तोतया वारसदार
पात्र रचना
वसंतराव परांजपे कावेरी गोखल्यांचे आताचे वंशज
प्रभावती वसंतरावांच्या पत्नी
त्र्यंबक वसंतरावांचे काका.
गोविंद वसंतरावांचा धाकटा भाऊ.
भाग ३३
भाग ३२ वरून पुढे वाचा....
“मग त्र्यंबक काका आत्ता नेमके कुठे आहेत? आम्ही कुठे शोधायचं त्यांना?” – निशांत.
एक महिन्या नंतर काळजी वाटली म्हणून मीच वाराणसीला गेलो. तिथे अखंडानंद स्वामींच्या मठात ते राहत होते. दिवसभर त्यांची सेवा चालायची. बरं चाललं होतं. खुश होते. मग मी समाधानाने वापस आलो. त्यानंतर काही भेट नाही. आणि बोलणं पण नाही.” – वसंतकाका
“म्हणजे आता त्यांची काय परिस्थिती आहे हे तुम्हाला पण माहीत नाही.” – रोहन.
“बरोबर. तुम्हालाच जाऊन चौकशी करावी लागेल.” – काका.
“तुमचा धाकटा भाऊ, गोविंद, तो का बाहेर पडला? कशावरून तुमचं भांडण झालं? काय कारण होतं? हे विचारतो आहे कारण त्यांच्याशी भेट झाल्यावर कसं बोलायचं हे ठरवता येईल.” – निशांत.
“माझं ऐकाल तर त्याच्या नादी लागू नका. अख्खी इस्टेट घेईल आणि अत्यंत थोडक्या वेळेत वाट लावून टाकेल” – वसंतराव.
“नाही काका, असं नाही करता येणार. अर्थात हे सारंग वकिलच बाकीच्या दोघांशी चर्चा करून ठरवतील. बघूया, काय निर्णय सारंग सर घेतात ते. पण तुम्ही आम्हाला त्यांची पूर्ण माहिती द्या. ती आम्ही सारंग सरांना देऊ, मग ते ठरवतील काय करायचं ते. आणि त्याप्रमाणे आम्ही पुढे जाऊ.” – निशांत.
“ठीक आहे, तुमचा तसा आग्रहच असेल तर सांगतो. पण नंतर म्हणू नका की मी आधी सावध केलं नव्हतं म्हणून.” – काका.
“असं बघा काका, तुम्ही दिलेली माहिती, आधी आम्ही समस्त गोखले मंडळींना आणि सारंग सरांना सांगू. मग ते सर्वानुमते जो निर्णय घेतील, त्याप्रमाणे करू.” – निशांत.
“ठीक आहे. गोविंद माझा धाकटा भाऊ, खूप हुशार, वर्गात नेहमी पहिला नंबर. दहावीला जेमतेम ४ मार्क कमी पडले म्हणून मेरिट मधे नाही आला. १२ वी ला सुद्धा ८० टक्के मार्क पडले. कॉलेज मधे सुद्धा फर्स्ट क्लास कायम. फिज़िक्स मधे M.Sc. केलं फर्स्ट क्लास मधे. बोलणं अत्यंत मधुर. जग मित्र. कोणाच्याही मदतीला तत्परतेने ढाऊन जायचा. इतका सद्गुणी मुलगा होता. बँकेची परीक्षा देऊन एका राष्ट्रीकृत बँकेत ऑफिसर म्हणून नोकरीला सुद्धा लागला. पहिलं पोस्टिंग मिळालं हुबळी. ट्रेनिंग संपल्यावर त्यांची बदली कोल्हापूरला झाली. तिथेच सगळी गडबड झाली.
एकदिवस बँकेत स्टाफ खूप कमी होता, दुसऱ्या ब्रँच मधून माणूस मागवला होता, पण तो आला नाही, मग याला कॅश काऊंटर वर बसावं लागलं. त्यावेळेला चेक दिल्या नंतर, टोकन दिलं जायचं आणि टोकन नंबर पुकारल्यावर तो माणूस टोकन वापस करून कॅश घेऊन जायचा, अशीच पद्धत होती. व्यापारी क्षेत्रा मधली ब्रँच असल्याने मोठमोठ्या रकमांची उलाढाल असायची. माणसंही नेहमीचीच, सगळाच व्यापारी वर्ग तसा ओळखीचाच होता. या ओळखीनेच घात केला. बोलता बोलता गोविंदने टोकन न घेताच, त्या माणसाला ३५ हजारांची कॅश दिली. बँक बंद झाल्यावर कॅश आणि टोकन टॅली करावं लागतं. ते होत नव्हतं. पुन्हा पुन्हा चेक केल्यावर लक्षात आलं की एक टोकन घ्यायचं राहिलं. हिशोब सापडला, पण जर त्या माणसाने उद्या पुन्हा टोकन आणलं आणि पैसे मागितले तर काय करायचं हा प्रश्न उभा राहिला होता.” वसंतराव थांबले. हा इतिहास त्यांच्यासाठी क्लेशकारक होता असं दिसत होतं.
“मग काय झालं? – रोहन.
“मग रात्र झाली होती तरी त्या माणसाच्या घरी बँक मॅनेजर आणि गोविंद आणि अकाऊंटंट असे तिघे जण गेले. घरात बरीच पाहुणे मंडळी दिसत होती. आनंदाचा प्रसंग नक्कीच नव्हता कारण सर्वांचे चेहरे गंभीर होते. चौकशी करता, कोणी तरी सांगीतलं की त्या व्यापाऱ्याचे वडील वारले होते, आणि तो आणि त्यांच्या बरोबर अजून तीन जण अलाहाबाद ला संगमावर वडिलांचं श्राद्ध करण्या साठी गेले आहेत आणि आठ एक दिवस तरी लागतील परत यायला.” – वसंतराव.
“आर बापरे मग काय झालं?” – रोहन
“मग काय? बँकेला भावना नसतात. ती नियमानुसार चालते. मॅनेजरने गोविंद ला ताबडतोब ३५ हजार बँकेत भरायला सांगितले. रात्रीतल्या रात्रीत गोविंद इथे आला, सकाळी बँक उघडल्यावर, मी त्याला पैसे दिले, आणि उलट्या पावली तो कोल्हापूरला वापस गेला. बँकेत पैसे भरले. त्यामुळे त्याला अटक झाली नाही. पण या गोष्टीचा त्यांच्या हळव्या मनावर खूप परिणाम झाला. त्याचा हसतमुख स्वभाव नाहीसा झाला. तशातच त्याची पदावनती झाली. त्याला खालच्या पोस्ट वर धारवाड ला पाठवण्यात आलं.” वसंतराव पुन्हा थांबले.
“बापरे हे भयंकर आहे, पण काका या परिस्थितीत तर तुम्ही त्यांच्या मागे भक्कम पणे उभं राहायला हवं होतं, आणि नक्कीच तुम्ही त्यांच्या मागे उभं राहिला असाल, पण मग भांडण कशामुळे झालं?” – लक्ष्मण.
“मी त्याच्या पाठीशी उभा होतोच. या सर्व प्रकारात त्याची चूक होती, पण ती अनावधानाने झाली होती. पण त्याची पदावनती झाली आणि तो खचुनच गेला. कोणाशी बोलेनासा झाला. एवढा बोलघेवडा माणूस, पण एकदम शांत झाला. धक्का पंचवू शकला नाही. हळू हळू बँकेत गैरहजर राहणं वाढत चाललं. सर्व लोकांना त्याच्या बद्दल सहानुभूति होती आणि ते त्याला सांभाळून पण घेत होते. पैसा पुरेना, मग उद्धार उसनवार पैसे घेणं सुरू झालं. एकदिवस त्याचा जवळचा मित्र मला भेटायला आला. त्याचं सासर कारवारच होतं. बायकोला सोडायला आला होता. मला त्याने सांगीतलं की जवळ जवळ ३० हजार रुपयांचं कर्ज गोविंदच्या डोक्यावर आहे आणि आता तो तोंड लपवून फिरतो आहे. त्याची बँकेतली नोकरी गेल्यातच जमा आहे.” – वसंतकाका
“बापरे अहो काय हे, वाताहतच झाली म्हणायची” लक्ष्मण म्हणाला.
“हो. अगदी खरं आहे. मी धारवाडला गेलो आणि त्याची सर्व उधारी चुकवली. त्याला म्हंटलं की नाही तरी नोकरी गेल्यातच जमा आहे, तर तू आता कारवारला चल. कुटुंबात राहून तुझी मन:स्थिती सुधारेल. त्याला घेऊन मी कारवारला आलो. पण त्याने माझ्या ओळखीच्या लोकांकडून पैसे घ्यायला सुरवात केली. माझा भाऊ म्हणून त्या लोकांनी पण दिले. पुन्हा मी सगळ्यांची उधारी चुकवली. पण नंतर मात्र मी त्यांच्यावर नजर ठेवली. त्याला कसलं व्यसन आहे का ते मला बघायचं होतं.” – वसंतकाका.
“मग?” - रोहन
व्यसन म्हणावं असं कसलाच व्यसन नव्हतं. नित्य नेमाने कारवार स्टेशनच्या पासून थोडं दूर एका दगडावर बसून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या पाहायच्या. आणि टाइम पास म्हणून समोसे किंवा बटाटेवडे खात बसायचं, बस, एवढंच व्यसन होतं त्याला. अजून कुठलंच नाही.” – वसंतकाका
“पण काका समोसे खाऊन हजारो रुपयांचं कर्ज नक्कीच होणार नाही.” – निशांत.
“नाही ना, मी अगदी हेच म्हणालो त्याला. मी सांगीतलं त्याला की रोज खाण्यापिण्या साठी जितके लागतील तितके पैसे मी देतो, पण तू लोकांना मागू नकोस. पण माझं म्हणणं त्याने पटल्यांसारखं दाखवलं.” – वसंतराव.
“मग माशी कुठे शिंकली?” -लक्ष्मण म्हणाला. पण सगळेच ही कथा ऐकून खुपच गोंधळले होते. भांडण का झालं याचा काही कुठे थांग पत्ता लागतच नव्हता.
मग एक दिवस त्याने मला ५००० रुपये मागीतले. मला जरा आश्चर्यच वाटलं. मी विचातरलं. “कशा साठी हवेत तुला इतके पैसे?”
“हे बघ, तू म्हणाला होतास की तू मला हवे तेवढे पैसे देशील म्हणून, मग आता का विचारतो आहेस? द्यायचे नसतील तर स्पष्ट सांग.” गोविंदा म्हणाला. त्यावेळेस मी त्याला ५००० रुपये दिले. तो काय करतो हे पाहण्यासाठी मी त्यांच्या मागे मागे गेलो. तर तो झोपडपट्टीत जाऊन ज्या ज्या मुलांची शाळेची फी थकली होती त्यांची नावं आणि शाळा लिहून घेत होता, आणि नंतर शाळेत जाऊन ती भरून आला. मी हतबुद्ध झालो. तो वाईट काम करत नव्हता, पण असा खर्च करायची त्यावेळी माझी ऐपत नव्हती. मी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण तो ऐकायला तयारच नव्हता. मग मी त्याला निक्षून सांगीतलं की असे लोकांवर लुटायला माझ्या जवळ पैसे नाहीयेत. तू स्वत: कमव आणि तुला वाटेल तशी विल्हेवाट लाव. माझं काही म्हणणं नाही. त्याच दिवशी तो रात्री घर सोडून निघून गेला.” – वसंतकाका
“हे तर एखाद्या नाटक सिनेमात शोभावं असंच झालं. मग पुढे काय झालं त्याचा शोध घेतला का तुम्ही?” – लक्ष्मण
“दोन – तीन दिवस वाट पाहिली आणि पोलिसांना सर्व सांगून तक्रार नोंदवली. ते म्हणाले की २६ -२७ वर्षाचा माणूस जर घरातून निघून गेला आहे, आणि तो मतिमंद नाहीये, तेंव्हा आम्ही त्याला शोधायचा प्रयत्न करू, पण काही साध्य होईल असं वाटत नाही. मग जवळ जवळ एक वर्षाने त्याचा फोन आला. तो एका आश्रमात राहत होता. पत्ता मिळाल्यावर मी लगेच त्याला भेटायला नाशिकला गेलो.” – वसंत काका.
“चला म्हणजे पत्ता मिळाला म्हणजे सुखरूप आहे. चिंता मिटली.” – लक्ष्मण.
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com