तोतया वारसदार
पात्र रचना
निशांत - शोधकर्ता
व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं.
रोहन - सौमित्रचा मुलगा
लक्ष्मण आणि वर्षा - महादेवराव – विश्वनाथ – श्रीपति -सहावी पिढी.
गोकर्णला स्थायिक.
भाग २५
भाग २४ वरून पुढे वाचा....
“अरे नाही, त्यांना सांग आम्ही सर्व साताऱ्याला काही कामानिमित्त येतो आहोत, तुम्हाला भेटायची आमची इच्छा आहे. त्यांना केंव्हा वेळ आहे, आणि त्यांच्या घराचा पत्ता विचारून घे.” काकू म्हणाल्या.
“ठीक आहे, असंच करतो.” – लक्ष्मण म्हणाला आणि त्यांनी फोन लावला. थोडा वेळ बोलणं झाल्यावर त्यांनी फोन ठेवला तेंव्हा खुश दिसत होता.
“त्यांनी सांगितलं की आमचं दुकान ८ वाजता बंद होतं. त्यानंतर आम्ही सगळे घरीच असतो. विचारत होते की केंव्हा येता आहात म्हणून, तर मी सांगितलं की साधारण साडे आठ होतील. म्हणाले की सरळ घरीच या. बरोबरच जेवू.” – लक्ष्मणने काय बोलणं झालं ते सांगितलं. “म्हणजे आपण उशीरात उशिरा, सकाळी १० वाजता निघाव लागेल.”
“हे तर फारच छान झालं.” – काकू.
निशांत म्हणाला की, “आपल्याला साधारण पणे आठ नऊ तास लागतील पोचायला. गेल्यावर एखाद्या हॉटेल मधे रूम बूक करू, फ्रेश होऊ आणि मग त्यांच्याकडे जाऊ. म्हणजे, दिवस भराच्या प्रवासाने मरगळलेले चेहरे घेऊन जाणं बरं दिसणार नाही म्हणून.
रोहनने लगेच सहमति दर्शवली. म्हणाला, “म्हणजे रात्री हॉटेलवर येऊन निवांत पणे झोपता येईल. मग सकाळी निघू.”
दुसऱ्या दिवशी साडे दहा वाजता निशांत, रोहनने आणलेल्या इंनोवा मधून सगळे निघाले. समोर लक्ष्मण बसला होता, मागच्या सीट वर रोहन आणि काकू आणि सगळ्यात मागच्या सीट वर निशांत आणि वर्षा बसले. नारळ फोडून सगळे साताऱ्याच्या दिशेने निघाले.
निशांत आणि वर्षा साठी तर ही पर्वणीच होती. दोघांच्याही चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसत होतं. निशांतने त्या साठी रोहनला मनोमन धन्यवाद दिले. रोहनने चलाखी करून लक्ष्मणला म्हंटलं की, “ लक्ष्मण तू समोर बस. तुझ्या पायाखालचा रस्ता आहे. त्यामुळे तू गाइड करू शकशील.” लक्ष्मणने मान डोलावली आणि तो पुढे जाऊन बसला. मग रोहन काकूंना म्हणाला “काकू तुम्ही आणि वर्षा मधल्या सीट वर बसा. मी आणि निशांत मागे बसतो.” निशांत समजला आणि लगेच मागे जाऊन बसला. पण वर्षा म्हणाली की तिला मागे बसली तर छान मांडी घालून आरामशीर पणे बसता येईल. मग वर्षा मागे निशांत च्या शेजारी जाऊन बसली.
सुरवातीला दोघेही शांतच होते. मग निशांतने तिच्याकडे पाहिलं. तिने वळून पाहिल्यावर निशांतने झटकन मान वळवली आणि समोर बघायला लागला. वर्षा गालातल्या गालात हसली. ते निशांतने डोळ्यांच्या कोपऱ्यातून बघितलं. थोडा वेळ असाच गेला मग वर्षाने निशांतकडे वळून पाहिलं, निशांतला जाणवलं आणि त्याने वर्षा कडे पाहिलं. प्रतिक्षिप्त क्रिये नुसार वर्षाने सुद्धा मान वळवली. असं झाल्यावर निशांतला राहवलं नाही त्याला हसू फुटलं. ते बघून वर्षा पण हलके हलके हसायला लागली. या हसण्याने दोघांमधला संकोच गळून पडला.
“आपल्याला ७-८ तास तरी लागतील ना साताऱ्याला पोचायला?” वर्षानेच सुरवात केली बोलायला.
“हो, ७ तासांचा प्रवास आणि एक दीड तास जेवण खाण चहा वगैरे. म्हणजे नऊ साडे नऊ तास कुठेच गेले नाहीत.” निशांत.
“म्हणजे सातारा येई पर्यन्त रात्रीचे साडे सात – आठ तरी वाजतील. होय ना?”- वर्षा
“बरोबर आहे. तेवढे होतीलच.” – निशांत.
थोडा वेळ तसाच गेला. मग वर्षांच बोलली, “काही तरी बोला न. नाही तर टाइम पास कसा होईल?”
“हे मात्र खरं आहे.” निशांत म्हणाला. “गोकर्ण मधे कॉलेज आहे? गावाकडे पाहून तर असं काही वाटत नाही.”
“नाही माझं १० वी पर्यन्त मुर्डेश्वर आणि नंतर पूर्ण शिक्षण कारवारला झालं. गोकर्णला शाळा आहेत, पण मी चौथी नंतर मुर्डेश्वरला जायची.” – वर्षा.
“सुरवाती पासून इंग्लीश माध्यमात शिकला?” – निशांत.
“नाही चौथी पासून.” वर्षा म्हणाली. “ईss, काय हे, शाळा शाळा करत बसला आहात? काही तर रंजक बोला नं. तुम्ही इतकं फिरता, अनेक अनुभव तुमच्या गाठीशी असतील, त्याच्या बद्दल काही सांगा नं. हे काय? माध्यम कोणचं ,शाळा कशी? माझी परीक्षा घेताय का?” वर्षा.
निशांत हसला. म्हणाला “तुम्ही चिडला आहात होय ना?”
“चिडू नको तर काय करू? अविनाश काकांची स्टोरी तुम्ही किती रंगवून सांगितली,
तुमच्या कडून खूप काही मनोरंजक ऐकायला मिळेल म्हणून मी मुद्दाम मागे बसले. तर तुमचं आपलं शाळा पुराण. रागच आला आहे मला.” – वर्षा.
“गंमत आहे, मला कधी असं पाहायला मिळालं नव्हतं.” – निशांत.
वर्षाने प्रश्नार्थक मुद्रा करून त्यांच्या कडे पाहिलं “ म्हणजे?”
निशांतला दुसरंच बोलायचं होतं. रागवल्यावर ती फार सुंदर दिसते असं त्याला म्हणायचं होतं, पण धाडस झालं नाही. म्हणून काही उत्तर द्यायचं तो म्हणाला, “काही नाही, असंच.”
वर्षा रोखून त्याच्याकडे बघत होती, एकटक, निशांतला सहन झालं नाही, त्याने मान वळवली. पण निशांतला ते ही मानवलं नाही, त्याने पुन्हा वर्षाकडे पाहीलं. ती हसत होती. म्हणाली, “काय झालं?”
“कुठे काय? काही नाही.” – निशांत आता जरा अवघडला होता. ती मिस्किल हसत होती पण डोळे सांगत होते की निशांत ची चोरी पकडल्या गेली आहे, म्हणून. मग सावरून घेत निशांत म्हणाला, ”तुम्हाला माहिती आहे? अविनाश काकांची भेट हा एक अविश्वसनीय योगायोग होता.”
“योगायोग? तो कसा? तुम्ही तर त्यांना शोधायलाच गेला होता न?” – वर्षा.
“हो, पण आम्हाला एक टक्का सुद्धा खात्री नव्हती की त्यांचा पत्ता लागेल म्हणून. तो
एक चान्स होता.” – निशांत.
“हे तुम्ही काय बोलता आहात? जर खात्री नव्हती, तर परदेशात जाण्याचं काय कारण होतं?” – वर्षा.
“असं आहे, शेवटी हे सगळं कोर्टाच्या अखत्यारीत जाणार आहे, त्यांनी जर विचारलं की अविनाशच्या शोधा साठी तुम्ही काय पावलं उचललीत? तर त्यांना आम्ही प्रयत्न केला पण त्यात यश नाही मिळालं हे पुराव्या सहित सांगता यावं म्हणून मी बांगलादेशात गेलो. एवढाच मर्यादित हेतु होता, पण अविनाश काकांची अचानक आणि ध्यानी मनी नसतांना गांठ पडली. म्हणून मी म्हणालो की योगायोग.” निशांतनी सगळं नीट फोड करून सांगीतलं.
“आत्ता कळलं मला. हा प्रश्न काल पासून माझ्या मनात घोळत होता.” – वर्षा.
“आता मिळालं प्रश्नाचं उत्तर.” - निशांत.
वर्षाने मान डोलावली. “अजून कोण कोण शोधायचे राहिले आहेत?” वर्षाने विचारलं.
“आता आपण साताऱ्याला जातो आहोत, तिथे काय होतं ते बघू. त्यांनी पण जर प्रॉपर्टी नाकारली, तर कठीण आहे. तसंही सांगलीला जाऊन आपल्या वंशावळी प्रमाणे, सातारकर नाही म्हणोत वा हो म्हणो, सान्यांचा शोध हा घ्यायचाच आहे.” – निशांत.
“मला हे कळत नाही की, काहीच माहिती नसतांना तुम्ही सांगली मधे शोधणार कोणाला?” – वर्षा.
“अगदी बरोबर. जेंव्हा लोकांना असे प्रश्न पडतात तेंव्हाच आमच्या सारख्या लोकांची जरूर पडते. माझ्या कामा बद्दल विचारत होतीस ना मग हे त्याचं उत्तर आहे.” – निशांत.
वर्षा त्यांच्याकडे बघत होती, पण आता यावेळी तिची नजर कौतुकाची होती. म्हणाली, “पण शोध कुठून सुरू करणार तुम्ही? मी बराच विचार केला पण सुरवात कशी आणि कुठून करायची, काहीच सुचत नाहीये.” – वर्षा.
“सोप आहे. सांगलीची डायरेक्टरी उघडायची, आणि साने या नावाचे फोन नंबर टिपून घ्यायचे आणि फोन करून, जो माणूस भेटायला तयार होईल, त्यांची वेळ घेऊन त्यांना भेटायला जायचं. पुढे जसजशी माहिती मिळत जाईल, शोध पुढे सरकेल” – निशांत.
“पण आशा रीतीने शोध केला तर त्याला महीने सुद्धा लागू शकतील, आणि फळ मिळेल याची काहीच शाश्वती नाही.” – वर्षा.
“बरोबर आहे, आपल्या जवळ ५ वर्षाचा काळ आहे.” निशांत म्हणाला “आणि पहा न, काहीही धागे दोरे नसतांना, कुठून तरी सुरवात करायची म्हणून पहिलं पाऊल टाकलं, आणि पाहता पाहता अविनाश काका भेटले, लंडन वाले भेटले, तुम्ही लोकं भेटलात आणि आता सातारची भर होते आहे. शोध कार्यात असंच असतं. धागे दोरे मिळत जातात आणि आपण एक एक पायरी चढत जातो.”
“म्हणजे ४-६ सान्यांच्या कडे चौकशी केल्यावर, आपल्याला हवे असलेले साने पण भेटतील, असंच ना.” – वर्षा.
“करेक्ट. अगदी असंच. बघ आता तू सुद्धा डिटेक्टिव गिरी करायला लागली. ये आमच्या टीम मधे.” निशांत म्हणाला आणि वर्षाला हसायला आलं.
“डिटेक्टिव वर्षा” असं म्हणून वर्षाने उजव्या हाताची दोन बोटं निशांत वर रोखून ठया ठया असा आवाज केला आणि खळ खळून हसायला लागली. तिचं हसणं इतकं जोरात होतं की लक्ष्मणने सुद्धा मान वळवून मागे बघितलं. “ काय झालं? त्याने विचारलं.
“काही नाही. असंच. निशांत मला डिटेक्टिव म्हणाला म्हणून मला हसायला आलं.
“निशांत तुला डिटेक्टिव म्हणाला? का बुवा?” – रोहन म्हणाला. त्याला पण गंमत वाटली.
“मी सांगलीच्या सान्यांना कसं शोधायचं या बद्दल टिप्स दिल्या म्हणून तो मला डिटेक्टिव म्हणाला.” – वर्षा.
“लक्ष्मण पण हसला. तो म्हणाला “काय निशांत, शिष्य शिरजोर झालेला दिसतोय.”
निशांत पण हसला, म्हणाला “लक्ष्मणराव तमची बहीण खूप हुशार आहे. तिने B. Com केलंय, आता तिला चार्टर्ड अकाऊंटंट बनवा. खूप नाव काढेल.”
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com