तोतया वारसदार
पात्र रचना
व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं.
रोहन - सौमित्रचा मुलगा
लक्ष्मण आणि वर्षा - महादेवराव – विश्वनाथ – श्रीपति -सहावी पिढी.
गोकर्णला स्थायिक.
विश्राम आणि अनिल - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -सहावी पिढी.
साताऱ्याला स्थायिक.
सुधा - विश्रामची बायको.
दिनेश आणि प्रांजल -विश्रामची मुलं.
मालती - अनिलची बायको.
विनय - अनिलचा मुलगा
भाग २६
भाग २५ वरून पुढे वाचा....
“लक्ष्मण पण हसला. तो म्हणाला “काय निशांत, शिष्य शिरजोर झालेला दिसतोय.”
निशांत पण हसला, म्हणाला “लक्ष्मणराव तमची बहीण खूप हुशार आहे. तिने B. Com केलंय, आता तिला चार्टर्ड अकाऊंटंट बनवा. खूप नाव काढेल.”
“अहो, काही तरीच काय? CA व्हायचं, तर किती जाड जाड पुस्तकं वाचावी लागतात. आणि कितीही अभ्यास केला तरी, माझी मैत्रीण करत होती, ती ४ वेळा नापास झाली, शेवटी तिने कंटाळून सोडून दिलं. नको रे बाबा इतकी चिकाटी नाहीये माझ्यात.” -वर्षा.
“तुझ्या कॉलेज बद्दल सांग ना काही.” निशांत.
“आधी तुम्ही सांगा, मग मी सांगेन.” वर्षाने भुवया उडवत म्हंटलं. तिच्या चेहऱ्यावरचे विभ्रम पाहतांना निशांत खुळावला.
“आम्ही अमरावतीचे त्यामुळे माझं सर्व शिक्षण अमरावतीलाच झालं. शाळा सायन्स कोर आणि कॉलेज विदर्भ महा विद्यालय. VMV. तिथूनच मी M.Sc केलं. झालं, मग नोकरीला लागलो नागपूरला.” – निशांत.
“कोणच्या विषयात केलं M.Sc?” वर्षा.
“फिज़िक्स मधे.” – निशांत.
“मग एकदम इतक्या वेगळ्या प्रकारच्या नोकरी मधे कसे काय शिरलात?” – वर्षा.
“ती एक गंमतच आहे. एकदा मी अमरावती वरून नागपूरला येत होतो, एका कंपनीत इंटरव्ह्यु होता म्हणून. बस मधे शेजारी एक तेलगु गृहस्थ बसला होता, त्यांच्याशी गप्पा मारत होतो. नागपूर येता येता त्यांनी मला सांगीतलं की “तू छान डिटेक्टिव होशील, तुझ्यात ती क्षमता अगदी ठासून भरली आहे. माझ्या कंपनीत ये. मी तुला १५००० रपये पगार देईन.” मी एवढ्या पगाराची अपेक्षाच केली नव्हती. मी हो म्हंटलं आणि आज पण तिथेच आहे.” – निशांत.
पूर्ण प्रवास भर वर्षा आणि निशांत अखंड बोलत होते. दोघांचीही भीड आता चेपली होती. संकोचाचा पडदा हटला होता. आणि दोघेही अगदी समरस होऊन बोलत होते. किती बोलू आणि किती नाही असं झालं होतं त्यांना. त्यांचं इतरांकडे लक्ष नव्हतं पण बाकीच्या लोकांनी जे ताडायचं ते ताडलं होतं. लक्ष्मण थोडा नाराज होता, पण त्या दोघांच्या बोलण्यात काहीही वावगं दिसत नसल्यामुळे तो काही बोलला नाही. ती दोघंही एकमेकांत गुंतत चालली आहेत हे स्पष्ट दिसत होतं. तसा निशांत, त्याला पण आवडला होता, वर्षा आणि निशांतची जोडी अनुरूप होती, पण त्याच्या बद्दल काहीच माहिती नसल्याने तो जरा अस्वस्थ होता. थोडा मोकळेपणा मिळाल्यावर त्याची माहिती काढायचं त्याने ठरवलं.
साताऱ्याला मंडळी पोचली तेंव्हा संध्याकाळचे साडे सात वाजले होते. दिवसभरच्या प्रवासाने सगळ्यांचेच अंग अवघडूनच गेले होते. हॉटेल वर पोचल्यावर सर्वांनीच आंघोळी केल्या, मग चहा कॉफी झाल्यावर सर्व गोखल्यांच्या कडे जाण्याच्या तयारीला लागले.
विश्राम गोखले सराफांच्या घरी ही मंडळी पोचली तेंव्हा पावणे नऊ वाजले होते. मंडळी मुद्दामच १५ मिनिटं उशिरा गेली. त्यांना वेळ मिळावा म्हणून.
“या, या.” विश्रामने त्यांचं स्वागत केलं. सर्व जण बसल्यावर लक्ष्मणने ओळख करून दिली. मग विश्राम म्हणाला “ ही माझी बायको, सुधा, ही मुलगी प्रांजल ही इंजीनीरिंग च्या दुसऱ्या वर्षाला आहे. हा मुलगा दिनेश. हा इंजीनियर झाला आहे, पण आमच्याच दुकानात काम करतो. माझा पार्टनर अनिल, त्याला पण मी सांगितलं आहे, तो पण येईलच एवढ्यात. अनिल म्हणजे माझा लांबचा चुलत भाऊ.”
“म्हणजे माझा काका झाला की. ” लक्ष्मण म्हणाला.
“अरे हो, माझ्या लक्षातच आलं नाही.” – विश्राम.
“आता सगळ्यांना मी आमची ओळख करून देतो. मी लक्ष्मण, मला तुम्ही ओळखताच. आपले खापर पणजोबा विश्वनाथ यांना दोन मुलं. श्रीपति आणि ओंकार. श्रीपति पासून आमची पांचवी पिढी. तुमचा वंश ओंकार पासून. ही माझी आई वसुधा. आणि ही वर्षा माझी बहीण. हा रोहन विनायकराव गोखल्यांचा नातू. सध्या इंग्लंडला असतो. हा निशांत, हा शोधकर्ता आहे.” – लक्ष्मणने परिचय करून दिला.
थोडं अवांतर बोलणं होत होतं तेवढ्यात अनिल, त्यांची बायको मालती आणि त्याचा मुलगा विनय हे लोकं आले. मग पुन्हा एकदा परिचयाचा कार्यक्रम झाल्यावर सगळे निवांत झाले.
मग विश्राम म्हणाला “निशांत आणि रोहन काही खास कामासाठी इथे आपल्याला भेटायला आले आहेत. लक्ष्मण त्यांना घेऊन आला आहे. नेमकं काय काम आहे, हे मलाही माहीत नाहीये, पण त्याबद्दल आपण जेवण झाल्यावर निवांत बोलू”
“सर्वांनाच रोहन बद्दल औत्सुक्य होतं, त्यामुळे बराच वेळ रोहनच बोलत होता. मग सगळे जेवणासाठी उठले. हसत खेळत जेवणं झाल्यावर, समोरच्या हॉल मधे सगळे येऊन बसले, मग लक्ष्मणने निशांतला खूण केली. ती आज्ञा घेऊन निशांतने बोलायला सुरवात केली. विनायकरावांची डायरी त्यांनी विश्रामच्या हातात दिली आणि सर्वांना कळेल अश्या आवाजात वाचायला सांगितले.
“काय आहे हे?” विश्रामने विचारले.
“तुम्ही वाचा तर खरं, सगळं आपोआप लक्षात येईल. मोठ्यानेच वाचा म्हणजे सर्वांनाच कळेल.” – निशांत.
विश्रामने फोल्डर उघडून बघितलं, थोडी पानं चाळल्यावर तो निशांतला म्हणाला की “निशांत, तूच वाच. तुला सगळी कथा माहीत आहे त्यामुळे तुला वाचणं सोप आहे आणि मधून मधून आम्हाला काही समजलं नाही तर तुला विचारता पण येईल. तुला आत्ता पर्यन्त तर पाठ झालं असेल.” विश्राम महाणाला.
“ओके वाचतो मी. पण तुम्ही सर्व जण लक्षपूर्वक ऐका.” – निशांत.
सर्व वाचन पूर्ण झाल्यावर थोडा वेळ शांतता पसरली. विश्राम खुर्चीच्या हातावर बोटाने टक टक असा आवाज करत होता, ती शांतता बघून सुधा, विश्रामची बायको आपल्या मुलीला म्हणाली “प्रांजल सगळ्यांसाठी जरा कॉफी करून आणतेस का?” प्रांजल लगेच उठली.१० मिनिटांनी कॉफी घेऊन आली. कॉफीपान पण शांत पणे पार पडलं.
“निशांत, तू आम्हाला ही डायरी वाचायला दिलीस, याचा अर्थ तुम्ही वारसदारांच्या शोधात इथपर्यंत येऊन पोचलात असा काढायचा काय? – विश्राम.
“हो, म्हणजे तसंच.” – निशांत.
“याच्यात तुझी भूमिका काय? तू तर गोखले नाहीस.” - विश्राम
“सारंग वकील, डॉक्टर प्रशांत आणि C.A. किरीट यांना विनायकरावांनी मालमत्तेचे विश्वस्त नेमले होते. त्यांच्या मृत्युपत्रात लिहिल्या प्रमाणे वारसदारांचा शोध घेण्याची जबाबदारी सारंग वकिलांनी आपल्या अंगावर घेतली आहे. आमची कंपनी “दक्षता” ही डिटेक्टिव एजन्सी आहे. आम्ही अश्या प्रकारची बरीच काम यशस्वी रित्या पार पाडली असल्याने, सारंग सरांनी ही कामगिरी आमच्यावर वर सोपवली, आणि कंपनीने, या कामावर मला नेमलं आहे.” निशांत म्हणाला, “आणि या कामात आतापर्यंत कशी आणि किती प्रगती झाली आहे, ते या डायरीत लिहिलं आहे. ही डायरी माझी आहे. मी सर्व नोटिंग करून ठेवलं आहे. हे घ्या. वाचा.” निशांतने आपली डायरी त्यांच्या हातात सोपवली.
विश्रामने ती पण डायरी वाचली. त्याला धड काही कळेच ना. थोडा वेळ शांतच राहिला. मग अनिलच म्हणाला “हे काय? कोणालाच एवढी मोठी इस्टेट नको आहे? आश्चर्य आहे.”
“आता निर्णय घेण्याची तुमची पाळी आहे.” निशांत म्हणाला. “काय विश्राम काका आणि अनिल काका, काय म्हणता तुम्ही?”
“हे पहा, ही संपत्ती कमावण्या साठी विनायकानी बरेच कष्ट घेतले असणार, आणि त्या कष्टात माझा एक टक्का सुद्धा सहभाग नाहीये, मग मी ही कशी स्वीकारू शकतो? आम्ही निस्वार्थ बुद्धीने सेवा कार्यात असणार्या बऱ्याच संस्थांना देणग्या देतो. मी दान देणारा आहे, घेणारा नाही. नाही, मला नको आहे. अनिल, तू तुझा निर्णय घे, माझी काही हरकत नाही.” विश्रामने रोख ठोक बोलत प्रस्ताव नाकारला.
“दादा, अरे तू योग्य तेच बोललास. माझाही निर्णय तोच आहे. कष्टाचाच पैसा खरा. हीच शिकवण आपल्याला मिळाली आहे, आणि आपण मुलांनाही तेच शिकवलं आहे. फुकट काहीही नको. काय विनय, दिनेश, प्रांजल तुम्हाला पटतंय का? तुमचा निर्णय तुम्ही घ्या. तुम्हीच आता कर्ते सवरते आहात.
“बाबा, आम्ही तुमच्या कडूनच शिकलो आहोत, आपल्याला काय कमी आहे? आम्हाला पण तसेच वाटते. तुम्ही घेतलेला निर्णय योग्यच आहे.” – विनय आणि दिनेश. प्रांजलने पण मान डोलावून सहमति दर्शवली.
“खरं म्हणजे ह्या संपत्ती वर जय आणि रोहनचाच अधिकार आहे. त्यांना डावलून, आम्हाला तुम्ही विचारता आहात हेच मुळात चूक आहे.” अनिल बोलला.
“काका असं नाहीये, जेंव्हा आम्हाला हे काम करायला सांगितल्या गेलं, तेंव्हा कोणी भेटतील अशी सुतराम शक्यता दिसत नव्हती. फक्त विनायकरावांची शेवटची इच्छा होती, आणि त्या इच्छेला मान द्यायचा म्हणून हा सगळा कार्यक्रम राबवल्या गेला. सारंग वकिल, डॉक्टर प्रशांत आणि किरीट सर विनायकरावांना वडीलांच्या स्थानी मानत होते. त्यामुळेच आम्हाला सारंग सरांनी सांगीतलं की पैसा कितीही खर्च होऊ द्या पण कसून प्रयत्न करा. या प्रयत्नांना नशीबानेच फळ तर मिळालं, पण तुम्हा लोकांच्या निर्णयामुळे विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. हे खरं.” निशांतने स्पष्टीकरण दिलं.
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com