तोतया वारसदार - भाग 56 Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तोतया वारसदार - भाग 56

 तोतया वारसदार

पात्र रचना

निशांत                     - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी.

व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं.

रोहन                       - सौमित्रचा मुलगा

चंद्रकांत गोखले                - दिनकर गोखल्यांचा सध्याचा वंशज. वेळणेश्वर

उज्ज्वला                    - चंद्रकांत गोखल्यांची बायको.

विश्वास                     - चंद्रकांत गोखल्यांचा मोठा मुलगा अमेरिका.

स्वानंदी                     - विश्वास ची बायको.

सुनील                      - चंद्रकांत गोखल्यांचा धाकटा मुलगा अमेरिका.

कावेरी                      - महादेवराव – विश्वनाथ – कावेरी (मुलगी )

                             श्रीपति रावांची बहीण. पती - विश्वास परांजपे

वसंतराव परांजपे                -कावेरी परांजपे यांचे आताचे वंशज

श्रीकांत आणि विक्रम            -वसंतरावांची मुलं. अमेरिकेत असतात. 

 

 

भाग  ५६         

भाग ५५  वरून पुढे  वाचा....

“अरे हे काय गौड बंगाल आहे? असं कधी होतं का? तुमची खात्री आहे का की असंच आहे म्हणून?” – विश्वास.

“हो मी मृत्यूपत्रांची प्रत, वंशावळी आणि विनायकरावांनी लिहिलेली डायरी सगळं पाहिलं आहे. हे असंच आहे. त्यांनी ही अट का घातली हे त्यांनाच माहीत.” – चंद्रकांत गोखले.

“का रे रोहन तुम्हाला तर माहीत असेलच ना?” – विश्वास.

“नाही आम्हाला पण सारंग वकिलांकडूनच कळलं.” – रोहन.

“अरे, असं कसं? तुम्हाला नसेल माहीत पण तुमच्या वडिलांना तर नक्कीच माहीत असेल.” – विश्वास.

“नाही, आजोबांशी आमचा गेली कित्येक वर्ष काहीच संपर्क नव्हता. ते गेल्यावर सारंग वकिलांनीच आमचा शोध घेऊन आम्हाला बातमी दिली.” – रोहन.

“हे जे काही तुम्ही सांगता आहात, ते फारच अनाकलनीय आहे.” – विश्वास.

“ विश्वास राव ही कहाणी सविस्तर फोन वर सांगणं शक्य नाहीये. तुम्ही आणि सुनील राव दोघंही येता का भारतात?” – रोहन.

“अहो काय बोलता आहात तुम्ही? हे असं अचानक भारतात येणं कसं शक्य आहे? आमची नोकरी आहे, परत किती खर्चाची बाब आहे ही, कसं विसरता तुम्ही?”-विश्वास

“खर्चाची चिंता करू नका, ते आमचे सारंग सर आहेत ना, त्यांना सांगीतलं की ते करतील सर्व व्यवस्था. तुम्हाला एका पैशाचीही  तोशीस लागणार नाही, याची मी खात्री देतो.” – रोहन.

“इतकी तयारी आहे तुमची? प्रकरण चांगलाच गंभीर दिसतंय. ठीक आहे मी सुनीलशी बोलतो  आणि तुम्हाला सांगतो.” – विश्वास.

“मग आम्ही केंव्हा फोन करू तुम्हाला?” – रोहन

“मी आत्ताच त्याच्याशी बोलतो. त्याचा काय विचार आहे ते बघू. पण त्या आधी तू मला पुन्हा एकदा सारांश सांग. कारण काही गोष्टी सुटून जाण्याची शक्यता आहे. . मग आमचा जसा विचार ठरेल त्या प्रमाणे तुम्हाला काळवतो. तुम्ही उद्या रात्री म्हणजे तुमच्याकडे उद्या सकाळी फोन करा. चालेल.” – विश्वास.

त्या दिवसांचं काम झालं होतं. रोहनने गोखल्यांना फोन वापरू दिल्या बद्दल धन्यवाद दिले. म्हणाला, “फोन ऑफिस मधे फोन करून विचारा किती बिल झालं ते. आणि मला आता सारंग सरांना अपडेट द्यावं लागेल, तेंव्हा STD ची पण तुमची परवानगी लागेल. उद्या पुन्हा अमेरिकेत बोलावं लागेल, तेंव्हा मी काय म्हणतो, की या महिन्याचं बिल आम्हीच देऊ. तुम्ही चिंता करू नका.” – रोहन.

“रोहन, अरे काय हे? त माझा दूरचा का होईना पुतण्या आहेस. तुझ्या कडून मी पैसे घेईन असं तुला वाटलच कसं? आणि तू बोललास माझ्याच मुलांशी ना? मग या पुढे पैशाचा विषय काढायचा नाही.” – गोखले.

मग निशांत ने सारंग सरांना फोन लावला पण फोन वर बबन आला, त्याने सांगितले की सर कोर्टात गेले आहेत. मग सारंगनी निरोप ठेवला की संध्याकाळी फोन करीन म्हणून. आता दिवसभर काहीच काम नव्हतं. वेळणेश्वर कालच फिरून झालं होतं. मग काय जेवण गप्पा आणि झोप यात दुपार निघून गेली. निशांत आणि रोहन दोघंही गोखले पतीपत्नीला आवडले, त्यांना आपल्या मुलांशी भेटी झाल्याचा आनंद झाला होता. आता परकेपणा काही शिल्लक राहिला नव्हता.

संध्याकाळी निशांतनी पुन्हा सारंग सरांना फोन लावला. आत्ता पर्यन्त काय काय घडामोडी झाल्यात, त्याचं अपडेट देऊन झाल्यावर, हे पण सांगीतलं की रोहन ने त्यांना जाण्या येण्याचा खर्च देण्याचं प्रॉमिस  केलं आहे. सारंग सर म्हणाले “अरे, हे सगळं त्यांचच आहे, त्याने जर प्रॉमिस केलं आहे, आणि येणारे सुद्धा गोखलेच आहेत ना, तर मग काहीच प्रॉब्लेम नाहीये. ती व्यवस्था होऊन जाईल. बरं आता जरा चंद्रकांत गोखल्यांना दे, मी बोलतो त्यांच्याशी.”

“फोन स्पीकर वर आहे. तुम्ही बोला. गोखले काका इथेच आहेत.” – निशांत.

“गोखले साहेब, नमस्कार मी सारंग  बोलतो आहे. तुमची भेट झाली यांचा खूप आनंद झाला. पण साहेब, आमचा प्रश्न सुटलाच नाही. तुम्ही तरी हो म्हणा.”

“सारंग सर नमस्कार. तुमची अडचण समजते मला, पण अहो, मी रिटायर्ड माणूस

आहे आणि एवढी मालमत्ता घेऊन मी काय करू? असे किती दिवस राहिले आहेत माझे? तरी पण माझ्या मोठ्या मुलाशी या रोहनने आज संपर्क साधला आहे, ते काय म्हणताहेत ते बघू. ते दोघेही अमेरिकेत आहेत आणि चांगले संपन्न आहेत, त्यांना सुद्धा या संपत्तीची जरूर असेल असं मला वाटत नाही, पण माझ्या धाकट्या मुलांशी बोलून उद्या सांगतो म्हणाला आहे. तर आता उद्या बघू.” – गोखले.

“तुमचा काही अंदाज असेलच ना?” – सारंग

“नाही हो, आजकाल कोणाबद्दल अंदाज वर्तवता येतो का? आता हा रोहनच बघा ना, खरं तर तोच या संपत्तीचा मानकरी आहे, पण ती दुसऱ्या कोणी तरी घ्यावी याच्यासाठी निशांत बरोबर तो सुद्धा वण वण करतोय. आता हेच बघा ना, आधी कोणी तुम्हाला सांगीतलं असतं की, १० कोटीची मालमत्ता दुसऱ्याने घ्यावी म्हणून समस्त गोखले मंडळी धडपडताहेत, तर तुमचा विश्वास बसला असतं का? नका बांधू अंदाज उद्या त्यांच्याशी बोलणं झाल्यावर कळेलच.” गोखले.

“हो बरोबर आहे. मी काय म्हणतो, कारवारचे परांजपे तुम्हाला आता माहीत झाले असतील, त्यांची मुलं सुद्धा अमेरिकेत आहेत. तुमच्या मुलाला त्यांच्याशी संपर्क करायला सांगता का? जमलं तर सगळेच या म्हणावं, अगदी कुटुंबासह येऊ देत. मग सगळे एक ठिकाणी जमून सर्वानुमते योग्य तो निर्णय घेता येईल.” सारंग सर म्हणाले.

“ठीक आहे उद्या विश्वासच्या कानावर घालतो तुमचा निरोप.” – गोखले.

“निशांत, उद्या आपण विश्वासशी बोलायच्या आधी सकाळी तुमचा  मंदिरातला कार्यक्रम आटोपून घेता का?” – गोखले.

“नको नको, हवं तर आम्ही एक दिवस जास्त राहू, पण आधी लगीन कोंडाण्याचं मग बाकीच्या गोष्टी.” रोहननेच परस्पर उत्तर दिलं.

दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा विश्वासला फोन लावला.

“हां विश्वास बोल, झालं का सुनीलशी बोलणं? काय म्हणाला तो?” – गोखले.

कालच बोलणं झालं. तो सॉलिड गोंधळला आहे. त्याला समजतच नाहीये, की दुसऱ्या कोणाची इस्टेट ते आपल्याला का देण्याची भाषा करताहेत ते?” – विश्वास.

“मग तू त्याला सर्व डिटेल्स सांगीतले नाहीस का? तुला तर काल दोनदा रोहननी प्रत्येक मुद्दा सविस्तर समजावून सांगितलं होता.” – गोखले.

“ते सर्व मी त्याला सुद्धा दोनदा सांगितलं. पण त्याचं एकाच पालुपद की आपला काही संबंध नसतांना आपल्यावर ही मेहरबानी का करताहेत हे लोकं. आणि मलाही पटलं त्याचं. बाबा, यांचा काय हेतु आहे असं करण्यात?” – विश्वास.

फोन स्पीकर होता आणि त्यामुळे सर्वांनाच कळलं विश्वास काय बोलला ते. रोहनने गोखल्यांना म्हणाला, काका, “या प्रश्नाचं उत्तर मी दिलं तर चालेलका?”

गोखल्यांनी त्याल तू बोल अशी खूण  केली, मग रोहन सुरू झाला.

“हे बघ विश्वास, हे सर्व गैर समज तात्काळ दूर होतील, जर तुम्ही इथे आलात तर. आणि हे बघ कालच माझं सारंग सरांशी बोलणं झालं आहे, आणि त्यांनी तुमच्या प्रवास खर्चावर मोहोर उठवली आहे, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याचं काही कारण नाही. तुम्ही टिकीटं काढा तेवढे पैसे आम्ही तुम्हाला ट्रान्सफर करतो. आणि इथे आल्यावर सगळी जबाबदारी आमची.”

दोन मिनिटं शांततेत गेली, मग विश्वास म्हणाला, “खरंच तुम्ही पूर्ण खर्च देणार आहात?”

“हो, निश्चितच आम्ही खर्च करू. मी तर म्हणतो की तुम्ही दोघेही सह कुटुंब या. काका काकूंशी पण भेट होईल, आणि सर्व गोखले कुटुंबाचा, मग काय विचार करता का भारतात येण्याचा?” – रोहन.

“ओके, असं असेल, तर तुम्ही खरंच सिरियस दिसता आहात, हे लक्षात येते. मी आत्ताच सुनीलशी बोलतो, तुम्ही अर्ध्या तासाने पुन्हा फोन करू शकाल का?” – विश्वास.

“ओके, आत्ता आठ वाजले आहेत इथे. आम्ही साडे आठ ला फोन करतो.” – रोहन.

फोन बंद झाला.

“निशांत, आपण असं करू, कारवारला फोन लावू आणि काकांना त्यांच्या दोन्ही मुलांचे फोन नंबर विचारू. आणि ते नंबर विश्वासला देऊन परांजपे मंडळींशी संपर्क साधायला सांगू. सगळे आलेत तर आपलं काम सोपं होईल. तुला काय वाटतं?” – रोहन.

“करेक्ट आहे. लाव ताबडतोब फोन.” – निशांत.

रोहनने वसंतरावांशी संपर्क केला आणि त्यांच्या दोन्ही मुलांचे म्हणजे श्रीकांत आणि विक्रम यांचे फोन नंबर लिहून घेतले.

अर्ध्या तासाने रोहनने पुन्हा विश्वासला फोन लावला.

“काय दादा, झालं का बोलणं सुनील दादाशी?” रोहनने विचारलं.

“हो झालं. आणि आमचं तिकडे यायचं ठरलं आहे. उद्या जाऊन कोणच्या तारखेची टिकीट मिळू शकतात ते बघतो. तुझा मेल आय डी असेल तर दे, म्हणजे तुला सूचना देता येईल.” – विश्वास.

 

क्रमश:........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com