तोतया वारसदार - भाग 32 Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तोतया वारसदार - भाग 32

तोतया वारसदार

पात्र रचना

कावेरी                             महादेव—विश्वनाथ—कावेरी       

वसंतराव परांजपे                     कावेरी गोखल्यांचे आताचे वंशज

प्रभावती                            वसंतरावांच्या पत्नी

त्र्यंबक                             वसंतरावांचे काका.

गोविंद                             वसंतरावांचा धाकटा भाऊ.  

श्रीकांत आणि विक्रम                  वसांतरावांची मुलं. अमेरिकेत असतात.  

भाग  ३२                 

भाग ३१   वरून पुढे  वाचा....

“लक्ष्मणराव, हे बघा, विश्वास परांजपे आणि कावेरी गोखले. साल आहे १८६८ कारवार. आता यांच्या पुढची वंशावळी बघू. काय पान नंबर दिला आहे.. हां ३५४. आजोबांनी ३५४ पान उघडलं.  बघा, विशास चा मुलगा नरहरी, त्याचा मुलगा राजाराम त्याला दोन मुलं लक्ष्मीकांत आणि त्र्यंबक. लक्ष्मीकांतची बायको गोदावरी त्यांची मुलं  वसंत  आणि गोविंद. वंशावळी वसंत आणि प्रभावती  पर्यन्त येऊन थांबली होती.

“लक्ष्मीकांत आणि गोदावरी हे तर माझे आई वडील. अरे त्र्यंबक काकांचं पण नाव आहे यात, आणि गोविंदाचं पण ” – आजोबा.

‘गोविंद म्हणजे तुमचा सख्खा भाऊ?” – लक्ष्मण.

“हो, माझा धाकटा भाऊ.” – वसंत राव.  

यांचा अर्थ काय लावायचा आजोबा? आपण नात्या मधे आहोत?” – लक्ष्मण.

“होय, असं दिसतंय खरं “ – आजोबा.

“लक्ष्मणराव. कावेरीबाई आणि आजोबांच्या मधे साखळीत कोण कोण आहेत ते पण चेक करावं लागेल. आता काम वाढलं आहे.” – निशांत.

“हे कोण? आणि काम वाढलं आहे, असं हे का म्हणताहेत? कसलं काम? आणि यांचा काय संबंध?”- आजोबा

“आता, तुम्हीच कावेरीबाईंचे वंशज आहात हे कळल्यावर तुम्हाला सर्व सांगणं हे माझं कर्तव्य आहे.” – लक्ष्मण.

“हे बघा गोखले, माझा प्रचंड गोंधळ उडाला आहे. प्रभा, तुला काही बोध होती का?” वसंतरावांनी आपल्या बायकोला विचारलं.

“अहो, जे तुम्हालाच उमगलं नाही ते मला काय कळणार? मी पण गोंधळात पडले आहे. वर्षा, तुझ्या भावाला सांग की लवकर सर्व उलगडा कर.” – प्रभाताई

“आजोबा, हा निशांत, प्रायवेट डिटेक्टिव आहे. हाच सर्व उलगडा करेल.” – लक्ष्मण

“डिटेक्टिव? इथे काही खून बिन झालेला नाहीये. आम्हाला कशात तरी गोवण्याचा प्रयत्न आहे की काय तुमचा? लक्ष्मणराव तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती आम्हाला. काय चाललंय काय? – वसंतराव

“आजोबा, शांत व्हा. तुम्ही समजता तसं काहीही नाहीये. हे निशांत शोधकर्ता आहेत आणि ते आमच्या वंशावळीच्या  शोध कामात आम्हाला मदत करताहेत. अजून काही नाही. खून किंवा तत्सम काही नाही. विश्वास ठेवा माझ्यावर. साधा गोखले मंडळींचा इतिहास काढतो आहोत आम्ही.” – लक्ष्मण.

“म्हणजे तुम्ही वंशावळी तयार करता आहात?” - वसंतराव

“हो, पण फक्त महादेवरांच्या वंशाची. समस्त गोखले कुलाची नाही.” – लक्ष्मण.

“काय कारण आहे? अशी काय गरज पडली तुम्हाला? आम्ही तर असं कधी ऐकलं नव्हतं” – वसंतराव अजूनही संशयानेच बघत होते.

“तसंच काही कारण असल्याशिवाय कोणी डिटेक्टिव नेमणार नाही. ही एक कहाणीच आहे. तुम्ही आधी ती ऐका. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील, काही शंका उरल्याच तर आम्ही त्याचं निरसन करू.” - लक्ष्मण.

“ठीक आहे. सांगा.” वसंतराव म्हणाले. आता ते आणि प्रभाताई जरा सावरून बसल्या.

“ते कहाणी वगैरे तर आम्ही ऐकुच, तो काही प्रश्न नाही पण हे सर्व काय गौड बंगाल आहे ते तर सांगा.” – प्रभाताई

“आजी ऐका न, सर्व ऐकल्यावर काही गूढ राहणारच नाहीये. विश्वास ठेवा आमच्यावर. आम्हाला तुम्ही चांगले ओळखता. मग थोडा धीर धरा न.” लक्ष्मण.

“अग आपण लक्ष्मणरावांना आणि वर्षाला ओळखतो, ते काही भलतं सलतं सांगणार नाहीत. एवढं ते म्हणताहेत तर ऐकुया त्यांची कहाणी.” – वसंतराव.

वसंतरावांनी असं म्हंटल्यांवर मग प्रभाताईं पुढे काही बोलल्या नाहीत. मग निशांतनी बोलायला सुरवात केली.

“गोखले घराण्याचा मूळ पुरुष वेळणेश्वरचे महादेवराव त्यांना चार मुलं आणि दोन मुली. त्यापैकी सखाराम आणि विश्वनाथ यांचा वंश वाढला.” निशांत तासभर अगदी मुद्देसूद पणे एक एक गोष्ट संगतवार सांगत होता. सगळं ऐकून घेतल्यावर वसंतराव म्हणाले, “अशी सगळी एकूण कथा आहे तर. पण यात आमचा संबंध कुठे येतो?” - वसंतराव.

“आजोबा, यात कावेरीबाई गोखले आहेत मग त्यांच्या वंशजाचा संबंध येतो. कारण विनायकरावांनी तसं लिहून ठेवलं आहे. म्हणून हा सगळं प्रपंच.” लक्ष्मण म्हणाला.

“लक्ष्मणा, माझा मोठा मुलगा श्रीकांत हा ३५ आणि धाकटा विक्रम ३२ वर्षाचा आहे. म्हणजे जवळ जवळ तुझ्याच वयाचे, त्यामुळे तू मला आजोबा म्हणू नकोस. काका म्हण” -वसंतराव

“ओके, मग काका आता तुमचं पण नाव यादी मधे जोडल्या गेलं आहे तेंव्हा तुमचं काय म्हणण आहे ते सांगा.” – निशांत.

“माझं काय म्हणण आहे म्हणजे? कशाबद्दल?” – वसंतराव.

प्रॉपर्टी मधे हिस्सा हवा की नको.?” – निशांत.

“अरे जिथे समस्त गोखले मंडळी नको म्हणताहेत, तिथे मी कशाला समोर येऊ? आणि कारणच काय? परमेश्वराने आम्हाला भरपूर दिलं आहे. आमच्या  मुलांनी तर या राहत्या घरावर सुद्धा पाणी सोडलं आहे. ते लोकं भारतात परत येण्याची शक्यता नाहीये, मग या आमच्या प्रॉपर्टीचं करायचं काय? म्हणून कुणा तरी समाजसेवी संस्थेला देऊन  टाका म्हणत होते. आता बोल.” – वसंतराव.

निशांत लक्ष्मण आणि रोहन तिघांनीही कपाळाला हात लावला. हे सगळं अगम्य प्रकरण होतं. एवढी मोठी प्रॉपर्टी सहजा सहजी मिळत असतांना एकही वारसदार तयार नाही म्हणजे काय? अतर्क्य प्रकार होता सगळं.

“रोहन, लक्ष्मणराव आता काय करायचं? काही केल्या हा पेच सुटत नाहीये. दमायला झालंय. अशी केस मी आयुष्यात पाहीली नाही. आतापर्यन्त जे काही अनुभवलं, त्यात सगळेच संपत्तीला हपापलेले होते, आणि ती मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जाण्याची तयारी असलेले होते.” – निशांत.

“काका तुम्ही तरी हो म्हणा हो.” – लक्ष्मण.

“आणि करू काय या संपत्तीचं? अरे या वयात काय उपयोग तुझ्या त्या प्रॉपर्टी चा? ती इस्टेट नागपूरला आम्ही कारवारला. काही अर्थच नाहीये. तुम्ही तरुण आहात, तुम्हालाच ती उपयोगाची आहे. तुम्हीच वाटून घ्या.” – वसंतराव.

“काका, तुम्हाला नको आहे पण तुमच्या मुलांना कदाचित हवी असेल. जरा विचारून बघा ना.” निशांत.

“अरे दोघंही गडगंज श्रीमंत आहेत. अमेरिकेचं नागरिकत्व पण घेतलं आहे. दोघांनी तिकडे अमेरिकेत मोठी घरं बांधली आहेत भरपूर बँक बॅलन्स आहे, मोठ मोठ्या गाड्या आहेत, आमचंच घर धर्मादाय देऊन टाका म्हणताहेत. आणि याच कारणा  साठी आम्ही मुलींचं हॉस्टेल सुरू केलं. जे आमच्या नंतर कुठल्या तरी चांगल्या संस्थेला देऊन टाकू. आता अश्या परिस्थितीत तुझ्या प्रॉपर्टीला आमची मुलं कशाला हो म्हणतील? तूच सांग?” – वसंतराव.

निशांत रोहन आणि लक्ष्मण जेंव्हा कारवारला आले तेंव्हा थोडी आशा बाळगून आले होते की कोणीतरी आता भेटेल जो ताबा घ्यायला उत्सुक असेल. पण सगळंच मुसळ केरात गेलं होतं. सर्व प्रयत्न वाया गेले होते. आता फक्त साने जेंव्हा सूरतहून येतील तेंव्हा ते काय म्हणतात त्यावर बरंच अवलंबून होतं.

‘काका, नागपूरला विनायकरावांचा १९ खोल्यांचा वाडा  आहे. त्या वाड्याचं पुनरुज्जीवन करण्याचं काम सुरू झालं आहे. ते पूर्ण झाल्यावर आताचे सर्व वंशज एक मोठं गेट टूगेदर करणार आहेत. सर्वांनी उपस्थित राहण्याचं कबूल केलं आहे. तुम्ही पण अवश्य आलं पाहिजे. लक्ष्मणराव, तुम्ही जबाबदारी घ्या काकांना आणि काकूंना आणायची. चालेल ना?” निशांत म्हणाला.

“हो नक्कीच. काहीच प्रॉब्लेम नाहीये. आम्ही येतांना काकांना घेऊन येऊ. पण काका, तुम्ही तुमच्या मुलांचा नंबर द्या. आम्ही त्यांना पण बोलावू.” – लक्ष्मण.

“ठीक आहे बोलवा त्यांना, आमच्या पण भेटी होतील ते आले तर.” – वसंतराव

“काका, त्र्यंबकराव आणि गोविंदराव यांचे पत्ते आहेत का तुमच्या जवळ? पत्ते मिळाले तर त्यांच्याशी संपर्क करता येईल.” – निशांत.

“हो काका, निशांत बरोबर बोलतो आहे.” – लक्ष्मण.

“त्र्यंबक काकांशी बऱ्याच वर्षात काही संपर्क नाहीये, आणि गोविंदा तर माझ्याशी भांडून गेला आहे. त्याच्याशी फोन वरून संपर्क करण्याचा खूप प्रयत्न केला पण तो बोलत नाही. पत्ते तर नाही पण दोघांचेही फोन नंबर आहेत माझ्याकडे. ते देतो. काका वाराणसीला आणि गोविंद नाशिकला राहतो.” – वसंतराव

“हं म्हणजे निशांत आता मोर्चा वाराणसी कडे का? – रोहन.

“मलाही असं वाटतंय की आधी वाराणसी आणि मग नाशिक असा प्रोग्राम करावा. आज रात्री सारंग सरांशी बोलून घेऊ आणि मग फायनल ठरवू. काय म्हणतोस?” – निशांत.

“काका, तुमचे त्र्यंबक काका प्रथम पासूनच वाराणसीला आहेत का?” – वर्षा.

“नाही. ते पण आमच्या बरोबर इथेच या घरातच राहत होते. पण एक दिवस सगळंच विस्कटून गेलं. त्याचा मुलगा, माझा पुतण्या विलास, एक दिवस घरी येत असतांना एका ट्रक ने त्याला उडवलं आणि जागच्या जागीच सर्व संपलं. असा २४ वर्षाचा तरणा बांड मुलगा अचानक सोडून गेला त्यामुळे काका भानच विसरले. काकूंची सुद्धा अवस्था काही वेगळी नव्हती. त्या दिवसांनंतर त्याने नोकरीवर जाणेच सोडले. चांगला बँकेत अधिकाराच्या पदावर होता, पण बँक तरी किती वाट पाहणार? शेवटी नोकरी गेली. असं जवळ जवळ एक वर्ष झालं. दिवसभर त्यांच्या खोलीत बसून असत, इतरांशी तर सोडाच, आपसात सुद्धा बोलत नव्हते. डॉक्टर झाले, कौंसेलर झाले, पण फरक काही पडला नाही. आम्हाला कोणालाच कळत नव्हतं की या अवस्थेतून त्यांना कसं बाहेर काढायचं ते. मग एक दिवस त्याचा एक जवळचा मित्र भेटायला आला. गावात कोणाचं तरी प्रवचन सुरू होणार होतं. त्याबद्दल सांगत होता, आणि कसं तरी त्याला पटवून तो प्रवचनाला घेऊन गेला. मग मात्र सलग १० दिवस काकाने त्या प्रवचनाला हजेरी लावली.” – वसंतराव

“मग काय झालं?” – निशांत.

“या १० दिवसांत त्याने काकुला पण सोबत नेलं होतं. यानंतर मात्र त्यांच्या वागण्यात बदल झाला. वाराणसीला आश्रमात जाऊन राहण्याची भाषा करू लागले, आणि एक दिवस खरंच थोडं फार सामान घेऊन ते वाराणसीला निघून गेले. जायच्या अगोदर या प्रॉपर्टी वरचा हक्क पण सोडून गेले. पुन्हा परत येणार नाही, असं निर्वाणीचं सांगून गेले. पोचल्यावर कळवतो म्हणाला होता, पण जवळ जवळ महिना उलटून गेला तरी पत्र आलं नाही.” – काका.

“मग आत्ता नेमके कुठे आहेत ते? आम्ही कुठे शोधायचं त्यांना?” – निशांत.

एक महिन्यानंतर काळजी वाटली म्हणून मीच वाराणसीला गेलो. तिथे अखंडानंद स्वामींच्या मठात ते राहत होते. दिवसभर त्यांची सेवा चालायची. बरं चाललं होतं. खुश होते. मग मी समाधानाने वापस आलो. त्यानंतर काही भेट नाही. आणि बोलणं पण नाही.” – काका.

क्रमश:........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com