तोतया वारसदार
पात्र रचना
निशांत - शोधकर्ता
नयना - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर
अनिल - विश्रामचा चुलत भाऊ. सातारा.
विनय - अनिलचा मुलगा सातारा.
बबन - सारंग वकिलांचा चपराशी.
भाग ५९
भाग ५८ वरून पुढे वाचा....
“आपल्याला देशभरातल्या प्रमुख वर्तमान पत्रात वारसदारांबद्दल एक जाहिरात द्यायची आहे. जेणेकरून कोणी सुटला असेल, तर तो आपल्याशी संपर्क करेल.” – सारंग.
“केंव्हा देणार जाहिरात?” – विनय.
“येत्या आठवड्यात. म्हणजे सगळे जमतील तेंव्हा सर्व गोष्टी क्लियर असतील.”– सारंग.
मीटिंग संपली आणि मग सगळे पांगले. रात्रीचे आता नऊ वाजले होते, सुभाषला फोन करणं शक्य नव्हत. म्हणून बबनने सरळ सुभाषच्या घरीच जायचं ठरवलं, आणि तो खापरीला सुभाषच्या घरी पोचला. त्याला अपडेट देणं गरजेचे होते.
सुभाष आणि बबन खापरीच्याच एका हॉटेल मधे बसले होते.
“काय बबनराव इतक्या रात्री एकदम खापरीला आलात? काही सिरियस मॅटर आहे का? लगेच सांगा, माझा जीव कासावीस होतो आहे.” – सुभाष.
“साताऱ्याहुन विनय गोखले आले आहेत. घराच्या दुरुस्तीवर देखरेख करायला. निशांत पण आला आहे. कालच सारंग सरांनी कॉंट्रॅक्टर ला आणि इंटिरियर करणाऱ्या नयना मॅडमला बोलावून सांगीतलं की पाहिजे तितके कामगार वाढवा पण दीड महिन्यात हे काम पूर्ण व्हायला पाहिजे म्हणून. म्हणजे आता आपल्या जवळ वेळ मुळीच नाहीये. तुमचं काम कुठवर आलंय?” – बबन.
“आपलं काम पूर्ण झालं आहे. डिग्री हातात आली आहे, करपोरेशन मधे सुद्धा नाव बदलून झालं आहे. अविनाश गोखल्यांची संपूर्ण माहिती गोळा झाली आहे. मी सारखा अभ्यास करतच असतो. आता माझी खात्री आहे की मला सारंग सरांच्या सर्व प्रश्नांना उत्तरं देता येतील म्हणून. तुम्ही निश्चिंत रहा. एवढंच सांगा की मी समोर येऊन दावा केंव्हा पेश करायचा ते.” -सुभाष
“ती वेळ आता लवकरच येणार आहे. काल या लोकांची मीटिंग झाली तेंव्हा माझ्या कानावर आलं की देश भरातल्या प्रमुख वर्तमान पत्रात जाहिरात द्यावी लागणार आहे म्हणून. आता ती आली, की त्यानंतर दोन तीन दिवसांनी सुभाष गोखले प्रगट दिन. त्यामुळे अभ्यासाची रिवीजन करायला सुरवात करा.” – बबन म्हणाला.
या गोष्टीला आठवडा होऊन गेला. वाड्याचं काम फूल स्पीड ने चालू होतं. विनयचा दिवसभर वाड्यावरच मुक्काम होता. अर्थात मुख्य कारण दुसरंच होतं. विनयने नयनाला पाहिलं आणि त्याचं भानच हरपलं. तरतरीत नाकाची आणि पाणीदार डोळ्यांची नयना त्याला एकदम आवडून गेली. तिच्या स्विफ्ट हालचाली बघून तर तो वेडाच झाला. प्रथम तो थोडा बिचकला, अवघडला, पण नयना मात्र त्याच्याशी खूपच मोकळे पणाने वागत होती, कारण तिला माहीत होतं की तो गोखले आहे म्हणून. तो तिचा प्रिन्सिपल क्लाईंट होता. आणि निशांत त्यांच्या बरोबर मित्रा सारखा वागत होता. मग नयनाशी दोन दिवसांत थोडी घसट झाल्यावर नयनानेच विचारलं की,
“विनय, तुम्ही असे तोलून मापून का बोलता आहात माझ्याशी? जे काही तुमच्या मनात आहे, ते सांगा, म्हणजे त्या प्रमाणे योग्य ते बदल करता येतील.”
“नाही, असं काही नाहीये, मी बघतो आहे की एवढ्या लहान वयात आणि ते ही आर्किटेक्ट नसतांना इतकं सुपर काम करता आहात की मी काही सांगण्याची आवश्यकताच नाही. तुमचं काम एकदम परफेक्ट आहे.” – विनय.
“तुम्हाला निशांतचं काम कसं वाटलं, म्हणजे आता त्याचं काम जवळ जवळ झालंच आहे म्हणून विचारते आहे.” – नयना.
“अतिशय उत्तम. काहीही समोर नसतांना त्यानी हे अशक्यप्राय वाटणारं काम तडीस नेलं. माझ्याजवळ तर शब्दच नाहीयेत त्याची तारीफ करण्यासाठी.” – विनय.
“मला भीती वाटत होती की मी तुमच्या अपेक्षेला खरी उतरते की नाही याची. तुमच्या कडून थोडा जरी नाराजीचा सुर उमटला असता तर माझी काही खैर नव्हती. दादाने माझी चांगलीच शाळा घेतली असती.” – नयना.
“तुमच्या कामाचं मूल्यमापन आम्ही आणि सारंग सर करू, आणि मी आत्ताच सांगीतलं की तुम्ही छान काम करता आहात म्हणून. आणि माझ्या माहिती प्रमाणे, सारंग सर पण तुमच्या कामावर खुश आहेत. तुमच्या दादाचा काय संबंध या कामांमध्ये?”– विनय.
“म्हणजे माझ्या दादा बद्दल तुम्हाला काहीच माहिती नाही?” – नयना.
“नाही, मला कसं माहीत असणार?” – विनय.
“अख्खी गोखले फॅमिली ओळखते त्याला. तुम्ही तर त्यांच्याच बरोबर नागपूरला आलात. तो बघा निळ्या शर्ट मधला कॉंट्रॅक्टर शी बोलतो आहे.” असं म्हणून नयना हसली.
“तो? निशांत? तुझा भाऊ आहे?” – विनय आश्चर्याने म्हणाला.
“हो, माझा सख्खा मोठा भाऊ. मला सुद्धा परवा तुम्ही आले तेंव्हाच कळलं.” – नयना.
“म्हणजे काय? तुमचं पण आमच्या सारखंच झालं की काय?” – विनय.
“तुमच्या सारखं म्हणजे? मी नाही समजले.” नयना म्हणाली.
“म्हणजे आम्हाला सुद्धा निशांत येई पर्यन्त माहीत नव्हतं की आमचे बरेच भाऊबंद आहेत म्हणून. असंच तुमच्या बाबतीत पण झालं का? निशांत तुमचा भाऊ आहे हे परवाच समजलं का?” – विनय.
नयनाला आता जोरदार हसू फुटलं. विनय तिच्याकडेच टक लाऊन बघत होता. नायनांच्या ते लक्षात आलं. ती एकदम हसायची थांबली. विनयला विचारलं, “असे काय बघता आहत माझ्याकडे? चेहऱ्यावर काही धूळ माती वगैरे चिकटली आहे का?”
“नाही तसं काही नाही. किती निरागस हसता हो तुम्ही. निर्मल हास्य. पण तुम्ही हसत का होता?” – विनयने उत्सुकतेने विचारलं.
“अहो,” नयना म्हणाली, “मघाशीच नाही का सांगीतलं की निशांत माझा सख्खा मोठा भाऊ आहे म्हणून?
“मग परवा ओळख झाली असं कसं म्हणता?” – विनय
“माझ्या बोलण्याचा अर्थ हा होता, की दादा कधीच त्याच्या कामाबद्दल बोलत नाही. आता आम्हालाही त्याची सवय झाली आहे. मी इथलं काम घेतलं तेंव्हा मला माहितीच नव्हतं की दादा सुद्धा सारंग सरांचं काम करतो आहे म्हणून. आणि सारंग सरांना पण माहीत नव्हतं की आम्ही बहीण भाऊ आहोत, म्हणून. हे सर्व तुम्ही इथे आल्यावर परवाच कळलं. मला वाटलं की तुम्हाला माहिती असेल. पण आता लक्षात आलं तुमच्या तोलून मापून बोलण्यामागे काय कारण आहे ते.”
“हे भगवान, पृथ्वी गोल आहे हे माहीत आहे, पण ती इतकी गोल गरगरीत असेल, यांची कल्पनाच नव्हती.” आणि असं म्हणून विनय हसायला लागला. त्याला हसतांना पाहून नयना पण हसायला लागली. दोघांचं हसणं काही केल्या थांबत नव्हतं. निशांतनी ते बघितलं आणि तो जवळ आला. म्हणाला
“काय झालं बुवा एवढं हसायला? आम्हाला पण कळू द्या.” – निशांत.
“अरे काही नाही, विनयला वाटलं की तू माझा भाऊ आहेस हे मला परवा कळलं, म्हणून मला हसायला आलं. आणि चूक कळल्यावर विनय पण हसला. इतकंच.”-नयना
निशांतला काहीच कळलं नाही. तो म्हणाला, “ म्हणजे? मी नाही समजलो.”
“तुम्ही लोकं परवा आले ना, तेंव्हाच मला कळलं की तू सुद्धा सारंग सरांच्या प्रोजेक्ट वर काम करतो आहे म्हणून.” – नयना.
“मग? त्यात हसण्यासारखं काय आहे?” – निशांत म्हणाला,
“त्यात हसण्या सारखं काहीच नाहीये, पण मी म्हणाले की मला पण दादा बद्दल परवाच कळलं, आणि विनयला वाटलं की जसं त्यांनाही इतके सारे गोखले आपले नातेवाईक आहेत हे आत्ताच कळलं तसंच माझी आणि भावाची भेट पण परवाच झाली म्हणून.” नायनाने स्पष्टीकरण दिलं. “आणि म्हणून आम्हाला हसायला आलं”
निशांतनी ऐकलं आणि त्याच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. काही कारण नसतांना दोघंही हसताहेत म्हणजे नक्कीच प्रेमात पडले असावेत. त्याने जरा विचार केला, असं असेल, तर त्याची काहीच हरकत नव्हती.
“चालुद्या, चालुद्या तुमचं मला बरीच कामं आहेत.
असेच चार पांच दिवस गेलेत. दोघंही दिवसभर एकत्रच असायचे, खाणं पिणं सगळंच बरोबर. नायनाला दागिन्यांबद्दल खूप उत्सुकता होती. तिने इतके प्रश्न विचारले, की शेवटी एक दिवस विनयने विचारलंच.
“इतकी आवड आहे तुला दागिन्यांची तर घालत का नाहीस? मी मागवु का साताऱ्यावरून?” – विनय.
“इथे? या धूळ मातीत? दागिन्यांसाठी वेगळं वातावरण लागतं. इथे जीन्स ठीक आहे,
आणि जिन वर दागिने नाही घालत.” नयना म्हणाली. “बरं ते जाऊदे, तुमचा दागिन्यांचा कारखाना तू सांभाळतोस का?”
“नाही, ते काम आईच्या अखत्यारीत येतं. मी दुकानात असतो, आणि सध्या आम्ही एका नवीन प्रोजेक्ट वर काम करतो आहोत.” – विनय.
“तुझी डिग्री कोणची आहे?” - नयना.
“मी केमिकल इंजीनियर आहे, आणि त्याच अनुषंगाने नवीन प्रोजेक्ट बद्दल विचार चालू आहे.” – विनय.
“मी केमिस्ट्रि मधे M.Sc. केलंय. अमरवतीच्या VMV कॉलेज मधून. तू कुठून केलस साताऱ्यावरून?” -नयना
“नाही इथल्याच LIT मधून.” – विनय.
“काय सांगतोस? म्हणजे तुला नागपूरची बरीच माहिती असेल. मला वाटलं की तू पहिल्यांदाच येतो आहेस.” – नयना.
“आता पांच वर्ष या शहरात काढली म्हंटल्यांवर तेवढी माहिती तर होणारच ना. आणि म्हणूनच मी हे घराचं काम अंगावर घेतलं. मला पण उत्सुकता होती नागपूरला यायची.”
दिवस सरत होते, काम वेगाने पूर्ण होत होतं. आणि त्याच बरोबर दोघांमधले बंध सुद्धा पक्के होत होते.
तिकडे बबन मात्र अस्वस्थ होत होता. १२-१३ दिवस उलटून गेले होते पण अजून जाहिरात काही दिल्या गेली नव्हती. ते काम त्यालाच करायचं होतं, आणि अजून सारंग सरांनी काही सांगीतलं नव्हतं.
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com