तोतया वारसदार
पात्र रचना
निशांत शोधकर्ता.
दिनकर सखाराम पंताचा भाऊ, महादेव रावांचा मुलगा.
सुधाकर गोखले निशांतला कानपूरला भेटलेले पहिले गोखले.
भाग ४९
भाग ४८ वरून पुढे वाचा....
“नो प्रॉब्लेम, तयारी नसती, तर मी एवढी मेहनत घेतलीच नसती. त्यांची चिंता तुम्ही करूच नका. एक मराठी माणूस एवढे कष्ट घेतो आहे, मला आनंद आहे. लागा तुम्ही कॅमेरा आणि स्टँडची व्यवस्था करायला.” – निंबाळकर.
निशांत आणि गोखले खुषितच बाहेर पडले.
हॉटेलवर गेल्यावर निशांतने सारंगला सर्व अपडेट दिलं. ऐकून घेतल्यावर सारंग म्हणाला, “मग आता काय करणार आहेस?”
उद्या इथल्या मार्केट मधे जाऊन डिजी कॅम किंवा कॅमकॉर्डर मिळतो का आणि काय किंमत आहे ते बघतो, मग तुम्ही ठरवा काय करायचं ते.” – निशांत.
“ओके. मग उद्या सांग मग बघू.” – सारंग.
दुसऱ्या दिवशी निशांत मार्केट मधे फिरला आणि संध्याकाळी सारंगला फोन केला.
“हूं, बोल काय म्हणतोस, मिळाली का माहिती?” – सारंग.
“डिजी कॅम साधारण ७-८ हजारांचा आहे आणि कॅमकॉर्डर २० हजारा पर्यन्त मिळेल. पण आपल्या उपयोगाचे नाहीत.” – निशांत.
“का? असं का म्हणतो आहेस?” – सारंग.
“आपल्याला २०००० फोटो काढायचे आहेत, तेवढी क्षमता दोन्ही मधे नाहीये.” – निशांत.
“हूं, मग आता?, सोडून द्यायचं?” – सारंग.
“दूसरा काही इलाज दिसत नाहीये. मिशन फेल. उद्या गोखले आणि निंबाळकरांकडे जाऊन, धन्यवाद देतो, आणि परतीच्या प्रवासाला लागतो.” – निशांत.
“ठीक आहे, तू असं कर, तू नागपूरलाच ये. जरा दोन दिवस आराम कर, फ्रेश हो, आणि मग नाशिकला जा. आणि गोविंदरावांना भेट ” सारंग.
निशांत तिसऱ्या दिवशी नागपूरला पोचला. संध्याकाळी येतो असं सारंग सरांना कळवलं. संध्याकाळी निशांत सारंग सरांच्या ऑफिस मधे पोचला. किरीट आणि प्रशांत आलेच होते.
“अजून वाराणसी वरुन परांजपे पती पत्नीचे डेथ सर्टिफिकेट आले नाहीत, तू पत्ता बरोबर दिला आहेस न? – सारंग.
“हो हो, पण त्याला वेळ लागणार आहे. त्या लोकांची मासिक बैठक झाल्यावर ते पाठवतील. खूप वेळ लागणार होता म्हणून तर मी कानपूरला जाण्याचा निर्णय घेतला होता. अर्थात हातात काहीच लागलं नाही आणि वेळ पूर्ण वाया गेला.” – निशांत.
“ये तो कभी कभी होता हैं, इतना मायूस होनेकी जरूरत नहीं हैं.” -किरीट.
निशांत हसला, “नाही हो निराश वगैरे काही झालो नाहीये. पण माहिती मिळता मिळता हातातून निसटून गेली. मग थोडं वाईट वाटणारच न” – निशांत.
बरं आता असं कर, जरा दोन दिवस विश्रांती घे, बरेच दिवस झालेत, नुसती धाव पळ चालली आहे तुझी, आणि मग जोमाने कामाला लाग. तसंही आता एकाच जण राहिला आहे, तो म्हणजे गोविंद परांजपे. त्याचा ठाव ठिकाणा सगळा माहीत आहे, त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही. हे झाल्यावर आपण वाडा दुरूस्तीचं काम हातात घेतलंच आहे, त्याला जरा गती देऊ. मगच सगळ्यांना बोलावता येईल. फायनल मीटिंग तेंव्हाच करू.” – सारंग.
“पण निशांत, कानपूर सारख्या अनोळखी गावात तू त्या गोखल्यांशी मैत्री कशी केलीस? जरा आम्हाला पण कळू दे की तुझ्या ट्रिक्स.” – प्रशांत.
मग निशांतने कानपूरच्या वास्तव्यात जे जे घडलं ते अगदी सविस्तर सांगीतलं. सर्वांनाच निशांतचं कौतुक वाटलं. प्रशांत म्हणाला, “सारंग मला वाटतं आपण या गोखल्यांना सुद्धा बोलावू, गेट टु गेदर करू तेंव्हा. रिजल्ट जरी मिळाले नसले, तरी यांनी बरीच मेहनत घेतली आहे. काय म्हणतोस?”
“बरोबर आहे. मलाही पटतंय, गुड आयडिया, बोलावू आपण त्यांना. शेवटी गोखलेच आहेत ते सुद्धा.” – सारंग.
इतका वेळ शांतपणे सर्व ऐकत असलेला किरीट बोलला. “निशांत माझ्या मनात एक पॉइंट आला आहे. सांगू का?
“काय सर, तुम्ही सांगायचं आणि मी ऐकायचं हीच रीत आहे. माझी परवानगी कसली मागताय? लाजवताय तुम्ही मला.” – निशांत.
“अरे नाही नाही, मला असं वाटतंय की कदाचित दिनकर किंवा त्यांची मुलं किवा नातवंड त्यांच्या वेळणेश्वर च्या घरी तर नसतील गेले? तिथे प्रॉपर्टी आहे, नारळी पोफळी आणि आंब्याची बाग आहे. असं होऊ शकतं न?” – किरीट.
किरीटनी हा नवीनच मुद्दा उपस्थित केला होता, हा विचार कोणाच्याच मनात आतापर्यन्त आला नव्हता. सगळे कानपूरच धरून चालले होते. त्यामुळे आता सगळेच विचारात पडले.
“म्हणजे, मी विचार केला की ५७ च्या युद्धात दिनकरचा सहभाग असेल, तर युद्धाचा निकाल लागल्यावर ब्रिटिश पोलिसांनी सर्वांचा माग काढायला सुरवात केली असेल. हा सापडला असेल, तर जेल मधे गेला असेल, पण जर लपत छपत जर वेळणेश्वरला सुखरूप पोचला असेल, तर तिथे राहू शकतो. ते गाव त्या वेळी इतक्या दुर्गम भागात असेल, की तिथे पोलिस गेले असण्याची शक्यता फारच धूसर आहे. बघा माझं म्हणण पटतंय का, नाही तर सोडून द्या.”- किरीट.
सारंग आणि निशांत वंशावळी आणि इतिहास बघत होते. जरा अभ्यास केल्यावर सारंग म्हणाला,
“किरीट, जर दिनकर युद्धं संपल्या नंतर वापस वेळणेश्वरला गेला असेल तर साधारणपणे १८६५ च्या आसपास गेला असेल. त्यावेळी तिथे सखाराम पंत खुद्द असतील, त्यांचा मृत्यू १८७० मधे झाला. आणि तोपर्यन्त रंगनाथ आणि भास्कर दोघंही तिथेच होते. ते पुण्याला १८७२ च्या आसपास गेले असतील. अश्या परिस्थितीत वंशावळी आणि घराण्याचा इतिहास दोन्ही मधे त्याचा उल्लेख असायला हवा होता. पण तो नाहीये. यांचा अर्थ रंगनाथ आणि भास्कर १८७२ च्या आसपास पुण्याला जाई पर्यन्त तरी दिनकर तिथे पोचला नव्हता. नंतर आला असेल, तर घराची अवस्था, आणि रिकामं घर बघून, त्याने निदान या लोकांची आजू बाजूला चौकशी तरी करायला हवी होती, आणि केली असेल, तर रंगनाथाचा पत्ता त्याला मिळाला असता. पण तसं काही इतिहासात नमूद केलेलं आढळत नाहीये.”
आधी किरीटचं म्हणण सर्वांनाच पटलं होतं, पण सारंगनी इतकं मुद्देसूद विश्लेषण केलं होतं की आता सारंगचं म्हणण पटायला लागलं होतं. सगळे विचार करत होते, सर्वांचीच माती गुंग झाली होती. विचार कर करून मेंदूचा भुगा पडला होता.
“तरी पण मला असं वाटतं की किरीटने मुद्दा मांडलाच आहे, तर त्याची पण शहानिशा करायला हवी. खरं म्हणजे वेळणेश्वराच्या घरा बद्दल नंतर काहीच उल्लेख नाहीये, यांचा अर्थ विनायकराव पण कधी तिथे गेले नसावेत, किंवा ते घर आधीच विकल्या गेलं असेल. हे जरा चमत्कारिक आहे, आपल्या वडिलोपार्जित वास्तु बद्दल इतका निरुत्साह कधीच नसतो. उलट घट्ट अटॅचमेंट असते. म्हणजे, नेमकं काय घडलं असेल, याचा उलगडा व्हायलाच हवा. निशांत सोडव रे बाबा हा गुंता पण. आता आणखी एक कामगिरी तुझ्या गळ्यात.” – सारंग फायनली बोलला. सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. काही तरी निर्णय झाला होता.
मग आता आधी काय हातात घेऊ? नाशिक की वेळणेश्वर?”- निशांत.
“निश्चितच आधी वेळणेश्वर, किरीटने डोक्यात किडा टाकून दिला आणि आता मजा बघतोय. खूपच गुंता झालाय, आणि तो गुंता सुटल्या शिवाय जीवाला चैन पडणार नाही.” – सारंग.
“अरे, मी काय केलंय? मी फक्त मला जी शंका आली ती बोलून दाखवली. बस. उगाच माझ्यावर बिल फाडू नकोस. पण तुलाही वाटतंच आहे ना, की याचं उत्तर शोधायलाच हवं म्हणून.” – किरीट.
“हो, मलाही तसंच वाटतंय. आणि मी गंमत केली रे. जस्ट किडिंग.” – सारंग.
“सर, सातारा आणि साने मंडळींची काय हाल हवाल?”- निशांत.
“सर्व मस्त एंजॉय करताहेत गोकर्णला. लक्ष्मण रावांचा पाहुणचार घेताहेत, आणि सुट्टी एंजॉय करताहेत.” – सारंग.
असं बोलणं चालू असतांनाच सारंगचा फोन वाजला.
“हॅलो मी रोहन बोलतो आहे. आम्ही कालच साताऱ्याला आलो, आज साने मंडळी सुरतला जातील. मग मी मोकळा. फोन हे विचारण्यासाठी केला की मी वाराणसीला केंव्हा जायचं आहे? निशांत पोचला असेल न तिथे?”
“काही करू नको, निशांत वाराणसीचं काम उरकून इथेच आला आहे. आमची त्या बद्दलच मीटिंग चालू आहे. तू तिथेच साताऱ्याला थांब. निशांत आणि तुला वेळणेश्वरला जायचं आहे. तुमच्याच गावी. निशांत तुला साताऱ्याला जॉइन होईल.” – सारंग.
“अरे, काय सांगता काय? आवडेल मला तिथे जायला. पण निशांतने एकट्यानेच वाराणसीचं काम केलं? आणि ते ही एवढ्या लवकर?” – रोहन
ते सगळं, तुला निशांत भेटला की सांगेल. उद्या तो इथून निघेल आणि परवा सकाळी महाराष्ट्र एक्सप्रेस ने साताऱ्याला पोहोचेल. मग दोघे मिळून तुमचा वेळणेश्वरचा कार्यक्रम ठरवा.” – सारंग.
“ठीक आहे. निशांतची वाट पाहतो.” – रोहन.
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com