तोतया वारसदार - भाग 47 Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तोतया वारसदार - भाग 47

तोतया वारसदार

पात्र रचना

निशांत                      शोधकर्ता.

सुधाकर गोखले                निशांतला कानपूरला भेटलेले पहिले गोखले.

भाग  ४७      

भाग ४६ वरून पुढे  वाचा....

 

“अरे बापरे, दीड दोनशे वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे, मी काय मदत करणार तुम्हाला? मला काहीच कल्पना नाहीये. सॉरी, मी तुम्हाला मदत नाही करू शकत.” – गोखले.

“सर, तुम्हाला नसेल माहीत पण अजून कोणाला तरी नक्की माहीत असेल, मी कोणालाच ओळखत नाही पण तुम्ही काही नावं सुचवू शकता न, मी त्यांच्या कडे चौकशी करेन. मी संध्याकाळी येऊ का तुम्हाला भेटायला?” – निशांत.

“या खटाटोपातून काही साध्य होईल असं मला वाटत नाही, पण या तुम्ही संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास.” – गोखले.

निशांत पोचला तेंव्हा गोखले त्याची वाटच पाहत होते. निशांतला वाटलं होतं की त्यांच्याशी बोलणारे गृहस्थ वयस्कर असतील, म्हणूनच दुपारी फोन वर भेटले. पण सादर गृहस्थ त जेमतेम चाळीशीचा दिसत होता. आणि घरात एकटाच होता. निशांतला जरा अश्वचर्यच वाटलं. पण ते बाजूला सारून त्याने लगेच विषयाला हात घातला.

“मी आधी माझी ओळख करून देतो. मी सारंग वकिलांचा प्रतिनिधी. नागपूर वरुन  आलो आहे.” – निशांत.

“सारंग वकील कोण? मी ओळखत नाही. आणि तुम्हाला अशी काय माहिती पाहिजे आहे? की ज्यांच्या साठी तुम्ही नागपूरहुन थेट कानपूर गाठलं?” – गोखले.

“नागपूरचे विनायकराव गोखले आमचे क्लायंट आहेत. त्यांच्या हातात महादेव रावांच्या वंशाची वंशावळी आली, त्यातल्या बऱ्याच जणांचा ठाव ठिकाणा त्यांना माहीत नव्हता, म्हणून त्यांनी आम्हाला सर्वांचा शोध करण्याची जबाबदारी दिली आहे. कितीही पैसे खर्च झाले तर शोध लावायचा असा त्यांचा आग्रह आहे. त्यानुसारच मी शोध घ्यायला बाहेर पडलो आहे. आता मी दुपारीच तुम्हाला सांगितल, की दिनकर गोखले हे श्रीमंत दुसरे बाजीराव पेशवे यांच्या मागोमाग जी अनेक मराठी मंडळी इथे आली, त्यांच्या सोबत हे पण आले. या विषयात जर तुमची मदत झाली तर मेहरबानी होईल.”– निशांत.

हे बघा, मी काही नावं सुचवू शकतो, पण मी तुम्हाला ओळखत नाही, अश्या परिस्थितीत मी तुमच्या नावाची शिफारस कशी करू? तुम्ही मला तुमची ओळख पटवून द्या, मग बघतो काय करता येईल ते.”

माझ्या जवळ तशी कागदपत्रे आहेत, आणि ती मी तुम्हाला दाखवतो, पण तरी सुद्धा एक प्रश्न राहातोच की ही कागद पत्र खरी कशावरून, बरोबर?” – निशांत.

“अगदी माझ्या मनातलं बोललात. मग अजून काही आहे का तुमच्या जवळ तुमची आयडेंटिटी सिद्ध करण्यासाठी?” – गोखले.

“तुमच्याकडे फोन आहे का?” – निशांत.

“हो आहे, पण तुम्ही दिलेल्या नंबर वर फोन करून काय मिळणार आहे? त्याच्या उत्तरांची व्यवस्था तर तुम्ही करूच शकता.” – गोखले.

“नाही, तुम्ही समजता तसं काही नाहीये. तुम्ही असं करा, फोन ऑफिसच्या चौकशीचा नंबर डायल करा, आणि त्यांच्याकडे नागपूरच्या सारंग वकिलांचा नंबर मागा. मग त्या नंबरवर माझी सगळी चौकशी करा. मग तर झालं?” – निशांत.

“हूं, हे पटलं. तुम्ही जो उपाय सुचवला आहे तसंच करतो.” असं म्हणून गोखल्यांनी चौकशीचा नंबर फिरवला. थोडं थांबावं लागलं पण सारंग सरांचा नंबर मिळाला. मग गोखल्यांनी सारंग सरांना STD कॉल लावायला घेतला, पण नंबर फिरवता फिरवता ते थांबले. आणि निशांत कडे बघून म्हणाले “STD ला पैसे पडतात, हा खर्च मी का करू?”

“नो प्रॉब्लेम, माझं काम आहे, मी करतो खर्च. चालेल?” – निशांत पुढे म्हणाला की “आपण PCO वर जाऊ, म्हणजे किती खर्च लागला ते आपोआप कळून येईल, आणि बिल मी देईन. एकदम सोपं काम”

गोखल्यांना ते पटलं आणि दोघे जवळच्या PCO वर पोचले.

“हॅलो, सारंग वकील आहेत का? मला त्यांच्याशी बोलायचं आहे.” – गोखले.

“वकील साहेब आत्ताच घरी गेले. उद्या भेटतील.” – बबन.

“तुम्ही कोण? त्यांचा घरचा नंबर देता का? जरा अर्जंट काम होतं.” – गोखले.

“मी बबन बोलतो आहे. ऑफिस चा प्यून. घरचा नंबर लिहून घ्या.” – बबन.

गोखल्यांनी सारंगच्या घरी फोन लावला.

“हॅलो मला सारंग वकिलांशी बोलायचं आहे. आहेत का ते.” – गोखले.

“मी सारंगच बोलतो आहे. आपण कोण?” – सारंग.

“मी कानपूरहुन गोखले बोलतो आहे, इथे निशांत नावाचे गृहस्थ आले आहेत आणि त्यांना काही माहिती हवी आहे, ते म्हणाले की हे काम तुम्ही त्यांच्यावर सोपवलं आहे म्हणून. याचीच शहानिशा करण्यासाठी हा फोन केला.” – गोखले.

“बरोबर आहे. निशांत आमचाच माणूस आहे, त्यांना दिनकर गोखल्यांची माहिती काढण्यासाठीच कानपूरला पाठवलं आहे. आम्हाला अगदीच प्राथमिक आणि निरुपद्रवी माहिती हवी आहे, बाकी डिटेल्स ते तुम्हाला सांगतीलच. त्यांच्याशी तुम्ही निश्चिंत पणे बोलू शंकता.” – सारंग.

“ठीक आहे. आता आपण घरी जाऊ आणि शांतपणे बोलू. चला.” – गोखले.

 घरी आल्यावर गोखले म्हणाले, “हूं, आता मला सांगा, तुम्हाला काय माहिती पाहिजे आहे आणि कशाकरिता हवी आहे?”

“हे मी तुम्हाला माघाशीच सांगितलं की, सर्व जुन्या संबंधांना उजाळा देण्यासाठी ही माहिती हवी आहे म्हणून.” – निशात .

“हे बघा, असल्या भाकड कथा मी बऱ्याच ऐकल्या आहेत. आम्ही चित्पावन कोकणस्थ आहोत. इतक्या फालतू कारणा साठी कोणी पदरमोड करत नाही. एक खाजगी शोधकर्ता नेमून त्याचा खर्च कोणी उचलणार नाही. तुम्ही खरं कारण सांगा. मला पटलं तर मी नक्कीच तुमची मदत करेन.” गोखले.

“किती अटी घालता हो तुम्ही. मी गोखल्यांचच काम करतो आहे, आणि मलाच अडचणीत टाकता आहात.” – निशांत.

“इलाज नाही, हवं तर तुम्ही बाहेर जाऊन सारंग वकिलांशी बोलू शकता.” – गोखले.

मग निशांत PCO वर जाऊन सारंग सरांशी बोलला.

“माणूस कसा वाटतो आहे? सज्जन असेल, तर खरं सांगायला हरकत नाही, पण जितकं कमी सांगशील तेवढं चांगलं. बाकी तपशील तूच ठरव.” – सारंग.

“ठीक आहे गोखले साहेब, आमच्या सरांनी ओके केलंय. आता विचारा, तुम्हाला काय विचारायचं आहे ते.” – निशांत.

“दुसरं काही नाही. मला फक्त खरं आणि सयुक्तिक कारण हवंय. बस.” – गोखले.

“ठीक आहे. सांगतो. वेळणेश्वराचे महादेव राव गोखले हे मुळ पुरुष. नागपूरचे विनायकराव गोखले ही पांचवी पिढी. विनायकरावांना तीन मुलं. दोघ इंग्लंडला स्थायिक झालेत आणि तिसरा सैन्यात होता, १९७१ च्या लढाई नंतर त्याचा पत्ता लागला नाही. विनायकरावांचा मृत्यू झाला तेंव्हा कोणीही जवळ नव्हतं. त्यांची बरीच मालमत्ता आहे, त्यांच्या जवळ त्रोटक अशी लिहिलेली वंशावळी होती, त्यांनी मग ही मालमत्ता चोरापोरी जाऊ नये, म्हणून आपल्या मृत्युपत्रात लिहून ठेवलं की महादेवरावांचे सर्व वंशज शोधून काढा, आणि पूर्ण तपास करून इस्टेट त्यांच्या हवाली करा. त्यांच्या संपत्तीचे आमचे सारंग सर ट्रस्टी आहेत. त्यांनी हे काम करावं हे नमूद केलं आहे मृत्युपत्रात. दिनकररावांचे कोणी वंशज आहेत का याची चाचपणी करण्यासाठी मी इथे आलो आहे. हा एकच हेतु आहे.” -निशांत.

“हूं, ठीक आहे. पटलं मला.” गोखले म्हणाले. “आता हे बघा निशांत, मी इथल्या महाराष्ट्र मंडळाचा सभासद आहे. केंव्हातरी पूर्वी, कोणीतरी बोलल्याचं मला आठवतं की श्रीमंतांबरोबर आलेल्या मराठी माणसांची लिस्ट बनलेली आहे म्हणून. ती लिस्ट आता कोणाकडे आहे हे शोधावं लागेल. ती बघितल्यावर काही सुगावा लागला तर लागेल, असं मला वाटत.”

“पण काका, आता मी तुम्हाला जी गोष्ट सांगीतली, ती सर्वांना कळून उपयोगी नाही. आपल्याला माहीत नसतं कोण कसा आहे ते. कोणाला जर लोभ उत्पन्न झाला तर आमची पंचाईत होईल.” – निशांत.

“बरोबर आहे तुझं म्हणण. पण तू काळजी करू नकोस. आपण आता माझ्या काही मित्रांना फोन करून बघू, कोणाला माहीत आहे का, लिस्ट कोणाजवळ आहे ते.कोणाला माहीत असेल, तर सांगतील”- गोखले.

मग गोखल्यांनी त्यांच्या १०- १२ मित्रांना फोन केले. कोणालाच माहीत नव्हतं, पण प्रत्येकाने हेच विचारलं की अचानक अशी लिस्ट बघण्याचं काय कारण झालं म्हणून. त्यांना गोखल्यांनी सांगितलं की त्यांचे एक मित्र नागपूरचे गोखले, एक पुस्तक लिहित आहेत, ५७ च्या स्वातंत्र्य युद्धात कोण कोण गोखले सहभागी होते, याचा संदर्भ त्यांना हवा आहे. म्हणून ही चौकशी.त्यांच्या मित्रांना हे कारण पटलं आणि प्रत्येकाने त्यांच्या मित्राकडे चौकशी करण्याचं आश्वासन दिलं. मग गोखले म्हणाले की “आता आपल्याला या लोकांचे फोन येई पर्यन्त वाट पाहावी लागेल. आज तर कोणी काही फोन करण्याची शक्यता दिसत नाहीये. तुम्ही उद्या येता का?”

दूसरा काही पर्याय नव्हता म्हणून निशांत हो म्हणाला. “मी केंव्हा येऊ ते सांगा म्हणजे त्या वेळेस येईन. नाहीतर मी यायचं, आणि तुम्ही ऑफिस मधे. असं नको व्हायला.”

“सध्या माझी कारखान्यात पहिली पाळी सुरू आहे. मॉर्निंग शिफ्ट. मी तीन वाजल्यानंतर मोकळा आहे. तुम्ही तीन नंतर केंव्हाही या. नो प्रॉब्लेम.” – गोखले.

चार वाजता येईन असं सांगून निशांत बाहेर पडला.

क्रमश:........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com