वसतीची गाडी
जुन 78 ते जुन 86 या कालावधित मी राजापुर तालुक्यात कुंभवडे हायस्कूल मध्ये शिक्षक म्हणून आणि नाणार हायस्कूल मध्ये हेडमास्तर म्हणून नोकरी केली. राजापुर तालुक्यातल्या ब-याच गावांमध्ये दिवसातून फक्त एक एस्टी असायची. संध्याकाळी 4 ते 5 वाजता बस राजापुरातून सुटायची. ती सायंकाळी सहा- साडेसहा पर्यंत गावात पोचायची. ती रात्री त्या गावी वस्तीला राहून दुसरे दिवशी सकाळी 7 वाजता त्या गावाहून राजापुरला निघायची. ड्रायव्हर कंडक्टर आपला जेवणाचा डबा सोबत न्यायचे. रात्री जेवण करून गाडीतच झोपायचे. संध्याकाळी गाडीवरच्या डेपोतून सुटली की बाजारात नदी पात्रात जावून पुन्हा वळून यायची. या दरम्याने ड्रायव्हर कंडक्टर आपल्या बि-हाडा लगतच्या स्टॉपवर गाडी थांबवून आपला जेवणाचा डबा घ्यायचे. काही वेळा त्यांचे कोणी कुटुंबीय जेवणाचा डबा द्यायला येत असत तर काही वेळा ड्रायव्हर कंडक्टर गाडी थांबवून स्वत: जावून डबा घेवून येत असत. गाडी ज्या गावी मुक्कामी थांबायची त्या स्टॉप जवळच्या एखाद्या घरातून पाण्याची कळशी नी तांब्या ड्रायव्हर कंडक्टर याना देण्याचा प्रघात असे.
क्वचित एखाद्या घरातून परिचयाच्या ड्रायव्हर कंडक्टर ना रात्री लोणचं,भाजी आमटी दिली जायची. क्वचित एखादा घर मालक त्याना सकाळी आवर्जून चहा द्यायचा. नाणारला गाडी मुक्कामी थांबे तिथे पेडणेकरांच्या घरातून रोज रात्री ड्रायव्हर कंडक्टरना जेवण वाढले जाई नी सकाळी चहा टोस्ट/बटर नेमाने दिला जाई. ही बाब इतकी सर्वश्रुत होती की, नाणारला येणारे ड्रायव्हर कंडक्टर जेवणाचा डबा आणित नसत. नवीन ड्रायव्हर कंडक्टर्सना ड्युटी लागली तर कंट्रोल रूम मधले कर्मचारी त्याना या गोष्टीची कल्पना देत. जेवणात हुकमी मच्छी- अंड्याची कढी/ मटण यापैकी एखादा प्रकार नक्की असायचा. त्यामुळे ब्राम्हणड्रायव्हर कंडक्टर असेल तर तो मात्र आपला जेवणाचा डबा स्वत: घेवून जात असे.सणाच्या काळात जादा मुंबई गाड्या सोडल्या जात तेंव्हा ड्रायव्हर कंडक्टर किंवा बस वेळेवर उपलब्ध झाली नाही तर पाच वाजता सुटणारी एस्टी रात्री आठ नऊ इतक्या उशिराने सोडली जाई पण कधिही वस्तीच्या एस्टीची फेरी रद्द होत नसे.
आम्ही कामानिमित्त कोल्हापूर,रत्नागिरीला जायचो. कोल्हापुरहूनयेणारी गाडी चार वाजेतो राजापुरला यायची. रत्नागिरीहून दोन वाजता सुटणारी वेंगुर्ला गाडी साडेचार पाच वाजेतो राजापुरला वरच्या डेपोत यायची तेंव्हा वसतीच्या गाड्या लागलेल्या असायच्या. क्वचित गाडी उशिरा आली तर पॅसेंजर कंट्रोल केबिनवर चौकशी करी. संबधित गाडी डेपोतून रवाना झालेली असली तरी ती बाजारात जावून वळून येई पर्यंत सहज तासभर वेळ मोडे. मग तो प्रवासी वरच्या डेपोतून फर्लांगभर अंतरावरच्या ऑक्ट्रॉय नाक्या जवळ जावून थांबायचा. सगळ्या गाड्या बाजारातून वळून ऑक्ट्रॉय नाक्या जवळ आल्यावर मग तिथून नियोजीत गावी रवाना होत. कुंभवडे नाणार आणि सागवे या एकाच रूट वर जाणा-या असल्याने प्रवाशाना त्यांची नियोजीत गाडी चुकली तरी तिन पैकी एखादी गाडी मिळाली तरी चाले. कुंभवडे प्रवासी नाणार टॉवर जवळ उतरून दीड तास चाल मारून गाव गाठू शकत असे. तर नाणार, सागवे प्रवासी नाणार मयक्रो वेव्ह रिले टॉवर जवळ उतरून किंवा पुढे मयेकर मांगर स्टॉप वर उतरून दीड पावणेदोन तास चाल मारून नाणार किंवा सागवे गाठू शकत असे.
जून 81 मध्ये मी नाणार हायस्कूलला हेडमास्तर म्हणून हजर झालो. काही कामानिमित्त राजापुरला जायच असेतेव्हा सकाळी लौकर उठून आंघोळ वगैरे उरकून सकाळी पावणे सात वाजता गाडी गाठायची म्हणजे मोठीच सर्कस करावी लागे. तरी गाडीचा स्टॉप मी रहात असे त्या घरापासून दोनेकशे पावलं एवढ्या अल्प अंतरावर होता. गाडी सुटायची निश्चित वेळ ठरलेलीनसे. गाडी वसतीला थांबे त्या मुसलमान वाडीतून मासे नेणारे त्यांच्या अडचणीच्या वेळी गाडी थांबवून ठेवून उशीरकरीत. काही वेळा एखादा ड्रायव्हर – कंडक्टर वक्तशीर असेल तर गाडी सकाळी साडेसहालाच सुटायची. एखादा हालमें खुशाल असेल तर गाडी साडेसात पर्यंतही सुटत नसे. मला कधी गाडी गाठायची असेल तेव्हा विश्वनाथ शिपाई सहा वाजण्याआधीच मला उठवायला यायचा. पण एकदा थंडीच्या दिवसात गंमतच झाली. त्या काळात रात्री मोठ्या असतात. सात वाजेपर्यंत काळोख असतो. असंच एका दिवशी राजापुरला जायचं होतं. थंडीचे दिवस असल्यामुळे विश्वनाथ ला यायला उशिर झाला.मी उठलो तेव्हा साडेसात वाजले होते. मी लगबगीने चहाहीन घेता स्टोव्हवरच पाणी तापत लावलं. माझी आंघोळ सुरु असताना विश्वताथने चहाचं आधणठेवलं. मी कसेबसे चार तांब्ये ओतून अंग पुशीत बाहेर आलो. अंडर वेअर बनियन चढवीत असतानाच गाडीचा आवाज आला.
मी आवरून जाई पर्यंत गाडीथांबवून ठेवायची म्हणून विश्वनाथ स्टोव्ह बंद करून स्टॉपवर धावला. त्याने हात दाखवून गाडी उभी केली. सर येताहेत म्हणून कंडक्टरला सांगितल. नशिबाने माझ्या चांगल्या परिचयातलेच कुवेसकर कंडक्टर होते. ते हसत हसत म्हणाले, “तू आदी जा नी दोन कोप चाय ठेव...... आज माका चांगली चाय भेटली नाय...... मी डायव्हरांक घेवन दोन मिनिटात येतय्.... तू मस्त घनघनीतशी चाय कर , दुदाची साय सगळी माज्या कोपात वत . नायतरी सर दिवसाडी नायच हत........ ” मी दाराबाहेर पडत असता असता विश्वनाथ आला. “सर, आज कुवेसकर कंडाक्टर हत..... ते नी डायव्हर चाय खावक् येतहत.... ” माझा जीव भांड्यात पडला.विश्वनाथने झटपट चहा ठेवला. त्या दिवशी मी चहा न घेताच बाहेर पडलो होतो. पण गिरमाईच्या कृपेने चहा घेवून आरामात निघता आलं.
माझ्या सहा वर्षाच्या नाणार वास्तव्यात तीन चार वेळा गाडी थांबवून धरून गाठावी लागली. गाडीत परिचयाची मंडळी असत ती कंडक्टरना विनंती करून थांबायला लावीत. वसतीच्या गाडीवर येणाऱ्या ड्रायव्हर कंडक्टरनाही या गोष्टी अंगवळणी पडलेल्या होत्या. गोरे कंडक्टर नी देवधर ड्रायव्हर नाणारला येत तेव्हा बहुसंकख्य वेळा रात्री मला भेटायला येत. डबा आणलेला नसेल तर शाळेसमोर स्टॉपवर गाडी उभी करून शिपाया कडे आपण आज डबा आणलेला नाही, रात्री जेवायला येणार आहोत असा आगावू निरोप देवून ठेवीत नी रात्री जेवायला येत.
मी आणि आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष उल्हासभाऊ शाळेच्या कामाला रत्नागिरी ला जायचो तेंव्हा दिसोदिशी परत यायचे असले तर जाताना कंट्रोल रूम मध्ये सप्रे साहेबाना सांगून जाऊ. आमचे उपाध्यक्ष उल्हास भाऊ त्यांचे स्नेही. तीन च्या रत्नागिरी वेंगुर्ला गाडीला यायला उशिर झाला तरी आम्ही येईतो सप्रे साहेब गाडी सोडू देत नसत. एकदा वेंगुर्ला गाडी पाली पोस्ट ऑफ़िस जवळ ब्रेकडाऊन झाली. ड्रायव्हर लांज्याला जावून मेकॅनिक घेऊन आला . त्याने गाडी दुरुस्त केली. या झेंगटात दोन तास मोडले. आम्हाला राजापुरला पोचायला आठ वाजणार म्हणजे वसती राजापूरला नवाळे लॉज वर करावी लागणार नी दुसरे दिवशी मुंबई सागवे गाडीने मयेकर मांगरला उतरून नाणार गाठी पर्यंत दुपारचे अडीच तीन वाजणार हे ठरलेले. पण रात्री पावणे आठला वेंगुर्ला गाडी राजापुर डेपोत गेली तेव्हा सप्रे साहेब आले. नाणार गाडी नदीपात्रात थांबलेली आहे असे त्यानी उल्हास भाऊना सांगितले.
साडेपाच पर्यंत वेंगुर्ला गाडी आली नाही म्हणून सप्रे साहेबानी लांजा डेपोला फोन करून चौकशी केली. आमची वेंगुर्ला गाडी आठ वाजेतो येणार याचा त्याना अंदाज आला. त्या दिवशी वसतीच्या गाडीवर ड्युटी लावलेल्या नियोजीत ड्रायव्हरांपैकी एकजण रजेवर गेल्यामुळे पर्यायी ड्रायव्हरची व्यवस्था करावी लागली असं सबळ कारण असल्यामुळे नाणार गाडी उशिरा सोडण्यात आली.आम्ही रिक्शा करून बाजारात गेलो नी जवाहरचौकात उतरून नदी पात्रात थांबलेल्या नाणार गाडीजवळ जावून गोरे कंडक्टरना आम्ही आल्याची वर्दी दिल्यावर रात्री आठ वाजता नाणार गाडी राजापुरहून सुटली .
वस्तीची गाडी ही माझ्या मर्मबंधातली ठेव आहे. एका गोष्टीचा मला आवर्जून उल्लेख करायचा आहे. सात आठ वर्षाच्या माझ्या कुंभवडे वास्तव्यात माझ्या असंख्य राजापूर खेपा झाल्या असतील. वसतीची गाडी ही एकमेव असल्याने येता जाता अनेक वेळा गाडी गाठायला तारेवरची कसरत करावी लागली पण बेमुर्वतखोरपणे पॅसेंजरला टाकून जाणारा अशी ख्याती असणारा राजापुर डेपोतला एकही ड्रायव्हर किंवा कंडक्टर मला सांगता येणार नाही.
************