तोतया वारसदार
पात्र रचना
व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं.
रोहन - सौमित्रचा मुलगा
लक्ष्मण आणि वर्षा - महादेवराव – विश्वनाथ – श्रीपति -सहावी पिढी.
गोकर्णला स्थायिक.
विश्राम आणि अनिल - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -सहावी पिढी.
साताऱ्याला स्थायिक.
भाग २४
भाग २३ वरून पुढे वाचा....
रात्री जेवण झाल्यावर बराच वेळ गप्पा चालू होत्या. निशांतने आतापर्यन्त काय काय घडामोडी झाल्या त्याचं वर्णन केलं. अविनाशची कहाणी सांगतांना तो खूपच भावुक झाला होता. इतरांना पण त्या गोष्टीने भरून आलं होतं. निशांतने हे पण सांगीतलं की गोष्ट बाहेर कुठेही बोलायची नाहीये, कारण अविनाशच्या जीवाला धोका होऊ शकतो.
रात्र बरीच झाली होती, काकूंनी आणि लक्ष्मणरावांनी राहून जा म्हणून खूप आग्रह केला, पण कपडे नाहीत ही सबब सांगून आणि उद्या बॅग घेऊनच येतो. असं सांगून रात्री उशिरा ही दोघं मुर्डेश्वरला परतले. निशांतचा पाय निघत नव्हता पण उपाय नव्हता.
“निशांत, काय चाललंय? माझ्या लक्षात आलंय.” रोहन परतीच्या प्रवासात निशांतला म्हणाला.
“काय? कुठे काय चाललंय?” – निशांत. रोहन नुसताच हसला. तो विषय तिथेच संपला.
दुसऱ्या दिवशी निशांत गोकर्णला जायचं म्हणून लवकर उठून आंघोळ वगैरे करून तयार होऊन बसला. रात्री पण त्याला बराच वेळ झोप लागली नव्हती. वर्षाचा चेहरा काही त्यांच्या डोळ्या समोरून हलत नव्हता. रोहन मात्र गाढ झोपला होता. त्याला अर्थातच कोणाला भेटायची घाई नव्हती. शेवटी साडे नऊ वाजता निशांतने त्याला उठवलंच. तो सगळं आटोपून तयार होई पर्यन्त नाश्ता संपला होता. मग फंक्त चहा पिऊन ते गोकर्णला निघाले.
ते लक्ष्मण रावांच्या घरी पोचले तेंव्हा १२ वाजून गेले होते आणि लक्ष्मणराव नेहमी प्रमाणे मंदिरात गेले होते. काकू सकाळच्या स्वयंपाकात गुंतल्या होत्या आणि वर्षा त्यांना मदत करत होती. रोहनने बाहेरूनच आवाज दिला, “काकू काही सटर फटर आहे का? सकाळी नाश्ता झालेला नाहीये. वर्षा बाहेर आली आणि म्हणाली, “पोहे केले आहेत, ५ मिनिटांत गरम करून आणते.” ती दिसल्यावर निशांतचा चेहरा लगेच फुलला. रोहनने त्याला कोपरखळी दिली. निशांत एकदम गोरा मोरा झाला. चोरी पकडल्या गेली होती. खाणं पिणं झाल्यावर वर्षा म्हणाली “चला मी तुम्हाला आमची बाग आणि गोठा दाखवते.” निशांत लगेच उठला, पण रोहनला इंट्रेस्ट नव्हता म्हणून तो म्हणाला की मी जरा इथला पेपर वाचतो, तुम्ही जाऊन या.
निशांत आणि वर्षा संधीचा फायदा घेऊन बराच वेळ रेंगाळत होते. दोघां मधले बंध हळू हळू घट्ट होत होते. बागेत प्रसन्न वातावरण होतं. दोघांनाही खूप बोलायचं होतं पण संकोच होता, आणि कुठून सुरवात करायची ते कळत नव्हतं. शेवटी निशांतनेच बोलायला सुरवात केली.
“वर्षाजी, काय करता तुम्ही?” – निशांत.
“बी. कॉम. झालं आहे.” – वर्षा.
“अरे वा. कॉमर्स ही चांगली शाखा आहे.
“माझ्या नावाला जी जोडू नका. मी लहान आहे तुमच्या पेक्षा.” – वर्षा.
बागेतली फुलं पानं, त्यांची तारीफ करतांना संभाषण छान चालू होतं पण निशांतने संभाषणाची दिशा वळवण्याचा प्रयत्न केल्यावर संवादाला खीळ बसली. चार वाक्य बोलून झाल्यावर दोघेही गप्प झाले. न बोलता फेर फटका चालू होता.
“मी M.Sc केलं आहे. माझा कॉमर्सशी काही संबंध नाही, पण आमचा व्यवसायच असा आहे की आम्हाला प्रत्येक विषयांचं थोडं थोडं ज्ञान आवश्यक असतं. माहिती साठी म्हणून विचारतो, काय काय विषय असतात तुम्हाला?” – निशांत.
“काही विशेष नाही, एकोनिमिक्स आणि अकाऊंटिंग चे विषय असतात.” – वर्षा.
“कानडी मधे बॅलेन्सशीट ला काय म्हणतात?” – उगाच काहीतरी बोलून संभाषण चालू ठेवण्या साठी, निशांत ने विचारले.
“माहीत नाही, माझं शिक्षण इंग्लीश मधून झालं.” – वर्षा.
हळू हळू गप्पा रंगत होत्या, पण तेवढ्यात, वर्षांच्या आईने तिला हाक मारली आणि स्वयंपाकघरात आईला मदत करायला निघून गेली आणि निशांत हॉल मधे येऊन रोहनच्या शेजारी बसला.
“काय निशांत, काय प्रगती?” रोहनने मिस्किल स्वरात विचारलं.
“कसली प्रगती?” निशांत आता अवघडला होता. तो काहीच बोलला नाही. रोहन आता गालातल्या गालात हसत होता.
“काय यार, काय चालू आहे तुझं?” – निशांत.
“जाने दो यार, आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं.” - रोहन
निशांतने त्याच्याकडे पाहिलं. आणि मग दिलखुलास हसला.
दोन वाजता लक्ष्मणराव मंदिरातून आले. जेवणं झाल्यावर थोडी विश्रांती घेऊन झाल्यावर मग बैठक भरली.
“मग लक्ष्मण राव काय ठरतंय तुमचं?, केला का काही विचार?” रोहननी विचारलं.
“आता काय ठरवायचं राहिलंय? कालच सांगितलं तुम्हाला. मला नकोय ती इस्टेट.” लक्ष्मणरावांनी ठामपणे सांगितलं.
रोहननी एक सुस्कारा सोडला. “वर्षा तुझं काय मत आहे? तुला चालेल का ती इस्टेट?”
“दादा,” वर्षा रोहनला म्हणाली. अवघ्या दोन दिवसांत रोहन आणि निशांत त्या कुटुंबात अगदी दुधातल्या साखरे सारखे विरघळून गेले होते. “माझा काय संबंध? मुलगी म्हणजे परक्याचं धन असतं बाबा, तिला इस्टेट देऊन काय करणार?”
“चल, हुंडा समज.” – रोहन.
“अरे, गंमत केली, मला पैसा नको, तुम्हा भावांचं प्रेम हवं. जय पण आला असता तर किती बरं झालं असतं.” वर्षा म्हणाली.
“चल माझ्या बरोबर इंग्लंडला. बाबा आणि काका दोघांनाही खूप आनंद होईल. आई आणि काकू तर तुझ्या प्रेमातच पडतील. त्या दोघींना पण मुलीची हौस होती, पण आम्ही त्यांची निराशा केली.” रोहन म्हणाला.
हे प्रेमाचं संभाषण अजून चाललं असतं पण लक्ष्मण मध्येच बोलला. “मला तुम्हाला काही सांगायचं आहे. माझ्याकडे जी माहिती आहे, त्याप्रमाणे, आमचे खापर पणजोबा, विश्वनाथ, जे प्रथम गोकर्णला आले, त्यांच्या बद्दल तुम्हाला माहितीच आहे. त्यांना तीन अपत्य होती. एक माझे पणजोबा श्रीपति, दुसरे ओंकार, आणि तिसरी मुलगी कावेरी. ओंकार आजोबांना भिक्षुकी मधे स्वारस्य नव्हतं म्हणून ते साताऱ्याला गेले. एका सराफा कडे काम करता करता, कालांतराने त्यांनी स्वत:ची सराफाची पेढी उघडली. काही वर्षांपूर्वी मी काही कामा निमित्त साताऱ्याला गेलो होतो तेंव्हा गोखले सराफ ही पाटी बघून त्यांच्याच दुकानात गेलो, बोलता बोलता, एकमेकांची माहिती कळली आणि नातंही, चांगलं मोठं दुकान आहे त्यांचं आणि आत्ता ते दुकान त्यांचे वंशज अनिल आणि विश्राम असे दोघं बंधु सांभाळतात. दोघेही सख्खे नाहीयेत, पण त्यांचा आपसातला ताळमेळ जबरदस्त आहे. त्यामुळे व्यवसाय भरभराटीला आला आहे. तर, सांगण्याचा मुद्दा असा की आपण त्यांच्या कडे जायचं का? कदाचित तुमचा प्रश्न सुटेल. कावेरी बाईंच्या बद्दल काही कळलं नाही. त्यांनाही काहीच कल्पना नव्हती.”
सगळे विचारात पडले. लक्ष्मणरावांनी एक नवीनच माहिती दिली होती जिच्या बद्दल रोहन आणि निशांत आत्ता पर्यन्त पूर्णपणे अनभिज्ञ होते. नागपुरच्या लोकांचा प्रश्नच नव्हता, त्यांनाही या नात्याची अजिबात कल्पना नव्हती. “निशांत, काय म्हणतोस? जाऊया साताऱ्याला? तसंही आपल्याला सांगलीला जायचंच आहे.” रोहनने विचारले.
“नक्कीच जायला पाहिजे. आता त्यांची माहिती कळली आहे तर त्यांच्याशी संपर्क केलाच पाहिजे. मृत्यूपत्रातली अटच आहे तशी. पण जर सराफीचं खूप मोठं दुकान आहे असं लक्ष्मणराव म्हणत आहेत, तर त्यांनाही या संपत्तीचं काय कौतुक असेल हा एक प्रश्नच आहे.”-निशांत
“त्यांचा धंदा तर मोठा आहेच. दुकानावरूनच त्याची कल्पना येते. लाखोंची उलाढाल आहे त्यांची, पण सोन्याचा आणि हीऱ्यांचा व्यवहार असल्याने खेळतं भांडवल सुद्धा जबरदस्त लागत असेल. कदाचित हा पैसा त्यांच्या धंद्याच्या वाढीला उपयुक्त ठरू शकतो. म्हणजे, असं मला वाटतं.” लक्ष्मण राव म्हणाले.
“मला असं वाटतं की लक्ष्मण बरोबर बोलतोय.” काकू म्हणाल्या.
रोहन आणि निशांतनी मान डोलावली. “केंव्हा निघायचं? लक्ष्मणराव, तुम्हाला केंव्हा जमू शकेल?” निशांत बोलला. आता त्याच्यातला शोधकर्ता जागा झाला होता.
“मी कशाला यायला पाहिजे? तुम्ही दोघं आहात की, माझी काय जरूर आहे? जसे इथे आलात, तसेच तिथे जा” – लक्ष्मण.
“लक्ष्मणा, मी काय म्हणते,” काकूंनी आपलं मत नोंदवलं. “अरे ते आपले नातेवाईक आहेत. इतके वर्ष आपल्याला माहीतच नव्हतं, पण आता कळलं आहे, तर आम्ही पण येतो, तेवढीच ओळख होईल. शेवटी आपली माणसं ती आपलीच माणसं. रक्ताचं नातं आहे. रोहनचंच बघ, इथे आला, किती बरं वाटलं. पुन्हा भेट होईल, ना होईल पण ओळख तर राहिलंच न, आनंद तर झालाच न?”
निशांत लगेच म्हणाला “करेक्ट आहे, काकू, तुम्ही एकदम बरोबर मुद्दा उचलला. आणि खरं सांगायचं तर, तुम्ही बरोबर आल्याने आमचं काम पण सोपं होईल. लक्ष्मणरावांशी जशी प्रश्नोत्तरं करावी लागली, तशी जरूर पडणार नाही.” लक्ष्मणरावांनी थोडा विचार केला, मग म्हणाले “ठीक आहे, तुम्ही म्हणता त्यात तथ्य दिसतं आहे. मी जोगळेकर गुरुजींशी आणि घैसास गुरुजींशी बोलतो ते जर माझी कामं करणार असतील तर जाऊ आपण.”
“न करायला काय झालं?” काकू बोलल्या. “एरवी तर तुम्ही एकमेकांची कामं करताच. मग या वेळेस काय अडचण आहे?”
“मी बोलतो त्यांच्याशी, त्यांच्या कडे किती कामाचं लोड आहे ते पण बघावं लागेल. आलोच मी.” असं म्हणून लक्ष्मणराव बाहेर पडले.
तासाभराने लक्ष्मणराव परत आले. म्हणाले, “दोघांनीही तयारी दर्शवली आहे. आता आपण जायला मोकळे.”
“दादा, तुमच्या कडे त्यांचा फोन नंबर आहे का?, असेल तर आपण सगळे येतो आहोत, अशी त्यांना कल्पना द्यायला पाहिजे.” रोहन म्हणाला.
“काय सांगणार त्यांना? इस्टेट हवी आहे का, असं विचारायला आलो म्हणून?”- लक्ष्मण
“अरे नाही, त्यांना सांग आम्ही सर्व साताऱ्याला काही कामानिमित्त येतो आहोत, तुम्हाला भेटायची आमची इच्छा आहे. त्यांना केंव्हा वेळ आहे, आणि त्यांच्या घराचा पत्ता विचारून घे.” काकू म्हणाल्या.
“ठीक आहे, असंच करतो.” – लक्ष्मण म्हणाला आणि त्यांनी फोन लावला. थोडा वेळ बोलणं झाल्यावर त्यांनी फोन ठेवला तेंव्हा खुश दिसत होता.
क्रमश:..
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com