वडिलांना पत्र.. Vrishali Gotkhindikar द्वारा पत्र मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

वडिलांना पत्र..

एक पत्र वडिलांना

 ती कै काकाना  सा नमस्कार आता पर्यंत वेगवेगळ्या वेळी आपण अनेक पत्रे एकमेकांना लिहिली पण हे पहिलेच पत्र मी लिहिते आहे जे तुम्हाला पाठवू शकत नाहीआणि तुमच्या मृत्युनंतर मी तुम्हाला लिहित आहे .तुमची लाडाची पहिली आणि एकुलती एक लेक होते मी !!!तुम्ही वडील असला तरी मी काकाच  म्हणायची तुम्हाला अगदी खुशीने माझी पहिली बेटी धनाची पेटी आहे असे तुम्ही म्हणायचा . माझ्या आगमना मुळे तुमचे आयुष्य भरभराटीला आले असे वाटायचे तुम्हाला त्यामुळे खूप खूप कौतुक आणि लाड करीत होता तुम्ही माझे ...तुमच्या तुटपुंज्या कमाईत नेहेमी आधी माझेच हट्ट पुरवले जायचे आई तर लटक्या रागाने नेहेमी म्हणत असे ..तुमच्या लाडाने वेडी होईल हं ती....मी लाडकी जरी असले तरी मला मात्र वेड लागले चांगल्या अक्षराचे, बहुश्रुत पणाचे,गाण्यांचे , कवितांचे ,..आणी अभ्यासू पणाचे, सुद्धा !!! रोज सकाळी माझा अभ्यास घ्यायचा तुम्ही इंग्रजी मराठी लेखन लिहयला सांगायचा ... तुमचे स्वतःचे अक्षर म्हणजे नुसते “मोती “च होते .दोन्ही हातानी लिहिण्याचे कसब होते तुमच्याकडे  रोजच्या लेखन सरावाने माझे पण इंग्रजी व मराठी दोन्ही अक्षरे “सुबक “झाली होती .सुंदर अक्षरासाठी..पुढील आयुष्यात॥  खूप बक्षिसे पण मिळवली मी तुमचा स्वभाव खुप हौशी होता . पैसे खर्चून छान छान खाणे .टोकीज ला जाऊन चांगले पिक्चर पाहण्याचा तुम्हाला खूप शौक होता !!! राजेंद्र कुमार  हा तुमचा अगदी आवडता “हिरो ..त्याचे बरेचसे पिक्चर आपण दोघांनी एकत्र पाहिले !!!आणखी एक तुमचा शौक म्हणजे रोज आई साठी एखादा गजरा किंवा फुल आणणे पण  असा खर्च करीत असताना त्या त्या  वेळी जिथे शक्य होते तिथे पैसे वाचवणे ही तुमची “खुबी “होती तुमचे एक वाक्य फेमस  असे “ताई ( हो मला ताई च म्हणायचा तुम्ही) मनी सेवड इज मनी अर्नड”!!! खूप मराठी हिंदी  कविता, सुभाषिते, नाटकातील वाक्ये, ..आणी हो सिनेमातील गाणी पण तुमच्या मुळे अगदी तोंड पाठ झाली होती मला तुमच्या बरोबर लहानपणी  डबल सीट सायकल वरून जाणारी मी .. तुमच्या कडून च सायकल शिकले .. इतर वेळेस् मला एवढेसे लागले तरी ..हळहळणारे तुम्ही ..सायकल शिकताना पडले की हसायचा  “ताई पडल्या शिवाय येईल का सायकल ? असे म्हणायचा .. शाळा कॉलेज मधील  माझा नाटक ,कविता .वक्तृत्व ,अभ्यास हस्ताक्षर यातील सहभाग आणि यश याचे खूप  कौतुक होते तुम्हाला .अकरावीला मला इंग्रजी मराठी आणि सायन्स यात अव्वल गुण मिळाले हे पाहून खूप खुष झाला होता तुम्ही आपल्या आर्थिक परिस्थिति ची पर्वाही न करता .अक्षरशः  हाताला येतील तितके पेढे तुम्ही वाटले होते अगदी कोणत्याही गोष्टीत मला काही कमी पडू नये असा कटाक्ष असे तुमचा  यथावकाश मी पदवीधर आणी द्वीपदवीधर पण झाले माझ्या प्रत्येक यशात तुम्ही जास्तीत जास्त आनंदी होत होता .पुण्यातल्या आपल्या नातेवाईकांना पत्रे घालून  लेकीच कौतुक  कळवत होतात !!अभ्यासा सोबत मला स्वयपाकाची पण खूप आवड होती खुप हौसेने मी वेगवेगळे पदार्थ करून पाहत असे ..तुम्हीही हौसेने ते खाऊन कौतुकाने आईला म्हणायचा बघ ताई सारखे तुला नाही करता येत काही तेव्हा मला स्वतःचा अभिमान वाटत असे .आई पण कौतुकाने हसत असे ..मला बँकेत नोकरी लागल्या वर ..माझ्या पेक्षा ताईचा पगार जास्त आहे असे मित्रांना आवर्जून सांगत  होता तुम्ही !!!यानंतर माझे लग्न ठरले .मला डॉक्टर  नवरा आणि तो ही कोल्हापुरातला मिळाला याचा तुम्हाला संतोष वाटला होता ...मनातून तुम्हाला हायसे ही वाटले.असावे .   कारण तुम्ही कधी स्पष्ट नाही बोलला ..पण मला सोडून राहणे तुम्हाला अशक्य वाटत होते ....माझा समजूतदार नवरा आणि माझ्यावरचे त्याचे प्रेम  बघुन “ताईने नशीब काढले बर का आमच्या “..असे साऱ्यांना सांगताना तुम्ही “थकत नव्हता !! लग्ना नंतर सुद्धा पण मला फक्त पाहण्या साठी तुम्ही रोज बँकेत येत होता.. सोबत एखादा गजरा किंवा एखादी खाण्याची वस्तू असेच !!.. लग्ना नंतर मी सुखी आहे असे पाहून तुमचा चेहेरा अगदी “प्रसन्न होत असे मला मुलगा झाला तेव्हा तर खुप आनंद झाला  होता तुम्हाला !अगदी माझ्या भावाच्या जन्माच्या वेळेस झाला होता त्यापेक्षाही  जास्त खूप थाटामाटात केले होते त्याचे बारसे तुम्ही  नंतर मग बरीच  वर्षे सारे काही  छान चालले होते ..लेकीचा संसार ,नातवाची हुशारी ,जावयाची कर्तबगारी याचे कौतुक वाटायचे तुम्हाला . कधीकधी हे सर्व पाहताना तुमच्या डोळ्यात पाणी सुद्धा तरळत असायचे तुम्ही खूप भावनाप्रधान होतात .  अडचणी होत्याच पण माझा संसार यशस्वी चालला होता माझा मुलगा बोर्डात आला तेव्हा तर तुमच्या आनंदाला “पारावार ..च नव्हता !! यानंतर काही वर्षात तुम्हाला डायबिटीस आहे हे निदान झाले....... औषध पाणी सुरु झाले ..प्रथम सारे काही ठीक होते पण  .गोड धोड चमचमीत खायच्या तुमच्या सवयीमुळे खाण्याचे पथ्य  मात्र तुम्ही पाळेनासे झाला कोणाचे ही न ऐकता आपल्या मना प्रमाणे वागणे सुरु झाले तुमचे इतर वेळी आईच्या सल्ल्या प्रमाणे वागणारे तुम्ही आता तीला पण जुमानेसे झाला होतात .याचा परिणाम काही दिवसातच समोर आला .शुगर वाढल्याने तुमचा एक पाय काढायची वेळ आली . त्या प्रसंगाला मी एकटीच साक्षीदार होते! ते ऑपरेशन झाल्यावर तुम्ही फक्त माझ्या गळ्यात पडून खूप रडला होतात ! तो प्रसंग मी कधीच नाही विसरणार ,,.. याआधी तुमची आई म्हणजे माझी आज्जी गेली तेव्हा फक्त तुम्ही इतके रडले होतात .. पाय काढल्याने आता  मात्र पूर्णपणे परावलंबी झाला  होता तुम्ही यानंतर मात्र आईचे हाल सुरु झाले कारण तुमचे सगळे तीलाच करावे लागे त्यात घरचे.. बाहेरचे व्यवहार पाहणे आणी ..तुमची चीडचीड सहन करणे  ..! आता तर तीलाही बिपी आणी शुगर ने गाठले होते !! पण बिचारी सारे हसत मुखाने करीत असे  अशीच काही वर्षे गेली ..तुम्हीं आहे त्या स्थितीत पण आनंदी होताच उत्साह नेहेमीचा होताच खरेतर तुम्हाला फिरायची खूपच आवड होती ,,पण पाय काढल्यामुळे स्वत उठून  कुठे जावे असे जमत नव्हते तरीही वाचन ,रेडीओ ऐकणे घरी येणाऱ्या मित्रांशी गप्पा करणे यात  तुम्ही आनंदी रहात होता  यानंतर मात्र एकदम सारेच बिघडले ..  आईला मोतीबिंदूच्या ऑपरेशन साठी दवाखान्यात नेलेखरे तर अगदी साधे ओपेरेशन होते ते ,,पण त्या दरम्यान अचानक तिची शुगर कमी  होवून तीचे निधन झाले.... हा धक्का आपणा साऱ्या साठी अनपेक्षित होता .. आम्ही दोघे भावंडे तर पारच “कोलमडून “गेलो होतो . मला वाटले या वेळी ..तुमची अवस्था अगदीच वाईट होईल पण कसे काय कोण जाणे तुम्ही अगदीच धीराने घेतले सारे ..!आईच्या माघारी काही दिवस ठीक गेलेपण नंतर नंतर मात्र तुम्ही स्वताला सगळ्यातून अलिप्त करून घेतले रोजचा पेपर, ..टीवी, ..गप्पा, भावाच्या मुलीशी खेळणे, या पैकी कशातच तुमचे मन रमेना …..आणी मग तुम्हाला अल्झायमर ने गाठले .. हे दुखणे फारच वाईट होते ..तुम्हाला काहीच आठवेना .. भाऊ वहिनी  तुमची नात यातील कोणाचीच तुम्हाला ओळख लागेना जेवण झालेले पण  तुमच्या लक्षात राहीना .दिवसातून चार वेळा जेवले तरीही तुम्हाला वाटायचे आपल्याला जेवायला वाढलेच नाही . आणी मग मला एके दिवशी माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात वाईट गोष्टीला सामोरे जावे लागले.............तुम्ही माझी खूप आठवण काढत आहात असा भावाने निरोप दिला होता .ताई तुमचा ध्यास घेतलाय बघा काकांनी असे वहिनी पण म्हणाली  तुम्हाला कवठ खुप  आवडत असे .त्याची ताजी चटणी घेवून मी तुम्हाला भेटायला आले होते... नेहेमी प्रत्येक पदार्थ अगदी चवीने खाणारे तुम्ही ..त्या दिवशी कसेतरी सांडत मांडत खात होता खाल्लेले अर्धे तोंडातून बाहेर येत होते त्याचे तुम्हाला भानच नव्हते .. !खाल्लेल्याची चव पण बहुधा तुम्हाला समजत नव्हती... आणी अचानक तुम्ही मला म्हणालात .. “कोण तुम्ही हो ?..नाव काय तुमचे ? म्हणजे मला तुम्ही अजिबात ओळखले नव्हते . हे ऐकुन माझ्या डोळ्यातून पाणी आले ..पण तुमचे लक्ष कुठेच नव्हते तुम्हीं मला म्हणाला .“.माझे एक काम कराल का ?आमची ताई कुठे भेटली तर तीला मी बोलावले आहे म्हणून सांगा बर का..सांगाल ना ? म्हणजे मी समोर असून पण माझी ओळख तुम्हाला पटत नव्हती!!!कीती भयंकर अवस्था ..होती ती .. काय ही दैवाची खेळी म्हणायची ?? माझ्या काळजाचे अगदी पाणी पाणी झाले होते  त्यावेळी ..! अजून ही तो वाईट दिवस मी विसरू शकत नाही  .. आणी मग काही दिवसांनी तुमचे आजारपणामुळे “रीतसर निधन झाले “…………….“निधन “वार्ता “  या सदरात तुमचा फोटो पण छापला गेला .. माझ्या दृष्टीने तर तुम्ही “त्या “दिवशीच गेला होतात जेव्हा माझी ओळख तुमच्या स्मृतीतुन पुसली गेली होती  .. असा हा आपल्या दोघांचा “प्रवास “या पत्रातून तुम्हाला वाचून दाखवते आहे . माझ्याजवळ  अजूनही तुमच्या खुप चांगल्या चांगल्या  “आठवणी “आहेत आणी राहतील .. आता आणखी लिहिले तर डोळ्यातल्या पाण्याने हे पत्रच  कदाचित धुवून जाईल म्हणून इथेच थांबते .. आणी आकाशातल्या एका तेजस्वी तार्या कडे पाहून तुमचा निरोप घेते ..............

..तुमची लाडकी |

“ताई . ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------