तोतया वारसदार - भाग 58 Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तोतया वारसदार - भाग 58

 तोतया वारसदार

पात्र रचना

निशांत                     - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी.

व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं.

रोहन                       - सौमित्रचा मुलगा

चंद्रकांत गोखले                - दिनकर गोखल्यांचा सध्याचा वंशज. वेळणेश्वर

उज्ज्वला                    - चंद्रकांत गोखल्यांची बायको.

विश्वास                     - चंद्रकांत गोखल्यांचा मोठा मुलगा अमेरिका.

स्वानंदी                     - विश्वास ची बायको.

सुनील                      - चंद्रकांत गोखल्यांचा धाकटा मुलगा अमेरिका.

कावेरी                      - महादेवराव – विश्वनाथ – कावेरी (मुलगी )

                             श्रीपति रावांची बहीण. पती - विश्वास परांजपे

वसंतराव परांजपे                -कावेरी परांजपे यांचे आताचे वंशज

श्रीकांत आणि विक्रम            -वसंतरावांची मुलं. अमेरिकेत असतात.

राव साहेब.                    - दक्षता कंपनी चे मालक. निशांत चे साहेब.

नयना                       - निशांतची बहीण.  

 

 

भाग  ५८           

भाग ५७  वरून पुढे  वाचा....

‘तुला अक्षय काकांशी काही काम होतं ना? मग तू सुरतला जाऊन ये, मी लढवतो इथला किल्ला. आणि शलाका पण आहे तिथे, तुझा वेळ छान जाईल.” – निशांत.

“माझं काम अक्षय काकांशी आहे, शलाकाशी नाही. मधेच शलाका कुठून आली?”- रोहन.

“तेच रे, काम अक्षय काकांशी. शलाका बोनस. बोनसची मजा काही वेगळीच असते. जाऊन ये सुरतला. उद्याच निघ.” – निशांत म्हणाला आणि हसला. रोहन पण हसला.

दुसऱ्याच दिवशी रोहन मुंबईच्या वाटेला लागला. तिथून सुरतला जाणार होता. अक्षय काकांशी फोनवर बोलणं झालं होतं.

दुसऱ्या दिवशी सकाळी गोखल्यांनी पुन्हा विश्वासला फोन लावला. आणि त्याला सांगीतलं की रोहन काही कामा साठी सुरतला गेला आहे, आणि आता त्याच्याशी  निशांत बोलेल.

“निशांत कोण? तो पण गोखलेच आहे का?” – विश्वास.

“नाही निशांत हा शोधकर्ता आहे. सर्व वारसदांना शोधायची त्याची जबाबदारी आहे. या मोहिमेचा तोच सूत्रधार आहे.” – गोखले.

“मग रोहन कोण आहे जो माझ्याशी आज पर्यन्त बोलत होता?” – विश्वास.

“ज्यांची इस्टेट आहे, त्यांचा नातू. ते लोक लंडनला असतात. तो निशांतच्या बरोबरीने शोध कार्यात सामील झाला आहे. म्हणजे इंट्रेस्ट म्हणून. अन्यथा त्यांचा लंडनला खूप मोठा व्यवसाय आहे. त्यांना इस्टेट नको आहे. तो सुरतला त्यांच्या व्यावसायिक कामा साठी गेला आहे.” – गोखले.

“हूं, हे सगळं खूप गोंधळात टाकणारं आहे. पण ठीक आहे. द्या तुम्ही निशांतला. त्यांच्याशी बोलतो. आज पर्यन्त जे काही बोलणं आमचं रोहनशी झालं आहे ते त्याला माहीत आहे न? नाही तर सारांश सांगावा लागेल.”- विश्वास

“फोन कायम स्पीकर वरच होते आणि आज पण आहेत. तू बोल. आम्ही सगळेच ऐकतो आहोत.” – गोखले.

“ठीक आहे. माझं श्रीकांतशी बोलणं झालं. त्यांना त्यांच्या वडिलांनी फोन करून सर्व सांगीतलं होतं त्यामुळे ते माझ्या फोनची वाटच पाहत होते. काल रोहनच्या बोलण्यावरून असं दिसलं की वाड्यात गॅदरिंग करायचं आहे. आणि वाड्याचं पुनरुज्जीवन करणं चालू आहे. याला साधारण  किती दिवस लागतील ते कळलं तर त्या प्रमाणे येण्याचा दिवस ठरवता येईल असं सर्वांचंच मत पडलं आहे. त्यामुळे ती डेट सांगा. सर्वांच्या सुट्ट्या कश्या मिळतात, त्यावर सगळं अवलंबून आहे. किमान एक महिना तरी अगोदर सांगा. म्हणजे सर्वांची व्यवस्थित मोट बांधता येईल.” – विश्वास.

“माझं काल रात्रीच सारंग सरांशी बोलणं झालं आहे त्यानुसार साधारण दोन महीने धरून चला. मी तुम्हाला सारंग सरांचा मेल आयडी देतो. तुमच्या काही शंका असतील तर त्यांना मेल करा. तुमचा फोन नंबर मी त्यांना देतो आहे, तुमचा मेल मिळाल्यावर ते तुम्हाला फोन करतीलच. पण वेळो वेळी अपडेट पण देतील.” – निशांत.

“का? सारंग सर का? तुम्ही स्क्रीनच्या बाहेर चालले आहात का?” – विश्वास.

“तुम्ही ज्यांना कॉनटॅक्ट केला होता, ते श्रीकांत परांजपे यांचे काका श्री गोविंद राव यांच्याशी अजून संपर्क करायचा आहे. ते नाशिकला असतात. महादेव राव गोखल्यांच्या वंशातले जवळ जवळ सर्व वंशज शोधून झाले आहेत. फक्त गोविंदरावांची भेट अजून झाली नाहीये. त्यांच्या साठीच मी उद्या नाशिकला जातो आहे. आणि तिथून नागपूरला जाईन. मी नागपूरला जाई पर्यन्त तुमच्या संपर्कात डायरेक्ट सारंग सरच राहतील. मी नागपूरला जाऊन घराच्या कामाकडे जातीने लक्ष देणार आहे.” – निशांत.

“ठीक आहे. आम्हाला सारंग सर वेळोवेळी अपडेट देतील ना?” – विश्वास.

“त्यांची तुम्ही चिंताच करू नका. आमचे सर फार काटेकोर आहेत.” – निशांत.

मग निशांत दिनेशला फोन करून सांगणार होता की तो नाशिकला जाता जाता साताऱ्याला येणार आहे. पण तेवढ्यात सारंग सरांचा फोन आला. निशांतला आश्चर्यच वाटलं की आत्ता सहसा सारंग सर कोर्टात असतात मग आज दुपारीच कसा फोन आला? त्याने सरांना विचारलं सुद्धा की, “सर आज दुपारीच फोन केला? काही गडबड झाली आहे का?”

“नाही, आज रविवार आहे रे बाबा,” सारंग सर म्हणाले “आज सुद्धा कोर्टात जायला लावतोस का मला?”.

“अरे हो खरंच की, माझ्या लक्षातच आलं नाही. इकडे कोकणात जवळजवळ सुट्टीवर असल्यासारखंच वातावरण आहे. बरं काही खास?” – निशांत.

“रोहन अक्षय साहेबांशी चर्चा करायला गेला होता, त्या बद्दल काही माहिती आहे का तुला?” – सारंग.

“नाही त्याचा काही फोन आला नाही. तो काय हो, चर्चा ही सबब असेल, मुख्य कारण शलाका आहे.” निशांत म्हणाला आणि हसला.

“हो त्याचा फोन आला होता, तो म्हणाला की काही डिल होण्याची शक्यता आहे, पण शलाका आणि त्याच्या जोडी बद्दल साने पती पत्नीला काही आक्षेप नाहीये. म्हणजे जवळ जवळ ठरलंच म्हणायचं. अजून दोन दिवस राहून तो लंडनला वापस जाणार आहे. त्याने तुला फोन करायचं खूप प्रयत्न केला पण नाही लागला असं म्हणत होता. अजून एक गोष्ट आहे. मी विश्राम ला फोन केला होता हे विचारण्या साठी की आता रोहन वापस चालला आहे तर त्यांच्या पैकी कोणी आलं तर रिनोवेशन परफेक्ट होईल म्हणून. त्यांचा तुला फोन येईल. मग ठरवा काय ते.” – सारंग.

“मी तर आत्ता निघालो होतो साताऱ्याला जायला. तिथून नाशिक. मग काय करू? निघू की फोनची वाट बघू? – निशांत.

“वाट बघ फोन ची.” – सारंग.

गोखले हे संभाषण ऐकत होते, म्हणाले की मुंबईला जाणं सोपं पडेल. तिथून ट्रेन घेता येईल. त्यामुळे सातारा रहित करून जेवण झाल्यावर मुंबईला जायचं निशांत ने ठरवलं.

मग निशांत साताऱ्याच्या फोन ची वाट बघत बसला. थोड्या वेळाने फोन आलाच. विनय बोलत होता. “निशांत, मी येतोय नागपूरला. वाड्यात काय काय सोई करायच्या आहेत हे बघू आपण. तुझा काय प्रोग्राम आहे?”

मला नाशिकला जायचं आहे, म्हणून मी आत्ता मुंबईला जातो आहे. तिथून नाशिक आणि गोविंदरावांची भेट झाल्यावर नागपूर.” – निशांतने आपला कार्यक्रम सांगितला.

“मग असं करू, मी पण मुंबईला येतो. मला थोडा उशीर होईल, पण मी एक काम करतो इथूनच मुंबईचं आमचं नेहमीचं हॉटेल बूक करतो. तू थोडा थांब. बूकिंग झाल्यावर मी तुला फोन करतो, आणि हॉटेलचं नाव आणि पत्ता काळवतो. तू पोच तिथे. मी पण पाठोपाठ पोचतोच.” – विनय.

दुसऱ्या दिवशी नाशिकला पोचल्यावर आधी हॉटेल वर जाऊन आंघोळ नाश्ता आटोपल्यावर तो आणि विनय गोविंदाच्या आश्रमात गेले. सगळी अथ पासून इति पर्यन्त उजळणी झाल्यावर गोविंदाला अनेक प्रश्न पडले होते. ते तसे सर्वांनाच पडले होते आणि सर्वांचं शंका निरसन करून करून निशांतला आता सर्व पाठ झालं होतं.

“तुम्ही म्हणालात की सर्वांचं गॅदरिंग होणार आहे म्हणून.” – गोविंद.

“हो बरोबर आहे. घराचं पुनरुज्जीवन पूर्ण झाल्यावर म्हणजे साधारण दोन एक महिन्यांनंतर सर्वच नागपूरला जमणार आहेत. पक्का दिवस अजून ठरायचा आहे. तो अमेरिका आणि इंग्लंड च्या लोकांवर अवलंबून आहे.” निशांत म्हणाला.

“मग मी पण त्याच वेळेस नागपूरला येईन आणि सर्वानुमते जे ठरेल ते ठरेल. चालेल ना?” – गोविंद.

“न चालायला काय झालं. पण तुमचा विचार स्पष्ट पणे सांगीतला असता तर बरं झालं असतं. अहो सगळेच आत्ता पर्यन्त स्पष्ट काहीच सांगत नाहीये, म्हणून विचारलं. अजून काही नाही.” निशांतने आपली अडचण सांगीतली.

“अरे यात प्रॉब्लेम काय आहे. जे सगळ्यांचं मत तेच माझं मत. सिम्पल.” - गोविंद.

“ठीक आहे. बरं आम्ही चलतो आता. संध्याकाळी नागपूरला जाणारी गाडी आहे, ती पकडायची आहे.” – निशांत.

“अरे आजच चालला आहेस? मला वाटलं की आज थांबशील म्हणून. थांबून जा. उद्या जा.” – गोविंद.

“नको खूप दिवस मी फिरतोच आहे. आता बाहेरचं काम जवळ जवळ संपलं आहे, आता नागपूरला जाऊन घराच्या प्रगतीवर लक्ष द्यायचं आहे. त्याच कामासाठी हा विनय पण आला आहे.” – निशांत.

मग गोविंदचा निरोप घेऊन निशांत आणि विनय निघाले. दुसऱ्या दिवशी सकाळी नागपूरला पोचल्यावर त्याने सारंग सरांना फोन केला. आणि तो आणि विनय नागपूरला पोचले आहेत, आणि संध्याकाळी भेटायला येतो आहे असं सांगीतलं आता त्याच्या घरात फोन लागला होता, त्यामुळे काळजी नव्हती.

संध्याकाळी निशांत आणि विनय सारंग सरांच्या ऑफिस मधे पोचला. कोणी पक्षकार आले होते, त्यांच्या बरोबर सरांची मीटिंग चालली होती म्हणून तो बाहेरच थांबला. त्याल पाहून बबनला आश्चर्य वाटलं. त्याने निशांतशी बोलायला सुरवात केली. बबन जनरल माहिती विचारात होता, निशांतला त्याचं सुभाषशी असलेलं कनेक्शन माहीत नव्हतं म्हणून तो माहिती देत होता. किती झालं तरी तो सारंग सरांचा विश्वासू माणूस होता. थोड्या वेळाने प्रशांत आणि किरीट पण आले. सारंग सरांची मीटिंग चालू होती म्हणून ते पण बाहेरच बसले. मग बबन कान टवकारून त्यांचं बोलणं ऐकत राहिला. त्याला बरीच माहिती मिळाली. पार्टी गेल्यावर मग निशांत आणि विनय आत गेले. निशांतने आधी विनयची सारंग सरांशी ओळख करून दिली आणि मग गोविंदाचं अपडेट दिलं. मग सारंग सर म्हणाले, “यांचा अर्थ आता सगळे गोखले शोधून झाले आहेत आणि सगळे नागपूरला जमायला तयार आहेत. आता रेनोवेशन पूर्णं होत आलं की सगळ्यांना निरोप पाठवू. मधल्या काळात, विनय आणि निशांत तुम्ही दोघं सर्वांच्या संपर्कात रहा. मी निशांतच्या फोन वर सुद्धा ISD ची सुद्धा घेतलेली आहे, त्यामुळे तुम्हाला अडचण जाणार नाही.”

“ठीक आम्ही राहू सर्वांच्या संपर्कात. अजून काही?” – निशांत.

“आपल्याला देशभरातल्या प्रमुख वर्तमान पत्रात एक वारसदारांबद्दल जाहिरात द्यायची आहे. जेणेकरून कोणी सुटला असेल, तर तो आपल्याशी संपर्क करेल.” – सारंग.

“केंव्हा देणार  जाहिरात?” – विनय.

येत्या आठवड्यात. म्हणजे सगळे जमतील तेंव्हा सर्व गोष्टी क्लियर असतील.”– सारंग.  

मीटिंग संपली आणि मग सगळे पांगले. रात्रीचे आता नऊ वाजले होते, सुभाषला फोन करणं शक्य नव्हत. म्हणून बबनने सरळ सुभाषच्या घरीच जायचं ठरवलं, आणि तो खापरीला सुभाषच्या घरी पोचला. त्याला अपडेट देणं गरजेचे होते.

क्रमश:........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com