तोतया वारसदार - भाग 39 Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तोतया वारसदार - भाग 39

तोतया वारसदार

पात्र रचना

अक्षय साने            महादेवराव – सखारामपंत – रेवती --- अक्षय

वैशाली साने           अक्षय ची बायको.

शलाका साने           अक्षय ची मुलगी.

विश्राम आणि अनिल           - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -सहावी पिढी.

  साताऱ्याला  स्थायिक.

सुधा                        - विश्रामची बायको.

दिनेश आणि प्रांजल            -विश्रामची मुलं.

मालती                      - अनिलची बायको.

विनय                       - अनिलचा मुलगा

किशोर केळकर                - शुगर टेक्नॉलॉजिस्ट पुणे.

विभावरी केळकर               - किशोर ची बायको.

गार्गी केळकर                 - किशोरची मुलगी

                   

 

भाग  ३९                    

भाग ३८  वरून पुढे  वाचा....

 

“बापरे, एवढं सगळं झालं? आणि तरीही तू याच व्यवसायात आहेस? इतकी खरंच जरूर आहे का? दुसरी नोकरी शोध, मिळेल तुला.” – विश्राम.

“नाही हो काका, नोकरी मी आवड म्हणून करतो आहे. तशी आमच्या कडे संत्र्‍याची बागायती शेती आहे. वर्षांचं लाखों रुपयांचं उत्पन्न आहे, नोकरी नाही केली तरी चालण्या सारखं आहे. पण माझी साहसी वृत्ती मला स्वस्थ बसू देत नाही.” – निशांत.

‘ऐकावं ते नवलच आहे. तू वेगळाच आहेस, यात वाद नाही. पण रोहन तुझं काय? तुला सुद्धा आवडला आहे का हा व्यवसाय?” – विश्राम.

“काका अहो, मी काही तो व्यवसाय म्हणून स्वीकारणार नाहीये. सध्या निशांत बरोबर आहे एवढंच. सगळं आटोपल्यावर लंडनला जायचंच आहे. एवढा मोठा व्यवसाय आहे, तो सोडून कसं चालेल?” – रोहन.

“बरं मग नागपूरला जायला केंव्हा निघणार तुम्ही लोकं?” – विश्राम

“निशांत, मी नागपूरला नाही आलो तर चालेल का? काल बाबांचा फोन आला होता, त्या संदर्भात, जरा अक्षय काकांशी मला बोलायचं आहे. तुझं नागपूर आटोपून तू वाराणसीला निघाला, की मी पण इथून तिथे पोचतो. चालेल?” – रोहन.

“हो ,हो, न  चालायला काय झालं? इतके दिवस तू माझ्या बरोबर होतास, खूप छान गेले ते दिवस, पण मी समजू शकतो, तुमचा व्यवसाय आहे, आणि जरी इथे असलास, तरी, मूळ कामाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तसंही मी रोजच्या रोज अपडेट देणारच आहे, प्रश्न मिटला. पण रोहन, मी काय म्हणतो, लक्ष्मणराव त्या दिवशी म्हणत होते, की अक्षयकाकांना गोकर्णला घेऊन या म्हणून. मग असं कर न, यांना घेऊन, एक गोकर्ण ट्रीप मारून ये. तू बरोबर गेलास, तर काका, काकू आणि शलाकाला सुद्धा अवघडल्या सारखं होणार नाही. इनोव्हा आहेच. सगळंच सोपं. काय?” – निशांत.

“हो रे, निशांत एकदम बरोबर बोललास बघ. रोहन तूच जा या लोकांना घेऊन. वाटल्यास उद्याच निघा. काय शलाका चालेल ना?” – प्रांजल.

“मला चालेल, बाबा काय म्हणतात ते बघू.” – शलाका.

“का ग बाबांना जायची घाई आहे का?” – प्रांजल.

“नाही नाही, मला मुळीच घाई नाहीये, बऱ्याच दिवसांनी असं कुटुंबा बरोबर निवांत वेळ घालवायला मिळतो आहे, मी सांगून आलो आहे की किमान आठ दिवस तरी येणार नाही म्हणून. विश्राम, मी काय म्हणतो, तुम्ही पण गोकर्णला कधी गेला नसाल, तर आपण सगळेच जाऊ, छान एक दोन दिवस लक्ष्मणचा पाहुणचार घेऊ आणि मग आपापल्या वाटेला  लागू. विश्राम तू काय म्हणतोस.?” – अक्षय.

“चालेल. आम्हाला पण सुट्टीची आवश्यकता आहेच. पण अनिल दुकानाचं काय? आपण सगळे कसे जाणार?” – विश्राम.

“दुकाना कडे मी बघतो. तसंही मला सुट्ट्यांमधे फारसा इंट्रेस्ट नसतो, तुम्ही सर्व जा आणि एंजॉय  करा.“ – विनय.

“ह्या, असं कसं चालेल? आपण सगळेच जाऊ. दोन दिवसांचा तर प्रश्न आहे, गुप्ते आणि टिळक आहेत ना, ते सांभाळून घेतील. नाही तरी तेच सर्व बघतात” – विश्राम.

मग सगळा कार्यक्रम ठरला. दुसऱ्या दिवशी निशांत सकाळी नागपूरच्या वाटेवर आणि हे लोक गोकर्णच्या. ठरल्या प्रमाणे विश्राम लक्ष्मणला फोन करून सांगणार होता, पण दिनेशचं लग्न ज्या मुलीशी ठरलं होतं तिच्या वडिलांचा फोन आला की, ते कोल्हापूरला दर्शनाला आले होते, आणि सातारा जवळच असल्याने, ते भेटायला येत आहेत म्हणून. मग लक्ष्मणला फोन करणं राहून गेलं आणि वेगळीच म्हणजे दिनेशच्या लग्नाचीच चर्चा सुरू झाली. दोन एक तासात ते लोकं आलेच.

*****

मूळचे, लातूरचे किशोर केळकर हे एक वेगळंच प्रस्थ होतं. बरीच वर्ष क्यूबा आणि जमेका मधे शुगर टेक्नॉलॉजिस्ट म्हणून काम केल्यावर भारतात येऊन स्थायिक झाले होते. भारतात आल्यावर स्थायिक होण्या साठी त्यांनी पुण्याची  निवड केली. ते क्यूबा मधे असतांनाच त्यांची ख्याती इथल्या साखर कारखान्यांमधे पसरली होती. त्यामुळे, लवकरच त्यांचा इथे पण जम बसला. साखर कारखान्यांना त्यांच्या ज्ञानाची व्याप्ती कळली आणि बऱ्याच साखर कारखान्यांनी त्यांना सल्लागार म्हणून नेमलं.

त्यांची  बायको विभावरी, संस्कृतची पंडित होती. तिचा संस्कृत भाषेचा व्यासंग फार मोठा होता. संस्कृत व्याकरण हा तिचा आवडता विषय होता. पुण्याला एका कॉलेज मधे ती संस्कृतची प्राध्यापक होती.

त्यांची मुलगी गार्गी ही फिज़िक्स घेऊन M.Sc. झाली होती आणि पुण्याच्या एका खाजगी कंपनीत नोकरी करत होती. दिनेशची आणि किशोरची ओळख एका हॉटेल मधे झाली. दिनेशची आणि त्याचे पुण्याचे काही व्यापारी मित्र यांची एका नवीन प्रोजेक्ट बद्दल मीटिंग होती, आणि ती झाल्यावर ते सगळे एका हॉटेल मधे संध्याकाळी जेवायला गेले होते. त्याच हॉटेल मधे किशोर, विभावरी आणि गार्गी पण आले होते. जेवून बाहेर आल्यावर पाहिलं तर मुसळधार पाऊस पडत होता, वॅले जस जसे कार आणत होते, तसे एक एक जण जात होते, तिथेच किशोर आणि मंडळी उभी होती, किशोर कॅब् साठी प्रयत्न करत होता पण एकही कॅब् मिळत नव्हती. दिनेश शेजारीच उभा होता, त्याच्या लक्षात आलं, की बरोबर बायको आणि मुलगी आहे, रात्र पण झाली आहे, पावसामुळे, कॅब् पण येण्याची शक्यता धूसर आहे आणि म्हणून, त्याने किशोरला विचारलं की

“गाडी मिळत नसेल, तर मी तुम्हाला सोडू का?”

“अरे नको, गाडी येईल, तुम्ही कशाला त्रास करून घेता?” – किशोर.

“एवढ्या पावसात गाडी मिळणं मुश्किल आहे, रात्र झाली आहे म्हणून विचारतो आहे. मी थोडा वेळ थांबतो, नाहीच आली कॅब् तर सोडीन मी तुम्हाला घरी.” – दिनेश.

मग संभाषण सुरू झालं. दिनेश कोण, कुठला, काय करतो वगैरे सगळं विचारून झालं. किशोरचं समाधान झाल्यावर त्याने दिनेशला होकार दिला आणि सगळे दिनेशच्या गाडीत बसले. घरी पोचल्यावर विभावरीने दिनेशला कॉफीचा आग्रह केला. म्हणाली, “एवढ्या पावसात तुम्ही साताऱ्याला जाणार, तर कॉफी पिऊन जा, कदाचित पाऊस थोडा कमी होईल.”

मग हळू हळू वातावरणातला संकोच कमी होत गेला, आणि गप्पा बऱ्याच रंगल्या. पाऊसही आता थांबला होता, मग सर्वांना साताऱ्याला येण्याचं आमंत्रण देऊन दिनेश निघाला. गव्हाळ रंगाची चमकदार डोळ्यांची बुद्धिमान गार्गी त्यांच्या मनात घर करून बसली होती. घरी गेल्यावर बाबांशी या बाबतीत बोलायचं ठरवून तो साताऱ्याच्या रस्त्याला लागला. पुढचे दोन दिवस नवीन प्रोजेक्ट बद्दलच दिनेश, विश्राम, अनिल आणि विनय यांच्यात चर्चा चालली होती. पुण्यात जी दुसरी मीटिंग होणार होती, त्या साठी तयारी करणं आवश्यक होतं, त्यामुळे दिनेशला गार्गी बद्दल बोलणं शक्य झालं नाही. नंतर कामाच्या गडबडीत ते राहूनच गेलं.

तिकडे विभावरी पण गार्गी साठी दिनेशचा विचार करत होती. तिच्या मते गार्गी साठी दिनेश अगदी योग्य मुलगा आहे. घर, घराणं पण चांगलं आहे. दिनेशचा स्वभाव पाहता त्याच्या घरी गार्गीला  काही अडचण येईल, असं दिसत नव्हतं. किशोरला पण विभावरीचं बोलणं पटलं. म्हणाला, “एकदा साताऱ्याला जाऊन, त्यांचं घर आणि दुकान पाहायला पाहिजे. मी असं करतो पुढच्या आठवड्यात साताऱ्याला जाऊन येतो, मग ठरवू. पण गार्गी काय म्हणते? तिला विचारलं का? काय ग गार्गी तुला चालेल का?”

गार्गी लाजली, काही बोलली नाही, पण तिचा चेहराच सांगत होता, की तिला दिनेश आवडला होता.

आठ एक दिवसांनंतर एका शनिवारी संध्याकाळी दिनेशला किशोरचा फोन आला. त्यावेळी दिनेश दुकानातच होता.

“दिनेशराव उद्या आम्ही कोल्हापूरला दर्शनासाठी जाणार आहोत, सातारा परतीच्या वाटेवरच आहे, तेंव्हा तुमच्या कडे चहा प्यायला यायचा विचार करतो आहे, चालेल ना?”

“चालेल म्हणून काय विचारता? आवडेल. किती वाजे पर्यन्त येता ते सांगा, म्हणजे त्या  वेळेस आम्ही घरी येऊ.” – दिनेश.

“अहो उद्या रविवार आहे, सुट्टीचा दिवस. विसरलात का” – किशोर.

“नाही हो, दाग दागिन्यांची दुकानं रविवारी बंद ठेऊन कसं चालेल? आमची पेढी बुधवारी बंद असते.”

“आता दर्शनाला किती वेळ लागेल, हे सांगता येणार नाही, पण साधारण ४ तरी वाजतील.” - -किशोर.

“चालेल. काहीच अडचण नाही. या तुम्ही.” – दिनेश. मग दिनेश बाबांच्या केबिन मधे गेला. अनिल काका आणि विनयला पण बोलावून घेतलं. आणि सगळी कथा सांगितली.

“ते उद्या चार वाजे पर्यन्त पोचतील, मला असं वाटतं की एवढा मोठा तज्ञ माणूस आपणहून घरी येतो आहे, तर सर्वांनीच त्या वेळेस घरी असायला हवं.” – दिनेश.

“इथे सुद्धा कोणी तरी थांबायला हवं. मी थांबेन, म्हणजे बाबांना येतं येईल.” विनय म्हणाला.  

रात्री जेवणाच्या टेबल वर विश्राम किशोर आणि त्याचं कुटुंब यांच्या बद्दल बरीच चौकशी करत होता. दिनेशनी त्याला होती तेवढी माहिती दिली. विश्रामचं समाधान झालं. दुसऱ्या दिवशी तीन वाजता किशोरने फोन करून दिनेशला सांगीतलं की ते चार वाजे पर्यन्त पोचतील म्हणून. साडे तीन पर्यन्त, विश्राम, विनय आणि दिनेश घरी पोचले आणि पाहुण्यांची वाट पाहत बसले. त्यांना भेटायची सर्वांनाच उत्सुकता होती. एखाद्या विषयातले तज्ञ घरी येण्याची ही पहिलीच वेळ होती.

चारच्या सुमारास केळकर फॅमिली आली. धोतर आणि नेहरू शर्ट घातलेले किशोर  केळकर, नऊ वारी नेसलेल्या विभावारी केळकर आणि कॉटनची साडी नेसलेली गार्गी पाहून सर्वांनाच फार आश्चर्य वाटलं. इतकी मोठी माणसं पण तरीही इतकी साधी! असाच भाव सर्वांच्या चेहऱ्यावर होता.

 

क्रमश:........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com