तोतया वारसदार - भाग 42 Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तोतया वारसदार - भाग 42

तोतया वारसदार

पात्र रचना

बबन                       सारंग वकिलांचा चपराशी.

सुभाष गोखले                 बबनचा बार मधला मित्र.

 

भाग  ४२                  

भाग ४१  वरून पुढे  वाचा....

“मला तुमचं म्हणण बरोबर वाटतंय असंच करा. आपल्या डोक्याला ताप नको. आधीच परीक्षा आणि निकालांचं खूप ओझं असत.” – साहेब.

“ठीक आहे. पण साहेब मी त्याला पुढच्या बुधवारी त्याला बोलावलं आहे, तो आल्यावर त्याला काय सांगू?” – कारकून.

“सांगून  टाका की शाळेला पत्र पाठवलं आहे म्हणून, पण नको. काय घोळ घातला आहे तुम्ही, सगळाच गोंधळ झाला आहे.” - साहेब.

“साहेब असं करतो, तो आल्यावर त्याला सांगतो की शाळेला पत्र पाठवलं आहे म्हणून, आणि नंतर पाठवतो. त्याला काय करायचं ते करू द्या.” – कारकून.

“ठीक आहे, काय करायचं ते करा, पण आपल्यावर शेकणार नाही हे बघा.” – साहेब.

“ठीक आहे.” – कारकून.

बुधवारी, बोलावल्या प्रमाणे, सुभाष पुन्हा बोर्डात गेला. माणूस जागेवर नव्हता, पण लवकरच आला.

“साहेब, मी सुभाष गोखले, माझं सर्टिफिकेट तयार झालं का?” – सुभाष.

मी सगळं तयार करून साहेबांच्या समोर ठेवलं होतं. पण साहेबांनी त्यावर एक क्वेरी काढलीय. ही बघा.” – कारकून.

सुभाषनी त्याच्या अर्जावर साहेबांनी लिहिलेली नोट वाचली. त्या मधे लिहिलं होतं की “जर शाळेची चूक असेल, तर तसं पत्र शाळेकडून मागवा. कारण त्यांनी जी माहिती दिली आहे त्याच्याशी शाळेचं सर्टिफिकेट सुसंगत दिसत नाहीये.”

सुभाषच्या पायाखालची जमीनच सरकली. आता जर शाळेकडे हे पत्र गेलं तर सगळंच मुसळ केरात जाणार होतं. कारण सुट्टीवर गेलेला क्लार्क आतापर्यन्त वापस आला असेल, आणि त्याच्या जवळ पत्र गेलं तर मग सगळंच  भांड फुटण्याची शक्यता होती. काय करावं हेच त्याला सुचेना.

“मग सर पाठवलं का पत्र शाळेला?” – सुभाष.

“नाही, मोठ्या साहेबांच्या नजरेखालून गेल्या शिवाय पत्र पोस्टात पडत नाहीत. मी माघाशीच जावक रजिस्टर चेक केलं. अजून पत्र जायचं आहे.” – कारकून.

“साहेब, इथेच काही करता येणार नाही का? या सगळ्या प्रक्रियेत बराच वेळ जाईल, आणि मला अर्जंट हवं होतं.” – सुभाष.

“साहेब, तुम्ही महापालिकेत काम करता, सरकारी काम कसं चालतं ते तुम्हाला चांगलं माहीत असतांना तुम्ही असं विचाराव याचच  आश्चर्य वाटत.” – कारकून.

“सगळं खरं आहे हो साहेब, पण मी अडचणीत आलो ना. काही मार्ग काढा न, तुम्ही म्हणाल ते करीन मी. पण या घोळातून मार्ग काढा.” – सुभाष.

“साहेब,” कारकून म्हणाला, “मला तुमच्याबद्दल पूर्ण सहानुभूति आहे, पण तुम्हीच सांगा, कागदावर एकदा, साहेबांचं नोटिंग झालं की ते नोटिंग स्वत: साहेब सुद्धा बदलू शकत नाहीत. तो अधिकार फक्त सेक्रेटरी साहेबांचा असतो, हे तुम्हीही जाणता. आता साहेबांच्या विरोधात जाऊन, वर फाइल घेऊन जायची हिम्मत माझ्या मधे नाही. मी एक छोटासा क्लार्क आहे हो. अधिकारी नाही.”

“अहो, तुम्ही म्हणता, ते सगळं मला माहीत आहे, पण माझी किती अडचण झालीय, आता मी काय करू? तुम्हीच काही मार्ग काढा म्हणतो मी. एवढी मेहरबानी करा. प्लीज.” – सुभाष.

“मी समजतो तुमची अडचण पण या बाबतीत मी तुमची काहीच मदत करू शकत नाही. माझे हात बांधलेले आहेत.” – कारकून.

“साहेब, इथल्या इथेच निपटवून टाका न. तुमची जी काही डिमांड असेल, ती पूर्ण करायला मी तयार आहे, पण साहेब, इथेच करून टाका न.” – सुभाष.

“हे बघा गोखले, तुमचा इशारा मला  समजला आहे, पण या ऑफिस मधे असं काही होत नाही. खरं म्हणजे आमच्या अंतर्गत बाबी बाहेर कोणालाही सांगता येत नाहीत. तरी सुद्धा तुमची अडचण होऊ नये म्हणून मी पत्रा बद्दल तुम्हाला सांगीतलं. साहेबांना जर हे कळलं तर माझी खैर नाही. या पेक्षा जास्त मी काही करू शकत नाही. शाळेचं पत्र येऊ द्या, त्याच दिवशी तुमचं सर्टिफिकेट मी तयार ठेवतो. या तुम्ही आता.” कारकुनाने निर्वाणीचं सांगीतलं.

सुभाष हताश झाला. आता काय करायचं? त्याची बुद्धिच चालेना. शेवटी कामातून थोडासा वेळ मिळाल्यावर त्याने बबनला फोन केला, संध्याकाळी बोलावलं.

संध्याकाळी कॉफी हाऊस मधे बबन आणि सुभाष बसले होते.

“काय झालं? तुमचं चेहरा सांगतो आहे की काही विपरीत घडलं आहे म्हणून.”- बबन.

“हो, तसंच घडलं आहे, आणि माझं डोकंच चालत नाहीये, म्हणून तुला बोलावलं, आपल्या बोलण्यातून काही मार्ग निघेल म्हणून.” – सुभाष.

“काही सांगितलस  तर मला कळेल. सांग काय झालं आहे?” – बबन.

मग सुभाषनी दुपारी काय झालं ते सांगीतलं. म्हणाला,

”फार मोठा अडथळा आलाय, काय करावं तेच समजत नाहीये.” – सुभाष.  बबन जरा विचारात पडला, पण त्याला काही तरी सुचलं आणि तो म्हणाला, “सुभाष, माझ्या मते, तुला वाटतं तेवढं काही कठीण नाहीये, अजून काही बिघडलं नाहीये.”

“तुझ्या जवळ काही सोल्यूशन आहे का?” – सुभाष.

“हो, माझ्या मनात एक आयडिया आली आहे, बघ तुला जमते का.” – बबन.

“अजून पत्र इथून निघालं नाहीये, तर तू आधीच चंद्रपूरला जा, आणि ज्याने तुझं काम केलं होतं, त्याला सर्व परिस्थिती समजावून सांग. मागच्या वेळेस तू ३००० दिले होतेस, या वेळेस ५ दे. तो लोभी माणूस नक्की तुझं काम करेल.” – बबन.

“खरंच तुला वाटतं की तो काम करेल?” – सुभाष म्हणाला. आता तो ही त्याच दिशेने विचार करत होता.

“हो, जर एक रकमी ५००० मिळत असतील, तर तो ते हातचे जाऊ देणार नाही.” बबन.

“त्याने काम केलं तरच आपला तरणोपाय आहे, नाही तर आजपर्यन्त केलेली सगळी मेहनत आणि खर्च पाण्यात जाईल.”- सुभाष.

“हे बघ, त्या बोर्डातल्या माणसाने तर तुला स्पष्ट नकार दिला, आता कसंही करून तुला या माणसा कडूनच काम काढून घ्यायचं आहे. दूसरा काही पर्याय मला तरी दिसत नाहीये. जोर लाव, आणि काम फत्ते करून ये.” – बबन.

“हूं असंच करतो. चला. जाऊया.” सुभाष. मीटिंग संपली.  

 

दोन दिवसांनंतर रविवारी, सुभाष चंद्रपूरला गेला. त्याने सहजच मागच्या भेटीत शाळेतल्या क्लार्क चा पत्ता घेतला होता, तो आता उपयोगी येणार होता. सुभाष त्यांच्या घरी पोचला.

“नमस्कार, मी सुभाष. थोडं काम होतं तुमच्या कडे.”

“नमस्कार, आता काही नवीन अडचण आली का?” – क्लार्क

हो, जरा प्रॉब्लेम झाला आहे, पण तुम्ही सहज त्याचं निवारण करू शकाल याची खात्री आहे म्हणूनच तुमच्याकडे आलो.” – सुभाष.

“काय झालं आहे?” – क्लार्क.

मग सुभाषने काय प्रॉब्लेम झाला आहे ते सांगीतलं. म्हणाला “ आता तुम्हीच काही तरी करू शकता. कसंही करून बोर्डाला पत्र जायला हवंय.”

“बापरे, हे फार अवघड काम आहे.” – क्लार्क.

“तुम्हाला काहीच अवघड नाहीये, तुम्ही फक्त हो म्हणा. मी तुम्हाला नाराज करणार नाही, याची खात्री बाळगा.” – सुभाष.

“अहो, सगळी पत्र बडेबाबूंच्या कडे जातात. तुम्ही प्रथम त्यांनाच भेटला होता, तुम्हाला अंदाज आलाच असेल आतापर्यन्त, की ते कसे आहेत. माझे हात तिथपर्यंत पोचत नाहीत हो.” – क्लार्क. म्हणाला पण क्षणभरातच त्याची चर्या बदलली. आता त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची छटा दिसत होती.

“साहेब, माझ्या साठी हे खूपच महत्वाचं आहे. काहीही करा, पण पत्र पाठवा.” – सुभाष.

“एक मिनिट, अहो, तुम्ही हा काय घोळ घातला आहे? तुमच्या बरोबर मी पण अडकणार आहे कारण बडे बाबू सर्वप्रथम ही चौकशी करतील की सुधारित दाखला कोणी दिला. मग माझं नाव समोर येणार, आता माझंच काही खरं नाही.” – क्लार्क

नाही म्हंटलं तरी तो क्लार्क अडकणार आहे म्हंटल्यांवर सुभाषला आनंदच झाला. आता त्याला स्वत:ला पण वाचवायचं आहे, म्हणजे नक्की तो पूर्ण प्रयत्न करणार..

“मग तर साहेब, हे काम करण्यावाचून काही पर्याय मला तरी दिसत नाही. आणि हे बघा तुमचे तीन मी तयार ठेवले आहेत, त्यांची चिंता करू नका.” – सुभाष.

“ठीक आहे, करतो मी काही तरी जुगाड. तुम्ही निश्चिंत जा. तुम्हाला हवं तसं पत्र बोर्डाला जाईल याची खात्री बाळगा.” – क्लार्क. सुभाषनी त्याला १००० रुपये दिले, आणि बाकीचे काम झाल्यावर असं सांगीतलं.

“साहेब, तुम्ही नागपूरचे. पत्र डायरेक्ट बोर्डाला जाणार आणि तुमचं काम होणार, मग तुम्ही कशाला चंद्रपूरला येणार? आणि एवढ्याशा कारणासाठी मी थोडीच नागपूरला हेलपाटे मारणार आहे? आणि तुमचा पत्ता तरी कुठे मला माहीत आहे? तुम्ही सर्वच आत्ता द्या. म्हणजे प्रश्न मिटला.” – क्लार्क.

“अहो, पण काही कारणांमुळे जर काम झालं नाही, तर माझे पैसे पाण्यात जातील.” – सुभाष

“तेवढी रिस्क तर तुम्हाला घ्यावीच लागेल. आणि तुमचं पहिलं काम मी बिनबोभाट करून दिलं आहे ना, मग तेवढा विश्वास ठेवा माझ्यावर.” – क्लार्क.

सुभाषने नाईलाजाने त्याला पूर्ण पैसे दिले आणि तो नागपूरला आला.

इकडे क्लार्क दुसऱ्या दिवशी पोस्टात गेला आणि पोस्टमनला पटवलं की जी काही पत्र येतील, ती माझ्या हातात देत जा म्हणून, पोस्टमन ला काय कोणाला तरी पत्र द्यायचीच असतात, त्याने हो म्हंटलं.

मग क्लार्क ने बोर्डाचं पत्र परस्पर घेतलं, नवीन पत्र शाळेच्या लेटर हेड वर छापून घेतलं आणि सही शिक्का करून पोस्टात टाकून दिल. बडे बाबू, आणि प्रिन्सिपल दोघांच्याही नकळत हा सर्व प्रकार झाला. बोर्डाच्या ऑफिस मधे हे पत्र मिळाल्यावर त्यांचंही समाधान झालं आणि त्यांनी सुभाषला सुधारित दाखला देऊन टाकला. सुभाषचं

महत्वाचं काम झालं होतं एक महत्वाचा टप्पा पार पडला होता. त्यांनी लगेच बबनला फोन लावला आणि संध्याकाळी कॉफी हाऊस ला बोलावलं.

क्रमश:........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com