तोतया वारसदार
पात्र रचना
वसंतराव परांजपे कावेरी गोखल्यांचे आताचे वंशज
प्रभावती वसंतरावांच्या पत्नी
त्र्यंबक वसंतरावांचे काका.
गोविंद वसंतरावांचा धाकटा भाऊ.
भाग ३४
भाग ३३ वरून पुढे वाचा....
“हे तर एखाद्या नाटक सिनेमात शोभावं असंच झालं. मग पुढे काय झालं त्याचा शोध घेतला का तुम्ही?” – लक्ष्मण
“दोन – तीन दिवस वाट पाहिली आणि पोलिसांना सर्व सांगून तक्रार नोंदवली. ते म्हणाले की २६ -२७ वर्षाचा माणूस जर घरातून निघून गेला आणे आही तो मतिमंद नाहीये, तेंव्हा आम्ही त्याला शोधायचा प्रयत्न करू, पण काही साध्य होईल असं वाटत नाही. मग जवळ जवळ एक वर्षाने त्याचा फोन आला. तो एका आश्रमात राहत होता. पत्ता मिळाल्यावर मी लगेच त्याला भेटायला नाशिकला गेलो.” – वसंत काका.
“चला पत्ता मिळाला म्हणजे सुखरूप आहे. चिंता मिटली.” – लक्ष्मण.
“आता बराच सुधारला होता, आश्रमातली बरीच कामं करायचा तो, त्याला राहायला एक खोली पण होती. तिघं जण एका खोलीत. सर्व पगारी कामगार. मला काही ते आवडलं नाही मी त्याला विचारलं, की स्वतंत्र खोली घेऊन का राहत नाहीस, तर तुटपुंज्या पगारात खोली भाडं परवडत नाही असं त्याचं उत्तर होतं. मग मी त्याला म्हंटलं की कारवारला चल. तर नाही म्हणाला. मग मी एका खोलीचे १० वर्षांचं भाडं भरलं. आणि त्याला सांगीतलं. त्याच दिवशी तो नव्या खोलीत शिफ्ट झाला. आता त्याला चार वर्ष होताहेत. अधून मधून तो फोन करतो आणि खुशाली कळवतो. मी दर वेळेस त्याला इथे ये म्हणतो आणि तो नाही म्हणतो. माझा बराच व्याप वाढला आहे असं म्हणतो. मी आश्रमातल्या संचालकाशी बोलतो आणि त्याच्या बद्दल माहिती घेत असतो. पण कसला व्याप वाढला आहे हे काही कळलं नाही.” – वसंतरावांनी गोविंद पुराण संपवलं.
थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही. मग लक्ष्मण म्हणाला की चला बराच उशीर झाला आहे, आता आपण निघायला हवं.
“अरे, असं कसं लक्ष्मणराव, न जेवता जाणार तुम्ही? जेवणाची वेळ झालीच आहे, जेवूनच जा.” जेवतांना वसंतराव जरा गप्पच होते, लक्ष्मणने कारण विचारलं तर म्हणाले,
“मी जरा वंशावळी वर विचार करत होतो, आमची वंशावळी पाहून झाली, पण लक्ष्मणा तुमच्या वंशावळीत, तू, विश्राम आणि अनिल यांच्या मधल्या पिढीच्या बद्दल काहीच उल्लेख नाही, हे कसं? ते पण बघायला हवं, म्हणजे तुम्ही शोधायलाच निघाला आहात म्हणून म्हणतो, अजून काही नाही.”
“अहो आमचं काही नाही. प्रत्येक पिढीत एकच मुलगा, हे विधिलिखित होतं. त्यामुळे शाखा उपशाखा हा प्रकारच नाहीये.” – लक्ष्मण
“ही काय भानगड आहे? असं कधी असतं का? लक्ष्मणा जरा फोड करून सांगशील का?” – काका.
“आमच्या बद्दल सांगायचं झालं तर,” लक्ष्मण बोलत होता, “आमची पाती विश्वनाथ पासून सुरू झाली. त्यांना तीन मुलं ओंकार श्रीपति आणि कावेरी. कावेरीबाईंचे वंशज काका तुम्ही. ओंकार चे वंशज विश्राम आणि अनिल. श्रीपतिरावांना बरीच वर्ष मूल होत नव्हतं, समाजामध्ये त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना फार त्रास होत होता, त्यांच्या वर वांझ म्हणून शिक्का बसला होता. त्यामुळे कामं पण हळू हळू कमी व्हायला लागली होती. मग एक दिवस वैतागून श्रीपतिराव अनुष्ठानाला बसले. निराहार आणि निर्जळा अनुष्ठान होतं ते. १८ दिवस अन्न पाण्या विना तपश्चर्या चालू होती. अठराव्या दिवशी त्यांना दृष्टान्त झाला, प्रत्यक्ष महादेव त्यांच्या स्वप्नात आले. त्यांनी सांगितलं की त्यांच्या नशिबात मूल नाहीये, पण त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन त्यांनी वर दिला की त्यांना तीन मुलं होतील, पण पुढाली पिढी निपुत्रिक असेल. श्रीपति रावांनी विचार केला की वंश खुंटलां तर कसं चालेल. मग त्यांना उ:शाप मिळाला की तिन्ही पिढ्यात तीन पोरं येतील. नंतर मात्र ज्यांच्या त्यांच्या कर्मानुसार होईल. त्यामुळे त्यांच्या नंतरच्या तीन पिढ्या एकाच मुलावर समाधान मानत होत्या. माझ्या वडिलांच्या वेळेस हा क्रम तुटला आणि मी आणि वर्षा अशी दोन मुलं झालीत. आता विश्रामकाकांना विचारावं लागेल की मधल्या फळीचा इतिहास सांगा म्हणून.”
“बरोबर आहे. आता पुन्हा साताऱ्याला जाल तेंव्हा नीट विचारपूस करून ठेवा.” – काका
नवीन नाते संबंध जोडल्या गेले होते, त्यामुळे सगळेच आनंदात होते. त्याच आनंदात त्यांनी गोकर्ण ची वाट धरली.
“निशांत, काय विचार आहे?” गोकर्णला जाता जाता प्रवासात, रोहनने विचारलं
“मला असं वाटतं की आधी इथून सरळ नागपूर गाठावं. सारंग सरांशी सविस्तर बोलावं, बऱ्याच घडामोडी झाल्या आहेत, त्या त्यांच्या कानावर घालून मग पुढच्या योजनेचा तपशील ठरवावा.” – निशांत.
“ठीकच आहे. पण मला सांग, आता मी कशाला थांबायचं इथे. गोकर्णचं काम झालंय. आता मला असं वाटतं की मी जाऊ शकतो वापस, तिथे जय वर कामाचा खूप बोझा पडत असेल.” – रोहन.
“बरोबरच आहे. तू जयला फोन करून विचार आणि दोघं मिळून काय ते ठरवा. मला एकट्यानेच काम करायची सवय आहे. तू बरोबर होतास म्हणून तुझ्या पण आयडिया मिळायच्या आणि मुख्य म्हणजे आपण काम करतो आहोत असं वाटायचं नाही. गोकर्ण आणि साताऱ्याची कामं अगदी हसत खेळत झाली.” – निशांत.
“आणि कारवार? ते तर लक्ष्मणने अगदी एका हाती पार पाडलं.” – रोहन.
“हो खरं आहे. मला तर असं वाटायला लागलं आहे की लक्ष्मण आणि वर्षा दोघंही डिटेक्टिव आहेत, चुकून मंदिरात काम करताहेत.” – निशांत.
“काय? माझ्या नावाने काय शिमगा चालू आहे? मी मंदिरातच बरा आहे.” – लक्ष्मण.
असाच हसत खेळत मंडळी गोकर्णला पोचली. ते घरात शिरतच होते, की फोन खणखणला. लक्ष्मणने उचलला. पलीकडच्या टोकाला विश्राम होता, म्हणत होता, “काय पोचले का घरी?”
“हो, घरात पाऊल ठेवलं आणि तुमचा फोन आला काका. बोला काय म्हणता आहात? तुम्हाला पोचल्याचा फोन करणारच होतो, काही नवीन बातमी आहे का?” – लक्ष्मण.
“हो, आत्ताच सान्यांचा फोन आला, ते साताऱ्याच्या वाटेवर आहेत. साधारण रात्री ३ वाजे पर्यन्त पोचतील. हॉटेल वर उतरणार होते, पण मी म्हंटलं की अजिबात संकोच करू नका, सरळ घरीच या. तर आता तुम्हा लोकांचा काय विचार आहे?” – विश्राम.
“मला मनापासून आवडलं असतं तिथे यायला. पण मला तर काका आता जास्ती दिवस बाहेर राहून चालायचं नाही. त्यामुळे मी तर नाही येऊ शकणार, पण निशांत आणि रोहन येतील. तसेही ते नागपूरला जाऊन, सारंग वकिलांशी घडलेल्या साऱ्या गोष्टी डिसकस करणार होते, तर नागपूरला जाता जाता ते साताऱ्याला थांबतील एखाद दिवस. काका सान्यांना सांगा की गोकर्ण हे पुरातन मंदिर आहे, आणी जागृत दैवत आहे, जर ते गोकर्णला आले, तर नक्कीच आम्हाला खूप आनंद होईल. ” लक्ष्मण.
“सांगतो, तुझं आग्रहाचं निमंत्रण कानावर घालतो त्यांच्या. असं करतो त्यांचं आणि तुझं बोलणं करून देतो उद्या संध्याकाळी, मग तर झालं? बाकी तुझंही बरोबरच आहे, सुट्टी किती घ्यायची याला मर्यादा असते. दे रोहनला फोन. मीच बोलतो त्यांच्याशी.” – विश्राम.
रोहन बोलला विश्रामशी आणि सांगितलं की उद्याच ते दुपार पर्यन्त साताऱ्याला पोचतील म्हणून. निशांतला जायचं एवढं जिवावर आलं होतं, पण इलाज नव्हता. तो संधि साधून वर्षाला म्हणाला सुद्धा, काकांना सुद्धा आत्ताच फोन करायचा होता, आरामात उद्या केला असता तर चाललं नसतं का?”
“हो न रे, आपलं नीट असं बोलणंच होत नाहीये, कायम आपले सर्वांच्या गराड्यात. आणि आता तू जाणार, मग केंव्हा भेट होणार देव जाणे. पण प्रॉमिस कर की रोज रात्री फोन करशील म्हणून.” – वर्षा.
“अग तुझ्याशी बोलल्या शिवाय, मला तरी चैन पडणार आहे का? तू केंव्हा फ्री असशील ते मला कळणार नाही, तेंव्हा तूच मला मिस् कॉल देत जा. मग मी कॉल बॅक करीन. चालेल ना?” – निशांत.
“ओके मी देईन मिस् कॉल” – वर्षा.
“दुसऱ्या दिवशी, सकाळी ७ वाजता रोहन आणि निशांत निघाले. साताऱ्याला पोचता पोचता दुपारचे साडे तीन वाजले. एक दिनेश आणि विनय सोडता सगळेच घरी होते.
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com