तोतया वारसदार
पात्र रचना
निशांत शोधकर्ता.
दिनकर सखाराम पंताचा भाऊ, महादेव रावांचा मुलगा.
सुधाकर गोखले निशांतला कानपूरला भेटलेले पहिले गोखले.
भाग ४८
भाग ४७ वरून पुढे वाचा....
दूसरा काही पर्याय नव्हता म्हणून निशांत हो म्हणाला. “मी केंव्हा येऊ ते सांगा म्हणजे त्या वेळेस येईन. नाहीतर मी यायचं, आणि तुम्ही ऑफिस मधे. असं नको व्हायला.”
“सध्या माझी कारखान्यात पहिली पाळी सुरू आहे. मॉर्निंग शिफ्ट. मी तीन वाजल्यानंतर मोकळा आहे. तुम्ही तीन नंतर केंव्हाही या. नो प्रॉब्लेम.” – गोखले.
उद्या दुपारी चार वाजता येईन असं सांगून निशांत बाहेर पडला.
दुसऱ्या दिवशी चार वाजता दुपारी निशांत गोखल्यांच्या घरी गेला, तेंव्हा ते कोणाशी तरी फोन वर बोलत होते.
“हॅलो, मी गोखले बोलतो आहे, मला सी. डी. गोखल्यांनी तुमचा नंबर दिला.”
“हो माझं झालं बोलणं त्यांच्याशी. तुम्हाला लिस्ट हवी आहे, पण माझ्या जवळ नाहीये लिस्ट. ती निंबाळकरांकडे आहे. त्यांचा नंबर लिहून घ्या.” - पलीकडची व्यक्ति.
गोखल्यांनी तो नंबर लिहून घेतला. मग निशांत कडे वळून म्हणाले, “निशांत, तुमचं काम होईल की नाही हे माहीत नाही, पण एक पाऊल नक्कीच पुढे पडलं आहे.”
“मला काहीं कळलं नाही. त्याच संदर्भात हा फोन होता का?” – निशांत.
“हो, मला माझ्या मित्राने महाराष्ट्र मंडळा मधल्याच एकाचा नंबर दिला होता, त्यांच्याशी बोलत होतो. त्यांनी सांगीतलं की त्यांच्या जवळ तर लिस्ट नाहीये, पण ज्यांच्या कडे आहे, त्यांचा नंबर आहे. मग त्यांच्याकडे आता फोन लाऊन बघू.” – गोखले.
“कसली लिस्ट? आणि पाऊल पुढे पडेल म्हणजे नक्की काय? जरा फोड करून सांगता का?” – निशांत.
“अरे, विसरलास का? कालच नाही का सांगीतलं की कोणी तरी, श्रीमंतांबरोबर आलेल्यांची लिस्ट बनवलेली आहे म्हणून? ती लिस्ट. आता मी फोन करतो, बघू काय म्हणतात ते निंबाळकर साहेब.” – गोखले.
मग गोखल्यांनी फोन लावला.
मग गोखल्यांनी निंबाळकरांना फोन लावला. थोडा वेळ बोलणं झालं. मग निशांत कडे वळून म्हणाले, “निंबाळकरांकडे ती लिस्ट आहे. पण त्यांच्यात सर्वच नावं असतील की नाही याबद्दल ते खात्रीपूर्वक सांगू शक नाहीये. त्यांनी संध्याकाळी बोलावलं आहे. जाऊन बघू तुमचं काम होतं का ते.” - गोखले. निशांतने मान डोलावली.
“काका, समजा लिस्ट मधे नाव सापडलं, तरी त्यांचे वंशज आहेत का? आणि असले तरी आता कुठे आहेत? हे कसं कळणार?” – निशांत.
“हे बघ जशी ही माहिती मिळाली, तशीच ती पण मिळेल अशी आशा करूया.” -गोखले.
“आत्ता जेमतेम ५ वाजले आहेत, आपण केंव्हा जायचं आहे? मी कुठे येऊ?” – निशांत.
“बसा हो, तुम्ही आता जाऊन केंव्हा येणार? मी चहा करतो, थोड्या गप्पा मारू आणि मग जाऊ.” – गोखले.
“कशाला एवढे कष्ट घेता काका, मला काही चहाची सवय नाहीये. आपण नुसत्याच गप्पा मारू.” – निशांत.
“अरे सध्या बायको आणि मुलं तिच्या भावाकडे गेली आहे. म्हणून मी चहा करणार आहे. घाबरू नकोस, मला सगळं उत्तम जमतं.” गोखले.
“कुठे असतो काकूंचा भाऊ?”” - निशांत
“तुमच्या कोकणात. रत्नागिरीला. दर वर्षीचा कार्यक्रम आहे. १० दिवस माहेर.” – गोखले.
संध्याकाळी दोघे निंबाळकरांकडे पोचले. निंबाळकर त्यांची वाटच पाहत होते. थोडं बोलणं झाल्यावर त्यांनी पण विचारलं, की अचानक लिस्ट कशाला हवी आहे म्हणून.
“त्याचं काय आहे, माझा नागपूरचा एक मित्र आहे, तो एक पुस्तक लिहितो आहे, “५७ च्या स्वातंत्र्य युद्धात गोखल्यांचा सहाभाग.” या साठी हे श्री निशांत नागपूर वरुन इथे आले आहेत. हे त्यांना पुस्तक लिहिण्या साठी मदत करतात. आता धावपळीत दिवस वाया गेले तर पुस्तकांचं काम पूर्ण व्हायला खूप वेळ लागेल, म्हणून हे इथे आले आहेत. लिस्ट बघून जर काही उपयुक्त माहिती मिळाली, तर बघायची आहे.” – गोखले
“अहो, पण लिस्ट म्हणजे सोपं काम नाहीये, तुम्ही बघालच आता, मी घेऊन येतो.” असं म्हणून निंबाळकर आतमधे गेले.
साधारण वीस एक मिनिटाने बाहेर आले, त्यांच्या हातात २५-३० रजिस्टर असलेला गठ्ठा होता. नुकतीच वरची धूळ झटकलेली दिसत होती. “हा एक गठ्ठा आहे, असे चार गठ्ठे आहेत, आता तुम्ही कसं शोधणार ते बघा.” – निंबाळकर.
काम वाटलं तेवढं सोप नव्हतं. इतक्या साऱ्या रजिस्टर मधून दिनकर गोखल्यांना कसं
शोधणार हा मोठाच प्रश्न निशांत आणि गोखल्यांच्या समोर उभा राहिला. निशांत हळूच गोखल्यांना म्हणाला की “त्यांना विचारा, की चार – पांच दिवस हे सर्व गठ्ठे तुमच्या घरी नेता येतील का?”
“पण घरी नेऊन काय करणार? चार दिवसांत हे पूर्ण गठ्ठे तपासून होणार नाही, वरतून हे सगळे हस्तलिखित आहेत. आणि मोडी लिपी मधे लिहिलं आहे. दीडशे वर्षांपूर्वीची मोडी मधे लिहिलेले मराठी वाचणं तुम्हाला वाटतं तितकं सोप नाहीये.” गोखल्यांच्या ऐवजी निंबाळकरच बोलले.
“आम्ही यांचे झेरॉक्स काढू, आणि मग मी ते घेऊन नागपूरला जाईन. मोडी मला येत नाही पण नागपुरात कोणीतरी भेटेलच, त्यांच्या कडून वाचून घेऊ. अर्थात तुमची हरकत नसेल तरच हे शक्य आहे.” – निशांत.
“मी एक काम करतो, आमच्या गल्लीच्या कोपऱ्यांवरच झेरॉक्सच दुकान आहे, मी त्याला बोलावून घेतो आणि कॉपी काढून ठेवतो. तसं कशाला त्यालाच इथे बोलावतो थांबा.” असं म्हणून निंबाळकरांनी फोन करून त्याला बोलावलं. मग निशांत कडे वळून म्हणाले, “हे हस्तलिखित आहे, ऐतिहासिक दस्तावेज आहे. म्हणून हे असं तुम्हाला देता येणार नाही. प्लीज समजून घ्या.” – निंबाळकर.
“सर, तुम्ही एवढं करता आहात आमच्या साठी या बद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. तुम्ही उगीच दिलगीर होऊ नका. मी एखादं रजिस्टर उघडून बघू का?– निशांत.
“हो बघा न. मी २० २५ वर्षांपूर्वी हेच रजिस्टर उघडलं होतं पण मोडी लिपितला मजकूर काही मला समजला नव्हता, मग नंतर आता तुम्हीच.” – निंबाळकर.
निशांतने वरचाच रजिस्टर उघडलं, त्याला काहीच कळलं नाही, दोन चार पानं उलटून बघितली पण सगळंच अगम्य. त्याने रजिस्टर बंद केलं आणि म्हणाला, दीडशे वर्षांपूर्वी अश्या टाइपची रजिस्टर नव्हती, हे बहुधा, नंतर सुसंगत रित्या संकलित केलं असावं. तुमचं काय मत आहे साहेब?”
“असेल, तसंही असेल. तुमच्या बोलण्यात तथ्य आहे, पण तरी सुद्धा हे दीडशे तर नाही, पण १०० वर्ष जुनं असणारच आहे.” – निंबाळकर.
झेरॉक्स वाला आला त्याला गठ्ठे दाखवले, आणि झेरॉक्स काढता येईल का विचारलं. “नाही साहेब, झेरॉक्स जमणार नाही. कागद खूप जुना आहे, जीर्ण झाला आहे मशीन वर ठेवता ठेवता फाटू शकतो किंवा त्यांचे तुकडे पण पडू शकतात.” झेरॉक्स वाला.
“पण मग यांची कॉपी करण्या साठी काही दूसरा उपाय सुचवू शकता का “ – निशांत.
“उपाय आहे, डिजिटल कॅमेराने प्रत्येक पानाचे फोटो काढायचे. पण हे खूपच वेळखाऊ काम आहे, आणि माझ्याजवळ तो कॅमेरा पण नाहीये.” झेरॉक्स वाला.
“समजा आपण कॅमेरा अरेंज केला तर काम होईल?” – निशांत.
“कठीण आहे, २०० पानांचं एक रजिस्टर असे २५ म्हणजे ५००० पानं झाली आणि असे चार गठ्ठे म्हणजे २०००० पान झाली. साहेब, खूपच किचकट काम आहे किती दिवस लागतील माहीत नाही.” – झेरॉक्स वाला.
गोखले आत्ता पर्यन्त नुसते ऐकत होते, त्यांच्यातला इंजीनियर जागा झाला. ते म्हणाले, “अरे यांचा एक स्टँड बनवून घेऊ, त्यावर कॅमेरा फिक्स बसवू. खाली रजिस्टरचं पान उघडून ठेऊ, मग एक माणूस पान उलटेल आणि तुम्ही क्लिक करा, माझ्या मते फार फार तर दोन दिवस लागतील. काहीच कठीण नाहीये.”
झेरॉक्स वाला जरा विचारात पडला. दोन दिवस त्याला दुकान बंद ठेवावं लागणार होतं. म्हणजे नुकसान. त्याने तसं बोलून दाखवलं.
“तुझ्या दोन दिवसांचं नुकसान आम्ही भरून देऊ. तुझ्या बरोबर जो माणूस आणशील, त्यांचे पण पैसे आम्ही वेगळे देऊ, मग काय प्रॉब्लेम आहे?” – निशांत.
“पण साहेब, आपल्या जवळ स्टँड ही नाही आणि कॅमेरा पण नाही.”- झेरॉक्स वाला.
“ती सगळी व्यवस्था आम्ही करतो. मग?” – निशांत.
“ठीक आहे साहेब, तुम्ही सगळा खर्च उचलणार असाल, तर करतो मी. पण मला पैसे लगेच पाहिजे.” – झेरॉक्स वाला.
निशांतने ५०० ची नोट काढून त्यांच्या हातात ठेवली. “ हे घे, काम पक्क?”
झेरॉक्स वाल्याने मान डोलावली आणि तो गेला.
“तुमच्या कडे कॅमेरा आहे?” निंबाळकरांनी गोखल्यांना विचारलं. गोखल्यांनी नाही या अर्थाने मान हलवली. “मग?” – निंबाळकर.
“साहेब, कॅमेरा मी आणतो, स्टँड कसा आणि कुठे बनवायचा हे गोखले साहेबच सांगतील. मला त्या बाबतीत काही कळत नाही. पण साहेब, प्रश्न तो नाहीये, प्रश्न हा आहे, की जर हा दस्तावेज बाहेर नेता येत नसेल, तर दोन दिवस तुमच्या घरीच सगळं करावं लागेल, त्याला तुमची तयारी आणि परवानगी आहे का?” – निशांत.
“नो प्रॉब्लेम, तयारी नसती, तर मी एवढी मेहनत घेतलीच नसती. त्यांची चिंता तुम्ही करूच नका. एक मराठी माणूस एवढे कष्ट घेतो आहे, मला आनंद आहे. लागा तुम्ही कॅमेरा आणि स्टँडची व्यवस्था करायला.” – निंबाळकर.
निशांत आणि गोखले खुशीतच बाहेर पडले.
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com