तोतया वारसदार - भाग 55 Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तोतया वारसदार - भाग 55

 तोतया वारसदार

पात्र रचना

निशांत                     - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी.

व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं.

रोहन                       - सौमित्रचा मुलगा

चंद्रकांत गोखले                - दिनकर गोखल्यांचा सध्याचा वंशज. वेळणेश्वर

उज्ज्वला                    - चंद्रकांत गोखल्यांची बायको.

विश्वास                     - चंद्रकांत गोखल्यांचा मुलगा अमेरिका.

स्वानंदी                     - विश्वास ची बायको.

सुनील                      - चंद्रकांत गोखल्यांचा धाकटा मुलगा अमेरिका.

 

भाग  ५५        

भाग ५४  वरून पुढे  वाचा....

“आश्चर्य आहे खरं, पण हेच सत्य आहे. आता तुमचा विचार सांगा.” – निशांत.

“आमचा काय विचार असणार? आमचा त्या संपत्तीशी काय संबंध आहे? कष्ट केले विनायकरावांनी, आणि तुम्ही आम्हाला विचारता आहात. आयत्या बिलावर नागोबा होऊन बसण्याची गोखल्यांची परंपरा नाहीये. सॉरी. देव दयेने आमच्या जवळ भरपूर आहे, आता आणखी कशाला हवंय?” चंद्रकांत.

आता हातबुद्ध होण्याची पाली निशांत आणि रोहन यांची होती. ते स्तिमित होऊन बघतच राहीले. निशांत विचार करत होता की सगळेच गोखले इतके निर्मॉही कसे? पण त्यांच्या जवळ या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. पुन्हा एकदा ते डेड एंड ला पोचले होते.  

“काका,” निशांत म्हणाला, “मी तुम्हाला आता काका म्हणू शकतो ना?”

“गोखले हसले  आणि मान डोलावली.

“काका, तुम्हाला या संपत्तीत स्वारस्य नसेलही कदाचित, पण तुमची मुलं? त्यांना जर इंट्रेस्ट असेल तर? त्याचाही विचार व्हायला हवा.” – निशांत.

“हां ते माहीत नाही, मला दोन मुलं आहेत, आणि ती अमेरिकेत असतात. त्यांना कशाचीच कमी नाहीये. मला उत्तम पेन्शन आहे, इंजीनियर असल्याने गावात मान आहे, नागपूरची मालमत्ता घेऊन मी काय करू?” - गोखले.

“काकूंना विचारा न, कदाचित त्यांचं मत वेगळं असू शकेल.” – निशांत.

काकू हसल्या, म्हणाल्या, “तुमच्या पिढीला असे वेगळे विचार करण्याची सवय असू शकते. पण आमच्या पिढीत नवरा बायको मधे खूप एकवाक्यता असते. न बोलताच आम्हाला एकमेकांचे विचार कळतात. यांना जर माझं वेगळं मत आहे असं वाटलं असतं तर त्यांनी आधी मलाच  विचारलं असतं. मजेत सुरू आहे आमचा संसार, आणखी काय हवं?” – उज्ज्वला काकू.

“पण तरीही मला असं वाटतं की तुम्ही जरा विचार करावा, तुमच्या मुलांचं पण मत घ्यावं.” – निशांत.

“हे तुझं म्हणण पटलं मला. अहो, आज रात्री करता का दोघांना फोन. जाणून घेऊया त्यांचंही मत.” – उज्ज्वला काकू.

“ठीक आहे, तू म्हणतेस तर बोलू, पण आज रात्री नको कारण तिथे सकाळ असेल आणि ते ऑफिसला जायच्या गडबडीत असतील. त्यापेक्षा आपण सकाळी फोन करू, तिथे रात्र असेल, म्हणजे मग निवांत बोलता येईल.” – गोखले.

निशांत आणि रोहननी मग तो विषय तिथेच सोडला. मग बराच वेळ हलक्या फुलक्या आणि अवांतर गप्पा चालू होत्या, संपूर्ण गोखले घराण्या बद्दल बरीच माहिती रोहनने त्यांना दिली. नागपूरला एक गेट टुगेदऱ् करण्याचा सगळ्यांचा मानस आहे, आणि चंद्रकांत गोखले आणि काकू दोघांनीही तिथ येणं अनिवार्य आहे असंही सांगितलं त्याला दोघांनीही होकार दिला.

“उद्या मी फोन करीन तेंव्हा तुम्ही मंदिरात असाल, तुम्ही पूजा आटोपून आल्यावर मी तुम्हाला सर्व अपडेट देईन,” – गोखले.

“नाही आपण पूजा परवा करू, आम्ही एक दिवस एक्स्ट्रा राहू, पण उद्या तुम्ही जेंव्हा बोलाल तेंव्हा आम्ही उपस्थित असणं आवश्यक आहे. कारण एवढे डिटेल्स तुमच्या लक्षात राहणार नाहीत, पण आम्हाला आता तोंडपाठ झाले आहेत. सर्व शंका आणि कुशंकांचं आम्ही निरसन करू.” – निशांत.

संध्याकाळी निशांत आणि रोहन मंदिरात जाऊन दर्शन करून आले, आणि मग गावात जरा फेरफटका मारावा म्हणून निघाले. १५ -२० मिनिटांत सर्व गाव फिरून झालं. मग काय परत घरी. पुन्हा एकदा चहा पाणी झाल्यावर निशांतनी गोखल्यांना विचारलं की मला नागपूरला फोन करायचं आहे, तर एसटिडी सुविधा आहे का? तर म्हणाले खुशाल करा.  

निशांतचं बोलणं ऐकून घेतल्यावर, सारंग सर वैतागाने म्हणाले,

“अरे काय चाललंय काय? एकाही गोखल्यांना संपत्तीत स्वारस्य नाहीये म्हणजे काय? जर कोणालाच नको होती, तर विनायकरावांनी कमावली कशाला? निशांत, जेंव्हा शोध सुरू केला तेंव्हा एकही गोखले माहीत नव्हते. आणि आता जादूगाराच्या  पोतडीतून निघावे तसे अनेक गोखले बाहेर पडताहेत, आणि गंमत म्हणजे एकाही गोखल्याला पैसा नको आहे. मला न निशांत, वेड्यांच्या इस्पितळात गेल्या सारखं वाटतं आहे. पैसा हवा म्हणून भांडणारे भाऊ भाऊ पाहीले, मुलगा आणि वडील पाहीले, नवरा बायको पण पाहीले, पण इतके नातेवाईक गोळा  झाले आणि पैसा कोणालाच नको आहे. हे असं कधीच नव्हतं पाहीलं. जगा वेगळंच आहे सारं. मला तर असं वाटतंय की नागपूरला जेंव्हा सगळे गोळा होतील, तेंव्हा सगळ्यांची मानसोपचार तज्ञांकडून तपासणी करून घ्यावी. नाही तर असं करतो, मीच जातो आणि स्वत:चंच काउन्सेलिंग चे सेशन करून घेतो. जरा जीवाला स्वस्थता लाभेल. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांचच मानसिक संतुलन बिघडण्याची दाट शक्यता आहे. माझा तुला सल्ला आहे, तू सुद्धा इथे आल्यावर मानसोपचार तज्ञाची भेट घे.” – सारंग.

“सर आज एवढे का वैतागला आहात, मला तर वाटलं होतं की दिनकररावांचा शोध लागल्याची बातमी ऐकून तुम्ही खुश व्हाल, पण सगळं उलटच दिसते. तिथे काही प्रॉब्लेम झाला आहे का?” – निशांत.

“नाही रे तसं काही नाही, पण इतके सारे लोकं मिळाले, पण इस्टेट घ्यायला कोणीच तयार नाही, देणारा देऊन गेला पण घेणाराच मिळेना, विचित्र परिस्थिती झाली आहे. अरे त्या चंद्रकांत गोखल्यांना म्हणावं घ्या की ही मालमत्ता, आणि सोडवा आम्हाला.  जरा पटव त्यांना. वापर तुझं स्किल” – सारंग.

“उद्या गोखले काका त्यांच्या मुलांना फोन लावणार आहेत, आणि सर ते म्हणत होते, की थोडक्यात सांगता येणार नाही आणि सविस्तर बोलत बसलो तर ISD असल्याने खूप बिल येईल.” – निशांत.

“मग तू काय म्हंटलस? – सारंग.

मी सांगितलं की त्यांची काळजी करू नका, संपूर्ण बोलण्याचं बिल मी देईन. बरोबर केलं ना” – निशांत.

“अगदी बरोबर. पैसे आहेत ना?” – सारंग.

“आहे. काळजी करू नका.” – निशांत.

सकाळी गोखल्यांनी फोन लावला.

“हेलो बाबा आज मधेच कसा काय फोन केलात? काही प्रॉब्लेम आहे का?” – विश्वास.

“नाही प्रॉब्लेम काहीच नाहीये. पण एका महत्वाच्या विषयावर तुझ्याशी जरा सविस्तर बोलायचं आहे. साधारण अर्धा तास लागू शकतो, वेळ आहे ना?” – गोखले.

“बापरे, अर्धा तास! आणि ते ही ISD वर? असं काय महत्वाचं काम आहे? कोणी घरावर कब्जा केला आहे का?” – विश्वास.

नाही, तसं काही नाही, पण हे रोहन गोखले आले आहेत इथे तेच तुला सविस्तर माहिती देतील. तू लक्षपूर्वक ऐक. ते जरूरी आहे. जमल्यास फोन स्पीकर वर टाक म्हणजे स्वानंदीला पण समजेल.” – गोखले.

“ओके. हाय रोहन कसा आहेस? सांग तुला काय सांगायचं आहे ते.” – विश्वास.

“ठीक आहे मी रोहन गोखले, मी लंडनला असतो, आमचा तिथे बराच मोठा व्यवसाय आहे. मी नागपूरच्या विनायक गोखल्यांचा नातू. आता मी मूळ विषयाकडे वळतो.” रोहन ने सुरवात केली आणि जवळ जवळ अर्धा तास तो वंशावळी आणि विनायकरावांच्या डायरी बद्दल बोलत होता, आत्ता पर्यन्त झालेल्या शोध कार्याची पण संपूर्ण माहिती दिली.

“म्हणजे तुझ्या आजोबांची इस्टेट तू आम्हाला देतो आहेस?” – विश्वास.

“हो, म्हणजे अजून सुनील भैय्याशी संपर्क करायचा आहे. तुम्ही मोठे म्हणून तुम्हाला प्रथम विचारलं.” – रोहन.

“ते ठीक आहे, पण मला का देता आहात? तुम्हीच हक्कदार आहात, तुम्हीच घ्या. हा काय प्रकार आहे ते कळतच नाहीये, एवढी करोडोची संपत्ती अशी कोणी वाटतं का? हा कसला तरी ट्रॅप दिसतो आहे, हे बघा माझ्या वडिलांना असल्या भाकड कथा सांगून कुठल्या तरी ट्रॅप मधे अडकवू नका. द्या बाबांना फोन द्या.” – विश्वास.

“अरे विश्वास मी सगळं चेक केलं आहे. तू समजतोस तसा ट्रॅप वगैरे काही नाही. हा रोहन विनायकरावांचा नातू आहे, आणि ते इंग्लंडला असतात, इथली इस्टेट घेऊन ते कसे सांभाळतील? आणि विनायकरावांनी स्पष्ट लिहिलं आहे की महादेव रावांच्या वंशातले सर्व वारसदार शोधा. आता पर्यन्त ६-७ लोकं शोधून झाले आहेत, आणि दिनकर रावांच्या वंशातले कोण आहे यांचा शोध घेत घेत ते कानपूर पासून फिरत फिरत इथे आले आहेत.” – चंद्रकांत गोखले.

“एक तर करूच शकतात. इस्टेट विकून टाका आणि आलेले पैसे सर्वांमधे वाटून टाका म्हणावं. इतके कष्ट घेण्याची काय जरूर आहे. फुकट विनासायास पैसे मिळत असतील तर कोणाला नको असतील! माझ्या सूचनेवर विचार करा.” – विश्वास.

“नाही, असं नाही करता येणार. ती इस्टेट विकता येणार नाही, जर कोणी वारसदार मिळाला नाही, किंवा इस्टेट स्वीकारणारा मिळाला नाही, तर पांच वर्षांनंतर ती कुणा धर्मादाय संस्थेला दान करण्यात यावी असा स्पष्ट उल्लेख आहे. मृत्युपत्रात.” – रोहन

“अरे हे काय गौड बंगाल आहे? असं कधी होतं का? तुमची खात्री आहे का की असंच आहे म्हणून?” – विश्वास.

“हो मी मृत्यूपत्रांची प्रत, वंशावळी आणि विनायकरावांनी लिहिलेली डायरी सगळं पाहिलं आहे. हे असंच आहे. त्यांनी ही अट का घातली हे त्यांनाच माहीत.” – गोखले.

“का रे रोहन तुम्हाला तर माहीत असेलच ना?” – विश्वास.

“नाही आम्हाला पण सारंग वकिलांकडूनच कळलं.” – रोहन.

 

क्रमश:........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com