तोतया वारसदार - भाग 43 Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तोतया वारसदार - भाग 43

तोतया वारसदार

पात्र रचना

अक्षय साने                   महादेवराव – सखारामपंत – रेवती --- अक्षय

वैशाली साने                  अक्षय ची बायको.

शलाका साने                  अक्षय ची मुलगी.

विश्राम आणि अनिल           - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -सहावी पिढी.

  साताऱ्याला  स्थायिक.

सुधा                        - विश्रामची बायको.

दिनेश आणि प्रांजल            -विश्रामची मुलं.

मालती                      - अनिलची बायको.

विनय                       - अनिलचा मुलगा

किशोर केळकर                - शुगर टेक्नॉलॉजिस्ट पुणे.

विभावरी केळकर               - किशोर ची बायको.

गार्गी केळकर                 - किशोरची मुलगी

                   

 

भाग  ४३                   

भाग ४२  वरून पुढे  वाचा....

चारच्या सुमारास केळकर फॅमिली आली. धोतर आणि नेहरू शर्ट घातलेले किशोर  केळकर, नऊ वारी नेसलेल्या विभावरी केळकर आणि कॉटनची साडी नेसलेली गार्गी पाहून सर्वांनाच फार आश्चर्य वाटलं. इतकी मोठी माणसं पण तरीही इतकी साधी! असाच भाव सर्वांच्या चेहऱ्यावर होता. सर्वांच्या परिचयाचा कार्यक्रम झाल्यावर, हळू हळू गप्पा सुरू झाल्या, विभावरी आणि सुधाचं छान जमलं. विश्राम अनिल आणि किशोर या तिघांच्या गप्पा रंगल्या. राहता राहिले, गार्गी  आणि दिनेश आणि प्रांजल. प्रांजल आणि गार्गी बोलत होत्या, आणि दिनेश नुसताच बसला होता. ओळखी त्याच्यामुळे झाली होती, पण आता तोच एकटा पडला होता. सुधाच्या लक्षात आलं होतं की फक्त प्रांजल आणि गार्गीच बोलताहेत, मग तिने प्रांजलला हाक मारली. आता गार्गी आणि दिनेश दोघंच उरले. समोरा समोर दोघं जण, पण काय बोलावं हेच दोघांनाही समजत नव्हतं. थोडा वेळ तसाच शांततेत गेला. दिनेशला मग हसायला आलं.  

“काय झालं? हसलात तुम्ही.” गार्गी म्हणाली.

“काही नाही, सहज मनात आलं की आत्ता पर्यन्त तुम्ही दोघी जणी धो धो बोलत होत्या, आता एकदम अळी मिळी गुप चिळी?” – दिनेश.

“काय बोलणार? मला दाग दागिन्यांमधलं काही समजत नाही, आणि तुम्हाला फिजिक्स मधलं, मग काय बोलणार, प्रांजलशी बोलण्याचे विषय वेगळे होते.” – गार्गी

“काय सांगता? IIT च्या मेक्यानिकल इंजीनियर ला फिज़िक्स समजत नाही हे मी प्रथमच ऐकतो आहे” – दिनेश.

“तुम्ही इंजीनियर आहात? खरंच?” – गार्गी

“का? मी इंजीनियर असू शकत नाही?” – दिनेश.

“नाही, थोडं आश्चर्य वाटलं. तुम्ही दागिन्यांच्या दुकानात काम करता ना म्हणून. IIT मधून डिग्री घेतली आहे, तर कुठेही छानशी नोकरी मिळाली असती की.” – गार्गी.

“अहो, घरचा एवढा मोठा व्यवसाय असतांना बाहेर का गुलामगिरी करायची?” – दिनेश.

गार्गी विचार करत होती, की दिनेश म्हणतो ते खरंच आहे. नोकरीची गरजच काय? मग म्हणाली, पण या वेळेस उत्सुकता होती. “दागिन्यांचा कारखाना टाकणार आहात का?”

“तो तर आहेच. २० कारागीर काम करतात तिथे. नवीन नवीन डिझाईन करतात आणि मग त्याबरहुकूम दागिने बनवतात. अख्या महाराष्ट्रात आमचे नवीन डिझाईनचे दागिने जातात.” – दिनेश.

“त्या दिवशी त्याच संदर्भात पुण्याला मीटिंग होती का?” – गार्गी.

“नाही, त्या दिवशी मी, विनय आणि माझे काही मित्र, मिळून एखादं मॅन्युफॅक्चरिंग यूनिट सुरू करण्याचा विचार करतो आहोत. त्या संदर्भात होती. त्याचा दुकानाशी काही संबंध नाही.” – दिनेश.

“कसली फॅक्टरी टाकता आहात?” – गार्गी.

“सध्या दोन तीन प्रोजेक्ट बद्दल विचार चालू आहे. या सगळ्याला वेळ लागतो. झटपट काही होत नाही.” – दिनेश.

सुधाला गार्गी आवडली होती आणि विभावरीला दिनेश, त्यामुळे त्यांनी एकमताने प्रांजलला सांगीतलं की “दोघांनाच आपसात बोलू दे मधे मधे करायला जाऊ नकोस. आणि प्रांजलला एका कामात अडकवून टाकलं. केळकर मंडळी केवळ चहाच प्यायला आली होती, पण विश्राम म्हणाला की चला तुम्हाला आमचं दुकान दाखवतो. मग सगळे जण दुकानावर गेले, दुकानावर गेल्यावर विभावरीला खूपच आनंद झाला. एवढं मोठं दुकान आणि तऱ्हेतऱ्हेच्या डिझाईनचे दागिने बघून तिने विचारले, “हे सगळं तुमच्या कडेच बनतं?”

“हो आमच्याच कारखान्यात बनलेले डिझाईन आहेत” – विश्राम. मग सगळी वरात कारखान्याकडे वळली. घरी येई पर्यन्त, किशोर आणि विभावरीचं दिनेश बद्दल एकमत झालं होतं. आता फक्त गार्गीला विचारायचं बाकी होतं. ते ही विभावरीने हळूच संधि साधून विचारलं. आणि गार्गीने थोडे आढे वेढे घेतले, पण तिलाही दिनेश आवडला होताच, तिने मग होकार दिल्यावर, विभावरीने तसं किशोरला सांगीतलं.

जेवणं आटोपल्यावर, पुण्याच्या वाटेवर असतांना किशोर, विभावरी आणि गार्गी यांची बरीच चर्चा झाली आणि शेवटी दिनेश बद्दल एकमत झाल्यावर एक दोन दिवसांत, विश्रामला फोन करून विचारायचं ठरलं.  

इकडे सुद्धा केळकर मंडळी गेल्यावर विश्राम, सुधा, अनिल दिनेश आणि प्रांजल सगळेच बसून चर्चा करत होते, त्यांना सुद्धा केळकर फॅमिली आवडली होती. दिनेशला गार्गी आवडली होती. मग विश्राम म्हणाला की तो एक दोन दिवसांत केळकरांना फोन करेल म्हणून.

पण सुधाच म्हणाली की “इतकी घाई नको करायला, त्यांच्याही मनात असंच असेल, तर त्यांचाच फोन येईल. जरा दोन चार दिवस वाट पाहू.”

अपेक्षे प्रमाणे दोन दिवसांनी संध्याकाळी किशोरनी विश्रामला फोन केला. विश्राम दुकानात होता,

“हॅलो विश्राम बोलतोय”

“मी किशोर, थोडा वेळ आहे का बोलायला? संध्याकाळ आहे आणि दुकानात गर्दी असेल, म्हणून विचारतो आहे.”

“गर्दी असली, तरी सांभाळणारे कार्यकर्ते आहेत ना, तुम्ही बोला निवांत.” – विश्राम.

“मी असं म्हणत होतो की..” थोडा वेळ शांतता. “मी असं म्हणत होतो की आमची गार्गी तुम्हाला कशी वाटते? म्हणजे आम्ही दिनेशचा त्या दृष्टीने विचार करत होतो.” – किशोर.

“किशोर साहेब, तुमचं प्रस्ताव कळला. पण असं एकदम मी कसं सांगू? मी असं करतो, घरी गेल्यावर सुधा आणि दिनेशशी चर्चा करतो, पण गार्गीला चालणार आहे का दागिन्यांच्या दुकानात काम करणारा मुलगा, नवरा म्हणून? तिचं मत घेतलं का? आजकाल नुसतं आई वडीलांनी ठरवून काही होत नाही.” – विश्राम.

“त्यांची चिंताच नका करू. तुम्ही आमचा प्रस्ताव स्वीकारला, तर आम्हाला सर्वांनाच आनंद होईल, गार्गीशी या बाबतीत संपूर्ण चर्चा झाली आहे.” – किशोर.

“ठीक आहे, मी घरी गेल्यावर सर्वांचं मत विचारात घेतो, आणि तुम्हाला कॉल बॅक करतो. चालेल ना?” – विश्राम.

“चालेल. मी तुमच्या फोनची वाट पाहतो. तुमचा  निर्णय कसाही असला तरी प्लीज फोन करून कळवा.” – किशोर.

“ओके. नक्की करेन.” – विश्राम.

घरी गेल्यावर विश्रामने सुद्धा आणि दिनेशला किशोरच्या फोन बद्दल सांगितलं. चर्चा काहीच करायची नव्हती, सगळं ठरलंच  होतं. किशोरचा फोन आला नसता, तर विश्राम फोन करणार होता.

जेवणं झाल्यावर विश्रामने किशोरला फोन केला, आणि होकार कळवला.

“धन्यवाद विश्राम साहेब. तुमच्याशी सोयरीक जुळते आहे यांचा खूप आनंद झाला आहे. आता आपण पुन्हा भेटायला पाहिजे,  केंव्हा भेटू शकतो ते सांगा म्हणजे पुढच्या गोष्टी फायनल करता येतील.”– किशोर.

“तुमच्या सोयीने केंव्हाही विना संकोच या. घर तुमचंच आहे.” – विश्राम.

“बुधवारी तुमच्या पेढीला सुट्टी असते, मग बुधवारीच आलो तर चालेल ना?” – किशोर

“या स्वागत आहे. बुधवारी वाट पाहतो. केंव्हा येणार तेवढं कळवा.” – विश्राम

बुधवारी केळकर मंडळी आली. ठरवा ठरवी काहीच नव्हती. साखरपुड्याचा दिवस ठरला आणि साताऱ्यात साखर पुडा पार पडला सुद्धा. आता दिनेश आणि गार्गीला मोकळेपणी भेटायला कोणताच अडसर नव्हता. दिनेशच्या त्यामुळे पुण्याच्या वाऱ्या वाढल्या इतकंच. *****

आता आजच्या दिवशी, केळकर कुटुंबांचं आगमन झालं. आज गोखल्यांकडे बरीच गर्दी होती. अक्षय आणि त्यांची फॅमिली, रोहन आणि निशांत सर्वच होते. अनिल आणि मालती सुद्धा उत्सुक होते केळकरांना भेटायला. किशोर आणि विभावरीचा स्वभाव सर्वांनाच आवडला होता. प्रथम तर इतकी गर्दी पाहून, केळकर कुटुंब जरा भांबावल्या सारखे वाटले. पण परिचय झाल्यावर हळू हळू सर्वच मोकळे झाले. अक्षय सुद्धा बोलघेवडा असल्याने काहीच अडचण आली नाही. हसत खेळत जेवणं झाल्यावर मग लग्नाच्या गोष्टी सुरू झाल्या. केळकरांनी त्यांच्या गुरुजी कडून तारीख काढून आणली होती. सहा महिन्यांनंतरची तारीख होती, त्यामुळे काहीच अडचण नव्हती. लग्न कुठे करायचं यावर चर्चा सुरू होती, नेहमी प्रमाणेच विश्रामला  लग्न साताऱ्याला हवं होतं तर केळकरांना पुण्याला.

“हे बघा किशोर साहेब, तुम्ही इथे नवीनच आहात, पुण्याशी काही तुमचे लागे बांधे नाहीत. पण आमची गोष्ट वेगळी आहे, आमची इथे हयात गेली आहे आणि ओळखीचा परिवार पण खूप आहे, ही सगळी मंडळी काही पुण्याला येणार नाहीत, तेंव्हा सातारा हेच ठिकाण योग्य आहे, परत, तुमच्या कडे माणुसबळ नाहीये, सगळी उस्तवारी तुम्हालाच धाव धाव करून, करावी लागणार, त्यापेक्षा लग्न इथेच करूया, तुमच्या सर्व पाहुणे मंडळींची चोख व्यवस्था होईल यांची मी ग्वाही देतो.” विश्राम आपलं बोलणं पटवून देत होता.

शेवटी केळकरांना सुद्धा त्याचं म्हणण पटलं, आणि त्यांनी होकार दिला. मग बाकी सर्व गोष्टी फायनल झाल्या, आणि केळकर फॅमिली पुण्याला जायला निघाली.

“किशोर साहेब, आत्ता साडे बारा वाजले आहेत, पोचायला जवळ जवळ दोन होतील, त्यापेक्षा, आज इथेच थांबा आणि सकाळी नाश्ता करून निघा.” – विश्राम.

गार्गी आणि दिनेशला काय जॅक पॉटच लागला रात्री बऱ्याच उशिरा पर्यन्त ती दोघं अंगणात बोलत बसली होती. सकाळी नाश्ता करून केळकर मंडळी पुण्याला निघाली.

ते लोकं  गेल्यावर, मग गोकर्ण प्लॅन बद्दल चर्चा सुरू झाली.

क्रमश:........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com