पाखरांची भाषा श्रीराम विनायक काळे द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पाखरांची भाषा

पाखरांची भाषा

          नित्य नेमाप्रमाणे मूठभर तांदूळ अन् पाण्याचा गडवा घेऊन कमू देवरण्याकडे येताना दिसली. जांभळीच्या झाडावर बसून तिची वाट पहाणाऱ्या भोरडया, साळुंख्या, बुलबुल, दयाळ अन् देवरण्याच्या मुळाशी नाचणाऱ्या सातबायांनी पंखाचा फटर्र-फटर्र फऽट फटर्र फाट आवाज काढीत कलकलाट सुरू केला. ती मोडण चढून वर येईपर्यंत थोप नसलेली पाखरं तिच्या डोक्याभोवती गिरक्या मारू लागली. मुठीतले तांदूळ देवरण्याच्या माथ्यावरील सप्पय तासलेल्या चिन्यावर टाकून पाण्याचं परळ भरता भरता मैत्रिणीशी बोलावं अशा थाटात कमू सांगायला लागली. "सिर्रर सिक्क च्यू... कुच्चू सीब्ब् च्युकर्र कुरर्र स्त्रकुर्कर्र मीम्स थ्युक्क चिर्र... चिरिक्क चिक्नु सिर्सर भ्रक थुर्रर्र त्रु रु मर्क कृ रिर्र मिर्वर्र स्वाक्क सुर्रर्र स्वर्कर इर्र थ्रक र्च र्च" (आज भारी उशीर केला नं मी? परळात थेंबभर सुद्धा ऱ्हायलेलं नसेल हे माहिती होतं मला? पण मी तरी काय करु? मी इकडे यायला बाहेर पडणार तेवढ्यात नवऱ्यामुलाचा भाचा नेमका पसंती कळवायला टपकला. मग मला थांबावंच लागलं. तुम्ही माझी वाट बघणार म्हणून माझी कोण उलघाल झाली म्हणू सांगू!) पण कमुचं बोलणं ऐकायला पाखरांना कुठली सवड? ती आपली चक् चक् करीत तांदूळ मटकायावच्या नादात! चोची भरभरून परळातलं पाणी पिण्याच्या त्या चिमण्यांकडे डोळे भरून बघन असलेल्या कमुचा कंठ दाटून आला. आता माझ लग्न होणार...तिकडे लांब होडावड्याला घर...मी गेल्यावर या माझ्या सख्यांचं कसं होणार? त्यांना नित्यनेमानं तांदूळ पाणी कोण घालणार? छे...! नुसत्या कल्पनेनंच कमूला रडू फुटलं. कमूच्या भावना अचूक टिपून एका भोरडीनं "थ्रिक्क्र स्सिर्र सीर्रर्र-स्त्रक्क्र-स्नू स्त्रर्कर्र त्रीक स्नू सीर्रर्र" करीत ही वार्ता सांगितली मात्र. खाणं थांबवून भोरड्या चितागती झाल्या. साळुंक्या, सातभाई, हळद्या, दयाळ, सगळीच पाखरं स्तब्ध झाली. क्षणभरापूर्वी खाण्यावर तुटून पडलेली ती पाखरं आता अंग फुलवून घुमारे काढीत हीव भरल्यासारखी थडथडायला लागली. घशातल्या घशात ब्रुभम्म... घ्रम्मम्म घ्रोम-गर्रर्म घुमवणाऱ्या साळुंक्यांना अन् सातभाईंना कमूचं काय बिनसलं हेच कळेना, पण ती अतीव दुःख करतेय हे स्पंदन मात्र त्यांनी अचूक हेरलं! पाखरांनी खाणं थांबवलं म्हणताना कमूसुद्धा जरा बाचकली. त्यांची समजूत काढीत. म्हणाली, "ध्रोम्म श्रक्क सिमम्बमम्ब्र मोक्कस्त्र सर्रर्र र्र स्त्रस्स" (अग बायानो हे कधीतरी व्हायचंच होतं त्यात कसलं दुःख करायचं?) त्रकस्स स्क्रू स्क्रू सीब्बस्स कर्रर्र सर्रर्भ ध्रोम्म (मी काय तुमच्या जन्माला पुरले थोडीच? तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. खा तुम्ही.)कमूनं कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरी पक्षी ढिम्म बधले नाहीत. त्यांनी खाणं टाकलं ते टाकलंच! अंधार पडत चालला म्हणून जड अंतःकरणाने कमू घराकडे वळली. रात्री तिला भूकच नव्हती. उगाच चार घास चिवडून ती पानावरून उठली. कमू झोपायची त्या खोलीच्या खिडकीबाहेर जास्वंदीच्या फांदीवर बसून रोज सकाळी दयाळ, बुलबुल गोड लकेरी छेडायचे परंतु दुसऱ्या दिवशी शिऽऽ श्शिऽऽऽ शिव्ह ऽऽ सिंह शर्रर्र ऽऽ असे त्याचे करूण विलाप ऐकून कमू जागी झाली. ती भांबावून खिडकीत आली तर अंग झडझडवीत पिसं विस्कटून विद्रुप ओंगळ दिसणारा तिचा सगळा मित्रगणच जास्वंदीवर गोळा झालेला. भोरड्या, साळुंख्या, परटिणी, सातभाई, दयाळ, किकऱ्या, टिम्बुल्या, हळद्या अन् देवरण्याच्या हद्दीपलीकडे चुकून न येणाऱ्या बाया, गोविंदा नि भुरल्या असा सगळा ताफा जास्वंद, प्राजक्त यांच्या फांद्या फांद्यांवर दाटीवाटीनं बसलेला दिसला. मग गोंधळलेली कमू चूळही न भरता मागील दार उघडून बाहेर धावली."कमू ऽऽअगो सकाळी सकाळी तोंडसुद्धा न धुता आधी चिमण्यांच्या मागावर कुठे निघालीस?" स्वयंपाकघरातून मामी करवादली. प्राजक्ताखाली गेलेली कमू आपल्या सवंगड्यांना हात जोडीत विनवू लागली. "सिर्रर्र ऽऽ सिर्रऽऽ सिर्र शिऽऽऽस्त्रकक्र सुर्रर्र र्रक्र क्रर्रर्र स्त्र स्त्र सिर्कक्क थुक दुर्र मम्मर्र थुर्क, स्त्रर्रर्र क्क्र" (तुम्हांला कसं समजावू? तुम्ही फिरता किनई आपल्या जोडीदाराबरोबर? मला तसाच जोडीदारमिळणारै) त्या आठवणीनं शहारलेली कमू पुढे म्हणाली, "स्त्रीक्क क्रक्र कर्रर्र खम्म सीक्कक्क च्यु च्यु च्यरूर्रर्र चमम्म चक्रर्रर्र रर्मर्म र्रर्र इर्रर्म" (आता थोड्या दिवसांनी मी त्याच्या घरट्यात रहायला जाणारेय....आमच्या माणसांच्यात हे अस्सचं असतं.) "स्त्रिम्म म्र म्रर्रर्र श्रम्ब कर्रर्र र्रर्क किरर्रम्म... ब्रम्मम्म स्त्रुर्रर्र चिरिर्र र्रर्कर्र भ्रम्म र्मर्कर्र चम्मम्म क्वर्रर्र" (तुम्हाला सोडून जोडीदाराबरोबर जायचं म्हणून काल मला वाईट वाटलं. मी गेल्यावर तुम्हाला खाणं पाणी कोणं घालील? पण खरं सांगू? मला आवडला गं, माझा जोडीदार!) कमू आनंदली तशी पाखरंही अंग झडझडवीत तरतरीत झाली. कमूकडे झेपावत दयाळानं गोड लकेर छेडली. प्राजक्तामागच्या आंब्यावरून कोकीळ खरबीला साद घालू लागला. पाखरं आनंदाने वेडीपाशी झाली. भिर्रर्र भिर्रर्र गिरक्या घेणाऱ्या पाखरांच्या जोड्या परस्परांशी दंगामस्ती करायला लागल्या.पाखरांचा कलकलाट मामीला स्वयंपाक घरात ऐकू गेला. स्वतःशीच बडबडल्यागत मामी म्हणाली, "निळावंतीचा हा नाद, बरा नव्हे. न्हाती धुती पोर, उद्या सासर घरी हिचं असलं चळिंत्र बघून सासू नाव नाही का ठेवणार? नलू त्या कमीला जरा हाक मार गो." कमूची मामेबहीण नलू मागीलदारी गेली अन् पाखरे भिरी भिरी उडून गेली. कमू मग नाईलाजानं घरात आली. कमरेवर हात ठेवून कमूच्या पुढ्यात उभी राहिलेली मामी कडक लक्ष्मीच्या आवेशात म्हणाली, "कमेऽ गधड्ये ऽऽ आता तरी तोंड विसळ अणि चहा घटाळायला ये आत! बुरशी कुठली. कोण उच्छाद मेला सकाळीच त्या पाखरांचा! तू दिसायचीच खोटी मेल्यांना!"काहीही न बोलता राखुंडी हातावर घेऊन कमू तोंड धुवायला गेली. मामीचं आपलं हे नेहमीचंच! निराधार कमूला घेऊन मामा पेंडखळ्यात आला तेव्हासुद्धा मामीनं असंच नाक मुरडलन! सिलीपाटाच्या धंद्यात मरणाची उधारी तुंबली म्हणून आधीच मामा जेरीला आलेला. झाडावाल्याचं देणं रखडलं... झाडांची तोड थांबली नि मोठीच पंचाईत होऊन बसली. आपली तीनं पोरं आणि त्यात हे एक नवीन खाणारं तोंड वाढलं म्हणून रंजीस झालेली मामी! पण कमू आली... दुसऱ्याच दिवशी मागिलदारी पाखरांना चोरून तांदुळाच्या कण्या टाकण्याचा, पाखरांना प्यायला म्हणून फुटक्या परळात पाणी भरुन ठेवण्याचा कमूचा चळ सुरू झाला. मग दोनच दिवसांनी... पाच वर्षाचे थकलेले उधारीचे सातशे रूपये घेऊन... ज्यांची मामानं आशाच सोडलेली... अमीन चिच्या सकाळी सकाळीच दाराशी आला. गेला दीडेक महिना देणेकऱ्यांची तोंड चुकवायला घरात लपून राहिलेला मामा नोटा खिशात टाकून घराबाहेर पडला...नि त्यानंतर त्याचा जम बसायला लागला. लक्षात येण्यासारखी सुस्थिती येत गेली. कमू पोर पायगुणाची म्हणून मामा तिचे लाड करायचा. कमी मुठी भरभरून तांदूळ न्हेऊन चिमण्यांना घालायची. तिकडे मामीही कानाडोळा करायची. तिचा स्वभाव जरा ताठ होता पण कमूशी वागताना आपल्या पोरांपेक्षा दुजाभाव मात्र ती करीत नसे!नवीन घर.. नवीन गाव.. अनोळखी माणसं... मामाकडे कमूचा जीव काय रमेना! बाबा तिला अंधुकसे आठवायचे पण आईची आठवण येऊन तिला सारखं रडू यायचं! लोकांच्या घरात रडायचं तरी चोरी मग मागिलदारी प्राजक्ताखाली एकवशी जागा गाठून कमू रडत बसायची. ती अशी रडत असताना समोर बसलेली एक गुबगुबीत अंगाची 'सातबाया' तिला दिसली. विटलेला मुकटा नेसलेली आईच आली असावी असा भास कमूला झाला. मग धावत जाऊन घरातून चिमटीभर तांदळाच्या कण्या आणून तिने टाकल्या सातबाया चुटु चुटु कण्या टिपायला लागली. तिचे बाकीचे भाईबंदही पटापटा उतरले. तेव्हा पासून मग कमूची नि त्यांची गट्टीच जमली. हळू हळू आणखीही कोण कोण पाखरं तिथे उतरायला लागली. कण्या अन् परळात हुकमी पाणी मिळतं हे लक्षात आल्यावर पाखरं नेमाने यायला लागली.कण्या टिपण्याऱ्या, परळात भुर्रर्र भुर्रर पंख फडफडवीत आंघोळ करण्याऱ्या पाखंराची मजा बघीत कमूचा जीव रमायला लागला. तिचा निर्मळ भाव ओळखून पाखरं न बिचकता तिच्या आशीपाशी वावरायची. आपल्या भाषेत चुक्क-चुर्रर्र करीत काही बाही बोलायची. गाण्याच्या गोड लकेरी छेडून कमूला रिझवायची. सुरूवातीला सगळीच पाखरं सारखी वाटायची. पण सरावा सरावानं प्रत्येक पक्ष्याची स्वतंत्र ओळख कमूला पटायला लागली. त्याची मजा बघायच्या नादात तल्लीन झालेली कमू हळू हळू त्यांच्या सारखे स्वर काढायचा प्रयत्न करू लागली. खूप सराव केल्यानंतर त्यांचे स्वर तिला जमायला लागले. त्यांना हाका कशा मारायच्या, खाऊ खायला या म्हणून कसं सांगायचं? हे आपोआप उमगत गेलं. एकदा तिनं टाकलेले सगळे तांदूळ पाखरांनी टिपून घेतले अन् नेमकी त्याच वेळी भूकेजलेली एक साळुंकी गयावया करीत खाणं मागू लागली. कमू तांदूळ आणायला घरात धावली.तांदळाची मूठ भरून ती वळणार तर मामी समोर उभी. "कम्ये ऽऽ गधड्ये, अगो आत्ता एवढ्यात मूठ भरून तांदूळ नेले होतेस ना?" कमू गयावया करीत रडवेल्या सुरात म्हणाली, "हो न्हेले होते ना तांदूळ! पण मामी कित्ती कित्ती पाखरं जमतात! सगळे तांदूळ संपले अन् एक सांळुकी भुकावून आली. मला तांदूळ घाल म्हणाली." तशी डोळे वटारीत मामी ओरडली, "अस्स काय? सांळुकी तांदूळ घाल म्हणाली वाटतं! तुला चिमण्यांची भाषा आणिक कधीपासून कळायला लागली?" निरागसपणे कमू उतरली, "अगं मामी ऽऽ सगळ नाय कळत! त्यांना आनंद झाला, की वाईट वाटलं? भूक लागली ... तहान लागली म्हणून पाणी हवय हे त्यांच्या ओरडण्यावरून बरोबर समजतं मला. मी दिसले ना की येऽऽग कमू असं त्या म्हणतात ते सुद्धा कळतं मला! तुझी शप्पत!!" तशी फाड्कन तिच्या कानफटात लगावीत मामी म्हणाली, "हद्द ग बाई तुझ्या अगोचरीपणाची. माणसाचा स्पर्श झाला तर त्या जातभाईला टोचून-टोचून मारणारी पाखरांची निर्दयी जात! त्या पाखरांची बोली, निळावंतीची भाषा तुला कळायला लागली ना तर वाट्टोळं होईलं आयुष्याचं.... खबरदार पुन्हा त्या पाखरांच्या नादात ऱ्हायलीस तर काय ते तांदूळ घाल नी मुकाट्याने तशी परत ये. आम्हांला नकोहेत त्या पाखरांच्या अभद्र भाषा..."तेवढ्यात देवपूजेवरून उठून मामा आला, "कमूऽऽ तू घाल जा चिमण्यांना तांदूळ नी बैस त्यांच्याशी गप्पा मारीत" कमू पळाली. मग मामीवर डाफरत तो म्हणाला, "तीन पोरांची आईस तू! त्या लहान पोरीच्या काय तोंडाला लागतेस. कसली निळावंतीची भाषा नी कसलं काय, अश्राप लेकरू ते! त्याला काय कळतंय... आईची आठवण न काढता कुठे तरी मन रमवत्येय् झालं! "पण त्या प्रसंगापासून कमू मात्र भलतीच सावध झाली. संध्याकाळी शाळेतून आल्यावर ही गोष्ट तिने सातबायांना सांगितली. तशी त्या दुःखाने आळपत, पंख फाकून जमिनीवर गोल गोल लोळण घ्यायला लागल्या. कमू पुढे झाली. एका चिमणीला अलगद उचलून छातीशी कवटाळलं. "मामीचं ओरडणं मी थोडचं ऐकणारेय...? आमच्या मराठीच्या बाई आहेत ना? त्यांनी उलट सांगितलं की ज्याच्या मनात पाप नसतं अशाच माणसांजवळ पाखरं जातात. मी शिकेन तुमची भाषा." चिमण्यांना तांदूळ पाणी ठेवायला, त्यांना भेटायला दौड्यापासून दूर निवांत अशी जागा कमू हेरायला लागली. फणसाच्या मागे असलेलं मोडण चढून जरा पुढे गेलं की आगराच्या पार टोकाला एक जांभ्या दगडाचं गळाभर उंचीचं देवरणं होतं. चांगली सुरक्षित, मोठ्या माणसांच्या नजरेपासून दूर निवांत जागा. जवळ जांभळीची, काजूची, आंब्याची झाडं! चिमण्यांना पण ही नवीन जागा पसंत पडली. आता कमू पाखरांना तांदूळ, पाणी ठेवायला त्या देवरण्यापाशी जायला लागली. जवळपास माणसाचा हासभास नाही...आता कमू तिथे बसल्यावर पाखरं तिच्या अंगा खांद्यावर बागडायची.कमू शाळेत जायची, पण तिचा जीव काही तिथे रमत नसे. कामासाठी गावात कुठे कुठे फिरताना, शाळेत जाता येताना कमू पाखरं शोधीत रहायची. कधी कधी तिचे सवंगडी भेटायचे. कमू अशी अवचित येताना दिसली अन् नजरेच्या टप्प्यात कोणी मनुष्य नसला तर पाखरं तिच्या भोवती गिरक्या मारीत तिच्या खांद्यावर, हातावर बसायची. गोड गोड गाणी म्हणायची. एकदा जोग काकूंकडे मामीचा कायसा निरोप सांगायला कमू निघालेली. मळ्यातून जाताना वाटेत भोरड्यांचा गलका चाललेला दिसला. त्या आपल्याच कळपातल्या एका भोरडीला टोचताना दिसल्या. कमू धावत पुढे झाली. ओळख असूनही भोरड्यांनी तिची दखल घेतली नाही. तिच्याकडे दुर्लक्ष करून त्या आपल्या ओरडणाऱ्या भोरडीच्या अंगावर त्वेषाने बोचण्यात मग्न. जखमी झालेल्या भोरडीला कमूनं उचलूनं घेतलं तर चिडलेल्या भोरड्यांनी तिच्या हातावर चोची मारल्या. कळपातली एक म्हातारी भोरडी कमूला म्हणाली, "मार.. मार तिला! तिला आता मरायलाच हवं. धड उडायला सुद्धा येत नाहीय् तिला. आता कशाला ती जिवंत रहायला हवी...मार तिला."कमू भोरडीला ओंजळीत सांभाळून धावत सुटली. भोरडया तिच्या पाठलागावर येत ओरडत राहिल्या, "मार तिला... मार...मार तिला... मार" जखमी भोरडीला घेऊन कमू घरी आली. मामीची नजर चुकवून तिने घराच्या बाजूला असलेल्या लाकडांच्या बलाटात भोरडीला सुरक्षित ठेवलं. तिला पाणी पाजलं पण रात्री जेवण वेळेला ती भोरडी आ वासून गतप्राण झाली. आपल्या जखमी भाईबंदाला मदत करायची त्याऐवजी बाकीच्या भोरड्या तिच्या जीवावर का उठल्या? एरवी शांत गरीब असलेली ती पाखरं ... ती अशी उफराटी का बनली हे काही कमूला समजलं नाही. दुसऱ्या दिवशी तांदूळ पाणी घेऊन ती देवरण्याजवळ गेली. तिथे आलेल्या सातभाईंना तिने विचारलं तर ते म्हणाले, "तसा मुळी पक्षांचा कायदाच आहे. ज्या पाखरांच्या पंखातलं बळ संपलं, जे क्षीण झालं त्याला मुळी बाकीच्या भाईबंदांनी मारायचंच असतं!"पाखरांच्या दुनियेत हरपून गेलेल्या कमूला आता त्यांची भाषा बरीचशी समजायला लागली. त्यांचे शीळ घालण्याचे प्रकार, शीळेची तीव्रता, स्वर यावरून त्यांच्या भाव भावना ओळखण्याचं कसब तिला चागलंच अवगत झालं. शब्दापेक्षाही मनातले भाव अचूक ओळखणाऱ्या हुषार पक्ष्यांचं तिला भारी नवल वाटायचं. काही कारणामुळे कमू रागावलेली-चिडलेली असायची. अशा वेळी पाखरं तिच्या जवळ जायला बिचकायची. अशा वेळी तिनं जास्त विनवण्या केल्या तर जवळ येण्याऐवजी पाखरं उलटी घाबरून दूर उडून जायची. त्यांच्याकडे जाताना मन मोकळं साफ असावं लागतं. एवढंच नव्हे, ती जवळपास वावरत असताना एखादा वाईट दुष्ट विचार मनात आला तरी पक्षांना ते नेमकं समजायचं... मग ती घाबरुन भुर्रर्र भुर्रर्र दूर उडायची. नित्य भेटणाऱ्या काही थव्यांमध्ये एखादं पाखरु कमी झालेलं दिसायचं. अशा वेळी विचारलं तर "ते मेलं" असं पाखरं बिनदिक्कत सांगायची. काहीवेळा नव्यानं उडायला शिकलेली पिल्लं घोळक्यात मिसळायला बघायची. त्यावेळी त्या पिल्लाच्या जाती वर्णातले पक्षी त्यांच्यावर हल्ला करुन त्यांना पिटाळून लावायचे. नव्याने तिथे आलेली पाखरं कमूजवळ यायला बिचकायची. काही वेळा इतर पाखरं कमूजवळ वावरताना बघितल्यावर नवीन आलेली पाखरं चिर्रर्र चिर्रर्र करीत घाबरून दूर उडून जायची.त्या दिवशी कमू अंथरूणात उठून बसल्या बसल्या दयाळ पाखराचं प्रणयगीत अवचितपणे कानात पडलं. पांघरूण बाजूला टाकून कमू पळतच मागिलदारी गेली. विहिरीजवळच्या नागचाफ्यावर गाणारा नर तिला दिसला. कमूला बघताच तिच्या डोक्याभोवती गिरक्या मारीत तो म्हणाला, "कमू, अगं गम्मतच आहे! आता माझी मादी अंडी घालणारेय्..." कमू विस्यमयानं पहात राहिली. खूप निरखून निरखून तिनं बघितलं तरी दयाळाचं घरटं काही तिला दिसेना. "अजून नाही ना दिसलं आमचं घरटं" नर म्हणाला. एवढ्यात मादीची गोड लकेर ऐकू आली अन् जमिनीपासून उंचावर एका डहाळीच्या बेचक्यात पानांच्या झुबक्याआड दडलेलं घरटं दिसलं. "अय्या... कधी गं बांधलंत हे घरटं? किती छान आहे..." कमू म्हणाली. पंख पसरून घरट्यात गोल गोल फिरून ते सारखं केल्यावर मादी तिच्याजवळ आली."कसलं छानं अन् काय! हा नर एवढा आडमुठ्ठा ... आत मऊ कापसाचं अस्तर न घालताच घरटं पुरं झालं म्हणून नाचतोय!" मादीची प्रतिक्रिया ऐकल्यावर खजिल झालेला नर दूर उडून गेला. कमू कुतुहलानं विचारू लागली, "पण काय गं? अंडी घालायची वेळ आली हे तुम्हाला अचूक कळतं कसं? अन् तोवर तुमचं घरट पूर्ण कसं होतं? कमालचं आहे की गं!" कमूच्या अचरटपणाची कीव करीत मादी म्हणाली, "मीच तर अंडी घालणार, मग मला न कळायला काय झालं?" आपल्या गळ्याखाली पोटवळाचा भाग चोचीने दाखवित ती म्हणाली, "इथे अंडी घालण्याच्या पिशवी जवळ दहा दिवस अगोदर जरा जड जड वाटायला लागतं. मग नराला घरटं बांधायची सूचना द्यायची. आमचा अंदाज कध्धि चुकत नाही. अंडी घालायची वेळ येईपर्यंत घरटं अचुक पुरं होतंच!" तेवढ्यात चोचीत सावरीच्या म्हाताऱ्या पकडून नर आला. चार पाच खेपा मारून घरट्यात अंथरायला पुरेल एवढा कापूस त्याने गोळा केला.कमूला आता एक नवीन छंद लागला. दयाळाची पिल्लं अंडयातून बाहेर आली का हे बघायला ती सारख्या खेपा घालीत रहायची. पिल्लं बाहेर येण्यापूर्वी एक दिवस अगोदर मादी तिला म्हणाली, "उद्या बाहेर पडतील बघ माझी बाळं." दुसऱ्या दिवशी अंड्याच्या कपच्या चोचीत घेऊन जाणारी मादी तिला दिसली. भुकेमुळे चोची वासून माना लांब करणारी तीन पिल्लं दिसली. अंड्यांच्या कपच्या घरट्याजवळ पडलेल्या दिसल्या तर शत्रूला सुगावा लागतो. एवढंच नव्हे तर पिल्लं मोठी होऊन उडायला लागेपर्यंत त्यांची 'शी' सुद्धा चोचीत धरून लांब नेऊन टाकावी लागते. ही नवीन माहिती मादीनं तिला सांगितली तसेच पिल्लं मोठी होईपर्यंत कमूने घरट्याजवळ यायचं नाही. सारखं सारखं घरट्याकडे टक लावून बघायचं नाही, बोट करून निर्देश करायचा नाही. शत्रूला घरट्याचा सुगावा लागेल. कावळे, भारद्वाज हे दुष्ट पक्षी बारक्या पक्षांची अंडी पिल्लं मटकावतात असंही तिने सांगितले.कमूला आश्चर्य वाटलं. कावळयांचा दुष्टपणा तिला माहिती होता. पण भारद्वाज? "भारद्वाजाला तर आम्ही माणसं पवित्र मानतो. त्याचं दर्शन होणं हे आम्ही चागलं समजतो." कमू म्हणाली. त्यावर मादी फणकाऱ्यानं बोलली, "एक नंबरचा दुष्ट असतो तो. लाल डोळ्यांचा राक्षस, तुम्ही माना त्याला पवित्र, पण त्याचं दर्शन झालं की आमच्या मात्र छातीत धडकी भरते." कमू खूप दक्षता घेऊन दयाळाच्या घरट्याचं निरीक्षण करायची. पिल्लं मोठी व्हायला लागली. त्यांची भूक वाढू लागली. त्यांना खाऊ आणून घालण्यात नर मादीचा संपूर्ण दिवस जायला लागला. कमूच्या हे लक्षात आल्यावर तिने नागचाफ्याच्या झाडाजवळच थोडे तांदूळ घातले. "मी इथेच घालीन तांदूळ, चांगले भरपूर घालीन. तुमच्या खेपा वाचतील अन् बाळानाही पोटभर खाऊ मिळेल."नर मादी दोघांनीही नागचाफ्याजवळचे सगळे तांदूळ वेचून खाल्ले. मादी म्हणाली, "कमू तुला अगदीच कसं गं कळत नाही. तू इथे तांदूळ घातलेस तर ते बघून इतर पक्षी इथे येतील. त्यांना आमच्या घरट्याचा सुगावा लागेल." मग नर म्हणाला, "आणि हे बघ! बाळांना काही आम्ही तांदूळ नाही भरवणार." कमू म्हणाली, "का? त्यांना चावता येणार नाही? तर मग मी शिजवलेला भात घातले ना मऊ मऊ..." मादी फणकारत म्हणाली, "काही नको भात...! तांदूळ भात हे काही आमचं नेहमीचं खाणं नाही. अळ्या, कीटक, फळं हे आमचं खाद्य. आपलं नेहमीच खाणं काय आहे ते बाळांना नको का कळायला? अन् मोठी झाल्यावर ती काय इथे रहाणार आहेत तुझे तांदूळ खायला? ती जातील दुसऱ्या भागात तिथे त्यांना रोज कसे मिळतील तांदूळ ?"दयाळाची पिल्लं उडायला शिकण्याचा दिवस उजाडला. देवरण्याजवळ तांदूळ पाणी ठेऊन येताना घरट्याबाहेर पडून थरथरत डहाळीवर बसलेली तीन गोजिरवाणी पिल्लं तिला दिसली. नर मादी त्यांना पंख पसरून झेप घ्यायला सांगत होते अन् भेदरलेली पिल्लं फांदी गच्च आवळून आढेवेढे घेत होती. शेवटी रागावलेल्या नर मादींनी आपल्या चोचींनी त्यांच्यावर प्रहार करायला सुरूवात केली. चोचीचा मार चुकवण्याच्या गडबडीत तीनही पिल्लं डहाळीवरून घसरली. ती जमिनीवर आदळणार म्हणून कमू घाबरली पण खाली पडता पडता पंख पसरल्यावर ती आपोआप उडायला लागली. दोन पिल्लं दूर झेपावत निघाली. नर मादी त्यांच्या मागोमाग गेले. एक पिल्लू मात्र अशक्त होतं ते थोडसं उडून जवळच्या दुसऱ्या फांदीवर पंख मुडपून बसलं. खूप वेळानं नर-मादी नागचाफ्याकडे परत आली. "हे काय? तुमची पिल्लं कुठे आहेत?" कमूनं विचारलं. मादी म्हणली, "ती गेली." त्यांना दूर आमच्या प्रदेशाबाहेर हाकलून आम्ही परत आलो. तेवढ्यात अद्यापि फांदीवर असलेलं तिसरं पिल्लू मादीला दिसलं. ती रागाने त्याला टोचायला लागली. घाबरलेलं ते अशक्त पिल्लू काही केल्या चाळवेना. मादीच्या चोचीचे प्रहार सहन न होऊन ते चिर्रर्र चिर्रर्र असं आळपायला लागलं. कमू कळवळ्यानं म्हणाली. "ए, राहू देना त्याला आणखी एक दोन दिवस, बिचारं अशक्त आहे. त्याला दोन दिवस खाऊ पिऊ घाल. मग आपोआप उडेल ते. अशानं मरेल ना ते!"नर रागाने म्हणाला, "मरू दे मेला तर! हा ऐतखाऊ, अजून घरट्याची उब सोडून जाऊ इच्छित नाही. कोण आयतं खायला घालणार याला? याचे सोबती कधीच दूर गेले अन् हा आयतोबा आमच्याच प्रदेशात हक्क गाजवायला पहातोय." अन् त्यानेही पिल्लावर जोरात चोची मारायला सुरूवात केली. कमूला निर्दयी नर मादीचं कृत्य पाहवेना. "कमाल आहे की रे तुमची. तुमचं बाळच ना ते? राहू दे ना त्याला इथे रहायचं तर." मादी रागाने म्हणाली, "तुला नाही समजायचे आमचे कायदे! पिल्लं मोठी झाली, उडायला लागली की ते आमचे शत्रू बनतात. हा इथे राहिला तर उद्या माझ्यावरही हक्क गाजवायला बघेल. ते काही नाही, जाऊदे याला इथून." आता नर मादी दोघेही त्याला टोचायला लागले. घायाळ झालेलं पिल्लू फांदीवरून खाली कोसळलं. "मरू दे त्याला" म्हणत नर मादी उडून गेली.कमूने त्याला अलगद उचललं अन् एका फांदीवर ठेवलं. त्या पिल्लाला घरी नेण्याची अनिवार इच्छा तिला होऊ लागली. पण मामीला समजलं तर ती गहजब करील याची भीती तिला वाटली. दुसरं म्हणजे पक्षांचे अद्भुत कायदे थोडे थोडे तिला समजू लागले होते. आपण या पिल्लाला आश्रय दिला तर ते पक्षांना कितपत आवडेल ही सुद्धा शंकाच होती. अशी किती निराधार पिल्लं असतील. सगळ्यांनाच कोण आसरा देणार? शेवटी त्याच्या नशिबात असेल ते चुकणार नाही हे उमजण्याएवढी कमू आता प्रौढ झाली होती. म्हणून मन घट्ट करून ती घरी गेली.पाखरांच्या संगतीत त्यांच्या भाषा, त्यांचे अद्भुत कायदे याचं ज्ञान कमूला झालं होतं. प्रत्येक पाखराची त्याच्या जातीवर्गाप्रमाणे भाषा वेगळी असते. मात्र राग व्यक्त करणं, खाद्य पाणी दिसलं की सूचना करणं, शत्रूची चाहूल लागणं अशा वेळी मात्र त्यांचे संकेत समानच असतात हे तिच्या लक्षात आलं. दुपारच्या वेळी माजघरात झोपलेली असताना शत्रूची चाहूल लागल्याचे संकेत देणारं साळुंक्यांचं भयकारी ओरडणं कमूच्या कानांत पडलं. कमू गडबडीने मागीलदारी गेली. प्राजक्ताप्रमाणे फणसावर उंच फांद्यांमध्ये असलेल्या बिळात साळुंक्या अंडी घालायच्या. त्या फणसावर एक पिवळं धम्मक आधेलं (धामण) चढताना दिसलं. साळुंक्यानी त्याला पाहून एकच गिल्ला केला. ते वर जायला लागलं तस तशा साळुंख्या अधिकच ओरडायला लागल्या. त्या झेप घेऊन आधेल्याच्या अंगावर चोचीचे प्रहार करू लागल्या. पण त्यांच्या हल्लाला न जुमानता आधेलं नेटाने वर जाऊ लागलं. आता मात्र कमू घाबरली अन् तिनं मामाला हाक मारली.कमूची ओरड ऐकून मामा धावतच आले. फणसावर साळुंक्यांची अंडी-पिल्लं खायला चढणारं आधेलं त्यांनी बघितलं. थोडा वेळ विचार करुन त्यांनी एक लांबलचक चिव्याची काठी घेतली. तिच्या टोकाला दोरीने कोयती बांधली अन् धोतराचा काचा मारुन ते फणसावर चढले. तो पर्यंत आधेलं फांदीवरच्या बिळापर्यंत पोहोचलं. अन् त्याने बिळात तोंड घातलं. बिळातल्या त्याने गिळलेल्या अंड्याचा फुगीर भाग त्याच्या वेटोळ्यातून मागे मागे सरकताना दिसू लागला. मामांनी आधेल्याच्या वेटोळ्यात कोयती खुपसून काठी जोराने खाली ओढली. त्याबरोबर अर्धवट अंग चिरलेलं आधेलं धप्पकन खाली जमिनीवर पडलं. खाली उतरल्यावर त्याला पूर्ण मारून मामानी ते अजस्त्र धूड कुंपणाबाहेर भिरकावून दिलं. जिची अंडी खाल्ली होती ती साळुंकी बिचारी अंग फुलवून हुडहुड्या घालीत राहिली. जेमतेम मार्क मिळवून कमू फायनल पास झाली. पुढे शिकायला तिने नकार दिला. मग कुणी जास्त आग्रहपण केला नाही. आता पुरा दिवस पाखरांच्या मागे रहायला तिला फुरसत मिळाली. कमू मन लावून त्यांची भाषा आत्मसात करू लागली. त्यांची भाषा मर्यादित ध्वनी, नेमके शब्द असलेली. त्यांच्यासारखे स्वर काढणे तर भारी अवघड. खूप प्रयत्न केल्यावर दात घट्ट आवळून एक नाकपुडी बंद करून जीभ घशात ओढून घेतल्यावर पाखरांसारखे स्वर काढता येतात हे तंत्र तिला उमगलं. त्यांची गाणी मात्र तिला सफाईदारपणे म्हणायला जमेनात. हळूहळू साळुंक्या, भोरड्या, दयाळ, सातभाई, बुलबुल अशा पुष्कळ पक्षी जातीची बोली तिला अवगत झाली. तिचं दिवस दिवस पाखरांमध्ये रमणं, शीळा घालणं असल्या अघोचरी नादिष्ट चाळ्यांबद्दल मामी तिची तासडमपट्टी करायची. तेवढ्यापुरती कमू गंभीर व्हायची.पेंडखळ्यात कार्तिक्या दशमीपासून पौर्णिमेपर्यंत गावदेवाचा उत्सव व्हायचा. सहा दिवस कीर्तन, प्रवचनं व्हायची. कमू आता मोठी म्हणून मामी तिला आपल्या सोबतीला कीर्तनाला न्यायची. कीर्तनकार बुवानी पक्षी तीर्थाची कथा सांगितली. कमूला भारी आवडली ती कथा. बुवानी पाखरांबद्दल सुद्धा किती अद्भुत माहिती सांगितली. पक्ष्यांची भाषा निळावंतीच्या पोथीत आहे पण ती पोथी कुणाला मिळत नाही. चुकून एखाद्या माणसाला ती पोथी मिळाली अन् त्यानं पक्षांची भाषा शिकली तर त्या माणसाचा निर्वंश होतो असं बुवा म्हणाले. हे ऐकून मात्र कमू घाबरली. दुसऱ्या दिवशी तांदूळ घालायला गेल्यावर तिने साळुंक्यांना त्याबद्दल विचारलं. त्यांना काही सांगता येईना पण त्या प्रदेशातला पाखरांचा नायक असलेला पिंगळा नक्की माहिती देईल असं त्या म्हणाल्या. पिंगळ्याचं ओरडणं कमूनं ऐकलेलं होतं. पहाटेच्या वेळी पिंगळा ओरडताना ऐकून भीती वाटायची म्हणून त्याची भेट घ्यायला कमू तयार होईना.पिंगळ्यांचा आवाज ऐकला की तिच्या अंगावर काटा यायचा. तो भीतीदायक दुष्ट पक्षी असावा असा तिचा समज! पण साळुंक्या, भोरड्या या तिच्या मैत्रिणीनी सांगितलेली माहिती एकदम वेगळी होती. पिंगळा हा अत्यंत हुषार अन् बुद्धिमान पक्षी असून पक्षी जगतात त्याचं आदराचं स्थान असल्याचं त्यांनी सांगितलं तेव्हा मात्र त्याला भेटायला कमू तयार झाली. दोन दिवसानंतर संध्याकाळच्या वेळेला देवरण्याजवळ जांभळीच्या झाडाखाली पिंगळा आला. कमू त्याला भेटायला गेली. कीर्तनकारबुवांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे का? असा प्रश्न तिने विचारला. पाखरांची भाषा जाणणाऱ्या माणसांचा निर्वंश होतो ही गोष्ट पूर्णतः खोटी आहे असं पिंगळा म्हणाला. उलट कमूचं मन निर्मळ आहे, ती भाग्यवान आहे, म्हणून ही अद्भुत विद्या तिला प्राप्त झाल्याचं त्याने सांगितलं.पक्ष्यांच्या आजवरच्या इतिहासात मानवाचे पक्ष्यांशी इतके जिव्हाळ्याचे संबंध असल्याची उदाहरणं अगदी थोडी असल्याचं तो म्हणाला. माणसं ही धूर्त, दगाबाज असल्यानं पक्षी त्यांच्यावर विश्वास ठेवीत नाहीत. एवढचं नव्हे तर माणसाचा जरा स्पर्श झाला तरी पाखरांना विटाळ होतो. पाखरं निरुपद्रवी असली तरी मनुष्य त्यांच्याशी क्रूरपणाने वागतो. त्याने आजपर्यंत पक्षीवर्गाची अपरिमित हानी केली आहे म्हणून आपल्याला प्राप्त झालेल्या या अद्भुत विद्येची माहिती कमूनं चुकूनही दुसऱ्या कुणाही माणसाला सांगू नये. ही विद्या दुसऱ्या माणसाला शिकवू नये. कारण दुसरा मनुष्य त्याचा गैरवापर करुन पक्षांना त्रास देईल तर मात्र पाखरांचा शाप तिला बाधेल. पाखरं दुर्बल असली तरी माणसाचं नशिब बदलण्याचं सामर्थ्य त्यांना निसर्गाने दिलेलं आहे. म्हणून अजाणतेपणाने झालेला संकेतभंग सुद्धा कमू अन् पाखरं दोघांच्याही दृष्टीने घातक असल्याचं पिंगळा म्हणाला. पक्षी आणि माणूस यांची विश्व भिन्न असल्याने दोघांनीही आपल्या मर्यादेत रहाणं हिताचं आहे असं सांगून कमूचं भवितव्य उज्वल आहे, तिने पाखरांवर जी माया केली त्याचं फळ तिला मिळेल असं भाकित सांगून पिंगळा निघून गेला. पिंगळ्याने सांगितलेल्या गोष्टीमुळे कमूच्या मनावरचं दडपण दूर झालं तसंच आपलं आणि पक्ष्यांचं नातं कुणाच्या लक्षात येऊ नये याकडे कटाक्ष ठेवायचा निर्धार तिने केला. पक्ष्यांना तांदूळ पाणी घातल्यावर नेहमीप्रमाणे तासन् तास त्यांच्याशी गप्पा मारीत रहाणं तिने बंद केलं. परमेश्वराने आपल्याला दिलेला हा अतीव आनंदाचा ठेवा आपल्या हातून घालवायचा नाही, असा सूज्ञ विचार करून ती संयमाने वागू लागली. घरच्या कामाधंद्यात लक्ष घालू लागली. तिचा पाखरांचा नाद कमी झाला हे मामीच्याही लक्षात आलं.कमू लग्नाला झाली. आता तिच्यासाठी एखादं चांगलं स्थळ बघायला हवं अशा चर्चा घरात व्हायला लागल्या. तेव्हा तिच्या भाव विश्वालाच तडा गेला. पक्ष्यांच्या विश्वात रमून गेलेल्या कमूला पक्ष्यांना सोडून नवऱ्याकडे रहायला जायचं हा विचारसुद्धा पटेना. होडावड्याच्या गोडबोल्यांकडून टिपण जुळतं असा निरोप आला. कमूला दाखवायला न्यायचा बेत ठरला त्या दिवशी तर तिची कोण उलाघाल झाली पण मनुष्य म्हणून हा भोग अटळ आहे. 'मला लग्न करायचं नाही' असं कमू सांगती तर अनेक तर्क-कुतर्क शंका निघाल्या असत्या. कदाचित तिचं गुपित फुटलं असतं म्हणून मामा मामी सांगतील ते निमूटपणे ऐकायचं, देवाच्या मनात असेल तसं होईल! आपलं भवितव्य उज्ज्वल आहे, हे पिंगळ्याचं भाकित खोटं ठरणार नाही हा विचार तिने केला.मामा-मामीबरोबर कमू होडावड्याला जाऊन आली. मामांनी तिच्यासाठी योजलेला नवरा मुलगा शांत, सालस होता. कमूला तो आवडला. चार दिवसांनी हे स्थळ पसंत असल्याचा निरोप आला. त्या दिवशी मात्र कमू सैरभैर झाली. तिच्या बदललेल्या मनःस्थितीचा किती विपरीत परिणाम पाखरांवर झाला याचा अनुभव आल्यावर कमू शहाणी झाली. पक्षी अन् माणूस दोघांनीही आपल्या मर्यादेत रहावं हे पिंगळ्याचं मत किती योग्य आहे हे तिला आता पटू लागलं. त्यांच्या विश्वातलं आपलं अस्तित्व लोप पावल्याची विषण्णता पाखरांना होऊ नये अशा बेतानं सावधपणे हे मायापाश तोडायचा निश्चय तिने केला.कमूचं लग्न मामांच्या दारातच लागणार होतं. मांडव घालणं, रूखवत, पाहुणे या सगळ्या घणाघोरात कमू मात्र अलिप्तच ऱ्हायली. आपण हे घर सोडून गेलो, पाखरांना आपण दिसलो नाही की त्यांची काय अवस्था होईल हा विचारसुद्धा तिला करवेना. लग्न दोन दिवसांवर आलेलं असताना नित्यनेमाप्रमाणे तांदूळ पाणी ठेवायला कमू देवरण्यापाशी गेली. तांदूळ ठेवताना तिच्या मनात आलं... आजची ही खेप आपली शेवटची. उद्या वऱ्हाडी आले की, आपल्याला घराबाहेर पडता नाही यायचं! न राहवून तांदूळ वेचणाऱ्या भोरड्या, साळुंक्या, सातभाईंना तिने म्हटलं, "बायानो उद्या काय मी इकडे येणार नाही. परवा तर मी माझ्या जोडीदाराबरोबर त्याच्या घरट्यात रहायला जाणार. मग तर आपली भेटच नाही होणार!" तिचा बांध फुटला. कितीही संयम घातला तरी तिला भावना आवरल्या नाहीत.आपली स्थिती पाहून पाखरं कलकलाट सुरू करतील अशी तिची अपेक्षा! परंतु त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही. त्यांचा अनपेक्षित प्रतिसाद पाहून सर्द झालेली कमू रडणं आवरून म्हणाली, "कां गं बायानो, मी तुम्हांला आता दिसणार नाही याचं वाईट नाही का वाटलं तुम्हांला?" तशी गोड लकेर छेडीत भोरडी म्हणाली, "त्यात कसलं वाईट वाटायचं? तुला तुझ्या जोडीदारा बरोबर जायलाच हवं! आता तुझी माणसं तुला या प्रदेशात राहू देतीलच कशी? मग कमू म्हणाली, "मी गेले की तुम्हाला तांदूळ पाणी कोण देणार? याची काळजी नाही वाटत तुम्हांला? रोज माझ्या यायच्या वेळेला तुम्ही वाट नाही बघणार माझी? तुम्हांला आठवण नाही येणार माझी?" शांतपणे साळुंकी म्हणाली, "तू तर जाणार! मग तुझी वाट कशाला बघायची? अन् तुझी आठवण तरी कशाला काढायची आम्ही? तांदूळ पाणी मिळायचं बंद झालं की आम्ही मुळी येणारच नाही इथे! आम्ही जाऊ दुसरीकडे खाणं शोधायला."पाखरांचं हे रूप, त्यांचे विचार कमूला नवीन होते. अपेक्षाभंग झालेली कमू पक्ष्यांकडे पाठ फिरवून घराकडे निघाली. चिमण्यांची उत्तर ऐकून ती एवढी खट्टू झाली की तिचं रडू मुळी बंदच झालं. रात्री तिला धड जेवणसुद्धा गेलं नाही. अंथरूणावर पडून विचार करीत असताना चिमण्यांच्या उत्तरामागचं रहस्य तिला अकल्पितपणे उलगडलं. पाखरं प्रेमळ असली तरी भावनाविवश नसतात. पिल्लं सक्षम होईपर्यंत जीवाचं रान करणारी पक्षीण... ते पिल्लू स्वतःच्या पंखावर उडू लागलं की पुढे त्याचं काय होईल याचा विचारही करीत नाही. ही त्यांची भावनाशून्यता नव्हे... हा असतो त्यांचा संयम, सारासार विवेक अन् स्वतंत्रबाणा! आपल्या मर्यादा त्यांना पूर्णार्थाने ज्ञात असतात म्हणूनच अल्पशा त्यांच्या आयुष्यात निर्भेळ आनंदाचे क्षण पाखरं जगू शकतात. त्यांच्या सहवासातून मिळालेला हा विचार अंतरी साठवीतच कमू निद्राधीन झाली.लग्नसोहळा पार पडला अन् मामा मामीच्या पाया पडून निघण्याचा क्षण आल्यावर मात्र तिला दुःखावेग अनावर झाला. मामीला मिठी मारून हुंदके देत कमू म्हणाली, "मामी तू अन् मामा, दोघांनी माझं खूप केलंत. आई-वडिलांची उणीव मला भासू नाही दिलीत. आईच्या मायेला पारखी होऊन मी इथे आले. जगण्याचा अर्थ पक्षी मित्रांनी मला शिकवला अन् जगण्याचं बळही दिलं. मामी मी गेले तरी रोज न चुकता मूठभर तांदूळ न् पाणी माझ्या पाखरांसाठी ठेवशील ना गं?" तिला कुरवाळीत मामी म्हणाली, "अगो! तू सांगण्यापूर्वीच तुझा वसा पुढे सुरू ठेवायचा असं मी ठरवलंय. आज एवढी गडबड, पण पहाटेच तुझ्या पाखरांसाठी पसाभर बुंदी अन् पाणी देवरण्याजवळ ठेवून आले मी." "कमू तू आलीस अन् तुझ्या पायगुणामुळे आमच्या संसारावर आलेलं अरिष्ट टळलं. पाखरांना दाणापाणी ठेवायचा तुझा नेम सुरू झाला अन् त्यांचा दुवा मिळून या घरात लक्ष्मीची पावलं उमटली. लहानपणी तुझं चळिंत्र बघून मी मारलं सुद्धा तुला! पण तुझ्या व्रताचं फळ मिळालं म्हणून आज माझ्या घरात समाधान नांदतेय् हे मला पुरतं उमगलं. तू मुठी भरूभरून तांदूळ घालायचीस पाखरांना ते का मला समजतं नव्हतं? पण तुझ्या व्रताच्या आड मी आले नाही. तू निर्धास्त मनानं सासरी जा! अन् हे बघ, गोडबोल्यांच्या घरामागे मोठा पार बांधलेला आहे. त्यावर उंबराचं झाड आहे हिरवंगार...तिथे खूप पाखरं जमलेली दिसली मला. त्या उंबराखाली पाखरांसाठी तांदूळ अन् पाणी ठेवायचा प्रघात तू सासरी गेल्यावर सुरू कर. मी अनुभवाचे बोल सांगत्येय... त्या अश्राप पक्ष्यांचा दुवा मिळाला तर तुला सुद्धा आयुष्यात कधी काही कमी नाही पडायचं...!"