तोतया वारसदार - भाग 57 Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तोतया वारसदार - भाग 57

 तोतया वारसदार

पात्र रचना

निशांत                     - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी.

व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं.

रोहन                       - सौमित्रचा मुलगा

चंद्रकांत गोखले                - दिनकर गोखल्यांचा सध्याचा वंशज. वेळणेश्वर

उज्ज्वला                    - चंद्रकांत गोखल्यांची बायको.

विश्वास                     - चंद्रकांत गोखल्यांचा मोठा मुलगा अमेरिका.

स्वानंदी                     - विश्वास ची बायको.

सुनील                      - चंद्रकांत गोखल्यांचा धाकटा मुलगा अमेरिका.

कावेरी                      - महादेवराव – विश्वनाथ – कावेरी (मुलगी )

                             श्रीपति रावांची बहीण. पती - विश्वास परांजपे

वसंतराव परांजपे                -कावेरी परांजपे यांचे आताचे वंशज

श्रीकांत आणि विक्रम            -वसंतरावांची मुलं. अमेरिकेत असतात.

राव साहेब.                    - दक्षता कंपनी चे मालक. निशांत चे साहेब.

नयना                       - निशांतची बहीण.  

 

 

भाग  ५७          

भाग ५६ वरून पुढे  वाचा....

रोहनने वसंतरावांशी संपर्क केला आणि त्यांच्या दोन्ही मुलांचे म्हणजे श्रीकांत आणि विक्रम यांचे फोन नंबर लिहून घेतले.

अर्ध्या तासाने रोहनने पुन्हा विश्वासला फोन लावला.

“काय दादा, झालं का बोलणं सुनील दादाशी?” रोहनने विचारलं.

“हो झालं. आणि आमचं, तिकडे यायचं ठरलं आहे. उद्या जाऊन कोणच्या तारखेची टिकीट मिळू शकतात ते बघतो. तुझा मेल आय डी असेल तर दे, म्हणजे तुला सूचना देता येईल.” – विश्वास.

“मी सारंग सरांचा मेल आय डी देतो. इथे नेट चे खूप प्रॉब्लेम आहेत. सारंग सरांना कळलं की ते ताबडतोब मला कळवू शकतील.”मग रोहन ने सारंग सरांचा आयडी दिला.

“अजून एक गोष्ट, कारवारचे परांजपे, मी सांगितलं होतं मी सांगीतलं होतं त्यांच्या बद्दल, आठवलं का? – रोहन.

“हो आलं लक्षात. पण त्यांचं काय?” – विश्वास.

“त्यांची पण दोन्ही मुलं श्रीकांत आणि विक्रम अमेरिकेतच असतात. मला असं वाटतं की तुम्ही त्यांच्याशी जर बोललात, तर त्यांचा सुद्धा प्रोग्राम ठरू शकतो. मग सगळेच इथे जमत असतील, तर आमच्या कडचे पण लंडन हुन इथे त्याच वेळेस येतील. एकदा सर्व जमले, तर सर्वंकष चर्चा होऊन सर्वानुमते योग्य तो निर्णय घेता येईल. मला वाटतं एवी तेवी गॅदरिंग करायचं ठरलंच आहे, तर त्याच वेळेस निर्णय प्रक्रिया पण होऊन जाईल. तुझं काय मत आहे?” – रोहन.

“ते बरोबर बोलतो आहेस तू, पण अरे, सगळ्यांच्या सुट्ट्या एकाच वेळेस कशा अॅडजस्ट होतील?” – विश्वास.

“थोडा वेळ लागेल, पण चालेल. कारण नागपूरच्या घराचं रिनोवेशन पूर्ण व्हायला पण वेळ लागणारच आहे. मी आजच सारंग सरांशी या बद्दल बोलून अंदाजे तारीख तुला उद्या काळवतो. त्या सुमारास योजना आखा.” – रोहन.

“ओके, पण एक काम अजून कर, वसंत काकांना सांग की आधी त्यांच्या मुलांशी या बाबत बोला, म्हणजे माझा जेंव्हा फोन जाईल, तेंव्हा ते गोंधळात पडणार नाहीत. कारण त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देणं मला अवघड जाईल.” – विश्वास.

“ठीक आहे मी काकांशी बोलतो. उद्या तुला सर्व अपडेट मिळेल.” – रोहन.

अमेरिकेचा कॉल संपला.

मग निशांतने वसंतरावांना फोन लावला. त्यांना वेळणेश्वर आणि चंद्रकांत गोखल्यांच्या बद्दल काहीच माहिती नव्हती. त्यांना सर्व कथा सांगून झाल्यावर निशांत म्हणाला “काका तुम्ही श्रीकांत आणि विक्रम दोघांशी बोलता का? त्यांना आता मी जे सांगीतलं, ते त्यांना सांगा. आणि त्यांना पण भारतात येण्याचा आग्रह करा. उद्या विश्वास गोखले त्यांच्याशी बोलतील हे पण सांगा. सगळ्यांनी मिळून जर तारीख ठरवली, तर फारच छान होईल. आणि त्यांना हे ही सांगा की सर्व खर्च सारंग सर करणार आहेत म्हणून.”

 

“काय निशांत, शोधकर्ता तू, आणि जबाबदारी माझ्यावर, हे चांगलं आहे. असो, तू म्हणतोस त्या बद्दल मी श्रीकांत आणि विक्रमशी बोलतो. मग तर झालं?”- वसंत राव

हा फोन झाल्यावर रोहन सारंग सरांशी बोलणार होता, पण बबननी सांगीतलं की ते कोर्टात गेले आहेत म्हणून. मग संध्याकाळी कॉल करीन असा बबन पाशी निरोप ठेवला. झालं. दिवसभराचं काम संपलं होतं. मग गोखले म्हणाले, “आता वेळ आहे तर पुळयाच्या गणपतीला जाऊन येऊ शकता. रोहन आणि निशांतला पण काही अडचण

नव्हती, मग त्यांनी काका आणि काकूंना पण आग्रह केला, आणि सगळेच दर्शन करून आले. परत वेळणेश्वरला यायला संध्याकाळ झाली. आल्यावर निशांत म्हणाला. “रोहन, सारंग सरांना फोन करायचा आहे न? आता करूया का?”

“आत्ता जेमतेम साडे आठ वाजले आहेत. फार काही रात्र झाली नाहीये, बोलायला तर पाहिजेच न? कर फोन.” रोहननी आपलं मत नोंदवलं.

निशांतने सारंग सरांना फोन लावला. “सर, मी निशांत बोलतो आहे.”

“हूं, बोल काय अपडेट आहे?” – सारंग.

मग निशांत दिवसभरातल्या घडामोडी सांगीतल्या, म्हणाला, “उद्या जर सगळ्यांनी सहकुटुंब यायचं ठरवलं, तर त्यांच्या तिकीटांची सोय करावी लागणार आहे.”

“नो प्रॉब्लेम. किती पैसे ट्रान्सफर करायचे आणि कसे करायचे ते विचारून ठेव.”- सारंग

“उद्या फोन करू तेंव्हा विचारतो. पण सर अजून एक गोष्ट, घराच्या दुरूस्तीचं काम थांबवलं असं म्हणाला होता, ते ताबडतोब सुरू करावं लागणार आहे. नाहीतर ही सगळी मंडळी यायची आणि वाडा राहण्या योग्य नाही. असं नको व्हायला.” – निशांत.

“अरे, हे माझ्या लगेचच लक्षात आलं आणि मी ते लगेच पुन्हा सुरू केलं. आता कॉंट्रॅक्टर ला उद्याच सांगतो की दुप्पट तिप्पट माणसं लाव पण वाडा महिन्या भरात तयार झाला पाहिजे. तू नको काळजी करू. तू आता तिथलं काम निपटलं की तडक नाशिकला जा. ते काम अजून बाकी आहे.” – सारंग.

“हो हो, इथलं काम झालं की लगेच मी नाशिकला निघतो.” – निशांत.

“निशांत, आठ दहा दिवसांपूर्वी राव साहेब आले होते भेटायला. सहजच आले होते. मी त्या वेळी वाड्यावर जात होतो, प्रगती कशी आहे ते बघायला.” – सारंग.

“मग? काय म्हणत होते?” – निशांत.

“काही नाही शोधकार्याची प्रगती समाधानकारक चालली आहे का हे विचारात होते. मी त्यांना घेऊन वाड्यावर गेलो.” – सारंग.

निशांत आता धास्तावला. जर सारंग सरांनी सांगितलं की अर्ध काम तर रोहनच करतो आहे तर आपली काही खैर नाही. “मग? तुम्ही काय सांगीतलं?” – निशांत.

सारंग सरांना निशांतच्या स्वरातली अस्वस्थता जाणवली. म्हणाले, “अरे, तू का घाबरतो आहेस? तू इतकं छान काम करतो आहेस, की ज्याची आम्ही कोणीच अपेक्षा केली नव्हती. पाहता पाहता सर्व नातेवाईक शोधून काढलेस की तू. तुला तर अवॉर्ड द्यायला पाहिजे.” – सारंग.

“सर, का चेष्टा करता आहात माझी? उद्या राव साहेब माझी शाळा घेतील.” – निशांत.

“अरे नाही नाही, ते सहजच आले होते, मीच त्यांना माझ्याबरोबर वाड्यावर घेऊन गेलो होतो. पण तिथे बोलता बोलता त्यांनी विचारलं की इंटिरियर कोणाला दिलं आहे म्हणून. मी सांगीतलं की अजून कोणाला नाही. मग ते म्हणाले की नयनाला द्या ती खूप छान सजवते घर. त्यांनी तिने केलेल्या कामाचे फोटो पण पाहीले होते. मग मी त्यांच्याकडून नंबर घेतला आणि तिला मीटिंगला बोलावून घेतलं. तिने फोटो दाखवले आणि कुठे कुठे काम केलं ते ही सांगीतलं. प्रशांत आणि किरीट ला सुद्धा तिचं काम आवडलं म्हणून लगेच तिला बूक करून टाकलं. ती आर्किटेक्ट नाहीये, साधी B.Sc. आहे. पण तेज तर्रार मुलगी आहे. काल पासून तिने सर्व दुरूस्तीचं काम आपल्या हातात घेतलं आहे. मी बघत होतो, बिजली आहे बिजली. अगदी थोडक्या वेळेत तिने सर्व कामगारांवर कंट्रोल बसवला. जेमतेम २५-२६ वर्षांची मुलगी आहे पण ज्या पद्धतीने काम करत होती, ते पाहिल्यावर तिचं खूप कौतुक वाटलं. आपल्या कॉंट्रॅक्टर ने आधी एकदा तिच्या बरोबर काम केलं आहे. तो सुद्धा सांगत होता की नयना मॅडम असतील तर आमची चिंताच मिटली. त्यामुळे आपल्याला पण काळजी करायचं कारण उरलं नाहीये.” – सारंग म्हणाला.

“सर तिला का दिलं काम?” – निशांत.

“का रे? तुला काय प्रॉब्लेम आहे? तिच्या बद्दल काही कळलंय का तुला?” – निशांत.

“सर ती माझी धाकटी बहीण आहे. लोकं म्हणतील निशांतने आपली फॅमिली घुसवली म्हणून.” – निशांत.

“तिला तू आमच्यासाठी काम करतो आहेस हे माहीत नाही का? तिच्या बोलण्यात तसं काही दिसलं नाही.” सारंग.

“नाही सर, आमचा व्यवसायच असा आहे की या कानाचं त्या कानाला कळत नाही. आमच्या व्यवसायात गोष्टी षट्कर्णि होऊन चालत नाहीत.” – निशांत.

पण आमच्या कामात तर इतकी गुप्तता बाळगण्याची काहीच आवश्यकता नाहीये, मग असं का?” – सारंग.

“सर एकदा लिबर्टी घ्यायची आणि सिग्नल तोडायची सवय लागली, की ती केंव्हा घात करेल हे सांगता येत नाही. त्यामुळे नियम तो नियम. तो मोडायचा नाही.” – निशांत.

“निशांत राव साहेबांना पण काहीच माहिती नव्हती, त्यांना फक्त तिच्या कामाचा रीपोर्ट चांगला आहे एवढंच माहीत होतं.” – सारंग.

“नाही, मी तरी नयनाबद्दल त्यांना काही सांगितलं नाहीये. पण शेवटी आमची डिटेक्टिव एजन्सी आहे, त्यांनी माहिती काढली असेल, तर माहीत नाही. पण तुम्ही दोघांशीही या बद्दल काही बोलू नका.” – निशांत.

“ठीक आहे, नाही बोलणार. उद्या तुला सांगतो की काम केंव्हा पर्यन्त पूर्ण होईल ते. मी सांगणार आहे की डबल माणसं लाव पण काम फास्ट कर. उद्याच नयनाशी बोलतो मी.” सारंग

“आम्ही पण उद्या विश्वास शी बोलून त्यांचा काय प्रोग्राम ठरला आहे ते विचारतो. आणि तुम्हाला अपडेट देतो.” – निशांत.

जेवणं झाल्यावर रोहन आणि निशांत शतपावली करायला बाहेर पडले.

“निशांत, आपण दोघांनाही वाडयाचं काम बघायचं होतं पण आपण इथेच अडकून पडलो आहोत. आणि खरं सांगायचं तर मला कंटाळा पण आला आहे.” रोहन म्हणाला. जरा वैतागलाच होता.

“मी एक सुचवू का?” – निशांत.

“काय?” – रोहन.

‘तुला अक्षय काकांशी काही काम होतं ना? मग तू सुरतला जाऊन ये, मी लढवतो इथला किल्ला. आणि शलाका पण आहे तिथे, तुझा वेळ छान जाईल.” – निशांत.

“माझं काम अक्षय काकांशी आहे, शलाकाशी नाही. मधेच शलाका कुठून आली?”- रोहन.

“तेच रे, काम अक्षय काकांशी. शलाका बोनस. बोनसची मजा काही वेगळीच असते. जाऊन ये सुरतला. उद्याच निघ.” – निशांत म्हणाला आणि हसला. रोहन पण हसला.

दुसऱ्याच दिवशी रोहन मुंबईच्या वाटेला लागला. तिथून सुरतला जाणार होता. अक्षय काकांशी बोलणं झालं होतं.

क्रमश:........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com