तोतया वारसदार
पात्र रचना
व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं.
भाग १६
भाग १५ वरून पुढे वाचा....
मग सारंगने पूर्ण रिपोर्ट द्यायला सुरवात केली. एक एक बारीक सारिक गोष्ट सुद्धा, तो त्यांनी काढलेल्या नोट बघून सांगत होता. सगळं सविस्तर सांगे पर्यन्त रात्रीचे साडे नऊ वाजले. नंतर तिघांच्याही मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते.
सारंगनेच प्रथम बोलायला सुरवात केली. “म्हणजे अविनाशचं नाव स्पर्धेतून बाद झालं असा निष्कर्ष काढायचा का ?”
“हो, म्हणजे या सर्व घटना क्रमातून दूसरा अर्थ निघतच नाहीये.” – निशांत.
“पण मला समजत नाहीये की, एवढ्या कोट्यावधीच्या मालमत्तेकडे कोणी इतक्या सहज पाठ फिरवू शकतो का?” प्रशांत सरांची शंका.
“सर, तुम्ही सलमा काकूंना पाहिलं नाहीये, अप्सरा फिकी पडेल आणि ते ही त्यांच्या या वयात. त्या आता चाळिशीच्या असतील. पण एवढंच नाही, तर जवळ जवळ १० वर्ष, अविनाशरावांची इतकी सेवा केली आहे त्यांनी, की ते विसरणं अविनाशरावांना शक्य नव्हतं.” निशांतनी स्पष्टीकरण दिल. “इतका मनमिळाऊ आणि प्रेमळ स्वभाव आहे त्यांचा, की मला सुद्धा असं वाटलं की आई असावी तर अशी. माझी आई लहानपणीच गेली, त्यामुळे आईची किंमत मी जाणून आहे सर.” निशांत थोडा थांबला, मग पुन्हा म्हणाला “आणि सर जेंव्हा, अविनाश रावांची स्मृति गेली होती आणि त्यांना हिन्दी सुद्धा धड बोलता येत नव्हतं, तेंव्हा संपर्क भाषा म्हणून काकूच मराठी शिकल्या. बांगला देशात, मराठी शिकणं हे किती अवघड गोष्ट असेल, याची कल्पना पण येणार नाही. अविनाश रावांच्या बद्दल जर बाहेर कळलं असतं, की ते इंडियन आर्मी ऑफिसर आहेत, तर त्या वेळच्या परिस्थितीत काय घडलं असतं हे सांगता येणं अवघड होतं. त्यांच्या जीवाला धोका होता, म्हणून त्यांनी अविनाश रावांची ओळख पण लपवली. काकूंचे वडील गेल्यावर अविनाश रावांचा सांभाळ करणं हे, उत्पन्नाचं कुठलच साधन नसल्याने, अत्यंत कठीण होतं. पण त्यांनी परिस्थितीशी अत्यंत धैर्याने लढा दिला आणि अविनाश रावांना त्यांच्या बिकट अवस्थेतून यशस्वी रित्या बाहेर काढलं. माझ्या मते, ज्याच्यात माणुसकी आहे, तो हे सर्व विसरण्या इतका कृतघ्न असूच शकत नाही. अविनाश काका पण विसरले नाहीत.”
“मला वाटतं, निशांत म्हणतो आहे ते बरोबर आहे. आपण अविनाशचा शोध लागला नाही अशी नोंद करून, पुढे जावं.” – किरीट म्हणाला.
“ते बरोबर आहे, पण पुढे, मागे जर अविनाशला संपत्तीचा मोह पडला आणि तो इथे उगवला, तर काय करायचं?” प्रशांतनी आणखी एक शंका बोलून दाखवली.
“पण सर असं काहीही होणार नाही अविनाश काका त्यांच्या निर्णयावर खूप ठाम होते.” निशांतनी ग्वाही दिली.
“अरे पण आपल्या जवळ त्याचं लिखित स्टेटमेंट नाहीये, त्यामुळे तो जर काही काळाने बदलला तर काय करायचं?” – प्रशांत.
निशांत जवळ या प्रश्नाचं काहीच उत्तर नव्हतं. तो गप्पच बसला.
थोडा वेळ सगळेच चूप होते. कोणा जवळच उत्तर नव्हतं. शेवटी प्रशांत सरच बोलले. “निशांत, पुन्हा जाऊन अविनाशकडून लिखित मधे आणू शकतो का?”
“कसं शक्य आहे सर, त्यांनी त्यांची ओळखच नाकारली आहे. ते कसे लिखित मधे देऊ शकतात? त्यांनी मला निक्षून सांगितलं आहे की पुन्हा इथे येऊ नकोस. त्यांना संपत्ति मधे काडीचा इंट्रेस्ट नाहीये. आणखी एक गोष्ट, जर त्यांची ओळख समोर आली, आणि ती बातमी पसरली, तर अवनाशकाकांवर कोर्ट मार्शल होऊ शकतं. आणि हा धोका आपण पत्करू शकत नाही.” निशांतनी त्यांची अडचण सांगितली.
“ठीक आहे.” सारंग सरांनी विषय संपवला. “आत्ता आपण असं धरून चालू की खूप प्रयत्न करून सुद्धा त्यांचा शोध लागला नाही. नाही तरी आर्मी ऑफिस ने त्यांना बेपत्ता घोषित केलंच आहे. आपण त्याचा रेफरन्स घेउच शकतो. ते ऑफिशियल डॉक्युमेंट आहे.”
“ओके,” किरीट ने बोलायला सुरवात केली. “आता पुढचा प्लॅन काय असणार आहे? ते पण तर ठरवायला हवं. सारंग, तुझ्या इंग्लंड मधल्या मित्रांनी काही कळवलं का?”
“नाही ना” सारंग सर म्हणाले. “त्या बाजूने काहीच प्रगती नाहीये. आता पर्यन्त माझ्या पत्राचं उत्तर यायला हवं होतं.”
“निशांत,” पुन्हा किरीट सर बोलले “मला वाटतं की तू आताची मोहीम उत्कृष्ट हाताळली आहेस, मग तूच का नाही इंग्लंडला जात? काय सारंग, प्रशांत, पटतंय का माझं
बोलणं तुम्हाला?”
“मी? सर मला इंग्लंडची काहीच माहिती नाहीये, माझं इंग्लीश जरी चांगलं असलं तरी त्यांचे उच्चार, त्यांचं बोलणं मला कळणार नाहीत. नको सर हे अवघड काम आहे. तुमच्या पैकीच कोणीतरी जा.” निशांतनी आपलं अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला.
“सारंग अरे, तू बोल ना काही तरी.” किरीट म्हणाला. थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही. सगळेच विचार करत होते.
थोडा वेळ गेल्यावर निशांतला काही तरी सुचलं, तो म्हणाला, “सर मी काही सुचवू का?”
“हूं, बोल.” – सारंग सर.
“सारंग सर, तुमच्या फोन वर ISD सुविधा आहे का?” – निशांत.
“हो, आहे, पण त्याचं काय?” – सारंग सर.
“आत्ता रात्रीचे साडे दहा वाजले आहेत, म्हणजे लंडनला संध्याकाळ असणार, तुम्ही तुमच्या मित्राला फोन लावा. त्यांना सांगा, की व्यंकटेश आणि सौमित्र या दोघांचे फोन नंबर लंडनच्या डायरेक्टरी मधे शोधून लिहून ठेवा, आम्ही उद्या पुन्हा याच वेळेस फोन करतो.” – निशांत.
“अरे! निशांत, हुशार आहेस रे, आमच्या कोणाच्याच डोक्यात हे आलं नाही. सारंग, तू उगाच पत्राचा उपद्याप करत बसलास. लाव, आत्ताच फोन लाव.” प्रशांत सर म्हणाले. त्यांना ही कल्पना एकदमच पटली.
सारंगनी लगेच फोन जवळ ओढला आणि त्यांच्या मित्राला फोन लावला.
“चला एक काम झालं. उद्या रात्री आपण सर्व पुन्हा जमू. फोन नंबर मिळाल्यावर, कोणाला फोन लावायचा आणि काय बोलायचं हे ठरवू, आणि त्या प्रमाणे पुढचं पाऊल टाकू. मीटिंग संपली.” – सारंग सरांनी सर्वांना शुभ रात्री केलं आणि मग सगळेच निघाले.
दुसऱ्या दिवशी रात्री १० वाजता सगळे सारंग सरांच्या ऑफिस मधे जमले. सारंग सरांनी त्यांच्या मित्राला लंडनला फोन लावला. थोडं बोलणं झालं. सारंग सरांनी एका कागदा वर व्यंकटेश आणि सौमित्रचा फोन नंबर टिपून घेतला. पांच मिनिटांनी फोन ठेवल्यावर, सारंग सर खुशीतच म्हणाले “निशांत, तुझी आयडिया काम करून गेली. दोघांचेही नंबर आपल्याला मिळाले आहेत.” सगळ्यांचे चेहरे ही बातमी ऐकून फुलले होते. “आता काय करायचं ते ठरवू या.”
“ठरवायचं काय त्यात? सारंग फोन लाव व्यंकटेशला, सिम्पल.” – किरीट.
“ओके, आत्ताच लावतो.” सारंग म्हणाला आणि त्यांनी लंडनचा नंबर फिरवला. रिंग जातेय. “आता कोणी आजिबात बोलू नका. ISD वर बोलाव लागणार आहे. लाइन कशी असेल ते माहीत नाही. त्यामुळे डिस्टर्बंस नको.”
“सारंग, फोन स्पीकर वर टाक म्हणजे आम्हाला पण ऐकता येईल.” किरीट म्हणाला. “ओके, स्पीकर वर टाकतो पण कोणी मधे बोलू नका, पिन ड्रॉप सायलेंस पाळा.” सारंग म्हणाला आणि फोन स्पीकर वर टाकला. रिंग जात होती. सगळे कान देऊन ऐकत होते. एक मिनिटानंतर फोन उचलल्या गेला.
“हॅलो गोखले स्पीकिंग”
“हॅलो, मी नागपूरहून advocate सारंग बोलतो आहे. व्यंकटेश गोखले साहेबांशी बोलायचं होतं. आत्ता बोलता येईल का?”
“मी व्यंकटेश बोलतो आहे, आपली जुनी ओळख आहे का? म्हणजे तुम्ही नागपूर वरून बोलत आहात म्हणून विचारलं. काय काम होतं माझ्याकडे ?
“सर, विनायकराव गोखले आपले वडील ना?” – सारंग.
“हो, पण त्यांचं काय?” – व्यंकटेश.
“विनायक रावांचं निधन झालं आहे आणि त्यांची प्रॉपर्टी, त्यांचा वकील या नात्यांनी मला त्यांच्या वारसदारांकडे सोपवायची आहे. म्हणून हा फोन केला.” – सारंग.
पलीकडच्या बाजूला थोडावेळ शांतता. हे लोकं एकमेकांना हात वारे करून विचारात होते, की काय झालं? एकदम शांत का झालं.
“हॅलो सर आपण लाइन वर आहात ना?” – सारंग.
“हो, हो. लाइन वरच आहे, पण आपण १० मिनिटांनी फोन करता का?” – व्यंकटेश.
“ओके. १० मिनिटांनी पुन्हा करतो.” सारंग सर म्हणाले आणि फोन ठेवला.
१५ मिनिटांनी सारंगने पुन्हा फोन लावला.
“हॅलो सर मी सारंग वकील बोलतो आहे. काय झालं?”
“काय आहे, तुम्ही एकदम नागपूर वरूनच फोन लावला, म्हणून थोडं गोंधळायला झालं अजून काही नाही. माझा धाकटा भाऊ पण इथेच असतो, त्याला फोन लावला होता. तो उद्या संध्याकाळी माझ्याकडे येईल. आम्हाला असं वाटतं की प्रॉपर्टी बाबांची आहे, तेंव्हा आम्ही दोघांनीही, तुम्ही डीटेल द्याल तेंव्हा हजर असणं सयुक्तिक राहील. बरोबर आहे न?” – व्यंकटेश.
“एकदम बरोबर साहेब, मग मी उद्या याच वेळेस फोन करू का? मी सगळे डिटेल्स तयार ठेवतो.” – सारंग.
“ओके, मी उद्या तुमच्या फोनची वाट पाहतो. गुड नाइट.” – व्यंकटेश.
“गुड नाइट.” – सारंग.
“मग आता?” – प्रशांत.
“आता काही नाही, उद्या रात्री पुन्हा सर्व जमा. व्यंकटेशला फोन लावू. बघूया काय म्हणतात ते.” – सारंग.
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com