दातारांचा त्रिपूर श्रीराम विनायक काळे द्वारा थरारक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

दातारांचा त्रिपूर

        दातारांचा त्रिपुर

 

       तिन्हीसांजा होत आली अन् डोक्यावर सामानाचे पेटारे घेतलेली दशावतारी मंडळी निव्यात म्हादू पेंढारकराच्या खळ्यात डेरेदाखल झाली.दाढी मिशा सफाचट केलेले, बाईल माणसासारखे लांब केस वाढवून त्यांचा आंबाडा बांधलेले, डोळ्यात काजळ घातलेले बापयेबघून अचंबीत झालेली घाडी, परब नी गुरवांची पोरेटोरे दशावताऱ्यांच्या तांड्या सोबत म्हादू काकांच्या घरापर्यंत आलेली. म्हादूकाका पडवीतल्या झोपाळ्यावर बसून पान सुपारीचा पितळी डबा उघडून पान जमवीत बसलेला.दशावतारी आंगणात येवून उभे राहिल्यावर स्वयंपाक घराकडे तोंड वळवण्याची तसदीही न घेता ओरडला,“ हऽऽय , भाग्ये ऽ दशात्री आलेत गो.... त्यांचे साटी पाण्याची कळशी - तांब्या नी  गुळाचे खडे घाडा बाहेर.....”

    म्हादुकाकाची बायको  बारा बाळंतपणे होवून टेकीला आलेली. त्यात दूध तूप खाऊन तिचा देह अस्ताव्यस्त वाढलेला. बसल्याजागी  मांडी बदलीतती करवादून म्हणाली,“हेस्नी झोपाळ्यावर बसून फर्मान सोडाय काय झाले...... सांजावतआले तरी एक लेकरू दिकी घरी आलेले नाय अजून. स्वता आत येवून न्हेलेत तर काय बिघडले  अस्ते म्हणतो मी? दुपारी पोरानी निस्ता उच्छाद मांडलेनी. घरभर निस्ती झुरले सारखी दडा दडा  धावत  ऱ्हायलेली . मज काय सुकान आडवे होयस्  दिलेनी नाय..... ” बायकोच्या तोंडाचा हा पट्टा ऐकल्यावर म्हादूकाका ना ईलाजाने उठला. सुपारी कातरीत कातरीत पडवीच्या दारात जावूनत्याने शेजारघरी खेळायला गेलेल्या अनी- बनीला हाका मारायचा सपाटासुरू केला नी “येतो... येतो ” अशी त्यांची हाळी ऐकल्यावर माघारी येवून झोपाळ्यावर स्थानापन्न झाला.

      गूळपाणी घेतल्यावर जरा हातपाय ताणून शीण भाग जिरल्यावर दशावताऱ्यानी अंगणात कडेला तीन धोंड्यांची चूल मांडून आमटी-भात रांधला. म्हादू काकांच्या बनीने  मोठ्या दगडी सटातून आवळ्याचे लोणचे  आणून दिले. केळीच्या फाळक्यांवर भाताचे ठाय वाढून त्यावर आमटी ओतून आवळ्याचे लोणचे तोंडी लावून दशवतारी चटाचटा जेवले नी आचवल्यावर पान खावून दोन घोंग़ड्या एकळत्या आंथरून कपड्याची बोचकी उशाला घेवून काळे वेळेचे भान न ठेवता डाराडूर झोपले. भावकाईचे देवूळ म्हादू काकाच्या घरापासून कोंबड्याच्या बांगे एवढ्या अंतरावर! आजचा धयकालातिथेच व्हायचा होता. देवूळ तसे गावाच्या एका कुशीला आडबाजूला..... दहा वर्षामागे भिकू दाताराचे पड ठिकाण लिलावात घेवून नाना बामण निव्यात रहायला आला. तो आल्यावरभावकाईच्या मंदिराला जरा उर्जितावस्था आली. ठाणेश्वर हा ग्राम देव! पण तिथे अण्णा दातार हे मानकरी. त्या देवस्थानाच्या उत्सवात नाना बामणाने  रिगाव करायचा प्रयत्न केला. पण अण्णा दातारानी त्याची डाळ शिजायला दिली नाही.गावात जम बसवायचा तर एखादे देवस्थान हातात हवे असा धूर्त विचार करून नाना बामणानेएका बाजूला दुर्लक्षित असलेले भावका देवीचे देवस्थान कबजात घेतले.

    गुरवकीच्या मानापासून वंचित राहिलेल्या दाजी गुरवाला हाताशी घेवून त्याने भावकाईच्या मंदिराचेआवार लख्ख बेणून घेतले. मंदिराच्या छपराची नीट डागडुजी करून घेवून  दिगू मिराश्याला बारा रुपये वर्षासन देवून देवीची नित्यपूजा सुरू केली. दाजी गुरवाने कौल प्रसाद घ्यायला सुरुवात केल्यावर देवळात लोकांचा राबता वाढला. शोध चौकश्या करून बामणाने देवीच्या मंदिरात नवरात्र सुरू केले. दसऱ्याला स्व खर्चाने प्रसादाचे गाव जेवण घातले. आता गावातले लोक बामणाला मान द्यायला लागले.त्याच्याकडे लोकांचा राबता वाढला. त्याचे हे वाढते प्रस्थ बघून अण्णा दातार नी त्याचे दैत्या सारखे सात मुलगे बामणाला पाण्यात बघायला लागले. आधीच भिकू दाताराला कर्जावू पैसे देवून गहाणखत लिहून घेताना ध चा मा करून रक्कमेचा आकडा फुगवूनबामणाने त्याच्या पडणाबर जप्ती आणून भिकूला देशोधडीला  लावले म्हणूनअण्णांचे मुलगे त्याचा राग राग करीत. तशात बामणाची ही नसती आफत शेजाराला आल्यावर हद्दमेरांवरून कायम तंडामुंडी सुरू झाली आणि कोर्टात दोन तीन केशीही दाखल झाल्या.पाताळयंत्री  नाना बामण सुखासुखी अहारी येणार नाही म्हणताना जळात राहून माशांशी वैर नको असा भावरथी विचार करून अण्णानीजरा नमते घ्यायला सुरुवात केली. नाना बामणानेही वरकरणी जवळीक साधीत सामोपचाराने वागायचे नाटक सुरू केले. मात्र त्याने मनात डूख धरलेला होता.

        काहीही करून आज ना उद्या अण्णांच्या सातही पोरांचा काटा काढायचा बेत त्याने योजलेला होता.ते सात वसू हयात असे पर्यंत आपल्याला सुखासुखी गावात वरचष्मा ठेवता येणार नाही नी गाव कह्यात येणार नाही हे त्याने पुरते ओळखलेले होते. त्या हेतूनेच त्याने आजचा हा दशवताऱ्यांचा धयकाला ठेवलेला होता. कौरव पांडव युद्धाच्या कथानकावर आधारितअसलेल्या खेळाच्या निमित्ताने प्रत्यक्ष युद्ध प्रसंग दाखवून दातार बंधंचा खात्मा करायचा असासुनियोजीत डाव होता. ‘निवे’ म्हणजे आडबाजुला, तुरळकरहदारी  असलेला दुर्गम एकवशी गाव.चिमणीच्या फाट्यावरून चार कोस वाट तुडवून घाडणीचे पाणी गाठायचे आणि तरीवपलिकडे  चिवेली, मुंबरी, सुरुंग पाणी  या तीन गावांचे   किनारे मापून आडकुशीच्या निव्यात जावेलागे.  नाटकाच्या निमित्ताने दातार बंधूनाआडवे केल्यावर बभ्रा झालाच तरी पोलिस केस  होवून शोध चौकश्या  सुरू होईतो पुराव्याची चिपूट चिंगळी हाती लागलीनसती. या कारस्थानात आपल्याला सुखासुखी गोवणे शक्य होणार नाही याची पुरेपूर दक्षता बामणाने घेतलेली होती.

  मुळात देवीच्या उत्सवात दशवतार आणायची कल्पना अण्णांच्या सदूमार्फत यावी अशी योजना अंतूघाड्या मार्फत बामणाने केली होती. पुढच्या गोष्टीही बामणाच्या कारस्थाना प्रमाणेचोख जुळत गेल्या. टिपऱ्या पौर्णिमेला पाष्टेकरांचा दशावतार आणायचा बेत नक्की झाला नी त्याना सुपारीही देवूनझाली. कौरव चित्रसेन गंधर्व युद्धाच्या कथानकावर आधारलेला खेळ या आडगावात सगळासरंजाम नी पंववीस तीस पार्टी  घेवून जावून करणे दुर्लभ होते. म्हणून कौरवातले मुख्य पार्टी वगळता भरीला लागणारे पार्टी  गावातल्या मंडळीतून घ्यायचा बेत ठरलेला होता.सदूसकट सातही दांडगे दुंडगे दातार बंधू आणि इतर दोन तीन झिलगे युद्धाच्याप्रसंगापुरते घ्यायचे ठरले होते. खेळ होण्याआधी दोन दिवस बाबा पाष्टेकर निव्यातआला नी त्याने गावातल्या  पार्ट्यांचीतालीम घेतली. दशावतारात कामकरायचे म्हणून दातार बंधू तर भलतेच हुरळून गेले होते.हा खेळ सातही दातारांच्या जीवावर बेतणार होता याची सुतराम कल्पनाही  कोणाला आली नव्हती.

        खेळाच्या दिवशी पाष्टेकरांच्या पार्टीबरोबर  सांगली सातार कडले पाच तलवार दांडपट्टा खेळणारे घाटी निव्यात आले. युद्धाचा खेळ सुरू झाल्यावर कौरवांच्यापार्टीतल्या  दातार बंधूना  भोसकून ठार मारायचे नी काय झाले आहे हे समजून गदारोळ  झाल्यावर मारेकऱ्यानी पळ काढून रातोरात तरी पलिकडे होवून परागंदा व्हायचे असा डाव रचलेला होता. यासाठी घाट्यानाचांगली सज्जड बिदाग़ी ठरवलेली होती. त्याना रातोरात तरी पलिकडे करून चिमणीच्याफाट्यापर्यंत सोडायचे कंत्राट चिवेलीच्या बाऊ आणि सुलेमान याना दिलेले होते.गावाचा मेळ जमून दशावताराच बेत मुक्रर झाल्या पासून बामणाने अण्णांशी घसण वाढवली.हद्दमेरांवरून केलेल्या कोर्ट केसीस मागे घेवून अण्णानी सुचवलेनी तशी तडजोड बामणाने मुकाट्याने मान्य केली.  आता दररोज बामण अण्णांचा उंबरा मळायला लागलेला होता. भुईमुगाच्या शेंगा,घाटावरून आणलेला गूळ अशा भेटी देवून त्याने अण्णाना खुष केले.बामण  नरम आला म्हणताना दातार बंधू  त्याच्या माघारी फुशारक्या मारीत.     

    हां हां म्हणताना पौर्णिमेचा दिवस उजाडला. पाष्टेकर आणि घाटी मारेकरी निव्यात दाखल झाले. आजची रात्र उलटल्यावर निव्यात आपले मनगट धरणारा प्रतिस्पर्धी  शिल्लक राहणार नाही या विचाराने बामण भलताच सुखावलेला होता. थरलेल्या बेतात एकच बारीकशी अ‍डचण  आली. नेमक्या त्याच दिवशी दातारांपैकी मोठा भाऊ विसू तापाने फणफणला. त्यामुळे तो धयकाल्यात उभा राहणार नव्हता. त्याचा कटा कसा काढायचा ? असे त्रांगडे निर्माणझाले. पण हुषार बामणाने भावल्या खडपकराला हाताशी धरून दातारांच्या घरातली माणसेदशवतार बघायला गेल्यावर विसूला घराबाहेर काढून नाबूत करायचा बेत ठरवला. त्या साठीभावल्याला अडिचशे रुपये बिदागी ठरली. दशावतारी जेवणखाण करून आडवे झाल्यावर घाटी मारेकऱ्यांचा म्होरक्या गुपचूप बाहेर पडूनबामणाला भेटला. त्यांच्या साठी आणलेल्या हातभट्टीच्या दारवेचे शिसे ताब्यात घेतल्यावर त्याने आयत्यावेळी अडवून ठरलेल्या बिडागीत तीनशे रुपये वाढवून घेतले.खरंतर दातार बंधूना मारल्यावर तरी पलिकडे जाताना बिदागी देतो असे बामण म्हणत होता.त्यावेळी गदारोळाचा  फायदा घेवून घाटबाना  अल्पस्वल्पात फुटवायचा बामणाचाबेत होता. पण बिलंदर  घाटबा बधायला तयारहोईना...... “ पुरी रक्कम आदुगर मोजून घेटल्या बिगर ह्ये काम व्हणार न्हायी..... “असे  म्होरक्याने निक्षून सांगितले. 

   एरव्ही त्रिपुरी पौर्णिमेला ठाणेश्वराच्या देवळात त्रिपूर पाजळायचा जंगी कार्यक्रम झाल्यावर घाडी गुरव मानकरी भावकाईच्या देवळात येवून चार दिवे पेटवून ठेवीत. पण या वेळी ठाणेश्वराच्या देवळात फक्त इनेगिने मानकरी  नी पुजा सांगणारा भालूकाका एवढी नेमस्त मंडळी जमलेली होती. त्यानी वेळेवारी पोपयाची टवळी आत फडक्याचे भोतखोचून तेल ओतून पेटवल्यावर त्रिपूर पुजन केले. मग आपापल्या मानाप्रमाणे परंपरेने ठरलेल्या  त्रिपूराच्यादिपमाळांवर  पेटवलेले दिवे ठेवून मंडळी भावकाईच्या देवळाकदे रवाना झाली. भावकाईच्या मंदिर परिसरात बाया बापड्यांची झुंबड उडालेली होती. मोकळ्या  पटांग़णात मोकयाच्याजागा धरण्या वरून हमरा तुमरी सुरू होती. एरवी दशावतार उभा रहायला मध्यान् रात्र व्हायची. कारण सकाळ पर्यंत रात्रजागवून उजाडायच्या वेळी दहीहंडी फोडून दहिकाल्याचीसांगता करायचा रिवाज होता. पण निव्यात फक्त नाटकाचा भाग करायच होता. तसेच उजाडततरी पलिकडे होवून परतीचा दीर्घपल्ल्याचा प्रवास होता. म्हणून वेळेवारी खेळ सुरूझाला.

    ठाणेश्वराकडे टिपूर पाजळून अण्णांचे सहा मुलग़े इतर मंडळीं बरोबर भावकाईच्या देवळाकडे रवाना झाले. मोठा  विसू अंगात ताप असूनही त्रिपूरपुजनाला ठाणेश्वराच्या देवळात आलेला होता. तो भावकाईच्या देवळात न जाता बाबल्याबरोबर परभरे घरी जावून टकले टेकणार होता. मंडळी मार्गस्थ झाली आणि भावल्या नीत्याचे पाच सहा  साथीदार विसूच्या मागावर घरी गेले. दातारांच्या घरात फक्त विसू नी त्याच्या सोबतीला म्हातारा घरगडी बाबल्यानी त्याची म्हातारी आईस  थांबलेली होती.भावल्या नी त्याच्या सोबतचे टोळ भैरव गजाली मारीत अण्णांच्या ओसरीवर थांबलेले होते.तासाभराने विसू परसाकदे जायला निघाला नी साथीदाराना इशारा करून भावल्या उठला. आमी देवळाहारी जाताव म्हणून ते रवाना झाले.

  फाणस (कंदिल) घेवून बाबल्या विसूच्या सोबतीलाखोरणाकडे गेला. भावल्या नी साथीदार मागावरच होते विसू खोरणात गेला नी बाबल्याबाहेर थांबला. काय होते हे कळण्यापूर्वीच त्यानी कांबळ्याचा बोखारा टाकून बाबल्याला उचलला. त्याचे मोटळे बांधून त्याला उंच दरडीवरून खाली भिरकावून दिले.बाबल्याचे ओरडणे ऐकून विसू खोरणाबाहेर आला. त्यासरशी भावल्या नी त्याचे दोन साथीदार  विसुवर तुटून पडले.  अवघाती दहावीस दांडे मारून झोडल्यावर विसू  थंड झाला. त्याला उचलून गोठ्यामागच्या शेणाच्या गायरेत गाडून भावल्या नी त्याचे साथीदार भावकाईच्या देवळात गेले. दशवतारी नाटक चांगले रंगात आलेले होते. भावल्यालावबघून नाना बामण त्याच्याजवळ गेला. त्याच्या जवळ येवून ‘काम झालां’ एवढे मोघम सांगून . भावल्या मघारी वळला.

        नाटक चांगलेच रंगात आले. मध्यान् रात्र झाली. चित्रसेन गंधर्व सरोवरात स्नान क्रीडा करीत असता दुर्योधन ,दु:शासन   आणि अन्य कौरव आले.  यात दातार बंधूहोते. आले. ते उगाच आरडा ओरडा करीत हातातल्या नकली  गदा फिरवीत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्याचाप्रयत्न करीत होते.  मढ्येच प्रेक्षकांच्यादिशेने गदा उगारून धावून  गेल्यावर:पोराबाळानी घाबरून  ओरड मारायला  सुरुवात केली.   आता माझ्या मायावी युद्धाची कमाल बघा असेम्हणत चित्रसेन गंघर्वाने  जोराने  टाळी वाजवली. गंधर्व स्त्रियानी  गुलाल उधळला.त्या ईशाऱ्यासरशी तलवारी परजीत घाटी मारेकरी पुढे आले. दारू पिऊन तर्रर्र झालेले घाटवळी हातातल्या नंग्या तलवारी हवेत फिरवून  घम्म घम्म  आवाज करीत  तोंडाने अक्राळ विक्राळआरोळ्या  मारीत   किरण साधून ते समोरच्या चार दाताराना भिडले. धारदार तलवारीने सपासप वार करून त्यानी बघता बघता चारही भावाला लोळवले. सुरुवातीला चार दातारांवर हल्लाझाला तेंव्हा  तो नाटकातलाच भाग़ आहे असे समजून  पेटीवाला, ढोलकीवाला, चकवा वाला (झांज वाला)  यानी टिपेच्या सुरात युद्धगीत सुरू करूनवाद्यांचा असा काय कडाका केला की  दातार बंधूंच्या प्राणघातक किंकाळ्या हवेत विरून गेल्या. पलित्यांच्या उजेडात  गुलाल नी राळ उडवणाऱ्यानी  असा धडाका उडवून दिलाकी ,  त्या धूसर वातावरणात मारेकऱ्यांच्या अक्राळवोक्राळ हालचाली पाहून बघ्यांच्या काळजाचा नुसता थरकाप उडाला. मात्र समोर काय भीषणप्रसंग खरा खुरा घडत आहे हे  मात्रकोणाच्याही लक्षात आले नाही.

      गंधर्वाच्या सैनिकानी  खऱ्या  खुऱ्या तलवारीनी सपासप वार करून  चारही भावाना कापून काढले  हे बघितल्यावर मात्र  उरलेल्या दोन भावानी हातातल्या गदा फिरवीत घाटी मारेकऱ्यांवर  प्रहार करायचा प्रयत्न केला.मारेकऱ्यांच्या हल्ल्यात दातार बंधू रक्ताच्या थारोळ्यात   पडून आचके द्यायला लागल्यावर मात्र:दशावतारी  नट भानावर आले. पेटी,ढोलकीनी चकवा  वादक वाद्य बंद करून भीतीने थरथरा कापायला लागले. जिवंत असणाऱ्या  दातार भावानी  प्रतिकार करायचा प्रयत्न केला .मात्र काठीला चिंध्या गुंडाळून केलेल्या त्या नकली गदा तलवारीचा वारा सरशी तूटूनगेल्या नी  मारेकऱ्यांच्या  वारानी दोन्ही भाऊ रक्ताच्या थारोळ्यात पडले.जखमी  दातार बंधूनी प्राणांतिक  बोंबा मारायला सुरुवात केली. बायाबापड्या पोरेटारे  गर्भगळित होवीन किंकाळ्या मारीतसैरावैरा धावत सुटली. काही क्षणातच मंदिराचा आवार बराचसा  मोकळा झाला. मारेकरी झटपट  नाटकातले वेष उतरून  आपली बोचकी घेवून सुलेमान – बाऊ यांच्या बरोबर तरीकडे पळत सुटले.

         हे भलतेच महाभारत घडले हे पाहून अण्णा दातारांची दातखीळच बसली. हाताच्या बोटावर मोजावी इतकी बापये मंडळी उशिराने भानावर आली.हतबुद्ध जालेले दशवतारी गाशा गुंडाळायला लागले.  बामणाला तर हर्षवायू व्हायची वेळ आली. पण प्रसंगाचे भान राखून तो छातीपिटीत जोरजोराने रडायला लागला. ह्या नसत्या भानगडीत सापडायला नको म्हणून आपली सामानाची बोचकी सांभाळीत दशवतारी जीव मुठीत घेवून म्हादू पेंढारकराच्या खळ्यात  उजाडायची वाट बघीत  बसले. खूप उशिराने पंच मंडळी भानावर आली.पण  उजाडल्या शिवाय कोणालाच काही करणे शक्य नव्हते.

      चांगले दिसायला लागल्यावर पंच मंडळीनी गावातल्या:मंडळीना भावकाईच्या मंदिरात जमायची वर्दी दिली. हळू हळू जाणती मंडळी मंदिराच्याआवारात जमली. हे अघटित कसे काय घडले  याचाकर्ता करविता कोण असेल/ काहीच आडाखा बांधता येईना. मात्र संपूर्ण गावावर नसती आफत येणार  या भीतीने जाणत्यांचे चेहेरे:काळेठिक्कर पडले. पण आवारत रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेल्या दातार बंधूंच्या प्रेताची काहीतरी विल्हेवाट लावून देवळाचा आवार साफ करणे तरी भाग होते. मग माणसं कामाला लागली. खाडी किनारी मोठं सरण रचून सहाही दातार बंधूना भडाग्नी देण्यात आला.मंदिराचा आवार धूवून साफ करण्यात आला.

     दुपारी जेवून खावून झाल्यावर जाणती मंडळी पुन्हा चावडीवर एकत्र जमली. आलेली बिलामत कशी निस्तरायची यावर उलट सुलट चर्चा झाली. पोलिस तपासात अण्णा दातार नाव सांगेल त्यांची धर पकड होणार...... नेमके काय झाले हे सांगितले तरी पोलिस ते ऐकणार नाहीत. कारण प्रसंगच  असा भीषण घडला होता नी त्याचे धागेदोरे काहीच:उलगडणारे नव्हते. मग पूर्ण विचार करून दातार बंधू होडीतून पलिकडे जात असता होडी उलटून त्यांचा मृत्यू झाला अशी आवई उठावची असे सर्वानुमते ठरले.  पोलिसानी कितीही जंग जंग पछाडले तरी घडलेल्यावदशावतार नाटक नी कशाचीच वाच्यता करायची नाही. जो कोणी हे ऐकणार नाही त्याचे हगणे-मुतणे गावाने बंद करायचे. अशी शपथ अण्णा दातारासंसह सगळ्या गावाने घेतली नी दातारबंधूंच्या मरण नाट्यावर पडदा पडला. 

   भावल्यानी त्याच्या साथीदारानी  बाबल्याची ग़ठळी वळून त्याला दरडीवरून खाली फेकून दिले. विसूला शेणाच्या गायरेत गाडून टाकला.  दरडीवरून अवघाती पडून बाबल्याचा पाय मोडला.किंचाळ्या  मारून त्याचा घसा बसला. खूप उशिराने  तो सावध झाला नी मोडका पाय ओढीत खुरडत खुरडत  घर गाठी पर्यंत मंदिरात भीषण नाट्य घडून  अण्णांची बायको नी चार सुनात्यांची पोरे घेवून घरी परतलेली होती. आपल्याला घोंग़डीत  गुरफ्ट्टोन दरडीवरून खाली ढकलून दिले त्या नंतर विसूचे काय झाले ते बाबल्यालाच माहिती नव्हते. झालेला प्रकार एवढा भीषण होता . विसूचे बेपता होणे याचा कोणी गांभिर्याने विचार करण्याच्या मनस्थितीत नव्हता. दातारानी झाल्या प्रकाराचा एवढा धसका घेतला की पोराना घेवूनसुना आपापल्या माहेरी निघून गेल्या. धास्तावलेले अण्णा  नी त्यांची भ्रमिष्ट झालेली बायको पंधरावीस दिवसानी एकामागोमाग एक निवर्तली. दातारांचे घर परसू  पुढे नाना बामणानेच त्यांच्या सुनाना पैसे देवून विकत घेतले. पण दातारांच्या घरात जावून रहायचे धाडस मात्र  बामणाला झाले नाही . दातारांचा घरवंद  बेवारस झाला. त्या घरवंदाच्या आसपासही कोणी कधीफिरकले नाही. 

     गावाने ठरवल्या प्रमाणे निव्यातले  सात दातार खाडीत बुडून मेले अशी आसमंतात आवई उठली. काही चुटपुटत्या बातम्या तालुक्यात पसरल्यामुळे महिनाभराने एक पोलिस जमादार निव्यात येवून जुजबी चौकशी करून गेला. दातार हे निव्यातले खोत. त्यांच्या जुलुमालाकंटाळून गावाने संगनमत करून त्यांचा नष्टांश केला अशाही वारे बातम्या फिरतराहिल्या. बऱ्याच काळाने नाना बामणाचे कृष्णकृत्य जनलोकात  प्रसृत झाले. चार पाचवर्षानी नाना बामणाला खूळ  लागले नी तोभयाक्र्या सारखा  फिरत रहायचा . पुढे  मुंबरीत बंदरावर तो मरून पडलेला उमगला. काळ जातराहिला. गावची खोती  नाना बामणाच्यामुलांच्या ताब्यात आली. पाच सहा  पिढ्या उलटल्या नी पाच घरांचा बामण   आवाठ उभा राहिला. गावात दातारांचा नामोनिशाणही उरलेला नाही. मात्र ठाणेश्वराचे देवस्थानवमात्र  गावकऱ्यांनी  बामणांचा कब्जात जावू दिले नाही.  ठाणेश्वराच्या मंदिरासमोरचा मुख्य टिपूर आजही दातारांचा टिपूर म्हणून ओळखला जातो. त्रिपुऱ्या पौर्णीमेला गावातले वतनदार मानकरीआपापल्या घराण्याच्या वंशपरंपरा मालकीच्या दगडी  त्रिपूरांवर कोहळ्याचे,तोवशाचे नी पोपयाचे दिवे  पुजून ते  ठेवतात. पण दातारांचा त्रिपूर मात्र मोकळा रहातो.

 

                                                             

      ००००००