तोतया वारसदार
पात्र रचना
बबन - सारंग सरांचा चपराशी
सुभाष -बबनचा मित्र. कटातला भागीदार.
निशांत - शोधकर्ता
नयना - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर
अनिल - विश्रामचा चुलत भाऊ. सातारा.
विनय - अनिलचा मुलगा सातारा.
भाग ६०
भाग ५९ वरून पुढे वाचा....
तिकडे बबन मात्र अस्वस्थ होत होता. १२-१३ दिवस उलटून गेले होते पण अजून जाहिरात काही दिल्या गेली नव्हती. ते काम त्यालाच करायचं होतं आणि अजून सारंग सरांनी काही सांगीतलं नव्हतं.
फोन वाजला. बबनने फोन उचलला. “सारंग वकिलांचं ऑफिस” तो फोन वर बोलला.
“तिथे बबनराव आहेत का? मी त्यांचा साळा बोलतो आहे.” – सुभाष.
“बबनच बोलतो आहे.”
“मी सुभाष. आज भेटायचं का?” – सुभाष.
“हो हो भेटावच लागेल.” – बबन.
“ओके मग आज संध्याकाळी.” असं बोलून सुभाषने फोन ठेवला.
कॉफी हाऊस मधे बबन आणि सुभाष बसले होते.
“बबनराव काय चाललं आहे? तुम्ही म्हणाला होता की दोन तीन दिवसांत जाहिरात येणार आहे म्हणून, पण आता १०-१२ दिवस उलटून गेले आहेत आणि तुम्ही काही बोलतच नाही आहात. माघार घेतली का?” – सुभाष.
“नाही हो, पण विचित्रच झालीय परिस्थिती” बबन म्हणाला.
“काय झालं आहे, नीट सांगता का?’ सुभाषने विचारलं.
जाहिरात दोन तीन दिवसांत द्यायची असं म्हणाले होते, पण त्या गोष्टीला आता १२-१३ दिवस होऊन गेले तरी जाहिरात देण्याविषयी सर काही बोलतच नाहीयेत. चिंतेची बाब झाली आहे.” बबन हताश झाला होता.
“तुम्ही नीट बघितलं का? कदाचित निशांतलाच सांगीतलं असेल जाहिरात द्यायला. आणि आतापर्यन्त त्यानी दिली पण असेल, तुम्हाला माहीत नसेल.” – सुभाष.
“असं कसं होईल? ही सर्व कामं माझीच आहेत.” – बबन.
“तुमचा काही संशय तर आला नसेल ना?” – सुभाष.
“नाही, तसं असतं तर त्यांनी मला ताबडतोब नोकरीवरून काढूनच टाकलं असतं. आणि ऑफिस मधे जे काही बोलणं होतं ते माझ्या कानावर येतच ना. मला आज पर्यन्त कधीच बाहेर जायला सांगीतलं नाहीये. त्यामुळे निशांतला हे काम दिलं असतं तर मला नक्कीच कळलं असतं” बबन म्हणाला.
“मग काही दुसरं कारण आहे का? कोणी अजून तिसरेच गोखले सापडले आहेत का? बबनराव तुम्ही डोळ्यात तेल घालून रहा. आपल्याला ही बातमी कळलीच पाहिजे. नाही तर केलेली सगळी मेहनत पाण्यात जाईल.” सुभाष आता हातघाई वर आला होता.
“अजून कोणी तिसरेच गोखले सापडले असण्याची शक्यता नाहीये, कारण तसं असतं तर निशांत लगेच निघाला असता. पण तो सध्या तरी खूप रीलॅक्स दिसतो आहे. पण मी काय म्हणतो, तुमची सर्व तयारी झाली आहे ना, अजून काही माहिती मिळवायची असेल तर वेळ गेली नाहीये.”-बबन
“तुम्ही चिंताच करू नका. मी पूर्णपणे तयार आहे.” – सुभाष.
“ठीक आहे. मी आता बारीक लक्ष ठेवतो आणि बातमी कळली की आपण लगेच भेटू आणि पुढची योजना बनवू.” – बबन. मीटिंग संपली.
पण बबनला बारीक लक्ष ठेवण्याची वेळच आली नाही. दुसऱ्या दिवशी विनय, नयना आणि निशांत यांची सारंग सरांबरोबर मीटिंग झाली.
“हूं, नयना, विनय काय म्हणते आहे प्रगती? तुम्ही बार चार्ट केला होता न? मग ते टाइम टेबल पाळल्या जाते ना? आज काय परिस्थिती आहे?” – सारंग.
“सगळं अगदी वेळापत्रकानुसारच चालू आहे, किंबहुना आम्ही थोडेसे पुढेच आहोत. तुम्ही निश्चिंत रहा.” नयनाने रीपोर्ट दिला.
‘वा. चला मग आपण जरा फेरफटका मारू.” असं म्हणून सारंग सर उठले.
वाड्यावर आल्यावर नयना आणि विनय प्रत्येक सुधारणेची सविस्तर माहिती देत होती.
सारंग सर सर्व प्रगती पाहून खुश झालेले दिसले. त्यांनी निशांतकडे पाहिलं. “काय निशांत, तुझं काय मत आहे?”
“ठीकच आहे. नयनाचं काम परफेक्टच असतं आणि वरतून विनयची देखरेख मग काय पहायचं? विनय, थोडं जरी इकडे तिकडे झालं किंवा शॉर्ट कट मारलेला दिसला, तर नयनाला सोडू नकोस. आपण पैसे देतो आहे तिला कामा बद्दल.” – निशांत.
“अरे निशांत काय बोलतो आहेस? अरे ती स्वत:च एवढी चोखंदळ आहे आणि बारीक सारिक गोष्टीत सुद्धा तिला हयगय चालत नाही. तुझीच बहीण आहे ती. एवढी कामात वाकबगार आहे, की मी काही बोलणं उचित नाहीये.” – विनयने अगदी पूर्णपणे मनापासून नयनाची तारीफ केली.
बाहेर पडल्यावर सारंग सरांनी निशांतकडे भुवया उंचावून पाहीलं म्हणाले,
“बरोबर आहे निशांत, तुझीच बहीण शोभते ती. तुझ्याच पावलावर पाऊल टाकते आहे. बरोबर ना?”
“म्हणजे? नेमकं काय म्हणायचं आहे सर तुम्हाला?” – निशांत.
तुम्ही दोघं बहीण भाऊ, गोखल्यांच्याबरोबर साट लोटं करता आहात हे काही लपून राहिलं नाहीये. अरे मांजरानी डोळे मिटले, तरी जगाला दिसतंच.” – सारंग.
निशांत हातबुद्ध,तो विचारातच पडला.
‘सारंग सरांना कसं कळलं की माझं आणि वर्षाचं ठरलं आहे म्हणून? विनय आणि नयनाचं वागणं तर सूर्य प्रकाशा इतकं स्पष्ट होतं. पण माझ्या बाबतीत अंदाज कसा बांधला सरांनी?’ त्याला काहीच कळेना. शेवटी त्याने विचारलंच,
“सर तुम्हाला कोणी सांगीतलं माझ्या बद्दल?
“ते महत्वाचं नाहीये, पण खरं सांगू. मला पण आनंद झाला आहे. गोखले फॅमिली खूप सरळ आणि स्वच्छ मनाची आहेत. साधी माणसं आहेत. एवढी श्रीमंती आहे पण कोणालाही अंहकाराचा स्पर्श पण झालेला नाही. विनयला बघितल्यावर कळतच ते. मी तुम्हा दोघांनाही शुभेच्छा देतो. नयना खरंच खूप छान कुटुंबात जाईल. काहीही त्रास होणार नाही तिला. जे करोडोची इस्टेट नाकारू शकतात, त्यांच्याबद्दल काय बोलायचं. नयनाला सुद्धा मी गेले काही दिवस पाहतो आहे, मोठी गोड पोरगी आहे. गोखल्यांच्या घरी सहज सामाऊन जाईल.” बोलता बोलता सारंग सर जरा भावना विवश झाले.
“काय झालं सर?” – निशांत.
“काही नाही रे, उगाच आपलं, मला मुलगी नाहीये, दोन्ही मुलंच. आम्हाला दोघांनाही मुलीची खूप हौस होती. नयनाकडे पाहून उगाच मन भरून आलं.” – सारंग.
निशांत पहातच राहिला. ‘कोर्टा मधे समोरच्या माणसाच्या कठोरपणे चिंध्या करतांनाचे सारंग सर आणि आत्ताचे सारंग सर याच्यात जमीन अस्मानचं अंतर होतं. त्यांचं हे रूप निशांतला नवीनच होतं.’ तो पण जरा हळवा झाला. म्हणाला,
“सर, नयना तुमचीच मुलगी आहे असं समजा.”
ऑफिस मधे येईपर्यंत सारंग सर सावरले होते. निशांतला म्हणाले,
“आता जाहिरात द्यायची वेळ आली आहे असं मला वाटतं, तुझं काय मत आहे?”
“आता अजून कोणाची भर पडणार नाहीये, त्यामुळे हीच योग्य वेळ आहे.” – निशांत.
“ठीक आहे, मी एक मसुदा तयार करून ठेवला आहे, तो नजरे खालून घाल मग फायनल करू. तो पर्यन्त मी विश्रामशी बोलून घेतो आणि त्याला पण सांगतो.” सारंग सर म्हणाले.
सारंग सरांचं विश्रामशी बोलणं झालं. त्यानेही अनुमोदन दिलं. तो पर्यन्त निशांतचा मसुदा वाचून झाला होता.
“एकदम बरोबर.” निशांतने मत दिलं.
“चला, तू ओके केलंय म्हंटल्यांवर मला चिंता नाही.” – सारंग.
“काय सर तुम्ही पण न!” – निशांत.
मग सारंगने बबनला बोलावून तो मसुदा दिला आणि कोण कोणच्या पेपर मधे ती जाहिरात द्यायची ते सांगीतलं आणि देशभरात ती प्रसिद्ध व्हायला हवी हे ही सांगितल.. बबनला तर काय हर्षवायूच व्हायचा बाकी होता, पण त्यानी स्वत:ला आवरलं, आणि तो बाहेर पडला.
दुसऱ्या दिवशी तो आणि सुभाष कॉफी हौस मधे.
“काय बबनराव, काय खबर? तातडीने बोलावलं?” – सुभाष.
“हे बघा मी तुमच्यासाठी खाऊ आणलाय” आणि असं म्हणून त्याने बरोबर आणलेला टाइम्स चा पेपर सुभाषच्या हातात दिला. सुभाषनी जाहिरात वाचली आणि तो उडायलाच लागला. म्हणाला,
“मग आता मी उद्याच जाऊन दावा पेश करतो.” – सुभाष.
“नाही, नको. अगदी उद्याच नको. जरा दोन दिवस जाऊ द्या. मग सारंग सरांची भेट घ्या.” – बबन.
“पण का? उशीर का करायचा? मी समजलो नाही.” सुभाष जरा नर्वस झाला. सगळी तयारी असतांना सुद्धा वेळकाढू पणा करायचा, हे काही त्याला पटत नव्हतं. पण तो काही बोलला नाही.
“तू अगदी उद्याच गेलास, आणि आपल्याला आधी पासूनच कल्पना होती आणि आपण या जाहिरातीची वाटच बघत होतो, असा संशय आला तर, ते खूप खोलात जाऊन चौकशी केल्या शिवाय सोडणार नाहीत. आणि त्या स्थितीत जर त्यांना माझा संशय आला तर सगळीच इमारत कोसळेल. अरे आमचे सर आणि तो निशांत खूप हुशार आहेत, हातात काहीही नसतांना सुद्धा इतके सारे गोखले शोधून काढले त्याने. आणि संशयास्पद काही वाटलं ना, तर तो तुझ्या मागे हात धुवून लागेल बघ. हाडाचा डिटेक्टिव आहे तो. म्हणून जरा दोन दिवस थांब. दोन दिवस हे लोकं उत्सुकतेने वाट बघतील आणि मग थोडे रीलॅक्स होतील, ते निश्चिंत असतांनाच आपण दावा ठोकायचा.” बबनने मुद्दा तपशीलवार स्पष्ट केला. सुभाष बबन कडे बघतच राहिला. इतका विचार बबन करू शकतो यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. शेवटी तो म्हणाला,
“बबनराव, खरंच सारंग सरांच्या तालमीत चांगले तयार झाले आहात तुम्ही. ठीक आहे तुम्हीच ताल माल बघा आणि मला सांगा, त्या प्रमाणे मी प्रगट होईन.”
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com