तोतया वारसदार
पात्र रचना
बबन सारंग वकिलांचा चपराशी.
सुभाष गोखले बबनचा बार मधला मित्र.
भाग ३५
भाग ३४ वरून पुढे वाचा....
सुभाष सकाळी सकाळीच नागपूरच्या गणेशपेठच्या बस स्टँड वर होता. चंद्रपूरची बस अजून लागायची होती. त्याने कॅंटीन मधे जाऊन चहा घेतला. तिथेच एक कंडक्टर बसला होता, त्याला सहज सुभाषने विचारलं की चंद्रपूरची बस केंव्हा लागणार आहे म्हणून. तो म्हणाला की आत्ताच. ड्रायवर बस लावताच असेल. माझा पण चहा पिऊन झाला आहे. चला, तुम्हाला चंद्रपूरला जायचं असेल तर चला माझ्याच बरोबर. सुभाषचं आरक्षण होतं त्यामुळे चिंता नव्हती.
सुभाष चंद्रपूरला पोचला तेंव्हा साडेबारा वाजले होते. बस स्टँड वरुन त्याने रिक्शा पकडली आणि सरळ शाळेत गेला. लंच टाइम होता त्यामुळे ऑफिस मधे कोणीच नव्हतं. सुभाष चरफडला. टाइम पास म्हणून सिगरेट पिण्यासाठी बाहेर पडला, पण शाळेच्या ५०० मिटर पर्यन्त परवानगी नसल्याने, जवळ पास पान ठेला पण नव्हता. वाट पाहाण्या व्यतिरिक्त त्याच्याजवळ काहीच उपाय नव्हता. येऊन बसला बाकावर. साधारण दीड च्या सुमारास सर्व कारकून लोकं आले. पहिल्याच कारकुनाला त्याने विचारले, “लिविंग सर्टिफिकेटचं काम कोण करतं?” त्यांच्या तोंडात तंबाखूचं पान गच्च भरलं होतं, त्यामुळे त्याने बोटानेच शेजारच्या माणसाकडे बोट दाखवलं. सुभाष त्या माणसाच्या समोरच्या खुर्चीवर बसला.
“लिविंग सर्टिफिकेटचं काम होतं.” स्वरात अत्यंत मवाळपणा आणून सुभाष बोलला. खरं तर तो येऊन दोन तास झाले होते आणि अजून कामाला सुरवातही झाली नव्हती. जाम वैतागला होता.
“त्याने हातानेच इशारा करत थांबायला सांगितलं. त्यानेही पानाचा तोबरा भरला होता. सुभाष महापालिकेत होता. तिथे पण हे जेवण झाल्यावरचं सर्व सामान्य दृश्य होतं. सुभाषला चीड आली, पण थांबण्या शिवाय इलाज नव्हता. तो गप्प बसला. इकडे त्या कारकुनाची ब्रह्मानंदी टाळी लागली होती. १० -१५ मिनिटं झाल्या नंतर तो बाहेर जाऊन मुख प्रक्षालन करून आला आणि सुभाष कडे पाहून म्हणाला “बोला काय काम आहे?”
“ते लिविंग सर्टिफिकेट जरा दुरुस्त करून घ्यायचं होतं.” – सुभाष.
“कोणाचं?” – कारकून.
“माझंच.” – सुभाष.
“तुमचं शिक्षण अजून चालू आहे?” – कारकून.
“नाही, मी B.Com. आहे.” – सुभाष. त्याला कळेना की कारकून असे संबंध नसलेले प्रश्न का विचारो आहे ते. पण उत्तर देण्यावयाचुन गत्यंतर नव्हतं म्हणून तो संयम बाळगून होता.
“म्हणजे तुम्ही पदवीधर आहात, मग तुम्हाला लिविंग सर्टिफिकेटची काय जरूर आहे? म्हणजे असं कोणतं काम आहे की जे या सर्टिफिकेट विना होणार नाहीये?” कारकून म्हणाला, आता त्याला संशय यायला लागला होता.
“साहेब, माझं दुसरं एक महत्वाचं काम त्याच्या साठी कदाचित या कागदाची जरूर पडू शकते. ऐन वेळेवर काम अडू नये म्हणून, सोय म्हणून मला हे सर्टिफिकेट पाहिजे आहे.” – सुभाष.
कोणच्या वर्षांचं आहे?” – कारकून
“१९८७ ला मी याच शाळेतून SSC झालो. त्याच वर्षांचं” – सुभाष.
“अरे बापरे, म्हणजे १३ वर्षांपूर्वीचं, शोधायला थोडा वेळ लागेल. असं बघा आम्ही काय सर्टिफिकेट दिलं होतं ते आधी चेक करावं लागेल, मग तुम्हाला काय दुरुस्ती पाहिजे आहे ते सांगा. तूर्तास थोडा वेळ तुम्ही बाहेर बसा. तुमचं सर्टिफिकेट मिळालं की मी तुम्हाला बोलावतो.” – कारकून.
सुभाषला जरा बरं वाटलं. निदान कामाला सुरवात झाली होती. पोटात कावळे कोकलत होते, सॉलिड भूक लागली होती. सकाळ पासून पोटात काही नव्हतं. तो म्हणाला, “मी जरा नाश्ता पाणी करून आलो तर चालेल ना?”
“हो हो तो पर्यन्त मी कागद शोधून ठेवतो. या तुम्ही ” – कारकून.
सुभाष ला चंद्रपूरची सर्वच माहिती होती. कित्येक वर्ष तो चंद्रपूरात राहिला होता. जवळच्याच हॉटेल मधे जाऊन त्याने नाश्ता उरकला, आणि पुन्हा शाळेत गेला.
थोड्या वेळाने कारकुनाने त्याला आत बोलावलं, त्यांच्या हातात एक रजिस्टर होतं आणि सुभाषच्या सर्टिफिकेटचं पान उघडून ठेवलं होतं.
“द्या तुमची कॉपी इकडे आणि सांगा काय दुरुस्ती करायची आहे.” – कारकून.
“ही घ्या. वडिलांच्या नावात दुरुस्ती करायची आहे.” – सुभाष.
“वडिलांच्या नावात? ही काय भानगड आहे? आज पर्यन्त माझ्या आठवणीत कोणीच वडिलांचं नाव बदलून घेतलं नाही. जन्म तारीख, जन्म गाव, पत्ता अशाच दुरुस्त्या कराव्या लागतात. तुम्हीच पहिले, जे वडिलांचं नाव बदलून मागता आहात.”- कारकून
“साहेब, माझ्या वडिलांचं नाव अविनाश आहे. पण याच्यावर आश्विन असं पडलं आहे. ते तेवढं बदलून द्या.” – सुभाष.
“या सर्टिफिकेट वर वडिलांचं नाव चुकीचं पडलं आहे हे गेली इतकी वर्ष तुमच्या लक्षात आलं नाही? हे कसं शक्य आहे? काही तरी घोळ आहे.” – कारकून
“आता नाही लक्षात आलं त्याला काय करायचं, पण साहेब, घोळ काहीच नाहीये. आत्ता लक्षात आलं एवढंच.” – सुभाष.
कारकुनाचा सुभाषच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता, आणि ते त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. “असं कोणचं काम आहे की जे शाळेच्या लिविंग सर्टिफिकेट वर अवलंबून आहे?” – कारकून.
“अहो साहेब, खाजगी काम आहे, छोटसं काम आहे करून टाका न.” – सुभाष.
“तुमच्या वडिलांचं नाव आश्विन नसून अविनाश आहे याला पुरावा काय?” – कारकून.
मग सुभाषने गोपालगंज शाळेचं खोटं सर्टिफिकेट दाखवलं. म्हणाला,” हा घ्या पुरावा साहेब,”
कारकुनाने ते सर्टिफिकेट बघितलं, मग त्यांच्या रजिस्टर मधल्या नोंदी बघितल्या. मग मान हलवली आणि म्हणाला, “या कागदाचा काही उपयोग नाही. आमच्याकडे हिंदमोटरच्या शाळेच्या सर्टिफिकेट वरच्या नोंदी आहेत. हे बांग्लादेश मधल्या गोपालगंज शाळेचं सर्टिफिकेट दिसतं आहे. हे तुमचंच कशावरून? तुमची काही तरी भानगड दिसते आहे. सॉरी, मी हे काम करू शकत नाही. या तुम्ही.”
सुभाष निराश झाला. त्याने असं काही होईल यांची कल्पनाच केली नव्हती. तो पुन्हा म्हणाला, “साहेब, माझं महत्वाचं काम आहे हो, ते झालं नाही तर मला फार मोठा फटका बसेल. प्लीज हे करून द्या न.”
“हे तुमचं काम होऊ शकेल, पण या बांग्लादेशच्या शाळेच्या सर्टिफिकेट वर माझा विश्वास नाही. आमच्या नोंदी प्रमाणे तुम्ही इथे हिंदमोटर च्या शाळेतून आला होता. त्याच शाळेचे दुरुस्ती पत्रक जर तुम्ही आणलंत, तर कदाचित काही आशा आहे. ते आणता येतं का बघा आणि मग या.” – कारकून
“साहेब, गरिबांवर दया करा हो, इतक्या दूर जाऊन त्या शाळेचं सर्टिफिकेट आणायचं म्हणजे काय चेष्टा आहे का? त्यापेक्षा तुमची काही अपेक्षा असेल, तर सांगा मी करतो.” – सुभाष.
कारकुनाची कारकीर्द स्वच्छ होती आणि त्याला निवृत्त व्हायला काही महिनेच उरले होते. तो आपल्या अंगावर हा डाग लावून घ्यायला मुळीच तयार नव्हता. तो म्हणाला, “हे बघा, तुम्ही कोण आहात हे मला माहीत नाही, मी असलं काम करत नाही. शांतपणे बोलतो आहे तोपर्यंत, इथून ताबडतोब निघून जा, नाहीतर प्रिन्सिपल सरांकडे तुमची तक्रार करेन.”
सुभाषचा आता नाईलाज झाला. त्याने माती खाल्ली, हे त्याला उमगलं, पण आता उशीर झाला होता. तो निमूटपणे बाहेर गेला. जाता जाता त्याने मागे वळून पाहिलं तेंव्हा त्याच्या लक्षात आलं, की शेजारचा कारकून, ज्याला तो प्रथम भेटला होता, तो काही खाणा खुणा करत होता, सुभाषने त्याच्याकडे बघून मान हलवली आणि तो बाहेर गेला.
शाळा सुटली, सर्व मुलं घरी गेली, तो म्हातारा कारकून पण बाहेर पडला. सुभाष लक्ष ठेऊन थोडा दूर बसला होता. आणखी थोडा वेळ गेला आणि मग दूसरा कारकून बाहेर पडला. त्याला पाहिल्यावर सुभाष समोर आला.
“बोला साहेब, काय म्हणता?” – सुभाष.
“तुमचं काम मला समजलं, अजून ४ दिवसांनंतर बडे बाबू सुट्टीवर जाणार आहेत. त्यांच्या मुलीचं लग्न आहे. अजून आठ दिवस जाऊ द्या, मग तुम्ही या. मी तुमचं काम करून देईन. पण थोडा खर्च करावा लागेल.” – दूसरा कारकून.
“किती?” - सुभाष
“तीन हजार.” – दूसरा कारकून.
“एक हजार वाजवी आहेत. तीन खूप जास्त होतात.” – सुभाष.
“तुमची मर्जी” असं म्हणून तो कारकून चालायला लागला.
“अहो थांबा. मी तयार आहे. मी आठ दिवसांनी येतो, पण तुम्ही सर्टिफिकेट तयार ठेवा. अजून उशीर नको.” – सुभाष.
“त्याची नका काळजी करू, कागद तयार असेल. पण अडवांस?” – दूसरा कारकून.
सुभाषने त्याला १५०० रुपये दिले. अविनाश हे नाव असलेलं सर्टिफिकेट दिलं. आणि तो निघाला.
आठ दिवसांनी सुभाष पुन्हा चंद्रपूरला गेला. शाळेत त्या कारकुनाने सर्टिफिकेट तयार ठेवलं होतं ते घेतलं, त्याला बाकीचे १५०० रुपये दिले. आता त्याचं काम झालं होतं. चंद्रपूरला थांबण्याची काहीच गरज नव्हती. त्याने नागपूरची बस पकडली.
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com