बांडगूळ श्रीराम विनायक काळे द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

बांडगूळ


बांडगूळ

 

 

 

 

            गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची अटी तटीची निवडणूक दोन तासांवर येऊन ठेपली.धर्मदाय आयुक्तांनी नेमलेल्या प्रशासकाला डोणग्यांनी मॅनेज केलेले.... इलेक्शन प्रोग्रॅम डिक्लेअर होण्यापूर्वी एक दिवस डोणग्यांनी त्यांच्या वगीतले ६० मेंबर्सनव्याने दाखल करुन घेतलेले. जुन्या मेंबर्सपैकी जवळपास निम्मे लोक आतुन पैसे देऊनखरेदी केलेले.... आबा दळवी चारीमुंड्या चीत होणार याची हेडमास्तर आणि संस्थाअध्यक्ष ज्ये. वाय्. डोणग्यांना शंभर टक्के खात्री.... तरीही खबरदारीचा उपायम्हणून ज्ये. वाय्. डोणग्यांचा भाऊ..... संस्थेचा सेक्रेटरी आणि हायस्कुलचाक्लार्क क्रिष्णा डोणग्याने प्लॅन आखला....प्लॅनची कार्यवाही अखेरच्या क्षणाला करायची.... ती वेळ येऊन ठेपली.... के. वाय. उर्फ कृष्णा डोणगेनी झिप्रेसरांना खूण करुन ते स्वतः ज्ये. वाय्. डोणग्यांच्या केबिनमध्ये शिरले.... !

          अवचितपणे के.वाय्. आलेला बघून धास्तावलेल्या ज्ये. वाय्. नी विचारणा केली, “समदं येवस्तित हाय न्हवं.... किस्ना? तू आनी कस्काय आला रं?”ज्ये. वाय्. च्या कानाशी लागत किस्ना म्हणाल, “दाजी... परस्थिती जरा गंभीर हाय पर काळजी करायच काय कारन न्हाई....समदं बैजवार मागनं आनी सांगतोय... त्या फकस्त बगीत ऱ्हा गपगुमान... आता एवड्यातआबा दळव्याला फुडं घालून डुंबरं येतंय् बघ.... काय बोलायच.... कस करायच म्या बगतु,त्वा फक्त मुंडी हलवायचं काम कर....” एवढबोलणं होतय तवर आबा दळवी भेटायला आल्याची खबर द्यायला डुंबरे शिपाई आत आला.   

      त्याला होनाही सांगण्यापूर्वीच आबा दळवी दमदार पावले टाकीत केबिन मध्ये प्रवेश करते झाले.... अनवधानाने ज्ये. वाय्. खुर्चीतून उठून उभे राहीले.... खरंतर या क्षणी तरीआबा दळवी संस्थेचे पदाधिकारी नव्हते.... त्यांनी स्वेच्छेने चेअरमन पदाचा राजीनामा देऊन मंडळाचा कारभार ज्ये. वाय्. के. वाय् बंधु यांना कुरण म्हणून मोकळा सोडलात्या गोष्टीला चवदा वर्ष उलटलेली.... आजच्या इलेक्शन लागल्या... धर्मादायआयुक्तानी प्रशासक नेमला या कारस्थानाचे सूत्रधार आबा दळवी.....

        आबांचा' दराराच तसा होता. स्वतःला उच्च शहाण्णव कुळी मराठा म्हणविणारे..... कोकणात शहाण्णव कुळी मराठ्यांची चार नामांकीत कुळे.... सावंत, साळवी, निकम, दळवी असा अभिमानाने उल्लेख आबा करायचे.तांबुस गौरवर्ण, भव्य भालप्रदेश, पिढीजात खानदान प्रत्ययाला यावे असे उंचपुरे, धिप्पाड शरीर यष्टी असलेले..... समोरच्या इसमाकडे नजर रोखुन बघितल्यावर समोरचा इसम अदबीने नजर झुकवून चपापलाच पाहीजे असं संपन्न, प्रभावी व्यक्तिमत्व निसर्गानेच आबाना बहाल केलेलं. आबांचा लौकीकही त्यांच्या खानदानाला शोभणारा..... धुतल्या तांदळासारखे निर्मळ स्वच्छ चारित्र्य.... दातृत्व तर असं कीदाराशी आलेला कोणीही याचक विन्मुख जाता नये याकडे त्यांचा कटाक्ष.... आसमंतातल्या दहा गावच्या लोकांचा उल्लेख आबा 'रयत' असा करायचे अन् रयत आबांचा उल्लेख सरदार दळवी असा करायचे.

          गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडाळाची स्थापना १९६८ साली आबांनी केलेली...... मुंबई-गोवा महामार्गापासुन ६ मैल अंतरावर असलेले गडमठ! त्याच्या शेजारचे आवळेगाव, गिसणगाव,पांग्रड, दुकानवाड, कट्टा, कुसगाव, पियाळी,कुंभवडे, शिरगाव या उर्वरीत नऊ गावात तेव्हा माध्यमिक शाळाच नव्हती. सातवीपर्यंत पूर्ण प्राथमिक शाळा पूर्ण करुनपी.एस्.सी. परीक्षा पास झाल्यावर मुलं पणदुर, कुडाळ हायस्कुल मध्ये जायची.... दोन्ही ठिकाणच्या हायस्कुल मध्ये जायला या दशक्रोशीतल्या मुलांना ८ ते १० मैल अंतर पायी काटावं लागत असे. अर्थात बरीच मुलं पी.एस्.सी./सातवी झाल्यावर घरीच बसायची.... तरीही दोन्ही ठिकाणच्या जवळ जवळ एका वर्गाचा पट म्हणजे ३५ ते ४० मुलं गडमठसह पंचक्रोशीतली असायची.

           आबांची तीननं बरची मुलगी कुसुम सहावी पास झाली.... मुलगी अत्यंत हुशार पी.एस्.सी. परीक्षेला कुडाळ तालुक्यात गडमठचा झेंडा ती फडकवणार असं मुख्याध्यापक नरे गुरुजींनी आबाना छातीठोक सांगितलं अन् आबा विचारात मग्न झाले. कुसुमचे मोठे भाऊ प्रशांत, अशोकयांनी सहा मैलाची रोजची चाल झेपवून माध्यमिक शिक्षण सुरु ठेवल खरं पण कुसुमला हेकसं काय झेपेल याचा घोरच आबांना लागला. त्याच वर्षी मे महिन्यात आबांचे साडभाऊ बापर्ड्यातले भगवंतराव नाईकधुरे गडमठला आले. भगवंतराव राजभवनामध्ये सेक्शनऑफिसर.... वर्ष दोन वर्षांनी त्यांची कोकण खेप व्हायची त्यावेळी ते आवर्जुनआबांकडे खेप करायचे.... या शिरस्त्याप्रमाणे नाईकधुरी आले. रात्री जेवण खाण झाल्यावर गप्पांच्या ओघात कुसुमच्या सातवी नंतरच्या शिक्षणाचा विषय निघाला.भगवंतराव सहजपणे बोलुन गेले.... "तुमचं एवढं तालेवार घराणं.... दशक्रोशीत तुम्हाला राजघराणं म्हणुन मान आहे.... तुम्ही मनात आणलत तर एक उत्तम संस्था तुम्ही पेलू शकता....  

       दुकानवाडची तुमची वखार तर रिकामीच आहे. थोडीशी डागडुजी केलात तरी पुरेशी आहे. शासन मान्यतेचे:काम आमच्यावर सोपवा...." भगवंतरावांच म्हणणं आबांनी मनावर घेतलं. रात्री उशीरापर्यंत पाव्हण्या पाव्हण्यांचे बेत ठरले. दुसऱ्या दिवशी सकाळी नरे गुरुजींना वाड्यावर बोलवून संस्थेची घटना, नियामक मंडळ अशा कागदपत्रांची तयारी सुरुझाली. भगवंतरावांचा मुक्काम चार दिवस लांबला. गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या नोंदणीचा प्रस्ताव करूनच भगवंतराव रवाना झाले. महिनाभरातच रजिस्ट्रेशनचं काम पूर्ण झालं. हायस्कुलला मान्यता मिळण्यासाठी प्रस्ताव तयार करुन आबा दळवीसमक्ष मुंबईला गेले.

         भगवंतरावांनी दिला शब्द पाळला. दिवाळीपूर्वी दोन दिवस ग्रँट इन एड् बेसिसवर हायस्कुलच्या मान्यतेची ऑर्डर आबांच्या हाती आली. आबांनी आता मोठ्या हुरुपाने कंबर कसली.वखारीची नऊ खणांची प्रशस्त इमारत, सभोवतीच्या तीन एकर जागेसह आबांनी बक्षिसपत्राने संस्थेकडे वर्ग केली. पंचक्रोशीतली तालेवार माणसं मंडळाच्या सभासद यादीत समाविष्ट झाली. महिन्या महिन्याला मिटींगा झडायला लागल्या. आबा अन् नरेगुरुजींच्या रत्नागिरीला शिक्षणाधिकारी कार्यालयात चकरा झाल्या. फेब्रुवारीमध्ये शिक्षणाधिकारी शास्त्री साहेबांनी समक्ष व्हिजीट दिली. शाळेची नियोजीत इमारत आणि परिसर बघून शास्त्री साहेब बेहद खुश झाले.

आबा, नरेगुरुजी, बाबा कुसगावकर, बाप्पामर्गज, दाजी राऊळ, दिवाकर दिक्षीत अशी संस्थेची पदाधिकारी मंडळी दशक्रोशीत फिरली. सातवीत शिकणाऱ्या मुलांच्या पालकांच्या समक्ष भेटी घेतल्या. जूनमध्ये शाळा सुरु झाली.

        त्या दिवशी आठवीचा पट सत्तरच्या पुढे गेला.त्यावेळी शिक्षक मंडळी सगळी घाटावरची असायची. कोकणातले संस्था चालक चेष्टेने म्हणायचे, "पावसाळा सुरु झाला की कोकणातले लोक दोन कारणांसाठी घाटावर जातात,शेतीसाठी घाटी पाडे (बैल) आणायला आणि हायस्कूलसाठी शिक्षकआणायला." शिक्षकांसाठीच्या जाहिराती बहुसंख्येने पुढारीमध्ये दिल्या जायच्या.इंटरव्ह्यू कोल्हापूरात मन्याबापू पडळकरांच्या सेरेकन गेस्ट हाऊसमध्ये नाहीतर शाळांना सायन्स मटेरियल पुरवणाऱ्या सरमळकरांच्या शाहुपुरीतल्या दुकानात व्हायचे.संस्था चालक मंडळी चार चार दिवस कोल्हापूरला तळ ठोकून रहायची अन् शिक्षकांना सोबत घेऊनच यायची.

           कुणीतरी स्थानिक, किमानपक्षी कोकणातले शिक्षक उमेदवार असावेत असं गडमठच्या संस्थापदाधिकाऱ्यांना वाटायचं ! येणाऱ्या पन्नास साठ विनंती अर्जात दोन तीन अर्जसुद्धा कोकणातल्या स्थायिकांचे नसायचे. यष्टीशी (STC), सी.पी.एड्.(C.P.Ed.), यफ.डी.शी.ये.टी.डी. (FDC/ATD) आणि शिकस्त इंटर आर्टस् असली बिरुद मिरवणाऱ्या, विद्वत्तेच्या नावानं सो-सो असणाऱ्यांची, शुद्धमराठी बोलायला लिहायला न येणाऱ्या, पदवी सोडाच मॅट्रिकबद्दलही शंका वाटावी असं सुमार ज्ञान असणाऱ्यांची खोगीर भरती बहुसंख्येने असायची.मुलाखतीसाठी आलेले उमेदवार कुणाकुणाच्या ओळखी, मध्यस्ती घेऊन यायचे. नेमणूक मिळण्यासाठी अक्षरशः हांजी हांजी करायचे. कुडाळ, सावंतवाडी, कणकवली मधल्या हायस्कूल शिक्षकांकडे गावाकडच्या इच्छुक उमेदवारांचा डेरा पडायचा. त्यांच्या बिऱ्हाडीपाच-पाच सहा-सहा उमेदवार तळ ठोकून रहायचे. नोकरदार शिक्षक नाना खटपटी करुन त्यांना कुठे कुठे चिकटवून द्यायचे.

      हुशार कष्टाळू शिक्षकांची वानवा असायची.आबांची कुसुम शिकत असल्यामुळे शाळेतली इत्थंभूत माहिती आबांकडे असायची. आरंभीच्यादोन वर्षात कायम करण्याजोगा एकही शिक्षक लाभला नाही. हेडमास्तर पोस्टसाठी बी.एड्.उमेदवारच मिळाला नव्हता. हायस्कूलमध्ये दहावीचा वर्ग सुरु झाला त्यावर्षी सालाबादप्रमाणे संस्थेने जाहिरात प्रसिद्ध केली. जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर चौथ्याच दिवशी कसालच्या हिरेमठ सरांसोबत जे.वाय्.डोणगे समक्ष आबांना भेटायला आले.हिरेमठ सरांचा मोठा लौकिक. आबाही त्यांचं नाव ऐकून असलेले. खेरीज डोणग्यांनी शिक्षणाधिकारी शास्त्री साहेबांचं खाजगी शिफारस पत्रही आबांना दिलं. डोणग्यांचं बोलणं अशुद्ध.... रत्नागिरीत शिर्के हायस्कूलमध्ये चार-पाच वर्ष अनुभव घेऊनही त्यांचं बोलणं गावरान राहिलेलं.... स्वतःचा उल्लेख खुद्द तेच ज्ये.वाय्. डोनगे असा करायचे. पण मनुष्य बी.एस्सी.बी.एड्.... त्यावेळी बी.एस्सी. क्वालिफिकेशन दुर्लभ मानलं जायचं. गणित,सायन्स आणि इंग्रजी या विषयांची क्वालिफाईड माणसं मोठ्यानामांकित हायस्कूलमध्येही नसायची.

         ज्ये.वाय्.डोनग्यानी हेडमास्तर म्हणून पदभार स्वीकारला अन् आबांचा ताप बराचसा कमी झाला. गेली दोन वर्ष शाळेतल्या शिक्षकांची काहीना काही खेकटी सुरु असायची. पहिल्या वर्षीच आठवीच्या दोन तुकड्या कराव्या लागल्या. तीन ठिकाणचे तीन लोक.... प्रत्येक जण एकमेकावर कुरघोडया करायला बघायचे. संस्थेच्या लोकांना भेटून एकमेकांच्या कागाळ्या सांगायचे. आबांसह कोणत्याही संस्था पदाधिकाऱ्याला या गोष्टी नविनच होत्या. कुणाचं खरं आणि कुणाचं खोटं काहीच समजायला पत्ता नाही. दुसऱ्या वर्षी पी.टी. शिक्षक शिवपुत्र मठपती आणि ड्राईंग शिक्षक भुजबळे यानी भलताच प्रकार केला. दोघेही अविवाहित.... ९अ मध्येआबांची कुसुम असायची..... तो वर्ग वगळता इतर तीन वर्गातल्या मुलींशी दोघेही लगट करायचे. काहीना काही कारण काढून दिसायला बऱ्यापैकी असणाऱ्या मुलींना स्टाफरूममध्ये बोलावून घ्यायचे.

          मठपती-भुजबळेयांचा आंबटशोक मुलांच्याही लक्षात आला. एका टारगट पोराने 'मठपती-भुजबळे बोर्डावर आले' असं मुतारीतल्या भिंतीवर लिहीलं.... शाळा भरल्यावर त्याची चर्चा झाली. दोघानी बोर्ड लिहीणाऱ्याचा शोध सुरु केला. लिहीणारं बिलंदर टोळकं बाजूला आणि भलत्याच मुलांची नावे संशयितांच्या यादीत गेली. ही घटना झाली आणिआठवडाभराने मर्गजांचा विश्वनाथ, दिवाकर कुलकर्णी, सतीश कुसगावकर या नववीतल्या तीन मुलांना मठपती भुजबळे जोडगोळीने खोलीवर बोलावून घेतले. खोदून खोदून विचारले तरी मुलं आपण लिहील्याचं कबूल करीनात. मुळातसंशयित म्हणून बोलावलेली तीनही मुलं घरंदाज कुटुंबातली. सरांनी आपला सशंय घेतलायामुळेच तिघेही हादरलेले.... त्यांचं त-त-प-प झाल्यावर मठपतींचा संशय अधिकच दुणावला. रागाने बेभान झालेल्या त्या पी.टी. शिक्षकाने तिघांनाही बेदम मार दिला.गुन्हा मात्र कुणीच कबुल केला नाही. इतका मार खाऊनही मुलं हो म्हणेनात तेव्हा मात्र भुजबळे भानावर आले. त्यांनी मठपतींना आवरल. आपलं कर्म बाहेर फुटु नये म्हणून दोघानीही अगदी खालच्या पातळीवर जाऊन 'जित्त गाडून टाकू'असा सज्जड दम दिला. हादरलेली मुलं चोरासाखी घरी गेली.

         घरी गेल्यावर तिघानाही सणकून ताप भरला. मुलं जेवली नाहीत.... कुणी काही सांगे ना.... दुसऱ्या दिवशी मर्गजांचा विश्वनाथ आंघोळ करीत असताना त्याच्या चुलतीने त्याच्या अंगावरचे माराचे वळ बघितले. ही गोष्ट तिने विश्वनाथच्या आईला सांगितली. तो आंघोळ करुन शर्टपँट घालून घरात आला तेव्हा आईने त्याला शर्ट काढायला सांगितला. विश्वनाथ शर्ट काढायला तयार होईना. जावा-जावांनी जबरदस्तीने त्याचा शर्ट काढला.... पाठीवर काळेनिळे वळ बघून विश्वनाथच्या आईला चक्कर आली. गोष्ट पुरुष माणसांच्या कानी गेली. खुप चौकशी केल्यावर भीतीने लटा-लटा कापत विश्वनाथने झाली गोष्ट सांगितली आणि आपण इतःपर शाळेत जाणार नाही असे जाहीर केले.

         मर्गज आणि कुलकर्णी कुसगावकरांच्या घरी गेले. कुसगावकरांचा सतीश मार पचवूनही शाळेत गेलेला.दिवाकर मात्र तापाने फणफणून घरी झोपून राहीलेला. एक एक गोष्ट उजेडात आली. माणसं आबा दळवीना भेटली. मर्गज आणि कुलकर्णी दोन्ही मुलांची स्थिती बघून आबा हादरले.चिडलेले दहा बारा ग्रामस्थ आणि आबा दुपारी दोन वाजता शाळेत पोहोचले. सतीश कुसगावकरला स्टाफरुममध्ये बोलावून घेऊन आबांनी शिक्षकांना शाळा सोडून द्यायचा हुकुम दिला. मुलं निघून गेल्यावर मठपती, भुजबळ दुक्कलीची चौकशी सुरु झाली. भुजबळ बधले पण मठपती मात्र अद्वातद्वा करायला लागले. मुलांनी गुन्हा कबूल केला असाच ठेका त्यांनी धरला. आपण केले ते योग्यच आहे.... कोणाच्या बापाला भीत नाही.... कुडाळचे पोलिस इन्स्पेक्टर ओळखीचे आहेत.... अशी भाषा त्यांनी सुरु केल्यावर मात्र आबांचा पारा चढला "आधी आवाज खाली..." आबा गरजले, "तुम्ही शिक्षक अहात की गुंड-मवाली ?"

        "शिस्तीसाठी शिक्षा करणं मी मान्य करतो. आधी हा प्रकार कुणीच आमच्या कानावर का घातला नाही ? आम्ही जातीनिशी चौकशी करुन टवाळखोर मुलं शोधून काढली असती. दुसरी गोष्ट तुमचं वागणं सभ्यनाही या गोष्टी आमच्याही कानावर आलेल्या आहेत...." आबा दळवीनी हे बोलल्यावर गुडघ्यात मेंदू असणारा मठपती दात ओठ खात मुठी वळून गरजला,"कोन रांडचा हरामजादा हे सांगतोय् त्येला फुडं आना न्हाई जित्ता गाडला तर...." मठपतींचे वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच त्यांच्या तोंडून अर्वाच्य शब्द उच्चारले जाताच संतापलेल्या आबा दळवींनी मठपती सरांच्या झिंज्या पकडून कानाखालीअशी सणसणीत थप्पड लगावली की आबांच्या पंज्याचा नकाशा त्यांच्या गालफडावर उमटला.बसल्या बैठकीत दोघांचेही राजिनामे घेऊन त्यांना संध्याकाळी पाच वाजताच्या कुडाळगाडीने गाव सोडून जायची समज आबांनी दिली.

         शाळेला अनुदान तत्त्वावर मान्यता मिळालेली असली तरी प्रत्यक्ष ग्रँट एकवर्ष पूर्णझाल्यावर मिळायची.... दरम्यानच्या काळात संपूर्ण खर्चाची जबाबदारी एकट्या आबांच्या शिरावर. कार्यकारीणीत काही सधन सभासद होते पण प्रत्यक्ष खिशात हात घालताना सगळेच काचकूच करायचे. कर्मचारी वर्गाला ठराविक वेतन द्यायचे आणि पगार बीलावर मात्र पूर्ण वेतनासाठी सही घ्यायची असे सल्लेही काही विस्थापितानी दिले. पण हे पापकर्म आबा दळवींना जमणारे नव्हते. आपल्या पायाखाली काय जळत आहे ते बघून जगाला बोध द्यायचाअसा त्यांचा खाक्या.... दहाक्रोशीतल्या लोकांना आबा रयत म्हणायचे. स्वतःचाच नव्हेतर कुटुंबीयांचाही उल्लेख 'आम्ही' 'तुम्ही' असाते करायचे पण हा देखावा बेगडी नसायचा..... शास्त्याची निस्पृहता आणि दातृत्व हेत्यांचे स्वभाव विशेष.... शुद्ध चारित्र्य आणि स्वच्छ नीती हा ते कुटुंब धर्म मानायचे.

          आबांचा कुटुंब कबिलाही मोठा ! त्यांचे तीन भाऊ मुंबई इंदूर सुरत या ठिकाणी व्यवसाय करायचे. आबानी हायस्कूल सुरु केल्यावर त्यांचे भाऊ भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभेराहीले.... हायस्कूल हे दळवी खानदानाचे राज्य संस्थान आहे. या धारणेने शाळेच्या व्यवहारात काटकसर कुठेच नसायची. कर्मचारी त्यांच्या या स्वभावाचा पुरेपुर फायदा घ्यायचे. आबा पाण्यासारखा पैसा खर्च करायचे पण एकूण शाळेचा कारभार मात्र मनाजोगता होत नव्हता. सदैव नाना कटकटी सुरु असायच्या. या साऱ्या पार्श्वभूमीवर ज्ये.वाय्.डोणगेंणी मुख्याध्यापक पदाची सूत्रं स्वीकारली. आठवडाभरात शाळेला शिस्त लागली.ऐतखाऊ शिपाई, बेमुर्वतखोर शिक्षक सगळ्यांना ज्ये.वाय्. नी पध्दतशीर सरळ केले.

       डोणगे येण्यापूर्वी कधिही शाळेत गेलं तर कायम पोरांचा गलका नी कालवा मासळी बाजारा सारखा सुरु असायचा. आबा दळवी शाळेकडे येताना बघितल्यावर नाईलाजाने वर्गावर जाणारे महाभागही होते. डोणग्यांनी सूत्रं हाती घेतल्यावर बजबजपूरी बंद झाली. ते हजरझाल्यावर आठवडाभराने संध्याकाळी चारच्या सुमाराला आबा हायस्कूलकडे गेले. ग्राऊंडवरसंपूर्ण शाळेची मुलं रांगेत उभी राहून सामुदायिक कवायत करताना दिसली. विशेष म्हणजेज्ये.वाय्. ग्राऊंडवर नव्हते. जरा पुढे गेल्यावर बाहेरच्या भिंतींवर सुविचार, बातम्या,पंचांग लिहिलेले दिसले. मुख्याध्यापकांच्या खोलीकडे जाईपर्यंतदोन वर्गात आबा डोकावले.... भिंतीवर नकाशे, चित्रे,तक्ते व्यवस्थित लावलेले. फलकावर त्या दिवसाचा पट लिहीलेला.आबाना खूपच हुरुप आला.

            महिनाभर गेला आणि एक दोन शिक्षक हेडमास्तरांविरुद्ध काही बाही कागाळ्या सांगायला दळव्यांच्याववाड्यावर गेले. त्यांच्या कागाळ्या तक्रारीमध्ये काहीच दम नव्हता. पाच मिनिटं उशीरझाला म्हणून ज्ये.वाय्. अद्वातद्वा बोलले.... गृहपाठ तपासायचे राहीले म्हणून मेमोदिला... भर वर्गात मुलांसमोर डोणगेसर मास्तरांच्या चुका काढून त्यांची कान उघडणी करतात. ह्या आणि असल्या तक्रारी सांगून तलवारीच्या धारेवर चालणारा कायदा पाळून शाळा चालत नसतात.... मंडळी अनुभवी आहे.... एकतर आडखेड्यात यायला मास्तर राजीनसतात.... हम करेसो कायद्याने शिक्षक टिकणार नाहीत आणि एकदा बभ्रा झाला तर नवीन माणूस इकडे वळायचाही नाही.

           या तक्रारी ऐकून आबा चुचकारुन घेतील.... मी हेडमास्तराना सांगतो.... तुम्ही काही काळजी करुनका असा दिलासा देतील अशा या अपेक्षेने आलेली मंडळी.... त्याना पुरते बोलूदेण्यापूर्वीच आबा कडाडले, "आम्ही शाळा काढली ती या दशक्रोशीतल्या रयतेची मुले शिकावीत, पुढे यावीत यासाठी, मास्तरांची पोटेभरण्यासाठी नाही.... इतर संस्थामधून काय प्रकार चालतात ते जरा बघा.... तीन-तीनमहिने कर्मचाऱ्यांना पै सुद्धा देत नाहीत. सही करायची एका आकड्यावर आणि घेतानाचाआकडा वेगळा असे प्रकार सर्रास सुरु आहेत. आम्ही दर महिन्याची पाच तारीख उलटायला देत नाही. मी दोन वर्ष बारकाईने पहातोय.... सगळी खोगीर भरती.... हायस्कूल सुरु करण्यापेक्षा कुडाळात किराणा भुसारी दुकान नाहीतर हॉटेल टाकले असते तरी बरे झालेअसते असे लाख वेळा आमच्या मनात यायचे. पण डोणगे आले आणि शाळेत शिस्त आली, रांबाडपणा बंद झाला शाळेत फिरावे, वर्गात डोकावून पहावे असे वाटते...."

         मग माजघराकडे मोहरा वळवीत आबानी ऑर्डर सोडली, "हायस्कूलमधली शिक्षक मंडळी आलीआहेत...." त्यांचे बोलणे पूर्ण होण्यापूर्वी मुगाच्या लाडवांचे ताट आणि केशरी दुधाचे पेले घेऊन कामवाली बैठकीच्या खोलीत आली. "घ्या.... लाडू घ्या, दूध प्या.... आम्ही सर्व अधिकारांसह शाळा डोणगेसाहेबांकडे सुपूर्त केलीआहे याचा अर्थ आम्ही डोळे मिटून आहोत असा नाही. काही आगळीक गैरप्रकार घडला तर तोआमच्यापर्यंत दखल होईल.... त्याचा जाब आम्ही आमच्या पद्धतीने विचारु पण शिस्तीच्याबाबतीत तडजोड नाही. एक शिक्षक गेला तर दुसरा आणू.... जादा पगार देऊन आणू पण इथे हेडमास्तरांच्या शिस्तीतच वागावे लागेल. तुमच्या सहकारी वर्गाला जरा समज द्या.अंतर्गत बारीक-सारीक गोष्टी आमच्या पर्यंत आणू नका.... आम्हाला सावध करायचाही प्रयत्न करु नका, आम्ही बेसावध नाही. ज्याने त्याने आपलेकाम चोख करा."

           आबांकडे डाळ शिजली नाही तेव्हा आलेल्या मंडळीपैकी मतलबी शिक्षक डोणग्यांना भेटले. आबांकडे कोणकाय चुगल्या सांगतो ते समजण्यासाठी आम्ही त्यांच्यातलेच आहोत असे आम्ही भासवले अशी मल्लीनाथी करत आबांकडे झालेल्या गोष्टींची बित्तंबातमी आणखी तिखट-मीठ, हिंग-जिरेलावून त्यांनी डोणग्यांना दिली. आपली नीती यशस्वी होणार हे उमजून डोणगे हरखले.त्यानी हळू हळू सगळा कारभार आपल्या कवजात घेतला आणि ब्रिटीशी नीतीने हातपाय पसरायला सुरुवात केली. वक्तशीरपणा, शिस्त हे डोणग्यांचे:दाखवायचे दात, गनिमी कावा होता! त्याना अपेक्षा होती:स्वतःचं निरंकुश एकछत्री साम्राज्य निर्माण करायची. त्यानी रणनीतीची एक एक तंत्र वापरायला सुरुवात केली.

           हायस्कूलचा:क्लार्क म्हणजे जणू नाक ! ते नेमकं आबांच्या कबजात. शिस्तीचा देखावा करताना:ज्ये.वाय्. संधीची वाट बघत टपलेले. डोणगे रोजची डायरी ठेवायचे. त्यात बारीक सारीक दैनंदिन गोष्टींची नोंद रहायची. काम करताना चुका दिरंगाई ही होतच असते. क्लार्कलोकाना तर काम आवरता आवरत नाही. सगळं काम पूर्ण करुन आज मोकळा श्वास टाकला हा क्षण हायस्कूलमधल्या क्लार्कच्या भाग्यातच नसतो. किर्द पुष्कळदा अपुरी असायची, टपाल इनवर्ड आऊट वर्डला नोंदलेलं नसायचं, पाठवावयाच्या कागदपत्रांचे रकाने पूर्ण करताना तर असंख्य चुका, एक एका कागदपत्राचे तीन-तीनदा फेर लेखन करावे लागे. अशा चुकलेल्या कागदांची फाईलच डोणग्यांनी ठेवलेली काम पूर्ण करण्यासाठी तारीखवार दिलेल्या तोंडी सूचनांची नोंद ठेवलेली. सापळा रचून तयार झालेला अन् एका गाफिल क्षणी साधले क्लार्क डोणग्यांच्या कचाट्यात सापडले.

         भाच्याच्या मुंजीसाठी साधले क्लार्कनी रजा अर्ज दिला. डोणग्यांनी शेरा मारला "जा.नं. ३९२दिनांक अमूक अमूक ची माहिती अर्जंट पाठवायची असल्याने रजा नामंजूर" खरं तर एवढी गंभीर बाब नव्हतीच ती. डोणगे आल्यापासून सव्वावर्षाच्या काळात साधल्यानी फक्त दोनच रजा घेतलेल्या. उलट रविवार आणि अन्य सुट्यांच्यावेळी सुद्धा दिवस दिवस थांबूनते काम ओढायचे. ऑफिस अवर्स तर काम पूर्ण होईल त्या वेळपर्यंत. हेडमास्तरांचा शेरावाचून साधले चिडले.... 'काय करायचे असेल ते करा.... बिनपगारी रजा झाली तरी मी फिकीर करीत नाही.'अशी मुक्ताफळं उधळून साधल्यांनी अर्ज मस्टरमध्ये टाकला. ते दोन दिवसांच्या रजेवर गेले.

        साधले कार्य उरकून तिसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता शाळेत आले. शिपायांची काम सुरु होती. पण ऑफिस बंद.... साधल्यांनी ऑफिस उघडायला सांगितलं तर 'किल्ली साहेबांकडे आहे'असं गोविंद शिपायाने उत्तर दिलं. रोज १०.३० ला शाळा भरायची.डोणगे सव्वादहाला आले. गोविंद शिपाई ऑफिसची चावी मागायला सायबांकडे गेला. 'नवीन कलारक् हाजर व्हईल तवाच हापिस उघडायचं.... तवर च्यावी आमापशी ऱ्हाईल. आमाला काय कागूद लागतील तवा आमी सांगू" डोणगे उत्तरले. त्यावर साधले क्लार्क ऑफिस उघडायला सांगताहेत असं गोविंद म्हणाला. त्यावर उसळून डोणगे म्हणाले, "कंचं साधलं म्हनायचं?" आम्ही वळकत न्हाई साधल नी फादल.... त्वा दीड दमडीचा पिऊन आणि मला शानपन शिकवितोस व्हय रेभाडया.... जा गुमान आपल काम कर... आज हापिस न्हाई उघडायच...."

       साधलेंच्या पायाखालची जमिनच सरकली. ते तडक आबा दळवींच्या वाड्यावर गेले. साधले रजा नामंजूरअसताना विनापरवानगी अनुपस्थित राहिले त्याच दिवशी साधलेंवर ठेवलेलं चार पानीचार्जशीट आणि वर्षभराची डायरी चुकलेल्या कागदपत्रांची फाईल घेऊन डोणगे समक्षवआबांना भेटून गेलेले. हजार वेळा तोंडी सुचना देऊनही साधले सुधारले नाहीत.कारकूनाचं काम तर त्यांना बिल्कुल येत नाही. वर आणि बेमुर्वतखोरपणा असंच सगळंचित्र डोणग्यांनी आबांसमोर उभं केलेलं. निस्पृह आबा दळवींना साधलेंच समर्थन करता आलं नाही. डोणग्यांच थोडसं अति होतंयू हे त्यांना कळत होतं पण परिस्थितीसाधल्यांच्या विरोधात होती. साधले दिवाणखान्यात आबांसमोर उभे राहिले. त्यांनी काही सांगण्यापूर्वीच आबा म्हणाले "साधले.... तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती.तुम्ही चुका केल्यात ते खंडीभर कागद हेडमास्तरांनी दाखवले. ही चार्जशीट वाचा तुम्हाला दिलेल्या तोंडी सूचनांची तारीखवार नोंद आहे."

         साधले मट्कन खाली बसले. त्यांना समजावीत आबा म्हणाले, "डोणग्यांनी रजा नामंजूरकेली. तुमची एवढी निकड होती तर आम्हाला भेटायचं होतं. तुम्ही बेमुर्वतखोरपणे परभारे निघून गेलात. आज नाका तोंडात पाणी गेल्यावर इथे कशाला आलात? फार मोठी चूक केलात तुम्ही. इकडे आलात ते हेडमास्तरांना सांगून तरीआलात ना? की परस्परच?"साधले काय बोलणार ते भवितव्य समजून चुकले. डोळ्यातलं पाणी निग्रहाने थोपवीत तोमानी मनुष्य बोलला, "आबा संस्थेच्या पहिल्या सभेचं प्रोसेडिंग मी लिहीलं.... त्यानंतर हायस्कूल सुरु होईतो सगळं दप्तर मी सांभाळलं.माझीसुध्दा उमेदवारीच सुरु आहे. कारकून काही गर्भात शिकून जन्माला येत नाहीत.नोकरीला लागून साडेतीन वर्ष झाली. मी फक्त पाच वेळा रजा घेतल्यायत्.... रविवारसुटी.... सणवार काही न बघता कामाला वाहून घेतलं.... माझी चूक झाली.... हेडमास्तरांच्या अधिकाराला मी चॅलेंज केलं.... रजा मंजूर नसताना रजा घेतली.....माझ्या माघारी गंभीर राजकारण सुरु आहे. हे मात्र मला कळलं नव्हतं.... ठीक आहे....मी सरांना सांगून पहातो." असं मोघमात बोलून साधले वाड्याबाहेर पडले.

         साधलेआबांकडून निघाले ते तडक बिऱ्हाडी गेले. राजिनामा खरडला तो रजिस्टर पोस्टाने पाठवूनत्यांनी बिहाड आवरलं आणि संध्याकाळच्या कुडाळ गाडीने साधल्यांनी गडमठ सोडलं.दुसऱ्या दिवशी साधलेला चार्जशीट देऊन पोच घेण्यासाठी गोविंद शिपाई त्यांच्या बिऱ्हाडी गेला तेव्हा साधले गाव सोडून निघून गेल्याचं बाहेर फुटलं. साधलेंचाअध्याय संपला आणि दोन महिन्यांनी त्यांच्या रिकाम्या जागी ज्येवाय्चा भाऊ क्रिष्णा उर्फ क्येवाय् लिपिक म्हणून हायस्कूलच्या सेवेत रुजू झाला. स्टाफवर शिपाई तीन स्थानिक आणि तेही हायस्कूल सुरु झाल्यापासूनचे आणि शिक्षकांपैकी मराठीच्या मुंडलेबाई एवढी स्थानिक मंडळी सोडली तर बाकीचा सगळा स्टाफ डोणग्यांनी आपल्या वगीच्या प्यादी फर्जदानी भरला.

          मुंडले बाईअलिप्त होती, ना कुणाच्या अध्यात न मध्यात म्हणून टिकली. काही ना काही निमित्तानेरेकॉर्ड ठेऊन, चार्जशीट भरुन तीन शिपायांपैकी दोघांना बळीचे बकरे बनवले गेले. त्यांच्या ऐवजी के.वाय्. नी गावाकडं 'रामुशाचं पोर्ग-शिरपा' आणि घरच्या शेतीच्या वाटेल्याच्या मुलगा तम्मान्ना यांची भर्ती केली. दोन्ही शिपायांना निम्मा पगार मिळायचा, तशाच बोलीवर त्यांना भरती केलेलं! ज्ये.वाय्.आला आणि शाळेत शिस्त आली.शाळेच्या अंतर्गत कुरबुरी कमी झाल्यामुळे आबांचा ताप कमी झालेला. त्यामुळे काही बाबींकडे दुर्लक्ष करुन त्यांनी ज्ये.वाय्. ला पूर्ण स्वायत्तता दिली इतकंच.

         हायस्कूलचा पट दिवसेंदिवस वाढतच चालला. आठवी, नववी, दहावीच्याचार-पाच तुकड्या आणि पाचवी सहावी सातवीच्या दोन-दोन तुकड्या एवढा पसारा वाढलेला.वखारीच्या डाव्या-उजव्या अंगानी इमारत विस्तारत चालली. अनुदानाची पैन् पै शाळेसाठी खर्च व्हायला हवी याकडे आबांचा कटाक्ष असायचा. पण ज्ये.वाय्.-के.वाय्. संगनमताने शाळेच्या हिशोबातून खावडी काढायचे. विज्ञान साहित्य,क्रीडा साहित्य, स्टेशनरी सगळी खरेदी कोल्हापूर-सांगलीइकडून केली जायची. बीलातले २०% ते २५% कमिशन ज्ये.वाय्. परस्पर खिशात टाकायचा.काही-काही साहित्याच्या तर नुसत्या पावत्या हिशोबाला लावल्या जात. प्रत्यक्ष सामान येतच नसे. तो पैसा ज्ये.वाय्. के.वाय्. परभारे हडप करायचे. स्कूल कमिटीच्या सभेत हिशोब सादर व्हायचा.... मेंबर मंजूरी द्यायचे, बस्स अधिक खोलात कोण कशाला शिरतो?

         पाच-सहा वर्ष बिनबोभाट गेली आणि मग मात्र ज्ये.वाय्. के.वाय्. नी गुण उधळायला सुरुवात केली. हायस्कूल नजिकच बाबु सुताराचं घर आणि परडं परसू.... त्याला हाताशी धरुन ज्ये.वाय्.नी भाडेकरूंसाठी इमारत बांधली. १४/१५ बिऱ्हाडकरूंसाठी तीन तीन खोल्यांची सोय केली. स्टाफवरचे आठ शिक्षक आणि खुद्द ज्ये.वाय्. के.वाय्. यानी आपली बिऱ्हाडं नव्या जागेत हलवली. जमिन विक्रीचे अगदी अल्प पैसे बाबूला मिळाले. सगळा व्यवहार के.वाय्.च्या बायकोच्या नावे झालेला. पण सुतार मात्र इमारत माझी आहे असं सांगायचा. ज्ये.वाय्.-के.वाय्. नी गावाकडनं आणलेले शिपाई.... त्याना त्याच इमारतीत एकेक खोली दिलेली. हेडमास्तरांच्या घरी पाणी भरणे, भांडी घासणे, कपडे धुणे-सगळी कामं ते बिनबोभाट करायचे. लोकं या गोष्टींची चर्चा करायचे.... पण कुणाची काही तक्रार नसल्यामुळे सगळ्या गोष्टी खपून गेल्या.

        आठवीची चौथी तुकडी वाढली त्या वर्षी दोन शिक्षकांची पदं निर्माण झाली. जाहिरात प्रसिद्ध झालीआणि कुणाकुणाचे अर्ज आले. यावेळी आबा दळवींनी सगळ्या गोष्टींमध्ये जातीनिशी लक्ष घातलेलं. आलेल्या अर्जात आठ उमेदवार स्थानिक बाकी पन्नास साठ अर्ज झाडून सगळे जिल्ह्याबाहेरचे. इंटरव्ह्यू झाले. आबांनी दोन स्थानिक उमेदवारांची निवड केली. एक सावंत नावाचे बी.ए. बी.एड्. उमेदवार आणि दुसऱ्या ड्राईंग टीचर पाटकर बाई. नवीनआलेली दोन्ही माणसं शाळेनजिक सुताराच्या घराजवळच्या इमारतीतच खोल्या घेऊन राहिली.पाटकर बाई हजर झाल्या आणि महिनाभरातच त्यांचं ज्येवायूशी सूत जमलं. ज्येवाय्नीबायको मुलं यांना गावाकडे रवाना केलं. आता सगळं मैदान मोकळं.... ज्येवायू अन् पाटकरबाई यांचे प्रच्छन्न व्यवहार राजरोस सुरु झाले.

      ज्येवायची राजरोस उठबस पाटकर बाईकडे असायची. बिऱ्हाडकरु म्हणजे ताटाखालची मांजरं.... सगळे डोळ्यावर पडदा ओढून रहायचे. तरीही या गोष्टी गावात फुटल्याच. पण ज्येवाय्चा दबदबा असा की तोंडावर विचारण्याची कुणाची हिम्मत झाली नसती. थोडीफार कुणकुण आबांच्या कानावरही गेली. गावातल्या बायकांमध्ये या गोष्टीची गांभिर्याने चर्चा व्हायची कुणीतरी आबा दळवींच्या मंडळींच्या कानावर या गोष्टी घातल्या. त्यांनी आबाना विचारल. असले प्रकार तत्काळ बंद व्हायला हवे असं खुद्द आबांच्या पत्नीनेच त्यांना बजावलं. आबानी खाजगीत ज्येवायू ना कानपिचक्या दिल्या. ज्ये.वाय्. नी मात्र उडवूनच लावलं. "हे इरोदकांच काम हाय.... येका चाळीत हातो म्हंताना कदीतरी येणंजाणं-च्या पाणी व्हतयच की.... आता समदं बिऱ्हाडकरु ष्टापवरचं.... आमी कुनाकडं बी बसतूयाकी.... बघनाऱ्यांच्या नदरेतच पाप.... तुम्ही ष्टापवरच्या मास्तरास्नी आमच्यामागारी विचरा की...." ज्येवाय्नी स्पष्टीकरण दिलं.

        पाटकर बाईचे संबंध ज्ये.वाय्. पुरते मर्यादितच नव्हते. केवायू सुद्धा बाईशी सूत जुळवून राहिलेला. अर्थात केवाय नी पाटकर बाईच सूत गूत शाळेत चालायच. केवायूची बायकोअसल्यामुळे घराकडे तो सांभाळून वागायचा. शाळेत मात्र दोघांचं हसणं खिदळणं-गप्पाष्टकं राजरोस सुरु असायची. ज्येवायच्या अनुपस्थितीत तर दोघांना भलताच ऊतयायचा. मुलांमध्येही या संबंधाची बातमी फुटली. या गोष्टी ज्ये.वाय्. समजून होता.पण त्याची काहीच आडकाठी नसायची. शाळा ही ज्ये.वाय्. केवायची को ऑपरेटीव सोसायटी.... तशी भागेदारी पाटकर बाईच्या संबंधातही दोघांनी मान्य केलेली.

      शाळेत राजरोसहे प्रच्छन्न व्यवहार सुरु झाले. मुलांमध्ये चर्चा व्हायला लागल्या. आबांच्या मंडळींकडून तर भलतंच प्रेशर यायला लागलं. या सगळ्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचं त्यानी पक्क केलं. गाठ ज्ये.वाय्. सारख्या बेरकी माणसाशी आहे. आबा ज्येवाय् ला पुरते ओळखून असलेले. भक्कम पुरावा हाती येईल तेव्हाच काय ती कारवाई करायची असंत्यानी योजलेलं त्यादृष्टीने त्यांची मोर्चे बांधणी झाली. आणि महिनाभरातच तशी संधीचालून आला. ज्ये.वाय्. शाळेच्या कामासाठी रत्नागिरीला गेलेले असतानाची गोष्ट. मधली जेवणाची सुट्टी संपून मुलं वर्गात गेली. तो मोका साधून के.वाय्. आणि पाटकरबाई लॅबोरेटरीत गेली. लक्ष ठेवायला दाराबाहेर रामुश्याचा शिरपा थांबलेला. खबर गेली अन्तीनचार नेमकी मंडळी घेऊन बाप्पा मर्गजानी शाळा गाठली.

       बाप्पा आणिसोबतची मंडळी शाळेकडे पोहोचली. सगळे लॅबोरेटरीच्या बंद दरवाजा समोर थांबले. मंडळीना तिथे थांबायची खूण करुन आबानी ऑफिस गाठलं. इनचार्ज कोळी आबाना पाहताचसटपटले. बाप्पा जरबेच्या सुरात म्हणाले, "हेडमास्तर कुठे आहेत?" त्यांच्या नजरेला नजर देणं टाळीत कोळी म्हणाले, "हेडसर, शिक्षणाधिकारी कार्यालयात रत्नागिरीला गेल्यात.... चार्ज माज्याकडं हाय...." मग बाप्पा कडाडले, "क्लार्क कुठे आहे? पाटकर बाई कुठे आहेत? बोलवा त्यांना...." कोळीसरांना झाल्या प्रकाराची कल्पनाच नव्हती. त्यानी शिरपाला बोलावलं. "अरे केवायू डोणगे सराना आणि पाटकर मॅडमनाइकडे यायला सांग...." त्याना थांबवीत बाप्पा म्हणाले, "कोळी सर.... केवायू डोणगे आणि पाटकर बाई कुठे आहेत अशी तुमचीकल्पना आहे? जावा.... सोबत आणखी दोन तीन शिक्षक मंडळीघेऊन लॅबोरेटरीकडे जावा.... लॅबोरेटरी बाहेर आमच्या सोबतची माणसं थांबली आहेत."

        कोळीसर जायला निघाले. त्याना थांबवीत बाप्पा म्हणाले, "लॅबोरेटरीचा दरवाजा बंदअसेल. धक्के मारुन दरवाजा उघडायला लावा आणि जे जे काही घडेल ते डोळे उघडे ठेऊनबघा.... त्या सगळ्याचा पंचनामा करायचा आहे." कोळीसर स्टाफमधले शिक्षक सोबत घेऊन लॅबोरेटरीकडे निघाले. दरम्यानच्या काळात तम्मान्ना शिपाई लॅबोरेटरीच्या मागीलबाजूने खिडकीपाशी गेला. खूप वेळ टकटक केल्यावर खिडकीचे झडप किल किले करुन केवाय् डोकावला, "म्या हाय न्हव हितं.... तू आनी कशापायमराय् लागलाईस?" त्यावर माणसं घेऊन बाप्पा मर्गजआल्याची वार्ता तम्मान्नाने सांगितली. केवायुच्या तोंडच पाणीच पळालं. प्रसंगावधान राखीत तो म्हणाला. "त्वा आसंच फुड जा आनि झिप्रसराला सांगून माणसास्नी बाजूला बलवून घे.... म्या गपचूप भाईर पडतो...." त्यावर या गोष्टीचा उपयोग नाही अस तम्मान्ना म्हणाला.

         दारावर टक्टक् झाल. आतून काहीच प्रतिसाद मिळेना. कोळी सरानी जोरजोराने दरवाजावर थापा मारल्या. "आत कोण हाय.... दार उगडा पाट् किनी.... बाप्पा साब, स्कूलकमिटीचं मेंबरं साळंत आल्याती.... दार उघडा आदी...." दार उघडल.... पाटकर बाई दारात उभ्या राहिल्या त्यानी आवाज चढवीत म्हटलं, "कोळीसर ss  हा काय तमाशा चाललाय .... ही माणस इथेकाय करतायत् ? सगळ्यानी बाजूला व्हा आधी.... ही काय पद्धत झाली कां?" त्या सरशी माणसं थोडी मागे सरकली. बाई दरवाजातून चार पावल पुढे आल्या. माणसं अवाक् होऊन बघित राहिलेली अन् के.वाय्.पाठमोरा दाराच्या फटीतून बाहेर पडला अन् डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोवर धूम पळत सुटला. बघणाऱ्यांना घटनेचा बोध होईपर्यंत केवायु नजरेच्या टप्प्याआड नाहिसा झाला.

         कोळीसरानी झाला प्रकार बाप्पांना जाऊन सांगितला बाप्पा हतबुद्ध झाले. मिनिटभर गप्प राहूनत्यानी मनात काही जुळणी केली. मग सगळी मंडळी कोळीसरांसह चार-पाच शिक्षकांना घेऊन लॅबोरेटरीत गेली. लॅबमध्ये कोपऱ्यात कपाटांच्या आडोशाला दोन बाके जोडून त्यावरसतरंजी चादर अंथरुन केलेला बेड दिसला. कपाळाला हात लावून बाप्पा म्हणाले,"हा तिढा आता आबा दळवीच सोडवू जाणेत. काय प्रकार झाला, हे तुम्हा सर्वांना माहिती आहेच. आबांना सगळं काही न घाबरता सांगा,तूर्त झाल्या गोष्टींची फार चर्चा नको."

    संध्याकाळी आबा कुडाळहून आल्या आल्या बाप्पा मर्गजानी झाली गोष्ट त्यांच्या कानावर घातली, सगळं ऐकल्यावर ते शांतपणे म्हणाले, "मी बघतो काय ते....उद्या सोक्षमोक्ष लावूया या प्रकरणाचा." दुसरे दिवशी दुपारी अकरा वाजता आबाशाळेत गेले. कोळीसर हात जोडीत पुढे आले. आबा दबक्या आवाजात म्हणाले, "कोळीसर आधी नोटीस काढून शाळा सोडून द्या. स्टाफ मेंबर्सची सभाआयोजित करा. सगळे जमले की आम्हाला वर्दी द्या." कोळीसर नोटीस काढायला रवाना झाले अन् आबा ऑफिसमध्ये जाऊन हेडमास्तरांच्या केबिनमध्ये नेहमीच्या खुर्चीत बसले.कोळीसरांनी शाळा सोडून दिली.

       स्टाफरूममध्ये मिटींगची तयारी केली आणि आबाना निरोप द्यायला शिपाई पाठवला. आबा स्टाफरूममध्ये प्रवेशले. शिक्षक खाली माना घालून उभे राहिले. आबा रुबाबदार पावल टाकीत खुर्चीपाशी येऊन थांबले. "आमच्या चारित्र्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे?"अजूनही शिक्षक मानाखाली घालून उभेच राहिलेले. आबा पुन्हा कडाडले, "मी तुम्हा शिक्षकाना विचारतोय.... मला उत्तर पाहिजे...."काय बोलावं कुणालाच काही समजेना. दोन मिनिटं गेली.... मग आवाज उतरीत आबा म्हणाले, "सांगा मुंडले बाई.... शाळा सुरु झाल्यावर दुसऱ्या वर्षीच तुम्हीआलात. पाच सहा वर्ष आम्हाला ओळखता.... माझं चारित्र्य तुम्हाला माहिती असेल. जे काही तुमच्या कानी आलं असेल ते परमेश्वराला स्मरुन सांगा." बाई धैर्याने उभ्या राहिल्या. शाळेत सुरु असलेल्या प्रकारांची त्यांना चीड होतीच.

       “आबा,आम्ही सगळी शिक्षक मंडळी तुम्हाला देवतुल्य मानतो. तुमचं चारित्र्य, तुमची नीतीमत्ता तुळशीपत्रा इतकी पवित्र आहे.पण.... हा प्रश्न तुम्ही कां विचारता अहात ते मला समजत नाही.” मुंडलेबाई शांतपणे म्हणाल्या. घडल्या प्रकाराची गंधवार्ताच त्यानानव्हती. “बाई, बसा खाली....आमच्याशी, शाळेशी ईमान राखून निष्ठेने काम करताहाततुम्ही. आम्ही तुमच्याबद्दल आदर बाळगून आहोत. आमच्या चारित्र्याबद्दल तुम्हाला शंका नाही हे ऐकून समाधान वाटल आम्हाला. आता तुम्हीच सांगा.... तुमच्या स्टाफपैकी कुणी बदफैलीपणा करीत असेल तर त्याला जाब विचारायचा नैतिक हक्क आम्हाला आहे ना?मी चेअरमन आहे.... तो अधिकार खड्ड्यात जाऊ दे.... स्टाफ मध्येइतके अश्लाघ्य प्रकार सुरु आहेत की, या शाळेचा चेअरमन आहे अस सांगायची मलाच लाज वाटते....

      आता आमच्या चारित्र्याबद्दल जे काढलात तसे उद्‌गार स्टाफवरच्या प्रत्येक कर्मचाऱ्याबद्दल काढाल का?” मुंडले बाईनी मान खाली घातली.... अगदी हळू आवाजात त्या म्हणाल्या,“आबा या दशक्रोशीत तुम्हाला शास्ते म्हणून मानतात... माझ्या घरची परिस्थिती ओळखता तुम्ही.... माझी भावंडं शिकताहेत मला कुटुंब वर काढायचंआहे.... मला नोकरी करायची आहे.... इथे दिवस काढायचे आहेत.... माझ काही चुकलं असेलतर वडिलकीच्या नात्याने कान पिळा.... पण असला अडचणीत टाकणारा प्रश्न जाहिरपणे विचारु नका....”

         मग कोळीसरांकडे निर्देश करीत आबा म्हणाले, “कोळीसर.... बाप्पांच्या हुकुमाप्रमाणे तुम्ही लॅबोरेटरी पर्यंत गेलात.... पुढे काय काय झाल.... कसं घडलंते थोडक्यात.... मुद्देसूद सांगा....” कोळीसर उठले,हात जोडीत अजिजी करीत म्हणाले, “आमासोबत पाटील वडार, येनेचवंडी, मकदूम सर बी व्हती नव्ह कां? आदी त्यास्नी ईचारा.... त्येकाय सांगतेत बगूया की.... मंग शेवटला बोलतू की म्या.... माजी गत लई अवघड झालीया कीसायेब.... म्या मान खाली घालून कान-डोळं त्वांड बंद करुन नोकरी करतूया.... माजंहात तोकडं हाईत हो सायेब.... कां आनी मला तोफंच्या तोंडी द्याया लागलात....”त्यांच्या या बोलण्याने आबा संतापले. मिशीवरुन पालखी मूठ फिरवीत भेदक कटाक्ष टाकीत ते गरजले.

        “भेकड,नामर्द.... कसले शिक्षक म्हणायचे तुम्ही! बांदेकर, जोशी, बापट एकेक शिक्षक आठवतात मला.तुटपुंज्या पगारात अनुदारपणे संसार चालवणारे, फाटक्या धोतराला गाठी घालून राहणारे आमचे शिक्षक.... आम्ही सातवीपर्यंत शिकलो. पण जे ज्ञानत्यावेळच्या आमच्या शिक्षकांनी दिलं ती शिदोरी आयुष्यभर पुरली आम्हाला. सगळा गाव घाबरायचा आमच्या गुरुजीना ! आमचं खोतांचं, प्रतिष्ठीतघराणं.... येणारी रयत दिंडी दरवाजात थांबून मुजरा करायची अन् या म्हटल्यावरच पुढेयायची. पण कधी काही कामानिमित्त गुरुजी आमच्या वाड्यावर यायचे. गुरुजी येतायत् हीवर्दी मिळाल्यावर एवढे तालेवार आमचे वडिल, पलंगावरुन उठून दरवाजा पर्यंत गुरुजींचं स्वागत करायला जायचे. भीरुता परिस्थितीमूळे येत नसते ती स्वभावतःच असते.... म्हणून अयोग्य संबोधन आलं आमच्या तोंडून.... माफ करा....”

        “कोळीसर तुम्ही आज इन् चार्ज हेडमास्तर आहात. चेअरमन म्हणून मी जाब विचारतोय.... तुम्ही काय पाहिलात ते स्टाफवरची सुशिक्षीत, जबाबदार माणसं ऐकूदेत. वेळ आली तर शाळा बंद पडली तरी चालेल.... चेअरमन पद आमचं खड्डयात जाऊदे,  त्याती पर्वा नाही करत आम्ही, जे अयोग्य आहे ते सुधारायचं आहे आम्हाला. आमच्या प्रश्नाचं नीट उत्तर द्या नाहीतर इथे बसल्या बैठकीत नोकरीचा राजिनामा द्या अन् बाहेर पडा....!” त्यानंतर मात्र कोळी सरांनी कसलाही आड पडदा न ठेवता सांगायला सुरुवात केली. पाटकर बाई दार उघडून बाहेर आल्या हे त्यांनी सांगताच पाटकर बाई उठल्या, “मला पित्त झालं.... चक्कर आल्यासारखी वाटायला लागली म्हणून मी आराम करण्यासाठी लॅबमध्ये गेल्ये होत्ये....” त्यांना थांबवीत आबा कडाडले, “पाटकरबाई ! आम्ही तुम्हाला काहीही विचारलेलं नाही. मध्येच कारण नसताना बोलणं आम्हाला आवडत नाही.... जरा गप्प बसा.... आम्हाला वाटेल तेंव्हा, आम्ही विचारु त्यावेळी, विचारलेल्या प्रश्नापुरतंच बोला. सांगा हो कोळीसर.... चालूद्या तुमचं....!”

         कोळींच कथन सुरु राहिलं. पाटकर बाई दार उघडून बाहेर आल्या. त्यांनी काय म्हटलं ते कोळीसरांनी सांगितलं. मग आपण आबांबरोबर लॅबोरेटरीत फिरुन आल्याचं ते म्हणाले. पाटकरबाई बोलतअसताना के.वाय्. पाठमोरा दाराबाहेर येऊन पळून गेल्याचं तसेच लॅबमध्ये कपाटांच्याआडोशाला असलेला बेड वगैरे तपशील त्यानी गाळला. ते खाली बसले आणि आबांसोबत आलेले, लॅबोरेटरीबाहेर थांबून राहिलेल्यांपैकी काका नाडकर्णी म्हणाले, “कोळीसर पाटकबाईंच्या पाठोपाठ डोणगे क्लार्क बाहेर पडले अन् पळून गेले.... ते नाही पाहिलंत?आणि लॅबोरेटरीत कपाटांच्या आडोशाला सजवलेला बाकांचा बिछाना....”

       गरीब चेहेरा करीत मुरब्बीपणे कोळीसर म्हणाले.... “आसल्.... आसल्.... बाप्पा कमिटीचे मेंबर ते आसं आवचित आल्यालं म्हंताना मी घाबारलो.... माजं चित्त ठिकानावर कुटलं असायला.... पाटकर बायच्या मागनं ल्याबोरेटरीतून  कोन भाईर आल्याल माला दिसल ‌न्हाई.... माज लक्ष न्हवतं....” मग कोळींच्या सोबत गेलेल्या वडार, येनेचवंडी, मगदूमया शिक्षकांना काका नाडकर्णीनी विचारलं. ते तिघेही काकांच्या जवळच थांबलेले पण त्यांनीही नरोऽवा कुंजरोवा असं सांगून कानावर हात ठेवले.             “शाळेतकाय काय गैरप्रकार सुरु आहेत ते आमच्या कानावर आले आहेत. आम्ही सगळ्या गोष्टींची जातीने चौकशी करणार आहोत. झाल्या गोष्टींचा बभ्रा करु नका. शाळेचा लौकिक सांभाळूनआपल्याला सगळं काही सुधारायचं आहे. याचं भान ठेवा. गुरांवर गोचीड-पिसवा पडल्या म्हणून कुणी गोठ्याला आग लावीत नाही. तव्दत आपण भान ठेऊन वागायचं आहे. कोळीसर, केवाय् ना मेमो द्या, संध्याकाळपर्यंत ते येतात का पहा नाहीतर अनुपस्थितीची कारणं द्यायला सांगा त्यांना. या पाटकरबाईंकडूनही लेखी खुलासा घ्या. पत्राच्या प्रती संस्थेकडे पाठवा. आम्ही निघतो आता.हेडमास्तर आल्यावर त्यांना ताबडतोब वाड्यावर यायचा निरोप द्या.” सभा बरखास्त करुन आबा दळवी बाहेर पडले.

         हा प्रकारघडला अन् दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ज्ये.वाय्. रत्नागिरीहून आले. के.वाय्. लॅबमधून पळाला तो दडी मारुन राहिलेला. संध्याकाळी झिप्रे, मगदूम सराना सांगूनगावाबाहेर निघून गेला. रात्री जेवण वगैरे उरकून सोबत दोन शिक्षकांना घेऊन ज्येवायूनी शाळा उघडली मस्टर काढला. घटना घडली त्या दिवशी केवायची सही झालेलीनव्हती. ज्येवायूनी सगळ्या गोष्टी समजून घेऊन पध्दतशीर सुटकेचा मार्ग शोधला. साधक-बाधक विचार विनिमय झाला. आबा दळवीनी पुन्हा विचारीपर्यंत या गोष्टीचे बोलणे काढायचेच नाही असा बेत ठरला. आबांची पुढची चाल समजेपर्यंत क्रिष्णाला रजेवर ठेवायचा. क्रिष्णा तीन चार दिवस रजेवर आहे, प्रकार घडला तेव्हा तो शाळेतच नव्हता असा स्टँड घ्यायचे ज्येवायूनी ठरवले.

         आबा दळवीनी चार दिवस वाट बघितली. पण कोळी सरांकडून पत्राच्या प्रती आल्या नाहीत की ज्येवाय भेटायला सुध्दा गेले नाहीत. आबानी कार्यकारणीतल्या लोकांची वाड्यावरच बैठक बोलवली.ज्येवाय्ना ही ही मिटींग असल्याचा निरोप गेला. सगळी मंडळी बैठकीला जमला. सगळं ऐकून घेतल्यावर ज्येवाय्नी कानावर हात ठवले. केवायु रजेवर असल्याचं स्पष्टीकरण त्यांनीदिलं. तेव्हा मात्र आबा दळवींचा तोल गेला. "निर्लज्ज.... बेशरम.... निमकहराम.... ज्ये.वाय्. तुम्ही या थराला जाल अशी मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती.किती धादांत खोटं बोलता तुम्ही. प्रत्यक्ष मला खोटं ठरवण्यापर्यत तुमची मजल गेली.... आता तुम्हाला दळव्यांचा हिसकाच दाखवायला हवा."

        ज्येवायूनी शांतपणे आदबीने उत्तर दिले, "साहेब तुम्ही आमचं पोशींदं..... तुमां म्होरं म्यां कुठलं किसपाट म्यां काय पुरं पडतुय तुमास्नी.... तुमी जल्मातून उठवशिला मला गरिबाला....माजी बायकापोर माती खात्याल.... क्रिस्नाच्या साटनं म्यां पाय धरतू तुमचं.... येक पावट माफी करा.... ह्येच्या म्होरं चुकी व्हनार नाय.... तुमी समाजताय तसलं कायवंगाळ न्हाय.... कोनतरी तुमचं कान भराय लागल्यात.... म्या समदी चवकशी क्येली.....किसना त्या रोज साळंत आल्याला न्हाई असं समदे सांगतेत.... म्या हतं नवतो.... आताकाय झालं? कसं झाल? मला काय दकलनाय.... तुमी साळत येऊन ग्येला त्या रोज सांच्याला किस्ना आल्ता घरी.... घडल्याला परकार त्येला समाजला आनी भिरमिटला की गडी आता कुट भूमिगत झाला काय दकल.... बाईलत्येची ऊर बडवून घ्यायलीया.... तुमी आनी जीवं मारता काय किस्नाला आस भ्याव वाटायलय् की तिला.... आम्ही कुटलं तुमच्या पासंगाल पुरतोया.... लोक एकाचं दोन करत्यात.... परतेक्ष घटना तुमी आपल्या नदरनं काय बगितल्याली न्हाई...."

        मिटींगला जमलेल्यांपैकी बाप्पांशिवाय कोणताच मेंबर घटनेच्या वेळी नव्हता. ज्येवायूनी प्रसंगाला बगल दिल्यावर ते सुध्दा बुचकळ्यात पडले. आबा दळवी हुशार पण पाताळयंत्री कारस्थानीपणा त्यांच्या वृत्तीतच नव्हता. कायद्याचा बडगा दाखवून ज्ये.वाय्. बधणार नाही हे त्यांनी ओळखलं. पूर्ण विचार करुन ते एवढंच बोलले,"कायद्यात पळवाटा पुष्कळ. तुम्ही कायदेबाज अहात.... घरात शिरुन घरमालकालाच त्रयस्थ ठरवलात तुम्ही.... आम्ही एकमार्गी आहोत. छक्केपंजे आम्हाला माहिती नाहीत.मी एकच सांगतो. तुम्ही आणि तुमचे बंधू दोघेही राजिनामा देऊन बाहेर पडा नाहीतर आम्हीच पदत्याग करुन संस्था मोडून टाकतो.... बस्स संपली मिटींग. मी चार दिवसाची मुदत देतो." मंडळी उठून निघून गेली.

        आबांनी दिलेल्या मुदतीत ज्ये.वाय्. गप्प राहीले. आबाना मात्र त्यांची सद्सद्विवेक बुध्दी, निस्पृह बाणा स्वस्थ बसू देईना. त्यानी चेअरमन पदाचा राजिनामा खरडला आणि रजिस्टर पोस्टाने कार्याध्यक्ष दुकानवाडचे तातु सावंत यांच्याकडे रवाना केला. तातु सावंत राजिनामा पत्र घेऊन ज्येवाय्ना भेटले. संस्थेचे दप्तर ज्ये.वाय्. सांभाळायचे. त्यांनी राजिनामा इनवर्ड केला. आपण आबांची समजूत घालूया असं गुळमुळीत सांगून कार्यकारणीच्या सभेचा अजेंडा तयार केला. त्यावर तातूंची सही घेऊन सभेची पत्रं कार्यकारिणी सदस्यांना पाठविली. ठरल्या दिवशी हायस्कूलमध्ये मिटींगसाठी सगळे पदाधिकारी जमले. आबा येतील म्हणून खूप वाट बघितली. तास दीड तासानंतर उलट सुलट चर्चा झाली. सार्वजनिक विश्वस्त संस्थेच्या कारभारात सगळेच अनभिज्ञ, गुंता कसा सोडवायचा कुणालाच ज्ञात नव्हते. ठंडा करके खाओ या नीतीने ज्येवायूनी बाजी मारली. आबा दळवी, त्यांच्या मागोमाग बाप्पा मर्गजही बाहेर पडले, संस्थेतून बाजूला झाले.

      आठ पंधरादिवस कुणाकुणाच्या भेटी घेऊन आबानी सल्ला मसलत केली. पण वाकडा मार्ग अवलंबून काही करायचे त्यांच्या वृत्तीतच नव्हते. ते जाहीर विरोध करते, दशक्रोशीतली माणसं जमवून प्रकरणाची चर्चा त्यांनी केली असती तर जमलेल्या लोकांनीज्ये.वाय्.-केवायूची गाढवावरुन धिंड काढली असती. पण आबांना हा मार्ग सुचला नाही.स्वतः सुरु केलेल्या संस्थेतून आबा बाजूला फेकले गेले. संस्था ज्येवाय्च्या कबजात गेली. पुढच्या साताठ वर्षात आहे तीच कार्यकारिणी ठेऊन जनरल मिटींग न घेताच संस्थेचा कारभार ज्येवायूनी रेटला. तातु सावंत अध्यक्ष बनले. कार्यकारिणीत खांदेपालट झाली. ती मंडळी ज्येवाय्ची मिंधी झाली. संस्थेचे अधिकृत सभासद पन्नास ते साठअसतील नसतील. निम्मे शिम्मे लोकांच्या गुपचूप सह्या घेऊन खोट्या सर्वसाधारण सभांचे रेकॉर्ड चोख ठेवले गेले.

       संस्थेतून बाजूला गेल्यावर मात्र आबा दळवी तालुक्याच्या राजकारणात सक्रिय बनले. महिनाभरानंतर आलेल्या निवडणूकांमध्ये ते पंचायत समितीचे अध्यक्ष झाले. नव्या कार्यक्षेत्रात कामाचा आवाका एवढा की संस्था-शाळा हा कारभार आबाना पोरखेळ वाटायला लागला.त्यांच्या कुटूंबीयांच्या उरात मात्र हे शल्य खुपायचे. पण कधी विषय निघालाच तर आबा जरबेने गप्प करायचे. "जे झालं ते झालं.... शैक्षणिक संस्था हे साठमारीचं मैदान नाही. आम्ही जे केलं ते विद्या देवीच्या प्रेरणेने केलं.... तिची इच्छा होती तोवर तिची सेवा केली. मी स्वेच्छेने बाहेर पडलो. आज तालुक्यात माझा लौकिक आहे.क्षुल्लक राजकारण करुन मी माझी किंमत कमी करुन घेणार नाही. माझी झेप गरुडाची आहे.मी कावळ्याबरोबर स्पर्धा नाही करणार....!" त्यांनी असं म्हटल्यावर कोण काय बोलणार ?

         दहा बारा वर्षाचा कालखंड मागे पडला. आबा दळवी कर्तृत्वाच्या जोरावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदापर्यंत पोहोचले. या कालावधीत कोकणात सुध्दा खूप स्थित्यंतरं झाली.जिल्हा विभाजन होऊन स्वतंत्र सिंधुदुर्ग जिल्हा अस्तित्वात आला. दुकानवाड गडमठ हा खरंतर दुर्गम भाग पण बॉम्बे गोवा हायवेमूळे या भागालाही महत्त्व आलं. आबांची मुलं उच्चपदापर्यंत पोहोचली. मोठा मुलगा जिल्हा पोलिस अधिक्षक म्हणून सिंधुदुर्गात हजर झाला. मधला मुलगा एम्.एस्. सर्जन झालेला, त्याची पत्नी सुद्धा डॉक्टर.... आबानी त्यांना दुकानवाड फाट्यावर हॉस्पिटल बांधून दिलं. आजपर्यंत हार्टपेशंट कोल्हापूर-मुंबई गाठायचे.... आता कुडाळ नजिक हायवेवर आबांच्या मुलाचं सुसज्ज हॉस्पिटल झाल्यामुळे जिल्हाभरचे आणि गोव्यातून सुद्धा पेशंट यायला लागले.

      सुरुवातीला ज्येवाच्या हो ला हो म्हणणारी कार्यकारिणी.... हळू हळू सगळ्या मेंबरना व्यवहार नी धोरणं कळायला लागली. ज्येवाय्ची खाबुगिरी, दडपशाही याना माणसं विटली.कार्यवाह सावजी वारंग खजिनदार दाजी राऊळ उघड उघड विरोध करायला लागले. पण कायद्याची बाजू त्याना न उलगडणारी. ज्ये.वाय्. त्यांच्या तोंडाला पद्धतशीर पानं पुसायचा. दरपाच वर्षानी जनरल सभा बोलावून कार्यकारिणी नियुक्त करायची अशी घटनेत तरतूद होती.पण ती धाब्यावर बसवून सभासदांच्या घरी जावून त्यांच्या सह्या घेऊन आपल्याला पाहिजे तसे ठराव लिहून कार्यकारिणीत क्येवाय्ला खजिनदार पदी नेमून नवीन कार्यकारिणी नेमीपर्यंत ज्येवाय्ची मजल गेली. भडकलेल्या दाजी राऊळानी आबांचा वाडा गाठला.

          संस्थांच्याकारभाराची आबाना आता पूर्ण माहिती झालेली. त्यानी सूत्र फिरवली. दाजी राऊळांसहसंस्थेच्या बावीस सभासदांचा अर्ज धर्मादाय आयुक्तांकडे सादर झाला. कार्यकारिणीबरखास्त करुन प्रशासकाची नेमणूक झाली. आणि नव्याने कार्यकारिणीची  निवडणूकीची प्रक्रिया जाहीर झाली. आता सभासद संख्या वाढवून बाजी मारायचे मनसुबे उभयपक्षी सुरुझाले. मध्यंतरी सभासद संख्या वाढून डोकेदुखी होऊ नये म्हणून ज्येवाय-क्येवाय् यानी  मखलाशी करुन सभासद वर्गणी शंभर ऐवजी एक हजार रुपये इतकी वाढवलेली. त्यामुळे नवीन सभासद नोंदणी हा आता पैशाचा खेळ झाला. ज्येवायने स्टाफ मधले आपले पित्त्ये, ग्रामस्थांपैकीआपल्या संबंधामुळे आबाना विरोध करणारे ग्रामस्थ सभासद म्हणून नोंदून घेतले.

       आबा सुद्धागप्प नव्हते. ज्याची सदस्य संख्या जास्त तो विजयी हे लोकशाहीचे सूत्र त्यानाहीअवगत असलेलं. त्यानी सुद्धा धूमधडाक्यात सभासद नोंदणी सुरु केली. पण आबांच्या कारवाईवर ज्ये.वाय्. क्येवाय् डोळा ठेऊन राहिलेले. त्यांचा सभासदांचा आकडा वाढला की आपले आणखी सभासद नोंदून बाजू भक्कम करायची रणनीती त्यांनी अवलंबिली. धर्मादायआयुक्तानी नेमलेला प्रशासक सुद्धा ज्ये.वाय्. क्येवाय् यांचा मिंधा. एकूणात ज्ये.वाय्.ची सरशी होणार अशीच सगळी चिन्हं. या गदारोळात निवडणूकीचा दिवस येऊन ठेपला.घटनेप्रमाणे सर्व सभासदांनी कार्यकारिणीतले सगळेच सदस्य आणि पदाधिकारी यांची निवडकरायची असल्यामुळे निर्धारीत वेळेला सभासद मंडळी शाळेच्या सभागृहात जमू लागली.

       सगळीकडून भक्कम मोर्चेबांधणी झालेली. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून ज्येवाय्च्या नकळत क्येवायने  खास व्यवस्था केली. निवडणूकीच्या दिवशी आबांच्या डॉक्टर सुनेला किडनॅपकरुन निवडणूक प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी तासभर आबाना ह्या गोष्टीची कल्पना देऊनमाघार घ्यायला लावायची असा त्याचा बेत ! साताऱ्याहून खास पार्टी या कामासाठी क्येवाय् नी मागवलेली. निवडणूकीच्या आदल्या दिवशी संध्याकाळी भाडोत्री गुंडांचीगाडी घेऊन क्येवाय्चा खास दोस्त स्टाफवरचा झिप्रेमास्तर शाळेत आला. शाळेच्याआवारात मुतारीच्या आडोशाला झिप्रे क्येवाय् यांची दबक्या आवाजात मसलत झाली.निवडणूकीच्या सकाळी आठ वाजता डॉक्टरणीला उचलायची असा बेत ठरला.

       डॉक्टरणीला गाडीत घातल्यावर झिप्रे मास्तरने शाळेत यायचं आणि मिशीवर पंजा फिरवून संकेत करायचाअस पक्कं ठरलं. निवडणूकीचा दिवस उजाडला. बेत ठरल्याप्रमाणे आठ वाजता हॉस्पिटल समोर ट्रॅक्स थांबली. ट्रॅक्समधून उतरलेली बाई हॉस्पिटलमध्ये शिरली. डॉक्टरीणबाई हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या मजल्यावर रहायची. अर्जंट व्हिजीटचा कॉल आला म्हणून डॉक्टरीणबाई काऊंटरला आल्या. बोलायला आलेल्या बाईशी जुजबी बोलणं झाल्यावर व्हिजीटिंग बॅग घेऊन डॉक्टरीणबाई बाहेर पडल्या. त्यांनी ट्रॅक्समध्ये पाय ठेवलाआणि आडोशाला राहून टेहळणी करणाऱ्या झिप्रेमास्तराने मोटर सायकल स्टार्ट केली.

         झिप्रेमास्तरची मोटर सायकल आत वळवताना दिसल्यावर क्येवाय् ऑफिसच्या बाहेर पडून व्हरांड्यात उभा राहिला. मोटर सायकल स्टैंड करुन मिशीवर पंजा फिरवीत झिप्रेमास्तर व्हरांड्याच्या दिशेने येताना दिसल्यावर निर्धास्त मनाने क्येवाय्ने ज्येवाय्ची केबिन गाठली अन्आबा दळवीना बोलवायचं फर्मान सोडलं. डुंबरे शिपायाच्या मागोमाग आबा दळवी आले. आबानी केबिनमध्ये प्रवेश केला त्या क्षणी मनात नसूनही ज्येवायू उभे राहिले. आधी उभे राहिल्यावर मग आपली चूक त्यांच्या लक्षात आली. ओशाळं हसून ज्ये.वाय्. म्हणाले."बसा की दळवी सरकार.... निवडणुका व्हत्याल की, पर पर तुमी आमचं पोशिंदं होची जाण हाय न्हवं आमाला.... काय च्या पाणी घेणार न्हवं....?" भेदक नजरेने ज्येवाय्कडे नखाशिखांत कटाक्ष टाकून आबा म्हणाले, "चहा आता निवडणूक जिंकल्यावरच.... आम्ही तुम्हाला पाजू.... ! तेजाऊ दे.... मला बोलावलं कशासाठी ?" क्येवाय् कडे प्रश्नार्थक नजरेने पहात ज्ये.वाय्. म्हणाले,"किस्ना.... काय म्हणतो रं तू? सांग म्हनं पटाटा...."

        आबांच्या नजरेला नजर देणं टाळीत क्येवायु म्हणाला, "दळवी सरकार, जरा शिस्तीत इच्यार करा.... मेंबरं आमची जास्त हैती.... लोकशाहीत सत्ता भौमतानी मिळवायची आस्ती..... तुम्ही पार जिल्ह्याच राजकारण करनारी नामजद असामी....या संवस्थेच्या येवारात आनी कशापाय पडलेत..... तसं हावंतर सल्लागार म्हनून तुमास्नी ध्येतो की...... पर विलेकशन तुमच्या इरोदात ग्येली तर जिल्ह्यात तुमची काय पत हायली हो?......" किस्नाने पुढे तारे तोडण्यापूर्वीच, काय होतय हे समजण्यापूर्वीच आबा दळवी ताड्दिद्दशी खुर्चीतून उठले. के.वाय्. च्या झिंज्या पकडून त्याला पुढे ओढीत त्यांनी फाडदिशी त्याच्या कानफटीत लगावली. रागाने थरथरत आबा बोलले, "अरे दीड दमडीच्या पेंद्या माझ्या पायताणाजवळ उभं रहायची तरी लायकी आहे का तुझी....? माझी पत तू टिनपाट काय मोजणार ?"

         "हे विद्यादेवीच मंदिर..... तुम्ही भावाभावांनी इथे कुंटण खाने चालवलेत.... ज्या ताटातअन्न खायचं त्या ताटात हगलात की तुम्ही.... तुम्हाला भिऊन मी बाजूला झालो असं वाटलं काय रे सोद्यानो तुम्हाला.... तुमची ही हिंमत...? तुकाय धमकी देणारेस ते माहिती आहे मला.... लक्ष्मीसारख्या माझ्या कुलवंत सुनेला किडनॅप करुन आबा दळव्याला नमवणार काय तुम्ही...? हे कोकणआहे... इथे माणसं विकत घेता येत नाहीत. तुझे खरेदी केलेले मेंबर काय दणका देतात ना, तो बघच आता.... आमचं घराणं हे या भागातल राजघराणं मानते इथली रयत..... विरोध आमच्या माघारी.... कुरबुरीच्या स्वरुपात.....        

       आमच्या तोंडावर आम्हाला विरोध करणारा अजून जन्माला यायचा आहे.... बघाच तुम्ही....!संस्थेच्या जीवावर तुम्ही बांडगूळासारखे वाढलात ! आता झाड वठायला लागलं.... म्हणूनआम्ही पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरलो आहोत. तुमच्या धमक्यांना घाबरणारी ही डरपोक अवलाद नाही. भले झाडाची फांदी छाटावी लागली तरी बेहेत्तर..... पण लक्षात ठेवा! बांडगूळ फक्त वाढतं..... फोफावतं..... तसे फार माजलेत तुम्ही आमच्या जीवावर! पण लक्षात ठेवा बांडगूळ रुजत नाही.... ही पांढर आमची आहे ! तुमची पाळंमुळं रुजलीयत् फक्त शाळेच्या फांदीवर, गाठ वाढावी तशी ! या भूमीत रुजायला तुमच्या पिढ्या जाव्या लागतील पिढ्या....!! "अन् पाठ फिरवून दिमाखात पावलं टाकीत आबा बाहेर पडले.

        ठीक दहा वाजता निवडणूकीची प्रक्रिया सुरु झाली. आबांचे दोन्ही मुलगे आणि सुना.... हो !क्येवाय् ने किडनॅप करण्याचा प्रयत्न केलेली डॉक्टरीण सूनसुध्दा.....! सभासद असल्यामुळे मतदान करायला सगळी जातीनिशी आलेली. डॉक्टरीण ट्रॅक्समध्ये चढली एवढंच झिप्रे मास्तरने बघितलं अन् अर्ध्या हळकुडांने पिवळा होत तो शाळेकडे रवाना झाला.ट्रॅक्स सुटली अन् गडमठ फाट्यावरुन मुंबई गोवा रस्त्यावर वळणार नेमक्या त्याच जागी आबांच्या डी.एस.पी. मुलाने ट्रॅक्स थांबवली. डॉक्टरणी सोबतच्या बाईला खाली उतरुनतिच्या कानाखाली पोलिशी पंजा वाजताच सगळा प्लॅन तिने भडा भडा सांगितला.

          इलेक्शन पारपडली. ज्ये.वाय्. क्येवाय् किंवा त्यांचा एकही पित्त्या निवडून आला नाही. गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळ (चौदा वर्षाच्या) प्रदीर्घ काळानंतर पुनःश्च आबादळवींच्या छत्रछायेखाली आलं.... ज्ये.वाय्. क्येवाय् पर्व इतिहास जमा झालं...अध्यक्षीय भाषणात आबा दळवी आत्मविश्वासाने म्हणाले. "ही पांढर अनीती खपवून घेणारी नाही...... कुणाच्या ताटाखालचं मार्जर होऊन रहाणं इथल्या मंडळींना फार काळ जमणारं नाही.... ज्ये.वाय्. धूर्त खरा पण ही नस त्याला नाही ओळखता आली.... वाढणं सोपं.... रुजणं कठिण !"

                            ********