तोतया वारसदार - भाग 19 Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तोतया वारसदार - भाग 19

   तोतया वारसदार

पात्र रचना 

बबन                       सारंग सरांच्या ऑफिस मधला चपराशी.

सुभाष गोखले                बबनचा बार मधे भेटलेला नवीन मित्र.

भाग  १९         

भाग १८  वरून पुढे  वाचा....

 

बबनने  थोडा वेळ मित्राची वाट पाहिली, ओल्ड मंक ची बाटली त्यांच्याकडे डोळे वाटारून बघत होती. शेवटी कंटाळून त्यांनी एकट्यानेच सुरवात केली. दोन पेग पोटात गेल्यावर, त्यांनी समोर पाहीलं, जो माणूस समोर बसला होता तो पण त्याच्या कडेच बघत होता, त्यांनीच बोलायला सुरवात केली. चार पेग पोटात गेल्यावर दोघे घनिष्ट मित्र बनले. राजकारण, नागपूरचे रस्ते, ऑफिस मधल्या मुली हे सगळे विषय चघळून झाल्यावर, बबन म्हणाला “ अरे आपण इतकं सगळं बोललो पण मला तुमचं नावंच माहीत नाही, माझं नाव बबन, तुमचं काय?”

“माझ नाव सुभाष गोखले.” तो माणूस उत्तरला.

सुभाष गोखले हे नाव ऐकल्यावर बबनची सगळी दारू उतरली. त्याच्या डोक्यात अनेक चक्र फिरू लागली. वंशावळी, निशांत ची नेमणूक, लंडन मधली मुलं, बेपत्ता अविनाश विनायक रावांची १० कोटींची मालमत्ता वगैरे. त्यानी विचारलं “काय करता, कुठ राहता तुम्ही?” – बबन.

“मी कॉर्पोरेशन मधे आहे. जल आपूर्ती विभागात. खापरीला घर आहे माझं.”

आणि मग सुभाष त्यांच्या घरा बद्दल आणि बायको बद्दल बोलत होता, पण बबनचं त्याच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. तो वेगळ्याच विचारात गढून गेला होता.

“अहो, बबन शेठ, कुठे हरवला तुम्ही? चढल्यासारखी तर वाटत नाहीये, कसला विचार करत होता?” सुभाषने बबनच्या  हाताला पकडून विचारले.

“अरे, काही नाही, असंच. तुम्ही खूप छान बोलता. मला आवडलं तुमचं बोलणं. मी काय म्हणतो आपण पुन्हा भेटायला हवं तुमचा काही फोन नंबर आहे का” बबनने विचारले.

“ऑफिसचा आहे. घ्या लिहून. घरी फोन नाहीये. पण कशाकरता? पुन्हा बसायचं आहे?” सुभाषने विचारले. तो जरा गोंधळला होता. बार मधे एकदाच भेटलेला माणूस पुन्हा भेटायचं म्हणतोय, कशाकरिता ते सांगत नाहीये, त्याला काही कळत नव्हतं पण एवढी दारू ढोसल्यावर एवढा विचार त्याला सोसवत नव्हता, म्हणून तो गप्पच बसला. थोड्या वेळाने दोघेही बारच्या बाहेर पडले.

ती रात्र आणि दूसरा दिवस बबन साठी फार अवघड गेला. तो जे करण्याचा विचार करतो आहे ते नैतिक दृष्ट्‍या बरोबर नाही, हे त्याला कळत होतं पण अचानक जी संधी  पुढ्यात चालून आली आहे, तिचा तरी अव्हेर कसा करायचा? ‘माझ्या नशिबात जर पैसा लिहिला असेल, तर तो मी का डावलू? नाही तरी  ही एवढी मोठी मालमत्ता चोरापोरीच जाणार आहे, कोणीही खरा वारसदार अजून सापडला नाहीये, मग मी प्रयत्न केला तर बिघडलं कुठे.’ अश्या विचारात त्याचा अख्खा दिवस गेला. दोन तीनदा सारंग सरांनी त्याला हटकलं सुद्धा, की त्याचं लक्ष कुठे आहे म्हणून. दिवसभर त्याच्या दोन मनामध्ये युद्ध चालू होतं. शेवटी नशिबात पैसा लिहिला आहे आणि त्याच्या साठी प्रयत्न करणं यात काही गैर नाही, यावर त्यानी शिक्का मोर्तब केलं. या विचारा नंतर जरा त्याला बरं वाटलं

संध्याकाळी, त्याला सारंग सरांचं बऱ्याच फायली व्यवस्थित करण्याचं काम होतं म्हणून त्यांनी बबनला थांबून ते काम पूर्ण करायला सांगितलं. बबनला ही सुवर्ण संधीच होती. त्यांनी सगळे बाहेर पडल्यावर आधी ऑफिसचं दार लावून घेतलं. फायली ठेवल्या होत्या तो गठ्ठा उपसला. त्यातली गोखल्यांची फाइल त्याने काढली. थोडी चाळली, त्यात निशांतचे रिपोर्ट, वंशावळी सर्व सापडलं. त्यात फंक्त बांग्लादेश चा रीपोर्ट नव्हता. त्यावेळच्या सर्व मीटिंग रात्री झाल्या होत्या आणि फाइल मधे नोटिंग करायचं नाही असंच ठरलं होतं, त्यामुळे, त्याबद्दल बबनला काहीच कल्पना नव्हती. फंक्त अविनाशचा पत्ता लागला नाही एवढंच नोटिंग होतं. बबननी सर्व फाइल ऑफिस मधल्या झेरॉक्स मशीन वर कॉपी करून घेतली. बबनचं काम  झालं होतं, मग त्यांनी दरवाजा उघडला आणि सरांनी सांगितलेलं काम पूर्ण केलं.

घरी गेल्यावर बबनने फाइल चा पुन्हा पुन्हा अभ्यास केला. सर्व गोष्टी आठवणीत पक्क्या झाल्यावर त्यांनी फाइल ठेवली आणि झोपायला गेला.

दोन तीन दिवस बबनने खूप विचार करण्यात घालवले. उलट सुलट विचारांनी त्याच्या  डोक्यात थैमान घातलं होतं. नीती आणि अनीति बाबत विचारांचं युद्ध त्याच्या डोक्यात धुमाकूळ घालत होतं. एक मन म्हणत होतं की दुसऱ्याच्या  संपत्ती चा विचार करणं बरोबर नाही. हे पाप आहे. तर दुसरं मन म्हणत होतं की जर कोणी वारसदार सापडलाच नाही तर तशीही, ही प्रॉपर्टी धर्मादाय होणार, तेंव्हा आपण प्रयत्न करण्यात काही चूक नाहीये. शेवटी दुसरं मन जिंकलं. त्या दिवशी त्यांनी एका PCO वरून सुभाष गोखल्यांना फोन केला.

“हेलो, मी बबन बोलतो आहे, आपण परवा बार मधे भेटलो होतो बघा.”

“हो, आठवतंय, काय काम आहे, म्हणत होता तुम्ही?” – गोखले.

“बसुया का आज आपण?” – बबन

“आज काय आहे?” – सभाष.

“अहो खास काही नाही, सहज. तुमचा सहवास आवडला मला. म्हणून.” – बबन

“ओके. संध्याकाळी ७ वाजता पोचतो मी. कुठे येऊ?” – सुभाष.

“चॅरियट बार “ – बबन

“ओके.” – सुभाष.

असेच ती दोघं ३-४ वेळा भेटले. बबनने सुभाष बद्दल बरीच माहिती गोळा केली. सुभाष बंगला देश मधून आला आहे, आणि त्यांच्या वडिलांचं नाव आश्विन आहे, हे कळल्यावर तर त्याला अधिकच आनंद झाला. आश्विन आणि अविनाश ही दोन्ही नावं खूप सारखी होती. आता पर्यन्त बबनची सुभाष बरोबर बरीच घसट झाली होती. मग एक दिवस संध्याकाळी बबनने सुभाषला फोन केला.

“आपण आज संध्याकाळी सदरच्या इंडियन कॉफी हाऊस मधे भेटू शकतो का?”- बबन

“आज तर मला खूप काम आहे, आज जमणार नाही. उद्या शनिवार आहे, उद्या भेटू शकतो. पण काय बबन राव बार मधल्या मित्राला तुम्ही कॉफी हाऊस मधे बोलावता आहात! बार मध्येच भेटू की. तुम्हाला चॅरियट नको असेल, तर दूसरा, तुम्ही सांगाल तो. काय?” – गोखले.

“नाही. मी ज्या कामासाठी भेटणार आहे तुम्हाला,  त्या साठी आपण दोघेही पूर्ण नॉर्मल असणं जरुरीचं आहे. जर तुम्ही हे काम करण्याची तयारी दाखवली, तर सर्वात प्रथम दारू पिणार नाही अशी शपथ घ्यावी लागणार आहे. तेंव्हा कॉफी हाऊसच ठीक आहे. भेटू मग उद्या  संध्याकाळी ७ वाजता. कॉफी हाऊस सदर.” – बबनने संभाषण आटोपतं  घेतलं.

दोन दिवसांनी संध्याकाळी, बबन कॉफी हाऊस समोर गोखल्यांची वाट पाहत उभा होता. गोखले आले, त्यांनी सायकल स्टँड वर लावली आणि दोघे आत मधे शिरले. कॉफी आणि आमलेट ची ऑर्डर देऊन झाल्यावर, गोखले म्हणाले की, “काय काम होतं? सांगा.”

बबनने आधी त्यांना सर्व तपशीलवार माहिती दिली. मग म्हणाला, “आपल्याला श्रीमंत होण्याची ही एक संधी चालून आली आहे. आपण ती घ्यायला पाहिजे.”

“म्हणजे ह्या प्रॉपर्टीवर हात मारायचा तुमचा विचार आहे का? आणि हे कसं साधणार आहात तुम्ही? आणि मुख्य म्हणजे माझा यात काय संबंध?” सुभाष गोखल्यांनी प्रश्नांचा भडिमारच केला.

“सांगतो. सगळं सांगतो. यांच्या पैकी अविनाश गोखले सैन्यात होते, आणि ७१ च्या लढाईत बंगलादेश मधे असतांना बेपत्ता झाले आहेत. त्यांचा अजून ठावठिकाणा  लागला नाहीये. तुम्ही गोखले आहात आणि बांग्लादेश मधूनच आला आहात, ही सर्वात जमेची बाजू आहे. तुम्ही वारसदार म्हणून उभं राहायचं. इस्टेट मिळाल्यावर आपण अर्धी अर्धी वाटून घ्यायची. १० कोटीची इस्टेट आहे. आपल्या वाट्याला ५-५ कोटी येतील. जन्माची ददात मिटेल.” बबनने त्यांची योजना सांगीतली.

हे ऐकल्यावर गोखल्यांची मतीच गुंग झाली. म्हणाले, “बापरे, ही तर चक्क फसवणूक आहे, अहो, बबनराव आपलं कारस्थान उघडकीला आलं तर सरळ जेल चा रस्ता. नको नको हे नाही झेपणार आपल्याला.”

“गोखले, तुम्ही कॉर्पोरेशन मधेच काम करता आहात न?, का निस्वार्थ जनसेवा कार्यालयात?” – बबन.

“दोन्ही ठिकाणी मी काम करतो, साहेब, पैसे खात असतो, तर आज माझं टोलेजंग घर झालं असत. माझा स्वच्छ कारभार आहे, म्हणून सार्वजनिक कार्यात मला थोडा फार मान आहे. माझा दोन खोल्यांतला भाड्याच्या घरातला संसार आहे. हे नाही जमायचं मला.” गोखल्यांनी साफ नकार दिला.

बबनचा चांगलाच अपेक्षा भंग झाला. त्याला वाटलं होतं की करोडो रुपयांची इस्टेट म्हंटल्यांवर गोखले पटकन तयार होतील, पण झालं उलटच. काय करावं हे त्याला सुचत नव्हतं. थोडा वेळ तसाच गेला. आमलेट आणि कॉफी आली, दोघांनी शांतपणे आमलेट खाल्लं. बबन विचार करतच होता, इतकी हाता तोंडाशी आलेली संधि दवडण्याची त्याची मुळीच इच्छा नव्हती.

कॉफी पिता पिता बबन म्हणाला “हे बघा गोखले साहेब, अशी दुर्मिळ संधी चालून आली आहे, हा नशीबाचाच भाग आहे, आयुष्यात एकदाच अशी संधी चालून येते. माझी अशी विनंती आहे की ती घालवू नका. विचार करा. तुम्हाला जी भीती वाटते आहे, तसं  काही होणार नाहीये, अजून  पर्यन्त कोणी वारसदार मिळालाच नाहीये, तुम्ही जर दावा पेश केला तर, तुम्हाला ही संपत्ती विनासायास मिळून जाईल.”

क्रमश:........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com