक्यांनी काही सांगीतलं नाही आपल्याला. त्यांचे रघूवीरशी जेवढे जवळचे संबंध आहेत तेवढेच आपल्याशी पण आहेत नं! मग असं का करावं त्यांनी?" नौदा
"तुझं म्हणणं मला पटतय. पण आता काय करणार?" आई
" चंदू ऊद्या तू जा. मालतीला भेट. रघूवीरचा स्वभाव कसा आहे ते विचार. ती जसं म्हणेल तसं आपण वागू. तिला त्रास नको व्हायला." आई
"हो तुझं म्हणणं बरोबर आहे. मी उद्याच लंचटाईममध्ये जाऊन मालतीला भेटतो." चंदू.
"आत्तापर्यंत मालतीचं लग्न जमत नाही म्हणून डोक्याला चिंता होती. आता लग्न झालंय तर ही नवीन चिंता लागली डोक्याला." आई
" हे बघा फार विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नका. मालतीच्या नशीबात हेच लिहीलं असेल तर तेच तिचं आयुष्य असेल आपण तरी काय करू शकतो." बाबा. बाबांच्या स्वरात हतबलता होती.
" नशीब तिला नोकरी करू देतात आहे." नंदा
" हो हे तिच्या नशीबानी चांगली गोष्ट आहे. तिच्या स्वतःजवळ तिचा पैसा असेल." चंदू
" मालतीला तीच भीती वाटत होती." चंदू
" चला आता बराच उशीर झालाय. जेऊन घेऊ." आई
" आई मला गंम्मत यांची वाटते की मी फोन केला तर त्यांनी मालतीला फोन दिला नाही कट केला."चंदू
" आजच सगळा विचार करत जेवणाची वेळ टाळू नका बाबांना त्रास होईल.चला." आई म्हणाली.
सगळे जेवायला गेले.______________________________क्रमशः मुक्त व्हायचंय मला भाग ४थालेखिका.. मीनाक्षी वैद्य.