तोतया वारसदार - भाग 44 Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तोतया वारसदार - भाग 44

तोतया वारसदार

पात्र रचना

व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं.

रोहन                       - सौमित्रचा मुलगा

लक्ष्मण आणि वर्षा            - महादेवराव – विश्वनाथ – श्रीपति -सहावी पिढी.

  गोकर्णला स्थायिक.

विश्राम आणि अनिल           - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -सहावी पिढी.

  साताऱ्याला  स्थायिक.

कावेरी                      - महादेवराव – विश्वनाथ – कावेरी (मुलगी )

                             श्रीपति रावांची बहीण.

वसंतराव परांजपे                -कावेरी गोखल्यांचे आताचे वंशज

प्रभावती                      -वसंतरावांच्या पत्नी

त्र्यंबक                       -वसंतरावांचे काका.

गोविंद                       -वसंतरावांचा धाकटा भाऊ.     

निशांत                      - शोधकर्ता.

सारंग, प्रशांत आणि किरीट       - विनायकरावांच्या ट्रस्टचे सदस्य.       

 

भाग  ४४                 

भाग ४३  वरून पुढे  वाचा....

“किशोर साहेब, आत्ता साडे बारा वाजले आहेत, पोचायला जवळ जवळ दोन होतील, त्यापेक्षा, आज इथेच थांबा आणि सकाळी नाश्ता करून निघा.” – विश्राम.

गार्गी आणि दिनेशला काय जॅक पॉटच लागला रात्री बऱ्याच उशिरा पर्यन्त ती दोघं अंगणात बोलत बसली होती. सकाळी नाश्ता करून केळकर मंडळी पुण्याला निघाली.

ते लोकं गेल्यावर, मग गोकर्ण प्लॅन बद्दल चर्चा सुरू झाली.

“निशांत, तू पण चल आमच्या बरोबर. थोडा रीलॅक्स होशील.” – रोहन

“रोहन, तुम्ही लोकं सुट्टीवर आहात, मी ड्यूटी वर आहे. कुठलाही भेदभाव न करता मला घरच्या सारखं वागवता आहात, हा तुम्हा सगळ्यांचा मोठेपणा. पण मी माझं काम सोडून उगाच विनाकारण फिरत बसलो, तर काम वेळेत पूर्ण होणार नाही आणि ते सारंग सरांना चालणार नाही. त्यामुळे मला आता निघायलाच हवं.”- निशांत.

“रोहन, निशांत आपल्याबरोबर आला तर आम्हालाही आनंदच झाला असता, इतका तो आपल्यात मिसळून गेला आहे. पण तो म्हणतो आहे, त्यात पण तथ्य आहे. शेवटी, आपली सर्व मदार त्याच्यावरच आहे. जाऊ दे त्याला. बाकी निशांत तुझा यापुढचा काय कार्यक्रम आहे?” - विश्राम.

“सरळ आहे. इथून प्रथम नागपूर. सारंग सरांना पूर्ण अपडेट देऊन त्यांची परवानगी घेऊन, मग वाराणसी. त्र्यंबक परांजपे यांना भेटायचं.” – निशांत.

मग जेवण झाल्यावर निशांत निघाला. टॅक्सी करून पुण्याला आणि तिथून विमानाने नागपूरला.

दुसऱ्या दिवशी सारंग सरांना भेटायला गेला. किरीट आणि प्रशांत पण आले होते. निशांतने आत्ता पर्यंत ज्या ज्या घडामोडी झाल्या होत्या, त्या सर्व सांगितल्या. तसं फोनवर आधीच बोलणं झालंच होतं, पण हे प्रत्यक्ष.

“ही परांजपे मंडळी अचानकच भेटली, यांचं आपल्या लिस्ट मधे नावच नव्हतं. तू नीट खात्री करून घेतलीस ना? असे अचानक कुठून उगवले हे परांजपे?”-किरीट.

मग निशांतने सर्व घटनाक्रम सांगितला.

“त्या दिवशी मी नागपूरला परतणार होतो, आणि लक्ष्मण आणि त्यांची फॅमिली गोकर्ण ला परतणार होते. रोहन तिथेच थांबणार होता, त्याला विश्रामकाकांशी काही व्यवसाया बाबत बोलणी करायची होती म्हणून. पण वर्षाला अचानक काही तरी आठवलं  आणि ती म्हणाली, “मी वंशावळी वाचल्यावर एक गोष्ट लक्षात आली म्हणून मुद्दाम पुन्हा  वाचली,” वर्षा बोलत होती. “मला असं दिसलं की विश्वनाथरावांना तीन मुलं होती. श्रीपति, ओंकार आणि कावेरी. त्यापैकी श्रीपतीचे वंशज आम्ही, ओंकारचे विश्राम काका आणि अनिल काका. पण कावेरी बद्दल काहीच संशोधन झालं नाही. त्यांच्या बद्दल कोणालाच काही माहिती कळली नाही का?”

मग मी सांगितलं की, . “आपण गोकर्ण ला असतांना हा विषय निघाला होता. लक्ष्मणराव जेंव्हा विश्राम काकांबद्दल सांगत होते, तेंव्हा ते म्हणाले होते की कावेरी बाईंबद्दल कोणालाच माहिती नाही. पण इथे आल्यावर  विश्रामकाकांना विचारून खात्री करून घ्यायचं राहून गेलं.”

मग तिलाच विचारलं की “तुला काही माहीत आहे का?”.

यावर ती म्हणाली की “वंशावळीत  त्यांचं लग्न कोणी कारवारचे विश्वास परांजपे यांच्या बरोबर झालं असा उल्लेख आहे.”

आणि कॉलेज मधे असतांना ती कुणा परांजपे यांच्याकडेच खोली घेऊन राहत होती. मग सर्वानुमते असं ठरलं की त्यांच्या कडून काही माहिती मिळते का ते बघावी. म्हणून लक्ष्मण बरोबर मी आणि रोहन पण निघालो. कारवार गोकर्ण च्या वाटेवरच होतं. त्यांच्याकडे गेल्यावर कळलं की त्यांना काहीच माहिती नाहीये. पण त्यांच्याकडे परांजपे कुल वृत्तान्त होता. मग तो बघितला, आणि आम्ही ज्यांच्याकडे गेलो होतो तेच वसंतराव परांजपे कावेरी बाईंचे वंशज निघाले. मग त्यांच्याशी बरंच बोलणं  झाल्यावर त्र्यंबककाका आणि धाकटा भाऊ  गोविंद यांची नावं कळली. आता यांच्याशी संपर्क साधावा लागेल.”

म्हणजे काम वाढलं, आम्हाला वाटलं होतं की जमले सगळे जण, मिशन पूर्ण झालं. पण आता हे ही तपासावं लागणार आहे.” – प्रशांत

“हो, प्रशांत सर काम वाढलं आहे हे खरं. पण मी आहे ना. चिंता नका करू.” – निशांत.

“मग तू आता वाराणसीला जाणार?” – प्रशांत.

“हो. जे काही होईल, तुम्हाला अपडेट देतच राहीन. तिथून मग नाशिक.” – निशांत.

“ओके. जाऊन ये.” – सारंग.

“निशांत, तू आत्ताच सांगीतलं की त्र्यंबकराव सर्व संग परित्याग करून वाराणसीच्या आश्रमात गेली १० वर्ष सेवा देत आहेत म्हणून, मग त्यांना भेटण्याचं काय प्रयोजन आहे? बरं त्यांचा मुलगा पण मृत्यू पावला आहे, किंबहुना त्याच्या अकाली जाण्यानेच त्यांनी आश्रमात जाण्याचा निर्णय घेतला. या परिस्थितीत तू जाऊन आणि भेटून आणखी काय साधणार आहेस?” – किरीट.

“सर प्रश्न तो नाहीच आहे, प्रश्न हा आहे की आपण सर्व वारसदारांना भेटून, त्यांना ते वारसदार असल्याची माहिती दिली का? सारंग सर म्हणाले, त्याप्रमाणे, कोर्ट आक्षेप घेऊ शकतं. मी जाऊन भेटणार आणि त्यांना इंट्रेस्ट नसेल, तर तसं लिहून आणणार. अजून काही नाही. अजून एक गोष्ट, आज आपल्याला हे ही माहीत नाहीये की त्र्यंबकराव हयात आहेत की नाही, आणि जर नसतील, आणि त्यांच्या बायकोला इंट्रेस्ट असेल तर काय करणार आहोत आपण. म्हणून त्यांना भेटणं आवश्यक आहे असं मला वाटतं. बाकी सारंग सर जो निर्णय देतील त्या प्रमाणे करू.” -निशांत.

“किरीट, निशांत बरोबर बोलतो आहे. जाऊ दे त्याला. एक एक चॅप्टर पूर्ण करावाच लागणार आहे.” – सारंग.

“नाशिकचं काय? त्या गोविंद बद्दल काही माहिती मिळाली का?” – किरीट.

“जी मिळाली, म्हणजे वसंतरावांनी जेवढी सांगितली, ती सगळी तुम्हाला आधीच सांगितली आहे, त्यापेक्षा जास्त, नाशिकला गेल्यावरच कळेल. पण एक गोष्ट नक्की, गोविंद राव समाजकार्य करताहेत, तेंव्हा त्यांना जर पैसे मिळाले, तर त्याचा योग्य विनियोग होईल असं मला वाटत.” – निशांत.

“हूं, ते ही बरोबरच आहे म्हणा, कोणीतरी वारसदार मिळेल. चांगलं आहे.” – किरीट.

“सर, माझ्या जवळचे पैसे संपत आले आहेत, सगळा हिशोब मी ठेवला आहे, आत्ता देवू, की सगळं आटोपल्यावर देऊ?” – निशांत.

“आत्ता पर्यन्त जो खर्च झाला आहे, त्याचं विवरण जर तयार असेल, तर दे. हिशोब वेळच्या वेळी लिहिलेले चांगलंच असतं. आता तुझी गरज काय आहे ते सांग म्हणजे मी तुला चेक देतो.” – किरीट.  

“ठीक आहे, मी उद्याच तुमच्या ऑफिस मधे येऊन आजपर्यंतचे सर्व हिशोब देतो. मी रोजच्या रोज खर्च आणि डायरी लिहीत असल्याने, सगळंच लिहिलेलं आहे, सगळा  हिशोब संकलित करून तुम्हाला देतो. चालेल ना?” – निशांत.

“नाही तर असं कर, तुझी डायरी आत्ता तुझ्या बरोबर आणली आहेस का?” – किरीट.

“हो माझ्याजवळच आहे. म्हणजे नेहमी नसते, पण आज तुम्हाला सगळ्यांना भेटायचं होतं, म्हणून संदर्भ घ्यावा लागाला तर असावी म्हणून आणली आहे.” – निशांत.

“मग तू असं कर, ती डायरी देऊन जा, उद्या बबन सगळी झेरॉक्स काढून ठेवेल, मी त्यातून मला हवे असलेले डिटेल्स घेईन. म्हणजे तुला संकलन करायची कटकट राहणार नाही. उद्या दुपारी येऊन तू डायरी आणि चेक घेऊन जा. मला वाटतं हे जास्त सोपं होईल.” – किरीट.

“चालेल. तसंही मला उद्या धोबीघाट काढावा लागणार आहे. वाराणसी म्हणजे लंबा चक्कर आहे, कपडे हवेत.” – निशांत.

“अरे, तू माझ्यामते दोन – तीन कपड्यांचे सेट ठेवावेस, म्हणजे अशी वेळ येणार नाही. धोब्याला देऊ शकतोस. आजच जाऊन भरपूर कपडे घेऊन टाक.” – प्रशांत.

ते आहेत हो माझ्याकडे, पण इतके सेट घेऊन जायचं म्हणजे सामान खूप होतं मग जाडजूड बॅग घेऊन प्रवास करायला त्रास होतो. मी गावोगाव फिरणारा माणूस, हे लोढणं नको वाटत.” – निशांत.

“ठीक आहे, केंव्हा निघणार आहेस वाराणसीला जायला. रिजर्वेशन मिळेल का?” -प्रशांत.

“दोन गाड्या आहेत ज्या नागपूरवरून जातात. गंगा कावेरी आणि सिकंदराबाद वाराणसी. जर रिजर्वेशन मिळालं तर ठीक नाही तर दिल्ली वरून फ्लाइट ने जावं लागेल. बघतो, जे मिळेल त्याने जातो.” – निशांत.

“ठीक आहे, मी उद्या तुझ्या नावे १०००० चा चेक सारंगच्या ऑफिस मधे पाठवून देतो, बबन कडून तू डायरी आणि चेक घे. एक वाजायच्या आतच ये, म्हणजे बँकेत जायला बरं.” – किरीट.  

“किरीट सर जर कॅशच काढून दिली तर बरं पडेल कारण माझा सकाळचा सगळा  वेळ कपडे धुण्यात जाणार आहे, कॅश मिळाली तर संध्याकाळीच मी एजंट कडे जाऊन बुकिंग पण करू शकेन.” – निशांत.

“ओके. तसं करू, मी चेक सारंगला देतो, बबन कॅश काढून ठेवेल. तूला जेंव्हा जमेल, तेंव्हा घेऊन जा.” – किरीट.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी निशांतने नागपूर – दिल्ली आणि दिल्ली - वाराणसी अशी विमानांची टिकीटं  बूक केली.

वाराणसीला  पोचल्यावर हॉटेल मधे जाऊन फ्रेश झाल्यावर तो विश्वनाथ मंदिरात गेला.

क्रमश:........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com