तोतया वारसदार
पात्र रचना
बबन सारंग सरांच्या ऑफिस मधला चपराशी.
सुभाष गोखले बबनचा बार मधे भेटलेला नवीन मित्र.
भाग २०
भाग १९ वरून पुढे वाचा....
कॉफी पिता पिता बबन म्हणाला “हे बघा गोखले साहेब, अशी दुर्मिळ संधी चालून आली आहे, हा नशीबाचाच भाग आहे, आयुष्यात एकदाच अशी संधी चालून येते. माझी अशी विनंती आहे की ती घालवू नका. विचार करा. तुम्हाला जी भीती वाटते आहे, तसं काही होणार नाहीये, अजून पर्यन्त कोणी वारसदार मिळालाच नाहीये, तुम्ही जर दावा पेश केला तर, तुम्हाला ही संपत्ती विनासायास मिळून जाईल.”
“अहो, पण मी कसं सिद्ध करणार की मीच वारसदार आहे म्हणून? आणि जर कोणी खरा वारसदार उभा राहिला तर?” गोखल्यांनी शंका काढली.
“खरा वारसदार जर कोणी उभा राहिला, तर संपत्ती जितके वारसदार आहेत, त्यांच्यामध्ये वाटली जाईल. विनायकरावांच्या मृत्युपत्रात तसं स्पष्टच लिहिलं आहे. तुम्ही वारसदार नाही हे ते लोकं कधीच सिद्ध करू शकणार नाहीत.” – बबन
“असं कसं? अहो ते वकील आहेत, आणि मुख्य म्हणजे, मी वारसदार आहे हे मी कसं सिद्ध करणार? मला पुरावे द्यावे लागतील, ते कुठून आणू मी?” गोखले आता द्विधा मनस्थितीत होते. त्यांनाही आता मिळणारी संपत्ती डोळ्यासमोर दिसायला लागली होती. नव्हे ती खुणावत होती. साहजिकच आता सुभाष गोखले त्याचाच विचार करत होते.
“पुरावे कसे गोळा करायचे ते मी तुम्हाला सांगेन. थोडे कष्ट तुम्हाला पण घ्यावे लागतील.” बबन म्हणाला. तो बघत होता की गोखले विचारात गढले आहेत.
“कसला विचार करता आहात तुम्ही, गोखले?” बबन म्हणाला.
“नाही बबनराव ही शुद्ध फसवणूक आहे. आज पर्यन्त मी कधी वाम मार्गाने पैसा मिळवला नाही, महापालिकेत असून सुद्धा साधे पांच रुपये पण मी कधी खाल्ले नाही.. हे असलं काही करणं मला झेपेल असं वाटत नाही. तुम्ही पण याचा फारसा विचार करू नका. ही वाट सरळ जेल मधे जाते. येतो मी.” – सभाष.
बबन जरा खट्टू झाला. पण त्यानी याचा विचार केला होता. सभाष गोखले तसा साधा माणूस होता. इतक्या सहजा सहजी तो हो म्हणणार नाही, याची कल्पना होती बबनला. तो म्हणाला,
“सुभाषराव, इतक्या घाई घाईने निष्कर्षाला येऊ नका. प्रश्न कोट्यावधी रूपयांचा आहे, मला माहीत आहे की तुम्ही नेक इंसान आहात, पण जरा विचार करा. आपण वाटल्यास परवा पुन्हा भेटू.” – बबन.
“बबनराव, यात विचार करण्या सारखं काय आहे? हे बघा जे काही तुम्ही करायला सांगता आहात तो चक्क गुन्हा आहे. नाही, मला जमणार नाही.” – सुभाष.
“ठीक आहे. पण परवा भेटायला काय हरकत आहे? दोन दिवस तुम्ही पूर्ण विचार करा. मग परवा तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो मला मान्य असेल. मी माझी योजना गुंडाळून टाकीन. पण परवा इथेच भेटू. नाही म्हणू नका. प्लीज.” बबन.
“ठीक आहे. भेटू परवा, पण माझा निर्णय बदलणार नाही. बरं येतो मी.” – सुभाष.
दोन दिवसांनी बबन आणि सुभाष कॉफी हाऊस मधे भेटले. बबन आज तयारीने आला होता. तो निरनिराळ्या तऱ्हेने या कामात धोका कसा अगदी कमी, म्हणजे जवळ जवळ नाहीच हे पटवून देत होता. तो म्हणाला,
“तुम्ही अजिबात घाबरू नका. मी आहे ना, मी सांभाळून घेईन.”
“अहो पण आपल्या हातून एखादी अनवधानाने झालेली चूक सुद्धा आपलं आयुष्य नासवून टाकू शकते. याचा विचार करा न. आपलं, आणि आपल्या मुलांचं भविष्य पूर्णपणे काळवंडून जाईल. आता सुखा समाधानात जगतो आहोत, ते काय वाईट आहे? आपल्याला जेल झाली तर, आपली बायका मुलं उघड्यावर पडतील ” – सुभाष.
“सुभाषराव एक गोष्ट तुमच्या अजून लक्षात आलेली दिसत नाहीये. ती म्हणजे वंशावळी प्रमाणे सर्व वारसदार शोधायचे आहेत. या शोधकार्याला मृत्यूपत्रातच ५ वर्षांचा कालावधी दिला आहे. आपल्याला मुळीच घाई नाही आहे. आपण काय करू, शांतपणे विचार करून एक आराखडा बनवू. सर्व साधक बाधक विचार करून तो फूल प्रूफ बनवू. आणि जेंव्हा योग्य वेळ आहे असं वाटेल तेंव्हाच आपला क्लेम समोर ठेऊ. जर १ टक्का सुद्धा धाकधूक वाटली, तर प्लॅन कॅन्सल. काय म्हणता?” – बबन मुद्दा सोडायला तयार नव्हता.
“पण बबनराव ज्या रस्त्याला जायचंच नाही, त्याचा विचार तरी कशाला करायचा? बरं समजा आपण आराखडा बनवला, तर त्याचं करायचं काय? माझं मन काही हे काम करायला तयार होत नाहीये. तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला प्लॅनिंग मधे मदत करायला मी तयार आहे. पण प्लॅन झाल्यावर मी बाहेर पडणार. माझा फक्त प्लॅन तयार करण्या पुरताच सहभाग राहणार आहे.” – सुभाष.
“ओके. ते आपण नंतर बघू. तुम्ही योजना बनवायला मदत करायला तयारी दर्शवली, यातच मला आनंद आहे. फक्त हे कोणाजवळ बोलू नका म्हणजे झालं. नाहीतर गर्भावस्थेतच मला योजना गुंडाळावी लागेल.” – बबन.
“तुम्ही निश्चिंत रहा. मी कोणाजवळही बोलणार नाही.” – सुभाष.
त्या नंतर दोघांच्या प्लॅन च्या निमित्ताने भेटी गाठी होत राहिल्या. हळू हळू प्लॅन कसा असावा याबद्दल चर्चा सुरू झाली. बबन आपले म्हणणे सुभाष वर बिंबवण्याचा सतत प्रयत्न करत होता. त्यांच्या प्रयत्नांना यश येण्याची शक्यता निर्माण झाली होती. सुभाषचं मन आता बदलायला लागलं होतं एक दिवस असेच दोघं जण बार मधे बसले असतांना, सुभाष जरा गप्पच होता, पण दोन पेग पोटात गेल्यावर बोलायला लागला. बबन म्हणाला, “सुभाष तुझ्या मनात काहीतरी खळबळ चाललेली आहे, काय आहे ते बोलून टाक” त्यावर सुभाषने ग्लास मधली उरलेली दारू संपवली आणि म्हणाला,
“जर हे पैसे मिळाले, तर माझ्या सामाजिक कार्याला चांगला वेग येईल. अधिक चांगल्या रीतीने मी लोकांची सेवा करू शकेन, असं तू म्हणाला होतास, ते मला आता पटतंय. या संपत्तीचा मला मोह नाही पण लोक कल्याणाच्या दृष्टीने याचा चांगला उपयोग होऊ शकेल. इतर कोणाला स्वार्था साठी ही संपत्ती लुबाडू देण्या पेक्षा मी घेतली तर सत्कारणी तरी लागेल.” गोखले म्हणाले.
बबनला गोखल्यांचा हा विचार काही फारसा आवडला नाही, पण त्यानी विचार केला की ते त्यांच्या वाटणीच्या पैशांचं काही का कारेनात, आपल्याला आपला वाटा मिळण्याशी मतलब. मग बबन गोखल्यांना म्हणाला “तू या कामात, सामील न होण्याचा निर्णय बदलला, ही तर फार आनंदाची गोष्ट आहे. मग ठरलं तर. आता तु असं कर, हे काही कागद आहेत, यात वंशावळी आणि इतिहास आहे. याचा नीट पुन्हा पुन्हा चांगला अभ्यास कर. सगळं मेंदूत साठवून ठेव. आपण पुन्हा भेटू, तेंव्हा आणखी सविस्तर बोलू. मी तुझ्या ज्या काही शंका असतील त्या सोडवीन. मग तु कामाला सुरवात कर. माझा ऑफिस चा फोन नंबर तुझ्या जवळ आहेच, मी जर ऑफिस मधे नसलो, तर इतर कोणाशीही या बाबतीत बोलू नकोस. किंवा आपण असं करू परवा इथेच, याच वेळेस भेटू. चालेल?”,
“हेच बरं पडेल. परवा याच वेळी भेटू.” – गोखले.
“अजून एक गोष्ट आत्ता पासून दारूचा एकही थेंब घ्यायचा नाही. चुकून कुठे बरळलास तर सरळ जेल. हे लक्षात ठेव. आत्ता जो घेतला, तो शेवटचा थेंब.” बबनने गोखल्यांना वॉर्निंग दिली. गोखल्यांनी हसून मान डोलावली. “नो लिकर” असं म्हणाले आणि चालू पडले.
तिसऱ्या दिवशी गोखल्यांचा बबनला फोन आला.
“काय झालं आज जमत नाहीये का ?” बबनने विचारलं.
“आज माझी बायको दोन दिवसांसाठी माहेरी गेली आहे. मी एकटाच घरी आहे, माझ्या घरीच या, निवांत पणे बोलता येईल.” – गोखले.
“ठीक आहे, मी रात्री साडे आठ वाजे पर्यन्त येतो जेवूनच येईन म्हणजे वेळ वाया जाणार नाही.” – बबन.
“ठीक आहे, मी वाट पाहतो.” -गोखले.
त्या दिवशी बबन गोखल्यांच्याकडे रात्रभर होता. जबरदस्त खलबतं झाली रात्रभर, आणि योजना पण तयार झाली. आता गोखल्यांचं काम सुरू होणार होतं. बबन ने त्यांना शुभेच्छा दिल्या आणि तो निघाला तेंव्हा सकाळचे सहा वाजले होते.
असेच दिवस जात होते, बबन आणि गोखल्यांच्या भेटी गाठी वाढत चालल्या होत्या. एक सर्वार्थाने परिपूर्ण असा प्लॅन तयार झाला होता. आता त्या प्लॅन वर अंमल करण्याची वेळ आली होती. त्या दृष्टीने तयारी पण चालू झाली होती.
बबन आणि सुभाष गोखल्यांचं कारस्थान चालू असतांनाच सारंग वकिलांना इंग्लंड वरून मेल आला की त्यांना विसा मिळाला आहे आणि गुरुवारी दुपारपर्यंत ते नागपूरला पोचतील. सारंग विचार करत होता की आज सोमवार आहे, ड्रायव्हरला बोलावलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच अमरावतीला जाऊन, निशांतला आणायला सांगितलं.
सारंग वकिल फोन वरून प्रशांत सरांना ही बातमी देतांना, बबनने ऐकलं. त्याच्या पोटात गोळाच उठला. त्यानी याची कल्पनाच केली नव्हती. हे कधी ठरलं?, त्याला कळेचना. त्याची अशी समजूत होती की इंग्लंड शी संपर्क प्रस्थापित झालाच नाही, आणि असंच त्यानी सुभाषला सांगितलं होतं. आता ताबडतोब त्याला अपडेट दिलं पाहिजे असं वाटून तो ऑफिस च्या बाहेर पडला. PCO वर जाऊन त्यानी सुभाषला फोन केला.
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com