तोतया वारसदार - भाग 31 Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तोतया वारसदार - भाग 31

तोतया वारसदार

पात्र रचना

व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं.

रोहन                       - सौमित्रचा मुलगा

लक्ष्मण आणि वर्षा            - महादेवराव – विश्वनाथ – श्रीपति -सहावी पिढी.

  गोकर्णला स्थायिक.

नयना                निशांतची  धाकटी बहीण.                

भाग  ३१                 

भाग ३०  वरून पुढे  वाचा....

“व्यंकटेश, एक मेंबर अजून जुळणार आहे.” विश्राम सांगत होता. “वंशावळी बघ.  साने. सुरतचा मोठा हीऱ्यांचा व्यापारी आहे. कालच त्यांच्याशी बोलणं झालं.  आपली भेटायची योजना पक्की झाली की त्याला फोन करतो. तसे आमचे व्यवसाईक संबंध आहेतच, पण नातं इतके दिवस माहीत नव्हतं.” फोन वरचं संभाषण संपलं.

“विश्राम काका,” लक्ष्मण म्हणाला “आता या योजनेमधे किती दिवस जाणार आहेत हे माहीत नाही. म्हणजे वाड्याची कंडिशन कशी आहे त्यावर अवलंबून आहे, तर उद्या आम्ही निघतो, आणि तुम्ही जेंव्हा सांगाल, तेंव्हा सरळ नागपूर गाठतो.”

वर्षा जाणार, म्हंटल्यांवर निशांतचा चेहरा पडला. त्यांनी वर्षा कडे बघितलं. तिचाही चेहरा उतरला होता. निशांत नागपूर आणि वर्षा गोकर्ण, दोघांनाही जावंच लागणार होतं.

“मला थोडं बोलायचं होतं. बोलू का?” – वर्षा म्हणाली, आणि सर्वांनीच चमकून तिच्याकडे बघितलं. वर्षा मोठ्यांच्या मधे कधी फारशी बोलायची नाही, म्हणून वर्षाला काय बोलायचं आहे यांचा प्रत्येक जण अंदाज लावण्याचा प्रयत्न करत होता. लक्ष्मणला वाटलं की निशांतला सोडून जायचं तिच्या जिवावर आलं असणार म्हणू त्याच्या बद्दल बोलणार असेल कदाचित. तर निशांतला वाटलं की अजून दोन दिवस राहून जाऊ असं म्हणणार  असेल, पण ती असं काहीच बोलली नाही. वर्षाचा चेहरा गंभीर दिसत होता.

“मी वंशावळी वाचल्यावर एक गोष्ट लक्षात आली म्हणून मुद्दाम पुन्हा  वाचली,” वर्षा बोलत होती. “मला असं दिसलं की विश्वनाथरावांना तीन मुलं होती. श्रीपति, ओंकार आणि कावेरी. त्यापैकी श्रीपतीचे वंशज आम्ही, ओंकारचे विश्राम काका आणि अनिल काका. पण कावेरी बद्दल काहीच संशोधन झालं नाही. त्यांच्या बद्दल कोणालाच काही माहिती कळली नाही का?”

सर्व जण एकमेकांकडे बघत होते, कोणाच्याच लक्षात हा मुद्दा आला नव्हता. पण मग निशांत बोलला. “आपण गोकर्ण ला असतांना हा विषय निघाला होता. लक्ष्मणराव जेंव्हा विश्राम काकांबद्दल सांगत होते, तेंव्हा ते म्हणाले होते की कावेरी बाईंबद्दल कोणालाच माहिती नाही. पण इथे आल्यावर  विश्रामकाकांना विचारून खात्री करून घ्यायचं राहून गेलं. तुला काही माहीत आहे का?”.

“वंशावळीत  त्यांचं लग्न कोणी कारवारचे विश्वास परांजपे यांच्या बरोबर झालं असा उल्लेख आहे. दादा, तुझ्या लक्षात आलं का मी काय म्हणते आहे ते?” – वर्षा.

सगळे आता लक्ष्मणाकडे पाहू लागले.

“लक्ष्मण, काय म्हणते आहे ही वर्षा? तुला काय माहिती आहे?” – विश्राम

लक्ष्मण दोन मिनिटं नुसता बघत राहील, मग त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला. म्हणाला “वर्षा कारवारच्या कॉलेज मधे शिकत असतांना जिथे पेइंग गेस्ट म्हणून राहत होती त्यांचं आडनाव परांजपे होतं.”

“म्हणजे आपल्याला त्यांच्याकडे जाऊन कावेरीबाईंची चौकशी करायला पाहिजे. शोध कार्य असं अर्धवट सोडून चालणार नाही,” वर्षाने आपला मुद्दा स्पष्ट केला.

“म्हणजे आता निशांतने कारवारला जायला पाहिजे, असाच ना?” – विश्राम.

“हो, म्हणजे मला असंच सुचवायचं होतं.” वर्षा.

“हे आमच्या नजरेतून सुटलं हे खरं आहे. पण आता नागपूरचा प्लॅन बदलावा लागेल असं दिसतंय. काय करायचं विश्राम काका?” – निशांत.

“कारवारला जायचं ठरव, अजून दुसरं काय?” – विश्राम.

“मग नागपूरचा प्लॅन पुढे ढकलायचा का?” – निशांत.

“इलाज नाही. तू आणि रोहन कारवारला जा, काय परिस्थिती आहे ते बघा. आणि मग त्या प्रमाणे ठरवा. पण तूर्तास नागपूर प्लॅन बाजूला ठेवावा लागणार हे नक्की.”- विश्राम

चर्चा चालू असतांना दिनेश म्हणाला की

“मी काय म्हणतो, तसेही उद्या लक्ष्मण आणि मंडळी गोकर्णला जाताहेत, त्यांच्या बरोबर रोहन आणि निशांत जातील आणि वापस येतांना कारवारला जातील. जर एक दोन दिवसांत काही रिजल्ट मिळाले तर ठीक, नाही तर ते तिथेच राहून चौकशी पुढे नेतील आणि गाडी वापस पाठवून देतील.”

“अरे दिनेश, आता जर आम्ही जाणार आहोत, तर आमच्याच गाडीतून हे लोकं येतील ना. यांना गोकर्णला सोडून मग आम्ही कारवारला जाऊ. तुम्ही कशाला वेगळी गाडी पाठवताय? – रोहन.

ही कल्पना सर्वांनाच पसंत पडली. लक्ष्मण आणि वर्षाचा संदर्भ देऊन निशांतने चौकशी करावी, असं एकमताने ठरलं. त्या प्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता नाश्ता वगैरे करून, लक्ष्मण, वसुधा काकू  आणि वर्षा गोकर्णाला निघाले. निशांत आणि रोहन सुद्धा त्यांच्या बरोबर निघाले. निशांतची इनोव्हा असल्याने, विश्रामला त्यांची गाडी आणि ड्रायव्हर बरोबर देण्याची आवश्यकता नव्हती. जाता जाता निशांत विश्रामला म्हणाला, “काका, व्यंकटेश काकांना हा बदललेला कार्यक्रम कळवून टाका. म्हणजे ते उगाच नागपूरचा बंगला केंव्हा तयार होतो आहे याची वाट पाहणार नाहीत.”

“ओके. कळवतो आज रात्री. पण तुम्ही रोज अपडेट देत चला.” – विश्राम

निशांत आणि वर्षाला पुन्हा ८ तासांची लॉटरी लागली. अखंड बडबड.

“अमरावतीला तुमचं  घर आहे का, कोण कोण असतं तिथे?”.– वर्षा.

“हो अमरावतीला घर आहे. आई बाबा तिथेच राहतात. धाकटी बहीण आहे. आता तिच्या लग्नाचं बघताहेत. – निशांत

“काय नाव आहे” – वर्षा.

“नयना नाव आहे. ती पण M.Sc. झाली आहे रसायन शास्त्र विषय घेऊन.” – निशांत.

“ती पण VMV मध्येच शिकली?” – वर्षा.

“अर्थात. अमरावतीलाच एवढं चांगलं कॉलेज असतांना इतरत्र जाण्याची जरूरच नाही. आता फावल्या वेळात ती कम्प्युटर वर MSCIT शिकतेय.” – निशांत.

“कसली शेती आहे?” – वर्षा.

“३० एकर शेती आहे. त्यापैकी २० एकरात संत्र्‍याची झाडं आहेत. बाकी १० एकरात गहू, ज्वारी, तूर, कापूस वगैरे पिकं घेतो आम्ही. मला स्वत:ला पण शेती फार आवडते, पण ही नोकरी जास्त आवडते. आत्ता बाबा सर्व बघतात, पण काही वर्षांनंतर बाबांच्याने होणार नाही तेंव्हा नोकरी सोडून मलाच सर्व बघावं लागणार आहे.” - निशांत.

“बरं, ते जाऊ दे, जरा तू ज्या परांजप्यांच्या कडे राहत होतीस त्यांच्या बद्दल काही माहिती दे न, म्हणजे चौकशी कशी आणि कुठून सुरू करायची यांचा विचार करता येईल.” – निशांत.

“त्यांचं ना बरंच मोठं घर आहे. त्यांची दोन्ही मुलं अमेरिकेत असतात. एक जण डॉक्टर आहे आणि दूसरा नोकरी करतो. एका मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्दया वर आहे. मग परांजपे आजी, आजोबांनी ठरवलं की घराच्या गच्चीवर खोल्या बांधून बाहेरगावावरून येणाऱ्या मुलींची सोय करावी. मुलींच्या आई वडिलांना चिंता राहणार नाही आणि त्यांना पण सोबत होईल, अश्या सहा खोल्या बांधल्या होत्या.  प्रत्येक खोलीत ३ मुली. अश्या आम्ही १८ मुली. होतो. एक स्वयंपाक करणारी होती, त्यामुळे आमच्या जेवण्याचा पण प्रश्न सुटला. एक बाई येऊन सर्वांचे कपडे धुवून जायची. त्यामुळे  आमची त्या त्रासातून पण सुटका झाली होती. दोघंही आजी आजोबा खूपच प्रेमळ होते.” – वर्षा.

बोलता बोलता वेळ कसा निघून गेला ते कळलंच नाही. मधे थांबून सर्व जेवायला उतरले.

जेवतांना लक्ष्मण म्हणाला, “आपण आधी जर कारवारला गेलो, तर निशांत आणि रोहनची त्यांच्याशी  ओळख करून देता येईल, मग एकदा ओळख झाल्यावर कसा मार्ग चोखाळायचा ते त्यांना ठरवता येईल. म्हणजे आता इथून थोड्या अंतरावर कारवारचा फाटा फुटतो त्याच्या आधी ठरवा.”

निशांत आणि रोहनला लक्ष्मणचं  म्हणणं पटलं. त्यांनी अनुमोदन दिलं. पण मग वर्षा म्हणाली, “दादा, ते लोक आहेत का, हे मी फोन करून विचारून घेते नाही तर उगाचच हेलपाटा पडायचा.”

“हो बरोबर आहे. विचार तू,” लक्ष्मण.

“दादा आहेत ते, या म्हणाले. विचारत होते की काय काम काढलं म्हणून.” – वर्षा.

“मग काय सांगीतलं?” – लक्ष्मण.

“सांगीतलं की आम्ही साताऱ्याला गेलो होतो, तुमची आठवण आली म्हणून गोकर्णला वापस जाता जाता, भेटायला येतो आहोत.” – वर्षा.

“छान केलस.” लक्ष्मण.

दुपारी साडे तीन च्या सुमारास कारवारला पोचले. परांजपे काकांनीच दार उघडलं. थोडं इकडचं तिकडचं बोलणं झाल्यावर लक्ष्मणने सुरवात केली. “काका, तुमची थोडी मदत हवी होती. आमच्या खापर पणजोबांची बहीण कावेरी, तिचं लग्न कारवारचे विश्वास परांजपे यांच्याशी झालं होतं. ही जवळ जवळ दीडशे वर्षा पूर्वीची गोष्ट आहे. या विषयी काही माहिती मिळू शकेल का? कुलवृत्तांत आहे का तुमच्याकडे?” – लक्ष्मण

“कुलवृत्तांत तर मिळून जाईल. आमच्याकडे आहे त्याची एक प्रत. पण आता दीडशे वर्षांनंतर तुम्हाला काय जरूर पडली?” – परांजपे काका.

आम्ही सध्या जरा आमच्या वंशावळीची माहिती गोळा करतो आहोत. कावेरीबाई माहेरच्या गोखले, म्हणून हा प्रपंच.

“ठीक आहे. मी कुलवृत्तांत आणतो.” असं म्हणून परांजपे आजोबा घरात गेले. तेवढ्यात चहा आणि बिस्किटे आलीत. थोड्या वेळाने परांजपे कुलवृत्तांत घेऊन आले. मग लक्ष्मण आणि आजोबा क्लवृत्तांत बघायला लागले. जवळ जवळ तास भर हा उद्योग चालला होता आणि बाकीचे शांत बसून होते. वर्षा मात्र वरच्या मजल्यावर जाऊन आपल्या मैत्रिणींना भेटून आली. शेवटी एकदाचा संदर्भ सापडला.

“हे बघा लक्ष्मणराव, विश्वास परांजपे आणि कावेरी गोखले. साल आहे १८६८ कारवार. आता यांच्या पुढची वंशावळी बघू. काय पान नंबर दिला आहे.. हां ३५४. आजोबांनी ३५४ पान उघडलं.  बघा, विश्वासचा मुलगा नरहरी, त्याचा मुलगा राजाराम त्याला दोन मुलं लक्ष्मीकांत आणि त्र्यंबक. लक्ष्मीकांतची बायको गोदावरी त्यांची मुलं  वसंत  आणि गोविंद. वंशावळी वसंत आणि गोविंद पर्यन्त येऊन थांबली होती.

“लक्ष्मीकांत आणि गोदावरी हे तर माझे आई वडील. अरे त्र्यंबक काकांचं पण नाव आहे यात, आणि गोविंदाचं पण ” – आजोबा.

‘गोविंद म्हणजे तुमचा सख्खा भाऊ?” – लक्ष्मण.

“हो, माझा धाकटा भाऊ.” – वसंत राव.

यांचा अर्थ काय लावायचा आजोबा? आपण नात्या मधे आहोत?” – लक्ष्मण.

“होय, असं दिसतंय खरं “ – आजोबा.

“लक्ष्मणराव, कावेरीबाई आणि आजोबांच्या मधे साखळीत कोण कोण आहेत ते पण चेक करावं लागेल. आता काम वाढलं आहे.” – निशांत.

“हे कोण? आणि काम वाढलं आहे असं हे का म्हणताहेत? यांचा काय संबंध?”- आजोबा  

क्रमश:........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com