तोतया वारसदार
पात्र रचना
व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं.
जय - व्यंकटेशचा मुलगा
रोहन - सौमित्रचा मुलगा
भाग १८
भाग १७ वरून पुढे वाचा....
“हॅलो, मी सारंग वकील बोलतो आहे, नागपूर वरून, सौमित्र साहेब आहेत का? त्यांच्याशी बोलायचं आहे.” -सारंग
“मी रोहन बोलतो आहे, रोहन सौमित्र गोखले. बोला सारंग साहेब, आम्ही ऐकतो आहोत.”
“आत्ता थोड्या वेळापूर्वी आम्ही व्यंकटेश साहेबांना फोन केला होता. त्यांनी सांगितलं की त्यांना बाबांच्या संपत्तीत हिस्सा नको आहे. पण तुम्ही लोकं तिथे नव्हते, म्हणून तुमचं मत जाणून घेण्यासाठी हा फोन केला.” सारंग म्हणाला.
“आमचंही तेच मत आहे, पण आज आम्हाला तिकडे जाणं जमलं नाही, एवढंच. आम्हाला पण त्या मालमत्तेत कुठलाही हिस्सा नको आहे.” रोहनने सांगितलं.
“जय साहेब म्हणत होते की तुम्हाला काही शंका आहेत म्हणून, आम्हाला कळलं तर तुमचं समाधान करण्याचा प्रयत्न करू आम्ही.” सारंग म्हणाला.
“एक दोन मुद्दे आहेत, सांगतो. तुम्ही गोकर्णच्या गोखल्यां बद्दल, परवा बोलत होता, आता हे गोखले खरंच आमच्यापैकी आहेत, हे कशावरून? त्याची पडताळणी करण्याची काही यंत्रणा आहे का तुमच्याकडे? काय निकष लावणार आहात तुम्ही? मी हे विचारतो आहे कारण आम्हाला कोणालाच, त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाही म्हणून.” रोहन म्हणाला.
“विनायकरावांनी गोखले घराण्याची वंशावळी लिहून ठेवली आहे, आणि त्याप्रमाणे, आम्ही एकेकाचा शोध घेतो आहे. जर त्यांनी मृत्युपत्रात तुमची नावं लिहून ठेवली असती, तर हा प्रश्नच उद्भवला नसता. पण त्यांनी स्पष्ट लिहिलं आहे की वारसदार शोधा म्हणून. त्यामुळेच आम्हाला शोध कार्य हाती घ्यावं लागलं.” – सारंग.
“ती वंशावळी आम्हाला कशी पाहायला मिळेल?” रोहन.
“तुम्ही पत्ता पाठवा, मी कूरियर करतो.” – सारंग
ठीक आहे, घ्या लिहून” रोहनने पत्ता सांगितला आणि सारंगने उतरवून घेतला.
“सांगलीच्या बाबतीत पण असंच आहे का?” – रोहन.
“हो” सारंग म्हणाला. “आणि मी एक सुचवू का?”
“काय?” – रोहन
“तुमच्या पैकी कोणीतरी भारतात या, आम्ही तुमचा तिकीटांसहित सर्व खर्च करू, तुम्ही इथे या, आल्यावर सर्व गोष्टी सविस्तर तुम्हाला कळून येतील. मग काही प्रश्नच उरणार नाही.” सारंगने त्यांना आमंत्रण दिलं.
“हूं, हे ठीक आहे, मी जयशी बोलतो, या बाबतीत आणि तुम्हाला सांगतो.” – रोहन.
“मग उद्या फोन करू?” – सारंग.
“चालेल.” – रोहन. सारंगने फोन ठेवला.
“हे बरं झालं, त्यांच्यापैकी कोणी जर भारतात आलं, तर आपला पण त्रास वाचेल. रोज रात्री येऊन बैठक करावी लागणार नाही.” निशांत म्हणाला. सगळ्यांनाच ते पटलं त्यांनी मान डोलावली आणि सर्व घरी निघाले.
दुसऱ्या दिवशी रात्री पुन्हा बैठक भरली. सारंगने फोन लावला.
“हॅलो, मी नागपूरवरून सारंग बोलतो आहे, रोहन साहेब आहेत का?” – सारंग.
“हॅलो, मी रोहनची आई बोलते आहे. रोहन आणि सौमित्र दोघेही आमच्या मोठ्या घरी गेले आहेत. नागपूरला जायचं की नाही यावरच चर्चा चालली असेल, तुम्ही तिकडेच फोन करा म्हणजे तुम्हाला पण कळेल.”
“थॅंक यू मॅडम” सारंग ने त्यांना धन्यवाद दिले आणि फोन ठेवला.
“मग आता व्यंकटेशला फोन लावावा लागेल असाच ना?” – प्रशांत.
“हो तेच करावं लागेल. पण मला हे समजत नाहीये, की यांना संपत्तीत अजिबात स्वारस्य नाहीये, मग इतकी गुंतागुंत का करताहेत? गंमतच आहे सगळी.” – सारंग.
“सरळ येऊन प्रॉपर्टीचा ताबा घ्यायचा आणि मोकळं व्हायचं. सारंग तुला या सगळ्या घडामोडीत गंमत का वाटतेय हेच मला समजत नाही.” – प्रशांत वैतागाने बोलला.
“गंमत नाही, परिस्थितीच अशी आहे की ते जे बोलताहेत त्या प्रमाणेच आपल्याला करावं लागणार आहे.” – सारंग.
बरं ते जाऊ दे, सारंग तू फोन लाव लगेच, उगाच वेळ घालवू नका. तिकडे जरी संध्याकाळ असली तरी इथे बरीच रात्र झाली आहे. अरे बॅलन्स शीट फायनल करतांना सुद्धा इतका जागत नाही मी. इथे काय, तर आपण लष्करच्या भाकऱ्या भाजतो आहोत. फोन लाव लवकर, म्हणजे काहीतरी निष्कर्ष आपल्याला काढता येईल. उगाच अधांतरी लोंबकळतो आहोत सध्या आपण. ही परिस्थिती तरी बदलेल. पुढची पावलं उचलायला मोकळे आपण.” – किरीटच्या बोलण्यातून वैताग स्पष्ट दिसत होता.
“यस बॉस” असं म्हणून सारंगने फोन लावला.
“हॅलो, मी सारंग बोलतो आहे, जय साहेब आहेत का?”
“हॅलो, मी जय बोलतो आहे. सारंग साहेब, तुम्ही जी सूचना केली होती, त्यावरच आम्ही आत्ता चर्चा करत होतो. जर मी आणि रोहन दोघंही नागपूरला आलो तर चालेल का?”
“नक्कीच चालेल. तुमचं नागपुरात स्वागत आहे. पैसे, किती आणि कसे पाठवायचे तेवढं, माझा ई मेल आयडी सांगतो, त्यावर कळवा.” सारंगने मग ई मेल आयडी सांगितला.
“त्याची काहीच जरूर नाही, अहो तुम्ही देत असलेले १० कोटी, आम्ही नाकारतो आहोत, त्यामुळे आमच्या जाण्या येण्याचा खर्च तुम्ही देण्याची काहीच आवश्यकता नाहीये. आमचे आम्ही येऊ. तिकीट आणि विसा झाला, की तुम्हाला तुमच्या मेल वर कळवू. ठीक आहे ना?” जय म्हणाला.
“ठीकच आहे. आम्ही खर्च दिला तरी ते तुमचेच पैसे आहेत. पण साधारण किती दिवस लागतील इथे यायला?” – सारंग.
“ते विसा मिळण्यावर आहे. पण मी उद्याच सुरवात करतो आणि तुम्हाला अपडेट तुमच्या मेल वर देत जाईन.” – जय.
“ठीक आहे तर मग. आम्ही वाट पाहतो आहोत तुमच्या येण्याची. ठेवतो आता.” सारंगने फोन ठेवला. सर्वांच्या चेहऱ्यावर एक समाधानाची छटा दिसत होती. निशांत ची जरा चुळबुळ सुरू होती, ती प्रशांतच्या लक्षात आली.
तो म्हणाला “काय रे निशांत, काय चाललं आहे तुझ्या मनात, सांगून टाक” निशांत चपापला. त्यांची अस्वस्थता प्रशांतच्या लक्षात आली होती.
“नाही तसं काही नाही पण मला असं वाटतं की जर या लोकांना महिना पंधरा दिवस लागले, तर मी माझ्या ऑफिस मधे जातो. तसंही बरेच दिवस ऑफिस पासून दूर राहिलो आहे.” निशांत म्हणाला.
“नाही, मुळीच नाही. तू ऑफिसला गेलास तर राव साहेब कुठलं तरी नवीन काम तुझ्या गळ्यात घालतील. तु इतरत्र कुठेही गुंतू नये आणि इतर कुठल्याही कामात अडकू नये, असं आम्हाला वाटतं. हवं तर मी राव साहेबांशी बोलतो, ते तुझा पगार कापणार नाहीत.” सारंगने निशांतची कल्पना मुळातूनच नाकारली. “मी काय म्हणतो निशांत, तू काही दिवस तुझ्या गावी का जात नाहीस, तसंही आई, वडिलांची भेट होऊन बरेच दिवस झाले असतील न?”
“ठीक आहे, तुम्ही एवढा आग्रहच करता आहात तर जातो मी गावी. नाही तरी मला थोडी सुट्टीची आवश्यकता आहेच. पण साहेब, जर गोकर्ण वरून फोन आला तर काय सांगू त्यांना?” निशांत म्हणाला.
“काही तरी सयुक्तिक कारण सांग आणि वेळ मारून ने. पण केंव्हा येणार त्याची पक्की तारीख सांगू नकोस. जय आणि रोहन इथे आल्यावरच ते ठरेल. ठीक आहे? पण काय रे, तू अमरावतीला जातो आहेस, त्यांना तुझा तो नंबर सांगीतला आहे का?” - सारंग.
“नाही, त्या बद्दल बोलणंच झालं नाही. आणि दुसरं म्हणजे अमरावतीला आमच्या घरी फोन नाहीये.” – निशांत.
“मग झालं तर.” – सारंग.
“पण साहेब, मी तर अमरावतीला असेन, मला कसे कळेल की, केंव्हा नागपूरला परतायचं ते? माझ्या कडे फोन नाहीये.” निशांतने आपली अडचण सांगितली.
“मी माणूस पाठवीन तुझ्या घरी. तू निश्चिंत रहा.” सारंग बोलला.
मीटिंग संपली आणि सगळे निश्चिंत मनाने घरी गेले.
निशांतने पडत्या फळांची आज्ञा घेतली आणि दुसऱ्या दिवशी तो अमरावतीला गेला.
त्या दिवशी सारंग सरांच्या ऑफिस मधे फारसं काही काम नव्हतं म्हणून सगळेच संध्याकाळी सहा वाजता मोकळे झाले. बबन, सारंगच्या ऑफिस मधला चपराशी, तो पण बाहेर पडला. बबन तसा दारू पिणाऱ्यातला नव्हता पण त्या दिवशी त्याला जरा तलफ आली. त्यांनी मित्राला जवळच्या PCO मधून त्याच्या ऑफिस मधे फोन केला.
तो पण म्हणाला की तो निघतोच आहे आणि पंधरा मिनिटांत पोचतो म्हणून. बबन मग चॅरियट बारच्या समोर मित्राची वाट बघत उभा राहिला. त्याचा मित्र आला, पण त्यांचे सर्व कपडे मातीने माखले होते, बबन ने ते पाहिलं आणि आश्चर्याने म्हणाला “अरे काय झालं? कुठे पडलास का? लागलं तर नाही?”
“नाही लागलं नाहीये, थोडा मुका मार आहे, पण त्याचं काही विशेष नाही, अरे एका स्कूटर वाल्या मुलीनी पाडलं. मुलगी असल्याने काही बोलता पण आलं नाही. लोकांना वाटलं की मीच तिला पाडलं पण त्या मुलीनीच सावरून घेतलं आणि लोकांना समजावलं, म्हणून वाचलो, नाहीतर पिटाईच झाली असती. मी आता कपडे बदलून येतो. ओके?” – मित्र.
“ओके” – बबन
बबन अजून थोडा वेळ बाहेर वाट पाहत थांबला, मग कंटाळून बार मधे शिरला आत मधे सर्व जण धूम्रपानामधे व्यस्त होते, सगळं वातावरण धूराने भरलं होतं. बबनने नजर फिरवली, एकच टेबल असं होतं की जिथे एकच माणूस बसला होता, बबन त्यांच्या समोर जाऊन बसला. तळलेले दाणे, भजी आणि ओल्ड मंक च्या क्वार्टर बॉटल ची ऑर्डर देऊन स्वस्थ बसला. बाहेर जाऊन विल्स च एक पाकीट आणि माचिस घेऊन आला. सिगरेट शिलगावली आणि मित्राची वाट पाहत बसला.
बबनने थोडा वेळ मित्राची वाट पाहिली, ओल्ड मंक ची बाटली त्याच्याकडे डोळे वाटारून बघत होती. शेवटी कंटाळून त्यांनी एकट्यानेच सुरवात केली. दोन पेग पोटात गेल्यावर, त्यांनी समोर पाहीलं, जो माणूस समोर बसला होता तो पण त्याच्या कडेच बघत होता, त्यांनीच बोलायला सुरवात केली. चार पेग पोटात गेल्यावर दोघे घनिष्ट मित्र बनले. राजकारण, नागपूरचे रस्ते, ऑफिस मधल्या मुली हे सगळे विषय चघळून झाल्यावर, बबन म्हणाला “ अरे आपण इतकं सगळं बोललो पण मला तुमचं नावंच माहीत नाही, माझं नाव बबन, तुमचं काय?”
“माझ नाव सुभाष गोखले.” तो माणूस उत्तरला.
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com