तोतया वारसदार
पात्र रचना
व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं.
जय - व्यंकटेशचा मुलगा.
रोहन - सौमित्रचा मुलगा.
भाग १७
भाग १६ वरून पुढे वाचा....
“एकदम बरोबर साहेब, मग मी उद्या याच वेळेस फोन करू का? मी सगळे डिटेल्स तयार ठेवतो.” – सारंग.
“ओके, मी उद्या तुमच्या फोनची वाट पाहतो. गुड नाइट.” – व्यंकटेश.
“गुड नाइट.” – सारंग.
“मग आता?” – प्रशांत.
“आता काही नाही, उद्या रात्री पुन्हा सर्व जमा. व्यंकटेशला फोन लावू. बघूया काय म्हणतात ते.” – सारंग.
“सारंग, मला असं वाटतं की तू त्या दोघांना इथे बोलावून घ्यावस. हवं तर आपण त्यांच्या तिकीटांची सोय करू, म्हणजे त्यांच्यावर भार पडणार नाही. जर ते इथे आले, तर सर्वच प्रश्न सुटतील. त्यांची प्रॉपर्टी त्यांना देऊन टाकू आणि आपण मोकळे होऊ.” प्रशांत म्हणाला.
“तू म्हणतो आहेस ते बरोबर आहे. त्यांना इथे बोलावून तर घेऊच, त्यांच्याशी चर्चा पण करू, पण प्रशांत, गोकर्ण आणि सांगलीला सुद्धा जावच लागणार आहे. असं तडका फडकी काही करता येणार नाही. इच्छा पत्रात लिहिल्या प्रमाणे सर्वांना शोधावच लागणार आहे, आणि हे आपल्या लंडनच्या पाहुण्यांना पण सांगावं लागणार आहे.” – सारंग.
“सारंग सर बरोबर बोलताहेत.” निशांतनी सहमती दर्शवली.
“ठीक आहे, चला मग आता, भेटूया उद्या रात्री. गुड नाइट.” प्रशांत म्हणाला, आणि मग सगळेच पांगले.
दुसऱ्या दिवशी रात्री सारंगच्या ऑफिस मधे पुन्हा बैठक भरली.
“निशांत, तू तुझ्या सर्व नोट्स तयार ठेव. मला रेफरन्स ची जरूर पडली, तर त्वरित देशील. ISD कॉल आहे हे लक्षात असू दे.” – सारंग.
“ओके, सर्व तयार आहे.” – निशांत. मग सारंगने फोन लावला.
“हॅलो, मी सारंग वकील बोलतो आहे.”
“हॅलो, मी व्यंकटेश बोलतो आहे, आणि माझ्या जवळच माझा भाऊ, सौमित्र बसला आहे. माझा आणि सौमित्राचा मुलगा पण इथेच शेजारी आहे. आता तुम्ही सविस्तर बोला.” – व्यंकटेश.
मग सारंग वकिलांनी सर्व परिस्थिती अगदी अथ पासून इती पर्यन्त सारांश रूपात सांगितली. सगळ्या ठळक घटना मात्र विस्ताराने सांगितल्या. नंतर मग म्हणाले की, ”आता सर्व कथा मी तुम्हाला सांगितली आहे, तर आता पुढे कसे जायचे ते सांगा.”
“पण तुम्हाला अजून गोकर्ण आणि सांगलीला जाऊन बघायचे आहे ना, त्याला तर वेळ लागणार आहे, मग आम्ही कशाला घाई करायची ?” – व्यंकटेश
“असं आहे, इच्छापत्रातल्या अटी प्रमाणे, जरी आम्हाला गोकर्ण आणि सांगलीला जाऊन शोध करावा लागणार असला, तरी तुमचं कुटुंब हे क्लास १ श्रेणी मधे येतं, त्यामुळे संपत्ती मधे सर्वात जास्त हिस्सा तुमचाच असणार आहे, म्हणून तुमचं मत महत्वाचं आहे.” – सारंग वकील.
“ठीक आहे, पण सारंग साहेब,” आता व्यंकटेशचा मुलगा जय बोलला. “तुम्ही सर्व सांगितलं, तुम्ही किती कष्ट घेतले ते सुद्धा सांगितलं, पण इस्टेट किती आहे ते नाही सांगितलं.”
“साधारणपणे ९-१० करोंड च्या आसपास असावी. एखाद्या चांगल्या एजन्सी कडून मूल्यांकन करून घ्यावं लागेल, ते करूच.” – सारंग वकील.
“सारंग साहेब, आम्हाला विचार करण्यासाठी दोन दिवस द्याल का? तुम्ही परवा याच वेळी फोन करू शकाल का?” – जयने विनंती केली.
“ठीक आहे. मी दोन दिवसांनंतर याच वेळी फोन करीन. गुड नाइट.” सारंगने फोन ठेवला.
“काय झालं असेल बुवा? एवढी मोठी इस्टेट सुखासुखी मिळते आहे, तर यांना विचार करायला वेळ हवा आहे. नवलच आहे एक एक.” निशांत आश्चर्याने म्हणाला.
“विनायकरावांची मुलं आहेत ती, अविनाशनी नाही का नाकारली ही इस्टेट? अरे या संपत्तीचं कौतुक तुला आहे, त्यांना नसेल, पैसा पाण्यासारखा वाहत असेल त्यांच्याकडे.”
प्रशांत सरांनी त्यांचं मत नोंदवलं.
“अविनाशकडे इस्टेट नाकारण्याचं स्पष्ट कारण होतं, यांचं काय चाललं आहे समजत नाही” सारंग सर म्हणाले.
“मग आता काय करायचं आपण?” – किरीट.
“आता आपण करण्या सारखं काहीच नाहीये, दोन दिवस जाऊ दे, मग पुन्हा फोन करू, ते लोक जे ठरवतील त्या प्रमाणे करू, अजून काय?” सारंग सरांनी समारोप केला आणि मीटिंग संपली.
आता दोन दिवस निशांतला काहीच काम नव्हतं म्हणून त्यांनी आरामच करायचं ठरवलं. पण दुसऱ्या दिवशी सहज ऑफिस मधे राव साहेबांना भेटायला गेला असतांना त्याचवेळी गोकर्ण हून फोन आला. फोन वर गोखले बोलत होते. राव साहेबांनी फोन निशांतला दिला.
“हॅलो, मी गोकर्ण महाबळेश्वर वरून गोखले बोलतो आहे. तुम्ही आठ दहा दिवसांपूर्वी फोन केला होता, पण मी नव्हतो. आपण कोण, कुठून बोलता आहात आणि माझ्याकडे काय काम होतं?”
“मी निशांत. मी नागपूरला असतो, मीच फोन केला होता आणि माझं जरा वैयक्तिक काम होतं तुमच्याकडे. मी तिथेच येणार होतो पण अजून रेल्वे चं आरक्षण मिळत नाहीये म्हणून उशीर होतो आहे. आरक्षण मिळाल्यावर मी लगेच तुम्हाला फोन करून कळविन. तुमचा नंबर सांगता का?”
“नंबर घ्या लिहून.” गोखल्यांनी एसटिडी कोड आणि नंबर सांगितला. “पण काय काम होतं याची थोडी कल्पना दिली तर बरं पडेल”
“कामाचं स्वरूप असं फोन वरून सांगता येणार नाही, म्हणूनच मी स्वत: तिथे येतो आहे. प्रत्यक्ष भेटीतच आपण सविस्तर बोलू. मला फंक्त एवढंच सांगा की तुम्ही मंदिरात पुजारी आहात न?” निशांत म्हणाला.
“हो” – गोखले.
“आणि हे काम पिढीजाद आहे का?” – निशांत.
“हो, गेल्या पांच पिढ्या हे काम आम्ही करतो आहोत पण ही सगळी चौकशी तुम्ही का करता आहात?” – गोखले.
“अहो हा माझ्या कामाचाच भाग आहे. मी तुम्हाला सविस्तर आपल्या भेटीत सांगेन, तुम्हाला अंधारात ठेवणार नाही. निश्चिंत असा.” – निशांत.
“वैयक्तिक काम आहे म्हणता आणि थोडीशी पण कल्पना देत नाही आहात, टेंशन येतं की हो.” – गोखले.
“नाही, नाही तसं अजिबात नाहीये. तुम्ही निश्चिंत रहा. मी जी गोष्ट सांगणार आहे ती तुमच्यासाठी आनंदाचीच असणार आहे हे नक्की, त्यामुळे तुम्ही टेंशन घेऊ नका.” निशांत नी थोडी सारवा सारव केली. गोखल्यांचं समाधान झालं नाही, पण ते पुढे काही बोलले नाहीत.
दोन दिवसांनंतर रात्री नऊ, साडे नऊच्या सुमारास सर्व जण सारंग वकिलांच्या ऑफिस मधे जमले. निशांतनी त्यांना गोखल्यांच्या फोन बद्दल सांगितलं. काय बोलणं झालं हे सविस्तर सांगितल्यावर म्हणाला “आता मला तिथे विनाविलंब जाणं जरूरी आहे.”
“तू म्हणतो आहेस ते बरोबर आहे, आज हे लोकं काय म्हणताहेत ते बघू, त्यांचा विचार काय आहे हे कळल्यावर आपल्याला पुढची पावलं टाकता येतील.” – सारंग.
सारंगने फोन लावला. “हॅलो मी सारंग वकील बोलतो आहे. तुमचा काय विचार ठरला आहे हे आम्हाला सांगता का?”
“मी जय बोलतो आहे, व्यंकटेश गोखल्यांचा मुलगा, आमचा विचार तर ठरला आहे, आम्हाला आजोबांच्या संपत्तीत कोणताच वाटा नको आहे. पण सौमित्र काका आज इथे येऊ शकले नाहीत.”
“अरे, मग त्यांचा काही वेगळा विचार आहे का ?” - सारंग
“नाही वेगळा नाहीये, त्यांना पण वाटा नको आहे, पण त्यांना काही शंका आहेत, त्याचं निरसन करायचं आहे.” – जय.
“मग आता आम्हाला कसं कळणार?” – सारंग.
“त्यांचा फोन नंबर देतो तो लिहून घ्या. तुम्ही त्यांच्याशी सरळ संपर्क करून विचारू शकता.” जय ने फोन नंबर दिला.
“अजून एक विचारायचं होतं.” – जय.
“काय?” सारंग.
“समजा, जर कोणी वारसदार नाही मिळाला, तर ही इस्टेट एखाद्या धर्मादाय संस्थेला द्यायची आहे असं तुम्ही म्हणाला होता, तर त्या वेळेस संस्था निवडण्याच्या प्रक्रियेत आम्ही सहभागी होऊ शकतो का?” – जय
“जय साहेब, हा तर तुमचा हक्कच आहे. तुम्ही जरूर निर्णय प्रक्रियेत सहभागी होऊ शकता. किंबहुना तुम्हालाच अधिकार असतील.” – सारंग. फोन वरचा संवाद संपला.
“काय चाललं आहे या लोकांचं?” सारंग स्वत:शीच बोलला. “काही कळायला मार्ग नाही.”
“सारंग, व्यंकटेश कडे भरपूर पैसा असेल, म्हणून त्यांना या संपत्ती मधे इंट्रेस्ट नसेल. आपल्या करता जरी ९ कोटी जास्त असले, तरी ९ कोटी म्हणजे जेमतेम १२-१३ लाख पौंड. ज्यांच्या कडे करोडो रुपये आहेत, त्याला १२ -१३ लाखांमधे काही इंट्रेस्ट असेल का? तूच विचार कर.” किरीट म्हणाला.
“कदाचित तू म्हणतो आहेस तसंच असेल. कदाचित याच मुद्यावर व्यंकटेश आणि सौमित्र मधे मतभेद झाले असतील.” – प्रशांत म्हणाला.
“अरे, नाही, नाही, तू सुद्धा ऐकलसच ना की त्यांना सुद्धा हिस्सा नको आहे असं जय म्हणाला ते” – सारंग
“अरे पण इकडे गोंधळाची परिस्थिती निर्माण करून ठेवली, त्याचं काय?” किरीट वैतागाने म्हणाला. “सारंग तू लगेच सौमित्रला फोन लाव.”
“लावावाच लागणार आहे.” असं म्हणून सारंगने सौमित्रला फोन लावला.
“हॅलो, मी सारंग वकील बोलतो आहे, नागपूर वरून, सौमित्र साहेब आहेत का? त्यांच्याशी बोलायचं आहे.” -सारंग
“मी रोहन बोलतो आहे, रोहन सौमित्र गोखले. बोला सारंग साहेब, आम्ही ऐकतो आहोत.”
“आत्ता थोड्या वेळापूर्वी आम्ही व्यंकटेश साहेबांना फोन केला होता. त्यांनी सांगितलं की त्यांना बाबांच्या संपत्तीत हिस्सा नको आहे. पण तुम्ही लोकं तिथे नव्हते, म्हणून तुमचं मत जाणून घेण्यासाठी हा फोन केला.” सारंग म्हणाला.
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com